सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

आरक्षण - नाण्याची दुसरी बाजु

मागच्या लेखात आरक्षणाचं समर्थन करणारा विचार मांडला, पण जसं प्रत्येक गोष्टिला दोन बाजु असतात तसं या आरक्षणालाही दुसरी बाजु आहे. आज आपण याची दुसरी बाजू बघुया.
बाबासाहेबानी आरक्षण लागु करण्याचं मुख्यं कारण होतं की आपल्या माणसाला विकासाची दारं मोकळी व्हावी. त्याला शिकता यावं, नौकरी करता यावी आणि समानतेचं जीवन जगता यावं. त्याच बरोबर देशाचाही विकास डोळ्यापुढे होताच. भारतातील बहुसंख्य लोकं दलित आहेत. या बहुसंख्य लोकांचा विकास घडवुन आणाल्यास देशातील एकुण सुशिक्षीत लोकांचा आकडा वाढेल. नुसतं आकडा वाढणार नाही तर याना रोजगाराच्या संध्या मिळतील. अशा प्रकारे या देशातील एक मोठा समाजा हळु हळु का होईना मुख्य प्रवाहात येईल. जेंव्हा दलित वर्गातील बहुसंख्य लोकं मुख्य प्रवाहाचा वाटा बनतील तेंव्हा त्याचा भारताच्या विकासावर सकारात्मक प्रभाव पडेल हे उघड होतं. पण आज तस होताना दिसत नाही हे खेदाने म्हणावे लागते.
वडिलोपर्जीत परंपरा
भारताला गालबोट लावणा-या इतिहासातील एकुण घटनांचा अभ्यास केल्यास त्यात सगळ्यात काळ्या कुट्ट रंगानी रंगलेली लाजीरवानी करणारी मान खाली घालायला लावणारी आणि गुणवत्तेला डावलणारी एक प्रथा दिसेल, ती म्हणजे वंशपरंपरा. हि वंशपरंपरा व घराणेशाहीनी भारताचा इतिहासतर मलिन केलाच पण वर्तमान सुद्धा बिघडविताना दिसते. पुजा-याचा मुलगा पुजारी व्हायचा आणि खरी पुजा-याची गुणवत्ता घेऊन जन्माला आलेल्या मुलाला त्या क्षेत्राचा विचार सुद्धा करता येत नव्हतं. लोहाराचा मुलगा लोहार, सोनाराचा मुलगा सोनार व राजाचा मुलगा राजा अशा प्रकार वंशपरंपरेनी या सगळ्या क्षेत्रात गुणवत्ता डावलुन वडिलांकडुन मुलाला संधी दिल्या जात असे. आज आरक्षणाचं पण तसच काहिसं होताना दिसतय.
आरक्षणाचा प्रमुख हेतु हा होता की दलितांच्या पुढच्या पिढीनी आरक्षणाचा फायदा घेऊन खुप शिकावं, संघटीत व्हावं आणि संघर्ष करावं. पण माझ्या समाजाला या आरक्षणाचा मुख्य हेतु समजलाच नाही. आम्ही आरक्षणाला अगदी वडिलोपर्जीत/वंशपरंपरागत संपत्तीसारखं वापरु लागलो. मी दलित म्हणुन जन्माला आलो म्हणजे माझं पहिलं काम असेल ते हे की मी आरक्षण घेणारचं (काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत). मी कितीतरी लोकाना व्यक्तीशा ओळखतो ज्याच्या वडीलानी आरक्षण घेऊन शिक्षण घेतलं व ते आज केंद्र सरकारमधे अधिकारी म्हणुन नौकरीला आहेत. त्यांच्या कडे भरपुर पैसा आडकातर आहेच पण त्यांची मुल सुद्धा हुशार आहेत. पण या महाशयाची मुलं अगदी शालेय शिक्षणात ईबीसी फॉर्म भरण्यापासुन इंजीनीअरिंग पर्यंत सगळ्याच ठिकाणी आरक्षण घेतलं. खरं तर त्यांच्या वडिलानी आरक्षण घेतलं, त्यांचं घरानं आज शैक्षणीक व आर्थिक दृष्ट्या सबळ झाल, आता त्यानी स्वेच्छेने हे आरक्षण नाकारल्यास त्याचा फायदा आमच्याच गरीब मुलाला झाला असता. ते पे शिटवर शिकण्याच्या लायकीचे आहेत आणि ही लायकीसुद्धा आरक्षणामुळेच आली. आरक्षणानी ज्याना आर्थिक सुबत्ता बहाल केली त्यानी या पुढे ती जागा दुस-या एक गरजुसाठी सोडावी आणि स्वत: पे-शिट किंवा पैशानी चांगली शिकवणी वगैरे लावुन स्वबळावर जागा मिळवायला आता हरकत नाही. आरक्षणानी आमचा विकास होणार हे जीतकं खर आहे तितकच एका सुखवस्तु कुटूंबाने गरजु कुटुंबासाठी हि जागा मोकळी करुन देणेही तेवढंच गरजेचं आहे. पण ईथे नेमकं उलट होत आहे. जस ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्याकडेच पैसा जोतो म्हणतात ना अगदी तसं चाललय.
ज्याचा बाप आधि आरक्षण घेऊन जरा पुढे आला, तो आपल्या मुलाला पैसे खर्च करुन चांगलं शिक्षण देतो, त्याला मार्कपण ब-यापैकी पडतात व उच्च शिक्षणाच्यावेळी मात्र आरक्षणाद्वारे प्रवेश घेतो. मग या ठिकाणी ज्याचा नंबर हुकतो तो इतर कुणी त्रेयस्थ नसुन आमचाच गरिब बांधव असतो. ह्या सगळ्य़ा प्रक्रियेचा अंतिम निकाल असा लागतो की जे विकसीत झालेत ते अधिक विकसित होत जातात व याच विकसीत लोकांद्वारे आपल्याच गरिब बांधवांच्या तोंडचा घास पळविल्या जातो. हे जर असच आजुन १०० वर्ष चालु राहिलं ना तर दलित समाजात आर्थिक व शैक्षणीक विषमतेची मोठी दरी निर्माण झालेली दिसेल. डॉक्टर, इंजीनिअर व प्राध्यापकांची पिढी विकास करत जाईल व गरिब लोकं आजुन गरिब होत जातील. बाबासाहेबाना आरक्षणापासुन चे साधायचं होतं ते केंव्हाच साधलं जाणार नाही.
आरक्षणाचं हस्तांतरण झालं पाहिजे.
आरक्षण आज ज्या प्रकारे वडिलोपर्जित संपत्ती म्हणुन वापरल्या जात आहे हे जर आजुन काही वर्ष असच चालल्यास याच आरक्षणामुळे दलितांमधे मोठी विषमता तयार व्हायला वेळ नाही लागणार. पुढच्या पिढीला विकासाकडे न नेता अंधाराच्या दिशेनी जाण्यासाठी हे आरक्षण कारणिभुत ठरेल. एकवेळ अशी येईल की एक गरिब दलित श्रीमंत दलिताला शत्रु मानु लागेल. आणि आरक्षणाच्या बडावर दोन पिढ्या आधी प्रगतीच्या वाटेवर पाऊल ठेवलेल्या तिस-या पिढितील दलित माणसाला गरिब दलित म्हणजे अकार्यक्षम, बुद्धिने कमी व कष्ट न केल्यामुळे मागे पडलेला एक तुच्छ माणुस असं वाटु लागेल. हा घोळ अगदी नजीकच्या काळात म्हणजे पुढच्या २०-२५ वर्षात बघायला मिळेल. ज्या आरक्षणाच्या आधारे बाबानी या समाजाला मुख्य प्रवाहात मिसळताना बघायची स्वप्ने पाहिलीत त्याच आरक्षणामुळे दलितांमधेच कमालीची आर्थिक व शैक्षणीक विषमता पाहायला मिळणार आहे. हे सगळं होणार आहे फक्त एक चुकीमुळे, आणि ती चुक म्हणजे सशक्त पिढीने अशक्त पिढीला आरक्षणाचं हस्तांतरण न केल्यामुळे.
म्हणुन ज्यांची एक पिढी स्वत:च्या पायावर उभी झाली, आर्थिक बळ आलं, आरक्षणाशिवायही शिक्षण व नौकरी मिळविण्याची कुवत आली त्यानी आरक्षण न घेण्याचं ठरवाव. ज्याच्याकडे सुबत्ता आली त्यानी आता मुख्य प्रवाहातील इतर लोकांप्रमाणे उपलब्ध साधनांचा अधिकाधिक वापर करुन स्वत:चा विकास करावा आणि ज्याच्याकडे साधनांच्या उपलब्धतेची कमतरता आहे त्याना ही सोय घेण्याची संधी दयावी. गौतम बुद्धांच बुद्ध धर्माबद्धल एक वाक्य आहे. बुद्ध धर्म म्हणजे नदी पार करण्यासाठी लागणारी नाव आहे. तीचा उपयोग तेवढ्यापुर्ताच करावा आणि ती नाव तिथेच सोडुन पुढे जावे. मला वाटतं आरक्षणाचं पण तसच आहे. बाबाना आरक्षणाबद्दल असच काहीतरी अपेक्षीत होतं. जीवनातील बेसिक गोष्टींसाठी झटाव्या लागणा-या समाजाला आरक्षणाची गरज आहे. पण ज्यांचं जीवनमान सुखवस्तु झालय त्यानी आरक्षण गरिब दलितांसाठी सोडावं. पण ईथे तसं होताना दिसत नाहिये.
