सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

६ डिसेंबर - सोहळा कृतज्ञतेचा

६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन, आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकराना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. आज देशाच्या कानाकोप-यातुन चैत्यभुमीत लोकांचा जनसागर उसडलेला असतो. लोकं आपापल्या संस्कारानुसार तिथे भावना व्यक्त करताना दिसतात. अगदी जे बाबासाहेबाना अभिप्रेत होतं तसच जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे, बाबांच्या शब्दात बोलायचं म्हटल्यास मला भक्त नकोत, अनुयायी हवेत या सचोटित तंतोतंत फिट्ट बसणारे अनुयायांपासुन ते महाराष्ट्राच्या कुठल्यातरी लहानशा खेड्यातुन मुंबईला ६ डिसेंबरसाठी चैत्यभुमीत हजेरी लावण्यासाठी निघताना गावाची वेस ओलांडेस्तोवर चार वेळा गाव देवीला नमस्कार करुन प्रवास सुखाचा होवो अशी विनवनी करणारा. किंवा घाटामधे बसचा तोल जाताच विठ्ठला वाचव रे बाबा! मी भिमाच्या चैत्यभुमीला निघालोय, मला सुखरुप घरी पोहचविण्याची जबाबदरी तुझीच आता! असं म्हणुण विठोबाचं नाव घेणारे असे कितीतरी विविध संस्काराचा प्रभाव असणारे लोकं आज मुंबईत मात्र बाबांच्या पुण्यतिथीला एकाच उद्देशानी जमलेली दिसतात, ते म्हणजे बाबांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
समाजातिल विविध स्तरातुन आज लाखोनी ईथे हजेरी लावणारी लोकं म्हणजे कित्येकाना वाटतं हे दलितांचं शक्तिप्रदर्शन होय. पण ते तसं मुळीच नाहिये. (काही नालायक राजकारण्यांमुळे ते तसं वाटु लागलं हे आपलं दुर्दैव) हा कसल्याच प्रकारचा शक्तीप्रदर्शनाचा किंवा इतर कुठल्या प्रदर्शनाचा प्रकार नाही, हा शुद्ध सोहळा आहे लोकांच्या भावना प्रकटीकरणाचा, बाबासाहेबांचे आभार मानन्याचा, कृतज्ञतेचा. जनावरापेक्षाही वाईट जीवन जगणा-या लाखो लोकांच्या जीवनाला कलाटनी देणा-या महापुरुषाचे आभार मानन्यासाठी येणारं हे जनसागर शक्तिप्रदर्शनाचं प्रतीक नक्कीच नाही. ईथे येणा-या कित्येकाना त्यांच्या रोजच्या जीवनात बाबानी सांगितलेला धम्म आचरणात आणता येत नसेलही, किंवा कित्येकाना त्या धर्माचं ज्ञानही नसेल, कित्येकानी ज्ञान असुन टाळाटाळ केली असेल किंवा कित्येकांचा अगदीच या सगळ्या धर्मभिर्म गोष्टी पासुन दुर दुरचा संबंधही नसेल. पण ईथे येणा-या प्रत्येक माणसात एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे या सगळ्यांच्या मनात बाबासाहेबांचं स्थान, आदर सर्वोच्च आहे. त्यांच्या जीवनात या महापुरुषाची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. बाबासाहेब म्हणजे वन एन्ड ओन्ली, तुलनेच्या पलिकडचं व्यक्तिमत्व. चैत्यभुमीवर फिरणारा प्रत्येक व्यक्ती हा बाबासाहेबांच्या विचारानी काहीप्रंमाणात का असेना, पण प्रभावीत झालेला असतोच. त्याला इतर वेळेस किंवा दैनंदीन व्यवहारात ते विचार प्रकट करायला मिळतात की नाही ही गोष्ट ब-याच ईतर घट्कांच्या प्रभावांवर अवलंबुन असते पण ईथे मात्र त्याला तो सगळा ताण झटकुन काही तास बाबांचा अनुयायी म्हणुन मुक्त संचार करता येतो. हा सोहळा अशा लोकांसाठी कृतज्ञतेच्या पुढे जातो व अनुयायी म्हणुन मिरविण्याचा सोहळा बनतो.
ईथे लोकं रडायला किंवा पिंड दान करायला जमलेली नसतात. लोकं जमलेली असतात ते बाबांचे आभार मानायला, हा समाज त्यांचा ऋणी आहे हे दाखवायला, आम्हाला जाण आहे तुमच्या त्यागाची, आम्हाला जाण आहे तुम्ही लढलेल्या लढ्याची, आम्हाला भान आहे तुमच्याशी एकनिष्ठ राहण्याची. आमची एकनिष्ठता काही पॅरामिटर्सवर तपासताना दिसुन पडत नसेलही, तरी आम्ही आमच्या परिने तुमचे ऋणी आहोत हे दाखविण्याचा तो दिवस म्हणजे ६ डिसेंबर. आमच्या रोजच्या जीवनात आम्ही जे काही जगतो त्यावर भलेही इतर धर्माचा/संस्काराचा पगडा जाणवत असला तरी तो आमचा नाईलाज आहे. आम्ही जिथे राहतो तिथे बहुसंख्य समाज बौद्धेत्तर असल्याने व तिथे जगताना आमच्यात तो प्रभाव झटकुन टाकण्याचं बळ नसल्याने त्या सकट जगतो, एवढेच! जरी आम्ही तुमच्या अपेक्षाना काही प्रमाणात तळा देणारा वर्ग वाटत असलो तरी तो आमच्या मजबुरीचा भाग आहे. किमान आमची, ही पिढीतरी तशीच जगेल त्या बद्दल क्षमा करा. आमची पुढची पिढी तुमच्या मार्गावर चालणारी असावी असा सदैव प्रयत्न असतो, त्यातही ब-याच अडचणी येतात. वेळ प्रसंगी आम्ही ब-याच आघाडयांवर पिछेहाट स्विकारतो. पण त्याही परिस्थीतीत आम्ही तुमच्याशी कृतज्ञ आहोत हे दाखवायचा हा दिवस मात्र न चुकवता ईथे जातीने हजेरी लावतो. अशा अर्थाच्या भावना कित्येकाच्या नजरेत दिसत असतात.
आजच एका वृत्तपत्रात वाचलं की चैत्यभुमी तिर्थक्षेत्राच्या दिशेनी जातेय. पण माझ्या मते तसं केंव्हाच होणार नाही. हा सोहळा साजरा करण्याची पद्धतच आगळी आहे. एरवी कुठल्याच दुकानात न मिळणारी पुस्तकं किंवा समाज प्रबोधन करणारं साहित्य ईथे मोठ्या प्रमाणात विकल्या जातं. ईथे येणा-या लोकांची संख्या व विकलेल्या एकुण पुस्तकांची संख्या लक्षात घेता ६ डिसेंबरला चैत्यभुमीत येणा-या प्रत्येक दोन माणसामागे एक पुस्तक विकल्याचा आकडा आहे. हि पुस्तकं दलितांच्या घरोघरी पोहचल्यावर जो प्रभाव दाखवायला पाहिजे तो दाखवितच आहेत. परिणाम १००% येत नसला तरी येतो आहे हे महत्वाचं. बाबासाहेबांचे विचार घरो घरी पोहचविण्याचं काम चैत्यभुमीतं विकल्या जाणा-या पुस्तकांच्या माध्यमातुन होताना दिसतय. तर ईथे हा सोहळा कृतज्ञतेच्या पुढे जातो आणि तो बनतो सोहळा पुस्तक रुपातुन बाबांचे विचार तळागळात नेण्याचा. आणि जिथे जिथे बाबासाहेबांचे विचार पोहचले तिथे तिथे क्रांती घडुन येते. जिथे वैचारिक क्रांती आहे तिथे तिर्थक्षेत्राना थारा नाही हे वेगळं सांगायची गरजच नाही. ६ डिसेंबर म्हणजे असा हा आमचा सोहळा कृतज्ञतेचा.
 कोटी कोटी उद्धारली कुळे, भिमा तुझ्या मुळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा