सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

आंबेडकर चळवळ आणि संभ्रम.

मुळात प्रश्न हा आहे की, आंबेडकर चळवळ म्हणजे नेमकं काय?
लोकाना हा प्रश्न विचारल्यावर त्यांची पार धांदल उड्ते. ही चळवळ म्हणजे नेमकं काय हे कुणालाही सोप्या भाषेत सांगता येत नाही. याचं मुख्य कारण आहे आजचा मिडीया. कारण या मिडीयानी तसं चित्र उभं करुन आंबेडकरी लोकांची दिशाभुल केली आहे. आंबेडकर चळवळीतील राजकीय आघाडीलाच आंबेडकर चळवळ म्हणुन नेहमी संबोधल्या जाते. उरलेल्या दोन सामाजीक व धार्मिक आघाडीचा साधा उल्लेखही होत नाही. त्यामुळे कुणालाही आंबेडकर चळवळ म्हटलं की एकच नाव दिसतं, बास... ते म्हणजे रामदास आठवले. अन फार फार तर प्रकाश आंबेडकर अन गवई. यांच्यापलिकडे कुणी जातच नाही. म्हणुन लोकाना असे वाटु लागले की आंबेडकर चळवळ म्हणजे आजुन काही नसुन आठवले, आंबेडकर किंवा गवई. अशा प्रकारे दोन चार फुटक्या राजकिय नेत्यांच्या दावणीला आंबेडकर चळवळ बांधण्य़ाचं फसवं चित्र उभ करणा-या मिडीयाचा तिव्र निषेध.
जेंव्हा आठवले निवड्नुकीत पड्तात तेंव्हा ही अशी अर्धवट टाळक्याची मिडीया आंबेडकर चळवळीची कशी यातायात झाली किंवा उभ्या महाराष्ट्रात आंबेडकर चळवळीची दानदान उडाली म्हणुन मोठठाले पानं भरुन बातमी छापते. यामुळे आंबेडकरी जनतेला खरच आपली दानादान होत आहे की काय, असे वाटु लागते. पण याच धरतीवर सेनेचा किंवा कॉंग्रेसचा एखादा नेता हारल्यास हिंदुंची किंवा संवर्णांची दानादान झाली अशी बातमी येत नाही. तिथे बातमी येते की अमुक तमुक नावाचा/पक्षाचा माणुस हारलाय. पण RPI किंवा तत्सम नेत्यांबद्दल असं होतं नाही. या नेत्याची हार म्हणजे अख्ख्या आंबेडकरी जनतेची हार असाच सुर काढला जातो जो मुळात चुकीचा आहे.
आंबेडकरी जनतेचा राजकीय सहभाग सर्व पक्षात आहे.
आंबेडकरी जनता म्हणजे आर.पी.आय. अन आर. पी. आय. म्हणजे आंबेडकरी जनता असे आभासी समिकरण तयार झाले आहे. जेंव्हा की आंबेडकरी माणुस या व्यतिरीक्त इतरही पक्षात सक्रिय आहे. नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे अशी वेगवेगळी आंबेडकरी माणसं ईतर पक्षात असताना उगीच आम्हाला आर. पी. आय. च्या मोजपट्टीनी मोजले जाते.  बळजबरीने सरसकट सगळ्याना आठवलेच्या दावणीला बांधले जाते. खरे तर आमचे अस्तित्व आर. पी. आय. च्या कक्षा ओलांडुन इतरही पक्षात स्थिरावलेले आहे, सिद्ध झालेले आहे. म्हणुन आर. पी. आय. ची हार म्हणजे आंबेडकरींची हार असे नाहिच मुळी. पण मिडिया मात्र सर्रास पणे तसा अर्थ लावुन आमच्या बांधवांचं उगीच खच्चिकरण करीत असते.  
आंबेडकर चळवळ म्हणजे आठवले का? आंबेडकर चळवळ म्हणजे ढसाळ का? आंबेडकर चळवळ म्हणजे RPI का? उत्तर नक्कीच नाही असेच असणार. कारण आंबेडकर चळवळ ही फार व्यापक चळवळ आहे. आंबेडकर चळवळीचे तिन प्रमुख आघाड्या आहेत.
१) राजकिय़ आघाडी २) सामाजीक आघाडी ३) धार्मिक आघाडी.

१)  राजकिय़ आघाडी : आंबेडकर चळवळीची हि एक आघाडी आहे. या आघाडीद्वारे आंबेडाकरी जनता राजकीय क्षेत्रात उतरविली जाते (ईतरही पक्षात उतरते हे ही तेवढेच खरे)  गावो गावी आंबेडकरी चळवळीचे राजकीय आघाडिवर काम करणारे कार्यकर्ते पसरलेले असुन दिवस रात्र या विविध आंबेडकरी पक्षाना यश मिळवुन देण्याच्या हेतुने गाव पातळी पासुन ते अगदी शहरा पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता झट्ताना दिसतो. पण या आघाडीत येणारे बहुतेक कार्यकर्ते हे समाजाच्या तळमळीपेक्षा स्वत:चं उखळ पांढर करण्यासाठी आलेले असल्यामुळे आज आंबेड्कर चळवळीची राजकीय आघाडी फार बदनाम झालेली आहे. सगळ्या बाबतीत या आघाडीचे तिन तेरा वाजले आहे. पण मिडीयाने एकमेव याच आघाडीला उचलुन धरल्यामुळे सगळ्या चळवळीची वाताहत झाल्याचा संदेश जातो.
२)     सामाजीक आघाडी: या आघाडी द्वारे समाजातील लोकांचे जिवनमान कसे उंचविता येईल, मुख्यत: यावर भर दिला जातो. समाजाचे जिवनमान उंचविण्याची प्रक्रिया सुरु होते विद्यादानापासुन. म्हणुन या आघाडीने विविध ठिकाणी वसतीगृहे बांधुन समाजातील गरिब मुलांची शिक्षणाची सोय केली आहे. शिक्षणामुळे आयुष्यात मुलभुत फरक पडतो अन पुढीळ सगळ्या समस्या सोडविताना फार अडचणी येत नाहीत. विविध सामाजीक संस्थां मार्फत अगदी पहिली पासुन ते पदवी पर्यंत शिक्षणाची सोय केली जात आहे. याही पुढे जाऊन MPSC UPSC च्या परिक्षेसाठी मोफत वर्ग चालविले जात आहेत. अशा प्रकारे समाजाच्या विचारसरणीत मुलभुत बदल घडविणारा महत्वाचा घटक म्हणजेच शिक्षण  प्रबोधनात्म काम या सामाजीक आघाडीने चालविले आहे. बॅंक, पतसस्था, को-ओपरेटीव गृहसंस्था अशी विविध कामे या आघाडी द्वारे चालविली जातात.
आज आमच्या समाजातील लोकं प्रत्येक ठिकाणी पोहचलेली आहेत. हा सामाजीक बदलाचाच तर प्रतिबिंब आहे. सरकारी नोक-यामधे साध्या चपराश्या पासुन ते अगदी सनदी अधिका-या पर्यंतच्या जागा पटकावुन बसणारा हा बदल कशामुळे झाला? ही सामाजीक आघाडीच्या कार्याची पावती आहे. पुण्याच्या दापोळीच्या प्रशिक्षण केंद्रात दर वर्षी सनदी अधिकारी येऊन फुकटात मार्गदर्शन करतात. आपल्या समाजातिल मुलानी प्रशासकीय सेवेत यावे या साठी ब-याच ठिकाणी अभ्यासक्रम चालु करण्यात आले. आज खाजगी क्षेत्रातही आम्ही उतरलो आहे. उत्पादन कंपन्यांपासुन ते आयटी पर्यंत सगळीकडे आमची लोकं आपली चुणुक दाखवित आहेत. हे सगळं सामाजीक आघाडीमुळे शक्य झालं आहे.

मला कुणीतरी म्ह्टलं होतं की हे सगळ आरक्षणामुळे होत आहे.
त्यावर माझं उत्तर असं आहे की, आरक्षणाचा सर्वोत्तम उपयोग करण्यासाठी जी जागरुकता लागते ती या आघाडीमुळे मिळते. अन्यथा तुम्ही जर जागरुकच नसाल तर मिळालेल्या आरक्षणाला मातीत मिसळण्यास वेळ लागत नाही. आज इतर लोकानाही आरक्शण आहे पण आम्ही तुलनेने जास्त जागरुक असल्यामुळे त्या आरक्षणाचं चिज करुन दाखवित आहोत. पण याच्या अगदी उलट ज्या समाजाची सामाजीक आघाडी सक्रिय नाही त्याना आरक्षन मिळुन सुद्धा फारशी प्रगती करता आली नाही. आरक्षण हे डोंगराचा कडा चढण्यासाठी लागणा-या दोरी सारखं आहे. त्या दोरीनी कडा चढता येतो. पण चढण्यासाठी जे बळ लागते ते तुम्हाला मिळालेल्या खुराखातुन तयार होते. अगदी याच धर्तिवर मिळालेल्या आरक्षणाच्या दोरीचा सर्वोत्तम वापर तोच करेल ज्याचा सामाजीक पातळीवर जास्तीत जास्त जागरुकीकरण झालं आहे. अन आज माझा समाज जे काही पादाक्रांत करत आहे त्याला आरक्षणाएवढीच जागरुकतेची जोड आहे. अन हि जोड लाभते सामाजीक आघाडीच्या सक्रियतेतुन.

३)     धार्मिक आघाडी: आंबेडकर चळवळीचा मुख्य कणा खरंतर धार्मिक आघाडीच असायला हवी होती. पण ईथे तसं होताना दिसत नाही. बुद्ध धर्म हा जगातिल सर्वोत्तम धर्म आहे अन या धर्माच्या तत्वानुसार वागल्यास माणसाचा सर्वांगिन विकास तर होणारच पण माणुस सगळ्या भौतिक दु:खापासुन मुक्त होऊन एक दर्जेदार जीवन जगु शकतो. आंबेडकर चळवळीची धार्मिक आघाडी जोमाने काम करत आहे. दर वर्षे शेकडो नविन बुद्ध विहारांची भर पडत आहे. आज काल लोकं अभिमानाने मी बौद्ध आहे असे सांगु लागले. या जणगणनेत तर कित्येकानी आपली जात लिहलीच नाही. धर्म बौद्ध लिहुन पुढचे रकाने खाली सोडले ही आहे धार्मिक प्रगती. पण आजुन या आघाडीने बराच पल्ला गाठायचा आहे. पण या आघाडीच्या कामाची दखल करणारं एकही लेख मिडिया छापत नाही. म्हणुन एकंदरीत होणारी प्रगती लोकाना दिसत नाही. मिडीया ईथे दुटप्पीपणा करते. म्हणुन लोकांमधे सुद्धा संभ्रम आहे, उदासिनता आहे. आज जरी मिडीयानी या आघाडीवर फोकस नाही केला तरी हळु हळु का होईना धार्मिक विचार, बौद्ध विचार प्रत्येक आंबेडकरी माणसाच्या घरी पोहचत आहेत. त्याचा परिणाम लवकरच केंद्र सरकार  जणगणना पुर्ण झाल्यावर घोषीत करेलच.
माणसाला जगण्यासाठी धर्म हा लागतोच लागतो असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं. म्हणुन त्यानी आम्हाला एक चांगला धर्म देण्याचा निश्चय केला व एक सर्वोत्तम धर्माची दिक्शा दिली. आज बुद्ध धर्माच्या छत्रछायेत वाढणारा बौद्ध समाज, फार सामंजस्य आहे, संयमी आहे, कष्टाळू आहे. ईमान आणि प्रामाणिकपणा हा तर आमचा स्थायी गुण अन या गुणामुळे दिवसेंदिवस आमची प्रगतीच होत आहे. याचाच परिणाम आज प्रत्येक ठिकाणी बौद्ध बांधव नोकरी व व्यवसायात दिसतो. या पलिकडे जाऊन दर रविवारी जागो जागो बुद्ध वंदना घेऊन धम्माचेही पालन करीत आहे. खरं तर आमचे आई वडील हे हिंदु म्हणुनच जगले. आमच्यावर संमिश्र संस्कार झाले. आम्ही अर्धे हिंदु व अर्धे बौद्ध अशा अवस्थेत वाढलो. नंतर बौद्ध बनलो, बनलो कसले मी व माझ्या वयाच्या सगळ्यानी स्वत:ला जाणिवपुर्वक बौद्ध करुन घेतले. म्हणुन माझ्या पिढी पर्यंततरी हिंदु धर्मानी आमच्या पिच्छा केलाच. पण खरी बुद्ध धर्माच्या छायेत वाढ्णारी पिढी आहे आमची मुलं. त्यांची जडण घडण ही शुद्ध बुद्ध धर्मात होत आहे. अन बुद्धाच्या तत्वातील ताकत परिणाम दाखवुनच दम घेईल. म्हणुन हि पिढी आजुन जास्त परिणामकारक निकाल देईल यावर दुमत नाही.

हि आहे वरिल तिन आघाड्यांची वास्तविकता.
 -------------------------------------------------------

पण यातिल वरिल दोन आघाड्यांच्या कार्याला मिडीयानी नेहमीच बगल दिली. आज आपण सगळे फक्त एकाच आघाडीला फार फोकस करतो आहेत.  इतर दोन आघाड्या दिवस रात्र आंबेडकर चळवळ चालवित आहेत त्यांच सबलीकरण होणे जास्त गरजेचं अन परिणामकारकही राहील. त्या दोन आघाड्या जर सशक्त झाल्या तर राजकीय आघाडीवर वचक बसविणे सोपे जाईल. नाहीतर हि राजकीय आघाडी अशीच सैरावैरा भटकेल. आज भाजपवर जसा RSS चा जसा वचक आहे. तसा राजकीय नेत्यांवर वचक ठेवायचा म्हटल्यास ईतर दोन आघाड्या बळकट होणे अपरिहार्य आहे. म्हणुन सगळ्य़ानी उठ सुठ राजकारणावर बोलण्यापेक्षा या दोन आघाड्यांवर लक्श केंद्रीत केल्यास तिसरी आघाडी मुठीत असेल.
मुळात आपलं समिकरणच आजवर चुकल बरं का! कारण कुठलीही राजकीय आघाडी ही त्याच्या सामाजीक आघाडीच्या बलस्थानावर उभी असते. जेवढी सामाजीक आघाडी बलवान तेवढं राजकीय अस्तित्व स्थीर. आज आपलं समीकरण उलट दिशेन मांडल्या जातं. आधि राजकी बळ प्राप्त झाल्यास सामाजीक बळ मिळेल असा समज झाला अन उठला सुठला कोणीही राजकारणावर बोलु लागला. पण वास्तविकता तशी नाहीये. ज्या समाजाचा पाया खंबिर त्या समाजाचं राजकीय अस्तित्व मोठं, टिकाऊन अन स्थीर. आज आपल्याला जर राजकीय वैभव प्राप्त करुन घ्यावयाचा असल्यास आधि सामाजीक आघाडीवर लढणे गरजेचं आहे. समाजामधे मुलभुत फरक घडवुन आणावा लागले. लोकांमधे वैचारिक क्रांती घडवुन आणने गरजेचं आहे. हे सगळं घडायला अविश्रांत कष्ट घ्यावे लागतील. एकदा  समाजाचं सबलीकरण करणारी कणखर यंत्रणा उभी झाली की मग त्या यंत्रणेतुन राजकीय दबदबा तयार होतो. हे सगळ करण्यासाठी संयम, दिर्गोद्योग व चिकाटी लागते. ती आधी तपासुन पहावी लागेल.
बाबासाहेबानी धर्मांतर घडवुन आणण्यामागे त्यांचा मुख्य हेतु असा असावा की, बुद्ध धर्म हा तर्कावर तपासुन बुद्धीला पटणा-या गोष्टिंचा स्विकार करणारा धर्म होय. यामुळे लोकांमधे जागृती निर्माण होईल. प्रत्येक गोष्टीला बुद्धीच्या कसोटीवर तपासण्याची सवय जडल्यामुळे इतर गोष्टींचा शिरकाव होणार नाही. त्यामुळे आपल्या हिताचं व अहिताचं काय आहे हे लोकाना अचुकपणे पकडता येईल असा हा एकंदरीत ढोबळ विचार असावा. आपल्या दैनंदीन जिवनात बुद्धाच्या तत्वाचा अवलंब केल्यास ही तत्वे माणसाचा विकास केल्या शिवाय थांबणार नाही हे बाबासाहेबानी अचुक हेरलं होतं. ज्या ज्या लोकानी बुद्धाच्या तत्वाचा काटेकोरपणे पालन केलं ते आज खुप पुढे निघुन गेलेत. पण ज्यानी बाहेर बौद्ध असल्याचा सोंग केला पण मुळात हिंदुत्वाला चिकटुनच राहिले ते जरी आर्थिक प्राबल्य मिळवुन बसलेही असतील पण मुळात नितिमत्तेला सोडुन जगल्यामुळे  ना त्यांचा हवा तसा विकास होत आहे ना धार्मिक परिवर्तन होत आहे. उलट या लोकांमुळे धर्माची प्रतीमा मलिन होते आहे.  किंवा बुद्ध तत्वज्ञानाचे फायदे ज्या प्रमाणात मिळायला हवे होते, जो निकाल बाबासाहेबाना अपेक्षित होता तो न येण्याचं मुख्य कारण तत्वांशी केलेला खेळखंडोबा होय. आजही वेळ गेली नाही. आजही बुद्धाच्या तत्वाचे निट पालने केल्यास आपला उद्धार झाल्यावाचुन राहणार नाही.
एक चांगला समाज हा राजकारण्यांद्वारे केंव्हाच घडविला जात नाही. कारण राजकारणात नजिकच्या काळातिल फायद्यांचा विचार केला जातो. जसे की पुढच्या निवडनुकीत आपल्याला यश मिळवायचे असल्यास कोणत्या वर्गाला जवळ करावे? काय काय नविन आमिष दाखविता येईल?  अशा प्रकारचे अगदीच पाच वर्षाच्या आतिल गोश्टिना डोळ्यापुढे ठेऊन राजकीय डावपेच मांडले जातात. २०११ मधे एखादा राजकीय पक्ष २०२५ ची स्थीती डोळ्यापुढे ठेऊन कार्यक्रम आखत नाही. तो तयार समाजाच्या आजच्या समजुतींवर आपली पोळी कशी भाजता येईल हे पाहतो. अन सामाजीक संस्था मात्र आज पासुन २५ वर्षानी या समाजाची एकंदरीत विचार सरनी अशी अशी असावी असे ध्येय ठेवून काम करते. सामाजीक पातळीवर बदल घडवायचे म्ह्टल्यास किमान एका पिढीचा विचार करुन धोरणं ठरविली जातात. जेंव्हा की राजकारणात एक टर्म जी ५ वर्षाची असते त्या नुसार हे गणित मांडले जाते. आज आमच्या बाबतीत हिच गल्लत झाली आहे. कोणिही उठतो व राजकीय मार्गाने काही करता येईल का याची चाचपणी करतो. मला तर यातही शंका येते. पैसे व नाव कमविण्याचा सोपा मार्ग म्हणुन राजकारणात शिरकाव होतो माझं असं स्पष्ट मत आहे. ज्याना खरच या शोषीत बांधवांचा विकास करायचा आहे त्यानी सामाजीक यंत्रणेच्या माध्यमातुन विकासाची कामं हातात घ्यावी. आता सामाजीक विकास म्हटल्यावर काही लोकं उगीच सरकारच्या अनुदानावर गळा काढतात. पण अनुदाना शिवायही सामाजीक विकास साधता येतो. पण त्या साठी लागते खरी तळमळ, आतुन आलेली समाज सेवेची कळ. पण लोभामुळे आलेली कळ मधेच विरते.

माझ्या समाजाचं आजचं चित्र हे केवळ राजकिय पट्टीनेच मोजुन ठरविल्या जात आहे. आर. पी. आय.लाच आमचा चेहरा समजल्या जात आहे. समाजाचा उद्धार करण्यासाठी लोकाना राजकारण हा एकमेव मार्गच दिसतो आहे. पण राजकीय अस्तित्वाला स्थैर्य देणारा बहुमोल घटक हा नेहमी समाज असतो  व हा समाज मजबुत असावा हे सुत्र सगळे विसरतात. त्याचा फक्त वापर करण्यापुर्तीच आजवर विचार झालेला दिसतो. त्याच्यात मुलभुत बदल घडवुन आणण्यात किमान राजकीय पुढा-याना तरी रस नाही. उपलब्ध सामाजीक स्थीतीचा महत्त्म फायदा मिळविण्याचे खेळ खेळले जातात. किंवा आयत्या समाजावर डल्ला मारणे चालु आहे. त्यासाठी फार कष्ट पडत नाही. ज्या समाजाला मोहात पाडायचे आहे त्याचा आजचा थोडासा अभ्यास करुन लगेच आपल्याकडे ओढता येते. याच धर्तिवर आंबेडकराच नाव घेऊन विविध राजकीय पक्ष आपली पोळी शेकत आहेत. पण कळस म्हणजे आठवले सारखे लोकं सगळी आंबेडकरी जनता म्हणजे माझी वयक्तीक संपत्ती आहे अशा गोड गुमान स्वप्नातच रंगलेली दिसते.  आता समाजानेही आपली कुस बदलली आहे. तो इतर पक्षातिल उमेदवाराना आपलं मत देऊ लागला आहे. आर. पी. आय. ही समाजाची बांधिल पार्टी नाही हे वेळोवेळी स्वत:ला गहान ठेवणा-या नेत्यांमुळे साबित झालं आहे. आजवर आंबेडकर चळवळीची राजकीय आघाडी वेळोवेळी गहान पडली. याचे मुख्य कारण या पक्षावर वचक ठेवणारी बौद्ध समाजाची एखादी सामाजीक संस्था नाही. आता गरज आहे अशा सामाजीक संस्थेची जीचा या समाजावर सामाजीक वर्चस्व असेल अन या सामाजीक सस्थेद्वारे राजकीय आघाडीला वेसन घालता येईल.  पुढेतरी मिडीयानी राजकीय आघाडी म्हणजे आंबेडकर चळवळ असा आज पर्यंतचा घोळ बाजुला सारुन वास्तविकता बघावी. आंबेडकर चळवळ आणि चळवळीतील एक आघाडी यातिल गल्लत टाळावी.

जयभिम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा