बुधवार, २० जानेवारी, २०१०

विपश्यना - Vipassana

विपश्यना:
विपश्यना हा पाली शब्द आहे, विपश्यनाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वत:कडे बघणे व मनाच्या जडणघडणीचे निरि़क्षण करणे असा होतो.बुद्ध तत्वदन्यान स्वत:मधेच एक अथांग व फार व्यापक असं आहे. या तत्वज्ञा नातला विपश्यना हा एक लहानसा भाग आहे. विपश्यना हि एक बुद्धिस्ट शुद्ध/पवित्र ध्यान साधना आहे, हि साधना समस्त माणव प्राण्यांसाठी खुली आहे. साधना १० दिवसाची असते. एकंदरित कडक शिस्तीचे पालन करावे लागते. या साधनेच्या दरम्यान १० दिवस कडक मौनव्रत, एकच वेळा जेवन, १० तास बसुन साधना/ध्यान सकाळी ४ ला ऊठणे, रात्री १० लाच झोपणे अशा सगळ्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे लाग्ते. भगवान बुद्धाने या साधनेला दोन भागात विभागले आहे, एक आन-पान व दुसरे विपश्यना, ह्या साधनेत मुख्यत्वे श्वासावर कसे नियंत्रण ठेवावे व शरिरातील अतिशु़क्ष्म हालचालिंचे कसे निरिक्षण करावे हे शिकविले जाते, पुढे सविस्तर लिहणारच आहे.

मी माझा विपश्यनाचा अनुभव लिहण्याचे कारण म्हणजे आजच्या दगदगीच्या जिवनात प्रत्येकाने किमान वर्षातुन एकदा तरी विपश्याना करावी, त्या मुळे मानसिक बळ वाढतं व आपली बौद्धिक,शाररिक व मानसिक अशा सगळ्या आघाडयांवर कार्य़क्षमताही वाढते.

मी ब-याच दिवसांपासुन विपश्याना करण्याच्या प्रतिक्षेत होतो, एक दिवस स्वारगेटच्या विपश्यना केंद्रावर जाऊन चौकशी केली. पुढचे किमान दोन महिने तरी माझा नंबर लागणार नाही असं कळलं. मग मी हताश होऊन परत आलो. मित्राला फोन करुन झालेला प्रकार सांगितला. तो म्हणाला मग पुण्याच्या बाहेरच्या एखादया केंद्रावर जाता येते का ती चौकशी कर. परत दुसर-या दिवशी स्वारगेट गाठलं, मला बघुन दुरुनच ते म्हणाले, अहो तुम्ही कालच येऊन गेलात ना? जागा नाही आहे, एक काम करा तुम्ही आता अर्ज देऊन जा तिन महिन्या नंतरच्या साधना वर्गासाठी तुमची नोंदणी करुन घेतो मी. मी दोन मिनटं शांत होऊन त्याना म्ह्टलं, पुण्याबाहेरचं एखादं पर्याय असल्यास सांगा माझी तयारी आहे जायला. त्यानी त्यांच्या मरकळ केंद्रावर फोन करुन दोन जागा शिल्लक आहेत पण तुम्हाला आजच निघावं लागेल असं सांगितलं. मी लगेच तयारी दर्शविली व माझा प्रवेश पका करण्यासाठी अर्ज भरायला घेतला. त्या अर्जातिल अटी खालील प्रमाणे होते.

विपश्यना प्रवेश मिळण्याच्या अटी:
१) सकाळी ४ वाजता उठणे आवश्यक.
२) दिवसातुन फक्त एकच वेळा जेवन मिळेल.
३) सायंकाळी १ ग्लास दुध व एक फळ/मुरमुरे एवढच मिळतील.
४) १० दिवस मौन व्रत पाळावे लागेल.
५) रोज १० तास बसुन ध्यान करने आवश्यक.
आणी अशा ब-याच अटी होत्या ज्या आज मला आठवत नाहीत. मला सगळ्या अटी मान्य होत्या. मी तो अर्ज भरुन दिला, नंतर गुरुजीनी काय काय सामान व कपडे सोबत घ्यावे ते सांगितले. त्यानी घरी वापरणारे, लुंगी व इतर अंगात सैल येणारे/बसणारे कपडे सोबत घेण्यास सांगितले. कारण १०-१० तास बसुन ध्यान करताना त्रास होऊ नये. मी घरी आलॊ दोन लुंग्या, व इतर गरजेचे कपडे व सामान ब्यागेत भरुन निघालो मरकडच्या दिशेनी.


