बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

पवारांची शालीनता अस्ताकडे!Image result for sharad pawarशरद पवारांचा जन्म १२ डिसे १९४० चं. त्यामुळे आज २०१७ मध्ये त्यांचं वय भरतं ७७ वर्षे पूर्ण. पवार साहेबांची राजकीय सुरुवात झाली ती १९६७ मध्ये म्हणजे आज त्यांच्या राजकीय कारकिर्दीला बरोबर ५० वर्षे झालीत. या पन्नास वर्षात त्यांच्या वाटचालीवर अनेक प्रश्न उपस्थीत केले गेलेत. भ्रष्टाचाराचे एकसे बढकर एक आरोप झालेत. कुटील कारस्थाना बद्दल तर पवार नावाचं नवं ब्रांड निर्माण झालय. त्यांच्यावर भरपूर चिखलफेकही झाली. पण या सगळ्यातून जाताना पवारांबद्दल एक कमालीची गोष्ट नोंदली गेली ती म्हणजे त्यांची संपूर्ण कारकीर्द अत्यंत संयत नि शालीनतेला धरुन होती. पवार हे पराकोटीचे संयमी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. पवार साहेबांनी कितीही अटीतटीची वेळ आली तरी शालीनता सोडली नाही हे अगदी विरोधकही मानतात. खैरनार सारख्या एका सनदी अधिका-याने तर भ्रष्टाचाराचे आरोप करुन ट्रकभर पुरावे असल्याचा ओरडा केला व देशभर बदनामी करत फिरले तेंव्हा सुद्धा पवार साहेबांनी संयम कधी ढळू दिला नाही किंवा कोणावर चिखलफेक करण्याच्या पातळीवर ते कधी घसरले नाहीत. ही पवारांची खरी कमाई आहे. उलट या सगळ्यातून जातांना पवार नावाचं व्यक्तिमत्व आजून उजळून निघालं, अधीक परिपक्व होत गेलं. 
पण मागच्या काही वर्षात पवार साहेब मात्र आपल्या शालीनतेला तडा देत असून अत्यंत संयत अशा व्यक्तीमत्वाला राजकीय पाडाव कसा हादरवून सोडू शकतो याचं दर्शन घडवित आहेत. मी अगदी लहानपणापासून पवार साहेबांचा चाहता आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दलच्या बातम्या नि लेख शक्यतो सोडत नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या संयत स्वभावाला पहिला हादरा दिला तो म्हणजे राजू शेट्टीने. उभ्या आयुष्यात कधीच संयम न सोडणारे साहेब पहिल्यांदा तोल जावून बोलले राजू शेट्टी बाबात. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात राजू शेट्टीने पवारांच्या बालेकिल्यांना हादरे देणे सुरु केल्यावर अस्वस्थ झालेले पवार साहेब पहिल्यांदा तोल सोडून राजू शेट्टीच्या जातीवर उतरतात तेंव्हा तमाम (माझ्या सारखे) चाहते अवाक झाले होते. पुढे काही दिवस “तुझी जात कंची रे” नावाचे लेख सोशल मीडियातून असे काही फिरविले गेले की त्यामुळे विरोधकांची कीव येऊन गेली. पवारांचं सार्वजनीक आयुष्यात संयम ढळलेली ही पहिली घटना होती.  
त्या नंतर मग महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यावर तर पवार साहेबांची शालीनता हळूहळू गडून पडत गेली व इतक्या वर्षा पासून जपलेली त्यांची इमेज त्यानीच तोडायला सुरुवात केली. मग नको तिथे नको ते कमेंट करणे, मध्येच मग सकारविरोधी शेरे मारणे, आम्हीच कसे शेतक-याचे तारणहार आहोत याचा अतिरेकी आव आणणे... अशा अनेक प्रकरणातून संयत नि शालीन शरद पवार हळूहळू उथळ पवारांकडे सरकू लागले. जवळपास अर्धा शतक सत्तेत वा सत्तेचा हिस्सा असणारे पवार आजकाल अचानक शेतक-यांच्या दशा व दिशेवर बोलत हिंडू लागतात तेंव्हा त्यांना जरूर शेतक-याची बाजू मांडल्याचं वाटत असावं. पण शेतकरी मात्र मनातल्या मनात हसत असावा की आजच्या परिस्थितीस पवारांची कालची राजकीय सत्ता जबाबदार आहे. शेतक-यांचा तारणहार बनण्याचा प्रयत्न करत फिरणारे पवार खरंतर आजच्या परिस्थीतीस कारणीभूत आहेत व जनता हे जाणून आहे. तरी जनतेला शेंडी लावण्यासाठी पदयात्रा नि तत्सम गोष्टीचा आव आणला जात आहे याला आता फारसा कोणी भुलत नाही हे कालच्या नागपूरच्या पदयात्रेतून सिद्ध झाले. कारण मोठा गाजावाजा करुन केलेल्या या हल्लाबोल पदयात्रेत इनमीन २००-२५० लोकं होती. हा ख-या अर्थाने त्यांचा पराजय आहे. 
इतरांना दोष देण्यापेक्षा या पराजयाला सर्वात आधी पराजय म्हणून स्विकारावे, मग अवलोकन करावे त्या नंतर प्रामाणीकपणे नवे नियोजन आखून घ्यावे. त्यातून ख-या अर्थाने उभारी घेता येईल. पण ते इतक्यात घडेल असे दिसत नाही. या उलट पवार साहेब अधीक उथळ होत चालले असून काहीबाही बोलू लागले आहेत. काल तर पवार साहेबांनी चक्क देवेंद्र फडणवीसांना धमकीच देऊन टाकली. धमकी काय तर "धमकी द्याल तर सत्ता उलथवून टाकू" म्हणजे धमकी के बदले धमकी असा पवारांचा पवित्रा दिसतो. अन इथेच त्यांच्या आजवरची शालीनता व संयत संस्काराचा अंत झाल्याची खात्री पटते. पवार सारख्या परिपक्व नेत्याने इतका उथळपणा करावा हेच मुळात पटत नाही. थोडक्यात आजवरची त्यांची शालीनता व संयतपणा स्वभावाचा भाग नसून तो सत्तेच्या सुरक्षीत आवरणातून आलेला आवाज होता असे वाटू लागते. आज सत्ता नसल्यावर त्या आवाजाला आतला सूर गवसला असून हे खरे पवार आहेत हा युक्तीवाद जास्त तार्कीक वाटतो. आम्ही  मात्र आजवर उगीच त्याला शालीनता व संयतपणा समजत होतो. आता ते सत्तेचं सुरक्षीत आवरण निसटून गेल्यावर जो बाहेर पडतोय तो पवारांचा खरा स्वभाव असून तो कळायला जरा वेळ लागला एवढचा काय त्याचा अर्थ होय. आता हा उथळपणा कुठले टोक गाठतो ते काळच सांगेल. 

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

मायावी अंत, बुद्धचरणी!Image result for mayawatiकाल दि. १० डिसे. २०१७ दिवस रविवारला कस्तूरचंद पार्क नागपूर येथे मायावतीची सभा झाली. नेहमीप्रमाणे या सभेची दोन वैशिष्टे होती ते म्हणजे बोलणारे वक्ते दलीत व ऐकणारे श्रोतेही दलीत. तसही मायावतीच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या सभांना प्रामुख्यांने दलीतच असतात. आजून खोलात जाऊन पाहिल्यास दलितांमध्येही एक खास वर्ग म्हणजे बौद्ध समाज बहुसंखेने असतो. तर एकूण काय तर बोलणारे वक्ते व ऐकणारे श्रोते दोन्ही बहुसंखेने शक्यतो बौद्धच असतात. इतर समाज अगदीच नाममात्र असतो. अशा समाजाच्यापुढे भाषण ठोकतांना मायावती म्हणतात की “धर्मप्रमूख व शंकराचार्यानी सुधरावे, अन्यथा मी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माचा स्विकार करेण” अन कहर म्हणजे यावर तमाम बौद्ध श्रोते मुर्खासारखं टाळ्या पिटतात. मागच्या काही महिन्यांपासून मायावतीने ही घोषणा सातत्याने चालविली आहे. धम्म स्विकारणे वगैरे नुसत्या थापा असून दुरावलेला बौद्ध मतदार परत मिळविण्यासाठी बाईची सगळी खटाटोप सुरु आहे.  बाईनी कोणता धर्म स्विकारावा हा जरी तिचा खाजगी मामला असला तरी  तो ज्या पद्धतीने वापरला जात आहे ते पाहता या मामल्याचा खाजगीपणा तसा खाजगी न राहता सामाजीक मुद्दा बनतो. त्याचं अजून थोडं खोलात जाऊन विश्लेषण केल्यास एक स्वार्थी डाव, तो ही अत्यंत नीच पातळीवरचा जातीयवादी खेळ असल्याचे दिसते. बघा मायावतीची राजकीय कारकिर्दच सुरु झाली आंबेडकरी विचाराच्या पायावर. बाबासाहेब व बुद्धाचे फोटो लावून, त्यांच्या विचाराचे अनुकरण करत असल्याचा सर्वत्र आभास उभं करुन त्यांनी आजवरचा राजकीय प्रवास केला. हे सगळं करताना धर्माने हिंदू राहिल्या मात्र राजकीय लाभासाठी बाईनी आंबेडकरी विचाराची पाईक असल्याचं कायम कृतीतून दाखवत राहिल्या. त्यामुळे तमाम दलित व खास करुन बौद्ध समाज बाईच्या पाठीशी उभा राहात गेला व ती अनेक पदं उपभोगत गेली. जवळपास दोन दशकं बाईनी सत्ता किंवा सत्तेत महत्वाचा वाटा राखला होता. या काळात ना तिला हिंदू असल्याचं आठवलं, ना बौद्ध धम्म स्विकारणे गरजेचे वाटले. कारण सगळं मस्त चालू असतांना असल्या वैचारीक उचापतीची गरजच भासत नव्हती. बाई पार विसरून गेल्या की त्या इथवर कशा आल्या? त्यांनी  जे काही मिळविलं ते कोणत्या विचारधारेमुळे मिळालं याचाच विसर पडला. मग त्यातूनच तिचा मतदार दुरावत गेला व बाई गाफील राहिली. यातच मग आली मोदी लाट अन चक्क तिच्या बालेकिल्ल्यतच तिचा पक्ष भुईसपाट झाला. मग मात्र बाईला खाटकन जाग आली व ज्यांच्यामुळे इथवर पोहचलो त्यांनी साथ सोडल्याचा कळलं. तेंव्हा कुठे मग बाईला बौद्ध धम्माचा परत एकदा साक्षात्कार झाला. पण आजचा मतदार हुशार आहे. तो लबाड्या लांड्याना ओळखून आपलं मत देत असतो. मग लोकसभेत मिळालेला फटका विधानसभेतही मिळाला व बाई पार तुटून गेल्या. तिथून सुरु झाला नवा राग.... "मै बौद्ध बनुंगी" पण मतदार आता बाईची लबाडी ओळखून आहे. तू बन किंवा नको बनू आम्हाला काय त्याचं... अशी मतदाराची मानसिकता झालेली आहे.  
मजेची बाब म्हणजे पहिल्यांदा बाईवर अशी वेळ आली आहे की राज्यसभेत जाण्यासाठी आवश्यक असलेला आकडा यावेळेस बाईकडे नाही. चार वेळा मुख्यमंत्री पद भुषविलेल्या व एका मोठ्या पक्षाच्या प्रमुखावर अशी वेळ येणे म्हणजे तिच्या राजकीय धोरणात काहितरी प्रचंड घोळ होत असून त्याला वेळीच सुधारण्याची गरज असल्याचा हा संकेत होय. पण स्वतच्या मस्तीत असणा-या लोकांना असले संकेत वगैरे कळत नसतात व त्यातून ते स्वत:ला आहे त्या स्तिथीतून आणखी वाईट स्तिथीकडे लोटत नेत असतात. मायावतीचं अगदी हेच सुरु आहे. माणसाच्या आयुष्यात अवलोकन हा एक असा गूण आहे, की त्याचं योग्यवेळी वापर न केल्यास होणारं नुकसान उगीच चारपट जास्त विध्वंस करु जातो. योग्य अवलोकनानी मात्र नुसतं विध्वसांची तिव्रताच कमी होत नसते तर प्रसंगी येणा-या संकटाला योग्य नियोजनातून थेट बायपासही केलं जाऊ शकतं. पण हे सगळं तेंव्हा होतं जेंव्हा माणूस अवलोकनातून आपल्या चुका मान्य करण्यास तयार असतो. त्याच बरोबर त्या सुधारण्याची तयारी ठेवतो. मायावती बाबतीत ही शक्यता अजिबात नाही. बाईला वाटतं की आली वाईट वेळ की घ्या आंबेडकराचं नाव... पण हे नेहमी नेहमी करुन चालणार नाही. एका टप्प्यावर लोकं तुम्हाला ओळखू लागलीत की मग कोणाचही नाव घ्या, तुमच्या मागे कोणीच उभं राहात नाही. त्यासाठी उमेदीचा काळात तुम्ही विश्वासार्हता कमवायची असते. मायावतीनी नेमकी तिचं कमावली नाही. उलट असली नुसली गमावली आहे. 
पारंपारीक राजकारणात व मतदारांत मागच्या चारपाच वर्षात जो बदल घडत आहे त्याची चाहूल सगळ्यात आधी भाजपला लागली व त्यांनी त्याचं भरपूर फायदा उठविला आहे. डावे, कॉंग्रेस नि आंबेडकरी मात्र आजही गाफिलच आहे. मायावतीला तर या बदलाचा अजून गंधही लागला नाहीये. ती आजूनही नव्वदीच्या दशकातील पॅटर्नला अशी काही कवटाळून आहे की ती बुडती नव्वदीतली नाव पुरती समुद्राच्या तळाला लागलीतरी बाईचं कवटाळणं काही संपेना. उलट अधीक करकचून धरणे चालू असल्यामुळे बसपाचं पुढे काय होणार हे सांगायची गरज उरत नाही. कट्ट्रर जातीयवादी मतदारांनी उत्तर प्रदेशात घडविलेला बदल पाहता वा-याची दिशा ओळखून पारंपारीक साच्यातून बाहेर पडत पक्षाला नव्या वैचारीक साच्यात बसविण्याची गरज आहे. ते करतांना जातीय समिकरणाला अग्रक्रमावरुन जरा दोन-तीन क्रमांक खाली ढकलत पक्षाचा मुख्य फोकस नव्या पिढीच्या गरजेनुसार आखायला हवा. पण ते करण्याची अजूनही काही पक्षांना गरज वाटत नाही. बसप त्यातलाच एक पक्ष.

बौद्ध धम्म
मायावतीच्या राजकारणात आजवर बौद्ध धम्म सायलेंट फिचर होता, तो आता सालियंट(महत्वाचा) फिचर बनवून नव्याने उभारी घेण्याचा डाव दिसतोय, पण मतदार अधीक परिपक्व नि सुजाण झालाय याचा बाईला अंदाज आलेला दिसत नाही.  आज पर्यंत तमाम राजकीय पुढा-यांनी बौद्धांना हवे तसे हवते तिथे राजकीय स्वार्थापायी वापरुन घेतले आहे. पण मागच्या १०-१२ वर्षात बौद्ध मतदार सुजाणपणा दाखवत सगळ्यांनाचा धूळ चारत आहे. अगदी झोपडपट्टीतील पैसे घेऊन मत टाकणारा बौद्ध मतदारही राजकीय पुढा-यांची लबाडी ओळखून आहे. त्यातूनच मग महाराष्ट्रातील सगळ्या रिपब्लीकन गटांची दाणादाण तर उडालीच पण आठवले सारखा जोकरही (जो कधीकाळी निवडून यायचा) थेट निवडून येण्याचे थांबले. आजच्या घडीला एकही बौद्ध पुढारी बसप/रिपब्लीकनच्या वगैरे तिकीटावर थेट लोकांतून निवडून आल्याचा पुरावा नाही. विदर्भात आंबेडकरी मतदार मोठ्या प्रमाणात असूनही या पक्षांच्या उमेदवारांना ज्या प्रकारे बौद्धानी नाकारले त्याचं कारण एकच... बौद्ध पुढा-यांनी विश्वासार्हता गमावली, एवढच.
अशा दारूण परिस्थीतीत विश्वासार्ह वाटणा-या पुढा-याचा उदय होणे गरजेचे आहे. पण प्राप्त पुढा-यांना मात्र ही नवी डिमांड दिसतच नाही. ते आजूनही याच भ्रमात आहेत की आपण बाबासाहेब ब दुद्धाचं नाव घेऊन राजकारण खेळू शकतो. काल मायावतीने कस्तूरचंद पार्क, नागपुरात याचंच दर्शन घडवलं. बाई म्हणली की मी हिंदू धर्म सोडेन... कोणाच्या पुढे तर, बौध्दांच्या... म्हणजे बाई आजही किमाण ३० वर्षे काळाच्या मागे चालत आहेत. तीस पसतीस वर्षा आधी अशा वाक्यांनी पुढे बसलेला बौद्ध भारावून जात असे व कोणीतरी नवा हीरा आपल्यात येणार म्हणून मग त्याला राजकीय शक्ती प्रदान करत असे. त्यातूनच मग आंबेडकरी विचाराचा आव आणणारे लबाड लांडगे मोठ्या पदावर बसत गेले. पण मागच्या तीस पस्तीस वर्षात आंबेडकरी विचाराचा आव आणण्याचा खेळ नेमका कोणत्या हेतूने खेळला जातो हे आंबेडकरी जनतेस अचूक ओळखले आहे. आता कोणी भारावून बिरावून जात नाही. आजचा बौद्धा खूप हुशार असून निळे झेंडे नुसतेच नावाचे आहेत हे ओळखून आहे. म्हणून मग नागपूर सारख्या शहरात जिथे आंबेडकरी मतदार मोठ्या प्रमाणात आहे तिथे निळे सरदारांची दाणादाण उडत असते.... अन ही कोणी त्रैयस्थ उडवत नाही तर आपलेच निळे सैनिक जे त्या झेंड्याला आतून सलाम करतात तेच झेंडा धरुन हिंडणा-याचा पाडाव करत असतात. कारण निळा सैनिक झेंडा धरुन हिंडणा-या पुढा-याची लबाडी ओळखून आहे.
त्यामुळे मायावती बाईनी हिंदू धर्मात राहिलं काय... किंवा बौद्ध धम्म स्विकारलं काय... दोन्ही केसमध्ये आता निळा सैनिक यांच्या लबाड्यांना फसणे तसे अवघड आहे. तो फसत नाही हे कळायला आजून दोन निवडणूका जावे लागतील बहुतेक. अन तोवर मायावती सुधारल्या नाही तर तिचा पूर्णपणे राजकीय़ अस्त झालेला असेल. राहिला प्रश्न तिच्या बौद्ध धम्माचा.... अशा लबाड बाईचं तसही बौद्ध धम्मात काही काम नाही. तरी हा मायावी अंत बुद्ध चरणी होतो की नाही ते काळच सांगेल.

शनिवार, २ डिसेंबर, २०१७

माहारकीचे डोहाळे लागतात तेंव्हा...!

Image result for nitin aageकोपर्डी केसचा निकाल व खर्डा केसचा निकाल एकाच महिन्यात लागले. दोन्ही केस खुनाचे होते. कोपर्डीत दलितांनी एका मराठा मुलीचा बलात्कार करुन खून केला होता तर खर्ड्यात मराठ्यांनी जातीयवादातून दलीत मुलाचा (नितीन आगे)चा खून केला. दोन्ही केसेमध्ये प्रत्यक्ष पुरावे नव्हते. दोन्ही केस परिस्थीतीजन्य पुरावे नि साक्षीदार यांच्या भरवश्यावर लढविले गेले. यात कोपर्डी केसमध्ये मराठा लोकांनी जे वादळ उठवून एकूण न्यायव्यवस्था व सरकारवर जो दबाव टाकला त्याची परिणीती म्हणून आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली. पण हा असा दबाव दलीत समाजाकडून टाकण्याची आमची ना ताकत ना कुवत. त्यामुळे नितीन आगेचे खुनी मोकाट सुटले. त्याहून लज्जास्पद बाब म्हणजे सगळे साक्षीदार नितीनच्या केसमध्ये चक्क पलटले. म्हणजे याचाच अर्थ असा की दलीतांच्या तोंडावर थुकत हे साक्षीदार खुन्यांच्या बाजूने आपला फेवर देतात व आपण सगळे त्यावर ब्र अक्षर उच्चारायची हिंमत दाखवत नाही. तमाम न्यायप्रिय एनजीओ व मराठा समाज जे न्यायाचा आग्रह धरण्याचा आव आणत लाखोचे मूक मोर्चे काढले त्यांनी आपली मर्यादा दाखव त्यांचा न्यायाचा आग्रह फक्त त्यांच्या समाजापुरता आहे हे दाखवून दिले. याचा दुसरा अर्थ असाही निघतो की  त्या त्या समाजाने आपल्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावे.
महाराष्ट्रात एक अदृश्य शक्ती अस्तीत्वात असून ती सर्वत्र फिरत असते. ती जिथे असते तिथे नसते व जिथे नसते तिथे अधीक जोमात असते असं म्हटलं जातं. पण कोपर्डी व खर्डा प्रकरणी मात्र ही अदृश्य शक्ती (पवार) चक्क उघड उघड कोपर्डीतील मराठ्यांच्या बाजूने पुर्ण शक्ती पणाला लावून उतरली.  केसचा सोक्षमोक्ष लागेस्तोवर पाठपुरावा केला. पण याच पवार शक्तीचा कोणताच अंश खर्ड्याच्या केसमध्ये मात्र दोषी असलेल्या मराठ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून हालचाल करताना दिसला नाही. थोडक्यात कालवर जे पवार न्यायाच्या बाजूने असण्याचा आव आणत होते ते जातभाईचा प्रश्न येताच चक्क पलटी मारतात. हे असले पुरोगामी दलीतांसाठी खरे घातकी असतात हे आतातरी दलितांनी ओळखावे. पवार व त्यांचे कुटूंब जर खरच न्यायप्रिय व सेक्यूलर असते तर जितका जोर कोपर्डीच्या आरोपींच्या विरोधात लावला, तेवढाच जोर खर्ड्याच्या आरोपींच्या विरोधात लावायला हवं होतं. पण खर्ड्याचे आरोपी जातभाई आहेत हे कळल्यावर पवार व त्यांच्या कन्या सुळे यांनी पद्धतशीरपणे तिथून काढता पाय घेतला. त्यामुळे मराठा आरोपींना निसटण्याची संधी मिळावी याची सोय लागली. जे साक्षीदार कोर्टात उभे झाले ते साक्षीपासून पलटण्याची हिंमत करु शकले. जोडीला पोलिसांवर सुद्धा जबाबदारी पार पाडण्याबाबत कोणी मोठा माणूस दबाब टाकत नसल्यामुळे बेफिकीरपणे या केसचं इन्वेस्टिगेशन तर झालच पण साक्षीदारांना सुद्धा यातून अभय मिळण्याचा संकेत गेला. त्यामुळे नेमक्या वेळी हे सगळे साक्षीदार पलटले. याचा एकूण परिणाम असा झाला की नितीन आगेचे खुनी मोकाट सुटले.
याची दुसरी बाजू अशी की आंबेडकरी चळवळीचं नाव घेऊन मोठे झालेले नेते व अधिकारी तसेच संघटना हे एकतर राजकीय गणितं मांडून गुलाम बनले आहेत किंवा आर्थीक हीताची समिकरणं बिघडू नये म्हणून गप गुमान झाली आहेत. थोडक्यात पराकोटीचे स्वार्थ गाठत हे सगळे तथाकथीत नेते नितीन आगे केसमध्ये दलीताला न्याय मिळाला नाही यावर बोलण्यापेक्षा कोपर्डीत कसा न्याय मिळाला याचा गोंगाट करत सुटले आहेत. यामागे न्याय मिळाल्याचा आनंद असण्यापेक्षा माहारकीचं लक्षणच अधीक आहे.  धर्मांतरापुर्वी आपल्या अंगात असलेला महारकीचा गूण उसळी मारुन आलेमुळे हे तमाम महार मराठ्यांची गुलामी इमाने इतबारे बजावत सुटले असून पुर्वाश्रमीचा नावाला शोभेल असं वागू लागले आहेत. त्यामागील कारण काय.... निव्वड स्वार्थ, बास!
थोडक्यात एकाच महिन्यात एकाच जिल्ह्यात, एकसमान गुन्ह्यासाठी या दोन परस्पर विसंगती असणारे निकाल न्यायालयात लागले. दोन्हीकडे खूनाचे आरोप असतांना मराठा पिडीत केसमध्ये न्याय होतो पण दलित पिडीत केसमध्ये मराठे मोकाट सुटतात. यामागे मराठा मूक मोर्चाचे राक्षसी दडपण कोपर्डीत न्याय घडविण्यात मोलाची कामगिरी बाजावते. पण असलं दडपण निर्माण करण्यास असमर्थ असलेल्या दलित “नितीन आगे” ला मात्र न्याय मिळत नाही. आम्ही परत एकदा गुलामीच्या देशेनी निघालो असून बौद्ध धर्माचा त्याग करुन मराठ्यांची महारकी करावी अशा अवस्थेला पोहचलो की काय असे वाटू लागले आहे. 
संघटीत होऊन स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न मागच्या पाऊन शतकापासून चालू असला तरी काही नेते मंडळी व संघटना यांनी नितीन आगे प्रकरणात ज्या पद्धतीने मौन धरले आहे ते पाहता एवढच म्हणेन... समाजाला  जेंव्हा महारकीचे डोहाळे लागतात तेंव्हा कुठे ना कुठे एका नितीन आगेचा पराभव जरूर होत असतो.

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

कभी उज्वल, कभी निकम्मा.Image result for ujjwal nikamसध्या उज्वल निकमवर कोपर्डी केसच्या निमित्याने शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. त्यांनी केलेलं कामही तेवढच महत्वाचं आहे. एका मुलीवर बलात्कार करणा-या नराधमाना थेट फाशी पर्यंत पोहचविण्याची निकमांची कर्तबगारी स्तूतीस पात्र आहेच. त्याहून अधीक महत्वाची गोष्ट म्हणजे कोपर्डी केसमध्ये आरोपींच्या विरोधात एकही थेट पुरावा नव्हता. मग जेंव्हा थेट पुरावा नसतो तेंव्हा परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारे केस लढली जाते. अशी केस शक्यतो लढणारा हारतो व बचाव पक्ष जिंकत असतो. कारण अरोपीच्या विरोधात कोणताही थेट पुरावा नसल्यामुळे सगळी केस अंदाज व परिस्थीतीच्या जोरावर लढली जाते. यातले अनेक अंदाज मग चूक ठरतात किंवा काही अंदाज चूक ठरले नाही तरी त्याच्या भरवश्यावर मोठी शिक्षा देणे तसे धाडसी असते. मग एकूण परिस्थीतीच ठोस निर्णया पर्यंत जाण्यास कमवूवत असल्यामुळे यात अरोपीला ’बेनिफीट ऑफ डॉऊट’ चा फायदा मिळतो व आरोपी सुटतो. तर कोपर्डीच्या केसमध्ये अगदी हीच परिस्थीती होती. म्हणजे आरोपी सुटण्याची शक्यताच अधीक होती. ज्या तीन अरोपींवर आरोप होते त्यांच्या विरोधात एकही ठोस पुरावा नव्हता. म्हणजे अख्खी केस परिस्थीतीजन्य पुराव्यांवर लढली गेली. त्यामुळे शिक्षा होण्याची शक्यता तशी फारच कमी होती. पण उज्वल निकमनी परिस्थीतीजन्य पुराव्याच्या आधारे ती केस जिंकली व आरोपींना थेट फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे निकमांचं कौतूकच.

खैरलांजी केस
याच्या अगदी उलट खैरलांजीची केस होती. जातीयवादी लोकांनी आई, मुलगी व दोन मुलांना अख्या गावाच्या पुढे मार मार मारलं. मग त्यांचे कपडे उतरवून नागडी वरात काढली. उभ्या गावानी हा तमाशा पाहिला. त्या नंतर दोन मुलांची हत्या करण्यात आली. मग तरुण मुलीवर बलात्कार करण्यात आला. आईवरही बलात्कार करण्यात आला. त्या नंगर त्यांचीही हत्या करण्यात आली. हे सगळं लपून छपून नाही तर उभ्या गावाच्या पुढे करण्यात आलं. म्हणजे आरोपींचा गुन्हा व घडलेला प्रकार पाहणारे लोकं याचा तळमेळ नीट बसविला असता तर सगळेच्या सगळे आरोपी फासावर चढायला पाहिजे होते. जातीयवादातून झालेल्या या हत्याकांडात दलीत हे पिढीत होते तर आरोपी उच्चवर्णीय. मग काय इथेही उज्वल निकम सरकारी वकील म्हणून केस लढले. इथे तर आरोपिंना फासावर चढविण्याची पुर्ण शक्यता होती. पण तसलं काही घडलं नाही.
निव्वड परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला फाशी पर्यंत पोहचविण्याची कुवत बाळगणारा उज्वल निकम खैरलांजी केसमध्ये मात्र अशी किमया घडवित नाही. खैरलांची हत्याकांड सर्वार्थाने कोपर्डीपेक्षा अधीक क्रुर व अधीक हिणकस होता. रेअरेस्ट ऑफ रेअरच्या निकषावर १००% खरा ठरणारा हत्याकांड होता. म्हणजे या हत्याकांडातील आरोपीना हमखास फाशी व्हायला हवी होती. पण एकालाही फाशी होत नाही. वकील हाच, डावपेच हेच, बुद्धीमत्ता हीच...पण आरोपिंना मात्र फाशी होत नाही. हे कसं काय घडलं ते उज्वल निकमच जाणे. उलट तीन आरोपी बाईज्जत बरी होतात ही गोष्ट उज्वल निकमवर सवाल उठवायला भाग पाडते. त्या तीन आरोपींची नावे खालील प्रमाणे आहेत.

१) महीपाल धांडे
२)धरमपाल धांडे
३) पुरुषोत्तम तित्तीरमारे

तर उज्वल निकम सारखा वकील केस लढूनही वरील तीन आरोपी मुक्त होतात ही आमच्यासाठी खरच लज्जेची बाब आहे. त्यासाठीच म्हणतो की या ताकदीचा वकील आपल्या समाजाचा असला पाहिजे. कारण जे उज्वल निकम-बिकम प्रकार आहे ते कितीही कर्तबगार असले तरी आपल्या कामाचे नक्कीच नाहीत. यांचं काळ वेळ पाहून कर्तबगारी उभारी घेते. मराठा मोर्चे व पवार कुटुंबाच्या दडपणात उज्वल निकमांनी कोपर्डी केसमध्ये  मोठा चमत्कार घडविला. पण हाच चमत्कार खैरलांजी प्रकरणात घडलेला नाही. म्हणून म्हणतो... आपल्याला आपला माणूसच हवा जो जी-जान लावून केस लढू शकेल.
कोपर्डीत सगळेच्या सगळे आरोपींना फाशी पर्यंत पोहचविणारा पण खैरलांजीत मात्र फाशी तर सोडाचा खुनातील तीन आरोपींना मुक्त होतांना हताश होऊन पाहणारा उज्वल निकम हे दोन्ही निकम एकच उज्वल निकम असू शकत नाही. त्यामागे एक विशेष उज्वल निकम असतो. त्याला कसं डिफाईन करायच ते माहीत नाही पण सध्या तरी एवढ म्हणता येईल “कभी उज्वल, कभी निकम्मा” बास!