सोमवार, १८ जानेवारी, २०१०

विर बाबुराव राजगोंड:

विर बाबुराव राजगोंड:

विर बाबुराव नावाचा एक महान माणुस इंग्रजांच्या काळात आमच्या भागात होऊन गेला. तसं अहेरीचं राज्य हे मुळ राजगोंड(गोंडाचीच एक जमात) जमातिचं, माडीया-गोंड हि जमात समान मानल्या जाते. या दोन जमाती मधे आजही रोटी चालते पण बेटी व्यवहार होत नाही. गोंड जमातीत परत दोन प्रकार पडतात एक गोंड दुसरं राजगोंड, यांच्यातही रोटी व्यवहार चालतो पण बेटी व्यवहार होत नाही.
इंग्राजीनी चंद्रपुरच्या गोंड राजाचा पराभव केल्या नंतर अहेरी कडे मोर्चा वळविला. तेंव्हा बाबुराव हे अहेरीचे राजे होते. इंग्रजांकडुन मांडलिकत्व स्विकाराण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, न स्विकारल्यास लढाईस पुढे जावे लागेल असा दमही भरण्यात आला. बाबुरावानी इंग्रजांचे किस्से ब-यापैकी ऐकुन व त्यांची नियत ओळखुन होते. ही वेळ लढाई करण्याची नाही व सैन्य आणी दारु गोडा जमवा जमव करायला थोडा वेळ लागणार होता, म्हणुन त्यानी प्रस्ताव मंजुर आहे, पण थोडा वेळ दयावा अशी विनंती केली. त्यानुसार त्यानी दोन-तिन आठवड्याचा कालावधी देण्यात आला. या वेळेत बाबुरावानी राना वनातुन सैन्य उभे केले व इंग्रजांच्या सैनिक तळावर हल्ला चढविला. अहेरीच्या घनदाट अरण्यात लढताना इंग्रजी सैन्याची अक्षरश: दानादान उडाली. बाबुरावनी इंग्रजाना असा काही अनपेक्षित धक्का दिला होता की काही केल्या त्या रानात इंग्रजाना तगच धरता येईना. नंतर इंग्रजांच्या लक्षात आले की जर बाबुरावला हरवायचे झाल्यास इथल्याच गोंड लोकांना सैन्यात भरती करणे गरजेचे आहे. नंतर इंग्रजानी अहेरी प्रांतातील गोंड लोकांचाई सैन्यात भरती करण्यास सुरुवात केली. चांगला पगार व इतर गोष्टींच्या लोभाला बळी पडुन मोठ्या प्रमाणावर स्थानीक गोंडानी इंग्रजी सैन्यात हजेरी लावली. पुढे काही महिने लढाई चालु होती, इग्रजानी एक एक करुन अहेरी, गड-अहेरी व इतर जवळपास सगळेच किल्ले हस्तगत केले.
हळु हळु बाबुरावाच्या सैन्याचं पतन होत गेलं, व एके दिवशी बाबुरावाल राज्य सोडुन रानात पळ काढावा लागला. मग बाबुराव रानातच कंद मुळ खाऊन, झाडांवर/शेतालया झोपड्यात झोपुन दिवस काढू लागला. इकडे इंग्रजानी अहेरीचं राज्य हस्तगत केलं होतं, व त्यांचा मर्जीतला माणुस अहेरीच्या गादिवर बसविला होता. बाबुराव मात्र तिकडे राना वनात हिंडुन पाला-पाचोळा खाऊन जिवन जगत होता. एक दिवस असच रानात हिंडत असताना, बाबुरावला वेळुच्या टोकावर उगवणारा तुरा दिसला.

वेळुचा तुरा व गाटवाल :
वेळु (बांबु) ला दोन प्रकारची फळं(धान्य) येतात, एक अगदी गव्हासारखं असतं त्याला गाटवाल अस म्हणतात. पण हे ५०-८० वर्षात फक्त एकदाच येतं, मी पाचवित असताना वेळुला गाटवाल आलं होतं, आम्ही सगळे टोपलं, पोती सोबत घेऊन रानात जायचो, दिवसभर वेळूपासुन पडलेले व गाटवाल (गहुसारखे धान्य) गोळा करुन पोत्यात भरायचो व सांयकाळि धान्य घेऊन घरी परत यायचो. त्या नंतर आजुन वेळूला हे असलं धान्य आलेलं नाहिये. एक माणुस जिवनात फक्त एकदान हे बांबुच/वेळुचं धान्य व (गाटवाल) बघत असतो. एखाद्यालाच दोन वेळा बघण्याची संधी मिळते. कित्येकाना तर हे धान्य बघायचं नशिबीच नसतं.
तसच लोखो झाडांमधे एखाद्या झाडावर तुरा उगवित असतो, व तो अगदी काही आठवड्यातच तुटुन पडतो. तो तूटुन पडण्या आधी जर तुम्ही बघितलात तर तुमच्या सारखा नशिबवान कुणीच नाही. त्या तु-याला तोडून जर खाल्लात तर शरिरात काही घोड्यांची ताकत येते, आणी इतर कुठलेच आजार होत नाही, जखम सुद्धा २४ तासात भरुन निघते. हा तुरा म्हणजे पेनिसिलिनचा मोठा भाऊच म्हणा. बाबुरावाना योगायोगाने हा तुरा दिसला त्यानी तो खाल्ला व काही घोड्यांची शक्ती अंगात भरुन अहेरीच्या दिशेनी परत आला. दिवसभर कुठेतरी लपुन राहायचे व रात्री एकट्यानेच हल्ले करायचे, दिसेल त्या इंग्रज सैन्याला नुसतं एका बुक्कीने ठार करत असे. पुढे इंग्रजानी वैतागुन एकटं दुकटं कुठेही जाण्यास मनाई केली. कुठेही जायचे असल्यास सैन्या १०-१२ जणांचा घोडका करुन जात असतं. पण बाबुरावच्या ताकतीच्या पुढे १०-१२ सैन्याचा टिकाव लागत नसे. पुढे पुढे ५०-६० सैन्यालाही हा बाबुराव एकटाच पुरुन उरत असे. जेंव्हा गावक-यांच्या लक्षात आले की आपला राज खुपच शुर आहे व एकटाच इंग्रजाना पुरुन उरतोय, तेंव्हा गावातील काही तरुणानी बाबुरावांच्या बाजुने उभं राहायचं ठरवलं. इंग्रजांच्या देखत त्यानी पुन्हा सैन्य उभारलं व जोरदार लढा देऊ लागला. अर्ध्यापेक्षा अधीक राज्य इंग्रजांच्या तावडीतुन हिरावुन घेतलं होतं. आता बाबुराव इंग्रजांवर भारी पडु लागला होता. आणी जेंव्हा इंग्रजाना खात्री झाली की हा माणुस काही तरी अदभुत नैसर्गीक ताकतीनी भरलेला आहे व त्याला हरविने अवघड आहे, तेंव्हा त्याना फितुरीने हरविण्याचं शस्त्र बाहेर काढलं.

विर बाबुरावची बहिण आत्राम घराण्यात दिली होती, (आजचे धर्मराव आत्राम ह्याच वंशातले). हे सगळे आत्राम अगदी विलासी व निष्क्रिय राजे होते. त्यानी कुठलीही लढाई न करता सरळ सरळ इंग्रजांचं मांडलिकत्व स्विकारलं होतं. बाबुरावचं बहिणीवर अत्यंत प्रेम होतं. इंग्रजानी त्या बहिणीला मोठ राज्य जोडून देण्याची आमिष दाखविली, पण त्या बदल्यात बाबुरावला धरुन देण्याची अट टाकली. ती तयार नव्हती पण सारकडचे (आत्राम) कुटुंबाला बळी पडुन तिनी होकार दिला.एके दिवशी तिनी तब्बेत बरी नसल्याचा संदेश पाठवुन बाबुरावला बोलावुन घेतलं, जेंव्हा बाबुराव घरात आले तेंव्हा जेवनात बेशुद्धीचं औषध घालुन बेड्या ठोकल्या. इंग्राजानी पुढे त्याना खुप शाररिक यातना दिल्यात पण दुस-याच दिवशी त्यांच्या शरिरावरचे सगळे जखम भरुन निघत असत. शेवटी इंग्रजानी खायला अन्न व पिण्याचे पाणी देणे बंद केले. तरी काही केल्या जीव जाईना, नंतर अगदी कंटाळुन बाबुरावनी स्वत: सांगितलं की आता मला हा त्रास सहन करने जमणार नाही, रानातुन एक ओला बांबू आणुन त्याला चिरुन घ्या व त्या बांबूच्या कांबीने माझा गळा कापा म्हणजे मला मॄत्यु येईल. शेवटी इंग्रजानी त्यांचा बांबुने गाळा कापला व एकदाचा त्यांचा शत्रू संपला.
आज आलापल्ली व अहेरीत मुख्य चौकाना विर बाबुराव राजगोंड चौक असे नाव देण्यात आले आहे. त्या चौकात गेलो की मी नेहमीच त्या विर पुरुषाला मनातुन सलाम ठोकत असतो.

1 टिप्पणी: