गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

आरक्षण – वॉकर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी, मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी व सामाजीक समतोल साधण्यासाठी आरक्षणाची घटनात्मक तरतूद केली. त्याचा परिणाम आज आपल्याला बघता येईल. दलित समाजातिल ही तीसरी पिढी शिक्षण घेत आहे व अगदी दोन पिढ्यांच्या अत्यल्प कालावधित दलितानी ब-याच आघाडयांवर अत्यंत प्रभावी नि तडाखेबंद मुसंडी मारली.  शिक्षणाच्या जोरावर अन आरक्शण्याच्या जोडीने प्रत्येक क्षेत्रातील दलितांचं अस्तीत्व दिवसेंदिवस वाढत आहे.  या मूळे समाजात रुंदावलेली दरी मिटविण्याचं पुण्यकार्य तर होतच आहे, त्याच बरोबर समतेची मुल्यं रुजताना एक नवीन समाज व्यवस्था जन्म घेत आहे. नवी सामाजीक मुल्य़ रुजताना दिसत आहेत, याचा एकंदरीत परिणाम हा देशाच्या हिताचा तर आहेच पण लवकरच महाशक्ती बनण्याचे स्वप्न रंगविणा-या या नव्या पिढीच्या उत्कर्षाला अत्यंत हितकारक नि अनुकूल परिस्थीती निर्माण करण्याचं कार्य सामाजीक दरीच्या निर्मूलनातून उभं होत आहे. अन या महान कार्यात सामाजिक असमतोलता सर्वात मोठा धोका होता, आधी सामाजिक सलोखा तयार करुनच हे कार्य सिद्धिस जाऊ शकतं, त्यासाठी तळगळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणने अत्यंत गरजेचे होते. या तळागळातल्या लोकाना मुख्य प्रवाहात आणून देशाचे हित साधण्यात सर्वात महत्वाची भूमिका जर कुणी बजावत असेल तर ती म्हणजे आरक्षण होय. आरक्षणाशिवाय या देशातील वंचिताना मुख्य प्रवाहात सामावून घेणे अशक्यप्राय गोष्ट होती व यावर दिलेला रामबाण उपाय म्हणजे आरक्षण.  मी स्वत: ज्या आयटी कंपनीत आहे तिथे सुद्धा दलित बांधव चांगल्या पदावर काम करत आहेत. इनफोसिस, ओरॅकल, विप्रो ते सिडॅक पर्यंत सगळीकडे बौद्धिक कसोट्यावर आपला लोहा मनवून मोठ्या डौलात अधिकारी पदावर विराजमान दलित बांधव बघुन मन समाधान पावतं. अत्यल्प काळात केलली ही यशस्वी वाटचाल, विना आरक्षण क्षेत्रात दलितानी केलेली विजय घोडदौड पाहता अंगावर मुठभर मांस  चढतं. हे सर्व शक्य झालं त्या आरक्षणामूळेच. आरक्षणामूळे आम्हाला विद्यार्जनाच्या वाटा खुलल्या जी प्रगतीच्या नि विकासाच्या मार्गातील मुलभूत गरज आहे. ईतर सर्व यश हे कष्टाने पादाक्रांत करता येतात पण त्या रणांगणात शिरण्याचा कार्ड ज्या मूळे मिळतो ती विद्या. अन विद्यासंपन्न होण्यास आम्हाला आरक्षणाची निकडीची गरज होती ती बाबासाहेबानी घटनेच्या माध्यमातून दिली.
कुबडयांचा आधार
माझ्याशी ब-याच लोकानी आरक्षणाबद्दल नकारात्मक चर्चा केल्या. दलितेत्तरांमधिल सगळ्याच लोकांचं (शिवधर्मवाले सोडुन) मत आहे की तुम्हाला आरक्षण देऊन आज ५० वर्षे उलटलीत. आता आरक्षणाशिवाय पुढे जायला शिका. आजुन किती दिवस या आरक्षणाच्या कुबडया धरुन चालणार? पुढे पुढे तुम्हाला या कुबड्यांची ईतकी सवय होईल की तुम्ही कुबड्यांशिवाय चालुच शकणार नाही. किंवा भारत सरकार कुबडयांच्या आधारानी चालणारा एक मोठा समाज तयार करतोय ज्या मुळे पुढे चालुन देशाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे जर असच चाललं तर काही वर्षानी भारतातील मोठा समाज कुबडयांमुळे दुबळा झालेला असेल व त्याचा ताण ईतर सुद्रुढ समाजावर पडेल. मग यांचा(दलितांचा) भार परत एकदा सुदृढ समाजाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करेल आणि आपल्या देशात एक अंतर्गत क्लेश, अधोगती, जातीय़वाद व ना ना प्रकारच्या समस्या नुसत्या या कुबडयांमुळे पहावयास मिळतील. म्हणून सरकारनी लवकरात लवकर आरक्षण उठवावे आणि सगळयाना फक्त बुद्धीमत्तेच्या कसोटिवर संधी मिळावी.
काही लोकानी तर इतर प्रगत देशांची उदा. दिलीत. अमुक तमुक देश सुद्धा गरीब होता पण आज त्यांच्या दैदिप्यमान प्रगतीत कुठल्याच आरक्षाचा वाटा नाही नुसतं कष्टाच्या बळावर ते सगळं घडुन आलं. म्हणून दलितानी कष्ट करुन स्वत:ची प्रगती करावी. अमेरीकेत सुद्धा काळे-गोरे वाद होते, तिथे आजही काही प्रमाणात तो वाद आहेच. पण काळ्य़ा लोकानी आज जे काही मिळविलं ते ईच्छाशक्तीच्या  व कष्टाच्या जोरावर. त्या तुलनेत दलितानी काहीच मिळविलेलं नाही, कारण त्याना आयतं मिळवायची सवय झालिये. हे आरक्षण जर असच चालु राहीलं तर भविष्यात सरकारवर आरक्षणा पासुन कसं दुर राहता येईलयावर एक मानसोपचार पोजेक्ट राबविण्याची वेळ येईल इथपर्यंत लोकांनी तारे तोडले.
यावर माझं मत
खर तर ही सुरुवात आहे, आत्ताशी कुठे आम्ही उभं राहायला शिकतोय. प्रत्येक गोष्टीचा परिणाम मिळायला काही कालावधी जावा लागतो. आणि तो परिणाम जर समाज या घटकाशी संबंधित असल्यास मात्र नियोजीत वेळेपेक्षा बराच काळ मागे पुढे होऊ शकतो. आज ५० वर्षात दलितांमधे जो बदल घडून आलाय तो अगदिच निराशाजनक नाही, उलट मोठ्या अभिमानाने सांगावं ईतकी प्रगती झाली आहे.  अगदीच प्रोजेक्ट फेल गेला म्हणून बोंबा मारणारे आमचं मानसिक खच्चिकरण करण्याच्या उद्देशाने व दूराग्रह भावनेने असा अपप्रचार करित आहेत. दलित आणि दलितेत्तर विदयार्थ्याना एकाच परिमाणाने मोजने म्हणजे तालिमीत खुराक खाऊन तयार झालेल्या पैलवाना समोर कुपोषित बाळाला उभे करण्यासारखे होईल. दलित हा आजही बौद्धिक दृष्ट्या पुर्ण सक्षम नाहीच, कारण आमच्या जीन्समधुन आलेला बौद्धिक अधूपणा हा हजारो वर्षाच्या ज्ञानवियोगाचा परिणाम आहे. हा वियोग कोणी घडवून आणला हे जगजाहिर आहे. आज पर्यंत आम्हाला बुद्धी वापरण्याची, ज्ञानार्जनाची सामाजीक व धार्मिक बंदी होती, त्यामूळे बुद्धीचा विकास झालाच नाही. आताकुठे आम्ही बुद्धीचा वापर करायला लागलो. ज्या ज्ञानक्षेत्रात आम्हाला कधीच प्रवेश नव्हता तिथे नुकताच प्रवेश मिळाला, पण तिथे टिकण्यासाठी लागणारा सराव तर व्हायला हवा ना. सवर्णाची पिढी पिढ्यान-पिढ्याच्या सरावानी अत्यंत निपून बनली आहे तर आम्ही नुकतेच विना-सराव तिथे प्रवेशलो आहोत. हा सराव घडावा म्हणून आरक्शण.  सवर्णानी लादलेलं नैराश्य घालवायला आजून किमान १५० वर्षे जावी लागतील. बुद्धिच्या मैदानात आम्ही उतरलो, तिथे आधिच उभा असलेला सवर्ण हा त्या मैदानातला जुना खेळाडू आहे. त्यानी प्रत्यक्ष सराव तर केलाच पण कित्येक पिढ्याच्या जणूकांमधूनही त्याला सरावाचा वारसा मिळाला आहे. त्यामूळे तो आमचा प्रतिस्पर्धी नाहीच मुळी. कुस्तीच्या मैदानात खाऊन पिऊन, आखाड्यात शरीर कमावून उभा असलेला पैलवान अन नुकताच प्रेक्षकांमधून उतरलेला एक सामान्य नागरीक याच्यात लढत केल्यास त्याला स्पर्धा म्हणता येणार नाही. कारण दोन स्पर्धकांची स्पर्धेसाठीची तयारी ही समान नाही. पैलवान हा त्यासाठी खास प्रशिक्षित असून तो दुसरा नागरी प्रशिक्षित नाही. म्हणून पैलवान व तो नागरीक जरी आमने सामने कुस्तीच्या मैदानात उतरले तरी ते बरोबरीचे स्पर्धक ठरणार नाही. जर या दोघात लढत करावयाचीच असेल तर मग त्या नागरीकाला पैलावानाला मिळणा-या सा-या सोयी देऊन तशी तयारी करवून घ्यावी लागले. मधेच तो पैलवान सवलतीच्या विरुद्ध बोंब मारून लढण्यास या म्हटल्यास तसे करता येणार नाही. पैलवानानी घेतलेल्या सर्व सोयी आधी या नागरीकाला देणे गरजेचे ठरेल. पैलवानानी केलेली तयारी करण्यास लागणारा वेळही देणे गरजेचे ठरेल. अधे मधे पैलवान दंड थोपटून लढ्याचा आव आणून आपल्याला आव्हान देऊन आपल्या दुर्बल्याचा उपहास करेलही.  अगदी याच धर्तीवर सवर्णानी पुर्वतय्यारी केली आहे. आम्ही नुकतेच त्या मैदानात उतरलो आहोत. आता आम्हाला पैलवानाच्या बरोबरीत उभं राहण्यासाठी सराव करायचा आहे. त्यासाठी घेतलेल्या सवलती म्हणजे आरक्शण होय.
हजारो वर्षाचा शैक्षणीक वारसा लाभलेल्या लोकांनी वाट्टेल ते बोलायला सुरुवात केली आहे. किंबहुना ५० वर्षातिल प्रगतीमुळे त्याना अंदाज आला असावा की, त्यांच्याकडे बौद्धिक वारसा जरी असला तरी आता दलितानी या क्षेत्रात उडी घेतलीय. लवकरच वेगवेगळ्य़ा आघाड्यातील सुत्र दलितांकडे जातील ला भीती मुळे परत एकदा दलितांची बौद्धिक आघाडिवर घेराबंदी करण्याचा हा प्रयत्न आहे.
बघा मुळात दलित हा हजारो वर्षापासुन शिक्षणापासुन व इतर बौद्धिक विकासाला प्रेरणा देणा-या सर्व गोष्टिंपासुन वंचित असल्यामुळे तो आज सवर्णांपेक्षा डावाच आहे. कारण बुद्धिमत्तेचा संस्कार हा जिन्समधुन सुद्धा येत असतोच. तिव्र ईच्छा शक्तिने सगळं बदलता येतं, पण सगळ्य़ानाच ईच्छाशक्तीचा तो टोक गाठता येणे शक्य नाही. आज जे संवर्ण बुद्दीचे बाता करताना दिसतात त्या मागे एक मोठा इतिहास आहे.
१) त्याचे पालक शिकलेले आहेत.
२) त्याच्या घरी शैक्षणीक जागृती झालेली आहे.
३) बुद्धीमत्तेचा वारसा जीन्स मधुन आलेला आहे.
४) ते जिथे राहतात तिथे शिक्षणासाठी अनुकुल असं वातावरण आहे.
५) एकंदरी बौद्धिक विकासासाठी लागणा-या सर्व गोष्टी त्याना जन्मजात उपलब्ध आहेत.
आणि दलितांचं बघा.
१) त्यांचे पालक शिकलेले नाहीत.
२) त्यांच्या घरी शैक्षणीक जागृती नाही.
३) जीन्स मधुन जे आलं ते नैराश्य, भीती व चाकरी शिकवते.
४) दलित आजही मोठ्या प्रमाणात झोपडयांत राहतो. अभ्यासाची गोडी निर्माण होत नाही.
५) बौद्धिक विकासासाठी काहीच अनुकूल नसतं. त्यानी विकास साधला त्यानी मोठा झगडा करुन ते मिळविलं आहे.
आता कुणीतरी उठुन म्हणेल कि, आमच्या ओळखितला अमुत तमुक माणुस उच्च पदावर असुन सुद्धा त्यानी मुलाना आरक्षणातुन इंजीनिअरिंगला प्रवेश मिळवुन दिलाय किंवा त्यांची मुलं फारशी शिकलेली नाहिये. हि असली एक दोन उदाहरणं घेऊन नियम सिद्ध करता यायचा नाही, याला अपवाद म्हणुन सोडुन दयावे. वरील सर्व घडामोडींचा, परिस्थीतीचा व इतिहासाचा संदर्भ पाहता दलिताना,  वंचिताना या देशाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे म्ह्टल्यास त्याना आरक्षणे देणे अनिवार्य आहे. आरक्षणामूळे सामाजिक असमतोल निर्मूलनास मोठी मदत होईल. याचा देशाच्या विकासावर सकारात्म परिणाम होऊन आमचा देश प्रगतीच्या मार्गावर गती धरेल. देशातील समाजीक सलोखा विकासा साठी पूरक असतो व तो अत्यंत गरजेचा आहे. त्यामूळे या देशातील उपेक्शिताना आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व देशाचे हित साधण्यासाठी बाबासाहेबानी तशी घटनात्मक तरतूद करुन देशावर उपकारच केले.
काय मिळवले, काय गमावले
खरी परिस्थीती काय आहे तर आजही दलित हा खूप मागासलेला आहे. आर्थीक परिस्थीती जेमतेम आहे. शिक्षणाचं महत्व नुकतच कळायला लागलं. पोरानी शिकावं हे आत्ता कुठे पालकांच्या लक्षात येतय. आरक्षणाने फक्त शिक्षण मिळतं इतर सगळ्या गोष्टी स्पर्धेनेच मिळविल्या जातात याचा नव्या पिढीला स्वानूभवातून साक्षात्कार  झाला. मागच्या दोन दशकात झपाट्याने वाढणारं खाजगी क्षेत्र व तिथल्या नौकरीच्या संध्या फक्त गुणवत्तेच्या बळावर मिळतात हे समजू लागलय. आत्ता कुठे गुलामी सोडून उभं राहण्याची तय्यारी करत होतो तोचं खाजगी क्षेत्राचं भूत बुद्ध म्हणून उभं ठाकलं. आता आम्हाला एकाच वेळी दोन आघाड्यावर लढायची वेळ आली. एकतर सामाजीक आघाताच्या दास्यातून स्वत:ची मुक्तता करणे, व दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्राच्या सैतानाशी दोन हात करणे. अजिबात खचून न जाता दोन्ही आघाड्यावर लढण्यास सिद्ध झालो हे सर्वात महत्वाचं. बघता बघता या दोन दशकात दलित मुलानी त्या दिशेनी पाऊल टाकायला सुरुवात केली. नुसतं आरक्षणावर अवलंबुन राहणारी आम्ही माणसं नाही हे सिद्ध करुन दाखविताना अनेक मल्टिनॅशनल कंपन्या पादाक्रांत करण्या पासून थेट अमेरीके पर्यंतची गरूड झेप घेऊन जगाला चकीत केलं. आज खाजगी क्षेत्रातील प्रत्येक मोठ्या कंपनीपासून लहानात लहान कंपनीत दलित मुलं आपली चुणूक दाखवित आहेत. आयटी सारखं बुद्धिमत्तेचं क्षेत्र असो, अटोमोबाईल सारखं कष्टाचं व जिकरीचं क्षेत्र असो वा बॅंकींग सारखं अत्यंत महत्वाचं क्षेत्र असो या सर्व खाजगी क्षेत्रात दलितांची दैदिप्यमान कारकिर्द सुरु झाली. आज आम्ही या विना-आरक्षीत क्षेत्रातही नविन अध्यायाला सुरुवात केली आहे. हे सर्व साध्य करताना आरक्षणाचा थेट संबंध नसला तरी या पदास सिद्ध होण्याच्या मुळाशी आरक्षणाची देण आहे.  
सरकार दरबारी मात्र आजही आरक्षण कोट्यातुन दलितांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तरी कित्येक शाळा व कॉलेजेस मधे दलितांच्या रिक्त जागा भरल्याच जात नाही. हा एक नवीन प्रकारचा जातीयवाद जन्मास आला आहे. कित्येक ठिकाणी तर कुठल्यातरी लोकल वृत्तपत्रात एक लहानशी नाममात्र जाहिरात दिली जाते, जी दलित लोकांच्या वाचन्यातच येत नाही. हा प्रकार मुद्दामहून केला जातो.   जाणीवपूर्वक अशी वृत्तपत्रं निवडली जातात त्यांचा खप अगदी जेमतेम असतो वा लोकं वाचत नाहीत अन नोकरीची जाहिरात दिली जाते. त्यामूळे नोकरीच्या जागांबद्दल दलिताना कळतच नाही.  अशा प्रकारे दलितांच्या जागांवर संस्थेच्या मर्जीतल्या लोकांची नियुक्ती केली जाते. हे सगळं दलिताना डावलण्याचं काम ब-याच संस्थांमधुन होत आहे. थोडक्यात आम्ही आरक्षणामूळे सावरतो ना सावरतो तोच अनेक अडचणी उभ्या ठाकल्या. जातीयवादाचे नवनवी प्रकार जन्मास आले, डावलण्याचे अनेक समिकरण तयार झाले. जागतीकीकरणाचं भूत भारतावर उभा ठाकला. दुहेरी लढा अनिवार्य झाला.  तरी सुद्धा अनेक  आघाड्यावर लढण्यास हा दलित समाज मोठ्या धैर्याने उतरला, अन एक एक टप्पा पादाक्रांत करत पुढे सरसावू लागला.
दलित उद्योजक
आज डिक्की नावाची संस्था दलित उदयोजकांची नवी फडी तयार करते आहे. याच वर्षी पुण्यात भरलेल्या दलित उद्योजकांच्या एक्स्पोला भरभरुन प्रतिसाद मिळाला. मी त्यावर मागे एक लेखही टाकाला होता म्हणून ईथे जास्त लिहत नाही.
बाबासाहेबानी संविधानात घटनात्मक तरतूद करताना अत्यंत जागरुकपणे लिहले आहे की, आरक्षण म्हणजे पुरेसं प्रतिनिधीत्व न मिळालेल्या समाजाला देण्यात येणारं हे प्रतिनिधित्व होय. आरक्षण म्हणजे राजकीय, सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात दिल्या गेलंला संविधानीक प्रतिनिधीत्व होय. हे प्रतिनिधित्व गरजेचं आहे का? होय आहे,कारण आम्हाला आजवर कुठे प्रतिनिधीत्व मिळालच नाही. त्यामूळे समाजीक असमतोल निर्मान झाला, देशाचं वाटोळं झालं. ज्या देशात गृह कलह असतो त्याचा विकास होत नाही.  हे टाळन्यासाठी त्या देशातील सर्व नागरीकाना समान प्रतिनिधीत्व मिळणे अनिवार्य असते. पण या देशातील व्यवस्था समान प्रतिनिधीत्व नाकारणारी होती. त्यामूळे विकास थांबला होता, एक गट विकसीत होत चालला होता तर दुसरा दुबळा होत चालला होता. या दुबळ्या गटाला संविधानिक, प्रतिनिधीत्व देऊन मुख्य प्रवाहात आणणे क्रमप्राप्त होते व त्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून वंचिताना प्रतिनिधीत्व बहाल करण्यात आलं.
आजून सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यास आरक्षण आमचं वॉकर आहे. जसं लहान बाळाला चालायचा निट सराव होईस्तोवर आपण त्याला वॉकरची मदत घ्यायला लावतो. त्या वॉकरच्या मदतीने तो चालायला शिकतो व एकदा पायात बळ आलं की ते मूल वॉकर टाकून स्वबळावर धावतं. आमचं अगदी तसच आहे, आम्ही कित्येक कारणामूळे चालणेच विसरुन गेलो होतो किंवा आम्हाला चालता येते हेच माहीत नव्हत. पण आरक्षण नावाच्या वॉकरच्या मदतीने आम्हाला प्रगतीच्या दिशेनी काही पाऊलं टाकायची संधी मिळाली. कित्येकजण त्या वॉकरच्या सहाय्याने चालायला शिकलेत व आज सुसाट धावत आहेत. म्हणून हा आरक्षणाचा वॉकर आम्हाला हवाच आहे. कित्येकाना आजून त्याच्या मदतीने उभं राहायचं आहे, कित्येकाना चालायला शिकायचं आहे. गतीची कास धरायची आहे. नवा इतिहास घडवायचा आहे. अन याचि सुरुवात होते आरक्षणापासून म्हणून त्याला कुबड्या हे नाव शोभणार नाही, ते आहे वॉकर.
आज या वॉकरमुळे दलितांचा विकास होताना दिसतोय, दलित बांधवात शैक्षणीक जागृती होते आहे. तसेच वॉकरच्या पुढची पायरी म्हणजे स्वत:च्या पायावर उभं राहुन चालणे. अन हे आम्हाला निट जमू लागलय.  पण आमच्या गतीने ज्यांच्या हृदयात धडकी भरली त्यानी धसका घेतलाय. हिनकस शेरे मारणे सुरु केले, मनाचं खच्चीकरण करणे सुरु केले. आरक्षणाच्या नावानी नुसत्या बोंबा सुरु झाल्यात. पण  त्यानी या वॉकरवर उगीच टिका टिप्पणी न करता सहकार्य न जमल्यास निदान विरोध तरी करुन नये व सामाजीक समतोल राखण्यास मुख्य भूमिका बजावणा-या आरक्षणाचं समर्थन करावं. प्रतिनिधित्व नाकारल्यामूळे पंगू झालेली अवाढव्य लोकसंख्या जोवर या देशात असेल तोवर विकास अशक्यप्राय आहे. देशाचा विकास साधावयाचा असल्यास वंचित वर्गाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याना आरक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विनाअट झाले पाहिजे. असे न केल्यास वंचित वर्गातील असंतोष कधीतरी बंड करुन उठेल, ईथे यादवी उसळेल. हे सर्व टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वंचिताना प्रतिनिधीत्व देऊन मुख्य प्रवाहाचा भाग बनविणे व देशाचं हित साधणे. या देशाच्या सार्वभौमत्वासाठी, आर्थिक प्राबल्यासाठी ईथला समाज सशक्त करणे अत्यावश्यक आहे व त्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरक्षण, ते असालयाच पाहिजे.
आरक्षण जिंदाबाद.

1 टिप्पणी:

  1. रामटेके साहेब "कितीही झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी ब्राह्मण श्रेष्ठ" असे एक वाक्य मी लहानपणी ऐकले होते.ते कितपत खरे आहे हे मला माहीत नाही.मी स्वतः कोकणस्थ ब्राह्मण असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा चाहता आहे. बाबासाहेबांनी त्या काळी- जेव्हा दलित समाजाला कोणी वाली नव्हता- अशा काळात दलितांसाठी जे काही केलं ते निव्वळ उल्लेखनीय असंच आहे यात वाद नाही. त्यांनी जी आरक्षणाची तरतूद भारतीय घटनेत केली, त्यामागे असा हेतू होता की वर्षानुवर्षे केवळ शूद्र म्हणून ज्यांना हिणवलं गेलं आणि त्यांना संधी नाकारण्यात आली,त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात येता यावं.पण दुर्दैवाने आज स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे होऊन गेली तरी ही आरक्षणाची मर्यादा अजूनही चालू आहे.एवढ्या वर्षात जर समजातील मागास घटकांचा विकास होऊ शकत नसेल तर ती सरकारची चूक आहे.त्यासाठी समाजातील इतर घटकांनी त्रास का सहन करायचा? निदान बाबासाहेबांना तरी हे अभिप्रेत नसेल की आरक्षणाची हि तरतूद वर्षानुवर्षे तशीच चालू राहावी.कारण मग दलितांचा विकास करण्याचा त्यांचा मूळ हेतूच बाजूला पडल्यासारखा होईल.किंबहुना २००४ साली सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देताना असे सांगितले होते की "जातवार आरक्षण आणि त्यावर आधारित फायदे मिळवण्यासाठी (का लाटण्यासाठी?) आपण अधिकाधिक मागासलेले कसे आहोत हे दाखवण्याची जी अहमहमिका आपल्या देशात सुरु असते ती जगातल्या दुसऱ्या कोणत्याच देशात आढळत नाही". य्हाच मुद्दा पुढे नेवून मला असा विचारायचं आहे की समजा एखादा मुलाने जातीचा आधार घेऊन कमी गुण असतानाही मेडीकलला प्रवेश घेतला आणि मग पुढे प्रत्येक ठिकाणी जातीचा फायदा घेत घेत तो डॉक्टर झाला.नंतर पेशंटवर उपचार करताना समजा त्याने चुकीची औषधे दिली (जातीचा फायदा आहे त्यामुळे कमी गुण असले तरी चालेल म्हणून जास्त अभ्यास करण्याची गरज नाही असा विचार करून) आणि तो पेशंट जर दगावला तर याला जबाबदार कोण? ही जातवार आरक्षणव्यवस्था, त्याचे समर्थक का आणखी कोणी? आरक्षणामुळे जातीभेद कमी होण्याऐवजी तो वाढत चाललाय आणि त्यामुळे वेगवेगळ्या जाती या एकमेकांपासून दुरावत चालल्या आहेत. त्यामुळे आरक्षण हे जातवार न देता ते आर्थिक निकषांवरच असायला हवं.

    तुम्ही वरती म्हटलंय की मराठा किंवा ब्राह्मण समाजात जे गरीब आहेत ते स्वतःच्या चुकीमुळे.पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. मराठा समाजाबद्दल मी बोलत नाही कारण मला त्याबद्दल पुरेशी माहिती नाही.पण गांधीहत्या झाल्यावर ब्राह्मण समाजावर प्रचंड प्रमाणात हल्ले झाले.अनेकांना आपलं मूळ गाव सोडून इतर ठिकाणी स्थायिक व्हावं लागलं. नव्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्यांनी कसेबसे स्वतःचे बस्तान बसवले.पण नंतर आरक्षणामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना संधी नाकारली गेली.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती ते परिस्थितीवर मात करू शकले पण सगळ्यांच्याच बाबतीत तसं झालं नाही.त्यामुळे त्यांच्या काही पिढ्या आजही गरिबीत दिवस काढत आहेत.सतत मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने त्यांच्यात एक असुरक्षिततेची भावना आहे.अशा काही लोकांसाठी "आर्थिक निकषांवर आरक्षण" हा नक्कीच एक आशेचा किरण ठरू शकेल. आणि हे जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल.

    प्रत्युत्तर द्याहटवा