सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

६ डिसेंबर - सोहळा कृतज्ञतेचा

६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन, आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकराना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. आज देशाच्या कानाकोप-यातुन चैत्यभुमीत लोकांचा जनसागर उसडलेला असतो. लोकं आपापल्या संस्कारानुसार तिथे भावना व्यक्त करताना दिसतात. अगदी जे बाबासाहेबाना अभिप्रेत होतं तसच जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे, बाबांच्या शब्दात बोलायचं म्हटल्यास मला भक्त नकोत, अनुयायी हवेत या सचोटित तंतोतंत फिट्ट बसणारे अनुयायांपासुन ते महाराष्ट्राच्या कुठल्यातरी लहानशा खेड्यातुन मुंबईला ६ डिसेंबरसाठी चैत्यभुमीत हजेरी लावण्यासाठी निघताना गावाची वेस ओलांडेस्तोवर चार वेळा गाव देवीला नमस्कार करुन प्रवास सुखाचा होवो अशी विनवनी करणारा. किंवा घाटामधे बसचा तोल जाताच विठ्ठला वाचव रे बाबा! मी भिमाच्या चैत्यभुमीला निघालोय, मला सुखरुप घरी पोहचविण्याची जबाबदरी तुझीच आता! असं म्हणुण विठोबाचं नाव घेणारे असे कितीतरी विविध संस्काराचा प्रभाव असणारे लोकं आज मुंबईत मात्र बाबांच्या पुण्यतिथीला एकाच उद्देशानी जमलेली दिसतात, ते म्हणजे बाबांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
समाजातिल विविध स्तरातुन आज लाखोनी ईथे हजेरी लावणारी लोकं म्हणजे कित्येकाना वाटतं हे दलितांचं शक्तिप्रदर्शन होय. पण ते तसं मुळीच नाहिये. (काही नालायक राजकारण्यांमुळे ते तसं वाटु लागलं हे आपलं दुर्दैव) हा कसल्याच प्रकारचा शक्तीप्रदर्शनाचा किंवा इतर कुठल्या प्रदर्शनाचा प्रकार नाही, हा शुद्ध सोहळा आहे लोकांच्या भावना प्रकटीकरणाचा, बाबासाहेबांचे आभार मानन्याचा, कृतज्ञतेचा. जनावरापेक्षाही वाईट जीवन जगणा-या लाखो लोकांच्या जीवनाला कलाटनी देणा-या महापुरुषाचे आभार मानन्यासाठी येणारं हे जनसागर शक्तिप्रदर्शनाचं प्रतीक नक्कीच नाही. ईथे येणा-या कित्येकाना त्यांच्या रोजच्या जीवनात बाबानी सांगितलेला धम्म आचरणात आणता येत नसेलही, किंवा कित्येकाना त्या धर्माचं ज्ञानही नसेल, कित्येकानी ज्ञान असुन टाळाटाळ केली असेल किंवा कित्येकांचा अगदीच या सगळ्या धर्मभिर्म गोष्टी पासुन दुर दुरचा संबंधही नसेल. पण ईथे येणा-या प्रत्येक माणसात एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे या सगळ्यांच्या मनात बाबासाहेबांचं स्थान, आदर सर्वोच्च आहे. त्यांच्या जीवनात या महापुरुषाची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. बाबासाहेब म्हणजे वन एन्ड ओन्ली, तुलनेच्या पलिकडचं व्यक्तिमत्व. चैत्यभुमीवर फिरणारा प्रत्येक व्यक्ती हा बाबासाहेबांच्या विचारानी काहीप्रंमाणात का असेना, पण प्रभावीत झालेला असतोच. त्याला इतर वेळेस किंवा दैनंदीन व्यवहारात ते विचार प्रकट करायला मिळतात की नाही ही गोष्ट ब-याच ईतर घट्कांच्या प्रभावांवर अवलंबुन असते पण ईथे मात्र त्याला तो सगळा ताण झटकुन काही तास बाबांचा अनुयायी म्हणुन मुक्त संचार करता येतो. हा सोहळा अशा लोकांसाठी कृतज्ञतेच्या पुढे जातो व अनुयायी म्हणुन मिरविण्याचा सोहळा बनतो.
ईथे लोकं रडायला किंवा पिंड दान करायला जमलेली नसतात. लोकं जमलेली असतात ते बाबांचे आभार मानायला, हा समाज त्यांचा ऋणी आहे हे दाखवायला, आम्हाला जाण आहे तुमच्या त्यागाची, आम्हाला जाण आहे तुम्ही लढलेल्या लढ्याची, आम्हाला भान आहे तुमच्याशी एकनिष्ठ राहण्याची. आमची एकनिष्ठता काही पॅरामिटर्सवर तपासताना दिसुन पडत नसेलही, तरी आम्ही आमच्या परिने तुमचे ऋणी आहोत हे दाखविण्याचा तो दिवस म्हणजे ६ डिसेंबर. आमच्या रोजच्या जीवनात आम्ही जे काही जगतो त्यावर भलेही इतर धर्माचा/संस्काराचा पगडा जाणवत असला तरी तो आमचा नाईलाज आहे. आम्ही जिथे राहतो तिथे बहुसंख्य समाज बौद्धेत्तर असल्याने व तिथे जगताना आमच्यात तो प्रभाव झटकुन टाकण्याचं बळ नसल्याने त्या सकट जगतो, एवढेच! जरी आम्ही तुमच्या अपेक्षाना काही प्रमाणात तळा देणारा वर्ग वाटत असलो तरी तो आमच्या मजबुरीचा भाग आहे. किमान आमची, ही पिढीतरी तशीच जगेल त्या बद्दल क्षमा करा. आमची पुढची पिढी तुमच्या मार्गावर चालणारी असावी असा सदैव प्रयत्न असतो, त्यातही ब-याच अडचणी येतात. वेळ प्रसंगी आम्ही ब-याच आघाडयांवर पिछेहाट स्विकारतो. पण त्याही परिस्थीतीत आम्ही तुमच्याशी कृतज्ञ आहोत हे दाखवायचा हा दिवस मात्र न चुकवता ईथे जातीने हजेरी लावतो. अशा अर्थाच्या भावना कित्येकाच्या नजरेत दिसत असतात.
आजच एका वृत्तपत्रात वाचलं की चैत्यभुमी तिर्थक्षेत्राच्या दिशेनी जातेय. पण माझ्या मते तसं केंव्हाच होणार नाही. हा सोहळा साजरा करण्याची पद्धतच आगळी आहे. एरवी कुठल्याच दुकानात न मिळणारी पुस्तकं किंवा समाज प्रबोधन करणारं साहित्य ईथे मोठ्या प्रमाणात विकल्या जातं. ईथे येणा-या लोकांची संख्या व विकलेल्या एकुण पुस्तकांची संख्या लक्षात घेता ६ डिसेंबरला चैत्यभुमीत येणा-या प्रत्येक दोन माणसामागे एक पुस्तक विकल्याचा आकडा आहे. हि पुस्तकं दलितांच्या घरोघरी पोहचल्यावर जो प्रभाव दाखवायला पाहिजे तो दाखवितच आहेत. परिणाम १००% येत नसला तरी येतो आहे हे महत्वाचं. बाबासाहेबांचे विचार घरो घरी पोहचविण्याचं काम चैत्यभुमीतं विकल्या जाणा-या पुस्तकांच्या माध्यमातुन होताना दिसतय. तर ईथे हा सोहळा कृतज्ञतेच्या पुढे जातो आणि तो बनतो सोहळा पुस्तक रुपातुन बाबांचे विचार तळागळात नेण्याचा. आणि जिथे जिथे बाबासाहेबांचे विचार पोहचले तिथे तिथे क्रांती घडुन येते. जिथे वैचारिक क्रांती आहे तिथे तिर्थक्षेत्राना थारा नाही हे वेगळं सांगायची गरजच नाही. ६ डिसेंबर म्हणजे असा हा आमचा सोहळा कृतज्ञतेचा.
 कोटी कोटी उद्धारली कुळे, भिमा तुझ्या मुळे.

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

त्रिपिटकाचं शुद्धिकरण

भगवान बुद्धांचा बुद्ध धम्म या मातितील व मुळ भारतिय धम्म आहे. जो पुर्णत: सम्यकतेचं समर्थन करणारं आणि निरिश्वरवादी आहे. पुढे बाबासाहेबानी सुद्धा हा धम्म दलितांच्या उद्धाराचा एकमवे धार्मिक पर्याय म्हणुन निवडला आणि आज भारताच्या कानाकोप-यात अगदी खेडयापाडयात पोहचलाय. खरं तर दोन हजार वर्षापुर्वी सुद्धा हा धर्म भारताच्या कानाकोप-यात पोहचलेला होताच पण नंतर काही कारणास्तव हा धर्म भारतातुन हद्दपार झाला. बाबासाहेबानी या धम्माला भारतात पुनरुज्जीवित करुन आमच्या पुढे एक जगण्याची आदर्श पद्धती उपलब्ध करुन दिली त्या बद्दल त्यांचे आभार. पण या धम्माच मूळ धर्मग्रंथ त्रिपिटक वाचल्यावर काही प्रश्न उपस्थीत होतात. ते असे... 
बुद्ध धम्म पुर्णत: निरिश्वरवादी आहे का?  
:- याचं उत्तर मिळतं नाही(त्रिपिटकाच्या आधारे). 
या धम्मात पुनरजन्माला मान्यता आहे का? 
:- होय... त्रिपिटका प्रमाणे आहे. 
त्रिपिटकात अनेक ठिकानी तसे लिहलेले आहे. आणि त्रिपिटक हा बुद्ध धर्माचा मुख्य ग्रंथ असल्यामुळे या गोष्टिला खुप महत्व प्राप्त होतं आणि ईथुनच सगळी गोची होतात. पुनर्जन्मामुळे ईथे अनेक प्रश्न निर्माण होतात. पुनर्जन्माला मान्यता देताना बुद्धानी कुठेच हे स्पष्ट केलेलं नाही की त्याची प्रोसेस काय आहे? किंवा पुनर्जन्म होतो म्हणजे नेमकं कोणाचं होतं? आत्म्याचं की मनाचं की आजुन कोणाचं?  हा सर्व घोळ होतो त्रिपिटक वाचल्यावर लक्षात येतो. मनाचं व बुद्धिचं समाधान होत नाही. हा सगळा घोळ पाहता एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे त्रिपिटकात भरपूर विपर्यास झालेला आहे. त्यामुळे बौद्ध धम्माचं वाचन केल्यास त्रिपिटकात प्रचंड विसंगती सापडते नि बौद्धिक समाधान होत नाही. बुद्ध धर्मात भगवंतानी आत्मा साफ नकारला आहे. म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचं होतं नाही हे स्पष्ट आहे. पण पुनर्जन्म मात्र होतो, मग तो होतो कुणाचा हे सांगितले नाही. संपुर्ण त्रिपिटकात कुठेच  या संबंधित खुलासा केलेला नाही. मी या विषयावर ब-याच धम्म अभ्यासकाना विचारणा केली. माझ्या वाचण्यातुन तो उतारा सुटलेला असु शकतो हे मी गृहीत धरुन ब-याच धम्मचा-यांजवळ या बद्दल चौकशी केल्यावर वेगवेगळी उत्तरं मिळाली. काहिनी मिलिंद प्रश्न वाचण्याचा सल्ला दिला. काहीनी पुनर्जन्म म्हणजे अगदी हिंदु धर्माच्या पुनर्जन्मासारखं नसुन ते बुद्धानी मनाच्य अवस्थांबद्दल सांगितलय असं म्हटलं. पण मनाच्या अवस्था आणि पुनर्जन्म या दोन गोष्टी एकच नसुन भिन्न असल्याचं त्रिपिटकात स्पष्ट लिहलं आहे. मग मी मिलिंद प्रश्न वाचुन काढला. तिथे तर सुरुवातिलाच दिलं आहे की, राजा मिलंद व नागसेन हे आधल्या जन्मापासुनचे परस्पर संबंधातुन या जन्मी आलेत.  आधल्या जन्माचा या जन्मात कसा संबंध आहे याची ईत्थ्यंभुत माहीती अगदी सुरुवातीलाच दिली आहे. म्हणजे पुनर्जन्मानी मिलिंद प्रश्नात अगदी सुरुवातीलाच घोळ घातला. परत मला दुसरे सदर्भ शोधावे लागले.
बुद्ध धर्मात देवांचं अस्तित्व (त्रिपिटका प्रमाणे) सुद्धा आहे, आकाशातुन फुलांचा वर्षाव करणारे देव काय, तर बुद्धाना तपस्याच्या ठिकाणी येऊन नमस्कार करणारे देव काय. अशा वेगवेगळ्या देवांचं अस्तित्वसुद्धा बुद्ध धर्मातील धर्मग्रंथात मिळतो.
आता काही संदर्भ पाहुया.
संदर्भ: त्रिपिटक या मुख्य बुद्ध ग्रंथातिल सुत्तपिटक मधिल काही उदाहरण खाली देतोय
१) अंगुत्तर निकाय, एक्क-निपात: एकदत्त वग्ग
याच्यात भगवान बुद्ध म्हणतात. भद्राकापिलायनी (एक बुद्ध भिक्षुणी) ही पुनर्जन्माची अनुस्मृती करण्यामधे अग्र आहे.

२) खुद्दकनिकाय, मेत्तसुत्त मधे भगवान बुद्ध म्हणतात. मी एक वेळा महाब्रह्मा आणी ३६ वेळा देवराज इंद्रच्या रुपात शक्र बनलो आहे. शेकडोवेळा चक्रवती बनलो आहे.
३) खुद्दकनिकाय, जरा वग्ग: यात बुद्ध म्हणतात. मी अनेक जन्म घेतले आहेत.
४) पठमपीठ विमानवत्थु, इत्थिविमान: मधे मोग्गलायन देविला प्रश्न विचारतो तेंव्हा पुनरजन्माचं फळ म्हणुन आज तेजोनीधी देवी झाल्याचा दाखला आहे.
५) गौतम बुद्ध जेंव्हा शेवटच्या घटीका मोजत असतात तेंव्हा ते स्वत: म्हणतात की मी एके जन्मी या लहानशा नगराचा राजा होतो म्हणुन मला आज ईथे देह ठेवायचे आहे.
६)मुचलिन्द वग्ग: नागाचा चमत्कार, बुद्धत्व प्राप्त होते तेंव्हा ब्रम्हाची भेट.
बुद्ध धर्म असा धर्म आहे जो पुनरजन्म मानतो पण आत्मा मानत नाही. पुनर्जन्माची प्रोसेस मात्र उलगडता ना आल्याने ब-याच गोष्टी तर्कावर सुटत नाहित.  देव मात्र बुद्ध धर्मात आहेत, चमत्कार आहेत, पाप पुण्य सुद्धा आहे.  कर्माचं फळ पुनर्जन्मावर प्रभाव टाकतो हे ही आहे. एकंदरित हिंदु धर्मातील यज्ञ सोडल्यास सगळच बुद्ध धर्मात आहे. हा झाला त्रिपिटका प्रमाणे उपलब्ध बौद्ध धम्म.
-----------------------------------------------

वरील बाबी बौद्ध बांधवाना बुचकळ्यात टाकणा-या आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. बाबासाहेबानी वरील सर्व प्रश्न निकाली काढले आहेत. त्रिपिटक वाचल्यावर मनाची त्रेधा उडाणार व आज ना उद्या आंबेडकरी समाज सवाल खडा करणार हे जाणून बाबासाहेबानी आधीच सोय केली आहे. वरील सर्व प्रश्नाना उत्तर देणारं, अत्यंत महत्वाचं ग्रंथ बाबासाहेबानी लिहून काढला आहे. त्रिपिटकातील विपर्यस्त सर्व लिखान काढून फेकण्याचं पवित्र काम बाबासाहेबानी केलं. बौद्ध धम्माच्या पतनानंतर घुसडलेले सर्व लिखान बाबासाहेबानी बाद ठरविलं अन त्रिपिटकाला चाळणी लावून एक नवीन ग्रंथ लिहून काढला त्या ग्रंथाचं नाव आहे The Bhuddha & His Dhamma. या ग्रंथात बाबासाहेबानी प्रत्येक गोष्टीला बुद्धीच्या कसोटीवर तपासून अगदी शुद्ध रुपात मांडलं आहे.
या ग्रंथात पान नं. २९० (लाईन नं. ७) मध्ये बाबासाहेब आत्म्याचं पुनर्जन्म नाकारतात व घटक पदार्थ म्हणजेच अ) पृथ्वी आ) आव इ) तेज ई) वायू यांचं विघटन व पुनर्बांधनीच विश्लेषण देऊन पुनर्जन्माचा प्रश्न निकाली काढतात.
या ग्रंथात पान नं. २१५ (लाईन नं. ५२) मधे बाबसाहेब मोक्ष नकारतात. या पानावर बाबासाहेबानी मोक्ष नाकारताना निब्बाण सांगितला. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन होय असे बाबासाहेबानी विशद केले.  पान नं. २३५ (लाईन नं. ३३) मधे आत्मा व ईश्वर दोघानाही नाकारले. पान नं. २४१ मधे सर्व पानभर विश्लेषण दिले आहे की काल्पनिक अनुमानाना धम्मात स्थान नाही
अशा प्रकारे बाबासाहेब त्रिपिटकाचं शुद्धिकरण करतात व नवीन ग्रंथ लिहून काढतात. त्या ग्रंथाचं नाव आहे The Buddha & His Dhamma. ज्याना कुणाला त्रिपटक वाचून अनेक प्रश्न पडले असतील. बुद्धाच्या मूळ सिद्धांताशी मेळ खाणारे तत्व वा परस्पर विरोधी वाक्यं दिसली असतील त्यानी बाबासाहेबांचं वरील ग्रंथ नक्की वाचावं.

जयभीम.
***