सोमवार, २५ जानेवारी, २०१०

नटरंग -डंडार

नटरंग

अगदी सुरुवातिलाच खुलासा करतोय कि मी नटरंग बद्द्ल लिणार नाही, नटरंग बघितल्यावर मला गावाकडाच्या ज्या लोक कलांची आठवण झालिय, त्या बद्दल लिहाणार आहे. परवाच नटरंग सिनेमा बघितला, तसं या सिनेमाचा मिडिया व इतर संकेतस्थळांवर खुपच गाजावाजा झालेला आहे. पण खर तर मला सिनेमा फारसा आवडला नाहि. पण अतुल कुलकर्णीचं अभिनय मात्र अप्रतिम आहे. तसं कुणाला हा सिनेमा बघा म्हणुन सांगता यावा एवढा चांगला तर नक्कीच नाही पण अतुलचं अभिनय बघायला नक्कीच जावं एवढं वजनदार काम केलय त्यानी.


१) लावणी
सुरुवातिलाच सगळ्या लावणी प्रेमींची क्षमा मागुन सुरुवात करतोय. मी मुळचा विदर्भाचा आहे, आमच्या विदर्भात आजही लावणी फारसी रुढलेली नाहिये. खरं तर लावणी हा शुद्ध पश्चिम महाराष्ट्रातिल लोक कलेचा प्रकार आहे व विदर्भा पर्यंत त्याचा तेवढा जोर आजुन पोहचायचा आहे. हल्ली विदर्भात लावणीची खेळ होताना दिसतात पण ते तेवढ्यापुरतच. जेंव्हा माझ्या पिढीची जडण घडण होत होती तेंव्हा मात्र लावणी ह्या प्रकाराकडे विदर्भात तरी तेवढया मानाने बघतिल्या जात नव्हते. शाळा कॉलेज मधिल गॅद्रींग व इतर कुठल्याहि सांस्कॄतीक कार्यक्रमात लावणी प्रकार फारसा बघायला मिळत नसे. तस आम्ही कॉलेजात शिकतान एक दोन मुलीनी गॅद्रींगला लावणीचे प्रयोग करुन बघितले पण त्यांच्या कलेला तेवढा वाव मिळाला नाही, मग पुढे त्यानीही लावणी बसवलेली आठवत नाही. कारण तिकडे लावणीकडे बघण्याचा दृष्टीकोन आजुन बदलायचा होता. लावणी म्हणजे वल्गरपणा, कस्ले ते घाणेरडे हावभाव, काय त्या नको नको त्या हालचाली, एकंदरित काय तर माझ्या मनातल्या कुठल्या तरी कोप-यात लावणी बद्दल थोडसा तिटकाराच आहे. जेंव्हा मी पहिल्यांदा पुण्यात आलो, बाल गंधर्वला लावणीचा कार्यक्रम होता, चला हा नविन प्रकार आज बघु या म्हणून एकदाचा लावणीचा कार्यक्रम बघायला गेलोच. बरिच लोकं सहकुटुंब लावणी बघायला आलेली पाहून मला नवलच वाटलं. कारण आजवर लावणी हि सहकुटूंब पाहण्याची कला नाही, माझा असाच समज होता. मनात विचार आला, “च्या बयीन, पुन्याची लोकं कायीच्या काय़ी आहेत बाप्पा, लावणी पाहाले बायका पोरांसग येऊन रायले” शेवटी एकदाचा सभागृहात शिरलो व लावणीचा कार्यक्रम चालु झाला. कार्यक्रम कुणाचा होता ते मुद्दाम लिहत नाही, पण त्या लावणीतले हावभाव, तो नाच, ती अदा व ते शब्द काहीच कलेच्या व्याखेत बसणारं वाट्त नव्हत. मला काही हा कार्यक्रम फारसा आवडला नाही, तरी मी स्वत:ची समजुत घालत होतो. “बघ मध्या, लावणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लोककला होय, सरकार दरबारी या कलेची दखल घेतली जाते, आपल्या सारख्यानी नाही तर कुणी बघावी लावणी?.” अशा वेगवेगळ्या आमिषाने स्वत:च्या मनाला वळविण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाल्यावर शेवटी मन मानायला तयारच नाही हे लक्षात आल्यावर सभागृह सोडण्याचा निर्णय घेतला. मधुनच कार्यक्रम सोडुन बाहेर पडलो त्या नंतर परत केंव्हाच लावणी बघायला जायच्या फंदतच पडलो नाही.

२) तमाशा : (दंडार/डंडार)
तमाशा हि कला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातिलच, म्हणून मला तमाशातलंहि फारसं कळत नाही. पण जेंव्हा नटरंग बघितला, तेंव्हा कळलं की अरे हा तर आमच्या विदर्भातील दंडार/डंडार प्रकार आहे. मी क्षणात थेट २०-२५ वर्षे मागे गेलो, तसं मी लहान असताना डंडार बघायला उड्डेरा, बुर्गी, व कांदोळीला रात्र बे रात्र जायचो. नटरंग मधे तमाशा म्हणुन जे काही दाखविण्यात आलं ते सगळं अगदी तंतोतंत आमच्या गावाकडच्या डंडारीशी मिळत जुळत आहे(जाणकारानी अधिक माहिती लिहावी). दंडार म्हणजे नाटकाच्या उत्क्रांतीची पहिली आवृत्ती म्हणता येईल. आमच्याकडे दंडार मध्ये बाईच्या भुमीका पुरुषच करतात, (आजका स्त्रीया करायला लागल्यात). दंडार म्हटलं की नाच, गाणं, रडण, ओरडण वैगरे सगळे प्रकार आलेतच, नुसती धमाल असते दंडार म्हटलं की. लहानपणी गावात दंडार असलं की न चुकता पाहायला जायचो. ज्या माणसानी दंडार ठेवली त्यानी दंडार करणा-यांची सोय करायची असते. दंडारिवाल्याना एखादा गोठा किंवा चावाडी (सेकंड होम) दिला जाई. ती लोकं तिथे रांध-पांध करुन जेवण झालं की थोडाफार सराव करित असत. आम्ही मात्र चोरुन त्यांचा सराव बघत असो, पण मधेच कुणी तरी येऊण आम्हाला पळवुन लावी. ज्या दिवशी गावात दंडार असायची तेंव्हा दुपारपासुन जिकडे तिकडे दंडारिचीच चर्चा व्हायची. आईपण लवर स्वयंपाक करुन दिवस बुड्ण्याआधीच खायला दयायची. आम्ही रात्र होण्या आधीच दंडारीच्या जागी जाउन चटई/पोते अंथरुन आपापली जागा पक्की करायचो. आजुण दंडार सुरु व्हायला बराच अवकाश असला तरी मात्र गावातिल माझ्या वयाची पोरं आधीच येऊन घरच्यांसाठी जागा राखीव करत असत. थोडसं अंधार झालं कि वडील सुद्धा तिकडे यायचे पण ते ईथे न बसता दंडार ज्यानी ठेवली त्याच्या अंगणात कुठेतरी कॉटवर आपली जागा पक्की करायचे. आई मात्र दंडार बघण्यात आमच्या सोबत असायची. एकदा दंडार सुरु झालं की आई अगदी वेळेवर यायची, आम्ही आधीच तिच्यासाठी जागा राखुन ठेवल्या मुळे तशी तीची बसायची सोय झालेलीच असे. मग आईसोबत बसुन आम्ही दंडार बघायचो. या दंडारितलं पोरांसाठीचं मुख्य आकर्षण असायचं ते म्हणजे माणूस वाघाचं सोंग घालून अधे मधे किंवा दंडारीच्या स्टेजवर सुद्धा फिरायचा, व त्याचं आम्हाला फारच अप्रुप वाटे. अगदी आजच्या पोराना सांताक्लोजला बघुन जसं वाटत असावं तसं काहितरी आम्हाला वाटे. आता या वाघाचा त्या दंडारातल्या काहाणीशी काही संबंध असायचा की नाहि ते मात्र मला आज निट आठवत नाही. आई मात्र आम्हाला मधे मधे दंडाराची कहाणी समाजावुन सांगत असे. आणि हे दंडार अगदी पहाट पर्यंत चालत असे. आम्ही जास्तित जास्त १२ पर्यंत जागत असु. नंतर केंव्हा झोप लागे माहितच नाही, आम्हा सगळ्या भावंडाना आई तिथेच झोपवी. नंतर पहाटे दंडार संपल्यावर जेंव्हा आई आम्हाला उठवायची, तेंव्हा मात्र दंडार चुकल्याचं फार वाईट वाटे. मगे पुढचे दोन महिने आईकडुन त्या दंडारची कहानी ऐकायचो. ती ही तेवढ्याच उत्साहाने परत परत तिच ति कहानी सांगायची. मला “नागा बालाम्मा” व “बिरबल” हे दोन दंडारं आजही पुर्णपणे आठवतात. पण नंतर जेंव्हा आम्ही चंद्रपुरला शिकायला आलो, टॉकीजवरचे सिनेमे बघु लागलो, व्यावसायीक नाटकं बघु लागलो तेंव्हा मात्र दंडाराचं आकर्षन हळू हळु कमी होऊ लागलं. या नंतर गावत दंडार असली तरी मी जात नसे, कारण दंडार हा खुपच जुना व विकसित न झालेला गावठी प्रकार वाटायचा. या संसाराचा नियम आहे, कुठलीही कला असो, तिनी काळानुसार कात टाकायलाच हवी, तेंव्हाच तिचं अस्तित्व टिकतं. त्या मानाने आजकालची चांगली व्यवसायिक नाटकं व थिएटरातली सिनेमे बघितल्यावर दंडारची गरजच काय असं वाटु लागलं आणी हे खरही आहे. आमच्या गावाला आधी दर वर्षी दंडारं व्हायची, कुणाच्या घरी लग्न, बारसं, वा इतर काही शुभ कार्य असल्यास गावातिल लोकांच्या मनोरंजनासाठी दंडार मात्र हमकास असायचं. आजकाल मनोरंजनाच्या इतर आधुनिक साधनं व विकसित कलेमुळे गावाकडील एक लोक कला लोप पावतेय (पावली). मागच्या १० वर्षात आमच्या गावात दंडार झाल्याचे मलातरी आठवत नाहि. हे सगळ आठवलं नटरंग बघुन. आज उभा महाराष्ट्र ज्या नटरंगाला बघत होता, तसे कितीतरी नटरंग मी लहानपणापासुन बघत आलेलो होतो. आज या सिनेम्या मुळे परत एकदा गावाला जाऊज दंडार बघण्याची इच्छा होते आहे. पण आता तिकडे दंडार आहे की नाही, माहीत नाही.

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

त्रिपिटक - Tripitak

त्रिपिटक

त्रिपिटक हे बौद्ध धर्माचं पवित्र ग्रंथ आहे. हे ग्रंथ खालील मुख्य तिण भागात विभागलेलं आहे.
१) विनयपिटक.
२) सुत्त पिटक
३) अभिधम्मपिटक
अशा तिन भातात हि ग्रंथसंपदा महाजालावर वाचकांसाठी उपब्ध आहे. त्या व्यतिरिक्त अठ्ठकथा, टिका व अन्य लिखान ईथे उपलब्ध आहे. वाचकानी खालील दुव्यावर टिकची मारुन वाचनांचा आनंद घ्यावा.

http://www.tipitaka.org/deva/

बुद्धं सरणं गच्छामी

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.


बुद्धं सरणं गच्छामी, ( बुद्धाला शरण जातो)
धम्मं सरणं गच्छामी.
( धम्माला शरण जातो)
संघं सरणं गच्छामी. ( संघाला शरण जातो)

दुतियंपी बुद्धं सरणं गच्छामी,
( दुस-यांदा बुद्धाला शरण जातो)
दुतियंपी धम्मं सरणं गच्छामी.
दुतियंपी संघं सरणं गच्छामी.

ततियंपी बुद्धं सरणं गच्छामी,
(तिस-यांदा बुद्धाला शरण जातो)
ततियंपी धम्मं सरणं गच्छामी.
ततियंपी संघं सरणं गच्छामी.

पानाति पाता वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।

(हत्या न करण्याची शपथ घेतो)
अदिन्नदाना वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।
(चोरी न करण्याची शपथ घेतो)
कामेसु मिच्चाचारा वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।
(कामना न करण्याची शपथ घेतो)
मुसावादा वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।
( खोटे न बोलण्याची शपथ घेतो)
सुरा मेरय मज्जा, पमादठाना वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।
( नशा न करण्याची शपथ घेतो)

बुधवार, २० जानेवारी, २०१०

विपश्यना - Vipassana

विपश्यना:
विपश्यना हा पाली शब्द आहे, विपश्यनाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वत:कडे बघणे व मनाच्या जडणघडणीचे निरि़क्षण करणे असा होतो. बुद्ध तत्वदन्यान स्वत:मधेच एक अथांग नि व्यापक अशी मांडणी आहे. या तत्वज्ञा नातला विपश्यना हा एक लहानसा भाग आहे. विपश्यना ही एक बुध्दीजम मधील शुद्ध व पवित्र अशी ध्यान साधना आहे. हीसाधना समस्त माणव जातीसाठी खुली आहे असून कोणीही ती करू शकतो. साधना १० दिवसाची असते. साधनेच्या दरम्यान त्या दहा दिवसात एकंदरीत कडक शिस्तीचे पालन करावे लागते. या  मौनव्रत, एकच वेळा जेवन, १० तास बसून साधना (ध्यान) तर सकाळी ४ ला ऊठणे, रात्री १० लाच झोपणे अशा सगळ्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे लागते. भगवान बुद्धाने या साधनेला दोन भागात विभागले आहे, एक आन-पान व दुसरे विपश्यना. ह्या साधनेत मुख्यत्वे श्वासावर कसे नियंत्रण ठेवावे व शरिरातील अतिशु़क्ष्म हालचालिंचे कसे निरीक्षण करावे हे शिकविले जाते.

मी माझा विपश्यनाचा अनुभव लिहण्याचे कारण म्हणजे आजच्या दगदगिच्या जिवनात प्रत्येकाने किमान वर्षातुन एकदा तरी विपश्याना करावी असं मला वाटतं. त्यामुळे मानसीक बळ तर वाढतच पण आपली बौद्धिक, शारिरीक क्षमताही ब-यापैकी कलाटणी घेते.

मी ब-याच दिवसांपासून विपश्याना करण्याच्या प्रतिक्षेत होतो पण दिवस काही उगवेना. शेवटी एक दिवस स्वारगेटच्या विपश्यना केंद्रावर जाऊन चौकशी केली. पुढचे किमान दोन महिने तरी माझा नंबर लागणार नाही असं कळलं. मग मी हताश होऊन परत आलो. मित्राला फोन करुन झालेला प्रकार सांगितला. तो म्हणाला मग पुण्याच्या बाहेरच्या एखादया केंद्रावर जाता येते का ती चौकशी कर. परत दुसर-या दिवशी स्वारगेट गाठलं, मला बघुन दुरुनच ते म्हणाले, अहो तुम्ही कालच येऊन गेलात ना? जागा नाही आहे, एक काम करा तुम्ही आता अर्ज देऊन जा तीन महिन्या नंतरच्या साधना वर्गासाठी तुमची नोंदणी करुन घेतो मी. अरेच्च म्हटल... ही वागणूक "अरे हाड..." वाली झाली. पण मनात पक्क ठरलं होतं... कुछ भी होऊन जाने दो, अपूनको तो विपश्यना करनाही है! ही माझी नागपूरी हुक्की. नागपूरी माणसाला मनाशी संवाद साधताना हिंदी मदतिला धावून येतेच. हताश झाला की नागपूरी माणूस हमखास एकदोन वाक्ये हिंदीत ठोकून देतो... कोणीच नाही मिळाला तर स्वत:शीच हिंदीत बडबडून घेतो. माझी हिंदी बडबड आटपून झाल्यावर मी दोन मिनटं शांत होऊन त्याना म्ह्टलं, "पुण्याबाहेरचं एखादं पर्याय असल्यास सांगा माझी तयारी आहे?"  हे मात्र अगदी बरोबर बसलं. दोन मिनटं थांबा मी बघतो म्हणत त्यानी त्यांच्या मरकळ केंद्रावर फोन लावला. चौकशी करुन फोन ठेवत ते म्हणाले  "दोन जागा शिल्लक आहेत पण तुम्हाला आजच निघावं लागेल".  मी म्ह्टलं "नो प्रोब्लेम सर" अन माझा प्रवेश पक्का करण्यासाठी अर्ज भरायला घेतला. त्या अर्जातील अटी व शर्थी खालील प्रमाणे होते.

विपश्यना प्रवेश मिळण्याच्या अटी:
१) सकाळी ४ वाजता उठणे आवश्यक.
२) दिवसातुन फक्त एकच वेळा जेवन मिळेल... इथे मात्र मी हादरलोच.
३) सायंकाळी १ ग्लास दुध व एक फळ/मुरमुरे एवढच मिळतील.
४) १० दिवस मौन व्रत पाळावे लागेल.
५) रोज १० तास बसून ध्यान करने आवश्यक आहे.
आणी अशा ब-याच अटी होत्या ज्या आज मला आठवत नाहीत. मला सगळ्या अटी मान्य होत्या. मी तो अर्ज भरुन दिला. नंतर गुरुजीनी काय काय सामान व कपडे सोबत घ्यावे त्याची यादीच दिली. त्यास खास करुन घरी वापरणारे कपडे जसे की लुंगी व  अंगात सैल बसणारे कपडे सोबत घेण्यास सांगितले. कारण १०-१० तास बसून ध्यान करताना त्रास होऊ नये वगैरे... मी घरी आलो... दोन लुंग्या, गरजेचे कपडे व सामान ब्यागेत भरुन निघालो मरकडच्या दिशेनी.


मरकडच्या दिशेने प्रवास:
मरकड हे गाव आळंदिच्या पुढे ७-८ किमी अंतरावर आहे. तसं मी सगळा पत्ता नीट समजावुन घेऊनच निघालो होतो. आणी या आधी बरेच वेळा आळंदिला गेलो असल्यामुळे तेवढी अडचण झाली नाही. एकदाचं आळंदी सोडून पुढे गेल्यावर मात्र भूक लागली. तसं मला खायला सगळ्यात जास्त काय आवडतं तर नाँनवेज. विपश्यना सारख्या पवित्र व धार्मिक साधनेला जाताना मांस खायचं नाही असं ठरवलं होतं. होटेलात जाऊन विचारलं तर तो म्हणे वेज मधे बटाटे, शेवग्याच्या शेंगा, भेंडी आणी आजुन दोन चार बोअरींग प्रकार सांगितले. कळस म्हणजे करल्याची भाजी मिळेल म्हणाला.  ते कारलं ऐकून त्या वेटरचा असला राग आला. त्याला जवळ बोलावुन म्हटलं, “काय मजाक करुन रायलास काय? कारलं मिळतं म्हणे, तुला काय मी अलिबागवरुन आलेला दिसुन रायलो की काय ?” (ही माझी दुसरी हुक्की. रागाच्या भारात मी नेहमी नागपूरी भाषा झोडतो). तो म्हणाला नाही साहेब, आमच्या मालकाच्या घरीच (जे होटलच्या अगदी माहे होतं) कारलं पिकतं.  म्हणून कुणी कारल्याचा दर्दी गि-हाईक आला की लगेच जाऊन ताजे ताजे करले तोडुन भाजी बनवतो. म्हटलं साला इथे वेगळाच प्रकार आहे. ह्या सगळ्य़ा वादाने माझं डोकंच पेटलं. म्ह्टलं नाँनवेज मधे काय आहे? बांगळा व चिकन दोनच प्रकार आहेत साहेब. म्हटलं "देऊन टाक तो बांगळा" साला म्हटलं कारल्यापेक्षा बांगला कधिही पवित्रच.  १० मिनटात जेवणाचं ताट आलं. जेवताना खरंतर वाईट वाटत होतं, पण त्या नालायक वेटरनी नको नको त्या भाज्यांची नावं घेऊन मला उचकवून दिलं होतं. म्हणून रागाच्या भारात विपश्यनेला जातान हा असलं मुर्खपणा केला होता. तसही मला खूप राग आला किंवा चिडचिड झाली की दोन्हीच गोष्टीनी मी शांत होतो... एक म्हणजे सेक्स दुसरं नॉनव्हेज. किंवा सलग दोन-तीन सुट्ट्या आल्या की घरात राहुन बोअर झाल्यास सारखं काहीतरी खावसं वाटतं. मग किचनमध्ये उंडरणे सुरु होतो.  शिकताना अभ्यासाला बसून बोअर झालं की तासा तासाला किचन मधे फेरफटका मारण्याची माझी जुनी सवय. तेंव्हा माधवी मला सारखी म्हणायची, “तुला अभ्यासाला बसल्यावर सारखी भूक कशी काय लागते रे?” अन काहीच नाही मिळालं की मग नुसते शेंगदाणे खात किचनमधून बाहेर पडायचो. तर चिडचिड झाल्यास खायची हुक्की येणे ही तशी माझी जुणी खोड आहे. तर एकदाचं जेवण झालं अन मरकडच्या दिशेनी निघालो. ही घट्ना आहे आजपासून ५ वर्ष जुनी. तेंव्हा आळंदी ते मरकड रस्ता बनत होता. नुसती गिट्टी टाकलेली होती. त्या गिट्टिवरुन गाडी चालविताना जिवात जीव नव्हता. गाडी पंक्चर होणार याची खात्री वाटत होती. कारण त्या गिट्टीच्या दाताना हुलकावणी देत गाडी दामटताना दातांनी जो टायरांचा चावा अखंडपणे सुरु ठेवला त्यामुळे हा प्रवास नडणार होता हे दिसतच होतं.  कसं बसं एकदाचा मरकड गावाच्या वेशीवर पोहचलो आणी गाडी वायब्रेट होऊ लागली. गाडी पंक्चर झाल्याची खात्री करायला खाली उतरायची गरजच पडली नाही. नशीब हे सगळं गावाजवळ पोहचल्यावर झालं. पुढे अर्धा किमी गाडी ढकलत ढकलत गावात आलो. पंक्चरवाला जानू माझ्या स्वागतासाठीच उभा आहे अशा थाटात "या साहेब... पंक्चर काढून देतो" म्हणत गाडी दुकानात घेतली. पंक्चर काढून झाल्यावर गावाच्या बाहेर वसलेल्या विपश्याना केंद्राकडे मोर्चा वळविला.


मरकड विपश्यना केंद्र:
मरकडचा विपश्यना केंद्र अगदी निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे. ते दिवस हिवाळ्याचे होते. चारी बाजुनी हे केंद्र उसाच्या हिरव्यागार शेतीने वेढलेलं होतं. केंद्राचा आवारा पण ४-५ एकरचा असावा. मेनगेट पासून संपूर्ण आवा-यात भरपूर प्रमाणात झाडं लावलेली आहेत. आणि केंद्राच्या अगदी मागून एक नदी वाहते. किंबहुना केंद्राच्या सगळ्या आवा-यात झाडं लावून रानाचं स्वरुप देण्यात आलं आहे. प्रवेश केल्याकेल्या पार्कींगमधे गाडी लावून मुख्य इमारतीत जावे लागते. तो पहिलाच दिवस होता. सगळे साधक मुख्य हाँल मधे जमले होते. ३०-३५ मिनिटाचं सुचना व नियमाची माहिती देणारं वर्ग झाला. सगळ्याना मोबाईल व इतर किमती वस्तु जमा करण्यासाठी लहानशा पिशव्या अन एक फाँर्म देण्यात आले. आपल्या वस्तु व मोबाईल त्या पिशव्यांत भरुन दिल्यावर सगळ्याना संबंधीत पिशव्यांची ओळख पटवुन देणारं टोकण देण्यात आलेत. टोकण हरवलच तर घोळ होऊ नये म्हणुन त्या पिशव्यांवर नावाचं पण लेबल लावलं जातं.

पहिल्या दिवशी सायंकाळचे ६ वाजेपर्यंत लोकांचं येणं चालुच होतं. मुख्य प्रवेशद्वार ते हाँल अशा सरळ रेषेत गेलात तर पुढे पुरुषांचं निवासस्थान आहे. उजवीकडे स्रियांच  निवासस्थान आहे. हॉल, पुरुषनिवासस्थान व स्त्रीयांचा निवासस्थान या तीन इमारती त्रिकोणात बसल्या असून अगदी यांच्या मधोमध धम्महाँल (Meditation Hall) आहे. प्रत्येकाला राहायला स्वतंत्र खोली दिली जाते. खोलीत एक काँट, बेडसिट, चादर, ब्लँकेट, गादी, उशी,पंखा, लाईट अशा सगळ्या सोई आहेत. आंघोळिला मात्र काँमन बाथरुम आहेत. मुख्य हाँलमधे आपलं नाव नोंदवून झाल्यावर राहण्याच्या खोलीची चावी दिली जाते. मी दुपारीच धकालो होतो. त्यामुळे धम्महालात नोंदनी झाल्यावर रुमची चावी घेऊन निवासस्थानात गेलो व मस्तपैकी सायंकाळ्चे ६ पर्यंत ताणून दिली.


पहिला दिवस:

६ वाजता धम्म्सेवक ( Volunteers ) घंटा (देवघरात पुजेत वाजविण्यासाठी जी लहान घंटा असते अगदी तशी) वाजवत दारात उभा.  दार ठोठावुन सगळ्याना भोजन गृहात एकत्र जमायचं आहे असं सांगुन निघुन गेला. पाच मिनटाअत आम्ही सगळे भोजन गृहात उभे.  एका धम्मसेवकाने नियमाची परत उजळणी करुन दिली, म्हणजे नव्याने आलेल्यांना ते नीट कळावे म्हणून. इति धम्मसेवक सुरु... “ईथे तुम्हाला पुर्ण १० दिवस राहायचे आहे, आज तुम्हाला पोटभर जेवण मिळेल. उदयापासुन फक्त एकच वेळा जेवण मिळणार व सायंकाळी दुध व एक फळ एवढाच आहार मिळेल. ज्यानी कुणी आधी विपश्यना केली असेल त्याना मात्र सायंकाळचं दुध व फळ मिळणार नाही. त्यानी फक्त १ ग्लास लिंबु पाणी पिऊन राहायच आहे. त्यामुळे इंद्रीयांवर नियंत्रण ठेवण्याचं संयम विकसीत होत जातं. ज्याना कुणाला वैद्यकीय कारणास्तव दोन वेळाचे जेवण हवेच असेल त्यानी तसे आजच सुचवावे.  म्हणजे त्यांच्यासाठी तशी सोय केली जाईल. तुम्ही ईथे १० दिवस राहणार आहात त्याच्या मोबदल्यात एकही पैसा दयायचा नाही. तुम्हाला पुढील १० दिवस जे अन्न दिले जाणार आहे ते मागील बँचच्या साधकानी केलेल्या दानातुन दिले जाणार आहे. म्हणजे तुमचं जेवण हे तुमच्या पैशातून नाही तर आधीच्या दानातून येणार आहे. विपश्यना संपल्यावर जाताना म्हणजेच शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटले तर तुम्ही दान देऊ शकता. पण दान देणं तुमच्यावर अजिबात बंधणकारक नाही. कुणाला दान दयायचे नसल्यास त्रास होऊ नये म्हणून दाण घेण्याची जागा अगदी नेहमीच्या रेल-चेल असणा-या ठिकाणांपासुन जाणीवपुर्वक दूर ठेवली आहे. फक्त मनातुन ईच्छा असणा-यानीच तिकडे जावे आणी  दान करावे. यात अजून एक अत्यंत महत्वाचं म्हणजे दान घेण्याची खिडकी फक्त शेवटच्या दिवशीच उघडेल. म्हणजे मधले दहा दिवस विपश्यना केंद्राचं नीट अवलोकन करुन त्या अनुरुपच दान करावं. म्हणजे जर तुम्हाला केंद्राचं काम  तेवढं महत्वाची नाहीये असं वाटल्यास दान न देण्याची संपूर्ण संधी आहेच. अन विपश्यनेचा कणा म्हणजे मौन साधना. मधल्या १० दिवसांत कुणालाही बोलण्याची परवानगी नाही. फक्त धम्म हाँल मधे गुरुजींशी कमीत कमी शब्दात गरजेचे तेवढेच बोलता येईल. बाकी इतर काही अडचणी असल्यासे धम्म सेवकांकडे लिहून दयावे. भोजन गृहात नेहमी कागद व पेनची सोय असते. इतर काही गरजेच्या वस्तु बाहेरुन मागवायच्या असल्यास रोज जेवायला आल्यावर तिथे नावासकट यादी सोडावी म्हणजे   बाहेरून मागवता येतील व दुस-या दिवशी जेवयला आल्यावर त्या वस्तु घेऊन जावे.” अशी लांब लचक सुचना सांगुन झाल्यावर शेवटी धम्मसेवकांनी हुश्श म्हटलं अन आम्ही मात्र नव्या अनुभवासाठी सज्ज... !
आणी पहिल्या दिवशीची सुरुवात मस्तपैकी सात्विक आणि चवदार भोजनाने झाली. जेवल्या नंतर लगेच धम्म हाँल च्या दिशेनी निघालो.


धम्म हाँल:

धम्म हाँल दुरुन अगदी एखाद्या बौद्ध स्तुपासारख्या आकाराचा दिसतो. आत अगदी पिनड्राँप सायलेंस होता. हॉलला दोन प्रवेशद्वार होते (एक स्त्रियांसाठी व दुसरे पुरुषांसाठी) प्रवेशद्वारातुन आता गेल्यागेल्या दुरवर बुद्धाची एक मोठी अर्धवट डोळे बंद असलेली मुर्ती दिसली. मुर्तीच्या थोडंस पुढे गुरुजींची बसण्याची सोय होती. बाकी संपुर्ण हाँल दोन भागात (स्त्री व पुरुषांसाठी) विभागलं होतं. ध्यानासाठी बसायला २ बाय २ फुट च्या चौकोनी गदया होत्या, व हाँलच्या दोन्ही कडेनी वयस्कांसाठी (ज्याना बसने जमत नाही ) खुर्च्या ठेवलेल्या होत्या. एकंदरित ध्यान करायला मन प्रवृत्त होईल असं मस्त वातावरण होतं. पहिल्या दिवशी नुसतच ध्यान करायला लावलं, गुरुजीनी विपश्यना काय असते, मनावर ताबा मिळविण्यास याची कशी मदत होते याची थोडक्यात माहिती दिली व ज्यानी विपश्याना ही विदया भारतात परत आणली त्या गोयंका गुरुजीची प्रोजेक्टरवर माहिती दाखविली.

गोयंका गुरुजी:
गोयंका गुरुजी मुळचे ब्रम्हदेशाचे. त्यांचे पुर्वज खूप आधी केंव्हातरी भारतातुन तिकडे स्थालांतरीत झालेत व गुरुजींचं जन्म ब्रम्हदेशातच झालं. गुरुजी मारवाडी परीवारतले, त्यामुळे त्यांचा खूप मोठा व्यापार होता. सगळं सुरळीत सुरु होतं पण मधेच गुरुजीना डोक्यात काहितरी असा आजार झाला व अनेक उपचार करुनही ते बरे होत नव्हते. अक्ख्या पृथ्विला गोल गोल घिरट्या घालुन झालेत पण कुठेच काही ईलाज होईना. शेवटचा उपाय म्हणुन तिथल्या बुद्धिष्ट मठात गेले अन कोणातरी भंतेच्या सांगण्यावरुन विपश्याना केली. त्यानी ब-यापैकी गुण आला व सकारात्मक निकाल मिळालेत. मग स्वत:ला झोकून देऊन पुन्हा पुन्हा विपश्यनाचे पुढचे धडे गिरवायला सुरुवात केली. विपश्यना गुरुजींवर औषधीचं काम करु लागली. मग तर गोयंकाजिनी सखोल विपश्यना साधना केली. ही मूळ भारतीय विद्या पण ती कधीच या मातितून हद्दपार झाली होती. या विद्येचा उगम ज्या देशात झाला तिथेच तिच्या अस्तित्वाचा प्रश्न यावा हे जेंव्हा गोयंकाजिना कळलं तेंव्हा त्यांनी एक निश्चय केला.. की या विद्येला परत भारतभूमीत न्यायचं. काही झालं तरी न्यायचंच. मग काही दिवस गेल्यावर गोयंकाजिनी विपश्यनेचा प्रचार व प्रसार करायला कायमचं बि-हाड हलविलं अन ते भारतात आले. संस्थात्मक बांधणी करुन विपश्यनेचा प्रसार सुरु केला अन अज परिणाम हा आहे की विपश्यना जगभरात केली जाते. या सगळ्याचं श्रेय फक्त गोयंका गुरुजींना जातं. तर असा हा विपश्यना रि-इन्स्टॉलेशनचा संक्षीप्त इतिहास.


रोजचा दिनक्रम:
पहाटे बरोबर ४  की धम्मसेवक घंट घेऊन दारात उभा. पहिली फेरी झाली की लगेच दुसरी फेरी असं त्यांचं चालू बोलता येत नाही म्हणून "उठा हो.." वगैरे म्हणायची सोय नाहीच. फक्त दारात उभं राहून घंटा वाजवा एवढच.  १० मिनिटात धम्मसेवक ती लहान घंटा वाजवत प्रत्येकाच्या खोलीचं दार ठोठावत पुढे जात असे. सगळे पटापटा उठून आपापली काम उरकुन धम्मा हाँलच्या दिशेने जात. काहीजण मात्र आजुन खोलीतुन बाहेर आलेच नसायचे. हे बहुतेक उशीरापर्यंत उठाणा-या गटातले प्राणी असावेत. ४.३० ला तिकडे धम्मा हाँल मधे साधना सुरु व्हायची. धम्म सेवक साधकांची बरोबर गिनती ठेवत असत. काही लोकं आजुन आली नाहीत याची खात्री झाली की ते परत घंटा घेऊन त्या पुरुष निवासस्थानाकडे जात व ज्या खोलीला बाहेरुन ताला लावलेला नाही अशा खोलीच्या दाराजवळ जाऊन आतला साधक बाहेर येइस्तोवर घंटा वाजवीत उभे राहायचे. बरं मौन व्रत हे सगळ्याना बंधणकारक म्हणुन धम्मसेवक सुद्धा आवाज देऊ शकत नव्हते. अन आतला माणुस सुद्धा “हो उठलो, बाहेर येतो पण तुझी घंटा थांबव रे बाबा” हे वाक्य बोलू शकत नव्हता. मग एकदाचं दार उघडुन धम्मसेवकाकडे बघितल की धम्मसेवक मात्र दोन हात जोडून नमस्कार मुद्रेत आपल्या समोर उभा. हे एकदा माझ्याबरोबर पण घडलं आणि मला मरणाची लाज वाटली. एक माणूस इतक्या सकाळी आपल्या चुकीचं स्वागत करतो हे मनाला पटतच नाही. त्या पेक्षा त्यानं दोन शिव्या घातलेल्या ब-या. पण हे शुन्य भावनेने बघितलं की पार इज्जतीचा चेंदामेंदा होतो. त्या नंतर मी परत कधीच या निर्विकार नजरेचा सामना होऊ नये म्हणुन युद्ध पातळीवर खबरदारी घ्यायचो. सकाळी ८-९ वाजता आंघोळीची वेळ असायची. त्याआधी नास्ता मिळायचा. आंघोळी झाल्या की परत धम्मा हाँल. ११ वाजता दुपारचे जेवण. जेवनानंतर थोडावेळ विश्रांती व परत धम्मा हाँल २ ते ४ विश्रांती. ४ नंतर परत धम्मा हाँल, आणी रात्री ९.३० ला दिवसाचा दिनक्रम संपायचा. असं एकंदरीत १० तास नेटाने ध्यान चालायचं. बसताना कुणाला काही त्रास झाला किंवा वयस्क लोकाना काही अडचण आली की धम्मसेवक अगदी नजर ठेवुनच असायचे. कुणाची चुळबुळ जाणवली की लगेच धम्मसेवक त्या साधकाला गाठून अडचण विचारायचे व  हातोहात मदत दिली जायची.  असा हा विपश्यनाचा दिनक्रम जो सुरुवातिला फार त्रासदायी होता  पण हळुहळु सगळेच ध्यानचा आनंद लुटु लागले.


आनापान सती:
आनापान सती आणि सतिपठ्ठण ही दोन्ही बुद्ध तत्वज्ञानातल्या सर्वात महत्त्वाच्या सूत्रांपैकी. यापैकी आनापान सती श्वासोश्वासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सोळा पद्धती शिकवतं. तर सतिपठ्ठणात मनसमृद्धिच्या चार आस्थापनांबद्दल सांगितलं आहे. या दोन्ही सूत्रांचा अभ्यास एकत्रीत रित्या केला जातो त्याला विपश्यना म्हणतात. आनापान सती सूत्रात सांगितल्याप्रमाणे श्वासोश्वासावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सराव अतिशय आवश्यक असतो. कारण यातून सतर्कता जागृत होऊन काळजीपूर्वक आणि सखोल निरिक्षण करता येतं. आणि निरिक्षण म्हणजे मनाचं, स्वत्वाचं निरिक्षण. म्हणुन आनापान सतीची सुरुवतीचे तीन दिवस १०-१० तास सराव करुन घेतल्या जातो. आम्हाला सकाळी ४ उठावे लागे, ४.३० पर्यंत आपापली कामं आटपुन धम्मा हाँल मधे हाजर. मांडी घालुन बसणे सुरुवातीला फार त्रासदायी काम होतं. अन वरुन नाकाद्वारे घेणा-या श्वाच्छोश्वासावर लक्ष केंद्रीत करणं मुळीच जमायचं नाही. आणी १० तास मांडी घालुन बसल्यामुळे पायांचे तर पार तुकडेच पडायचे. तसं दर एक तासानी ५ मिनिटाचा ब्रेक असतो पण तो पुरायचाच नाही. असं करता करता दोन तीन दिवसानी हळु हळू श्वासावर लक्ष केंद्रित होऊ लागलं व मांडी घालुन १० तास बसण्याची क्षमतासुद्धा आली. आणि तिस-या दिवशी आनापान सती संपली. आता सुरु होणार होता विपश्यनाचा दुसरा भाग.


सतिपठठणात:

सतिपठठणात म्हणजे नाकाद्वारे शरिरात जाणा-या वायुचे अतीशुक्षम निरिक्षन करणे. मन लावुन केल्यास अगदी दोन दिवसात समाधी (काही क्षणाची) अवस्था गाठता येते. शरिरातल्या प्रत्येक भागाची अतिशुक्षम हालचाल अनुभवण्याची कला इथे अवगत होते. सतिपठठणात ची शिकवण चार भागात दिली जाते.
१) डोके
२) धड
३) हात
४) पाय
या शरिराच्या चारही भागाचं सुरुवातिला वेगवेगळं निरिक्षण करायचं असतं, आणी तेही थोडं फार नाही १०-१० तास. आणि नंतर मात्र या सगळ्या भागांचं एकत्र अतिशुक्षम निरिक्षण करावं लागत. आपण जीवनात केंव्हा विचारही केला नसेल त्या सगळ्या केंव्हाच पकडता न येणा-या भावना व हालचालींची ईथे अनुभूती घेता येते. आनापनसती व सतिपठठणात याला एकत्रीत रित्या विपश्यना असे म्हणतात. हे सगळ संपुर्ण १० दिवस चालले. विपश्यनेतील १० व्या दिवसाला मैत्री दिवस म्हणतात. हा हा म्ह्णता आमचे दहा दिवस पुर्ण झालेत.  मैत्री दिवस येऊन ठेपला. मग त्या दिवशी दुपारुन मौन सोडूण्यात आलं.  मुख्य हाँल मधे ध्यानसाधना व इतर धार्मिक पुस्तकांचे स्टाँल लागलेत. पुस्तक विक्रीतुन मिळालेला निधी संस्थेच्या विकास कामासाठी वापरला जातो हे अजून एक स्तूत्य कार्य. त्या रात्री स्नेह भोजन झाले. ध्यान वैगरे करुन रोजच्या प्रमाणे आपापल्या निवासस्थानाकडे गेलो.  पण आज मात्र एक गोष्ट बदललेली होती ती म्हणजे आज मौन नव्हतं... १० व्या दिवशी मौन नसतं.  सगळे एकमेकांशी गप्पा गोष्टी करुन झोपी गेलेत व दुस-या दिवशी परतीच वाट धरली. तर असा होता माझा विपश्यना अनुभव.

आता मात्र आंतरजालावरुन प्रवेशाचा अर्ज भरता येतो. अधिक माहितीसाठी खालील दुवा बघा.


http://www.dhamma.org/en/schedules/schgiri.shtml

http://www.vridhamma.org/Home.aspx

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

विर बाबुराव राजगोंड:

विर बाबुराव राजगोंड:

विर बाबुराव नावाचा एक महान माणुस इंग्रजांच्या काळात आमच्या भागात होऊन गेला. तसं अहेरीचं राज्य हे मुळ राजगोंड(गोंडाचीच एक जमात) जमातिचं, माडीया-गोंड हि जमात समान मानल्या जाते. या दोन जमाती मधे आजही रोटी चालते पण बेटी व्यवहार होत नाही. गोंड जमातीत परत दोन प्रकार पडतात एक गोंड दुसरं राजगोंड, यांच्यातही रोटी व्यवहार चालतो पण बेटी व्यवहार होत नाही.
इंग्राजीनी चंद्रपुरच्या गोंड राजाचा पराभव केल्या नंतर अहेरी कडे मोर्चा वळविला. तेंव्हा बाबुराव हे अहेरीचे राजे होते. इंग्रजांकडुन मांडलिकत्व स्विकाराण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, न स्विकारल्यास लढाईस पुढे जावे लागेल असा दमही भरण्यात आला. बाबुरावानी इंग्रजांचे किस्से ब-यापैकी ऐकुन व त्यांची नियत ओळखुन होते. ही वेळ लढाई करण्याची नाही व सैन्य आणी दारु गोडा जमवा जमव करायला थोडा वेळ लागणार होता, म्हणुन त्यानी प्रस्ताव मंजुर आहे, पण थोडा वेळ दयावा अशी विनंती केली. त्यानुसार त्यानी दोन-तिन आठवड्याचा कालावधी देण्यात आला. या वेळेत बाबुरावानी राना वनातुन सैन्य उभे केले व इंग्रजांच्या सैनिक तळावर हल्ला चढविला. अहेरीच्या घनदाट अरण्यात लढताना इंग्रजी सैन्याची अक्षरश: दानादान उडाली. बाबुरावनी इंग्रजाना असा काही अनपेक्षित धक्का दिला होता की काही केल्या त्या रानात इंग्रजाना तगच धरता येईना. नंतर इंग्रजांच्या लक्षात आले की जर बाबुरावला हरवायचे झाल्यास इथल्याच गोंड लोकांना सैन्यात भरती करणे गरजेचे आहे. नंतर इंग्रजानी अहेरी प्रांतातील गोंड लोकांचाई सैन्यात भरती करण्यास सुरुवात केली. चांगला पगार व इतर गोष्टींच्या लोभाला बळी पडुन मोठ्या प्रमाणावर स्थानीक गोंडानी इंग्रजी सैन्यात हजेरी लावली. पुढे काही महिने लढाई चालु होती, इग्रजानी एक एक करुन अहेरी, गड-अहेरी व इतर जवळपास सगळेच किल्ले हस्तगत केले.
हळु हळु बाबुरावाच्या सैन्याचं पतन होत गेलं, व एके दिवशी बाबुरावाल राज्य सोडुन रानात पळ काढावा लागला. मग बाबुराव रानातच कंद मुळ खाऊन, झाडांवर/शेतालया झोपड्यात झोपुन दिवस काढू लागला. इकडे इंग्रजानी अहेरीचं राज्य हस्तगत केलं होतं, व त्यांचा मर्जीतला माणुस अहेरीच्या गादिवर बसविला होता. बाबुराव मात्र तिकडे राना वनात हिंडुन पाला-पाचोळा खाऊन जिवन जगत होता. एक दिवस असच रानात हिंडत असताना, बाबुरावला वेळुच्या टोकावर उगवणारा तुरा दिसला.

वेळुचा तुरा व गाटवाल :
वेळु (बांबु) ला दोन प्रकारची फळं(धान्य) येतात, एक अगदी गव्हासारखं असतं त्याला गाटवाल अस म्हणतात. पण हे ५०-८० वर्षात फक्त एकदाच येतं, मी पाचवित असताना वेळुला गाटवाल आलं होतं, आम्ही सगळे टोपलं, पोती सोबत घेऊन रानात जायचो, दिवसभर वेळूपासुन पडलेले व गाटवाल (गहुसारखे धान्य) गोळा करुन पोत्यात भरायचो व सांयकाळि धान्य घेऊन घरी परत यायचो. त्या नंतर आजुन वेळूला हे असलं धान्य आलेलं नाहिये. एक माणुस जिवनात फक्त एकदान हे बांबुच/वेळुचं धान्य व (गाटवाल) बघत असतो. एखाद्यालाच दोन वेळा बघण्याची संधी मिळते. कित्येकाना तर हे धान्य बघायचं नशिबीच नसतं.
तसच लोखो झाडांमधे एखाद्या झाडावर तुरा उगवित असतो, व तो अगदी काही आठवड्यातच तुटुन पडतो. तो तूटुन पडण्या आधी जर तुम्ही बघितलात तर तुमच्या सारखा नशिबवान कुणीच नाही. त्या तु-याला तोडून जर खाल्लात तर शरिरात काही घोड्यांची ताकत येते, आणी इतर कुठलेच आजार होत नाही, जखम सुद्धा २४ तासात भरुन निघते. हा तुरा म्हणजे पेनिसिलिनचा मोठा भाऊच म्हणा. बाबुरावाना योगायोगाने हा तुरा दिसला त्यानी तो खाल्ला व काही घोड्यांची शक्ती अंगात भरुन अहेरीच्या दिशेनी परत आला. दिवसभर कुठेतरी लपुन राहायचे व रात्री एकट्यानेच हल्ले करायचे, दिसेल त्या इंग्रज सैन्याला नुसतं एका बुक्कीने ठार करत असे. पुढे इंग्रजानी वैतागुन एकटं दुकटं कुठेही जाण्यास मनाई केली. कुठेही जायचे असल्यास सैन्या १०-१२ जणांचा घोडका करुन जात असतं. पण बाबुरावच्या ताकतीच्या पुढे १०-१२ सैन्याचा टिकाव लागत नसे. पुढे पुढे ५०-६० सैन्यालाही हा बाबुराव एकटाच पुरुन उरत असे. जेंव्हा गावक-यांच्या लक्षात आले की आपला राज खुपच शुर आहे व एकटाच इंग्रजाना पुरुन उरतोय, तेंव्हा गावातील काही तरुणानी बाबुरावांच्या बाजुने उभं राहायचं ठरवलं. इंग्रजांच्या देखत त्यानी पुन्हा सैन्य उभारलं व जोरदार लढा देऊ लागला. अर्ध्यापेक्षा अधीक राज्य इंग्रजांच्या तावडीतुन हिरावुन घेतलं होतं. आता बाबुराव इंग्रजांवर भारी पडु लागला होता. आणी जेंव्हा इंग्रजाना खात्री झाली की हा माणुस काही तरी अदभुत नैसर्गीक ताकतीनी भरलेला आहे व त्याला हरविने अवघड आहे, तेंव्हा त्याना फितुरीने हरविण्याचं शस्त्र बाहेर काढलं.

विर बाबुरावची बहिण आत्राम घराण्यात दिली होती, (आजचे धर्मराव आत्राम ह्याच वंशातले). हे सगळे आत्राम अगदी विलासी व निष्क्रिय राजे होते. त्यानी कुठलीही लढाई न करता सरळ सरळ इंग्रजांचं मांडलिकत्व स्विकारलं होतं. बाबुरावचं बहिणीवर अत्यंत प्रेम होतं. इंग्रजानी त्या बहिणीला मोठ राज्य जोडून देण्याची आमिष दाखविली, पण त्या बदल्यात बाबुरावला धरुन देण्याची अट टाकली. ती तयार नव्हती पण सारकडचे (आत्राम) कुटुंबाला बळी पडुन तिनी होकार दिला.एके दिवशी तिनी तब्बेत बरी नसल्याचा संदेश पाठवुन बाबुरावला बोलावुन घेतलं, जेंव्हा बाबुराव घरात आले तेंव्हा जेवनात बेशुद्धीचं औषध घालुन बेड्या ठोकल्या. इंग्राजानी पुढे त्याना खुप शाररिक यातना दिल्यात पण दुस-याच दिवशी त्यांच्या शरिरावरचे सगळे जखम भरुन निघत असत. शेवटी इंग्रजानी खायला अन्न व पिण्याचे पाणी देणे बंद केले. तरी काही केल्या जीव जाईना, नंतर अगदी कंटाळुन बाबुरावनी स्वत: सांगितलं की आता मला हा त्रास सहन करने जमणार नाही, रानातुन एक ओला बांबू आणुन त्याला चिरुन घ्या व त्या बांबूच्या कांबीने माझा गळा कापा म्हणजे मला मॄत्यु येईल. शेवटी इंग्रजानी त्यांचा बांबुने गाळा कापला व एकदाचा त्यांचा शत्रू संपला.
आज आलापल्ली व अहेरीत मुख्य चौकाना विर बाबुराव राजगोंड चौक असे नाव देण्यात आले आहे. त्या चौकात गेलो की मी नेहमीच त्या विर पुरुषाला मनातुन सलाम ठोकत असतो.

शनिवार, १६ जानेवारी, २०१०

३ ईडियट्स


नमस्कार मित्रहो.तसं मी कुठलाही सिनेमा लगेच पाहायला जात नाही, आधी लोकानी काय कल दिला ते तपासुन बघतो व नंतरच जातो. आत्ता पर्यंत या सिनेमाने बर्‍याच नोंदी तोडल्या व सगळ्यांकडुन चांगलेच ऐकायला मिळाले व एकदाचा गेलोच हा सिनेमा बघायला. मला व्यक्तिशा हा सिनेमा फारसा आवडला नाही, आणी काही सिन तर फारच खटकलेत. जसे या तिन व्यंधळ्यानी मिळुन केललं बाळंतपण, पँट तरवुन चड्डिवर केलेले तमाशे व खास करुन बोमन ईराणी.त्या बोमण ईराणीचं नाव दाखवलय "सहस्त्रबुद्दे" आता हा कुठुनतरी सहस्त्रबुद्धे वाटतो का ? किमान तो नाही वाटत तर त्याची भाषा, कपडे, घरातले वातावरण तरी मराठी दाखवावे ना! नाही, कुठल्याच गोष्टीतुन तो बोमन मराठी वाटत नाही. वरुन ती करिना, हि तर सरळ सरळ मराठीची कत्तलच वाटली. बरं मराठी कुटुंब दाखवायला फार काही कष्ट घ्यावे लागत नाही, तरि निर्देशक मराठी कुटूंब दाखविण्यात चुकलाच चुकला, किंवा त्यांचा अभ्यास कमी पडला म्हणावे लागेल. तसं अमिर कुठलेही काम करण्या आधी त्याचा अभ्यास करतो असे ऐकले होते, या वेळी मात्र अमिर कमी पडला असे मी ठामपणे म्हणु शकतो. कारण त्या बोमनचं नाव तेवढं सोडलं की काहिच मराठी वाटत नाही.
स्पेशल पेनःआजुन एक खटकलेली गोष्ट, त्या बोमण कडे एक स्पेशल पेन असते, तो म्हणे मागच्या २० वर्षापासुन ति पेन पास करावा असा एकहि विद्यार्थी मिळाला नाहीये, म्हणुन तशीच ठेवली होती. आणी शेवटी अशी अती महत्वाची पेन देतो कुणाला तर आमिर खानला. आणी कारण काय तर त्याच्या पोरिचं बाळंतपण केलं म्हणुन. पहिली गोष्ट तर त्या सिनेमातलं न पटलेलं व कडाडुन विरोध करावं असं ते दृश्य आणी त्याच दृश्यामुळे आमिरला ती स्पेशल पेन मिळते हि आजुन एक घोळचुक. ओवर ऑल हा सिनेमा फक्त Teenagers साठी बनवलाय असे वाटते. आणी ३ ईडियट्स या शब्दाचं अगदी सार्थक झालं