या जीवनाची दारिद्रय नावाची नदी पार करायला जे दलित नदिच्या त्या तिरावर उभे आहेत त्यात कमजोर व सशक्त अशा दोन्ही वर्गातील दलित आहेत. ही आरक्षण नावाची नाव कमजोरांसाठी आहे, सशक्तानी स्वबळावर नदी पोहायला हवी. पण ईथे नेमक उलटं होताना दिसतय. सशक्त दलितानी आरक्षण नावाच्या होडीवर हक्क सांगितला व गरज नसताना ही सेवा उपभोगताहेत. बिचारे गरिब ज्याना या नावे शिवाय ती नदी पार करणे शक्यच नाही ते कायमचे नदीच्या त्या तिरावर स्थानबद्द झालेत. या सशक्त वर्गाने ती नाव न वापरता नदी पार करायचे ठरविले असते तर आज कितीतर दुर्बल गटातिल दलित आरक्षणाच्या सहाय्याने ती दारिद्र्याची नदी पार करुन सुबत्तेच्या किना-यावर पाय ठेवले असते. थोडक्यात सांगायचे म्हटल्यास प्रत्येक दलितानी विकासाचा एक ठराविक टप्पा गाठला की, मग इतर गोष्टी आरक्षणाशिवाय मिळवायला शिकायला हवे. त्याचे दोन फायदे होतील. एक तर त्या जागा आपल्याच कुठल्यातरी बांधवासाठी खुली होईल व दुसरे म्हणजे आपण स्वतंत्ररित्या स्वबळावर हे सगळ मिळविल्याने खरच मुख्य प्रवाहाचा हिस्सा होता येईल.
मुख्य प्रवाहात आमचं स्थान:
आज मुख्य प्रवाहात आमच्याकडे तुच्छ नजरेनी बघतले जाते. मी माझच उदा. सांगतो मी खर तर त्या क्षेत्रात काम करतोय जिथे आरक्षणाचा काहीच संबंधच नाही. मी खाजगी क्षेत्रात संगणक (सोफ्टवेअर) कंपनीत  काम करतो ईथे नौकरी देताना फक्त आणि फक्त गुणवत्ताच पाहिली जाते. तरी जेंव्हा माझ्या सहका-याना कळते की मी दलीत समाजातील आहे तेंव्हा ते नाकं मुरडताना दिसतात. मी विचारल्यावर त्यांचं म्हणंन असतं की तुम्ही ईथे येताना भलेही आरक्षण घेतलं नसेल पण शिकताना तर आरक्षण घेताच ना. म्हणजे ईथे येण्याच्या एकंदरित प्रक्रियेतील सुरुवातीच्या काही टप्प्यात तर तुम्ही आरक्षण घेऊनच ईथवर आलात. तेंव्हा मात्र माझं यावर ठरलेलं उत्तर असतं.
आई वडिलांचं बोट धरुन उभं राहायला शिकलेलं मुल व पायाला आजार झाल्यामुळे डॉक्टरांच्या उपचाराने उभं राहायला शिकलेलं मुल यातील दोघांच्या उभं राहण्याच्या प्रक्रियेत जरी भिन्नता असली तरी शेवटी रेसच्या मैदानात पदक पटकविताना धावपट्टीवर फक्त गतीमान प्रदर्शन महत्वाचे. तसेच मी कुठला उपचार घेऊन आलो या पेक्षा या शर्यतीच्या धावपट्टीवर मी माझी गती सिद्ध केली हे महत्वाचं, मग माझ्या उभं राहण्याच्या प्रक्रियेत काय उपचार झाले ते महत्वाच नाही.
आपल्याला दोन आघाड्या उघडुन या मुख्य प्रवाहात घुसायचे आहे. एक आरक्षणाच्या मदतीने विकास साधत पुढे येणारी आघाडी व दुसरी थेट स्वबळावर ईथे मुसंडी मारणारी आघाडी. त्यामुळे मुख्य प्रवाहातील आपली एकुण संख्या वाढेल. मुख्य प्रवाहात आपल्या लोकांची जसजशी संख्या वाढेल तसं विकासाची बरीच दारं आपल्यासाठी मोकळी होतील.  
आजच्या घटकेला आपल्यापैकी बरिच लोकं मुख्य प्रवाहात शामिल आहेत पण ते वरवर दिसण्यापुर्ती. ज्यांना आधि संधि मिळाली, विकास झाला त्यातलीं कित्येल लोकं समाजाशी संबंध सोडुन मुख्य प्रवाहाच्या फसव्या सामिलिकरणात उर्मीनी जगतात. पण जेंव्हा पोरा बाळांच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा हया मुख्य प्रवाहातिल कुणीच आपल्याला मुलगी देणार नाही किंवा मुलीला स्थळ मिळणार नाही याची प्रचिती येताच खाडकन झोप उडते व हि लोकं या २० वर्षाच्या समाजत्यागा नंतर परत एकदा स्वार्थापायी आपल्या समाज बांधवांना शोधत येतात. आम्ही वरवर कितीही म्ह्टलं तरी आजुन जातपात मुळीच म्हणजे मुळीच गेलेला नाहिये. फक्त प्रोफेशनल लेवलवर आम्ही एकत्र येतो म्हणुन उगीच तसं जाणवु लागलं. पण जेंव्हा मुला-मुलींच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा कळतं की हि जी नाती आज पर्यंत जोपासलीत ती जातिपातीचे बंध सांभाळूनच जोपासलित. या सगळ्या नात्याना व्यवहारिक टच होता व त्याच धर्तिवर ती नाती उभी होती. माणुस म्हणुन आपण एकदुस-याना स्विकारले नव्हतेच. आपण एक शेजारी म्हणुन स्विकारले होते, कार्यालयातील सहकारी म्हणुन स्विकारले होते. शेजारी व सहकारी म्हणुन स्विकारने काळानुरुप गरजेचेही होते. पण माझ्या बरोबरिचा माणुस म्हणुन आपण केंव्हाच एक दुस-याला स्विकारलेलं नव्हतं. तर हे आहे आमचं मुख्य प्रवाहातिल स्थान.
म्हणुन आता मुख्य प्रवाहात मुसंडी मारायची तर दोन आघाड्या उघडुन. पण हे होईल की नाही शंकाच येते.

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

मराठीत वेबसाईट बनवा फक्त १०,०००/- रुपयात.

खरतर बरहा वापरायला लागल्यापासुन मला मराठीत लिहण्याचा सराव तर झालाच पण आता वाचताना सुद्धा अमराठी साईट नकोशी होते. या आधी एखादी माहीती आंतरजालावर शोधायची म्ह्टल्यास ती फक्त इंग्रजीतच उपलब्ध असे व माझ्यासारख्या कुडकेल्लीच्या रानातुन मराठी माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या व इंग्रजीत कसंबसं पास झालेल्या माणसाला ती माहिती अर्धवटच समजत असे. पण एवढ्या एक दोन वर्षात मात्र मराठीतील संकेस्थळांवर जवळपास हवी असलेली सगळी माहीती उपलब्ध आहे.
आज प्रबोधनकारांच्या संकेतस्थळावर फिरताना www.marathiwebsites.com  हे संकेतस्थळ दिसलं. तिथे जाऊन सविस्तर वाचल्यावर मनातुन आनंद झाला. लगेच दिलेल्या नंबरवर फोन लावला. प्रसाद शिरगावकरांशी बोलणं झालं. त्यानी सांगितल्याप्रमाणे साधारण एक साईट बनविण्याचा खर्च ९,०००/-  ते १०,०००/- रुपये एवढा येतो. मी या आधी वेबसाईट बनवायची म्हणुन ब-याच लोकांकडे विचारना केली तेंव्हा त्यांच्या विक्रीअधिका-यानी स्टॅटिक पेज, डायनामिक पेज व डेटाबेस असे बरेच गोंधळघालणारे प्रकार सांगुन मला झेपणार नाही एवढा आकडा सांगितला. त्या नंतर मी स्वत:चं संकेतस्थळ बनवुन घेण्याचं स्वप्नच डोक्यातुन काढुन टाकला. आज प्रसादशी बोलताना त्यानी वरिल पेजेसबद्दल काहीच सांगितलं नाही. मग मी स्वत:हुन त्याला विचारलं, तेंव्हा तो म्हणाला की, ते Content Management System मधे साईट तयार करतात. सगळेच पेज डायनामिक असतात. आपल्याला हवं तेंव्हा, हवी तशी माहिती अपडेट करता येते. आणि हे सगळं मिळणार आहे फक्त ९ ते १० हजारात.
चला, तर आता परत एकदा विचार करायला हरकत नाही.
धन्यवाद प्रसाद

मराठी वेबसाईट्स
प्रसाद शिरगावकर : 9850 828291 
किंवा
info @ marathiwebsites.com