सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

६ डिसेंबर - सोहळा कृतज्ञतेचा

६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन, आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकराना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. आज देशाच्या कानाकोप-यातुन चैत्यभुमीत लोकांचा जनसागर उसडलेला असतो. लोकं आपापल्या संस्कारानुसार तिथे भावना व्यक्त करताना दिसतात. अगदी जे बाबासाहेबाना अभिप्रेत होतं तसच जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे, बाबांच्या शब्दात बोलायचं म्हटल्यास मला भक्त नकोत, अनुयायी हवेत या सचोटित तंतोतंत फिट्ट बसणारे अनुयायांपासुन ते महाराष्ट्राच्या कुठल्यातरी लहानशा खेड्यातुन मुंबईला ६ डिसेंबरसाठी चैत्यभुमीत हजेरी लावण्यासाठी निघताना गावाची वेस ओलांडेस्तोवर चार वेळा गाव देवीला नमस्कार करुन प्रवास सुखाचा होवो अशी विनवनी करणारा. किंवा घाटामधे बसचा तोल जाताच विठ्ठला वाचव रे बाबा! मी भिमाच्या चैत्यभुमीला निघालोय, मला सुखरुप घरी पोहचविण्याची जबाबदरी तुझीच आता! असं म्हणुण विठोबाचं नाव घेणारे असे कितीतरी विविध संस्काराचा प्रभाव असणारे लोकं आज मुंबईत मात्र बाबांच्या पुण्यतिथीला एकाच उद्देशानी जमलेली दिसतात, ते म्हणजे बाबांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
समाजातिल विविध स्तरातुन आज लाखोनी ईथे हजेरी लावणारी लोकं म्हणजे कित्येकाना वाटतं हे दलितांचं शक्तिप्रदर्शन होय. पण ते तसं मुळीच नाहिये. (काही नालायक राजकारण्यांमुळे ते तसं वाटु लागलं हे आपलं दुर्दैव) हा कसल्याच प्रकारचा शक्तीप्रदर्शनाचा किंवा इतर कुठल्या प्रदर्शनाचा प्रकार नाही, हा शुद्ध सोहळा आहे लोकांच्या भावना प्रकटीकरणाचा, बाबासाहेबांचे आभार मानन्याचा, कृतज्ञतेचा. जनावरापेक्षाही वाईट जीवन जगणा-या लाखो लोकांच्या जीवनाला कलाटनी देणा-या महापुरुषाचे आभार मानन्यासाठी येणारं हे जनसागर शक्तिप्रदर्शनाचं प्रतीक नक्कीच नाही. ईथे येणा-या कित्येकाना त्यांच्या रोजच्या जीवनात बाबानी सांगितलेला धम्म आचरणात आणता येत नसेलही, किंवा कित्येकाना त्या धर्माचं ज्ञानही नसेल, कित्येकानी ज्ञान असुन टाळाटाळ केली असेल किंवा कित्येकांचा अगदीच या सगळ्या धर्मभिर्म गोष्टी पासुन दुर दुरचा संबंधही नसेल. पण ईथे येणा-या प्रत्येक माणसात एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे या सगळ्यांच्या मनात बाबासाहेबांचं स्थान, आदर सर्वोच्च आहे. त्यांच्या जीवनात या महापुरुषाची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. बाबासाहेब म्हणजे वन एन्ड ओन्ली, तुलनेच्या पलिकडचं व्यक्तिमत्व. चैत्यभुमीवर फिरणारा प्रत्येक व्यक्ती हा बाबासाहेबांच्या विचारानी काहीप्रंमाणात का असेना, पण प्रभावीत झालेला असतोच. त्याला इतर वेळेस किंवा दैनंदीन व्यवहारात ते विचार प्रकट करायला मिळतात की नाही ही गोष्ट ब-याच ईतर घट्कांच्या प्रभावांवर अवलंबुन असते पण ईथे मात्र त्याला तो सगळा ताण झटकुन काही तास बाबांचा अनुयायी म्हणुन मुक्त संचार करता येतो. हा सोहळा अशा लोकांसाठी कृतज्ञतेच्या पुढे जातो व अनुयायी म्हणुन मिरविण्याचा सोहळा बनतो.
ईथे लोकं रडायला किंवा पिंड दान करायला जमलेली नसतात. लोकं जमलेली असतात ते बाबांचे आभार मानायला, हा समाज त्यांचा ऋणी आहे हे दाखवायला, आम्हाला जाण आहे तुमच्या त्यागाची, आम्हाला जाण आहे तुम्ही लढलेल्या लढ्याची, आम्हाला भान आहे तुमच्याशी एकनिष्ठ राहण्याची. आमची एकनिष्ठता काही पॅरामिटर्सवर तपासताना दिसुन पडत नसेलही, तरी आम्ही आमच्या परिने तुमचे ऋणी आहोत हे दाखविण्याचा तो दिवस म्हणजे ६ डिसेंबर. आमच्या रोजच्या जीवनात आम्ही जे काही जगतो त्यावर भलेही इतर धर्माचा/संस्काराचा पगडा जाणवत असला तरी तो आमचा नाईलाज आहे. आम्ही जिथे राहतो तिथे बहुसंख्य समाज बौद्धेत्तर असल्याने व तिथे जगताना आमच्यात तो प्रभाव झटकुन टाकण्याचं बळ नसल्याने त्या सकट जगतो, एवढेच! जरी आम्ही तुमच्या अपेक्षाना काही प्रमाणात तळा देणारा वर्ग वाटत असलो तरी तो आमच्या मजबुरीचा भाग आहे. किमान आमची, ही पिढीतरी तशीच जगेल त्या बद्दल क्षमा करा. आमची पुढची पिढी तुमच्या मार्गावर चालणारी असावी असा सदैव प्रयत्न असतो, त्यातही ब-याच अडचणी येतात. वेळ प्रसंगी आम्ही ब-याच आघाडयांवर पिछेहाट स्विकारतो. पण त्याही परिस्थीतीत आम्ही तुमच्याशी कृतज्ञ आहोत हे दाखवायचा हा दिवस मात्र न चुकवता ईथे जातीने हजेरी लावतो. अशा अर्थाच्या भावना कित्येकाच्या नजरेत दिसत असतात.
आजच एका वृत्तपत्रात वाचलं की चैत्यभुमी तिर्थक्षेत्राच्या दिशेनी जातेय. पण माझ्या मते तसं केंव्हाच होणार नाही. हा सोहळा साजरा करण्याची पद्धतच आगळी आहे. एरवी कुठल्याच दुकानात न मिळणारी पुस्तकं किंवा समाज प्रबोधन करणारं साहित्य ईथे मोठ्या प्रमाणात विकल्या जातं. ईथे येणा-या लोकांची संख्या व विकलेल्या एकुण पुस्तकांची संख्या लक्षात घेता ६ डिसेंबरला चैत्यभुमीत येणा-या प्रत्येक दोन माणसामागे एक पुस्तक विकल्याचा आकडा आहे. हि पुस्तकं दलितांच्या घरोघरी पोहचल्यावर जो प्रभाव दाखवायला पाहिजे तो दाखवितच आहेत. परिणाम १००% येत नसला तरी येतो आहे हे महत्वाचं. बाबासाहेबांचे विचार घरो घरी पोहचविण्याचं काम चैत्यभुमीतं विकल्या जाणा-या पुस्तकांच्या माध्यमातुन होताना दिसतय. तर ईथे हा सोहळा कृतज्ञतेच्या पुढे जातो आणि तो बनतो सोहळा पुस्तक रुपातुन बाबांचे विचार तळागळात नेण्याचा. आणि जिथे जिथे बाबासाहेबांचे विचार पोहचले तिथे तिथे क्रांती घडुन येते. जिथे वैचारिक क्रांती आहे तिथे तिर्थक्षेत्राना थारा नाही हे वेगळं सांगायची गरजच नाही. ६ डिसेंबर म्हणजे असा हा आमचा सोहळा कृतज्ञतेचा.
 कोटी कोटी उद्धारली कुळे, भिमा तुझ्या मुळे.

