शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

हरी नरकेच्या कोलांटऊडया

प्रा. हरी नरके हे बहुजन चळवळीतील एक मुख्य विचारवंत आहेत. त्यानी फुले शाहु आंबेडकर चळवळीला बरीच गती दिली. ते या चळवळीतील एक विदवान आहेत. त्यांचा बहुजन चळवळीतील अभ्यास सखोल आहे. या चळवळीला नरके साहेबांची बरीच पुस्तकं लाभलीत त्यांच्या या योगदानाचे कौतुक करावे तेवढे कमीच. ते आजच्या घटकेला आंबेडकरी चळवळीतील प्रथम ५ विचारवंतात बसतात.
आज सकाळी सकाळी लोकप्रभा हातात पडल्या पडल्या कव्हर पेजवर संभाजी ब्रिगडचं नाव बघुन लगेच संबंधित लेख उघडला. लेख वाचायला सुरुवात केली, बघतो काय तर नरके साहेबानी ब्रिगेड्वर बरीच टिका केली. नरकेनी अक्षरश: ब्रिगेडचे वाभाडे काढले. ब्रिगेडनी कशाप्रकारे फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीला हायजॅक केले हे नरकेना आता नविनच साक्षात्कार झाल्याचं जाणवते. एवढे दिवस हेच नरके ब्रिगेड कशी बहुजनांची संघटना आहे याचं गुणगाण करत फिरायचे. जागो जागी ब्रिगेडवर स्तुती सुमने उधळायचे.
आज मात्र तेच नरके चक्क ब्रिगेडला चळवळीचे हायजॅकर म्हणतात. माणसानी किती कोलांटऊड्या माराव्या त्याला काही मर्यादा नाही, म्हणुनच त्याला कोलांटऊड्या म्हटल्या जातं. आज नरक्यानी एक कोलांटऊडी मारली आता ते अशा अनेक कोलांटऊड्या मारायला मोकळे. ते लिहतात की ब्रिगेडला वाढविण्यात माझा हातभार लागला आहे. अरे हो मग तेंव्हा तुम्हाला हायजॅकपणा कसा काय नाही जाणवला बुवा? आजच कसा काय अचानकच नविन साक्षात्कार झाला तुम्हाला? ब्रिगेडनी भांडारकरव हल्ला केला त्याचं समर्थन करणारे हेच नरके आज लोकप्रभामधे लिहतात की भांडारकर कसे बहुजन हिताचे विचारवंत होते. अरे हे तुम्हाला आधी कळलं नव्हतं का? तुम्हीच तर ओरडुन ओरडुन जगाला सांगत होतात की तो हल्ला कसा योग्य आहे. Youtube वर हरी नरकेचे हे भाषण उपलब्ध आहेत. हरी नरकेनीच माहितीच्या आधाराखाली भांडारकर संस्थेकडुन झालेल्या नुकसानाची माहिती मागविली होती. त्यात स्पष्ट लिहलं होतं की ब्रिगेडवाल्यानी एकही पुस्तक किंवा हस्तलिखीत नष्ट केलं किंवा फाडलेलं नाही. जेंव्हा सगळा मिडीया ब्रिगेडनी नासधुस केली म्हणुन ओरडत होता तेंव्हा हरी नरकेच तर होते ज्यानी ही अधिकृत माहिती उघड केली की ब्रिगेडनी एक पुस्तकाला हात लावलं नव्हत.
त्या लेखात नरके साहेब मुद्दा उपस्थीत करतात की खैरलांजी प्रकरणात ब्रिगेड तटस्थता बाळते. त्यावर एक शब्द बोलत नाही. याचाच अर्थ मराठ्यानी केलेल्या अन्यायाला ब्रिगेड मुक सम्मती देते. ब्रिगेड atrocity बंद करण्याची मागणी करते. हा कायदा दलितांच्या संरक्षणासाठी आहे तेंव्हा ब्रिगेड्नी त्याच्या विरोधात खरच जायला नको. किंवा खैरलांजी प्रकरणातील त्यांची तटस्थता संशयास्पद आहे. हे सगळे हरी नरकेचे मुद्दे ज्यावरुन त्यांचं ब्रिगेडशी बिनसलं. अन हे मुद्दे रास्त आहेत. ब्रिगेडजर अशी वागत असल्यास ते न पटण्यासारखं आहे. पण नरके साहेब पुढे लिहतात की, जेम्सलेन प्रकरणात ब्रिगेडनी आपला वकिल का दिला नाही. किंवा बायकोला भाजपाच्या तिकीटावर निवडनुकीत उतरविणे यावरुन नरके साहेबानी ब्रिगेडचा उद्धार केला. पण खरं तर हा वादाचा मुद्धाच होऊ नाही शकत. कारण जेंव्हा नरके साहेब ब्रिगेडवर स्तुतीसुमने उधळत असत तेंव्हा हे मुद्दे त्यानी का नाही उचलले. तेंव्हा त्याना हे सगळं चालायचं आज कशावरुन तरी बिनसल्यावर हे मुद्दे पुढे करायचे, मला नाही पटलं.
हरी नरके आमच्या बहुजन चळवळीचे मुख्य विचारवंत आहेत. त्यांच्या सारख्या माणसानी अशा प्रकारे आपल्याच संघटनेच्या विरोधात लिखान करायला नको होते.
जर त्यांचे ब्रिगेडशी काही मतभेत असतील तर तो आमचा बहुजनांचा अंतर्गत मामला आहे. त्याला अंतर्गत चर्चेनी सोडविता आले असते. पण आज नरकेनी लोप्रभाच्या माध्यमातुन जे केले त्यामुळे बहुजनांचंच नुकसान होईल. अशा विद्वानानी अंतर्गत कलहात उर्जा खर्ची घालण्यापेक्षा ती मुख्य चळवळीवर केंद्रित करावी. प्रत्येक चळवळीत अंतर्गत मतभेद असतात. पण चळवळ डळमळु नये असे वाटत असल्यास अशा विचारवंतानी अशा प्रकारे अंतर्गत वाद चव्हाट्यावर न  आणता परस्पर सोडविण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा कार्यकर्त्यांमधे संभ्रम निर्माण होतो. मी खरं तर ब्रिगेडशी जोडलो गेलो ते हरी नरकें यांच्यामुळेच. पण आज आपलाच आदर्श जर अशा प्रकारे मतभेद होऊन ब्रिगेडचे वाभाडे काढत असेल तर मग आम्ही कुणाकडे बघायचे. माझ्या सारख्या अनेक वाचकाना संभ्रमात टाकणारं स्टंट घेण्याआधी नरके सारख्या विचारवंताने तो प्रश्न चर्चेने निकाली काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. 

http://www.loksatta.com/lokprabha/20110204/cover.htm