शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

पुस्तक परिक्षण:- महार कोण होते? उदगम, संक्रमण, झेप


महार समाजाचा तेजस्वी इतिहास यथावत मांडणारा शोधग्रंथ प्रसिद्ध लेखक व माझे मित्र संजय सोनवणी साहेबानी लिहला असून तो उद्या प्रकाशित होत आहे. या ग्रंथाचे नाव आहे “महार कोण होते, उदगम, संक्रमण, झेप”. आता पर्यंत अनेकानी महार समाजावर संशोधन केले. पण हे सर्व संशोधन महारांचा गौरवशाली इतिहास सांगण्यात तोकडे पडायचे.  अनेकांच्या व्याख्या, शब्दव्युत्पत्ती तर अयशस्वी खटाटोप सदरात मोडणा-या आहेत. महार समाज या मातीतला एक प्रमूख, प्रबळ नि शूर समाज होता हे सर्वाना मान्य होते पण संशोधनाच्या अभावापोटी ते सिद्ध करता  येत नव्हते.
संजय सोनवणी साहेबानी महार समाजावर अत्यंत महत्वाचे संशोधन केले. कालचा महार हा मध्ययुगात सामाजिक फटका बसलेला एक रक्षक होता हे सिद्ध करताना या समाजाची पाळं मुळं एक एक शतक मागे मागे नेत अर्वाचीन काळातील अस्तीत्व ने जबाबदा-या यांचे सखोल विवेचन केले आहे. त्याच बरोबर आजून एक एक शतक मागे मागे सरकत या समाजाची प्राचिन काळातील भूमिका ही ’रक्षक’ अशी होती व गाव कुशीवरील अत्यंत जबाबदारीचे कार्य पाहणारा, वेशीवर पहारा देणारा, समाजाचे व गावाचे रक्षण करणारा नि गावातील उत्पन, जमिनी व ईतर सर्व सरकारदरबारी आवश्यक नोंदी ठेवणारा हा समाज होता हे सिद्ध केले आहे.
महार सुशिक्षित असल्याचे पुरावे
त्याच बरोबर संजय साहेबानी हे ही सिद्ध केले आहे की जर या समाजावर अशा विविध जबाबदा-या होत्या तर हा समाज नक्कीच सुशिक्शतही होता. कारण नोंदी ठेवणे वगैरे गोष्टीसाठी  विद्येची गरज अपरिहार्य आहे. जर या समाजावर असे अत्यंत जबाबदारीचे (रेव्हेन्य़ु) कार्य सोपविले होते तर मग  ते अशिक्षित असून चालणार नव्हते. मग संजय साहेबांचा शोध सुरु होतो ते महारांच्या शिक्षणाच्या दिशेनी. महार समाज प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन काळात नक्कीच सुशिक्षित होता व कुठेतरी त्याचा पुरावा नक्की सापडेल नि तो शोधलाच पाहिजे म्हणून ते जिद्दिने पेटून उठतात. शेवटी या काळात महार सुशिक्षित होते याचा पुरावा ते मिळवतात. ते पुरावे काय आहेत? कसे मिळाले?  महार खरच सुशिक्षित होते का? या सर्व प्रश्नांचे उत्तर या पुस्तकात संजय साहेबानी पुराव्यानिशी मांडले आहेत. ते जाणून घ्यावयाचे असल्यास पुस्तक नक्की वाचा.
महार समाज धर्मांतरा आधी बौद्ध असल्याचा पुरावा
दुसरा अत्यंत महत्वाचा शोध असा आहे की बाबासाहेबानी धम्मचक्रप्रवर्तनाद्वारे जी धम्म क्रांती घडवून आणली त्या आधीही हा महार समाज कधी बौद्ध होता का? बहुतेक होता असेच उत्तर मिळते. यावर संशोधन करताना संजय साहेबानी एक असा पुरावा मांडला आहे की तो वाचून समस्त बौद्ध समाज थक्क होणार आहे. महारांची देवी मरीआई. महार समाजावर मरीआईचा मोठा प्रभाव. पण या मरीआईला बौद्धेय म्हटल्या जात असे असा पुरावा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की महार  समाजावर बौद्ध धम्माचा प्रभाव आधीसुद्धा होता. ते कसे.... जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
ब्राह्मणांचा राष्ट्रद्रोह
संजय साहेबांच्या ठायी असलेले विदवत्तेचे भांडवल अफाट आहे. ज्याच्या बळावर ते अखंड वादविवाद करु शकतात. या त्यांच्या विद्वत्त्तेची चमक उपरोक्त पुस्तकातून अनेक ठिकाणी जाणवून जाते. प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध करताना कित्येक ठिकाणी तर्काच्या कसोट्या लावून अत्यंत क्लिष्ट नि गुंतागुंतीचे प्रश्न निकाली काढतात. या देशावरील परकीय सत्तेचे गमक उलगडताना त्यानी एक स्फोटक संशोधन मांडले आहे.  काशी विद्वदसभा व ईतर सर्व पुराणकारानी “या देशावर यवनांचे राज्य येईल” हे वारंवार लोकांच्या मनावर बिंबवून दिले. म्हणून शत्रू सीमेवर उभा ठाकण्या आधीच आमचे मानसिक खच्चिकरण झाले. हा हा म्हणता एक दिवस यवन सिमेवर उभा ठाकला. आम्ही अनेक वर्षापासून त्यांची सत्ता येणार हे ऐकून असल्यामूळे आधिपासून मानसिक पातळीवर खचलेले होतो.  त्याना पाहून आजूनच खचून गेलो व त्यांची सत्ता स्विकारली. त्या नंतर ब्राम्हणानी धर्मसत्ता व मुस्लिमानी राजसत्ता अशी त्यांच्यात्यांच्यात वाटणी झाली व पुढे सातशे वर्ष आम्ही या दोघांचेही गुलाम राहिलो. आज पर्यंतच्या सर्व संशोधनाना नवे वळण देणारे हे संशोधन व असे अनेक अकथीत पुरावे पाहण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
अशा प्रकारे संजय साहेबांची लेखनी विविध क्षेत्रातून लिलया फिरते व ती थेट इसवी सन पूर्व सातवाहनाच्या काळा पर्यंत महार समाजाचे अस्तीत नेऊन भिडविते. सातवाहनाच्या काळातील महारख्ख, महारठ्ठ, रठ्ठ अशा अनेक शब्दांचा अर्थ सांगत त्या काळातील गाव रक्षकांचा, संपत्ती रक्षकांचा नि व्यापा-यांच्या रक्षकांचा इतिहास सांगताना हे रक्षक कोण होते याची इत्यंभूत माहिती देते.  एके काळी हा देश आंतराष्ट्रीय पातळीवर व्यापार करण्यात अग्रणी समजला जात होता. त्या वेळी व्यापा-याना मोठ्या प्रमाणात रक्षकांची गरज पडत असे. त्यामुळे रक्षक समाजाची मोठी मागणी होती. हाडाने खणखर, बुद्धिने चाणक्ष नि वृत्तीने वीर अशा लोकांची नितांत गरज असे. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास रक्षक वर्ग हा सेवा (सेक्युरिटी) देणारा वर्ग होता. हा रक्षकांचा तेजोमय काळ सातव्या-आठव्या शतका पर्यंत अस्तीत्वात होता.  पण हळू हळू यवनांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर व्यापार बंद झाले. त्यामुळे रक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर  बेरोजगार झाला. त्याची अवणती सुरु झाली. हळू हळू त्याची एक वैभवशाली सेवा गावातील पाटल्याच्या, कुणब्याच्या घरी गहाण पडू लागली व ईथे सुरु झाली गुलामी. या गुलामीची पाळं मुळं कुणाशी जाऊन मिळतात? का बरं एक पराक्रमी नि शूर समाज हतवीर्य होऊन अस्पृश्य बनला? कोणत्या समाजानी यांच्यावर आघात केला?  कशा प्रकारे एका अप्रतिम सेवाक्षेत्राला महारकीत बदलण्यात आले? हे सर्व जाणून घेण्यासाठी वरील पुस्तक नक्की वाचा.
जाता जाता संजय साहेबानी या पुस्तकात आंबेडकर चळवळीतील राजकीय आघाडीचा समाचार घेताना अत्यंत मर्मभेदक, मनोवेदक नि मार्गदर्शक चर्चा केली आहे. त्यांची संशोधनाची शैली, अविरत कष्ट नि जिज्ञासू वृत्ती याचा परिपाक म्हणजे “महार कोण होते? उद्गम:संक्रमण:झेप
सर्वानी आवर्जून वाचावे नि संग्रही ठेवावे, असे पुस्तक आहे.
------------------------------------------------
पुस्तकाचे नाव:  महार कोण होते? उद्गम:संक्रमण:झेप
प्रुष्ठ संख्या :  ११२
मुल्य: रु. १००/-
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
एकमेव वितरक: भारत बुक हाउस,
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे-३०.
मो. ९८५०७८४२४६

मंगळवार, २७ डिसेंबर, २०११

स्तुपांची मंदिरे

मुखपृष्ठ
मागच्या दोन वर्षापासून ब्लॉगवर लेखन करीत आहे. वाचक वर्गातील समर्थकानी सतत पाठ थोपटली तर विरोधकानी माझ्या नावाने लाखोल्या वाहिल्या. शिव्या शापांचा मोठा वर्षाव केला. तरी मी अजिबात न डगमगता माझे लिखान अखंडपणे चालू ठेवले. कित्येनी धमक्या दिल्या, काहीनी तर चक्क माझ्यावर पोलिसात तक्रार नोंदविली. अशा प्रकारे सनातन्यांशी तोंड देत मी आपले कार्य चालू ठेवले.  याच दरम्यान मराठीतील एक प्रमुख प्रकाशक  पुष्प प्रकाशन चे मालक व प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांच्याशी ओळख झाली.
संजय साहेबानी माझे हे पुस्तक प्रकाशित करण्याचे बोलून दाखविले व लगोलग कामाला सुरुवात झाली.
हा हा म्हणता माझे पहिले पुस्तक तयार झाले असून १ जाने २०१२ ला कोरेगाव भीमाच्या पवित्र नि वीर भूमीत प्रकाशीत होत आहे.
खरंतर ब्लॉग लिहायला घेतला तेंव्हा कधी ध्यानीमनीही आलं नव्हतं की या लेखमालिकेचे पुस्तक रुपात प्रकाशन होईल. पण संजय साहेबानी ते घडवून आणले व आज पुस्तक विक्रिसाठी तयार आहे. माझ्या सारख्या नवख्या लेखकाचे (?) पुस्तक प्रकाशीत केल्या बद्दल मी पुष्प प्रकाशन व संजय सोनवणी यांचा आभारी आहे.
हे पुस्तक मुख्यत: चळवळीचे पुस्तक असल्यामूळे शक्यतो मु्ख्य प्रवाहातील विक्रेत्यांकडे मिळणार नाही. तरी सुद्धा ज्याना हे पुस्तक हवे असेल ते माझ्याशी वा पुष्प प्रकाशनाशी थेट संपर्क साधून पुस्तक मागवू शकतात. त्याच बरोबर आंबेडकर चळवळीतील सर्व विक्रे्त्यांकडे हे पुस्तक उपलब्ध असून महाराष्ट्रभर सर्वत्र हे पुस्तक सहज मिळविता येईल.
मागिल पान
बौद्धमय भारताचे स्वप्न पाहणा-यांसाठी बौद्ध धम्माचे गतवैभव उलगडणारे हे पुस्तक या चळवळीस  अत्यंत उपयोगी आहे.  भारतातील अत्यंत प्रसिद्ध हिंदू मंदिरं गतकाळातील बौद्ध मंदिरं असून त्यांचे वैष्णविकरण करण्यात आले आहे. बुद्धाच्या मुर्त्यांचे वैष्णवीकर झाले तरी जनमानसातील प्रथा मात्र बौध्द धम्माचं अस्तीत्व अधोरेखित करुन जातात.
त्याच बरोबर मुर्तीपुजेचाही इतिहास या पुस्तका द्वारे उलगडण्यात आला आहे. वैदिक धर्मात मुर्तीपूजा वर्ज्य असून भारत देशात मुर्तीपुजा बौद्ध समाजानी सुरु केली. पण बौद्ध धम्मातील मुर्तीपुजा ही दैववादी नसून प्रतिकांची पूजा होती व आहे. ब्राह्मणी धर्मानी ही मुर्तीपूजा वेदांचे मुलभूत तत्व झूगारुन देत बौद्धाना शह देण्यासाठी स्विकारले व प्रतिकांच्या पुजेचे दैवी पुजेत रुपांतर केले. हा सर्व इतिहास या पुस्तकातून मांडण्यात आला असून मुर्तीपुजा ही बौद्ध धम्माची प्रथा असून ती प्रतिकांची पुजा अशा स्वरुपाची पुजा होती.
लक्ष्मी, सरस्वती या स्त्री देवताही मूळ हिंदू स्त्रीया नसून त्या बौद्ध धम्मातील पुज्य स्रीया होत्या. कारण वैदिक धम्मात स्त्री ही शूद्र असल्यामूळे ती पुज्य असूच शकत नव्हती. पण बौद्ध धम्मात मात्र स्त्रीयाना मानाचे स्थान होते. नंतरच्या काळात या बौद्ध स्त्रीयांचे नामांतर करुन हिंदूनी त्यांच्या ग्रंथात घुसडविले. मग या देवींची हिंदू देवांशी नातीगोती ठरविताना कधी सरस्वती ब्रह्माची बायको बनली, कधी मुलगी बनली तर मग कधी आजून काही. अशा प्रकारे मोठा अडचणीचा प्रवास करत ही देवता शेवटी विद्येची देवता म्हणून हिंदु धर्मात स्थीरावली. याचे कारण आहे की ही देवता मुळात बौद्ध देवता होती. असा एकंदरीत बौद्ध धम्माचा गौरवशाली इतिहास कथन करणारे हे पुस्तक चळवळीस देताना मला अत्यंत आनंद होत आहे. 
पुस्तकाचे नाव:  स्तुपांची मंदिरे
लेखक:  मधुकर रामटेके
प्रकाशक :  पुष्प प्रकाशन, पुणे (संपर्क: ८८०६२४०५२७)
वितरक:  भारत बुक डेपो, पुणे. (०२०-३२५४८०३२)

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

दलित उद्योगपती - कल्पना सरोज


दारिद्र्याचा मारा खात, अगणित दु:खात खितपत पडलेल्या उपेक्षिताना बाबासाहेब रुपी समाज क्रांतिकरक लाभल्यावर सर्वत्र मोठी उलथापालथ झाली. सहस्त्रावधी वर्षे दारिद्र्यात खितपत पडलेला समाज उठून उभा राहीला. आपल्या अंगभूत कौशल्यावर मोठी मजल गाठली. सर्व क्षेत्रात मुख्य प्रवाहातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या कर्तुत्वाने आपली गौरवशाली गाथा लिहू लागला. देशाच्या मुख्य प्रवाहातील समाजाशी स्पर्धा करताना एक एक क्षेत्रात आघाडी घेत हळू हळू दलित समाज सर्वत्र आपल्या पाऊलखूणा उमटवू लागला. उद्योग क्षेत्रात उतरण्यासाठी लागणारं भांडवल, अनूभव नि आत्मविश्वास यांच्या अभावामूळे दलितांना या क्षेत्रात उतरावयास बराच अवकाश लागला. बाबासाहेबा नंतर पहिली पिढी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगीरी बजावत उच्च पदस्थ अधिकारी बनली. साहित्य क्षेत्रातही अनेक दलित साहित्यिकानी दैदिप्यमान कार्य केले. कला क्षेत्रातही दलितांचे सूरमणी प्रभाकर धाकडे ते अभिजीत सावंत, अभिजीत कोसंबी पर्यंतची गौरवशाली व तेजोमय वाटचाल आपल्या समोर आहेच. पण या सर्व आघाड्यात दलितांच्या हातून उद्योग क्षेत्र मात्र आजून दूर होते. पण हा आंबेडकरी समाज आहे, थांबणे आम्हाला अमान्य आहे. 
सर्व क्षेत्र पादाक्रांत करण्याच्या ध्येयानी झपाटलेला हा समाज नव्वदीच्या दशकात उद्योग क्षेत्रातही उतरला व हा हा म्हणता आज अनेक यशस्वी दलितांनी कार्पोरेट इंडस्ट्रीत आपली स्वतंत्र ओळख नि स्थान निर्माण केले. अशा दलित उद्योगपती मधील आध्यउद्योजक म्हणजे आयु. लाहोरी राम हे पहिले दलित अब्जाधीश. त्या नंतर मिलिंद कांबळे (डिक्कीचे संस्थापक), राजेंद्र गायकवाड (जी.टी. पेस्ट कंट्रोल), प्रसाद जगताप (एव्हरेस्ट स्पून पाईप इंडस्ट्री), संजय क्षीरसागर (एपीए इन्फ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड),  अशी अनेक दलित उद्योजकांची उद्योगपतीच्या दिशेनी वाटचाल सुरु झाली आहे.  अन एवढ्यावरच न थांबत याच रंजल्या गाजल्या समाजातून एक अत्यंत आत्मविश्वासी, कर्तुत्ववान नि कार्यक्षम महिलेनी कार्पोरेट क्षेत्रात गरूड झेप घेतली त्या महिलेचे नाव आहे आयु. कल्पना सरोज.
कल्पना सरोज:
कल्पना सरोज, भारतातील कार्पोरेट क्षेत्रातील नवीन तडफता तारा म्हणून सर्वज्ञात आहे. कल्पना सरोज आज रु. ३,०००/- कोटीची मालकीन असून अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. दहावी पर्यंतचे  शिक्षणही पूर्ण करु न शकलेली, पराकोटीच्या दारिद्र्यात जिची जडण घडण झाली अशी स्त्री आज यशाच्या एक एक पाय-या चढत थेट भारतीय कार्पोरेट क्षेत्राच्या इतिहासात आपल्या नावाचे एक सोनेरी पान लिहले आहे. 
विदर्भातील अकोल्या जवळील रुपरखेळ नावाच्या एका खेडयात पोलिस हवालदाराच्या घरी जन्म झाला. वयाच्या १२व्या वर्षी विवाह झाला.  त्या नंतर आपल्या जन्मगावापासून हजारो कोस दूर लोकानी गजबजलेल्या माया नगरी मुंबईत पतीच्या घरी कल्पना नांदायला आली. पण सासरच्या लोकांनी कल्पनाचा अतोनात छळ केला. अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीतून आलेल्या या कोवळ्या मुलीस घरुन भक्कम असे पाठबळही नव्हते. सासरच्या लोकांचा छळ, अमानवी वागणूक व पतीचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच गेला. वयाने लहान, शिक्षणाने अपूर्ण व घरचे दारिद्र्य यामूळे होणारा हा छळ मुकाट्याने सहन करत कसे बसे एक वर्ष काढले. पण शेवटी परोकोटीच्या वेदना असाह्य झाल्यामूळे या अमानवी छळापासून सुटका करुन घेणे हा एकमेव पर्याय उभा होता. पतीचे घर सोडण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण मनोधैर्य एकवटून हा निर्णय घ्याण्याचे ठरले. कर्तव्यबुद्धिला न जागणारा पती व सासरचे मंडळी यांनी नितीमत्ता सोडून केलेला अत्याचार मोडीत काढण्याचे साहस व बळ नव्हते. अन शेवटचा पर्याय म्हणजे या पतीला कायमचा निरोप देणे हा एकमेव उपाय होता. मोठ्या धैर्याने व दु:खी मनाने कल्पनाला हा निर्णय घ्यावा लागला. आता कल्पना परत एकदा आपल्या माहेरी वडलांकडे राहायला आली.
मात्र नव-याचे घर सोडून आलेल्या मुलिंची आपल्या समाजात काय स्थीती होते हे सर्वविदित आहे. समाजातील लोकांच्या शेलक्या व टोमणे अस्वस्थ करुन जात. पदोपदी होणारा उपमर्द नि उपहास मनाला चटके लावून जाई. पतीचे घर हे स्वर्ग मानणा-या समाजाला स्त्रीचे स्वत्व असते मुळात हेच मान्य नाही. त्यामूळे नव-यापासून फारकत घेतलेल्या स्त्रीस हा समाज सदैव दोषी मानतो. याचा जिवंत अनूभव कल्पनाला येऊ लागला. मनात विचारांचे काहूर उठू लागले. हे आयूष्य नकोसे होऊन गेले. आत्मघात करण्याचा विचार वारंवार डोकावू लागला. नव-याचे घर सोडल्या पासून सासूरवास संपला खरा पण सामाजीक सासूरवास सुरु झाला. पुरातन विचारानी बरबटलेला, स्त्रीस सदैव दुय्यम मानणारा व पुरुषी अहंकारानी पछाडलेला हा समाज स्त्रीयांच्याप्रती आपलं दायीत्व ओळखून जबाबदारपणे वागण्यास नेहमीच कमी पडला. उलटपक्षी स्त्रीयांवर सामाजिक बंधने लादण्यात व तीचा तेजोभंग करण्यात अग्रेसर होता. कल्पनाला सुद्धा समाजाच्या या संकुचीत नि प्रतिगामी वृत्तीनी अत्यंत छळले. अपमान व दोषारोपाचा प्रचंड मारा झेलत जगताना हे जिवन नकोसे होऊन गेले व शेवती  आत्मघात करण्याचा निर्णय घेऊन टाकला. विषाच्या दोन बाटल्या पिऊन टाकल्या. पण  आयुष्याचा शेवट करण्याचा हा प्रयत्न फसला. घरच्यानी तडका फडकी दवाखान्यात दाखल केले डॉक्टराना कल्पनाचा जिव वाचविण्यात यश आले. हा कल्पनाचा पुनर्जन्म होता. आता मात्र तिनी नवे आयूष्य स्वत:च्या अटीवर जगण्याचे ठरवून टाकले. समाजाच्या टिका टिप्पण्याना  भीक न घालता मनास पटेल तसे जिवन जगण्याचा निर्धार केला. अन वडिलांकडे आग्रह धरला की मला मुंबईस पाठवा. कष्ट करणा-या माणसाला यशाची कवाडं मुंबईत सदैव उघडी असतात व मला तिथेच जाऊन कष्ट करायचे आहे. पोरीच्या हट्टापायी व आत्महत्तेचा धसका घेतलेल्या वडलानी मुंबईतील नातेवाईकाकडे कल्पनाची राहण्याची सोय केली.
आता मात्र कल्पनाच्या आयूष्याला नवी कलाटनी मिळाली होती. आत्मविश्वासानी भरलेली, नव्या वाटा चोखाळणारी व अविरत कष्टानी यश खेचून आणणारी ही कल्पना मुंबईत येऊन थडकली. सुरुवातीला होजीयारीच्या दुकानात शिलाईची कामे करु लागली. अत्यल्प मोबदल्यात तीला हे काम करावे लागत असे, पण आयूष्यात काहितरी नवे घडवूनच थांबायचे असा निश्चय करुन मुंबईत आलेली कल्पना या कामासही मोठ्या आनंदाने स्विकारले. विशिष्ट ध्येयानी प्रेरीत माणसं थाबंत नसतात. त्यांच्या ठायी असलेली अखंड उद्योजकता नि अविश्रांत कष्ट या दोन भांडवालाच्या जोरावर बाकी सर्व तारून नेण्यास ते सिद्ध असतात. कल्पना सुद्धा अशाच ध्येयानी झपाटलेली एक तरुणी होती.
पदरी शिक्षणाचा अभाव होता खरा पण तिच्या ठायी असलेला आत्मविश्वास नि उद्योगशिलता याच्या बळावर  ही कसर भरुन काढण्यास ती सिद्ध होती.
दुसरा विवाह
हा हा म्हणता काही दिवस गेले. कल्पनाचा या व्यवसायात जम बसत गेला. त्याच दरम्यान एका उमद्या तरुणाशी तीची ओळख झाली व त्याच्याशी विवाह केला. हा तरुणही उद्योजक व आत्मविश्वासानी काठोकाठ भरलेला, ध्येयानी झपाटलेला नव्या वाटा चोखाळणारा उमदं व्यक्तीमत्व होतं. म्हणूनच बहुतेक कल्पनाच्या मनात वेगळं स्थान मिळवू शकला. त्याचा काल्याण येथे कपाट बनविण्याचा व्यवसाय होता. ईकडे कल्पना होजीयारीच्या व्यवसायात आता बरीच पुढे निघून गेली होती. या तरुणापासून कल्पनाला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये झाली. पण नशीबानी पुन्हा एकदा थट्टा केली, कल्पनाचा जोडीदार दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर टाकून ईह लोकाचा निरोप घेतो. आता तीचा सामाजीक दर्जा विधवा असा होता. हा आघात झेलण्यास कल्पना सज्ज नव्हती. पहिल्या आघाता नंतर मोठ्या धैर्याने उभी झालेली कल्पना पतीच्या निधनानी पुर्ती खचून गेली, कोसळली, कोलमडून पडली. पण या वेळी तीच्यावर दोन मुलांची जबाबदारी होती. त्यांची तोंडं पुढे येताच तीला परत नव्या उमेदीने उभे राहणे भाग पडले. पतीचा व्यवसाय होताच. कल्पनानी हा विस्खटलेला संसार परत एकदा आवरला व  नव्या उत्साहाने व्यवसायास सुरुवात केली.
कपाटांच्या व्यवसायात तीचा जम बसत गेला. पैसा मागे पडू लागला. अचूक निर्णय, अफाट कार्यक्षमता व अंगभूत उद्योगशीलता याच्या मिश्रणातून उभं झालेलं हे नवं व्यक्तीमत्व यशाची गरुड झेप घेत गेलं. या नंतर कल्पनानी कधी मागे वळून पाहिलच नाही.
कोहीनूर प्लाझा
याच दरम्यान कल्पनानी १९९७ मधे एक भूखंड विकत घेण्याचा निर्णय घेतला. खरतर हा निर्णय अत्यंत धाडसी व जोखीमीचा होता. जो भूखंड कल्पनानी विकत घेण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर अनेकांचे दावे होते. त्या जागेत असलेल्या ईमारतीत अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरुनी आपला मालकी हक्क सांगितला होता. त्याच बरोबर ईतरही स्थानीक बिल्डर व गुंडांची त्या जागेवर नजर होती.  या सर्व अडीअडचणीच्या जोडीला या भूखंडाशी निगडीत काही खटले न्यायालयात प्रलंबित होते. असा एकंदरीत कटकटीचा व गुंतागुंतीचा हा भूखंड विकत घेणे म्हणजे धैर्याचे व धाडसाचे कृत्य होते. कल्पनानी धाडसी निर्णय घेत हा भूखंड विकत घेतला. कायदेशीर लढा लढण्याची सिद्धता केली. दरम्यान काळात गाव गुंडाकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. पोलिसात तक्रार करुन या गुंडांचा बंदोबस्त करण्यात आला. ईतर राजकीय दबाव नि वजनदार माणसांचे नाना प्रलोभने झूगारून देत आपला लढा सुरु ठेवला. अखेर न्यायालयीन लढा जिंकून दाखविला, जागेचे मालकी हक्क कल्पनाच्या नावे झाले. विजयी घोडदौडची ईथे रोवली गेली मुहूर्तमेढ.
या जागेवर सुंदरशी ईमार बांधून कल्पनानी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. या ईमारतीला कोहिनूर प्लाझा असं समर्पक नाव देण्यात आले. २००० साली ही ईमारत विकून मिळालेल्या पैशातून हा व्यवसाय वाढविण्यास सुरुवात झाली.
कमानी ट्यूब्स लि.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून व्यवसायात असलेली कमानी ट्यूब्स लि. २००६ साली दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. या कंपनीवर ११६ करोडचे कर्ज होते. १२० पेक्षा अधिक खटले कंपनीच्या विरोधात न्यायालयात प्रलंबित होते. ५००ते ८०० कामगारांचे देणे बाकी होते. त्याच बरोबर कामगारांची दोन युनियन मधे विभागणी झालेली होती. एका युनियनची समजूत काढावी तर दुस-यानी रुसावे, दुस-याची मागणी मान्य करावे तर पहिला ओरडायचा. अशी एकंदरीत आणिबाणीची परिस्थीतून जाणारी ही कमानी ची कमान घ्यावयास कुणीच तयार नव्हते. तेंव्हा मोठ्या धैर्यानी एक स्त्री उद्योजक पुढे सरसावून येते व बीआईएफआर [बोर्ड फारइंडस्ट्रियल एवं फाइनेंशियल रिकंसट्रक्शन] कडे या कंपनीचे सुत्र आपल्याकडे दयावे असा प्रस्ताव ठेवते.  ते आत्मविश्वासानी भरलेलं व्यक्तीमत्व म्हणजे कल्पना होय.
शेवटी हा प्रस्ताव मान्य करुन कमानीची कमान  कल्पनाच्या हाती देण्यात येते. हा हा म्हणता वर्षभरात कल्पनाच्या कर्तूत्वानी कमानी गरुड झेप घेत कंपनी तोट्यातून बाहेर पडली. परंतू कंपनीवर असलेलेल एकूण कर्ज व ईतर सर्वि देणी अवाढव्य असल्यामूळे या सर्व कर्जातून मुक्त होण्यास कंपनीला सहा वर्षे लागली. पण आता मात्र कमानी ट्यूब्सचे गतवैभव परत आले. अत्यंत धोरणी, दिर्गोद्योगी, धाडसी व चिकाटीच्या बळावर  कल्पनानी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका कंपनीला खेचून बाहेर काढले व आपल्या कर्तूत्वाच्या बळावर कंपनीला गतवैभव प्राप्त करुन देत नवा इतिहास घडविला. 
समीर सरोज:
कार्पोरेट क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणारी, पहिली दिलत उद्योजिका म्हणून भारताच्या इतिहासात स्वत:च नावं कर्तुत्वाच्या बळावर अजरामर करणारी कल्पना शेवटी आहे व्यक्ती. या सर्व जबाबदा-या पार पाडताना, अवाढव्य व्यवसाय सांभाळताना वयक्तीक आयुष्यात एक जोडीदार असावा ही निसर्गिक गरज होय. कल्पनानी आपला तिसरा विवाह ज्याच्या सोबत केला त्याचे नाव समीर सरोज. सरोज साहेब बांधकाम व्यवसायाला वाळू पुरवठा करणारे व्यवसायी होते. पण लग्ना नंतर आता ते आपल्या पत्नीच्या व्यवसायात कल्पनाचे सहकारी म्हणून काम करतात.
कौटुंबिक जबाबदा-या
ही सर्व व्यवसायीक जबाबदारी सांभाळताना कल्पना आई म्हणूनही एक आदर्श व्यक्ती आहे. अत्यंत प्रेमळ, जबाबदार नि कर्तव्यदक्ष आई म्हणून कल्पनाची आप्त ईष्टात मोठी ख्याती आहे. दोन मुलांचे संगोपन करताना आपल्या मुलिला  होटेल मॅनेजमेंटच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठविले असून मुलगा जर्मनीमध्ये पायलटचे प्रशिक्षण घेत आहे. आभाळाला स्पर्श करणारी कल्पना जमीनीवर पाय रोवून उभी आहे. आपल्या लहान भावाचा व बहिणीचा शिक्षणाचा सर्व खर्च कल्पनानी केला असून त्यांच्या लग्ना पर्यंतची सर्व जबाबदारी पार पाडली आहे. एवढ्यावरच न थांबता कल्पनानी त्या दोघानाही एक एक सदनिका भेट म्हणून दिली व त्यांचे आयुष्य मार्गी लावले.
सामाजीक कार्य
बाबासाहेब आंबेडकरांच्या परोपकारबुद्धिमूळे आज हा बदल घडून आला आहे. समाज बांधवांप्रती त्यांच्या मनात असलेला कळवळा, त्याग व सामाजिक क्रांतीसाठी दिलेला प्रदिर्घ लढा यामूळे आज आपल्या समाजाला हे तेजस्वी दिवस पाहण्याचे भाग्य लाभले. कल्पना सरोजनी व्यवसायीक गगन भरारी घेतानाच सामाजीक बांधिलकी जोपासली आहे. आपण समाजाचे देणे लागतो व ते आपले कर्तव्यच आहे अशी खूणगाठ बांधून त्या सामाजीक ऋण फेडण्यास सदैव सज्ज असतात. त्याच बरोबर ज्या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला व बालपण गेले तिथे पायलट ट्रेनिंग स्कूल काढण्याचा त्यांचा संकल्प आहे.
दलित समाज आता नवा इतिहास घडवतो आहे. कार्पोरेट जगतातील कल्पनाची कामगीरी दलितांच्या कर्तूत्वाची दखल घेण्यास भाग पाडत असून नुकत्याच मुंबईत भरलेल्या दलित एक्स्पोला टाटा बिरला सारख्या दिग्गजानी भेटी दिल्या. सा-या जगाचे लक्ष वेधून घेणारी ही कामगीरी दलित बांधवांमधे नवचैतन्य जागविणारी, नवे मार्ग चोखाळायला लावणारी व मुख्य प्रवाहात आता स्वताचे स्वतंत्र स्थान निर्माण  करण्यास मार्गदर्शक ठरणारी आहे.  
दहावी पर्यंतही शिक्षण न घेऊ शकलेली एक अल्पशिक्षित ते एक यशस्वी उद्योगपती (? पत्नी)  असा थक्क करणार प्रवास करुन आज कल्पना जेंव्हा मुंबईतील बैलार्ड ईस्टेट मधिल कार्यालयात बसते तेंव्हा भारतातील मोठ मोठे दिग्गज तीला भेटायला बाहेर रांगेत उभे असतात.
या यशस्वी नि गौरवशाली वाटचाली बद्ध कल्पनाचं अभिनंदन व शुभेच्छा.

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

’भगवद गीता’ वर रशियात बंदी.

भगव्या आतंकवादाचे बुरखे उतरण्यास सुरुवात झाली ती साध्वी प्रज्ञा पासून. आज पर्यंत मुस्लिमांवर आतंकवादाचे आरोप ठेवणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही एक महत्वाची घटना होती. त्या नंतर एक एक करुन भगव्या आतंकवादाचे अनेक रुप सातत्याने पुढे येत राहीले. ही झाली भारतातली अवस्था. पण आता मात्र आंतराष्ट्रीय पातळीवरही भगव्या दहशतीची दखल घेणे सुरु झाले आहे. भगवद गीता हा  समाजीक सलोखा बिघडविणारा व समाजात दुही तयार करणारा ग्रंथ आहे असा रशीयाच्या न्यायालयाने काल सोमवार १९ डिसे २०११ रोजी घोषीत केले व २८ डिसे. २०१ ला या संदर्भात अंतीम निर्णय येणार आहे.
हिंदू समाज ज्या ग्रंथाला पुज्य मानतो त्या ग्रंथाला एखाद्या देशाच्या न्यायव्यवस्थेने अशा प्रकारे फटकारणे ही अपूर्व अशी घटना आहे. त्याच बरोबर या निंदणीय ग्रंथाचं समर्थन करणारा हिंदू समाजही आत्मघातकी नि देशहिताच्या व समाज हिताच्या विरोधात कृतीशील असणारा घातकी समाज असल्याचे अधोरेखीत होते. हिंदू धर्म अत्यंत घातकी, समाज द्रोही व मानवी मुल्याची पायमपल्ली करणारा एक कडवट व कट्टरपंथी धर्म आहे हे सर्वज्ञात आहे. पण त्याची झड आता पर्यंत फक्त भारतीय लोकानाच बसल्यामूळे विदेशात मात्र या धर्माचे सदैव गुणगाणच चालले होते.
पण हळू हळू हिंदू धर्मानी आपला मुळ रंग दाखविला नि त्याच्या विरोधात पहिला प्रतिध्वनी उठला तो रशीयामधे. आता युरोपातील ईतर सर्व देशातूनही हा विरोधाचा, निषेधाचा व प्रतिकाराचा सूर उठेल यात शंका नाही. हिंदू धर्मानी कित्येक वर्षे सज्जनतेचा बुरखा घालून जगभर प्रवास केला खरा पण शेवटी तो रशीयात जाऊन फाटलाच. आता रशीयाच्या विरोधात आवाज उठविताना हिंदूच्या सहिष्णूवृत्तीची कसोटी लागणार आहे. सहिष्णूतेचा आज पर्यंतचा दिखावा खरा की खोटा ते लवकरच सिद्ध होईल.
भगवद गीता हे जगातील अलौकिक तत्वज्ञानानी संपन्न असा धर्मग्रंथ असल्याचा आज पर्यंतचा दावा मोडीत काढणारा रशीयन न्यायालयाचा कालचा निकाल हिंदू धर्माच्या जागतीक किर्तिला खिंडार पाडण्यास पुरेसं आहे. मनूवादाचा प्रसार जगभरात करण्यासाठी रान पेटवून उठलेला हा सनातनी धर्म शेवटी कायद्याच्या कचाट्यात सापडला तेवढे बरे झाले. 

ईस्कॉनचे वाभाडे:  International Society for Krishna Consciousness (ISKCON). ही सस्था जगभर पसरली असून आज पर्यंत भगवद गीतेचा प्रसार करण्यात सर्वात अग्रणी संस्था म्हणून गणली जाते. देश विदेशात गीतेचा प्रसार करण्यात झोकून देणारी एक कट्टर संस्था असून अवाढव्य माया गोळा करण्यातही ईस्कॉन अग्रणी आहे. गीतेचे तत्वज्ञान जगात सर्वात्तोम आहे असा हिंदू व त्यातल्या त्यात ईस्कॉनचा प्रबळ दावा आहे. पण रशीयन न्यायव्यवस्थेच्या कसोट्या लावल्यावर ही गीता सर्वोत्तम तत्वज्ञान तर ठरणे दूर पण मानवी मुल्यास घातक असल्याचे सिद्ध झाले. सहा महिन्या पासून न्यायालयात हे प्रकरण प्रलंबीत होते. सहा महिन्याच्या अभ्यासांती न्यायालयाने गीतेस घातक ठरवून एकदाची  बंदी घातली. याच बरोबर ईस्कॉनचाही निकाल लावला. आता नजर लागली आहे ईतर युरोपीयन व अमेरीकन देशांकडे. या सर्व पश्चीमी देशानी सुद्धा लवकरात लवकर गीतेचा व ईस्कॉनचा बंदोबस्त केल्यास नवल वाटू नये.
हिंदू संघटना मात्र क्रोधाने चरफडल्या, शंकराचार्य तर बहुतेक थडग्यातच(?) चडफडला असावा. अत्यंत घातकी अशा गीतेवर बंधी घालणा-या या निर्णयाचे समस्त समतावाद्यांच्या तर्फे मी मनोभावे स्वागत करतो. असा हा अभूतपूर्व निर्णय देण्याचे नितीधैर्य दाखविल्यामूळे मी रशीयन न्यायालयाचे अनिभंदन करतो. आता भारतीय हिंदू २८ च्या आता हा निर्णय फिरविण्यासाठी रशीयावर दबाव आणतात की गीतेच महत्व सिद्ध करतात ते आपण सर्व पाहणारच आहोत.

इंदू मीलची जागा फुकट नको विकत हवी.


इंदू मीलच्या  प्रश्नावरुन सध्या विधान सभेत खडाजंगी सुरु आहे. काल विधानसभेने इंदू मीलची बारा एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास देण्याची मागणी करणा-या पाच आमदाराना एक दिवसासाठी निलंबित केले. त्या नंतर आजून एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे एन. टी. सी. (National Textile Corporation) नी कोर्टात धाव घेतली. याची सुनावणी करताना न्या. डी. के. देशमूख व न्या. अनूप मेहता यांच्या खंडपिठाने सरकारची कान उघडणी करताना असे सुनावले की “जर उद्या विधानसभेत भीम सैनिक घुसले व स्वत:ला मुख्यमंत्री घोषीत केले तर सरकार हे मान्य करणार की कसे?” या वाक्याचा रोख असा होता की इंदू मीलमधे घुसलेल्या भीम सैनिकाना मीलचा ताबा घेऊच कसा दिला. त्याना जागीच ठेचायचे काम सरकारने पार पाडायला हवे होते. किंबहूना या पुढेतरी भीम सैनिकाना ठेचून काढावे नि त्यांचा आवाजा लगेच दडपावा अशा अर्थाची ती सुचना होती. सरकारला अप्रत्यक्षपणे भीम सैनिकांवर अत्याचार करण्यास प्रवृत्त करणारे हे विधान न्यायमुर्तीला न शोभणारे आहेत. न्यायमूर्तीनी काय तो निर्णय दयावा.  
इंदू मीलचा जागा फुकट नको विकत दया:
मागच्या आठवडा भरापासून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आंबेडकरी जनतेनी सौम्यपने निदर्शने सुरु केली असून काही ठिकाणी प्रातिनिधीक निषेध म्हणून रेल रोको सारख्या तुरळक घटना घडल्या आहेत. इंदू मीलची जागा आंबेडकर स्मारकास मिळावी याची मागणी  रिपब्लिकन सेनेने मागच्या दोन वर्षापासून लावून धरली. सरकारनी नेहमीप्रमाणे ईथेही सुस्तडपणा दाखवत घोंगळं भीजत ठेवले. आता जेंव्हा भीमसैनिक सरकारला जागं करण्यासाठी व प्रश्न निकाली काढण्यासाठी मीलचा ताबा घेऊन काय तो निर्णय एकदाचा करुन टाका अशी भीम गर्जना केल्यावर  सरकार खळबळून जागं झालं खरं पण त्यानी फक्त चार एकरच जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला.
संपूर्ण बारा एकर जागा मिळवूनच राहू असा आंबेडकरी जनतेने पवित्रा घेतला व मुख्य प्रवाहातील मिडीयानी या बातम्या काहिच्या काही रंगवून छापायला सुरुवात केली. मुख्य प्रवाहातील वृत्तपत्र वाचताना असे दिसून येते की आंबेडकरी समाजाने ही जागा बळकावली आहे, असा अर्थ निघणा-या त्या बातम्या असतात. पण वास्तव वेगळे आहे. रिपब्लिकन सेनेची मागणी अशी आहे की ती जागा सरकारनी एन.टी.सी. कडुन मिळवून आंबेडकर स्मारकास द्यावी.
सरकारला हे जमत नसल्यास सरकारने तशी जाहीर कबुली द्यावी की ती जागा सरकार स्मारकास मिळवून देण्यास असमर्थ आहे. सरकारने तसे जाहीर केल्यास दोन दिवसाच्या आत रिपब्लिकन सेना ती जागा आजच्या बाजार भावा प्रमाणे म्हणजे रुपये. २,३५,००,००,०००/- (रु. दोन अब्ज, पसतीस कोटी ) ला विकत घेण्यास तयार आहे. म्हणजे आंबेडकरी समाज मोल मोजून ती जागा मिळविण्यास तयार असताना सरकारनी अत्यंत धुर्तपणे हा प्रश्न न सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रिपब्लिकन सेनेनी जागा विकत घेतल्यास धर्मदायी संस्थाना/मंदिराना करोडोची  खैरात वाटणा-या सरकारवर  पक्षपातीपणा केल्याचा ठपका बसेल हे कॉंग्रेसवाले चांगलेच जाणतात. या पक्षपाताची किंमत पुढच्या निवडणूकीत मोजावी लागेल याची धास्ती आहे. म्हणून ही जागा कुठल्याही परिस्थीतीत विकत दयायची नाही यावर सरकार ठाम आहे.   सरकारची ही बदमाशकी मेनस्ट्रीम मिडीया छापत नाही. आंबेडकरी जनता फुकटात जागा मागत असल्याचं चित्र रंगविण्यात येत  असून ही आमची बदनामी आहे.
सरकारला धास्ती आहे की आंबेडकरी समाजाने पैसे मोजून ती जागा विकत घेतल्यास सरकारची मुख्यत्वे कॉंग्रेसची नाचक्की होईल व पुढच्या निवडनुकित मत मागायला दारात उभं राहण्याची लाज वाटेल. त्यामूळे सरकारनी चार एकर देण्याचा सोंग केला. पण आंबेडकरी समाज संपुर्ण बारा एकर जमीन मिळवूनच राहील असा पवित्रा घेतला आहे. आज आंबेडकरी सामाजाचं हेच म्हणन आहे की सरकार बारा एकर जमीन देण्यास असमर्थ असल्यास तसे जाहिर करावे.  आम्ही लगेच पैसे मोजून ती जागा  एन.टी.सी. कडून विकत घेऊ. सरकार मात्र दोन्ही ठिकाणी पाय अडवून बसली आहे. आता मात्र उद्रेक होणे अटळ आहे.

बुधवार, ७ डिसेंबर, २०११

आनंदराज यशवंत आंबेडकर - एक नवे नेतृत्व

मोहिम इंदू मील फत्ते केली
काल ६ डिसेंबर बाबासाहेबांचं महापरीनिर्वाण दिन. देशभरातून जमलेले भीम सैनिक या दिवशी बाबासाहेबाना विनम्र अभिवादन करतात हे दर वर्षी ठरलेलं आहेच. पण अनेक वर्षापासून भीजत पडलेलं इंदू मीलच घोंगळं या वर्षी धुवून काढलं गेलं, ही कामगीरी बजावणारा आंबेडकरी चळवळीतील नवीन नेता मात्र फारश्या लोकाना माहीत नाही. बाकी सर्व आंबेडकरी नेते मूग गिळून बसले असताना आर पारची लढायी लढणारा हा नवा आंबेडकरी नेता आता आंबेडकरी चळवळीचे नवे पर्व सुरु करेल अशी आशा आहे.  
इंदू मिलचा प्रश्न निकाली काढण्याच्या दिशेनी पुर्व तय्यारी करण्यात आली होती. मोहीम इंदू मील फत्ते करण्याचे काम हाती घेतले होते बाबासाहेबाचे नातू आयु. आनंदराज यशवंतराव आंबेडकर यानी अन अत्यंत धाडसीपणे त्यानी ही मोहीम फत्ते करुन दाखविली. इंदू मीलला पोलिसाना वेढा दिला होता. कुठल्याही परिस्थीती भीमसैनिकाना इंदू मीलमधेय घूस दयायचे नाही असा वरुन आदेश होता. पण आनंदराज साहेबांच्या नेतृत्त्वातील भीम सेना ईतकी बलाढ्य, शूर नि दृढनिश्चयी होती की पोलिसांच्या सा-या फळ्या उध्वस्त करत हिंदू मीलमधे घुसली. जो जगह सरकारी है, वो जगह हमारी है या ना-यानी आकाश दुमदुमू लागला. अत्यंत आक्रमक पणे पोलिसांचा वेढा फोडून काढत आंबेडकरी सेना कुच करु लागली. ठरल्या प्रमाणे इंदू मीलची जागा ताब्यात घेतली. महाराष्ट्र शासनानी नेमलेल्या पोलिसानी सुरुवातीला मुजोरी करण्याचा प्रयत्न केला पण भीमसैनीकांच्या महासागरापुढे त्यांचे एक चालले नाही, किंबहूना चालुही नये. कारण प्रश्न बाबासाहेबांच्या स्मारकाचा आहे.  जागा ताब्यात घेतल्या नंतर तिथे बाबासाहेबांचा पुतळा बसवीण्यात आला. धम्म वंदना घेऊन इंदू मीलची जागा भंत्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्या नंतर असे घोषीत करण्यात आले की इंदू मीलची संपुर्ण जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी ताब्यात घेण्यात आली असून आज पासून या जागेवर आंबेडकरी जनतेचा अधिकार आहे. त्याच बरोबर ईथे आता बौद्ध भीक्कू व भंतेंचा कायमचा वास असणार आहे. पोलिसानी या नंतर ईकडे वाकड्या नजरेनी पाहण्याची जरुरत करु नये, किंवा ईथल्या भीक्कुना हिसकावून लावण्याचा प्रयत्नही करु नये. तसे केल्यास महाराष्ट्र शासनाला आंबेडकरी जनता धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. अशा प्रकारे शासनाला इशारा देऊन इंदू मिलच्या जागेवर आंबेडकरी जनतेचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यात आला. आता या इंदू मिलच्या जागेवर भव्य असे बाबासाहेबांचे स्मारक उभे करण्यात येणार आहे. पण हे सर्व करणारे आनंदराज आंबेडकर कोण आहेत त्यांच्या बद्दल थोडसं जाणून घेऊ या.  
आनंदराज यशवंतराव आंबेडकर
हे नाव आंबेडकर चळवळीत फारसं कुणाला माहीत नाही. मुख्य प्रवाहातील मिडीयाला तर अजिबात माहीत नव्हतं. आंबेडकरी चळवळीचे पेपर सम्राट, बहुजन नायक वगैरे मधुन मागच्या दोन वर्षापासून आनंदराज आंबेडकर यांच्या बद्दल अधून मधून थोडंफार लिहून येतय, पण ते तेवढ्या पुरताच. यांच्या बद्दल मेनस्ट्रिम मिडीयानी तर अजिबात दखल घेतली नव्हती. पण कालचा धडाका पाहून आता सर्वान त्यांची दखल घेणे भाग पडले.  तर आनंदराज आंबेडकर आहेत डॉ. बाबासाहेब यांचे नातू, प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू , यशवंत आंबेडकरांचे पुत्र. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे नवे सेनानी म्हणून उभरताना दिसत आहेत. त्यानी रिपब्लीकन सेना नावाचा राजकीय पक्ष सुरु केला आहे. त्याची वाटचाल कशी होते ते काळच सांगेल पण सुरुवात मात्र धडाकेबाज नि बहुजनांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणार आहे.

आनंदराज यांचे शिक्षण
आनंदराज हे एक उच्च शिक्षित नेते असून आंबेडकर चळवळी बद्दल अत्यंत कळवळा असलेले धुरंधर सेनानी आहेत. ते पुण्याच्या राजा शिवाजी विद्यालयातून १९७५ मध्ये एस. एस. सी. उत्तीर्ण झाले. त्या नंतर १९७७ मध्ये रुईया कॉलेज मधुन एच. एस. सी. उत्तीर्ण झाले. व्ही. जे. टी. आय. मुंबई मधून १९८१  मधे बी.ई. ईलेक्ट्रिकलची पदवी घेऊन. १९८३ मधे बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई) एम. एम. एस. ची पदवी घेतली. असा उच्च शिक्षित, धाडसी व आक्रमक नेता मिळाल्यामूळे आंबेडकरी जनता सध्यातरी  मोठ्या खुषीत आहे.
पण याच बरोबर एक निराशाही आहे की, आज पर्यंत आंबेडकरी चळवळीत येणारा प्रत्येक नेता सुरुवातीला असाच धाडसी व आक्रमक होता. पण कालांतरने सत्तेची लालसा व लाल दिव्याच्या गाडीची सवय या दोन गोष्टिनी त्यांच्यातील धाडस व आक्रमकता करणाच्या कवच कुंडला प्रमाणे राजकीय धुरंधरानी उतरविले. आता ते सर्व धाडसी नेते शेपुट हालविताना दिसतात. आनंदराज बद्दल काय होते ते काळच सांगेल. मी वेट एन्ड वॉच शीवाय आजून काहीच बोलू शकत नाही.

आनंदराज आंबेडकरांबद्दल अधिक माहिती ईथे उपलब्ध आहे.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

तसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही


फुगण्यात अर्थ नाही,रुसण्यात अर्थ नाही,
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

निष्पन्न ही न ज्यातुन्,उत्पन्न ही न काही,
नापिक जमीन ऐसी,कसण्यात अर्थ नाही

हे तथ्य जाणले मी,आयुष्य भोगताना
तू एकटा जगी या,रमण्यात अर्थ नाही

या बेगडी जगातुन्,निष्कर्श काढला मी
तू व्यर्थ चंदनासम ,झिजण्यात अर्थ नाही

विद्येविनाच वंचित्,शूद्रास राखते जी
तसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही

सांगून काल गेले,ते बुद्ध या जगाला
मुर्खांत सज्जनाने,बसण्यात अर्थ नाही

शरदा च्या चांदण्यातच्,राहून रामदासा
दारुण तुझा पराभव्,बघण्यात अर्थ नाही 

व्हा संघटीत बंधू,संघर्ष हा कराया
परतून खैरलांजी,घडण्यात अर्थ नाही

जो अर्थबोध ही ना,हो सकल बहुजनांना
असली गझल विनायक्,रचण्यात अर्थ नाही

-------------------------------------------
विनायक (अण्णा) त्रिभुवन्,वाशी,नवी मुंबई.