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

त्रिपिटकाचं शुद्धिकरण

भगवान बुद्धांचा बुद्ध धम्म या मातितील व मुळ भारतिय धम्म आहे. जो पुर्णत: सम्यकतेचं समर्थन करणारं आणि निरिश्वरवादी आहे. पुढे बाबासाहेबानी सुद्धा हा धम्म दलितांच्या उद्धाराचा एकमवे धार्मिक पर्याय म्हणुन निवडला आणि आज भारताच्या कानाकोप-यात अगदी खेडयापाडयात पोहचलाय. खरं तर दोन हजार वर्षापुर्वी सुद्धा हा धर्म भारताच्या कानाकोप-यात पोहचलेला होताच पण नंतर काही कारणास्तव हा धर्म भारतातुन हद्दपार झाला. बाबासाहेबानी या धम्माला भारतात पुनरुज्जीवित करुन आमच्या पुढे एक जगण्याची आदर्श पद्धती उपलब्ध करुन दिली त्या बद्दल त्यांचे आभार. पण या धम्माच मूळ धर्मग्रंथ त्रिपिटक वाचल्यावर काही प्रश्न उपस्थीत होतात. ते असे... 
बुद्ध धम्म पुर्णत: निरिश्वरवादी आहे का?  
:- याचं उत्तर मिळतं नाही(त्रिपिटकाच्या आधारे). 
या धम्मात पुनरजन्माला मान्यता आहे का? 
:- होय... त्रिपिटका प्रमाणे आहे. 
त्रिपिटकात अनेक ठिकानी तसे लिहलेले आहे. आणि त्रिपिटक हा बुद्ध धर्माचा मुख्य ग्रंथ असल्यामुळे या गोष्टिला खुप महत्व प्राप्त होतं आणि ईथुनच सगळी गोची होतात. पुनर्जन्मामुळे ईथे अनेक प्रश्न निर्माण होतात. पुनर्जन्माला मान्यता देताना बुद्धानी कुठेच हे स्पष्ट केलेलं नाही की त्याची प्रोसेस काय आहे? किंवा पुनर्जन्म होतो म्हणजे नेमकं कोणाचं होतं? आत्म्याचं की मनाचं की आजुन कोणाचं?  हा सर्व घोळ होतो त्रिपिटक वाचल्यावर लक्षात येतो. मनाचं व बुद्धिचं समाधान होत नाही. हा सगळा घोळ पाहता एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे त्रिपिटकात भरपूर विपर्यास झालेला आहे. त्यामुळे बौद्ध धम्माचं वाचन केल्यास त्रिपिटकात प्रचंड विसंगती सापडते नि बौद्धिक समाधान होत नाही. बुद्ध धर्मात भगवंतानी आत्मा साफ नकारला आहे. म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचं होतं नाही हे स्पष्ट आहे. पण पुनर्जन्म मात्र होतो, मग तो होतो कुणाचा हे सांगितले नाही. संपुर्ण त्रिपिटकात कुठेच  या संबंधित खुलासा केलेला नाही. मी या विषयावर ब-याच धम्म अभ्यासकाना विचारणा केली. माझ्या वाचण्यातुन तो उतारा सुटलेला असु शकतो हे मी गृहीत धरुन ब-याच धम्मचा-यांजवळ या बद्दल चौकशी केल्यावर वेगवेगळी उत्तरं मिळाली. काहिनी मिलिंद प्रश्न वाचण्याचा सल्ला दिला. काहीनी पुनर्जन्म म्हणजे अगदी हिंदु धर्माच्या पुनर्जन्मासारखं नसुन ते बुद्धानी मनाच्य अवस्थांबद्दल सांगितलय असं म्हटलं. पण मनाच्या अवस्था आणि पुनर्जन्म या दोन गोष्टी एकच नसुन भिन्न असल्याचं त्रिपिटकात स्पष्ट लिहलं आहे. मग मी मिलिंद प्रश्न वाचुन काढला. तिथे तर सुरुवातिलाच दिलं आहे की, राजा मिलंद व नागसेन हे आधल्या जन्मापासुनचे परस्पर संबंधातुन या जन्मी आलेत.  आधल्या जन्माचा या जन्मात कसा संबंध आहे याची ईत्थ्यंभुत माहीती अगदी सुरुवातीलाच दिली आहे. म्हणजे पुनर्जन्मानी मिलिंद प्रश्नात अगदी सुरुवातीलाच घोळ घातला. परत मला दुसरे सदर्भ शोधावे लागले.
बुद्ध धर्मात देवांचं अस्तित्व (त्रिपिटका प्रमाणे) सुद्धा आहे, आकाशातुन फुलांचा वर्षाव करणारे देव काय, तर बुद्धाना तपस्याच्या ठिकाणी येऊन नमस्कार करणारे देव काय. अशा वेगवेगळ्या देवांचं अस्तित्वसुद्धा बुद्ध धर्मातील धर्मग्रंथात मिळतो.
आता काही संदर्भ पाहुया.
संदर्भ: त्रिपिटक या मुख्य बुद्ध ग्रंथातिल सुत्तपिटक मधिल काही उदाहरण खाली देतोय
१) अंगुत्तर निकाय, एक्क-निपात: एकदत्त वग्ग
याच्यात भगवान बुद्ध म्हणतात. भद्राकापिलायनी (एक बुद्ध भिक्षुणी) ही पुनर्जन्माची अनुस्मृती करण्यामधे अग्र आहे.

२) खुद्दकनिकाय, मेत्तसुत्त मधे भगवान बुद्ध म्हणतात. मी एक वेळा महाब्रह्मा आणी ३६ वेळा देवराज इंद्रच्या रुपात शक्र बनलो आहे. शेकडोवेळा चक्रवती बनलो आहे.
३) खुद्दकनिकाय, जरा वग्ग: यात बुद्ध म्हणतात. मी अनेक जन्म घेतले आहेत.
४) पठमपीठ विमानवत्थु, इत्थिविमान: मधे मोग्गलायन देविला प्रश्न विचारतो तेंव्हा पुनरजन्माचं फळ म्हणुन आज तेजोनीधी देवी झाल्याचा दाखला आहे.
५) गौतम बुद्ध जेंव्हा शेवटच्या घटीका मोजत असतात तेंव्हा ते स्वत: म्हणतात की मी एके जन्मी या लहानशा नगराचा राजा होतो म्हणुन मला आज ईथे देह ठेवायचे आहे.
६)मुचलिन्द वग्ग: नागाचा चमत्कार, बुद्धत्व प्राप्त होते तेंव्हा ब्रम्हाची भेट.
बुद्ध धर्म असा धर्म आहे जो पुनरजन्म मानतो पण आत्मा मानत नाही. पुनर्जन्माची प्रोसेस मात्र उलगडता ना आल्याने ब-याच गोष्टी तर्कावर सुटत नाहित.  देव मात्र बुद्ध धर्मात आहेत, चमत्कार आहेत, पाप पुण्य सुद्धा आहे.  कर्माचं फळ पुनर्जन्मावर प्रभाव टाकतो हे ही आहे. एकंदरित हिंदु धर्मातील यज्ञ सोडल्यास सगळच बुद्ध धर्मात आहे. हा झाला त्रिपिटका प्रमाणे उपलब्ध बौद्ध धम्म.
-----------------------------------------------

वरील बाबी बौद्ध बांधवाना बुचकळ्यात टाकणा-या आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. बाबासाहेबानी वरील सर्व प्रश्न निकाली काढले आहेत. त्रिपिटक वाचल्यावर मनाची त्रेधा उडाणार व आज ना उद्या आंबेडकरी समाज सवाल खडा करणार हे जाणून बाबासाहेबानी आधीच सोय केली आहे. वरील सर्व प्रश्नाना उत्तर देणारं, अत्यंत महत्वाचं ग्रंथ बाबासाहेबानी लिहून काढला आहे. त्रिपिटकातील विपर्यस्त सर्व लिखान काढून फेकण्याचं पवित्र काम बाबासाहेबानी केलं. बौद्ध धम्माच्या पतनानंतर घुसडलेले सर्व लिखान बाबासाहेबानी बाद ठरविलं अन त्रिपिटकाला चाळणी लावून एक नवीन ग्रंथ लिहून काढला त्या ग्रंथाचं नाव आहे The Bhuddha & His Dhamma. या ग्रंथात बाबासाहेबानी प्रत्येक गोष्टीला बुद्धीच्या कसोटीवर तपासून अगदी शुद्ध रुपात मांडलं आहे.
या ग्रंथात पान नं. २९० (लाईन नं. ७) मध्ये बाबासाहेब आत्म्याचं पुनर्जन्म नाकारतात व घटक पदार्थ म्हणजेच अ) पृथ्वी आ) आव इ) तेज ई) वायू यांचं विघटन व पुनर्बांधनीच विश्लेषण देऊन पुनर्जन्माचा प्रश्न निकाली काढतात.
या ग्रंथात पान नं. २१५ (लाईन नं. ५२) मधे बाबसाहेब मोक्ष नकारतात. या पानावर बाबासाहेबानी मोक्ष नाकारताना निब्बाण सांगितला. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन होय असे बाबासाहेबानी विशद केले.  पान नं. २३५ (लाईन नं. ३३) मधे आत्मा व ईश्वर दोघानाही नाकारले. पान नं. २४१ मधे सर्व पानभर विश्लेषण दिले आहे की काल्पनिक अनुमानाना धम्मात स्थान नाही
अशा प्रकारे बाबासाहेब त्रिपिटकाचं शुद्धिकरण करतात व नवीन ग्रंथ लिहून काढतात. त्या ग्रंथाचं नाव आहे The Buddha & His Dhamma. ज्याना कुणाला त्रिपटक वाचून अनेक प्रश्न पडले असतील. बुद्धाच्या मूळ सिद्धांताशी मेळ खाणारे तत्व वा परस्पर विरोधी वाक्यं दिसली असतील त्यानी बाबासाहेबांचं वरील ग्रंथ नक्की वाचावं.

जयभीम.
***मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०

हरी नरके

हरी नरके हे फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीचे एक अत्यंत धडाळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्यांचे लिखान दलिताना सदैव वाट दाखविण्याचे काम करत आहे. एक अत्यंत हुशार व अभ्यासु व्यक्ती म्हणुन हरी नरकेंची ख्याती आहे. हरी नरके लिखित साहित्य पुस्तक रुपाने प्रत्येक विद्रोही, बहुजन कार्यक्रमांच्या प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध असतेच. एखादया बहुजन कार्यक्रमात हरी नरकेंचं पुस्तक दिसलं नाही असं कदापिही होत नाही. या खंदया कार्यकर्त्याचं शिवजयंती व टिळक यांच्यावरिल भाषण नुकतच युट्युबवर ऐकलं आणि धन्य झालो.

शिवजयंती आणि टिळक:
टिळकानी शिवजयंती सुरु केली असा जो आपला गैरसमज आहे तो एका झटक्यात दुर होईल असे कितीतरी खणखणीत पुरावे त्यानी आपल्या भाषणात दिले आहेत. सर्वप्रथम महात्मा फुलेंनी १८६९ साली शिवजयंती साजरी केली होती व त्याची नोंद ब्रिटीशकालीन पोलिसांच्या कार्यलयात आहे. हा तो पुरावा आहे जो ब्राह्मणेत्तरानी नोंदवुन ठेवल्यामुळे आज आपल्याला छाती ठोकुन सांगता येते की, टिळकानी उगीच शिवजयंतीची पोळी लाटली होती.  अरे जेंव्हा हा शिवजन्मोत्स्व फुल्यानी सुरु केला तेंव्हा टिळक केवढे असतील यावा विचार न केलेलाच बरा.

हा उत्सव फुल्यानी सुरु केला, तिथे लोकं येऊ लागली, लोकांच्या मनात महाराजांबद्दल  असलेल्या सन्मानाखतर महाराष्ट्रातिल द-या खो-यातुन शिवजयंतीला येणा-या लोकांच्या संखेत दिवसेंदिव वाढ होऊ लागली. हे सगळं टिळक आपल्या डोळ्यानी बघत बघत मोठे झाले. पुढे जाऊन टिळकानी या जनसमुदायाचा पाठिंबा मिळविण्यासाठी एक डाव रचला. फुल्यांच्या निधनांनंतर काहीच वर्षानी या लोकोत्सवात टिळक पोहचले व फुल्यानी तयार केलेल्या हा पाया स्वत:च्या हितासाठीतर वापरलाच, पण हळु हळु तो त्यानीच रचला असाही प्रसार केला. असं हरी नरके पुराव्यानीशी म्हणतात.

टिळक व आगरकराना जेंव्हा १८८२ साली अटक झाली तेंव्हा  फुलेंनी श्री. रामशेठ बापुशेठ उरावणे याना १०,०००/- रुपयाची तजविज करुन टिळकांचा जामिन घेण्यास पाठविले. टिळकांची सुटका झाल्यावर मुंबई शहरात नारायण लोखंडेनी त्यांची मिरवणुक काढली आणि पुढे टिळकानी आपल्या केसरी या वृत्तपत्रात रामशेठ यांच्या मुत्युची बातमी छापतात. परंतु जेंव्हा फुले गेले तेंव्हा हेच टिळक फुल्यांच्या मृत्युची साधी बातमी छापत नाहित. कारण तो पर्यंत ते establish झालेले होते. थोडक्यात स्वत:चा राजकिय पाया भक्कम करताना फुल्यांच्या लोकांचा व शिवजयंतीचा यानी वापर केला. एकदा पाया भक्कम झाल्यावर कावा केलाच.

जयंतराव श्रीधर टिळक (टिळकांचे नातु) यानी मी जयंत टिळक नावाच पुस्तक लिहल व पदमगंधा प्रकाशनाने तो प्रकाशीत केला. या पुस्तकात जयंतरावनी लिहुन ठेवलय. माझ्या आजोबानी शिवजयंती पुढे आणली.  याचाच अर्थ असा की, शिवजयंतीची सुरुवात करणारे टिळक नव्हते. मग कोण होते? ते होते महात्मा ज्योतिराव फुले. आणि हे परत एकदा टिळकांच्या घराण्यातील लोकानी सांगितले आहे.
शाहुमहाराजाना एका भटजीनी (रोजोपाद्याय नावाचे) वेदोक्त मंत्राने पुजा पाठ करण्यास नकार दिल्यावर महाराजानी त्या भटजीना प्रश्न विचारला, भटाचं उत्तर होतं. तु कुणभट आहेस, क्षत्रिय नाही. म्हणुन पुजा पुराणा प्रमाणेच होईल, वेदांप्रमाणे नाही. हे ऐकल्यावर महाराजानी त्या भटाला नौकरिवरुन काढुन टाकलं. टिळक लगेच भटाच्या मदतिला धावले. वेद फक्त ब्राह्मणांसाठी असुन शाहुनी नमत घ्यावं आणि भटाला परत रुजु करुन घ्यावा यासाठी टिळकानी अगदी सुप्रिम कोर्टापर्यंत भटाच्या बाजुनी लढा दिला व शेवटी तिथे हारल्यावर चर्चेनी प्रश्न सोडवुया म्हणुन केसरीत अग्रलेख लिहणारे हेच टिळक जेंव्हा भटाला नौकरी वरुन काढलं तेंव्हा अग्रलेख लिहतात. इंग्रजी शिक्षणामुळे मराठ्याना खुळ लागला असं म्हणणारे टिळक सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर शाहुमहाराजाना वेदोक्त मंत्राचे अधिकार दयायला तयार झाले. आणि शाहुमहाराजही या प्रस्तावास मान्यता दयायला तयार झालेत. पण महाराजांच्या शेजारी एक खंदा कार्यकर्ता भास्कराव जाणवा यानी टिळकांचा डाव ओळखला व तो महाराजांच्या लक्षात आणुन दिला की, हा वेदोक्त मंत्रांचा अधिकार फक्त आपल्यालाच मिळतोय, आपल्या लहान भावाचं काय? त्याना हा अधिकार मिळतोय की नाही याचा खुलासा केला गेलेला नाहीये. महाराजानी या विषयावर टिळकाना विचारना केल्यावर टिळकांचं उत्तर होतं.

हो, वेदोक्त मंत्राचा अधिकार फक्त तुम्हालाच देण्यात आलय, तुमचा भाऊ क्षुद्रच आहे. यात आमचा नाईलाज आहे  हे आहे टिळकांचे खरे विचार. असली व नकली टिळक बघायचं असल्यास खालील लिंकवर टिचकि मारा आणि हरी नरकेंचे सगळे भाग एकदा नक्की ऐका.

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

आरक्षण - नाण्याची दुसरी बाजु

मागच्या लेखात आरक्षणाचं समर्थन करणारा विचार मांडला, पण जसं प्रत्येक गोष्टिला दोन बाजु असतात तसं या आरक्षणालाही दुसरी बाजु आहे. आज आपण याची दुसरी बाजू बघुया.
बाबासाहेबानी आरक्षण लागु करण्याचं मुख्यं कारण होतं की आपल्या माणसाला विकासाची दारं मोकळी व्हावी. त्याला शिकता यावं, नौकरी करता यावी आणि समानतेचं जीवन जगता यावं. त्याच बरोबर देशाचाही विकास डोळ्यापुढे होताच. भारतातील बहुसंख्य लोकं दलित आहेत. या बहुसंख्य लोकांचा विकास घडवुन आणाल्यास देशातील एकुण सुशिक्षीत लोकांचा आकडा वाढेल. नुसतं आकडा वाढणार नाही तर याना रोजगाराच्या संध्या मिळतील. अशा प्रकारे या देशातील एक मोठा समाजा हळु हळु का होईना मुख्य प्रवाहात येईल. जेंव्हा दलित वर्गातील बहुसंख्य लोकं मुख्य प्रवाहाचा वाटा बनतील तेंव्हा त्याचा भारताच्या विकासावर सकारात्मक प्रभाव पडेल हे उघड होतं. पण आज तस होताना दिसत नाही हे खेदाने म्हणावे लागते.
वडिलोपर्जीत परंपरा
भारताला गालबोट लावणा-या इतिहासातील एकुण घटनांचा अभ्यास केल्यास त्यात सगळ्यात काळ्या कुट्ट रंगानी रंगलेली लाजीरवानी करणारी मान खाली घालायला लावणारी आणि गुणवत्तेला डावलणारी एक प्रथा दिसेल, ती म्हणजे वंशपरंपरा. हि वंशपरंपरा व घराणेशाहीनी भारताचा इतिहासतर मलिन केलाच पण वर्तमान सुद्धा बिघडविताना दिसते. पुजा-याचा मुलगा पुजारी व्हायचा आणि खरी पुजा-याची गुणवत्ता घेऊन जन्माला आलेल्या मुलाला त्या क्षेत्राचा विचार सुद्धा करता येत नव्हतं. लोहाराचा मुलगा लोहार, सोनाराचा मुलगा सोनार व राजाचा मुलगा राजा अशा प्रकार वंशपरंपरेनी या सगळ्या क्षेत्रात गुणवत्ता डावलुन वडिलांकडुन मुलाला संधी दिल्या जात असे. आज आरक्षणाचं पण तसच काहिसं होताना दिसतय.
आरक्षणाचा प्रमुख हेतु हा होता की दलितांच्या पुढच्या पिढीनी आरक्षणाचा फायदा घेऊन खुप शिकावं, संघटीत व्हावं आणि संघर्ष करावं. पण माझ्या समाजाला या आरक्षणाचा मुख्य हेतु समजलाच नाही. आम्ही आरक्षणाला अगदी वडिलोपर्जीत/वंशपरंपरागत संपत्तीसारखं वापरु लागलो. मी दलित म्हणुन जन्माला आलो म्हणजे माझं पहिलं काम असेल ते हे की मी आरक्षण घेणारचं (काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत). मी कितीतरी लोकाना व्यक्तीशा ओळखतो ज्याच्या वडीलानी आरक्षण घेऊन शिक्षण घेतलं व ते आज केंद्र सरकारमधे अधिकारी म्हणुन नौकरीला आहेत. त्यांच्या कडे भरपुर पैसा आडकातर आहेच पण त्यांची मुल सुद्धा हुशार आहेत. पण या महाशयाची मुलं अगदी शालेय शिक्षणात ईबीसी फॉर्म भरण्यापासुन इंजीनीअरिंग पर्यंत सगळ्याच ठिकाणी आरक्षण घेतलं. खरं तर त्यांच्या वडिलानी आरक्षण घेतलं, त्यांचं घरानं आज शैक्षणीक व आर्थिक दृष्ट्या सबळ झाल, आता त्यानी स्वेच्छेने हे आरक्षण नाकारल्यास त्याचा फायदा आमच्याच गरीब मुलाला झाला असता. ते पे शिटवर शिकण्याच्या लायकीचे आहेत आणि ही लायकीसुद्धा आरक्षणामुळेच आली. आरक्षणानी ज्याना आर्थिक सुबत्ता बहाल केली त्यानी या पुढे ती जागा दुस-या एक गरजुसाठी सोडावी आणि स्वत: पे-शिट किंवा पैशानी चांगली शिकवणी वगैरे लावुन स्वबळावर जागा मिळवायला आता हरकत नाही. आरक्षणानी आमचा विकास होणार हे जीतकं खर आहे तितकच एका सुखवस्तु कुटूंबाने गरजु कुटुंबासाठी हि जागा मोकळी करुन देणेही तेवढंच गरजेचं आहे. पण ईथे नेमकं उलट होत आहे. जस ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्याकडेच पैसा जोतो म्हणतात ना अगदी तसं चाललय.
ज्याचा बाप आधि आरक्षण घेऊन जरा पुढे आला, तो आपल्या मुलाला पैसे खर्च करुन चांगलं शिक्षण देतो, त्याला मार्कपण ब-यापैकी पडतात व उच्च शिक्षणाच्यावेळी मात्र आरक्षणाद्वारे प्रवेश घेतो. मग या ठिकाणी ज्याचा नंबर हुकतो तो इतर कुणी त्रेयस्थ नसुन आमचाच गरिब बांधव असतो. ह्या सगळ्य़ा प्रक्रियेचा अंतिम निकाल असा लागतो की जे विकसीत झालेत ते अधिक विकसित होत जातात व याच विकसीत लोकांद्वारे आपल्याच गरिब बांधवांच्या तोंडचा घास पळविल्या जातो. हे जर असच आजुन १०० वर्ष चालु राहिलं ना तर दलित समाजात आर्थिक व शैक्षणीक विषमतेची मोठी दरी निर्माण झालेली दिसेल. डॉक्टर, इंजीनिअर व प्राध्यापकांची पिढी विकास करत जाईल व गरिब लोकं आजुन गरिब होत जातील. बाबासाहेबाना आरक्षणापासुन चे साधायचं होतं ते केंव्हाच साधलं जाणार नाही.
आरक्षणाचं हस्तांतरण झालं पाहिजे.
आरक्षण आज ज्या प्रकारे वडिलोपर्जित संपत्ती म्हणुन वापरल्या जात आहे हे जर आजुन काही वर्ष असच चालल्यास याच आरक्षणामुळे दलितांमधे मोठी विषमता तयार व्हायला वेळ नाही लागणार. पुढच्या पिढीला विकासाकडे न नेता अंधाराच्या दिशेनी जाण्यासाठी हे आरक्षण कारणिभुत ठरेल. एकवेळ अशी येईल की एक गरिब दलित श्रीमंत दलिताला शत्रु मानु लागेल. आणि आरक्षणाच्या बडावर दोन पिढ्या आधी प्रगतीच्या वाटेवर पाऊल ठेवलेल्या तिस-या पिढितील दलित माणसाला गरिब दलित म्हणजे अकार्यक्षम, बुद्धिने कमी व कष्ट न केल्यामुळे मागे पडलेला एक तुच्छ माणुस असं वाटु लागेल. हा घोळ अगदी नजीकच्या काळात म्हणजे पुढच्या २०-२५ वर्षात बघायला मिळेल. ज्या आरक्षणाच्या आधारे बाबानी या समाजाला मुख्य प्रवाहात मिसळताना बघायची स्वप्ने पाहिलीत त्याच आरक्षणामुळे दलितांमधेच कमालीची आर्थिक व शैक्षणीक विषमता पाहायला मिळणार आहे. हे सगळं होणार आहे फक्त एक चुकीमुळे, आणि ती चुक म्हणजे सशक्त पिढीने अशक्त पिढीला आरक्षणाचं हस्तांतरण न केल्यामुळे.
म्हणुन ज्यांची एक पिढी स्वत:च्या पायावर उभी झाली, आर्थिक बळ आलं, आरक्षणाशिवायही शिक्षण व नौकरी मिळविण्याची कुवत आली त्यानी आरक्षण न घेण्याचं ठरवाव. ज्याच्याकडे सुबत्ता आली त्यानी आता मुख्य प्रवाहातील इतर लोकांप्रमाणे उपलब्ध साधनांचा अधिकाधिक वापर करुन स्वत:चा विकास करावा आणि ज्याच्याकडे साधनांच्या उपलब्धतेची कमतरता आहे त्याना ही सोय घेण्याची संधी दयावी. गौतम बुद्धांच बुद्ध धर्माबद्धल एक वाक्य आहे. बुद्ध धर्म म्हणजे नदी पार करण्यासाठी लागणारी नाव आहे. तीचा उपयोग तेवढ्यापुर्ताच करावा आणि ती नाव तिथेच सोडुन पुढे जावे. मला वाटतं आरक्षणाचं पण तसच आहे. बाबाना आरक्षणाबद्दल असच काहीतरी अपेक्षीत होतं. जीवनातील बेसिक गोष्टींसाठी झटाव्या लागणा-या समाजाला आरक्षणाची गरज आहे. पण ज्यांचं जीवनमान सुखवस्तु झालय त्यानी आरक्षण गरिब दलितांसाठी सोडावं. पण ईथे तसं होताना दिसत नाहिये.
या जीवनाची दारिद्रय नावाची नदी पार करायला जे दलित नदिच्या त्या तिरावर उभे आहेत त्यात कमजोर व सशक्त अशा दोन्ही वर्गातील दलित आहेत. ही आरक्षण नावाची नाव कमजोरांसाठी आहे, सशक्तानी स्वबळावर नदी पोहायला हवी. पण ईथे नेमक उलटं होताना दिसतय. सशक्त दलितानी आरक्षण नावाच्या होडीवर हक्क सांगितला व गरज नसताना ही सेवा उपभोगताहेत. बिचारे गरिब ज्याना या नावे शिवाय ती नदी पार करणे शक्यच नाही ते कायमचे नदीच्या त्या तिरावर स्थानबद्द झालेत. या सशक्त वर्गाने ती नाव न वापरता नदी पार करायचे ठरविले असते तर आज कितीतर दुर्बल गटातिल दलित आरक्षणाच्या सहाय्याने ती दारिद्र्याची नदी पार करुन सुबत्तेच्या किना-यावर पाय ठेवले असते. थोडक्यात सांगायचे म्हटल्यास प्रत्येक दलितानी विकासाचा एक ठराविक टप्पा गाठला की, मग इतर गोष्टी आरक्षणाशिवाय मिळवायला शिकायला हवे. त्याचे दोन फायदे होतील. एक तर त्या जागा आपल्याच कुठल्यातरी बांधवासाठी खुली होईल व दुसरे म्हणजे आपण स्वतंत्ररित्या स्वबळावर हे सगळ मिळविल्याने खरच मुख्य प्रवाहाचा हिस्सा होता येईल.
मुख्य प्रवाहात आमचं स्थान:
आज मुख्य प्रवाहात आमच्याकडे तुच्छ नजरेनी बघतले जाते. मी माझच उदा. सांगतो मी खर तर त्या क्षेत्रात काम करतोय जिथे आरक्षणाचा काहीच संबंधच नाही. मी खाजगी क्षेत्रात संगणक (सोफ्टवेअर) कंपनीत  काम करतो ईथे नौकरी देताना फक्त आणि फक्त गुणवत्ताच पाहिली जाते. तरी जेंव्हा माझ्या सहका-याना कळते की मी दलीत समाजातील आहे तेंव्हा ते नाकं मुरडताना दिसतात. मी विचारल्यावर त्यांचं म्हणंन असतं की तुम्ही ईथे येताना भलेही आरक्षण घेतलं नसेल पण शिकताना तर आरक्षण घेताच ना. म्हणजे ईथे येण्याच्या एकंदरित प्रक्रियेतील सुरुवातीच्या काही टप्प्यात तर तुम्ही आरक्षण घेऊनच ईथवर आलात. तेंव्हा मात्र माझं यावर ठरलेलं उत्तर असतं.
आई वडिलांचं बोट धरुन उभं राहायला शिकलेलं मुल व पायाला आजार झाल्यामुळे डॉक्टरांच्या उपचाराने उभं राहायला शिकलेलं मुल यातील दोघांच्या उभं राहण्याच्या प्रक्रियेत जरी भिन्नता असली तरी शेवटी रेसच्या मैदानात पदक पटकविताना धावपट्टीवर फक्त गतीमान प्रदर्शन महत्वाचे. तसेच मी कुठला उपचार घेऊन आलो या पेक्षा या शर्यतीच्या धावपट्टीवर मी माझी गती सिद्ध केली हे महत्वाचं, मग माझ्या उभं राहण्याच्या प्रक्रियेत काय उपचार झाले ते महत्वाच नाही.
आपल्याला दोन आघाड्या उघडुन या मुख्य प्रवाहात घुसायचे आहे. एक आरक्षणाच्या मदतीने विकास साधत पुढे येणारी आघाडी व दुसरी थेट स्वबळावर ईथे मुसंडी मारणारी आघाडी. त्यामुळे मुख्य प्रवाहातील आपली एकुण संख्या वाढेल. मुख्य प्रवाहात आपल्या लोकांची जसजशी संख्या वाढेल तसं विकासाची बरीच दारं आपल्यासाठी मोकळी होतील.  
आजच्या घटकेला आपल्यापैकी बरिच लोकं मुख्य प्रवाहात शामिल आहेत पण ते वरवर दिसण्यापुर्ती. ज्यांना आधि संधि मिळाली, विकास झाला त्यातलीं कित्येल लोकं समाजाशी संबंध सोडुन मुख्य प्रवाहाच्या फसव्या सामिलिकरणात उर्मीनी जगतात. पण जेंव्हा पोरा बाळांच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा हया मुख्य प्रवाहातिल कुणीच आपल्याला मुलगी देणार नाही किंवा मुलीला स्थळ मिळणार नाही याची प्रचिती येताच खाडकन झोप उडते व हि लोकं या २० वर्षाच्या समाजत्यागा नंतर परत एकदा स्वार्थापायी आपल्या समाज बांधवांना शोधत येतात. आम्ही वरवर कितीही म्ह्टलं तरी आजुन जातपात मुळीच म्हणजे मुळीच गेलेला नाहिये. फक्त प्रोफेशनल लेवलवर आम्ही एकत्र येतो म्हणुन उगीच तसं जाणवु लागलं. पण जेंव्हा मुला-मुलींच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा कळतं की हि जी नाती आज पर्यंत जोपासलीत ती जातिपातीचे बंध सांभाळूनच जोपासलित. या सगळ्या नात्याना व्यवहारिक टच होता व त्याच धर्तिवर ती नाती उभी होती. माणुस म्हणुन आपण एकदुस-याना स्विकारले नव्हतेच. आपण एक शेजारी म्हणुन स्विकारले होते, कार्यालयातील सहकारी म्हणुन स्विकारले होते. शेजारी व सहकारी म्हणुन स्विकारने काळानुरुप गरजेचेही होते. पण माझ्या बरोबरिचा माणुस म्हणुन आपण केंव्हाच एक दुस-याला स्विकारलेलं नव्हतं. तर हे आहे आमचं मुख्य प्रवाहातिल स्थान.
म्हणुन आता मुख्य प्रवाहात मुसंडी मारायची तर दोन आघाड्या उघडुन. पण हे होईल की नाही शंकाच येते.

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

मराठीत वेबसाईट बनवा फक्त १०,०००/- रुपयात.

खरतर बरहा वापरायला लागल्यापासुन मला मराठीत लिहण्याचा सराव तर झालाच पण आता वाचताना सुद्धा अमराठी साईट नकोशी होते. या आधी एखादी माहीती आंतरजालावर शोधायची म्ह्टल्यास ती फक्त इंग्रजीतच उपलब्ध असे व माझ्यासारख्या कुडकेल्लीच्या रानातुन मराठी माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या व इंग्रजीत कसंबसं पास झालेल्या माणसाला ती माहिती अर्धवटच समजत असे. पण एवढ्या एक दोन वर्षात मात्र मराठीतील संकेस्थळांवर जवळपास हवी असलेली सगळी माहीती उपलब्ध आहे.
आज प्रबोधनकारांच्या संकेतस्थळावर फिरताना www.marathiwebsites.com  हे संकेतस्थळ दिसलं. तिथे जाऊन सविस्तर वाचल्यावर मनातुन आनंद झाला. लगेच दिलेल्या नंबरवर फोन लावला. प्रसाद शिरगावकरांशी बोलणं झालं. त्यानी सांगितल्याप्रमाणे साधारण एक साईट बनविण्याचा खर्च ९,०००/-  ते १०,०००/- रुपये एवढा येतो. मी या आधी वेबसाईट बनवायची म्हणुन ब-याच लोकांकडे विचारना केली तेंव्हा त्यांच्या विक्रीअधिका-यानी स्टॅटिक पेज, डायनामिक पेज व डेटाबेस असे बरेच गोंधळघालणारे प्रकार सांगुन मला झेपणार नाही एवढा आकडा सांगितला. त्या नंतर मी स्वत:चं संकेतस्थळ बनवुन घेण्याचं स्वप्नच डोक्यातुन काढुन टाकला. आज प्रसादशी बोलताना त्यानी वरिल पेजेसबद्दल काहीच सांगितलं नाही. मग मी स्वत:हुन त्याला विचारलं, तेंव्हा तो म्हणाला की, ते Content Management System मधे साईट तयार करतात. सगळेच पेज डायनामिक असतात. आपल्याला हवं तेंव्हा, हवी तशी माहिती अपडेट करता येते. आणि हे सगळं मिळणार आहे फक्त ९ ते १० हजारात.
चला, तर आता परत एकदा विचार करायला हरकत नाही.
धन्यवाद प्रसाद

मराठी वेबसाईट्स
प्रसाद शिरगावकर : 9850 828291 
किंवा
info @ marathiwebsites.com

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

आरक्षण – वॉकर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी, मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी व सामाजीक समतोल साधण्यासाठी आरक्षणाची घटनात्मक तरतूद केली. त्याचा परिणाम आज आपल्याला बघता येईल. दलित समाजातिल ही तीसरी पिढी शिक्षण घेत आहे व अगदी दोन पिढ्यांच्या अत्यल्प कालावधित दलितानी ब-याच आघाडयांवर अत्यंत प्रभावी नि तडाखेबंद मुसंडी मारली.  शिक्षणाच्या जोरावर अन आरक्शण्याच्या जोडीने प्रत्येक क्षेत्रातील दलितांचं अस्तीत्व दिवसेंदिवस वाढत आहे.  या मूळे समाजात रुंदावलेली दरी मिटविण्याचं पुण्यकार्य तर होतच आहे, त्याच बरोबर समतेची मुल्यं रुजताना एक नवीन समाज व्यवस्था जन्म घेत आहे. नवी सामाजीक मुल्य़ रुजताना दिसत आहेत, याचा एकंदरीत परिणाम हा देशाच्या हिताचा तर आहेच पण लवकरच महाशक्ती बनण्याचे स्वप्न रंगविणा-या या नव्या पिढीच्या उत्कर्षाला अत्यंत हितकारक नि अनुकूल परिस्थीती निर्माण करण्याचं कार्य सामाजीक दरीच्या निर्मूलनातून उभं होत आहे. अन या महान कार्यात सामाजिक असमतोलता सर्वात मोठा धोका होता, आधी सामाजिक सलोखा तयार करुनच हे कार्य सिद्धिस जाऊ शकतं, त्यासाठी तळगळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणने अत्यंत गरजेचे होते. या तळागळातल्या लोकाना मुख्य प्रवाहात आणून देशाचे हित साधण्यात सर्वात महत्वाची भूमिका जर कुणी बजावत असेल तर ती म्हणजे आरक्षण होय. आरक्षणाशिवाय या देशातील वंचिताना मुख्य प्रवाहात सामावून घेणे अशक्यप्राय गोष्ट होती व यावर दिलेला रामबाण उपाय म्हणजे आरक्षण.  मी स्वत: ज्या आयटी कंपनीत आहे तिथे सुद्धा दलित बांधव चांगल्या पदावर काम करत आहेत. इनफोसिस, ओरॅकल, विप्रो ते सिडॅक पर्यंत सगळीकडे बौद्धिक कसोट्यावर आपला लोहा मनवून मोठ्या डौलात अधिकारी पदावर विराजमान दलित बांधव बघुन मन समाधान पावतं. अत्यल्प काळात केलली ही यशस्वी वाटचाल, विना आरक्षण क्षेत्रात दलितानी केलेली विजय घोडदौड पाहता अंगावर मुठभर मांस  चढतं. हे सर्व शक्य झालं त्या आरक्षणामूळेच. आरक्षणामूळे आम्हाला विद्यार्जनाच्या वाटा खुलल्या जी प्रगतीच्या नि विकासाच्या मार्गातील मुलभूत गरज आहे. ईतर सर्व यश हे कष्टाने पादाक्रांत करता येतात पण त्या रणांगणात शिरण्याचा कार्ड ज्या मूळे मिळतो ती विद्या. अन विद्यासंपन्न होण्यास आम्हाला आरक्षणाची निकडीची गरज होती ती बाबासाहेबानी घटनेच्या माध्यमातून दिली.
कुबडयांचा आधार
माझ्याशी ब-याच लोकानी आरक्षणाबद्दल नकारात्मक चर्चा केल्या. दलितेत्तरांमधिल सगळ्याच लोकांचं (शिवधर्मवाले सोडुन) मत आहे की तुम्हाला आरक्षण देऊन आज ५० वर्षे उलटलीत. आता आरक्षणाशिवाय पुढे जायला शिका. आजुन किती दिवस या आरक्षणाच्या कुबडया धरुन चालणार? पुढे पुढे तुम्हाला या कुबड्यांची ईतकी सवय होईल की तुम्ही कुबड्यांशिवाय चालुच शकणार नाही. किंवा भारत सरकार कुबडयांच्या आधारानी चालणारा एक मोठा समाज तयार करतोय ज्या मुळे पुढे चालुन देशाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे जर असच चाललं तर काही वर्षानी भारतातील मोठा समाज कुबडयांमुळे दुबळा झालेला असेल व त्याचा ताण ईतर सुद्रुढ समाजावर पडेल. मग यांचा(दलितांचा) भार परत एकदा सुदृढ समाजाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करेल आणि आपल्या देशात एक अंतर्गत क्लेश, अधोगती, जातीय़वाद व ना ना प्रकारच्या समस्या नुसत्या या कुबडयांमुळे पहावयास मिळतील. म्हणून सरकारनी लवकरात लवकर आरक्षण उठवावे आणि सगळयाना फक्त बुद्धीमत्तेच्या कसोटिवर संधी मिळावी.
काही लोकानी तर इतर प्रगत देशांची उदा. दिलीत. अमुक तमुक देश सुद्धा गरीब होता पण आज त्यांच्या दैदिप्यमान प्रगतीत कुठल्याच आरक्षाचा वाटा नाही नुसतं कष्टाच्या बळावर ते सगळं घडुन आलं. म्हणून दलितानी कष्ट करुन स्वत:ची प्रगती करावी. अमेरीकेत सुद्धा काळे-गोरे वाद होते, तिथे आजही काही प्रमाणात तो वाद आहेच. पण काळ्य़ा लोकानी आज जे काही मिळविलं ते ईच्छाशक्तीच्या  व कष्टाच्या जोरावर. त्या तुलनेत दलितानी काहीच मिळविलेलं नाही, कारण त्याना आयतं मिळवायची सवय झालिये. हे आरक्षण जर असच चालु राहीलं तर भविष्यात सरकारवर आरक्षणा पासुन कसं दुर राहता येईलयावर एक मानसोपचार पोजेक्ट राबविण्याची वेळ येईल इथपर्यंत लोकांनी तारे तोडले.
यावर माझं मत
खर तर ही सुरुवात आहे, आत्ताशी कुठे आम्ही उभं राहायला शिकतोय. प्रत्येक गोष्टीचा परिणाम मिळायला काही कालावधी जावा लागतो. आणि तो परिणाम जर समाज या घटकाशी संबंधित असल्यास मात्र नियोजीत वेळेपेक्षा बराच काळ मागे पुढे होऊ शकतो. आज ५० वर्षात दलितांमधे जो बदल घडून आलाय तो अगदिच निराशाजनक नाही, उलट मोठ्या अभिमानाने सांगावं ईतकी प्रगती झाली आहे.  अगदीच प्रोजेक्ट फेल गेला म्हणून बोंबा मारणारे आमचं मानसिक खच्चिकरण करण्याच्या उद्देशाने व दूराग्रह भावनेने असा अपप्रचार करित आहेत. दलित आणि दलितेत्तर विदयार्थ्याना एकाच परिमाणाने मोजने म्हणजे तालिमीत खुराक खाऊन तयार झालेल्या पैलवाना समोर कुपोषित बाळाला उभे करण्यासारखे होईल. दलित हा आजही बौद्धिक दृष्ट्या पुर्ण सक्षम नाहीच, कारण आमच्या जीन्समधुन आलेला बौद्धिक अधूपणा हा हजारो वर्षाच्या ज्ञानवियोगाचा परिणाम आहे. हा वियोग कोणी घडवून आणला हे जगजाहिर आहे. आज पर्यंत आम्हाला बुद्धी वापरण्याची, ज्ञानार्जनाची सामाजीक व धार्मिक बंदी होती, त्यामूळे बुद्धीचा विकास झालाच नाही. आताकुठे आम्ही बुद्धीचा वापर करायला लागलो. ज्या ज्ञानक्षेत्रात आम्हाला कधीच प्रवेश नव्हता तिथे नुकताच प्रवेश मिळाला, पण तिथे टिकण्यासाठी लागणारा सराव तर व्हायला हवा ना. सवर्णाची पिढी पिढ्यान-पिढ्याच्या सरावानी अत्यंत निपून बनली आहे तर आम्ही नुकतेच विना-सराव तिथे प्रवेशलो आहोत. हा सराव घडावा म्हणून आरक्शण.  सवर्णानी लादलेलं नैराश्य घालवायला आजून किमान १५० वर्षे जावी लागतील. बुद्धिच्या मैदानात आम्ही उतरलो, तिथे आधिच उभा असलेला सवर्ण हा त्या मैदानातला जुना खेळाडू आहे. त्यानी प्रत्यक्ष सराव तर केलाच पण कित्येक पिढ्याच्या जणूकांमधूनही त्याला सरावाचा वारसा मिळाला आहे. त्यामूळे तो आमचा प्रतिस्पर्धी नाहीच मुळी. कुस्तीच्या मैदानात खाऊन पिऊन, आखाड्यात शरीर कमावून उभा असलेला पैलवान अन नुकताच प्रेक्षकांमधून उतरलेला एक सामान्य नागरीक याच्यात लढत केल्यास त्याला स्पर्धा म्हणता येणार नाही. कारण दोन स्पर्धकांची स्पर्धेसाठीची तयारी ही समान नाही. पैलवान हा त्यासाठी खास प्रशिक्षित असून तो दुसरा नागरी प्रशिक्षित नाही. म्हणून पैलवान व तो नागरीक जरी आमने सामने कुस्तीच्या मैदानात उतरले तरी ते बरोबरीचे स्पर्धक ठरणार नाही. जर या दोघात लढत करावयाचीच असेल तर मग त्या नागरीकाला पैलावानाला मिळणा-या सा-या सोयी देऊन तशी तयारी करवून घ्यावी लागले. मधेच तो पैलवान सवलतीच्या विरुद्ध बोंब मारून लढण्यास या म्हटल्यास तसे करता येणार नाही. पैलवानानी घेतलेल्या सर्व सोयी आधी या नागरीकाला देणे गरजेचे ठरेल. पैलवानानी केलेली तयारी करण्यास लागणारा वेळही देणे गरजेचे ठरेल. अधे मधे पैलवान दंड थोपटून लढ्याचा आव आणून आपल्याला आव्हान देऊन आपल्या दुर्बल्याचा उपहास करेलही.  अगदी याच धर्तीवर सवर्णानी पुर्वतय्यारी केली आहे. आम्ही नुकतेच त्या मैदानात उतरलो आहोत. आता आम्हाला पैलवानाच्या बरोबरीत उभं राहण्यासाठी सराव करायचा आहे. त्यासाठी घेतलेल्या सवलती म्हणजे आरक्शण होय.
हजारो वर्षाचा शैक्षणीक वारसा लाभलेल्या लोकांनी वाट्टेल ते बोलायला सुरुवात केली आहे. किंबहुना ५० वर्षातिल प्रगतीमुळे त्याना अंदाज आला असावा की, त्यांच्याकडे बौद्धिक वारसा जरी असला तरी आता दलितानी या क्षेत्रात उडी घेतलीय. लवकरच वेगवेगळ्य़ा आघाड्यातील सुत्र दलितांकडे जातील ला भीती मुळे परत एकदा दलितांची बौद्धिक आघाडिवर घेराबंदी करण्याचा हा प्रयत्न आहे.
बघा मुळात दलित हा हजारो वर्षापासुन शिक्षणापासुन व इतर बौद्धिक विकासाला प्रेरणा देणा-या सर्व गोष्टिंपासुन वंचित असल्यामुळे तो आज सवर्णांपेक्षा डावाच आहे. कारण बुद्धिमत्तेचा संस्कार हा जिन्समधुन सुद्धा येत असतोच. तिव्र ईच्छा शक्तिने सगळं बदलता येतं, पण सगळ्य़ानाच ईच्छाशक्तीचा तो टोक गाठता येणे शक्य नाही. आज जे संवर्ण बुद्दीचे बाता करताना दिसतात त्या मागे एक मोठा इतिहास आहे.
१) त्याचे पालक शिकलेले आहेत.
२) त्याच्या घरी शैक्षणीक जागृती झालेली आहे.
३) बुद्धीमत्तेचा वारसा जीन्स मधुन आलेला आहे.
४) ते जिथे राहतात तिथे शिक्षणासाठी अनुकुल असं वातावरण आहे.
५) एकंदरी बौद्धिक विकासासाठी लागणा-या सर्व गोष्टी त्याना जन्मजात उपलब्ध आहेत.
आणि दलितांचं बघा.
१) त्यांचे पालक शिकलेले नाहीत.
२) त्यांच्या घरी शैक्षणीक जागृती नाही.
३) जीन्स मधुन जे आलं ते नैराश्य, भीती व चाकरी शिकवते.
४) दलित आजही मोठ्या प्रमाणात झोपडयांत राहतो. अभ्यासाची गोडी निर्माण होत नाही.
५) बौद्धिक विकासासाठी काहीच अनुकूल नसतं. त्यानी विकास साधला त्यानी मोठा झगडा करुन ते मिळविलं आहे.
आता कुणीतरी उठुन म्हणेल कि, आमच्या ओळखितला अमुत तमुक माणुस उच्च पदावर असुन सुद्धा त्यानी मुलाना आरक्षणातुन इंजीनिअरिंगला प्रवेश मिळवुन दिलाय किंवा त्यांची मुलं फारशी शिकलेली नाहिये. हि असली एक दोन उदाहरणं घेऊन नियम सिद्ध करता यायचा नाही, याला अपवाद म्हणुन सोडुन दयावे. वरील सर्व घडामोडींचा, परिस्थीतीचा व इतिहासाचा संदर्भ पाहता दलिताना,  वंचिताना या देशाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे म्ह्टल्यास त्याना आरक्षणे देणे अनिवार्य आहे. आरक्षणामूळे सामाजिक असमतोल निर्मूलनास मोठी मदत होईल. याचा देशाच्या विकासावर सकारात्म परिणाम होऊन आमचा देश प्रगतीच्या मार्गावर गती धरेल. देशातील समाजीक सलोखा विकासा साठी पूरक असतो व तो अत्यंत गरजेचा आहे. त्यामूळे या देशातील उपेक्शिताना आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व देशाचे हित साधण्यासाठी बाबासाहेबानी तशी घटनात्मक तरतूद करुन देशावर उपकारच केले.
काय मिळवले, काय गमावले
खरी परिस्थीती काय आहे तर आजही दलित हा खूप मागासलेला आहे. आर्थीक परिस्थीती जेमतेम आहे. शिक्षणाचं महत्व नुकतच कळायला लागलं. पोरानी शिकावं हे आत्ता कुठे पालकांच्या लक्षात येतय. आरक्षणाने फक्त शिक्षण मिळतं इतर सगळ्या गोष्टी स्पर्धेनेच मिळविल्या जातात याचा नव्या पिढीला स्वानूभवातून साक्षात्कार  झाला. मागच्या दोन दशकात झपाट्याने वाढणारं खाजगी क्षेत्र व तिथल्या नौकरीच्या संध्या फक्त गुणवत्तेच्या बळावर मिळतात हे समजू लागलय. आत्ता कुठे गुलामी सोडून उभं राहण्याची तय्यारी करत होतो तोचं खाजगी क्षेत्राचं भूत बुद्ध म्हणून उभं ठाकलं. आता आम्हाला एकाच वेळी दोन आघाड्यावर लढायची वेळ आली. एकतर सामाजीक आघाताच्या दास्यातून स्वत:ची मुक्तता करणे, व दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्राच्या सैतानाशी दोन हात करणे. अजिबात खचून न जाता दोन्ही आघाड्यावर लढण्यास सिद्ध झालो हे सर्वात महत्वाचं. बघता बघता या दोन दशकात दलित मुलानी त्या दिशेनी पाऊल टाकायला सुरुवात केली. नुसतं आरक्षणावर अवलंबुन राहणारी आम्ही माणसं नाही हे सिद्ध करुन दाखविताना अनेक मल्टिनॅशनल कंपन्या पादाक्रांत करण्या पासून थेट अमेरीके पर्यंतची गरूड झेप घेऊन जगाला चकीत केलं. आज खाजगी क्षेत्रातील प्रत्येक मोठ्या कंपनीपासून लहानात लहान कंपनीत दलित मुलं आपली चुणूक दाखवित आहेत. आयटी सारखं बुद्धिमत्तेचं क्षेत्र असो, अटोमोबाईल सारखं कष्टाचं व जिकरीचं क्षेत्र असो वा बॅंकींग सारखं अत्यंत महत्वाचं क्षेत्र असो या सर्व खाजगी क्षेत्रात दलितांची दैदिप्यमान कारकिर्द सुरु झाली. आज आम्ही या विना-आरक्षीत क्षेत्रातही नविन अध्यायाला सुरुवात केली आहे. हे सर्व साध्य करताना आरक्षणाचा थेट संबंध नसला तरी या पदास सिद्ध होण्याच्या मुळाशी आरक्षणाची देण आहे.  
सरकार दरबारी मात्र आजही आरक्षण कोट्यातुन दलितांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तरी कित्येक शाळा व कॉलेजेस मधे दलितांच्या रिक्त जागा भरल्याच जात नाही. हा एक नवीन प्रकारचा जातीयवाद जन्मास आला आहे. कित्येक ठिकाणी तर कुठल्यातरी लोकल वृत्तपत्रात एक लहानशी नाममात्र जाहिरात दिली जाते, जी दलित लोकांच्या वाचन्यातच येत नाही. हा प्रकार मुद्दामहून केला जातो.   जाणीवपूर्वक अशी वृत्तपत्रं निवडली जातात त्यांचा खप अगदी जेमतेम असतो वा लोकं वाचत नाहीत अन नोकरीची जाहिरात दिली जाते. त्यामूळे नोकरीच्या जागांबद्दल दलिताना कळतच नाही.  अशा प्रकारे दलितांच्या जागांवर संस्थेच्या मर्जीतल्या लोकांची नियुक्ती केली जाते. हे सगळं दलिताना डावलण्याचं काम ब-याच संस्थांमधुन होत आहे. थोडक्यात आम्ही आरक्षणामूळे सावरतो ना सावरतो तोच अनेक अडचणी उभ्या ठाकल्या. जातीयवादाचे नवनवी प्रकार जन्मास आले, डावलण्याचे अनेक समिकरण तयार झाले. जागतीकीकरणाचं भूत भारतावर उभा ठाकला. दुहेरी लढा अनिवार्य झाला.  तरी सुद्धा अनेक  आघाड्यावर लढण्यास हा दलित समाज मोठ्या धैर्याने उतरला, अन एक एक टप्पा पादाक्रांत करत पुढे सरसावू लागला.
दलित उद्योजक
आज डिक्की नावाची संस्था दलित उदयोजकांची नवी फडी तयार करते आहे. याच वर्षी पुण्यात भरलेल्या दलित उद्योजकांच्या एक्स्पोला भरभरुन प्रतिसाद मिळाला. मी त्यावर मागे एक लेखही टाकाला होता म्हणून ईथे जास्त लिहत नाही.
बाबासाहेबानी संविधानात घटनात्मक तरतूद करताना अत्यंत जागरुकपणे लिहले आहे की, आरक्षण म्हणजे पुरेसं प्रतिनिधीत्व न मिळालेल्या समाजाला देण्यात येणारं हे प्रतिनिधित्व होय. आरक्षण म्हणजे राजकीय, सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात दिल्या गेलंला संविधानीक प्रतिनिधीत्व होय. हे प्रतिनिधित्व गरजेचं आहे का? होय आहे,कारण आम्हाला आजवर कुठे प्रतिनिधीत्व मिळालच नाही. त्यामूळे समाजीक असमतोल निर्मान झाला, देशाचं वाटोळं झालं. ज्या देशात गृह कलह असतो त्याचा विकास होत नाही.  हे टाळन्यासाठी त्या देशातील सर्व नागरीकाना समान प्रतिनिधीत्व मिळणे अनिवार्य असते. पण या देशातील व्यवस्था समान प्रतिनिधीत्व नाकारणारी होती. त्यामूळे विकास थांबला होता, एक गट विकसीत होत चालला होता तर दुसरा दुबळा होत चालला होता. या दुबळ्या गटाला संविधानिक, प्रतिनिधीत्व देऊन मुख्य प्रवाहात आणणे क्रमप्राप्त होते व त्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून वंचिताना प्रतिनिधीत्व बहाल करण्यात आलं.
आजून सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यास आरक्षण आमचं वॉकर आहे. जसं लहान बाळाला चालायचा निट सराव होईस्तोवर आपण त्याला वॉकरची मदत घ्यायला लावतो. त्या वॉकरच्या मदतीने तो चालायला शिकतो व एकदा पायात बळ आलं की ते मूल वॉकर टाकून स्वबळावर धावतं. आमचं अगदी तसच आहे, आम्ही कित्येक कारणामूळे चालणेच विसरुन गेलो होतो किंवा आम्हाला चालता येते हेच माहीत नव्हत. पण आरक्षण नावाच्या वॉकरच्या मदतीने आम्हाला प्रगतीच्या दिशेनी काही पाऊलं टाकायची संधी मिळाली. कित्येकजण त्या वॉकरच्या सहाय्याने चालायला शिकलेत व आज सुसाट धावत आहेत. म्हणून हा आरक्षणाचा वॉकर आम्हाला हवाच आहे. कित्येकाना आजून त्याच्या मदतीने उभं राहायचं आहे, कित्येकाना चालायला शिकायचं आहे. गतीची कास धरायची आहे. नवा इतिहास घडवायचा आहे. अन याचि सुरुवात होते आरक्षणापासून म्हणून त्याला कुबड्या हे नाव शोभणार नाही, ते आहे वॉकर.
आज या वॉकरमुळे दलितांचा विकास होताना दिसतोय, दलित बांधवात शैक्षणीक जागृती होते आहे. तसेच वॉकरच्या पुढची पायरी म्हणजे स्वत:च्या पायावर उभं राहुन चालणे. अन हे आम्हाला निट जमू लागलय.  पण आमच्या गतीने ज्यांच्या हृदयात धडकी भरली त्यानी धसका घेतलाय. हिनकस शेरे मारणे सुरु केले, मनाचं खच्चीकरण करणे सुरु केले. आरक्षणाच्या नावानी नुसत्या बोंबा सुरु झाल्यात. पण  त्यानी या वॉकरवर उगीच टिका टिप्पणी न करता सहकार्य न जमल्यास निदान विरोध तरी करुन नये व सामाजीक समतोल राखण्यास मुख्य भूमिका बजावणा-या आरक्षणाचं समर्थन करावं. प्रतिनिधित्व नाकारल्यामूळे पंगू झालेली अवाढव्य लोकसंख्या जोवर या देशात असेल तोवर विकास अशक्यप्राय आहे. देशाचा विकास साधावयाचा असल्यास वंचित वर्गाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याना आरक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विनाअट झाले पाहिजे. असे न केल्यास वंचित वर्गातील असंतोष कधीतरी बंड करुन उठेल, ईथे यादवी उसळेल. हे सर्व टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वंचिताना प्रतिनिधीत्व देऊन मुख्य प्रवाहाचा भाग बनविणे व देशाचं हित साधणे. या देशाच्या सार्वभौमत्वासाठी, आर्थिक प्राबल्यासाठी ईथला समाज सशक्त करणे अत्यावश्यक आहे व त्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरक्षण, ते असालयाच पाहिजे.
आरक्षण जिंदाबाद.

रविवार, १२ सप्टेंबर, २०१०

महात्मा रावण


महात्मा रावण एक खुप चांगलं पुस्तक बाजारात आलय। आपण आता पर्यंत रामा बद्दल वाचताना रावण हा एक अतिदृष्ट राजा असल्याचं रंगवुन सांगण्यात आलं किंवा विष्णुच्या अवताराला प्रमोट करण्याच्या उद्देशाने रावणावर चिखलफेक केली गेली।

पण रावण एक महान राजा होता व त्यावर हिंदु लेखकानी सतत शिंतोळेच उडविले नाही तर स्त्री ला पळ्वुन नेणारा एक राक्षसांचा राजा म्हणुन अत्यंत हिन दर्जाच साहित्य हजारो वर्षे भारतात वाचलं व लिहलं गेलं।

पण आता मात्र वेळ आली आहे मुळ रावणाला जाणून घेण्याची। रामायणाच्या बाहेर पडुन रावणाची दुसरी बाजु समजावुन घेण्याची।

रावण बहुगूणी राजा होता। तो एक ज्ञानी व शुर विर मुलनिवासी होता। रावणाला वेदिक लोकानी नुसतं बदनाम करुन ठेवलय।
पण आज मुलनिवासी लोकं शिकुन पुढे येऊ लागले। ब-याच गोष्टी तर्कावर तपासुन बघु लागेले, व ज्या गोष्टी थोतांड आहेत असे वाटते त्यावर संशोधन करुन नविन, सुधारित व खरा ईतिहास दाखविणारं साहित्य आपल्या पुढं ठेऊ लागलेत।
याचाच परिणाम म्हणुन डॉ. वि. भि. कोलते यांचं हे पुस्तक आपल्यापुढे नविन ईतिहास म्हणन्यापेक्षा ईतिहासातिल डावललेली पानं आपल्या समोर सादर करित आहे।

गणेश उत्सव-एक कावा


दोन दिवस झाले पुण्यात गणेश उत्सवाची सगळीकडे धुमधाम चालु आहे. जिकडे तिकडे लोकं गणपतीच्या मुर्त्या घेऊन जाताना दिसतायेत. गल्लो-गल्लीतील मंडळानी सार्वजनिक गणपती स्थापन करुन ध्वनी प्रदुषण करायला सुरुवात केली आहे. ऊभा महाराष्ट्र हा सण साजरा करतोय. सर्व स्थरातून गणेशाला विद्येची व बुद्धीची देवता म्हणुन पुजण्याचा महाकाय असा कार्यक्रम चालू झाला. या कार्यक्रमामूळे होणारी लोकांची गैरसोय हा वेगळा विषय आहे. या उत्सवानी लोकांच्या नाकी नऊ आणून ठेवले तरी हिंदूवादी लोकाना याचं काही देणं घेणं नाही.
गणेश उत्सवाचा ईतिहास:
गणेश उत्सवाचा ईतिहास सगळ्य़ा जगाला माहित आहे. इंग्रजांच्या काळात देशवासी बांधवाना एकत्र आणण्यासाठी टिळकाना एक Plat Form ची गरज होती व त्यानी गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले. हा धार्मिक platform वापरुन इंग्रजांविरुद्ध चळवळीला बळ देता येईल असा त्यांचा उद्देश होता म्हणे. असा इतिहासातील पुराव्यांचा कल आहे.
आता माझं मत
जर तसे असते तर मग इंग्रज गेल्या गेल्या हा उत्सव बंद व्हायला पाहिजे होता.  पण तिळकानी तशी केलीच नाही. म्हणजे गणेश उस्तव म्हणजे टिळकानी आपल्या जात बांधवांसाठी तयार केलेली राजगार हमी योजना होती.  स्वातंत्र्याच्या नावाखाली बामणांसाठी रोजगार मिळवुन देण्याचा हा एक हेतु होता व तसेच भारतातिल बहुजनांच्या डोक्यात हा गणेश घुसवून धार्मिक गुलामगिरी लादण्याची ही एक प्रोसेस होती. जी आज खरच तसा निकाल दाखवित आहे. आज सगळा बहुजन समाज गणपतीच्या आहारी गेला आहे. दारु व अफुची नशा एकवेळ सोडविता येईल पण टिळकानी जी नशा बहुजनाना लावुन दिली ती सहजासहजी सोडविता येणे शक्य नाही.
बरं भारतिय संविधानात धार्मिक उत्स्वाना स्थान आहे. भारतात हिंदु व्यतिरिक्त पारसी, जैन, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या समाजातील लोकंपण सण साजरे करतात. वरिल सगळ्या धर्मात सुद्धा धार्मिक उत्सव आहेत. पण हा समाज धार्मिक उत्सव साजरा करताना इतर लोकाना त्रास होणार नाही याची काळजी घेतो. उत्सव साजरा करताना जबाबदारी न विसरता नियमाचे उल्लंघन न करता सगळे उत्सव शिस्तीत व लोकांच्या स्वातंत्र्याला गदा न पोहचविता पार पाडतो. भारतातीलच काय जगातील सर्व समाजात आपले सणं साजरा करताना इतराना त्रास होणार नाही याची दखल घेण्याची मानसिकतात, नितमत्ता दिसून येते. याच्या अगदी उलट हिंदू मात्र नितीमत्तेला धाब्यावर बसवून उस्तव साजरा करतो. यांचा उत्सव हा उद्दामपणाचा प्रतिबिंब असतो. गणेश चतुर्थीला गल्लो गल्ली स्टेज ठोकुन रस्ते अडविले जातात. येणा-या जाणा-यांची गैरसोय केली जाते. आणि १० दिवस नुसता धिंगाणा चालु असतो. या टागरपणामूळे कित्येक गणेशमंडळांविरुद्ध दर वर्षी गुन्हे दाखल होतात. हिंदू सणांच्या व्यतिरिक्त कुठल्याच सणाला असा गालबोट लगत नाही. सर्वात जास्त पोलिस केसेस नोंदविल्या जातात ते हिंदूच्या सणानाच, त्यातल्या त्यात या बाबतीत गणपतीचा मान सर्वात मोठा. गणपती उत्सवात सर्वात जास्त तक्रारी दाखल होतात व वेळ प्रसंगी पोलिसांचा सौम्य, तरी कधी तीव्र असा लाठीमारही होतो. एकंदरीत या सर्व घटनांचा आढावा घेतल्यास गणेश उत्सव कसा असंवेदनशील व उद्दामपनाचा प्रतिध्वनी आहे हे सिद्ध होते.
वरुन गणेश कोण तर बुद्धिचा देवता म्हणे।
पण या देवतेनी दलिताना शिक्षणाची सोय दिली का ? त्या साठी इंग्रजाना यावं लागलं. तोवर हा देवता कुठे होता ?
आणि इंग्रज आले नसते तर आजही शिक्षण हे फक्त बामणांसाठीच आरक्षीत असतं. हजारो वर्ष शिक्षण बामणांसाठी राखुन ठेवण्यात हातभार लावणारा हा गणेश किंवा दलिताना शिक्षणांपासुन वंचित ठेवणारा गणपती बामणेत्तरांचा देव आहे का? अजिबात नाही. तो देव आहे बामणांचा, कारण गणेशाच्या कृपेने फक्त बामणाना शिक्षणाची सोय व्हायची अन आजही होते. अशा गणेशाला टिळकानी अगदी शिताफिने बहुजानांच्या गळ्यात मारलं. भोळी जनता गणेशाला देव मानून पूजू लागली व आज ती प्रथा काटेकोर पणे पाळली जात आहे. हे खरच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.