मरकडच्या दिशेने प्रवास:
मरकड हे गाव आळंदिच्या पुढे ७-८ किमि अंतरावर आहे. तसं मी सगळा पत्ता निट समजावुन घेऊनच निघालो होतो. आणी या आधी बरेच वेळा आळंदिला गेलो असल्या मुळे तेवढी अडचण झाली नाही. एकदाचं आळंदी सोडून पुढे गेल्यावर मात्र भुक लागली होती. तसं मला खायला सगळ्यात जास्त काय आवडतं तर नाँनवेज. विपश्यना सारख्या पवित्र व धार्मिक साधनेला जाताना मांस खायचं नाही असं ठरवलं. होटेलात जाऊन विचारलं तर तो म्हणे वेज मधे बटाटे, शेवग्याच्या शेंगा, भेंडी आणी आजुन दोन चार बोअरींग प्रकार सांगितले. कळस म्हणजे करल्याची भाजी मिळेल म्हणाला. मला त्या वेटरचा असला राग आला, त्याला जवळ बोलावुन म्हटलं, “काय मजाक करुन रायलास काय? कारलं मिळतं म्हणे, तुला काय मी अलिबागवरुन आलेला दिसुन रायलो की काय ?” (रागाच्या भारात मी नेहमी गावाकडी भाषा बोलतो). तो म्हणाला नाही साहेब, आमच्या मालकाच्या घरिच (जे होटलच्या अगदी माहे होतं) कारलं पिकतं/निघतं म्हणुन कुणी आँर्डर दिलीच तर लगेच जाऊन ताजे ताजे करले तोडुन आणतो व भाजी बनवतो. ह्या सगळ्य़ा वादाने माझं डोकंच पेटलं. म्ह्टलं नाँनवेज मधे काय आहे? बांगळा व चिकन दोनच प्रकार आहेत साहेब. मग मी बांगळाची आँर्डर दिली, १० मिनटात जेवणाचं ताट आलं, जेवताना खरंतर वाईट वाटत होतं, पण त्या नालायक वेटरनी नको नको त्या भाज्यांची नावं घेऊन माझी पार फजिती केली होती, म्हणुन रागाच्या भारात धार्मिक साधनेला जातान सुद्धा हे असलं मुर्ख पणा केला होता. तसही मला खुप राग आला किंवा सलग दोन तिन सुट्ट्या आल्याने घरात राहुन बोअर झालो तर सारखं काही तरी खावसं वाटतं. शिकताना अभ्यासाला बसुन बोअर झालं तर तासा तासाला किचन मधे फेर फटका मारण्याची माझी जुनी सवय. माधवी सारखी म्हणायची, “ तुला अभ्यासाला बसल्यावर सारखी भुक कशी काय लागते?” एकदाचं जेवण झालं व मरकड च्या दिशेनी निघालो. हि घट्ना आहे आजपासुन ५ वर्ष जुनी, तेंव्हा आळंदि ते मरकड रस्ता बनत होता. नुसती गिट्टी टाकलेलि होती. त्या गिट्टिवरुन गाडी चालविताना जिवात जिव नव्हता, गाडी कुठे पंचर होईल काहि नेम नव्हता. त्या गिट्टीच्या दाताना हुलकावणी देत, हुलकावणी देत, कसं बसं एकदाचा मरकड गावाच्या वेशीवर पोहचलो आणी गाडी वायब्रेट होऊ लागली, गाडी पंक्चर झाल्याची खात्री करायला खाली उतरायची गरजच पडली नाही. नशिब हे सगळं गावाजवळ पोहचल्यावर झालं, पुढे अर्धा किमी गाडी ढकलत ढकलत गावात आलो, पंक्चर काढला व गावाच्या बाहेर वसलेल्या विपश्याना केंद्राकडे मोर्चा वळविला.मरकड विपश्यना केंद्र:
मरकडचा विपश्यना केंद्र अगदी निसर्ग रम्य ठिकाणी वसलेला आहे, ते दिवस हिवाळ्याचे होते, चारि बाजुनी हे केंद्र उसाच्या हिरव्या गार शेतीने वेढलेलं होतं. केंद्राचा आवारा पण ४-५ एकरचा असावा, मेन गेट पासुन संपुर्ण आवा-यात भरपुर प्रमाणात झाडं लावलेली आहेत, आणि केंद्राच्या अगदी मागुन एक नदि वाहते. किंबहुना केंद्राच्या सगळ्या आवा-याला झाडं लावुन रानाचं स्वरुप देण्यात आलं आहे. प्रवेश केल्या केल्या पार्कींग मधे गाडी लावुन, मुख्य इमारतित जावे लागते. तो पहिलाच दिवस होता, सगळे साधक मुख्य हाँल मधे जमले होते, ३०-३५ मिनिटाचं सुचना व नियमाची माहिती देणारं वर्ग झाला. सगळ्याना मोबाईल व इतर किमती वस्तु जमा करण्यासाठी लहानशा पिशव्या व एक फाँर्म देण्यात आले. आपल्या वस्तु व मोबाईल त्या पिशव्यांत भरुन दिल्यावर सगळ्याना संबंधीत पिशव्यांची ओळख पटवुन देणारं टोकण देण्यात आलेत, टोकण हरवलच तर घोळ होऊ नये म्हणुन त्या पिशव्यांवर नावाचं पण लेबल लावलं जातं.

पहिल्या दिवशी सायंकाळचे ६ वाजेपर्यंत लोकांचं येणं चालुच असतं, मुख्य प्रवेश द्वार -हाँल अशा सरळ रेषेत गेलात तर पुढे पुरुषांचं निवासस्थान आहे, उजवीकडे स्रियांच व या तिन इमारतिंच्या अगदी मधोमध धम्म हाँल (Meditation Hall) आहे. प्रत्येकाला राहायला स्वतंत्र खोली दिली जाते, खोलीत एक काँट, बेडसिट, चादर, ब्लँकेट, गादी, उशी,पंखा, लाईट अशा सगळ्या सोई आहेत, आंघोळिला मात्र काँमन बाथरुम आहेत. मुख्य हाँल मधे आपलं नाव नोंदवुन झाल्यावर राहण्याच्या खोलीची चावी दिली जाते, आपल्या सामाना सोवत खोलीत जाऊन सायंकाळ्चे ६ पर्यंत मस्त आराम केला.


पहिला दिवस:

६ वाजता धम्म्सेवक ( Volunteers ) घंटा (देवघरात पुजेत वाजविण्यासाठी जी लहान घंटा असते अगदी तशी) वाजवत दाराजवळ आला, दार ठोठावुन सगळ्याना भोजन गृहात एकत्र जमायचं आहे असं सांगुन निघुन गेला. आम्ही सगळे भोजन गृहात जमलो, एका धम्मसेवकाने नियमाची परत उजळणी करुन दिली,
“ईथे तुम्हाला पुर्ण १० दिवस राहायचे आहे, आज तुम्हाला पोटभर जेवण मिळेल. उदयापासुन फक्त एकच वेळा जेवण मिळेल व सायंकाळी दुध व एक फळ एवढाच आहार मिळेल. ज्यानी कुणी आधी विपश्यना केली असेल त्याना मात्र सायंकाळचं दुध व फळ मिळणार नाही. त्यानी फक्त १ ग्लास लिंबु पाणी पिऊन राहायच आहे, या मुळे इंद्रीयांवर नियंत्रण ठेवण्याची ताकत वाढते. ज्याना कुणाला वैद्यकिय कारणास्तव दोन वेळाचे जेवण हवे असेल त्यानी तसे आजच सुचवावे, तशी सोय केली जाईल. तुम्ही ईथे १० दिवस राहणार आहात त्याच्या मोबदल्यात एकही पैसा दयायचा नाही. तुम्हाला पुढील १० दिवस जे अन्न दिले जाणार आहे, ते मागिल बँचच्या साधकानी केलेल्या दानातुन दिले जाणार आहे, शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटले तर दान दया, पण हे बंधणकारक नाही. कुणाला दान दयायचे नसल्यास त्रास होऊ नये म्हणून दाण घेण्याची जागा अगदी नेहमीच्या रेल-चेल असणा-या ठिकाणांपासुन जाणीवपुर्वक दुर ठेवली आहे, फक्त मनातुन ईच्छा असणा-यानीच तिकडे जावे आणी तेही दान घेण्याची खिडकी फक्त शेवटच्या दिवशीच उघडेल. मधल्या १० दिवसांत कुणाला बोलण्याची परवानगी नाही, फक्त धम्म हाँल मधे गुरुजींशी कमीत कमी शब्दात गरजे नुसार बोलता येईल. बाकी इतर काही अडचणी असल्यासे धम्म सेवकांकडे लिहून दयावे. भोजन गृहात नेहमी कागद व पेनची सोय असते. इतर काही गरजेच्या वस्तु बाहेरुन मागवायच्या असल्यास रोज जेवायला आल्यावर तिथे नावासकट यादी सोडावी, दुस-या दिवशी जेवयला आल्यावर त्या वस्तु घेऊन जावे.”
आणी पहिल्या दिवशीची सुरुवात मस्त सात्विक आणि चवदार भोजनाने झाली. जेवल्या नंतर लगेच धम्म हाँल च्या दिशेनी निघालो.


धम्म हाँल:

धम्म हाँल दुरुन/बाहेरून अगदी एखाद्या बौद्ध स्तुपासारख्या आकाराचा दिसतो. आता अगदी पिन ड्राँप सायलेंस होता, दोन प्रवेश द्वार होते ( एक स्त्रियांसाठी व दुसरे पुरुषांसाठी) प्रवेश द्वारातुन आता गेल्या गेल्या दुरवर बुद्धाची एक मोठी अर्धवट डोळे बंद असलेली मुर्ती दिसली. मुर्तीच्या थोडंस पुढे गुरुजींची बसण्याची सोय होती. बाकी संपुर्ण हाँल दोन भागात (स्त्री व पुरुषांसाठी) विभागलं होतं. ध्यानासाठी बसायला २ बाय २ फुट च्या चौकोनी गदया होत्या, व हाँलच्या दोन्ही कडेनी वयस्कांसाठी (ज्याना बसने जमत नाही ) खुर्च्या ठेवलेल्या होत्या. एकंदरित ध्यान करायला मन प्रवृत्त होईल असं मस्त वातावरण होतं. पहिल्या दिवशी नुसतच ध्यान करायला लावलं, गुरुजीनी विपश्यना काय असते, मनावर ताबा मिळविण्यास याची कशी मदत होते याची थोडक्यात माहिती दिली, व ज्यानी विपश्याना हि विदया भारतात परत आणली त्या गोयंका गुरुजीची प्रोजेक्टरवर माहिती दाखविली.

गोयंका गुरुजी:
गोयंका गुरुजी मुळचे ब्रम्हदेशाचे, त्यांचे पुर्वज खुप आधी केंव्हा तरी भारतातुन तिकडे स्थालांतरित झालेत व गुरुजींचं जन्म तिकडेच झालं. त्यांचा खुप मोठा व्यापार होता, गुरुजीना डोक्यात काहितरी असा आजार झाले की अक्ख्या पृथ्विला गोल गोल घिरट्या घालुन झालेत पण कुठेच काही ईलाज होईना. शेवटचा उपाय म्हणुन तिथल्या बुद्धिष्ट मठात गेलेत व शेवटचा पर्याय म्हणुन विपश्याना केली, त्यानी ब-यापैकी सकारात्मक निकाल मिळालेत मग स्वत:ला झोकून देऊन पुन्हा पुन्हा विपश्यनाचे पुढचे धडे गिरवायला सुरुवात केली. आणी ईकडे भारतातुन मात्र हि विदया हद्दपार झाली होती. या विद्येचा उगम ज्या देशात झाला तिथेच तिच्या अस्तित्वाचा प्रश्न यावा हे काही त्याना पटलं नाही व त्यानी विपश्यनाचा प्रचार व प्रसार करायला कायमचं बि-हाड हलविलं. आणी आज विपश्यनाचा व्याप एवढा वाढला की पुर्ण जगभरातिल लोकं या विद्येचा फायदा घेत आहेत.


रोजचा दिनक्रम:
सकाळी पहाटे ४ वाजता धम्म हाँलची घंटा वाजवली जात असे, पुढच्या १० मिनिटात धम्मसेवक ती लहान घंटा वाजवत प्रत्येकाच्या खोलीचं दार ठोठावत पुढे जात. सगळे पटापटा उठून आपापली काम उरकुन धम्मा हाँलच्या दिशेने जात, काही जण मात्र आजुन खोलीतुन बाहेर आलेच नसायचे. हे बहुतेक उशीरापर्यंत उठाणा-या गटातले प्राणी असावेत. ४.३० ला तिकडे धम्मा हाँल मधे साधना सुरु व्हायची. धम्म सेवक साधकांची बरोबर गिनती ठेवत असत. काही लोकं आजुन आली नाही याची खात्री झाली की ते परत घंटा घेऊन त्या पुरुष निवासस्थानाकडे जात व ज्या खोलीला बाहेरुन ताला लावलेला नाही अशा खोलीच्या दाराजवळ जाऊन आतला साधक बाहेर येइस्तोवर घंटा वाजवित उभे राहत. बरं मौन व्रत हे सगळ्याना बंधणकारक म्हणुन धम्मसेवक सुद्धा आवाज देऊ शकत नाही, व आतला माणुस सुद्धा “हो मी उठलो, बाहेर येतो पण तुझी घंटा थांबव रे बाबा” हे वाक्य मनातल्या मनात बोलत एकदाचं दार उघडुन धम्मसेवकाकडे बघितल की धम्मसेवक मात्र दोन झात जोडुन अगदी निर्विकार नजरेने आपल्या समोर उभा असायचा. हे एकदा माझ्याबरोबर पण घडलं आणि मला मरणाची लाज वाटली. एक माणुस इतक्या निर्विकार भावनेने आपल्या चुकीचं स्वागत करतो त्या पेक्षा त्यानं दोन शिव्या घातलेल्या ब-या, पण हे शुन्य भावनेने बघितलं की पार इज्जतीचा चेंदामेंदा होतो. त्या नंतर मी परत केंव्हांच या निर्विकार नजरेचा सामना होऊ नये म्हणुन युद्ध पातळीवर खबरदारी घ्यायचा. सकाळि ८-९ आंघोळीची वेळ असायची, त्या आधी नास्ता मिळायचा. आंघोळी झाल्या की परत धम्मा हाँल. ११ वाजता दुपारचे जेवण, जेवना नंतर थोडावेळ विश्रांती व परत धम्मा हाँल २-४ विश्रांती परत धम्मा हाँल, आणी रात्री ९.३० ला दिवसाचा दिनक्रम संपायचा. असं एकंदरीत १० तास नेटाने ध्यान चालायचं. बसताना कुणाला काही त्रास झाला, किंवा वयस्क लोकाना काहि अडचण आली कि धम्म सेवक अगदी नजर ठेवुनच असायचे, हातो हात मदत हाजिर असायची. असा हा विपश्यनाचा दिनक्रम जो सुरुवातिला फार त्रासदायी होता, पण हळु हळु सगळेच ध्यानचा आनंद लुटु लागले.


आनापान सती:
आनापान सती आणि सतिपठ्ठण ही दोन्ही बुद्ध तत्वज्ञानातल्या सर्वात महत्त्वाच्या सूत्रांपैकी. यापैकी आनापान सती श्वासोश्वासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सोळा पद्धती शिकवतं. तर सतिपठ्ठणात मनसमृद्धिच्या चार आस्थापनांबद्दल सांगितलं आहे. या दोन्ही सूत्रांचा अभ्यास एकत्रीत रित्या केला जातो त्याला विपश्यना म्हणतात. आनापान सती सूत्रात सांगितल्याप्रमाणे श्वासोश्वासावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सराव अतिशय आवश्यक असतो. कारण यातून सतर्कता जागृत होऊन काळजीपूर्वक आणि सखोल निरिक्षण करता येतं. आणि निरिक्षण म्हणजे मनाचं, स्वत्वाचं निरिक्षण. म्हणुन आनापान सतीची सुरुवतीचे तिन दिवस १०-१० तास सराव करुन घेतल्या जातो. आम्हाला सकाळी ४ उठावे लागे, ४.३० पर्यंत आपापली कामं आटपुन धम्मा हाँल मधे हाजर. मांडी घालुन बसणे सुरुवातीला फार त्रासदायी काम होतं, आणी वरुन नाकाद्वारे घेणा-या श्वाच्छोश्वासावर लक्ष केंद्रीत करणं मुळीच जमायचं नाही. आणी १० तास मांडी घालुन बसल्यामुळे पायांचे तर पार तुकडेच पडायचे. तसं दर एक तासानी ५ मिनिटाचा ब्रेक असतो पण तो पुरायचाच नाही. असं करता करता दोन तिन दिवसानी हळु हळू श्वासावर लक्ष केंद्रित होऊ लागलं व मांडि घालुन १० तास बसण्याची क्षमतासुद्धा आली. आणि तिस-या दिवशी आनापान सती संपली. आता सुरु होणार होता विपश्यनाचा दुसरा भाग.


सतिपठठणात:

सतिपठठणात म्हणजे नाकाद्वारे शरिरात जाणा-या वायुचे अतीशुक्षम निरिक्षन करणे. मन लावुन केल्यास अगदी दोन दिवसात समाधी (काही क्षणाची) अवस्था गाठता येते. शरिरातल्या प्रत्येक भागाची अतिशुक्षम हालचाल अनुभवण्याची कला इथे अवगत होते. सतिपठठणात ची शिकवण चार भागात दिली जाते.
१) डोके
२) धड
३) हात
४) पाय
या शरिराच्या चारही भागाचं सुरुवातिला वेगवेगळं निरिक्षण करायचं असतं, आणी तेही थोडं फार नाही १०-१० तास. आणि नंतर मात्र या सगळ्या भागांचं एकत्र अतिशुक्षम निरिक्षण करावं लागत. आपण जीवनात केंव्हा विचारही केला नसेल त्या सगळ्या केंव्हाच पकडता न येणा-या भावना व हालचालींची ईथे अनुभूती घेता येते. आनापनसती व सतिपठठणात याला एकत्रीत रित्या विपश्यना असे म्हणतात. हे सगळ चालत संपुर्ण १० दिवस. १० व्या दिवसाला मैत्री दिवस म्हणतात, त्या दिवशी दुपारुन मौन सोडायचं असतं, मुख्य हाँल मधे ध्यान, साधना व इतर धार्मिक पुस्तकांचे स्टाँल लागतात. पुस्तक विक्रीतुन मिळालेला निधी संस्थेच्या विकास कामासाठी वापरला जातो. त्या रात्री स्नेह भोजन होतो, ध्यान वैगरे करुन रोजच्या प्रमाणे आपापल्या निवासस्थानाकडे गेलो पण आज मात्र एक गोष्ट बदललेली होती, ती म्हणजे आज मौन नव्हतं. सगळे एकमेकांशी गप्पा गोष्टी करुन झोपी गेलेत व दुस-या दिवशी परतीच वाट धरली.

आता मात्र आंतरजालावरुन प्रवेशाचा अर्ज भरता येतो. अधिक माहितीसाठी खालील दुवा बघा.


http://www.dhamma.org/en/schedules/schgiri.shtml

http://www.vridhamma.org/Home.aspx

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा