शुक्रवार, २५ जून, २०१०

दलित उद्योजक-II

(हा लेख लोकसत्ताच्या साईटवरुन कॉपी पेस्ट केलाय. कारण लोकसत्तानी पुढे मागे तो लेख हलविल्यास माझ्याकडे तो संग्रही असावा इतकेच.)

मिलिंद कांबळे हा या प्रदर्शनाचा सूत्रधार.. ते प्रदर्शन भरवलं होतं त्याच्या डिक्की नामक संस्थेनं.. डिक्की हे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॅण्ड इण्डस्ट्रीज या नावाचं लघुरूप.. डिक्कीच्या या उपक्रमात महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकचे सुमारे १५० उद्योजक सहभागी झाले होते.. ऐंशी हजारांहून अधिक पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली, पन्नासेक लाखांची विक्री प्रदर्शनात झाली आणि दहाएक कोटींची कॉँट्रॅक्टही झाली.. डिक्कीनं या निमित्तानं नॅशनल बिझिनेस ॅडव्हायझरी कौन्सिल स्थापन केली आहे.. देशभरातील दलित उद्योजक या कौन्सिलशी निगडीत व्हावेत असा त्यांचा प्रयत्न आहे.. कल्पना सरोजना त्याचं प्रमुखपद देण्यात आलं आहे.. पर्यटन क्षेत्र हे येत्या काळाचं विकसित होणारं क्षेत्र असल्यानं होतकरू दलित उद्योजकांनी देशविदेशातील या क्षेत्रात उतरावं असा त्यांचा प्रयत्न आहे..
साधारणपणे २००४-२००५ च्या सुमारास देशभर खासगी क्षेत्रातील आरक्षणाची मागणी आंदोलनांद्वारे जोर धरत होती, तेव्हा त्या आंदोलनाची दखल भारतीय उद्योग जगतालाही घ्यावी लागली होती.. आरक्षण नको अशी भूमिका घेणाऱ्या उद्योगजगताला तेव्हा पंतप्रधानांनी सल्ला दिला होता, आरक्षण नको असेल तर खासगी क्षेत्रानं दलित समाजाच्या रोजगाराची जबाबदारी घ्यावी असा.. त्यातूनच टाटा सन्सचे संचालक जमशेद इराणी यांच्या अध्यक्षतेखाली ॅफर्मेटिव्ह ॅक्शन कौन्सिलची स्थापना केंद्र सरकारनं केली होती.. या समितीनं अभ्यास करून दलित समाजाच्या विकासाचा एक कृती आराखडा सरकारला सादर केला होता..
या आराखडय़ापासूनच स्फूर्ती घेऊन, याच सुमारास पुण्यात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॅण्ड इंडस्ट्रीजची स्थापना एप्रिल २००५ मध्ये झाली होती.. मिलिंद कांबळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.. दलित उद्योजकांना एकत्र आणणं, त्यांची कार्यशक्ती, त्यांची कार्यक्षमता, त्यांची गुणवत्ता, त्यांची उद्यमशीलता समाजाला दाखवून देणं हा त्यामागचा उद्देश होता.
स्वातंत्र्यानंतरची पहिली दलित पिढी सुशिक्षित झाली, आरक्षणाच्या धोरणामुळे पहिली पिढी एम्पॉवर झाली.. शिक्षणामुळे मिळालेल्या संधीतून त्या तरूणांमध्ये नवनव्या आकांक्षा निर्माण होऊ लागल्या.. ८० नंतरच्या, म्हणजे मंडल आयोगानंतरच्या कालखंडात तर दलित तरूणात उद्योग क्षेत्राची पाऊलवाटच रूजू लागली.. नेमक्या याच कालखंडात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात उद्योगांच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा प्रभाव दाखविणारे दलित उद्योजक उभे राहिले.. नकारात्मक सामाजिक वातावरण, आर्थिक कोंडी, अपुरी साधनं यावर मात करत हे उद्योजक आपलं स्थान प्रस्थापित करत राहिले.. अर्थात यातल्या काही जणांनी सरकारी नोकरीही केली, पण ती फारच थोडा काळ.. नोकरी करणारं होण्यापेक्षा नोकरी देणारं व्हावं हे त्यांच्यापैकी अनेकांच्या मनानं घेतलं.. अशा साऱ्यांना एकत्र यायला एक व्यासपीठ हवं होतं.. डिक्कीच्या रुपानं ते प्राप्त झालं.. टाटा उद्योग समूहानं आपल्या दर महिन्याच्या व्हेंडर मिटींगसाठी डिक्कीला निमंत्रण देऊ केलं.. थरमॅक्सनं तर डिक्कीशी संबंधित उद्योगांची यादीच मागवून घेतली.. हावरे उद्योग समूह आणि फियाटनं तर छोटे कारखानदार, त्यांनी निर्मिलेले सुटे भाग, सेवा पुरवठय़ाची त्यांची क्षेत्रं याचीच विचारणा डिक्कीकडे केली..
००००००
मिलींद कांबळे हे डिक्कीचे संयोजक, संस्थापक.. कांबळे मूळचे लातूर जिल्ह्यातले अहमदपूर तालुक्यातल्या चोबळी गावचे.. त्यांचे वडील शिक्षक, त्यामुळे शिक्षण वेगवेगळ्या गावी वडिलांची बदली होईल तिथं तिथं झालं.. नांदेडमधून ते इंजिनिअर झाले, कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांचा संबंध विद्यार्थी परिषदेशी आला.. स्वभाव चळवळ्या, त्यामुळे विद्यार्थी आंदोलनं, विद्यापीठ निवडणुका यात कांबळे पुढे राहिले.. १९९० नंतर ते पुण्याला स्थायिक झाले, आणि नोकरी करायची नाही असं ठरवून बांधकाम व्यवसायात उतरले.. पुढे राजकारणात जाणंही झालं आणि पुणे महानगरपालिकेवर ते निवडूनही आले.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मिलिंदचं आराध्यदैवत..२००१ साली मिलिंदनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉट कॉम ही वेबसाइट सुरू केली.. सात हजार पानं आणि एक हजार छायाचित्रं असलेली ही वेबसाइट विकसित करण्यामागचा त्याचा विचार अगदी साधा-सरळ-सोपा होता.. इंटरनेटच्या माध्यमातून बाबासाहेबांना घराघरात पोचवायचं, इतकाच.. तो साध्य झाला, पण बाबासाहेबांचं आणखी एक वाक्य त्याच्या मनात कायमचं रुंजी घालत राहिलं.. खासगी क्षेत्रातील उद्योगशीलता जपल्याशिवाय भारताचा उद्धार होणार नाही, हे ते वाक्य.. मिलिंदनं ते पक्कं ध्यानात ठेवलं आणि उद्योगाच्या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या तमाम दलित बांधवांना एकत्रित करून त्यांची औद्योगिक संघटना काढायचा विचार बोलायला सुरूवात केली.. समविचारी मंडळी एकत्र येत गेली आणि त्यातनं उभी राहिली डिक्की.. दलित समाजाचा विकास व्हायचा असेल तर उद्योगविश्व वाढलं पाहिजे, दलित समाजातील उद्योजकांना भारतीय उद्योगाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलं पाहिजे, हे त्यानं आग्रहानं मांडायला सुरूवात केली..
डिक्कीच्या माध्यमातून मग मिलिंदनं नव्यानं उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या दलित तरूणांना प्राथमिक माहिती, आराखडे, संबंधित संस्था, अर्थपुरवठा करणाऱ्या एजन्सीज यांची माहिती द्यायला सुरूवात केली.. शासनाचं सहकार्य मिळावं यासाठी प्रसंगी झगडणंही त्यात आलंच.. आज महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात डिक्की पोचली आहे, दोनशेहून अधिक सदस्य झाले आहेत.. डिक्कीची आता राष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जाऊ लागली आहे.. डिक्की हे दलित उद्योजकांच संघटन असलं तरी तिचा मुख्य उद्देश दलित समाजाचं आर्थिक सबलीकरण करावं असा आहे.. दिवसेंदिवस शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी कमी होत असताना आणि शासकीय कामांचेही आऊटसोर्सिग होण्याचे दिवस फार लांब नसताना दलित समाजाला स्वत:ची आर्थिक उन्नती करून घेण्याचा एकमेव हमखास मार्ग उरणार आहे तो उद्योग किंवा व्यवसायाचा.. मिलिंद कांबळेंची ही ठाम धारणा आहे..
डिक्कीच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं विवेक व्यासपीठानं दीपस्तंभ नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला.. सॅटर्डे क्लबचे संस्थापक अध्यक्ष माधव भिडे यांनी या दीपस्तंभला प्रस्तावना लिहिली आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे, एखादा समाज आर्थिकदृष्टय़ा तेव्हाच पुढे येतो, जेव्हा तो उद्योगव्यापाराची कास धरतो.. गुजराती, मारवाडी, कच्छी, सिंधी, पंजाबी समाजाने हेच सिद्ध केले, पण मराठी समाजाने मात्र शतकानुशतके संपत्तीची उपेक्षाच केली, मराठी समाज केवळ सरस्वतीची उपासना करीत राहिला, त्याचे लक्ष्मीकडे दुर्लक्ष झाले आणि मराठी समाजाची सामुदायिक आर्थिक ताकद इतर समाजांच्या तुलनेने नगण्य राहिली. दलित समाजाची स्थितीही काही फारशी वेगळी नव्हती, पण या समाजातील तरूणांनी उद्योग जगताची नीतीमूल्ये आत्मसात केली, अल्प बीज भांडवल, खडतर परिश्रम, अचूक ध्येय निश्चिती यांच्या बळावर त्यांचा प्रवास झाला आणि कोणतीही पाश्र्वभूमी नसताना या युवकांनी स्वत:चं विश्व उभं केलं..
०००
दीपस्तंभमध्ये परिचय आहे तो पंधरा उद्योजकांचा.. त्यांनी मिडिया, सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सव्‍‌र्हिस आदी क्षेत्रात आपलं भक्कम स्थान निर्माण केलं आहे.. मुकुंद कमलाकर हे त्यातले एक.. सूर्या टच सोलर सिस्टीम ही त्यांची कंपनी.. सोलर वॉटर हीटर ही त्यांची खासियत.. ते मूळचे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी..सरकारी नोकरी फार काळ करायची नाही हे त्यांनी मनाशी ठरवलेलं होतंच.. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला आणि उद्योग सुरू केला.. आज आयएसओ ९००१-२००० हे प्रमाणपत्र मिळवलेला तो एकमेव मराठी उद्योजक आणि उद्योग आहे.. आज २८ कुशल आणि अर्धकुशल कामगार त्यांचेकडे आहेत..
कुरिअरच्या क्षेत्रात असलेले अविनाश कांबळे मूळचे सोलापूरचे..वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडून बाहेर पडलेला, औंधच्या कस्तुरबा झोपडपट्टीत वाढलेला, गजरे-पेरू-शेंगा विकत गुजराण करणारा, प्रारंभी हेल्पर मग ऑफिस बॉयची नोकरी केलेला हा तरूण आज १२० कामगारांना नोकरी देणारा आणि ११ फ्रॅंचायझींचा मालक म्हणून ओळखला जाणारा यशस्वी उद्योजक बनला आहे.. डी.टी.डी.सी या प्रख्यात कुरिअर कंपनीच्या चेअरमन क्लबचा तो सदस्य आहे.. कुरिअर क्षेत्रात त्यांच्या नावाला वलय आह, पण तरीही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.. सुखाई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.. आपण ज्या समाजात वावरतो, जगतो त्याचे आपण देणे लागत असतो या बाबासाहेबांच्या विचारांना कृतीचे कोंदण देणारा हा तरूण..
बारा वर्षे हेल्परचा पगार घेऊन हंगामी कामगाराच्या स्वरूपात कंपनीत वावरणारा, पण त्या वावरातच सर्व प्रकारची तांत्रिक कामे शिकून घेऊन स्वत:चा वर्कशॉॅप सुरू केलेला, सकाळी ते दुपारी फोर्ब्स कंपनीत नोकरी करणारा आणि दुपारी नंतर रात्री १० पर्यंत स्वत:च्या वर्कशॉपमध्ये काम करणारा असा विजय सुहासे त्यातलाच एक.. गॅस एजन्सीधारक ते गॅस पुरवठादार अशी मजल मारणारा स्वप्निल भिंगारदिवे हा दीपस्तंभमधला आणखी एक होतकरू तरूण.. व्यवसायाचं क्षेत्र वाढवताना स्वप्निलनं इथेनॉल आणि स्पिरिट निर्मितीचा प्रारंभ केला, ते तयार करताना जी मळी शिल्लक राहते, जे दोन लाख लिटर पाणी त्यासाठी दररोज लागतं, त्याचा पुनर्वापर करून त्यानं जसं सांडपाणी निकालात काढलं तसंच मळीचाही इंधन म्हणून वापर करुन वातावरण प्रदूषणमुक्त ठेवण्यात यश मिळवलं.. स्वप्निल तिथंच थांबलेला नाही, १००० टन साखर निर्मितीचा त्याचा कारखाना २०१०-२०११ च्या गळीत हंगामात आता सुरू होतो आहे..
अविनाश जगताप हा तरूण पिढीजात उद्योग चालवणारा.. केवळ घर चालविण्यासाठी म्हणून वडिलांनी सुरू केलेल्या सिमेंट पाईप विकण्याच्या एव्हरेस्ट पाईप इंडस्ट्रीज नामक उद्योगाला आता अविनाशनं व्यापक स्वरुप दिलं आहे, जवळपास अडीचशे जणांना या उद्योगात आता नोकरी मिळाली आहे.. बी..एल.एल.एम. शिकलेल्या जगतापांनी लेबर लॉमार्फत कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या काहीशा लांबच्या मार्गानं जाता कामगारांना थेट उद्योगात स्थान देऊ करून त्यांच्या आर्थिक उन्नयनाचंच काम हाती घेतलं आहे.. जगतापांच्या आईवडीलांनी अतिशय कष्टात हा उद्योग सुरू केला.. दारिद्रयाच्या चिखलातून बाहेर पडण्यासाठी ते धडपडत होते तेव्हा त्यांना कुणी मदत केली नाही, पण तरीही त्यांनी चिकाटीने आपलं काम चालू ठेवलं.. तीच चिकाटी आणि तोच प्रामाणिकपणा घेऊन जगतापांची वाटचाल सुरू आहे..
घरचं शिक्षणानुकूल वातावरण असणाऱ्या चिंचवडच्या अमित गोरखेंनी कुठलीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसताना केवळ स्वत:च्याच जिद्दीवर २००३ साली महापालिकेच्या अवघ्या दोन गाळ्यात सुरू केलेल्या नॉव्हेल इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट ॅण्ड रिसर्र्चने आठ वर्षांत यशाची शिखरं पार करत अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे.. कर्ज परत करू शकल्यानं अचानक परागंदा झालेल्या वडिलांनंतर आईनं घरची जबाबदारी घेतली खरी, पण अमितनंही पेपर टाक, कच्छी दाबेलीची गाडी लाव, बस स्टॅण्डवर काकडय़ा-शेंगा विक असं करत शिक्षण पूर्ण केलं आणि दोन संगणक घेऊन स्वत:ची इन्स्टिटय़ूट सुरू केली.. शैक्षणिक क्षेत्र हेच आपलं क्षेत्र म्हणून त्यांनी पक्कं केलं आणि मागे वळून पाहिलंच नाही.. आज चिंचवड एम.आय.डी.सी. मध्ये तलावाला लागून असलेल्या अडीच एकर जागेवर ३० हजार चौरस फुटांची संस्थेची इमारत उभी आहे..
१२० रुपये पगारावर बॉक्स फाईल बनवण्याच्या कारखान्यात नोकरी सुरू करणाऱ्या राजेंद्र गायकवाडांनी राष्ट्रकुल स्पर्धाच्या निमित्ताने पुण्याच्या बालेवाडीतील एका तारांकित हॉटेलातील उंदीर मारण्याचे कंत्राट स्वीकारले आणि हॉटेल सोडून जाणाऱ्या परदेशी खेळाडूंपासून स्पर्धेला आणि भारताच्या इभ्रतीलाही वाचवले.. गायकवाड पुढे रॅट किंग म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्या निमित्ताने जी. टी. पेस्ट कंट्रोल नामक कंपनी स्थापून त्यातलेच स्पेशालिस्ट बनले.. पोल्ट्री फार्मसना सतावणाऱ्या उंदरांच्या नियंत्रणाचे काम गायकवाडांना मिळाले आणि पोल्ट्री फार्मचे जी. टी. पेस्ट कंट्रोलशी असलेले समीकरणच जगापुढे आले.. पर्यावरणाचे जागतिक निकष पाळून काम करणारी १४००-२००४ आणि ९००१-२००० ही दोन्ही आय.एस.. प्रमाणपत्रे मिळवणारी कंपनी म्हणून आज गायकवाडांच्या कंपनीकडे अभिमानाने पाहिले जाते.. अवघा एक माणूस सोबत घेऊन गायकवाडांनी उद्योग सुरू केला आणि आज चारशे जणांना रोजगार देणारा यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे..
अमर सोनावलेंचा भारत लेदर वर्क् सुरक्षा साधनांच्या क्षेत्रात गेली १८ वर्ष कार्यरत आहे.. मास्क आणि हॅण्डग्लोव्हज या दोन उत्पादनांच्या निर्मितीत ते आहेत, तर बाकीची उत्पादने उत्पादकाकडून खरेदी करून नेमक्या ग्राहकांना विकण्याच्या उद्योगात ते आहेत.. वर्षांला ३५ लाखांची उलाढाल त्यांची कंपनी करते आहे.. सुरक्षा कवचाच्याच क्षेत्रात असलेली आणखी एक कंपनी नामदेव खरातांची, सिग्नेट इंजिनिअर्स नावाची.. पण त्यांचं क्षेत्र आकाशातून पडणाऱ्या वीजेपासून आस्थापना, निवासी संकुलांना संरक्षण प्राप्त करून देण्याचं.. टाटा, आयडिया, पेप्सी, महिंद्रा, सत्यम, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, सॅण्डोज, बजाज हे आहेत त्यांचे काही मान्यवर ग्राहक..
सुनील माने हे आणखी वेगळंच व्यक्तिमत्व.. ते आहेत खऱ्या अर्थानं पहिल्या पिढीचे उद्योजक.. झोपडपट्टीतला जन्म, आईवडील मोलमजुरी करणारे.. शिक्षणाचा गंधही नसलेलं घरचं वातावरण, त्यामुळे कष्टाची भाकरी मिळवण्याशिवाय पर्याय नव्हताच.. कर्मवीर भाऊराव पाटलांचा कमवा आणि शिका हा संदेश प्रत्यक्षात जगणं सुरू होतं.. आय.टी.आय. करून गोदरेजमध्ये नोकरी, आणि ती करताकरता एम.. .. पुणे ते वाघोली असा रोजचा बसचा प्रवास, त्या प्रवासातच वाचन, पण ते करूनही माने कॉलेजमध्ये दुसरे आले.. दै. सकाळमध्ये नोकरीला लागले.. तिथे सुमारे दहा वर्षे नोकरी केली.. पत्रकार म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले आणि एका क्षणी नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचा निर्णय मानेंनी घेतला.. कंटेण्ट कन्सेप्ट कम्युनिकेशन हे त्यांच्या व्यवसायाचं नाव.. प्रसिद्धी माध्यमांशी संबंधित असं जनसंपर्क, उत्पादनांचं ब्रॅण्डिंग, साहित्य निर्मिती, डिझायनिंग, प्रिंटींग, राजकीय जनसंपर्क, माध्यमांचं व्यवस्थापन , मिडिया मॉनिटरिंग, सर्वेक्षण, पत्रकार परिषदांचं आयोजन, कॉर्पोरेट फिल्म्स अशा अनेक गोष्टी मानेंची कंपनी करीत असते.. मानेंनी याचाच एक भाग म्हणून डी.एस.कें.चं निवडणूक प्रचाराचं आणि प्रसिद्धीचं कामही पाहिलं.. शरद पवारांवर लोकनेता नावाचा विशेषांक काढला आणि बाळासाहेब ठाकरेंवर शाहीर विठ्ठल उमपांकडून पोवाडाही लिहून घेतला..
संजय क्षीरसागर साऊंड कॉन्सेप्ट नावानं स्पीकर्सच्या निर्मिती क्षेत्रात आहेत. कॉलेजच्या जीवनापासूनच त्यांनी या व्यवसायाला प्रारंभ केला आज ९० लाखांची उलाढाल आणि २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जनतेचा महानायक या नावानं चालणाऱ्या वृत्तपत्रामुळं समस्त आंबेडकर चळवळीलाच नव्हे, तर मराठी वाचकसृष्टीला ज्ञात झालेले सुनील खोब्रागडे मूळचे गडचिरोलीचे.. आईवडील दोघेही शेतमजूर.. शिक्षणासाठी चंद्रपूरला आलेल्या सुनीलनं अशोका कोल्ड्रिंकमध्ये नोकरी केली, आणि ती करताकरता ६९ टक्के गुण मिळवून शालांत परीक्षाही दिली.. कॉलेजच्या शिक्षणासाठी नागपूरला यावं लागलं, तिथं एम.आय.डी.सी.तल्या कामगारांचे डबे पोचवणं, नागपूर पत्रिकेचं वितरण करणं अशी कामं केली.. दुपारच्या प्रचंड उकाडय़ात काम करणंच शक्य नसल्यानं त्या वेळाचा उपयोग त्यांनी विद्यापीठ ग्रंथालयात बसून मनमुराद वाचन करण्यासाठी वापरला.. बारावी उत्तीर्ण होणं काही जमलं नाही, मग अमरावतीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.. महिना १२५ रुपये एवढय़ा तुटपुंज्या स्टायपेंडवर एकवेळ जेवण करून अभ्यास केला, आणि नोकरी मिळाली ती गडचिरोली जिल्ह्यात जनावरांना लसी टोचण्याची..
पण हे आपलं जीवनोद्दिष्ट नाही हे त्यांना चांगलं ठाऊक असावं, त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला, बारावीची परीक्षा दिली.. नोकरी करताकरता एम.. केलं.. एम.पी.एस.सी.ची परीक्षा दिली, ती उत्तीर्ण होताच मंत्रालयात सहाय्यक पदावर ते रूजू झाले.. कक्ष अधिकारी झाले, एका मित्राच्या मदतीनं घाटकोपरला प्रिंटींग व्यवसाय सुरू केला.. वयाची ४५ र्वष पूर्ण होताच नोकरी सोडायची हेही ठरलं होतंच.. मधल्या काळात वृत्तपत्रात गुंतवणूक करून अनुभव घेऊन झाला होताच.. त्या आधारावर स्वत:चं दैनिक सुरू करायचं ठरवलं.. महापेत स्वत:च्या मालकीची प्रेस उभी केली आणि जनतेचा महानायक हे दैनिक सुरू केलं.. आज महानायकच्या निमित्तानं ३६ जणांना पत्रकारितेच्या क्षेत्रात नशीब अजमावण्याची संधी उपलब्ध झाली आहे..
आर्थिक कोंडीवर मात करीत, पुण्याच्या ज्ञानेश्वर वसतीगृहात राहून बाबा आढावांच्या हमाल पंचायतीची कष्टाची भाकरी खाऊन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले देवळालीचे प्रकाश वैरागर सरकारी सेवा सोडून योगायोगानेच उद्योग क्षेत्रात आले आणि यशस्वी झाले.. पेट्रोल पंप आणि राज प्रेसिडेन्सी हे हॉटेल उभारून वैरागर यांनी मान्यवर उद्योजक म्हणून नाव कमावले आहे.. मावळ तालुक्यात प्रताप मेमोरियल हॉस्पिटल उभारणारे डॉ. दिलीप भोगे देखील गरिबीचे चटके खातच शिकले.. गेल्या १७ वर्षांत त्यांच्या हॉस्पिटलने अनेकांना प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला आहे..
०००
नोकरी की व्यवसाय या तिढय़ातून प्रत्येकालाच जावं लागतं.. पण जे हा तिढा सोडवतात ते यशस्वी उद्योजक होतात, आणि ज्यांना तिढा सोडवण्याची हिंमत होत नाही ते खाली मान घालत इमाने इतबारे नोकरी करतात, त्यातच समाधान मानतात.. पण त्याचवेळेस एक उद्योजक उभा राहिला तर समाजाचं भलं होतं, अनेकांना रोजगार उपलब्ध होतो.. दीपस्तंभनं अशा उद्योजकांचा परिचय करून देत आत्मविश्वासाची नवी बीजं रोवण्याचा जसा प्रयत्न केला आहे, तसाच नवसमाजरचनेची, समाजपरिवर्तनाची दिशा स्पष्ट करून देण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकणाऱ्या साहित्यकृतीला प्रकाश दाखवला आहे.. ते सादर करणाऱ्या रवींद्र गोळेंचं आणि मिलिंद कांबळेंचं मन:पूर्वक अभिनंदन..

बुधवार, २३ जून, २०१०

दलित उद्योजक

जूनच्या पहिल्या आठवडय़ात पुणे शहरात एक ऐतिहासिक घटना घडली.. ती घटना होती इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर भरलेल्या दीप एक्सपो २०१०ह्ण नामक व्यावसायिक औद्योगिक प्रदर्शनाची.. दलित समाजातील तरूण, होतकरू, प्रथम पिढीतील उद्योजकांनी आपापल्या उत्पादनांचं मांडलेलं असं होतं ते प्रदर्शन.. आम्ही दलित समाजातले आहोत हे खरं असलं तरी आम्ही उद्योग सुरू करताना ती भूमिका कुठेही मनाशी धरलेली नाही.. त्यासाठीच्या अवास्तव सवलती मागितलेल्या नाहीत, आणि व्यवसायात वा आमच्या उत्पादनांच्या दर्जात कुठेही तडजोड होऊ दिलेली नाही हे आत्मविश्वासानं दाखवून देणारं असं होतं ते प्रदर्शन.. आरक्षणाची मागणी आग्रहानं प्रतिपादित करण्यासाठी पुण्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पहिला करार आणि आरक्षणासारखे मुद्दे बाजूला ठेवून उद्योगाच्या आघाडीवर तमाम दलित तरूणांनी एकत्र येण्यासाठी डिक्की नामक संघटनेनं केलेला तो दुसरा ऐतिहासिक करार.. एकविसाव्या शतकात पुण्याच्याच पुण्यभूमीवर नियतीशी केलेला जणू दुसरा ऐतिहासिक करार..

अधिक माहितीसाठी ईथे वाचा


http://www.indianexpress.com/news/the-dalit-evangelists/636003/


http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=79313:2010-06-19-17-20-02&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13


हि डिक्कीची वेबसाईट

http://www.dicci.org/en/