मंगळवार, २९ डिसेंबर, २००९

राजमलाई चॉकलेट


माझं तिसरी पर्यंतचं शिक्षण कुडकेल्लीत झालं. गावात पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती म्हणुन पुढचं शिक्षण म्हणजेच ४ थी पासुन पुढचं शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाव लागलं. समूह निवासी वसतिगृह (सनिव), एटापल्लीला ४ थ्या वर्गासाठी प्रवेश घेतला, एकदाची राहण्याची व शिक्षणाचि सोय झाली होती. मला माहीत नाही आजच्या मुलाना चवथ्या वर्गात असताना किती कळतं, पण आम्हाला मात्र परिस्थीतीमुळे लहान वयात अगदी मोठ्या माणसा सारखी समज्-उमज आलेली होती. आईला खऊ साठी पैसे मागणे वगैरे तर दूर पण एखाच्या रात्री आईन जेवण वाढलं नाही तर आजची दिवस उपाशी काढायची आहे हे त्या वयात न सांगता कळायचं. अशा परिस्थीतीत माझं बालपण गेल. तर मी जेंव्हा ४थ्या वर्गात शिकायला म्हणून एटापल्लीत दाखद झालो तेंव्हा समूह निवासी वसतीगृहात राहयचो. आई महिन्यातुन एकदा मला भेटायला यायची. मग आई सोबत दिवसभर गावात हिंडायचो. सायंकाळी आई परत जाताना पाच रुपयाची नोट हातात ठेवायची. आता हे पाच रुपये पुढच्या महिन्यापर्यंत पुरवायचे असत. तसं बघितलंतर आम्हाला पैशाची गरजच पडत नसे. कारण खाणं व राहणं तर शासनाकडुन मोफतच होतं. शिवाय आमच्या होस्टेलात जवळपास सगळ्याच गरजेच्या वस्तू शासनाकडुन फु़कटात मिळायच्या. लोखंडी कॉट, गादी, चादर, ब्लँकेट, मच्छरदानी, पेटी, ताट, ग्लास, वाटी, पुस्तकं हे सगळ One Time One return basis वर मिळायचं. या व्यतिरिक्त खोब्रेल तेल एक लाईफबाय साबन (जे संपता संपेना)निरमा, रीन किंवा इतर कुठलं तरी कपडे धूण्याच साबन मिळायचं. आमच्या गावात कपडेधुण्याचं एकमेव आम्हाला ज्ञात साबन म्हणजे राजस्थानी काळा-बार किंवा काळी-बट्टी(काळा साबन). अन इकडे सनिवत चक्क रीन साबन हातात ठेवल्यावर मी तर उडालोच. कारण हे असलं साबन मी माझ्या बापजन्मी पाहिलेलं नव्हतं. मग या नवलाईच्या साबनाचं एवढ कौतुक की वापरताना कमित कमी वापर व्हावा म्हणून त्याचे दोन तुकडे करुन १५ दिवस पुरवायचो अन दुसरा तुकडा पेटीत लपवुन ठेवायचो. पण बरेच वेळा कुणीतरी सिनिअर मुलं हा दुसरा तुकडा लांबवायचे. असो.
मला हे सांगायचं होतं की होस्टेलात असताना पैशाची फार गरज पडायची नाही. मग आईने दिलेल्या पाच रुपयाचं करायचं काय. आमच्या गावाकडे हाट(आठवडी बाजार)भरतो. हा हाट म्हणजे जणू जत्राच. आसपासच्या गावातुन सगळी लोकं खरेदीसाठी हाटात हजेरी लावतात. एरवी होस्टेल मधुन बाहेर जायला परवानगी मिळत नसे, पण हाटाचा पगडा एवढा की आमचे अधिक्षक/वार्डन (रेक्टर हा शबद आजही तिथे प्रचलित नाही) आम्हाला हाटात जायची सुट्टी मात्र कधीच नाकारत नसत.  मला आठवतं जेंव्हा मी पहिल्यांदा वसतीगृहातुन सुट्टी घेऊन एटापल्लीच्या हाटात शिरलो, तेंव्हा मला जो आनंद झाला तो मी शब्दात व्यक्त करण्या पलिकडचा आहे. लहानचा मुलगा, हातात पाच रुपयाची नोट धरुन एकटाच चाललो हाटाच्या दिशेनी. गावात नवीन असल्यामुळे आजुनतरी इतरांशी मैत्री व्हायची होती. या आधी दुसरीत असताना केंव्हातरी मावस बहिणीसोबत पेरमिल्लीच्या हाटात गेलो होतो. त्या नंतर हाटात जाण्याची ही माझी दुसरी वेळ होती. नुकतच आठ दिवसा आधी वसतिगृहात प्रवेश घेतला होता. त्यात भर म्हणजे हे एटापल्लीचं हाट नेमकं कुठे भरतो हेच माहीत नव्हतं. लोकाना विचारत विचारत एकदाचा हाटात पोहचलो. सगळीकडे लोकांची गर्दी.  हाटात शिरताच उजव्या हातावर कुंभार मडके घेऊन बसलेला. थोडसं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेनी दोन्ही बाजूला दुकानांची तुफान गर्दी. हे असलं पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्यातल्या त्यात हे दुकानदार तार स्वरात ओरडून ओरडून गि-हाईकाना आकर्षीत करत होते.   खरंतर हाटात आल्याचा आनंद होत होताच, पण ओरडून गि-हाकांना बोलविण्याचा प्रकार पाहून जरा दचकलोच. मग हळूच पुढे सरकताना वाकड्या नजरेनी कशाचं द्कान आहे याचा अंदाज घेउ लागलो. पण दुकानदारल अव्वल होते, ते चोर नजरेला पटकन धरायचे अन भूवया उंचावून “बाताल गावाल?” (काय हवय) म्हणायचे. बोलायची तर हिंम्मत सोडाच पण त्या नजरेचा सामना करण्याचीही हिंमत नव्हती. मग चटकन आपली नजर दुसरीकडे वळवत मी नाही त्यातला टाईप हावभाव करत जणू काही अपराध केला अशा अवस्थेतून सावरावं लागे.  पाच सहा दुकान ओलांडे पर्यंत प्रचंड प्रगती झाली. आता तिरक्या नजरेने दुकानाचा वेध घेणे तर जमलेच अन भीतीही गेली.  हाटात हिंडताना दुकानातील सामान हेरणं ही एक कलाच. ती जर तुम्हाला जमली नाही तर एखादा दुकानदार तुम्हाला दुकाना बोलावतो. मग दोन चार वस्तू तर दाखवतोच पण ती वस्तू तुमच्या गळ्यातही मारतो.  हे सगळं टाळायचं असल्यास दुकानात न शिरता आधी हाट हिंडून पाहावं, मग काय ते ठरवावं. त्या साठी तुम्हाला तिरक्या नजरेनी पाहता आलचं  पाहिजे.  अन खास करुन जर खिशात पैसे नसतील तेंव्हा...
मी मात्र काही मिनटात ही कला शिकलो. मग या कलेच्या जोरावर अख्खं हाट हिंडून झालं. पण एका दुकानात मात्र नजर अडकली, तोंडाला पाणी सुटले. ते दुकान होतं जिलेबीचं. खरच तो हाटातला जिलेबीवाला मोठा जालीम असतो. आमच्या एटापल्लीच्या हाटातले जिलेबीवाली अगदी रस्त्याच्या कडेला जेलीबीसाठी मोठी चूल लावायचे. त्यावर मोठी कढई ठेवून तेल कढवायचे. जेंव्हा बाजारात लोकांची गर्दी वाढायाची तेंव्हा ते सगळ्यांदेखत जिलेबी तळायचे. अन तळून झाले की शेजारच्या मोठ्या गंजातील साखरेच्या पाकात बुडवायचे. हे सगळं करताना जेलिबी काढणे एवढीच कृती होत नसून ती लोकाना आकर्षीत करेल याचे हतखंडे वापरले जायचे. हे सगळं पाहून तोंडाअला पाणी सुटलं नाही तर नवल.  मी जागीच थांबलो व दुकानेकडे बघु लागलो. दुकानदारानी “जिलेबी पाहीजे का?”  अशा डरावन्या आवाजात विचारलं. मी म्हटलं हो! अन एक रुपयाची जिलेबी घेऊन चार रुपये परत घेतले व हाटाच्या बाहेर पडलो. आता कुठेतरी बसून ही जिलेबी खायची होती, जागा शोधू लागलो.  मग मला एका दुकानाच्या समोर मोठाल्या दोन लोखंडी टाक्या(रॉकेलच्या) दिसल्या, व तिकडे माणसांचा तसा वावरही कमी होता. अन झाडांची सावलीही होती. मी लगेच टाक्यांच्या दिशेनी धावलो अन निवांत बसून जिलेबी खाल्ली.  खिशात जून ४ रुपये शिल्लक होते. परत हाटात जावं अन काहीतरी खावं याचा विचार करतो होते तेवढ्यात आवाज आला “ए.. मध्या, काय करुन राहिलास?” वळुन पाहिलं तर चंद्रभान नावाचा वर्गमित्र अन वसतिगृहातला सोबती. त्याला सांगितलं की जिलेबी खाल्ली आणी माझ्याकडे आजुन दोन रुपये आहेत (४ रुपये सांगितल्यास तो सगळे पैसे खर्च करायल लावेल या भितीपोटी दो रुपये लपवले) “चल काहितरी खाऊ” अन  तो म्हणाला “अरे माझ्याकडे पण एक रुपया आहे चल आपण राजमलाई खाऊ या”  अन आम्ही दोघं राजमलाई घ्यायला निघालो. आयुष्यात पहिल्यांदा हा शब्द ऐकला होता. म्हटलं राजमलाई काय असते? "अरे च्याकलेट हाय त्ये, तुले नाई मायीत? एकदम बाक्की असते.” ( बाक्की म्हणजे छान, टेस्टी) म्हटलं “नाई रे चंद्र्या, आजच नाव ऐकुन रायीलो.”
आमच्या कुडकेल्लीत तेंव्हा राजमलाई पोहचली नव्हती, म्हणून मला माहीत नव्हतं की असं काहीतरी असत ते. पण हा पठठा राजमलाई बहाद्दर होता. गादेवारच दुकान (आजही याच नावाने आहे) पुढेच होतं. आम्ही दोघे तिथे गेलो अन दोन रुपयाचे चार राजमलाई घेतले. रॅपर काढलं, ते चॉकलेट कसलं लहान वडीच होती ती.  पुर्ण वडी एकाच वेळी तोंडात मावेना. मग दोन तुकडे केले अन एक तुकडा तोंडात घातला. आ...हा... काय ती चव होती. अप्रतिम चव कशाला म्हणतात ते राजमलाई खाल्ल्यावर कळलं. पार त्या चविनी मी वेडाच झालो. शुद्ध तुपात शिजवलेलं, थोडसं करपटसं अशी काही तरी ती चव पण होती मात्र अगदी वेगळी. एकदा राजमलाई खाल्ला की काही तास चव जिभेवर असायची, आजही ती तुपकट चव जिभेवर आहेच.  दुसरी वडीही लगेच तोंडात. मी म्हणजे पक्का गावठी, ज्याला ह्या असल्या शहरी चॉकलेट बिकलेटची ओळख नव्हती. आमच्या कुडकेल्लीत पिपरमेट मिळायचे. ते ही अत्यंत स्वतात, अगदी२५ पैशात ५ मिळायचे (अन कुडकेल्लीत आजही मिळतात). पिपरमेटच्या पलिकडे आजून काही असतं हे माहीत नव्हतं. अन ईथे आज थेट राजमलाईशी गाठ पडली. राजमलाई म्हणजे नुसतं चॉकलेट नव्हेच. तो आहे चॉकलेटचा राजा. मग काय १० मिनीटा आधी चंद्र्याशी खोटं बोललो त्याचं बरं वाटलं.  कारण खिश्यात जे दोन रुपये उरले होते त्यातून आता आजून चार राजमलाई खाता येणार होते.  पण त्या आधी चंद्र्याला कटवायचं होतं. अनेक प्रयत्न केले पण पठ्ठा पिच्छा सोडायला तयार नव्हता.  सगळे प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर मुकाटयाने त्याच्या सोबत वसतीगृहात परत गेलो. तो दिवस होता मंगळवार आता पुढच्या मंगळवाराशीवाय गावात जायला सुट्टी मिळणार नव्हती आणि राजमलाईसाठी माझा जिव जिभेत येऊन अडकला होता. काही केल्या ती चव डोक्यातुन जाईना. बरं आमची शाळा अगदी वसतीगॄहाच्या मागे. म्हणुन शाळेतुन दांडी मारुन गावात जायला मार्गच नव्हता. मग रोज शाळेसमोर बसुन नरडे (बॉबी) विकणा-या मावशीला विचारायचो “तुमच्याकडे राजमलाई मिळते का” अन तिचंही उत्तर ठरलेलं “नाही." एक दिवस तर तिनी मला खडसावलच “एकदा सांगितलेलं कळत नाही, रोज येऊन त्रास देतोस” अन विचरणं थांबलं.  पण मी काय सांगू माझी काय अवस्था झाली होती ती. या राजमलाईने तर मला वेड लावलं होतं. अने नाना प्रयत्न करुन थकून गेलो पण राजमलाई काही मिळेना. राजमलाई मिळविण्याचे सगळे मार्ग मंगळवार पर्यंत बंद झाले याची खात्री झाल्यावर हताश होऊन मंगळवारची वाट बघत बसलो.

आणि एक दिवस मंगळवार उजळला...!!!
------------xxxxxxxxxxxxxxxxx-----------
आत्ता, मागच्या रविवारी अकोल्यात एक मित्राच्या लग्नाला गेलो. लग्न एका खेड्यातच होतं, सिगारेट घेण्यासाठी आम्ही दुकानात गेलो, तर मला चक्क राजमलाई दिसली, मग काय सिगारेट कँन्सल... राजमलाई जिंदाबाद. चक्क दोन दशकानंतर राजमलाई खायला मिळाल्याच आनंदच निराळा.
आज बाजारात एवढे चॉकलेटचे प्रकार आहेत, पण राजमलाईची सर कुणालाच नाही. राजमलाईची चव वर्षानुवर्षे ताजी असते (डोक्यात की जिभेवर ते माहित नाही)पण असते. हे राजमलाई पुण्यात कुठे मिळतो का हो ?

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

आजचा सुविचार

संसार एक कटू वृक्षाप्रमाणे आहे, याचे फक्त दोन फळ गोड आहेत।
एक मधुर वाणी, आणि दुसरे सुसंगती
चाणक्य

मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९

दलित- हिंदू व क्रिश्चन


आरक्षण
स्वातंत्र्यापुर्वी किंवा बाबासाहेबानी धर्मातंर करण्याआधी दलितांची काय अवस्था होती हे सगळयानाच माहित आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर मुख्य प्रवाहाबाहेर असणार्‍या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्य़ासाठी विशेष सवलती देणे गरजेचे होते. शिक्षण आणी इतर संधींचा लाभ मिळालेल्या समाजाला    हजारो वर्ष या संध्याना मुकलेल्या समाजाला एकाच स्पर्धेसाठी उतरविता येणार नव्हते. किंवा ते अन्यायकार ठरले असते. शिक्षणाचा जन्मजात वारसा लाभलेला व याचा गंधही नसलेला या दोघांची स्पर्धा म्हणजे चांगला खाऊन पिऊन तायर झालेला तालमीतला पहीलवान आणी कुपोषीत मुलगा यांच्यामध्ये होणारी लढत जशी असावी तसा हा प्रकार असता. ही लढत स्पर्धा नसून पढित समाजावरील अन्याय ठरला असता. दलिताना यातुन बाहेर आणण्यासाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली. हा अन हाच एकमेव उपाय होता. बाबासाहेबांच्या दूरदर्शी  नजरेनी भविष्याचं अचूक वेध घेतला अन आरक्षण नावाचं भीमकवच आमच्या अंगावर चढवलं. आज ब-याच दलितानी त्याचा सदुपयोग केलेला दिसतो. उपेक्षीत घटकाला पुरेशी संधी दिल्याने व आरक्षणामुळे कमी बुध्दीचे(ब्राह्मणी अत्याचारामूळे बौद्धिक विकासाला मुकलेले) लोक पुढे आल्याने इतर क्षेत्रात काही तोटा नक्कीच झाला असावा, पण हजारो वर्षापासुन जागा बळकावुन बसलेल्या लोकांमुळे होणारे आर्थीक विषमतेचे दुष्परिणाम, दोन समाजातिल असंतोष, टोळियुद्ध व यादवी टाळता आली. वर्षानुवर्षे उपेक्षीत राहिल्याने व सामाजीक पिळवणुकिचे चटके बसल्याने केंव्हातरी असा हा समाज पेटुन उठतो, आणि मुख्य प्रवाहाच्या विरोधात बंड पुकारतो,  त्याही पलिकडे जाऊन सशस्त्र क्रांती करतो, याला ईतिहास साक्षी आहे. आरक्षणामुळे दलिताना सुरक्षीतता जाणवू लागली व या देशात व समाजात आपला विचार केला जातो असा सकारात्मक संदेश गेला म्हणुन हि १२५ कोटीची लोकशाही भक्कम राहिली. नाहीतर ती विद्रोहाची बीजे आपल्यालाही उध्वस्त करुन गेली असती हे वेगळ सांगायची गरज नाही. सामाजीक समतोलता राखण्यासाठी सर्व घटकांचा विकास होणे आवश्यक असते, जे आरक्षाणातुन साधल्या जात आहे. म्हणुन दलिताना आजुन किमान २०० वर्षे तरी आरक्षणाची गरज आहे.
धर्मांतर
बौद्ध
हिंदू धर्मात दलिताना हीन दर्जाची वागणूक मिळत आलेली आहे, व आजही ते गावपातळिवर चालुच आहे. दलिताना माणूस म्हणुन हक्क नाकारणारे हिंदू धर्मच होय ना. गळयात मडके व मागे खराटा बांधण्याची प्रथा हिंदुनीच चालु केली. या व्यतिरिक्त ब-याच प्रथा मानवजातिला काळीमा फासणा-या होत्या, बाबासाहेबानी या प्रथांमधे काही बदल होतो का, याची बरीच वाट बधितली, शेवटी काहीच सकारात्मक प्रतिसाद येत नाही हे लक्षात आल्यावर धर्मांतर हा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे होता. आपल्या माणसाना जर धर्माच्या/जातिच्या नावाखाली अपमानास्पद वागणूक मिळत असेल व सुधारणा होण्याची काहीच लक्षणे दिसत नसेल तर तो धर्म सोडणे हा एकमेव पर्याय होता. बाबासाहेबानी दलिताना बौद्ध धर्माची दिक्षा देऊन लाखो लोकांना त्यांच्या अस्तित्वाची व मानवतेची जाण करुन दिली. मागील ५० वर्षात दलित समाजाचे अनुयायी (मग ते सुशील कुमार सारखे हिंदु दलीत असोत, गायकवाड, कांबळे ते मायावती सारखे बौद्ध दलित असोत व के.आर. नारायण सारखे आणखीन कोणते असोत.) गल्लीपासुन दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. हे सगळ फक्त बाबासाहेबांमुळे झाले. व धर्मांतरामूळे दलिताना स्वत:चा हक्काचा धर्म मिळाला.

क्रिश्चन
भारतातिल दलिताना सन्मानाने जगविण्याचा पहिलं श्रेय क्रिश्चनाना जातो. संपुर्ण देश जेंव्हा दलितांना माणूस म्हणुन सुद्धा स्विकारायला तयार नव्हता. कुत्र्यासारखी वागणूक दिली जात होती, तेंव्हा या मिशन-याने त्यांची खाण्यापिण्यापासुन, शिक्षणापर्यंत सगळी सोय केली. माझ्या ओळखीतिल बरीच मंडळी या मिशन-यांच्या शाळेत शिकुन, बाबासाहेबांच्याच काळात मोठ्य पदावर काम करुन निवृत्त झालीत. फक्त त्या बदल्यात त्याना क्रिश्चन धर्म स्विकारावा लागला, ही तर आनंदाची गोष्ट आहे. एकिकडे हिंदुधर्मात राहण्याच्या मोबदल्यात तुम्हाला कुत्र्याची वागणुक मिळते तर दुसरीकडे फक्त धर्म स्विकारला तर तुमच्या सगळ्या सोयी केल्या जातात, माणुस म्हणुन तर वागणुक मिळतेच, पण शिक्षणापासुन ते राहण्या, खाण्यापिण्याची सोय होते,  मग वाईट काय, तो धर्म स्विकारण्यात. हिंदुच्या लाथापेक्षा तिथली वागणुक लाख पटिने चांगली नाही का ? ज्या दलितानी १००-१५० वर्षापुरवी क्रिश्चन धर्म स्विकारला त्यांचा विकास इतर दिलितांच्या तुलनेने अधिक झाला. आज केरळ व मुझोरॅम मध्ये याची प्रचिती येते. जरी त्यांचे चर्च वेगवेगळे आहेत, पण त्याना स्वत:ची हक्काची जागा, धर्म, शिक्षणाची सोय व इतर गोष्टी उपलब्ध झाल्यात. आणि त्याच वेळी जे दलीत हिंदुची चाकरी करत इथेच थांबले, त्याना बाबासाहेब येईपर्यंत लाथाबुक्क्या खाऊन जिवन जगाव लागलं. आजही जिथे सरकारी सोय पोहचत नाही अशा दुर्मिळ भागात या मिशन-याच्या शिक्षण व वैधकीय सेवा उपलब्ध आहेत. ओरिसा मध्ये आजही दलिताना मिशन-यांच मोठा आधार (शैक्षणिक व आर्थिक) मिळतो. आमच्या भामरागड भागात सुद्धा मिशन-यांचे मोठ्य प्रमाणावर कार्य चालते. तळागळातल्या लोकांमध्ये हि लोकं सगळयात जलद गतीने पोहचतात. आजही गावपातळीवर हिंदुतर्फे अपमानीत होणा-या दलिताना मिशन-यांचा आधार मिळतो. मी जरी ख्रिश्चन नसलो तरी मी मिशन-यांचं समर्थनच करतो. दलित वर्गाला सन्मानाने वागविण्याचा पहिला मान ज्यांचा त्या ख्रिस्ती समाजाच्या या सम्यक वृत्ती व कृतीला सलाम करतो. आजचे हिंदूवादी लोकं मिशन-यांच्या विरोधात रान पेटवताना दिसतात. पण हिच मंडळी वेळ प्रसंगी आम्हाला जातीयवादाच्या नावाखाली तुडवायला मागे पुढे पाहात नाही. आज ख्रिश्चनांमूळे थोडीफार का हाईना दलितांची प्रगतीच झाली असे ठामपणे म्हणता येते.
दलितांची आजची अवस्था
आजही दलितांचा मोठा वर्ग आरक्षणाच्या कुबड्या धरुनच चालत आहे, मग ते राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक असो व इतर कुठेले असो. पण आज इतर क्षेत्रात जिथे आरक्षण नाही, तिथे दलिताना बघुन फार बरं वाटतं. आज सगळ्याच बहुराष्टीय कंपन्यात (जिथे आरक्षाणाच अ देखील नाही) दलित कुठल्या ना कुठल्या पदावर कामाला आहे.  यावरुन दलितानी कुबड्या सोडायला सुरुवात केली हे दिसुन येते. आजुन २०-३० वर्ष जाउद्या, हाच आकडा ब-यापैकी फुगलेला दिसेल. ही आरक्षणाच्या रिंगणातुन बाहेर उडी मारण्याची सुरुवात आहे. राजकीय क्षेत्रात दलितांची पार पिछेहाट झालेली दिसते, ऐक्य नसने हे त्यातिल म्हत्वाचे कारण होय.
एकंदरित काय, तर हिंदु धर्माचा त्याग केल्यावर दलित समाज बौद्ध व क्रिश्चन धर्माचा स्विकार करुन सन्मानाने जगतो आहे. शिक्षण, नौकरी, व्यवसाय, मान-सन्मान, सगळया गोष्टी त्याच्या पायाशी आल्यात. परंतू आजही हिंदुना हे पहावत नाही, म्हणुन दलितांची गावपातळिवर या हिंदु़कडुन कशी मानहानी होते. दलितानी अत्यल्प काळात बाबासाहेबांच्या आशिर्वादाने गरूडझेप घेतली आहे. प्रत्येक क्षेत्रात दलितानी सर्व बाजून मुसंडी मारली आहे. सरकारी, निम सरकारी ते खाजगी क्षेत्रातील अगदी आय.टी. कंपन्या पर्यंत दलितांनी आपल्या बुद्धिची चुणूक दाखविली आहे. आज पर्यंत दारिद्रयात खितपत पडलेला हा बहुजन समाज आत्ता कुठे उठून उभा राहतो आहे. आज पर्यंतच्या दास्यातील आयूष्याला बाबासाहेबांचं पारीसस्पर्श नवी चकाकी देऊन गेलं. दलितांची पहिली पिढी जी बाबासाहेबांसोबत धर्मांतर सोहळ्यात होती ती आजही जीवंत आहे. त्यानी शिक्षणाची कास धरताना अनेक अडचणी आल्या. पण आमची पिढी म्हणजे दुसरी पिढी ही मात्र शिक्षणाच्या क्षेत्रात आपला लोहा मनवून पुढे निघून गेली आहे. आपल्या क्षमता सिद्ध करुन जागो जागी भीमसेना अधिराज्य गाजवित आहे. सर्व स्थारातून व सर्व क्षेत्रात बाबासाहेबांच्या लेकरांची रेलचेल दिसू लागली आहे. भारतातच नाही तर दूर देशीही आमच्या भीमपुत्रानी निळा झेंडा फडकवीला आहे. आत्ता ही दुसरी पिढीच भूतलावर सर्वदूर निळा रंग उधळते आहे तर विचार करा आजून चार पिढ्या नंतर काय चित्र असेल. या भीम पुत्रांच्या यशाचं सर्व श्रेय बाबासाहेबानाच जातं. म्हणून आम्ही सर्व भीमपुत्र कुठेही असलो तरी बाबासाहेबांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहू. त्याच बरोबर ज्या दलितानी ख्रिश्चन धर्म स्विकारुन स्वत:चा विकास साधला त्यांनाही शुभेच्छा.  
जयभीम.