मंगळवार, १ मार्च, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १५ (महाड सत्याग्रहाची तयारी)

जुन १९२७ मंदिर प्रवेशाचा विचार विनिमय सुरु झाला. पेपर मधुन तशा बातम्या सोडण्यात आल्या. त्यामुळे लोकांचा एकंदरीत कल काय आहे तो आजमावण्याचा हा डाव होता. बाबासाहेबानी लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेण्याचे जाहिर करताच सनातन्यानी सडकून टिका चालू केली. आतातर धमक्याही येऊ लागल्या होत्या. अस्पृश्यानी नसले उद्योग करु नये अन्यथा त्याना धडा शिकविण्यात येईल अशी सर्वत्र चर्चा चालु झाली. बाबासाहेबाना जे हवं होतं ते मिळालं. सनातन्यांचा रोख काय आहे याचा त्याना अचूक अंदाज आला. आता त्या अनुषंगाने तेवढाच सशक्त लढा उभारणे गरजेचे होते. नुकतीच महाडची मोहीम फत्ते झाल्याचा आनंद होताच. आता मंदिर प्रवेशाची मोहिम हाती घ्यावयाची होती.
याच दरम्यान पेपरात एक क्रांतिकारी बातमी आली. मुंबईतील ठाकुरदास येथील नविन मंदीर सगळ्यांसाठी खुले आहे असे मंदिरांच्या संचालकानी जाहिर केले. हे वाचुन बाबासाहेब फार सुखावले. आपल्या कार्यकर्त्याना बातमीची खात्री करायला सांगितले. खात्री पटल्यावर संचालकांशी संवाद साधुन मंदिरात जाण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे बाबासाहेब सीताराम शिवतरकर व काही कार्यकर्त्याना सोबत घेऊन मंदिरात पोहचले. बाबासाहेबाना बघुन सनातन्यानी एकच गिल्ला केला. महार मंदिर बाटविण्यासाठी येथेही आला असा ओरडा करुन गुंडांच्या मदतिने दमदाटी सुरु झाली. बाबासाहेबानी धिटपणे त्याना उत्तर दिले की, मी संचालकांच्या आग्रहाने ईथे आलो आहे त्यांच्याच सांगण्याने परत फिरेन तुमच्या नाही. मग या सनातनी गुंडानी संचालकांशी बाचाबाची केली, त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली, दमदाटिही केली. संचालकांनी नमतं घेऊन बाबासाहेबाना प्रवेश न देताच परत जाण्याची विनंती केली. ईथे परत एकदा बाबासाहेबांचा पराजय झाला. सनातनी विजयी झाले. या घटनेने बाबासाहेब फार दुखावले.
इतर धर्मियांचे प्रचारक आमचा देव सगळ्यांसाठी खुला आहे, सगळ्यानी ईकडे यावे असे आवाहन करत असताना हिंदु मात्र आपला देव आपल्याच बांधवांपासुन बंदिस्त करते होते. आपल्याच लोकांपासुन देवाला दूर नेत होते. इतर प्रचारक बोलावत होते, हिंदु मात्र हाकलत होते. हा मूलभूत फरक होता. 
जुलै १९२७ पुण्यातील मांगवाड्यात अस्पृश्यांची सभा भरली. बाबासाहेब सभेस हजर होते. चांभारानी बाबासाहेबांवर टिका केली. तुम्ही फक्त महारांचच हीत बघता म्हणून तक्रार केली. आम्हिही अस्पृश्य आहोत, आमच्याकडे तुमचं लक्ष नसतं वगैरे बरच काही सुनावलं. यावर बाबासाहेबानी त्यांना झणझणीत उत्तर देताना म्हटलं की "मी जी वसतीगृह चालवित आहे ती सगळ्या अस्पृश्यांसाठी खुली आहेत. माझ्या घरी मांगाच्या पोराला शिक्षणासाठी ठेवलं आहे. पी. बाळु या चांभाराला मुंबई नगरपालीकेच्या सदस्यस्थानी नेमले आहे. तेंव्हा तुम्ही उगीच गैरसमज करुन घेण्यापेक्षा माझ्या कार्याकडे डोळसपणे पहावे. हिंदु संघटनांचे प्रेम मायावी आहे. मुसलमानाच्या धाकापायी हे तुमच्याशी गोड बोलतात. यांचा डाव ओळखून वागायला शिका. असे सडेतोड उत्तर देऊन चांभारांची कानऊघडणी केली व सभा संपली.
तिकडे महाडला सनातन्यानी चवदार तळे शुद्ध करण्याचा चंग बांधला. महारांच्या स्पर्शानी बाटलेले तळे गोमुत्र शिंपडुन  शुद्द करण्यात आले. हे ऐकुन बाबासाहेब फार संतापले. आता तळे परत शुद्ध झाल्यामुळे दलिताना मज्जाव होता. याच दरम्यान मंदिर प्रवेशाची बातमी अधे मधे येत असे. बाबासाहेब म्हणत की, आज पर्यंत अस्पृश्यता ही हिंदु धर्मावरिल कलंक आहे असा समज होता. पण आता कळले की तो या धर्मावरील कलंक नसुन आमच्या देहावरिल कलंक आहे. म्हणुन याची सफाई धर्माकडुन होणार नसुन आता ती आम्हीच करणार आहोत. आमच्या देहावरचा कलंक आता धर्माने पुसण्याची गरज नाही आम्ही तो स्वत: पुसु." धर्माचा अधिकार नाकारुन मानवी अधिकार निर्माण करण्याचा व आत्मसन्मानाने जगण्याचा तो नवा संकेत होता. माझ्या आयुष्याचं मुल्य कोण्या धर्मानी ठरवावं हे तत्वज्ञान नाकारण्याची सुरुवात ईथून झालेली दिसते. ती काही वर्षानी पुढे येवल्यातील घोषणेनी पुर्णत्वास येते. तर....
४ ऑगस्ट १९२७ रोजी महाड नगरपालिकेने आपला पुर्विचा निर्णय फिरविला अन तळ्यावर बंदी घालणारा नविन ठराव पास करुन घेतला. केवढा हा नालायकपणा. अस्पृश्याना आजवर सनातन्यानी अटकाव केला होता पण आता नगरपालिकेने ठराव पास करुन सनातन्यांच्या पाठिशी राहण्याचे ठरविले. आपलाच पुर्विचा निर्णय फिरविताना थोडीही लाज वाटली नाही.
आता उठाव अधिक तीव्र होणार हे जाहीर होते. परत एकदा चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याची बाबासाहेबानी भीम गर्जना केली.
पुण्यातील ब्राह्मणेत्तर पुढारी जेधे-जवळकरानी या सत्याग्रहास पांठिंबा देण्याचे जाहिर केले. पण त्यानी बाबासाहेबांपुढे एक अट ठेवली की या चळवतील सगळ्या ब्राह्मण कार्यकर्त्यास व पुढा-यास बाहेरचा रस्ता दाखवावे. बाबासाहेबानी ही अट नाकारली. तेंव्हा ते असं म्हणतात की ब्राह्मण आमचे शत्रु नाही, आमचा शत्रु आहे ब्राह्मण्य. अन ब्राह्मण्य हा कोणा एक अमुक तमुक जातीत नसून तो सर्वच उच्च वर्णिय समजल्या जाणा-या जातीत मोठ्या प्रमाणात आहे. माझे भांडण तत्वासाठी आहे. या पवित्र कार्यास तत्वनिष्ठेनी पुढे येणा-या प्रत्येकाचं स्वागत आहे. सत्याग्रहासाठी सभासदांची नाव नोंदणी सुरु झाली. जिकडे तिकडे लोकानी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी नावं नोंदविली. भारताच्या कानाकोप-यातुन पुढा-यानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे कळविले. ठराव फिरविल्याने आता धुगधुगणा-या आगिचे भडक्यात रुपांतर झाले होते. अन २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाडला सत्याग्रह करण्याची भिम गर्जना झाली व सा-या देशात ती दुमदुमु लागली.
बाबासाहेबानी या चळवळीचे परिणाम व तिव्रता याची लोकाना जाणिव करुन देण्यास सुरुवात केली.
या सत्याग्रहात शांतताभंग झाल्यास सरकार मधे पडणार हे निश्चित होते. कार्यकर्त्यानी कारागृहात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपली जबाबदारी ओळखुनच काम हातात घ्यावे. शांतता व कायदा सुव्यवस्था हातात घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपली जनता आतून पेटलेली आहे. मूलभूत अधिकार फिरविल्यामुळे आमच्या गालावर थापड मारल्या सारखे झाले. आता मात्र आम्ही हे सहन करणार नाही. सरकार मात्र आपल्यावर दबाव आणनार हे निश्चित होते. अन आपण हूकूम मोडीत काढला नि भावनांचा उद्रेक बाहेर पडल्यास तुरुंगात जावे लागणार हेही पक्के होते. त्यामुळे आता होणा-या महाड सत्याग्रहात सगळ्यानी तुरुंगात जाण्याची तय्यारी ठेवावी अशी बाबासाहेबांची भुमीका होती व ती इतरांना नीट समजावून सागंण्याचे काम चालू झाले. आपण हक्कासाठी लढा देणार आहोत तेंव्हा घाबरण्याचे कारण नाही. १०० वर्षे कुजत जगण्यापेक्षा घटकाभराचा पराक्रम मोलाचा असतो. आता महाडला पराक्रम गाजविण्याची वेळ आली आहे वगैरे विविध लेखनांतून व भाषणातून बाबासाहेब बोलू लागले. यामगचे कारण एकच, की येणा-या लढ्यात आपण कशाचा सामना करणार आहोत याची आपल्या बांधवाना नीट कल्पना असावी, एवढच. अशा प्रकारे आपल्या लोकांत नवचैतन्य भरण्याचे काम युद्धाची पुर्वतय्यारी म्हणून केले जात होते.
याच काळात पुण्यात एक अत्यंत महत्वाची घटना घडली. पुण्याचे ब्राह्मणी व भटाळलेले जातियवादी नेते टिळक यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांच्याशी बाबासाहेबांचा परिचय झाला होता. श्रीधरपतं अत्यंत पुरोगामी विचाराचे होते. त्यांचा जातियवादाला कडाडून विरोध होता. बाबासाहेबांच्या कार्यानी ते भारावून गेले होते. ते फार थोड्या अवधित बाबासाहेबांचे चांगले स्नेही बनले. अस्पृश्यांसाठी काहितरी विधायक काम करावं अन त्याना त्यांचा अधिकार बहाल करावा ते या मताचे होते. १९२७ च्या गणेशऊत्सवात केसरी तर्फे होणा-या कार्यक्रमामधे अस्पृश्यांना आमंत्रित करण्याचे त्यांनी ठरविले. केसरीच्या संचालकानी श्रीधरपंताना कडाडुन विरोध केला. पवित्र गायकवाड वाड्यात (आजचा टिळक वाडा) अस्पृश्याना बोलाविण्याच्या विचाराचा कडक विरोध झाला. सगळ्या संचालकानी श्रीधरपंताना धारेवर धरले. पण ऐकतील ते श्रीधरपंत कसले. समस्त संचालकांच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य कार्यकर्ता श्री. राजभोज यांचा श्रीकृष्ण मेळाव्याचे कार्यक्रम गायकवाड वाड्यात ठेवण्यात आले. मेळाव्यात अस्पृश्यांचे आगमन होताच सगळे ब्राह्मण चवताळले. कार्यक्रमात अस्पृश्याना धक्काबुक्की करण्यात आली. पण शेवटी श्रीधरपंतने हा कार्यक्रम घडवून आणलाच अन अस्पृश्यांबद्दल त्यांच्या मनात असलेली तळमळ दाखवुन दिली. श्रीधरपंतांच्या या धैर्याचे कौतुक करण्याचे ठरले. पुण्यात अभिनंदनपर सभा घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुण्याच्या पापी भुमित ज्योतिरावा नंतर आज परत एक क्रांतिकारी समाजोद्धारक ईथली पापे धुवुन काढण्यासाठी उभा ठाकला होता. हीच ती नालायक लोकांची नगरी जिथे अस्पृश्यांचा सगळ्यात जास्त छळ झाला होता. पण या भुमीचं वैशिष्ट्य असं की इथेच ती पापं धुवून काढणारी उद्धारकही वेळोवेळी जन्मास आला होता. यावेळी इथे श्रीधरपंतांच्या रुपाने एक नवे नाव उदयास आले होते. पुण्याच्या पापी इतिहासाला नेहमीच पुण्याचा इतिहास भारी पडला होता. तो आजही पडणार होताच, इतिहासात एक नवे पान लिहले जाणार होतेच. पण दुर्दैवाने तो लढा खूप दूरवर जाणार नव्हता एवढएच. तर ईथल्या सनातनवाद्यांचा या थोर पुरुषाच्या कार्याला विरोध होता. त्यानी हीन पातळीवर जाऊन श्रीधरपंतांचा छळ चालविला. नको नको ते आरोप सुरु झाले. अस्पृश्यांच्या बाजूने उभे राहण्याची किंमत मोजताना अनेक  आरोप व सामाजाती हल्ले सहन करावे लागले. जिवाला सळो की पळो करुन टाकणारा ब्राह्मण द्वेष पंताच्या मागे लागले. सर्वत्र त्यांची अवहेलना सुरु झाली. जातीतून प्रखर विरोध होऊ लागला. आपले दुपले सगळेच दुरावू लागले. एकूण त्यांचं जगण तिथे हराम करुन सोडण्यात आलं. हे सगळं सहन न झाल्याने शेवटी त्यानी आत्महत्या केली व आशेची एक किरण उगवण्या आधीच मावळली. हा भारतीय अस्पृश्य लढ्याला एक हादरा होता. 
पण ते मरण्याआधी बाबासाहेबाना एक पत्र लिहतात. त्यात ते म्हणतात हे पत्र तुमच्या हाती लागले तेंव्हा बहुतेक मी हे जग सोडलेले असेल. पण तुम्ही काळजी करु नका. मी मरत नाहिये. मी तुमची गा-हानी सांगण्यास मी कृष्णाच्या दरबारी जात आहे. येथील लोकानी, संवर्णानी अस्पृश्याची चालविलेल प्रतारणा बघवत नाही. तुम्ही लढा दया. पण तुमच्या लढ्याला यश आलच पाहिजे अशी विनविनी करण्यासाठी त्या वासुदेवाचे पाय धरयाला मी पुढे जात आहे. हे पत्र वाचुन बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले. एक चांगला मित्र आणि पुरोगामी विचारांचा नेता हरविल्याचं दु:ख त्याना आवरेना.
या सगळ्या प्रकारामुळे ते आजुन संतापले अन महाडचा सत्याग्रह अधिक तीव्र कसा होईल या दिशेने मोर्चेबांधणी सुरु झाली. आता अस्पृश्यांचा लढा उभा हिंदुस्थानाला गदागदा हलविणार होता. त्याची सुरुवात झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा