सोमवार, ११ एप्रिल, २०११

अण्णा........ गाठ माझ्याशी आहे

नुकतच अण्णानी भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपाल विधेयेक पास व्हावा यासाठी देशव्यापी आंदोलन उभं केलं. खरंतर ते उपोषणाला बसेस्तोवर त्याना कुणी फारसं सिरीयसली घेतलच नव्हत. मुळात लोकपाल विधेयक आहे तरी काय हे ही उपोषणापुर्वी फारसं माहित नव्हत. अण्णानी आता पर्यंत केलेले किंवा आम्ही पाहिलेले बरेच उपोषणं हे पवार अन्ड पार्टीचा काटा काढण्यासाठी असा साधारण समज असल्यामुळे हे ही त्यातलचं समजुन फारसं लक्ष दिलं नाही. पण जेंव्हा महाराष्ट्रातली गांधी टोपी दिल्ली हालवुन सोडते तेंव्हा जरा खोलात जाऊन या उपोषणाची माहिती घेतली.
गांधी व जेपीची चळवळ आम्ही नाही बघितली. या दोघानी म्हणे उभ्या भारतातुन समर्थन व समर्थक दोन्ही मिळविले होते. त्या नंतर अण्णाची दिल्ली धडक हि तिसरी अशी चळवळ होती जीला भारताच्या कानाकोप-यातुन समर्थन मिळालं होतं. आज पर्यंत आम्ही हेच बघत आलो की अख्खा देश एका मुद्यावर एकवटने म्हणजे अशक्यप्राय घटना. पण अण्णानी ते करुन दाखवलं. या देशातिल सामाजीक कार्यकर्ते, सनदी अधिकारी, सनातन्यांचे गुरु (जे सगळ्यात जास्त भ्रष्ट व भोगी आहेत) चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व आंतराष्ट्रिय ख्यातीचे खेडाळू अशी एकुणच सगळ्या स्तरातुन अण्णाना पाठिंबा मिळाला. फेसबुक व ट्विटर तर ओसंडुन वाहत होतं.  जागो जागी तरुणानी एकत्र येऊन कॅंडलमार्च काढले, गांधी टोप्यांची जिकडे तिकडे रेलचेल दिसली.  एकंदरीत सगळा भारत अण्णाच्या पाठीशी उभा होता. कित्येकाना प्रत्येक्ष कार्यात भाग घ्यायला न जमल्याने एखाद्या साईटवर कंपु बनवुन जमेल तसा पाठिंबा देऊन कार्य सिद्दिस जावं अशी मनिषा बाळगली.
पण हे साला अण्णाचं उपोषण आपल्याला नाही बुवा आवडलं. कारण काय तर ते उपोषण म्हणे भ्रष्टाचाराच्या विरोधात होतं. अण्णांचं म्हणन असं आहे की भ्रष्टाचार करणा-या अधिका-याला, राजकारण्याला किंवा कुठल्याही व्यक्तिला कडक शिक्षा व्हावी यासाठी लोकपाल नावाचा नवा पहारेदार आपल्या मानगुटिवर बसवुन घ्यायचा. हा पहारेदार नुसतं भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणार नाही तर म्हणे तो स्वत:च एक समांतर न्यायालय असणार.  हे ऐकुन उपलब्ध न्यायाधिशांनी उसासा टाकला एवढं नक्की. नाहीतर काहिही नविन आलं की यांच्याच बोकांडी पडायचं. मी तर अण्णाच्या नावानी लाखोल्या वाहल्या. कारण काय तर कुठलही सरकारी काम पैसे चारल्याशिवाय होत नाही यावर माझा ठाम विश्वास. ही पैसे चारण्याची वृत्ती माझ्यात सहजासहजी आली नाहीये. मी कित्येक ठिकाणच्या अनुभवातुन हे दिव्य गुण विकसीत केलं.  २०-२५ वर्षाच्या मेहनतीने आत्ता कुठे थोडं जमु लागलं होतं की पैसे कसे चारावे अन आपलं काम करुन घ्यावं तर या अण्णानी गोंधळ घातला. एखाद्या सरकारी हाफिसात काम असलं की मला आनंदाच्या उकडया फुटतात. कारण काय तर पैसे चारल्यावर, थोडं गोड गोड बोलुन टेबलाखालुन एक पाटिक सरकवल्यावर माझं काम हमखास होतं. एखाद्या बाबुनी पैसे मागितले नाही तर मला चक्क घाम फुटतो, जीवाची घालमेल होते. आता हा पैसे नको म्हणाणार की काय, तसं झालं की वाजले तीन तेरा माझ्या कामाचे. म्हणजे सरकारी वेळेनुसार कित्येक हेलपटे मारल्यावर माझं कामं होण्याची मला खुप भिती वाटु लागते. ते कसं आहे, मला सगळे नियम धाब्यावर बसवुन थोडे पैसे चारुन आपलं काम करुन घेण्यात जी धन्यता वाटते ना त्याची मजा औरच असते. मला तो फील गमवायचा नाहिये, हेलपटा तर अज्जीबत नको आहे. कसं बसं करुन थोडे पैसे त्याच्या खिशात कोंबले की हायसं वाट्तं. हे सगळं मी ईथल्या संस्कृतीचा एक भाग म्हणुन अंगिकारलं. एवढच नाही तर मी माझ्या ओळखितल्याना आपल्या या दिव्य गुणांचा व कौशल्याचा वापर करुन कसं काम करवुन घेतलं हे छाती फुगवुन सांगतो. अन आता अण्णा म्हणतात हे सगळं होता कामा नये. हे ऐकुन माझ्या डोळ्य़ा समोर तर अंधारच दाटला. पैसे दयाचे नाही.... काहीतरी काय... नसेल त्याना घ्यायचे... पण आमच्या सवय़ीचं काय? छे छे पैसे घेतलेच पाहीजे.
मागच्या किती वर्षाचा हा संस्कार आहे माहीत नाही.... पण तो मी व माझ्या देशातील बहुतांश ९०% लोकं हे जपत आलेत. सगळ्यानी सरकारी बाबुना भरभरुन दिलं अन आता काय तर म्हणे मुळीच दयायचं नाही. मला नाही बुवा हे जमणार. कोण त्या रांगेत उभं राहणार..... कोण दोन चकरा मारणार..... त्यापेक्षा थोडे पैसे कोंबले त्या बाबुच्या खिशात की आपलं काम फत्ते. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचा मी का म्हणुन विचार करु? त्यानी आधी पैसे कमवावे अन नंतर काम करवुन घ्यावं. मी त्यांचा का म्हणुन विचार करु? पण अण्णा मात्र फारच विचित्र... त्याना काळजी देशाची... ईथल्या भ्रष्टाचाराची.... ईथल्या गरिबांची. अन विरोध कुणाचा कराव हेही त्याना कळतच नाही. लुटारु राजकारण्यांच्या विरोधात दंड थोपटणे म्हणजे अण्णांचा आवडता खेळ. पण मला हा खेळ मुळीच नाही पटत अण्णाचा!
आम्ही एवढा वेळ कढुन(?) ज्या राजकारण्याना निवडुन देतो, त्यांची अर्हता काय ते कधीच तपासुन बघत नाही. ते किती काळा पैसा साठवतात याचही आम्हाला काही देणं घेणं नसतं. ते किती भ्रष्टाचारी आहेत हे सुद्धा आम्ही तपासुन पाहात नाही अन भरघोष मतानी आमचा प्रतिनिधी म्हणुन त्याना मुंबई व दिल्लीच्या तख्तावर पाठवतो हे काय उगीच. अहो भ्रष्टाचारात ते अन आम्ही मौसेरे भाऊ आहेत म्हणुन तर आम्ही त्याना निवडुन देतो ना. पण अण्णाचं काय आहे ना ते झाले म्हातारे. त्यांची बहुतेक नजर कमजोर झाली असावी. आता त्याना फक्त दुरचं दिसतं असावं किंवा मोठे मासे दिसत असावेत. म्हणुन तर त्याना भ्रष्टाचाराच्या खेळातील मोठे प्यादे म्हणजेच राजकारणी, सनदी अधिकारी एवढेच दिसतात. नाहितर त्याना सगळयात आधि जर कोण दिसला असता तर तो ’मी’. मी एवढाले मोठे भ्रष्टाचार करत नाही. मी फक्त लहान सहान घोटाळे करतो. गाडी चालविताना मामानी धरलं कि चिटकव ५० रुपये. वीज तोडली की त्या ईलेक्ट्रिशनला दे १०० रुपये. RTO कडे लायसन्स काढताना कोंब एजंटच्या खिशात पैसे. असे लहान सहान पराक्रम मी सर्रास करत असतो. पण अण्णानी माझं नावं नाही बाबा घेतला त्या लोकपालात. नाहीतर त्यांच्या समर्थनार्थ उभा असलेला, मेणबत्त्याची मिरवणूक काढणारा, फेसबुकवर अण्णाच्या चकाट्या पिटणारा असा एकंदरीत सगळाच जनसमुदाय जो या संस्कृतीचा खंदा शिलेदार आहे त्याला पळता भूई थोडी झाली असती. कारण हे सगळे थोड्या फार फरकाने माझ्यासारखेच आहेत. अण्णा... गाठ माझ्याशी आहे, अन मी फक्त पुण्यात एकटा नाहीये. प्रत्येक शहरात, खेडयात, गल्लो गल्ली, भारतभर पसरलो आहे. जागो जागी माझं अस्तित्व शाबूत आहे.... वेळच सांगेल बाजी कोण मारेल ते.