बुधवार, १ जून, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २३ (पुणे करार)


गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५ जाने १९३२ रोजी भारतास रवाना होतात. बाबासाहेब लंडहुन निघतानाच शिवतरकराना मुंबईत पोहचण्याची तारिख कळवतात. बाबासाहेबांच्या स्वागतासाठी ईकडे मुंबईत अस्पृश्यानी जंगी तयारी चालु केली. आज आपला अनभिषिक्त राजा येणार अन ते ही गोलमेज-२ मधे कित्येक आघाड्यावर मर्दुमकी गाजवून  येत होता. दलितांची बाजू भक्कम करुन शत्रूच्या गोटात शिरून आपल्या लोकांसाठी कित्येक अधिकार  खेचुन आणण्याचा पराक्रम गाजविला होता. नुसतं पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी अत्यंत चालाखिने ब्रिटिशांशी खलबते केलीत. पत्रकाराना जमेल तितकं वापरुन त्यांची शक्ती आपल्या लोकांच्या कामी लावली. चलाखी व राजनितीक मुत्सद्दीपणाच्या सर्व कसोट्य़ा वापरल्या. बाबासाहेबांच्या आतमधिल राजकिय पुरूष गांधीमधल्या खलपुरुषाला कित्येक वेळा उघडे पाडतो. दलितांचा बाप म्हणुन आपल्या लेकराना जास्तीत जास्त अधिकार मिळवुन देताना बाबासाहेबांमधिल विद्वान अत्यंत मुद्देसुद अन तर्कसुसंगत वाद करतो व वस्तुनिष्ठ परिस्थीती अचुक मांडतो. अशा प्रकारे सर्व शक्ती एकवटून गोलमेज-२ मधे आमचा बाप म्हणुन कर्तव्य बजावताना लेकरांसाठी अतूल्य कामगिरी करणारा महाबली आज भारतात येत होता. २९ जाने १९३२ रोजी बाबासाहेब मुंबईच्या बंदरात पाय ठेवतात. एक दिवसा आधीपासुन तिथे जमलेल्या सर्व भीमपुत्रानी गगनभेदी आरोळ्यानी बाबासाहेबांचं जंगी स्वागत केलं. समता सैनिक दलानी आपल्या राजाला मानवंदना दिली व भायखळा मार्गे परळ पर्यंत बाबासाहेबांची मिरवणुक काढण्यात येते. त्या नंतर जागो जागी बाबासाहेबांचा सत्कार व मानपत्र देऊन त्यांच्या गोलमेजच्या कार्याबद्दल अस्पृश्य संघटनानी आभार मानले.

लोथियन समिती: (मताधिकार समिती)
बाबासाहेब गोलमेज-२ मधे ब-याच मागण्या मागुन आलेत पण त्यातिल अत्यंत महत्वाची मागणि होती ती म्हणजे राजकीय अस्तित्व मिळविण्याची. बाबासाहेबानी अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार मागितला होता. खरं ते फक्त बाबासाहेबानीच हे मागितलं नव्हतं. शिख, मुसलमान, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्यांक  लोकानीही याच मागण्या मागितल्या होत्या. पण गांधीनी इतरांसाठी वरिल मागण्या देण्याचे कबूल करताना त्याच मागण्या अस्पृश्याना मात्र नकारल्या. गांधीच्या अशा अनेक गूढ प्रकरणांचा एकंदरीत परिणाम असा झाला की राजकिय मागण्या मान्य करण्याआधी भारतातील अस्पृश्य लोकांची खरी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेण्यासाठी लंडनहून एक समिती भारतात येते. त्या समितीचे अध्यक्ष  लॉर्ड लोथियन होते, म्हणुन त्या समितीचे नाव लोथियन समिती पडले. लोथियन समिती देशभर फिरून अस्पृश्यांची पाहणी करणार होती. त्यांच्या मागण्या व ईतर गोष्टींचा वृत्तांत लंड्नला पाठविल्यावर मतदानाचा अधिकार देण्याचे ठरविले जाणार होते. या कामात बाबासाहेब स्वत: जातीने भाग घेण्यासाठी लगेच दिल्लीत हाजर होतात. लोथियन समिती सोबत त्यानी देशभर दौरा केला. जागो जागी लोथियन समिती व बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले जाते. भारतातील कानाकोप-यातील अस्पृश्यानी समितीपुढे बाबासाहेब आमचे एकमेव अन बिनविरोध नेते असल्याच्या भीमगर्जना करुन लोथियन साहेबांना भंडावुन सोडले. संयुक्त मतदार संघाचा सर्व देशातून अस्पृश्य संघटनानि विरोध नोंदविला. स्वतंत्र मतदार संघ मिळावा याची जागो जागी मागणी करण्यात आली अन दुहेरी मतदानाचा अधिकार मागण्यात आला.

राजा-मुंजे करार (फितूरी आपल्याच माणसाची)
बाबासाहेब जीवाचं रान करुन जेंव्हा लोथियन समिती सोबत देशाचा दौरा करुन स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करित होते तेंव्हा एक अत्यंत महत्वाचा अस्पृश्य नेता फोडण्यात हिंदु महासभा यशस्वी होते.  सावरकरांच्या प्रभावाखाली चालणारी हिंदु महासभा त्या काळात बाबासाहेबांच्या बाजूनी होती असे ब-याच ठिकाणी जाणवते. पण डॉ. मुंज्यानी मात्र यावर बोट उचलण्यास भाग पाडणारी फितूरी घडवून आणली. जेंव्हा बाबासाहेब गोलमेज-२ गाजवत होते तेंव्हा गांधीच्या मीच एकमेव अस्प्रुश्यांचा नेता आहे या विधानावर सडेतोड उत्तर देण्यासाठी ज्या राजानी ईकडे भारतात रान पेटवुन दिले अन बाबासाहेब हे एकमेव अस्पूश्यांचे नेते असल्यांचा तारांचा वर्षाव पाडून गांधीचे मुखवटे फाडले अशा कर्तव्यनिष्ठ राजाला आज मुंज्यानी फोडुन बाबासाहेबांच्या पवित्र कामात विघ्न उभे केले. या सर्व घडामोडींच्या मागे सावरकरांचा हात होता हे निर्विवाद सत्य आहे. आज पर्यंत जो राजा अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ मिळावा असे म्हणत होता त्यानी अचानक आपला पवित्रा बदलला अन अस्पूश्याना संयुक्त मतदार संघ व राखीव जागा मिळाव्यात अशी मागणी करण्याचा करार फेब्रुवारी १९३२ मधे मुंज्यांशी केला. यालाच राजा-मुंजे करार म्हणतात. हा प्रकार ऐकुन बाबासाहेब मात्र अत्यंत अस्वस्थ होतात, क्रोधीत होऊन हिंदु महासभेच्या कूननितीचा निषेध नोंदवितात. पण ईकडे सावरकर अन मुंजे मात्र संघटना फोडल्यामुळे आनंद साजरा करतात. सावरकरानी अस्पृश्यनिवारणाचे काम चालविल्याचा इतिहास आहे. पण त्यामागची भूमिका काय होती कोणी तपासुन पाहिले नाही. खोलात गेल्यावर हे कळते की बाबासाहेबांच्या कामात विघ्न निर्माण करण्यासाठी काही अस्पृश्य नेते सोबत असणे गरजेचे होते. त्यामुळे सावरकर अस्पृश्य निवारणाचा आव आणत. या करारा नंतर लगेच राजानी ब्रिटिश पंतप्रधानाना तार करुन कळविले की बाबासाहेब हे सर्व अस्पृश्यांचे नेते नसून ते एका लहानशा गटाचे नेते आहेत. ईकडे बाबासाहेब समिती सोबत व्यस्त होते.
राजा-मुंजे कराराची लाट देशभर उसळली. पुर्वेकडील सर्व अस्पृश्य नेत्यानी या कराराचा निषेध केला. सावरकरांची कूटनिती उघड झाली. बाबासाहेब मात्र मताधिकार समिती सोबत काम करण्यात गढून गेले होते. राजानी नसता उपद्रव करुन बाबासाहेबांचा ताप वाढवून ठेवला होता. याच वेळी तिकडे नाशिकची चळवळ जोर धरते अन भाऊराव गायकवाड व रणखांबे याना अटक होते. अशा प्रकारे अनेक अडचणीना तोंड देत बाबासाहेब आपला लढा चालवित होते. याच दरम्यान भारतातील खास करुन पुर्व भारतातील अस्पृश्यानी अनेक परिषदा भरवुन बाबासाहेबाना पाठींबा दिला. १ मे १९३२ रोजी लोथियन समितीचे काम संपले. समितीचे इतर सदस्य निघुन गेले पण बाबासाहेब मात्र आपले एक स्वतंत्र निवेदन सादर करण्याच्या हेतूने तिथेच (सिमल्याला) थांबले होते. त्या निवेदनाचा प्रभाव असा पडला की डिप्रेस्ड क्लास म्हणजे अस्पृश्य  अशी नवीन व्याख्या लोथियन साहेबाना मान्य करावी लागली. आता पर्यंत अस्पृश्य म्हणजे गुन्हेगारी लोकं, भटके जमाती, वन्यजाती व आदिवासी असा साधारण समज होता. पण बाबासाहेबांच्या निवेदनांचा व तर्कसुसंगत अन अभ्यासपुर्ण मांडणीची फलश्रूती म्हणजेच लोथियन साहेबांनी स्विकारलेली वरील नवीन व्याख्या. हा बाबासाहेबांचा एक महत्वाचा विजय होता.  आता लोथियन साहेबानाही तिकडे ब्रिटनला जाऊन हे सगळं सांगताना सोपं जाणार होतं.
हे काम संपवुन बाबासाहेब मुंबईला परततात. दोन दिवस आराम करुन लगेच ६ मे १९३२ रोजी नागपूर जवळील कामटी येथे भरविण्यात येणा-या डिप्रेस्ड क्लासच्या परिषदेस हाजर राहतात. बाबासाहेबांसारख्या महान नेत्याला आमच्या दलित लोकानी ईथे स्टेशनवर काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला होता. हे सगळे काळे झेंडे दाखविणारे दलित राजा-मुंजे समर्थक होते. हि अत्यंत लाजीरवाणी गोश्ट होती की बाबासाहेब ज्या दलितांसाठी लढत होते त्यांच्यातूनच काही गटातील लोकानी बाबासाहेबांचा निषेध केला होता. बाबासाहेब परिषदेच्या ठिकाणी पोहचतात. १५-२० हजार लोकानी मंडप भरलेले होते. लोकांच्या अलोट गर्दिपुढे बाबासाहेबांचे एक अत्यंत महत्वाचे अन आत्मसन्मान जागृत करणारे भाषण होते.  या परिषदेत दलित नेते गवई याना बाबासाहेबांच्या विरोधात न जाण्याची तंबी देण्यात येते. ज्यामुळे संतापून गवई साहेबानी लिथियन साहेबांकडे तक्रार दाखल केली. राजभॊजनी सुद्धा घोळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याना सुद्धा परिषदेतुन बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारे ज्या ज्या नेत्यानी कॉंगेस व हिंदु महासभेच्या प्रभावाखाली फितूरी करण्याचे काम केले त्याना धडा शिकविण्यात आला. अशा प्रकारे हि परिषद वादावादीची व दगाबाजाना धडशिकविणारी ठरते.
अस्पृश्य नेत्यांनी केलेल्या एकंदरीत फितूरीमुळे लोथियन साहेबांचे मतपरिवर्तन होऊन आपल्या मागण्या मान्य करताना अस्पृश्यांवर अन्याय होऊ नये म्हणुन बाबासाहेब आता थेट लंडन गाठण्याची तयारी करतात. लोथियन समितीजे सादर करील त्यावरुन आपल्यावर अन्याय होता कामा नये अन फितूरांचं फावल्यास समाजाची हानी भरुन निघणार नाही. म्हणुन निर्णय येण्या आधीच तिथे धडकण्यासाठी बाबासाहेब २६ मे १९३२ रोजी लंडनला रवाना होतात. आयुष्यात अशी संधी परत परत येणार नाही. काय करायचे ते आत्ताच करायचे हे बाबासाहेब जाणून होते. जुनच्या पहिल्या आठवड्यात बाबासाहेब लंडनला पोहचतात. तिथे कित्येक महत्वाच्या व्यक्तीना भेटून आपले मत मांडतात. अस्पृश्याना जास्तीत जास्त सवलती देणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगतात. त्यानी लहानात लहानापासुन मोठ्यात मोठ्या लोकांच्या भेटी घेतल्या. एक स्वतंत्र निवेदन तयार केले अन ब्रिटिश पंतप्रधानाना ते सादर केले. १४ जुन पर्यंत काम फत्ते करुन बाबासाहेब जर्मनीला निघून जातत.  याद दरम्यान त्यांची प्रकृती बिघडते. त्यामुळे त्यानी जर्मनितील ड्रेसडेन येथिल डॉ. मोलर यांच्याकडे उपचार नि विश्रांती घेतली. वेळप्रसंगी ब्रिटनला धावता येण्यासाठी हा मुक्काम अचुक होता. पुर्ण जुलै महिना ते जर्मनीत विश्रांती घेतात व  ऑगस्ट मधे भारतात येण्यास निघतात. 

मताधिकाराचा निवाडा जाहीर झाला
बाबासाहेब मुंबईच्या प्रवासात होते. तिकडे भारतापासून हजारो मैल दूर ब्रिटनमधे अस्पृश्यांच्या मताधिकार व इतर मागण्यावर निर्णय घेण्यात आला. १४ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटनचे पंतप्रधान अल्पसंख्यांक प्रश्नावर आपला निवाडा जाहीर करतात. या निवाड्या प्रमाणे अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ बहाल करण्यात आले होते. आता अस्पृश्य जनता आपला माणूस निवडून आणू शकत होती.  त्याच बरोबर स्पृश्य हिंदूच्या प्रतिनिधीच्या निवडनुकीत मतदान करुन आपला हक्क बजावण्याचा दुहेरी अधिकारही बहाल करण्यात आला होता. आज सोनियाचा दिनू होता. भारतभर जल्लोषाचं वातवरण होतं, पण ज्या माणसानी हे मिळविण्यास अत्य़ंत कष्ट उपसले तो दूर समूद्रात भारताच्या दिशेनी प्रवासात होता. १७ ऑगस्ट १९३२ ला बाबासाहेब मुंबईस पोहचतात. या निवाड्यामुळे अस्पृश्य वर्गामधे नवचैतन्याची लाट उसळते. आता नव्या दिशा त्याना खुणावू लागल्या होत्या. प्रगतीचे नवे पथ समोर दिसू लागले. राजकीय हक्क बजावण्यासाठी ब्रिटिशानी दिलेली संधी अतूल्य अन अमूल्य होती. आज पर्यंत दास्यात खितपत पडलेला समाज आता धन्याच्या बरोबरीत येऊन ठेपला होता. सरकार दरबारी अस्पृश्यांची वर्णी लागणार होती. ज्या सनातन्यानी आजवर कुत्र्यापेक्षा वाईट वागविले त्यांचा बरोबरीचा मान सन्मान बहाल झाला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जल्लोष चालू होता. देशाच्या कानाकोप-यातील दलित आनंदाने भारावून गेला होता. या सर्व धामधूमीत मग्न झालेला दलित येणा-या वादळी संकटापासून अनभिज्ञ होता. या जल्लोषाला नजर लागली होती.
उभा समाज सर्वत्र आनंदात न्हाऊन निघत असताना भारताच्या पश्चिम भागात पुणे नावाच्या शहरात गांधी नावाचा इसम ज्याला लोकं महात्मा म्हणत त्यानी या सर्व आनंदावर विरजण घालण्यासाठी एक अत्यंत क्रुर व निष्ठुर आक्रमणाची तयारी सुरु केली. अस्पृश्यांचं राजकीय अस्तित्व उदयास येण्या आधीच त्याला ठेचण्याचा आराखडा पुण्यातील येरवडा तुरुंगात आकार घेऊ लागला. सर्व शक्ती झोकून देऊन दलितांचा नवे सर्व अधिकार विसर्जीत करुन त्याना परत गुलाम म्हणुन वागविण्याची गांधीनी जणु शपथच घेतली होती. आपली पुर्ण ताकत झोकून दलितांच्या अस्तित्वावर घाला घाण्यास आता गांधी सज्ज झाला होता. अस्पृश्याना मिळालेले स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचे अधिकार हे ब्रिटिशानी दिलेले कवच कुंडल काढून घेण्यासाठी गांधीनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत शक्तीशाली असे ब्राह्मास्त्र म्हणजेच आमरण उपोषण उपसले. हे अस्त्र ईतके प्रभावी होते की दलितांची उभी जमात यात भस्म झाली असती. या उपोषणात गांधीचा मृत्यू झाल्यास देशात रक्ताचे पाट वाहिले असते अन मृत्यु न झाल्यास ती कवच कुंडले गांधी पळवुन नेणार होता. एकंदरीत काय तर गांधीने अत्यंत शक्तीशाली अस्त्र सोडण्याचे जाहिर केले. आज पर्यंतचे बाबासाहेबांचे सर्व कष्ट मातीस मिसळणार होते. पर्यायही नव्हता. दलितांच्या विरोधातील उघड उघड घेतलेली हि गांधीची भूमीका समस्त मानव जातीला लाजविणारी होती. बर हे स्वतंत्र मतदार संघ फक्त दलितानाच मिळाले होते अशातला भाग नव्हता. मुसलमान, शीख, ख्रिश्चन याना सुद्धा स्वतंत्र मतदार संघ मिळाले होते. पण गांधीना इतरांचे मतदार संघ मान्य होते. त्यानी देशाला धोका नव्हता. पण दलितांचे मतदार संघ मात्र गांधीना नको होते. यावरुन दिसेल की गांधी किती जातीवादी व अस्पृश्य द्वेष्टा होता. त्याना सरळ सरळ दोन समाजात मतभेद केला होता. मुसलमान व शीखाना मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघाला समर्थन दिले होते तर फक्त अन फक्त दलितांचा अधिकार मात्र त्यांच्या डोळ्यात खुपू लागला. जातीयवादी संस्कारात ज्याची जडण घड्ण होते त्याच्या बुद्दीच्या मर्यादा अशा प्रकारे सिद्ध होतात. गांधीमधील महात्मा आज गळुन पडला व जातियवादी पुरुष जगापुढे आला. ज्या स्वतंत्र मतदार संघामुळे मुसलमान सारख्या समाजाकडुन गांधीला कुठलाच धोखा वा देशातील लोकामधे पडणारी फूट दिसली नाही ती दलितांच्या बाबतीत मात्र दिसली. गांधीच्या या दृष्टीकोनानी हे जगजाहिर झाले की गांधीची वैचारीक क्षमता फारच कुचकामी व मर्यादीत आहे.
गांधीजी लवकरच उपोषणास बसणार आहेत हि बातमी हांहां म्हणता देशभर पसरली. सगळीकडे गांधीवादयानी अस्पृश्यांवर दबाव आणणे सुरु केले. दलितानी आपले सर्व अधिकार विसर्जीत करुन गांधी देतील ते अधिकार स्विकारावे असा पवित्रा सगळ्या सवर्णानी घेतला. अस्पृश्य समाज मात्र हताश होऊन कात्रीत सापडलेल्या बाबासाहेबांकडे खिन्न व छिन्न विछिन्न झालेल्या भावनानी बघू लागला. या वेळेस गांधीनी बाबासाहेबाना अशा खिंडीत गाठले होते जिथे विजय अशक्यप्राय होते. पराजय मात्र अटळ होता. गांधीच्या या अमानवी, निर्दयी अन निष्ठूरपणाचा निषेध करावा तेवढा कमीच.

उपोषणापुर्वीची परिषद
१९ सप्टे १९३२ रोजी इंडियन मर्चंट चेंबर, मुंबई येथे अत्यंत तप्त वातावरणात एक सभा घेण्यात येते. पंडित मदन मोहन मालवीय हे अध्यक्षपद भूषवितात. मनू सुभेदार, सर चिमणलाल सेटलवाड, वालचंद हिराचंद, राजेंद्रप्रसाद, कमला नेहरु,सर तेजबहाद्दूर सप्रू, छोटीराम गिडवानी, ठक्करबाप्पा, डॉ. देशमुख, डॉ. सावरकर, माधवराव अणे, के. नटराजन, पी. बाळू, पंडित कुंझरू, स्वामी सत्यानंद, एन. शिवराज, असे एकसे बढकर एक लोकं या सभेस हजर असतात. त्या मानाने बाबासाहेब हे रंजल्या गांजल्यांचे नेते. वरुन प्रश्न गांधीच्या विरोधात जाण्याचा असल्यामुळे वातावरण तापलेले होते. सर्व गांधीवादी नेत्यांची नजर बाबासाहेबाना खाऊ कि गिळू म्हणत होती. तेवढ्यात वालचंद हिराचंद यानी बाबासाहेबानी आपले मत मांडावे अशी अध्यक्षाना विनंती केली.

बाबासाहेब उभे होतात अन अत्यंत संयम व विद्वत्तपुर्वक आपले विचार मांडतात. ते म्हणतात, गांधीजीनी अस्पृश्यांच्या हिताविरोधात प्राणांकित उपोषण करणे खेदाची गोष्ट आहे. हेच उपोषण त्यानी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात केले असते तर त्यांचं महात्म्य अधिक उंचावलं असतं. गांधीनी नुसतच उपोषण जाहिर करुन माझ्यावर संकट ओढविले आहे. त्यानी बदली योजना सुचविल्या शिवाय प्रसंगातून मार्ग काढणे अशक्य आहे. मी अत्यंत कष्टाने मिळविलेले हे अधिकार नुसतचं गांधीच्या धाकामुळे पाण्यात सोडण्यास कधीच तयार होणार नाही. मग तुम्ही माझे प्राण घेतले तरी बेहत्तर. तुम्ही बदली योजना गांधींकडुन आणावे मग विचार करया येईल.
मर्द कशाला म्हणतात ते जर बघायचे असेल ना अडचणीत सापडलेले बाबासाहेब बघावे. शत्रूच्या गोटात घुसुन परिस्थीतीच्या नजरेस नजर भिडवून निर्भेडपणे गरजणारा महाबली शत्रूला नुसतं आवाजाने गारद करत असे. आपला मनसुबा जाहिर करण्याचा त्यांचा हा बाणेदारपणा अन आतील मर्दानकीचा हा दणकटपा त्यांच्यातुन ओसंडून वाहताना दिसतो. शत्रू कितीही बळकट व बलवान असला तरी बाबासाहेब दंड थोपटताना जो आत्मविश्वास व निर्भेडपणा दाखवायचे त्यामूळे शत्रू चरकून जाई. लढण्यापेक्षा ईथे समेटच बरे असा शत्रूचा विचारपरिवर्तन होई. बदली योजने शिवाय समेट नाही या भीम गर्जनेने गांधीवादी चरकले. धावाधाव झाली. नेते मुंबई वरुन पुण्या पर्यंत धावले. नुसती धावपळ व धांधल चालू झाली. सगळ्य़ांची तारांबळ उडाली. बाबासाहेब असं काही करतील याचा अंदाज नव्हता. समेट घडविण्याच्या सा-या फुशारक्या बाबासाहेबानी उडवून लावल्या होत्या. मोठ मोठाले नेते म्हणून मिरविण्याचा ज्याना गर्व होता ते पार भूईसपाट झाले होते. सर्व नेत्यानी अवाक होऊन बाबासाहेबांच्या पुढे लोटांगण घालून गांधीपर्यंत धाव घेतली. बाबासाहेब मात्र शांत नजरेनी उडालेला गोंधळ न्याहाळत होते.
पुण्यात गांधीची भेट घेऊन एक शिष्टमंडळ मुंबईस परत येते. दुस-या दिवशी परत परिषद भरते तेंव्हा ते शिष्टमंडळ सांगते की, अस्पृश्याना राखीव जागा देण्यास गांधीची हरकत नाही.
हे ऐकुन बाबासाहेब म्हणतात, मी माझ्या कर्तव्यापासून तसुभरही ढळणार नाही, माझा प्राण गेला तरी माझ्या लोकांशी मी घात करणार नाही. मग त्यात माझा जीव गेला तरी चालेले. त्या पेक्षा तुम्ही गांधीना आपले उपोषन अठवडाभर तहकूब करायला सांगावे.
बाबासाहेबांच्या रोखठोक भूमिकेमुळे दुस-या दिवशी दुपारी परिषद स्थगीत होते.
सप्रूनी कार्यकर्त्यांबरोबर बसुन एक नवीन योजना तयार केली व रात्री परत सगळे चर्चेस जमले. तेंव्हा बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्य वर्गास जातीय निवाड्यानुसार स्वतंत्र मतदर संघ मिळाले आहेत. त्या बदल्यात आम्हाला अधिक जागा मिळाव्यात व मध्यवर्ती विधिमंडळात लोकसंख्येंच्या प्रमाणात अस्पृश्याना जागा मिळाव्यात.
परिषदेतील नेत्याना हे मान्य झाले. जयकर, सप्रू, बिर्ला, राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी हे रात्रीच्या रात्रीच्या गाडीने पुण्यास रवाना झाले.


************************

गांधीचे उपोषण सुरु
दिवस-१
२० सप्टे १९३२ रोजी ईकडे येरवडा तुरूंगात गांधीनी आमरण उपोषण सुरु केले. अस्पृश्यानी मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघावर पाणी सोडावे अन दुहेरी मतदानाचा अधिकारही विसर्जीत करुन हताश जीवन जगावे. आम्ही देऊ त्यावर समाधाना मानावे असे गांधीनी जाहीर केले.  माझ्या या सर्व अटी मान्य करेस्तोवर अन्नाचे एक शीत न घेण्याचे जाहीर करुन गांधीनी बाबासाहेबांवर उपोषणरुपी अस्त्र डागले. बाबासाहेब या अस्त्राला परतवून लावतात की घायाळ होतात ते बघण्यासाठी ऊभा देश मुंबईकडे डोळे लावून होता. सर्व पत्रकार पुण्या मुंबईत ठाण मांडून बसलीत. गांधी येरवडा कारागृहातच आपले कार्यालय थाटुन बसले होते. त्यांच्या सोबत त्यांचे खंदे कार्यकर्ते होतेच. तिकडे मुंबईत बाबासाहेबाना गांधीच्या काही अत्यंत बलवान लढवय्या सरदारानी घेरले होते. बाबासाहेबांचं मानसिक खच्चिकरण करुन दलितांच्या अधिकारांची होळी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू झाले. पण बाबासाहेबानीही मुत्सद्देपणाने खिंड लढवुन आपला निर्णय निर्भेडपने मांडला.
दिवस-२
२१ सप्टे १९३२ रोजी मुंबईहून आलेले पुढारी सकाळीच कारागृहात जाऊन गांधींची भेट घेतात.  बाबासाहेबांचे मत गांधीपुढे मांडतात. त्यावर गूढ व्यक्तिमत्व परत घोळ घालतो. शांत चित्ताने सगळं ऐकुन झाल्यावर गांधी म्हणतात की विचार करुन सांगतो. ही गांधीची टिपिकल स्टाईल होती. कार्यकर्त्याना शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रमात ठेवण्यात त्यांचा हतखंडा होता. सरदार पटेल व सरोजीनी नायडू गांधीच्या सेवेत होत्याच. गांधीची प्रकृती खालावत चालली होती. तुरूंगाबाहेर गांधीवाद्यांचा जमावडा वाढला होता. सप्रूनी दुपारी फोन करुन बाबासाहेबाना कळविले की लवकरात लवकर पुण्यास निघून यावे.  बाबासाहेब रात्रीची गाडी धरुन पुण्यास निघतात.
दिवस-३
२२ सप्टे १९३२ रोजी सकाळी बाबासाहेब पुण्यात पोहचतात. याच दिवशी गांधीजीनी डॉ. राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी याच्या सोबत विचार विनिमय करुन पुढची स्ट्रॅटजी ठरविली. बाबासाहेबांच्या मागण्या काय आहेत हे तर मुंबईहुन आलेल्या प्रतिनिधीनी आधीच सांगितले होते. आता त्यावर गांधीनी या दोघांसोबत बसुन सखोल चर्चा केली व पुढचे पाऊल काय असेल ते ठरविले. अस्पृश्य वर्गाच्या सर्व जागाना निवडणुकीच्या प्राथमिक  व दुय्यम पद्धती लागु करण्यात याव्या. हे गांधीनी ठरविले.
बाबासाहेब पुण्यात पोहचले होते. नॅशनल होटेल मधे ते उतरले होते. गांधींचे म्हणने बाबासाहेबाना कळविण्यात आले. गांधीवादी पुढारी मात्र बाबासाहेबांवर दबाव आणण्याचे काम करु लागले. तणाव वाढत चालला होता. बाबासाहेबानी मुकाट्याने ब्रिटिश पंतप्रधाना तार करुन दिलेले दोन्ही अधिकार (स्वतंत्र मतदार संघ, दुहेरी मतदानाचा अधिकार) रद्द करण्या बाबत निवेदन दयावे अशी मागणी कार्यकर्त्यानी लावून धरली.  या सगळ्य़ा शेळ्या मेंढ्याना भीक न घालणार सिंह गरजून उठतो. असल्या बुड शेंडा नसलेल्या मागण्या करणा-या पुढा-यांपुढे डरकाडी फोडून सांगतो की, माझ्या समोर पर्यायी योजना आल्याशिवाय मी ब्रिटिश पंतप्रधानाना काहिच कळविणार नाही, मग काही झाले तरी झेलायची आपली तयारी आहे.  बाबासाहेबांचा दृढ निश्चय व भीम गर्जना इतकी प्रभावी अन  भेदक होती की सर्व पुढा-यानी झटक्यात माघार घेतला. आता सर्व पुढारी पर्यायी योजना दिल्याशिवाय बाबासाहेब ऐकणार नाही या मतावर आले. पर्यायी योजना देणे आता परिहार्य झाले होते. बाबासाहे या मुद्यावर लढण्यास सज्ज आहेत व सर्वोतोपरी युद्धाची सिद्धता करुन आले आहेत हे कळताच गांधीवादयानी मवाळ भूमिका घेतली.
दुपार पर्यंत वातावरण अत्यंत तापले होते. जयकर, सप्रू, पी. बाळू व एम. सी. राजा यानी दुपारी गांधीजींची भेट घेऊन समेट घडवून आणण्याची खात्री दिली.
याच दिवशी संध्याकाळी बाबासाहेब गांधीजीना भेटण्यास तुरुंगात गेले. त्यांच्या सोबत जयकर, बिर्ला, चुनीलाल मेथा व राजगोपालाचारी होते. गांधींची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती. ते मृत्युच्या देशेनी बरेच पुढे निघून गेले होते. त्यांची हि अवस्था पाहून बाबासाहेबांचे हृदय द्रवेल व ते आपला निर्णय लगेच जाही करतील असा गांधीवादयांचा अंदाज होता. बाहेर गांधीवादयांनी बाबासाहेबांच्या विरोधात गगनभेदी आरोळ्यानी आकाश दणाणून सोडले होते. या घोंघवत्या आवाजात बाबासाहेबांचा हट्ट विरघळून जाईल अशी सगळ्याना आशा होती. परंतू झाले उलटेच.... युगानूयुगे गुलामीत जगणा-यांच्या अधिकारावर घाला घालणारे गांधी दिसताच बाबासाहेब अधिक दृढ निश्चयी व कठोर बनतात. आपल्या बांधवांच्या हक्कासाठी सर्वतोपरी लढा देणारे बाबासाहेब मनोधैर्य एकवटून म्हणतात, गांधीजी तुम्ही माझ्यावर अन्याय करित आहात. तुम्हाला काही झाले तर काहीच कारण नसताना मला दोषी ठरविण्यात येईल. तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे आहेत. पण आमचे अधिकारही तेवढेच महत्वाचे आहेत. तेंव्हा गांधी म्हणतात, डॉक्टर, तुम्ही सुचविलेली पॅनलची पद्धती मी मान्य करतो. पण तुम्ही तुमचे दोन्ही अधिकार सोडून दयावे अन हि पॅनलची पद्धती सर्व आरक्षित जागांवर लागू करावी. बाबासाहेबानी गांधीची ही सुचना मान्य केली.  मुलाखत संपली पण  आता  ईतर पुढा-यांसोबत पॅनलमधे किती उमेदवार असावेत, प्रत्येक प्रांतात अस्पृश्याना किती राखीव जागा दयाव्यात,  प्राथमिक निवडनुकीची पद्धत किती वर्षे चालवावी, राखीव जागांची सवलत किती वर्षे असावी अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यास सुरुवात झाली.

दिवस-४
२३ सप्टे १९३२ उजाडला.  आता बदली मागण्याची मिटींग भरली. बाबासाहेबानी बदली मागण्यात सर्व प्रांतात एकून १९७ जागा अस्पृश्याना मिळाव्यात असे जाहीर केले. कम्युनल अवार्ड (जातीय निवाडा) नुसार अस्पृश्याना केवळ ७८ जागा मिळाल्या होत्या. पण त्या स्वतंत्र मतदार संघ म्हणुन मिळाल्या होत्या. त्या बदल्यात बाबासाहेबानी राखीव जागा स्विकारण्याची तयारी दर्शविली पण त्या बदल्यात १९७ जागांची मागणी करताच गांधीवादी संतापाने गोरेमोरे होऊन उठले. नाराजीची लाट उसळली. बरीच खडाजंगी झाल्यावर त्यानी १२६ जागा देण्याचे मान्य केले. पण बाबासाहेब हट्टाला पेटले होते. जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा निर्धार ठाम होता. पॅनल मधे किती उमेदवार असावे यावरही सभागृह पेटले. १० वर्षानी राखीव जागा रद्द कराव्यात असा गांधीवाद्यांनी आग्रह धरला पण राखीव जागांचा कालावधी न ठरविता १५ वर्षानी अस्पृश्यांचे सार्वमत घ्यावे अशी बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाची अट घातली. अशा प्रकारे चर्चा १० तासापेक्षा जास्त रंगली पण एकमत होताना दिसेना. शेवटी गांधीवादयानी गांधींजी भेट घेऊन संपुर्ण वृत्तांत कथन केला. ईतर सर्व मुदयांवर गांधी राजी झाले पण राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी मात्र संकट बनुन उभा ठाकला होता. बाबासाहेबानी कालावधीला मान्यता न देण्याचा निर्णन अत्यंत कठोरपणे जाहीर करताना निक्षुन सांगितले की अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीव जागा रद्द करण्यात याव्यात.  १० किंवा १५ वर्षाचा कालावधी झाल्यावर राखीव जागा रद्द करणे म्हणजे दलितांवर अन्याय होईल असे बजावुन सांगितले.
तो पर्यंत अशी बातमी आली की गांधीजींची प्रकृती आजुन बिघडली असुन आणिबाणीची वेळ उभी झाली होती. सायंकाळी बाबासाहेब स्वत: गांधीना भेटण्यासाठी तुरुंगात जातात. सार्वमताच्या प्रश्नाला गांधीजीनी पाठिंबा दिला पण त्यांनी वेगळाच फासा टाकला. गांधी म्हणाले ५ वर्षानीच सार्वमत घ्यावे. गांधीच्या या तर्कहिन व खोचक वाक्यानी बाबासाहेब अत्यंत दुखावतात. कधी कधी गांधी फारच तर्क विसंगत बोलत. अशा प्रकारे हि भेट ईथेच संपते. गांधीच्या हट्टापायी व बाबासाहेबांच्या दृढनिश्चयापायी आजच्या दिवसाची सारी चर्चा अनिर्णायक वळणावरच थांबली.

दिवस-५
२४ सप्टे १९३२ दिवस शनिवार, सकाळी परत चर्चा चालु झाली. शेवटी १४८ राखीव जागा देण्याचे ठरले व स्पृश्य हिंदुंच्या जागांपैकी १०% जागा अस्पृश्य वर्गाला देण्यात येतील असे ठरले. आता मात्र राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी किंवा सार्वमत यावरुन खडाजंगी होऊ लागली. गांधीवादयानी १० वर्षासाठीच राखीव जागा असासाव्यात या मताला लावून धरले तर बाबासाहेबानी कुठल्या परिस्थीतीत कालावधी ठरवू नये. अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीवजागा रद्द करण्याची अट घातली. या चर्चेतून काहीच परिणाम निघत नाही असे दिसु लागल्यावर शेवटी बाबासाहेबानी गांधींची भेट घेतली. गांधीशी झालेली चर्चातर अधिकच बिनबुडाची व तर्कविसंगत निघाली. गांधीनी ५ वर्षातच सार्वमत घेण्याचे बोलून दाखविले. बाबासाहेब मात्र आपल्या मतावर ठाम होते.शेवटी गांधी चिडून जातात अन निर्णायक आवाजात गरजतात,  ५ वर्षात सार्वमत घ्या किंवा माझा जीव घ्या.
गांधींचा अविचारीपणा बाबासाहेबाना अजिबात आवडला नव्हता. ते तडक उठून बोलणीच्या ठिकाणी आलेत व शेवटी त्यानी रोकठोक भूमिका मांडली, सार्वमत कमीत कमी १० वर्षानी घ्यावे किंवा बोलणी थांबवू या असे जाहीर केले. बाबासाहेबांचा निर्णायक सुर ऐकून गांधीवादी नेत्यांचे धाबेदणाणले. दाबावाचे सर्व तंत्र निष्क्रीय करण्यात बाबासाहेबांनी आघाडी घेतली. आता मात्र त्यांचे सर्व अस्त्र निकामी झाले होते. शेवटी सार्वमताचा मुद्दा बाजूला सारुन मुदतीचा नामनिर्देश न करता करार करावा असे ठरले. दुपारी ३ वाजता राजगोपालाचारी यानी ही माहिती तुरुंगात जाऊन गांधीना सांगितली. गांधीनी आशिर्वाद दिला. चर्चेच्या ठिकाणी आनंदाच्या कारंज्या उडाल्या. लगोलगो कराराचा मसूदा तयार करण्यात आला. करार खालील प्रमाणे होता.

पुणे करार (संक्षिप्त मसूदा)

१)     प्रांतीय  विधानसभामध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणेप्रमाणे मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मधप्रदेश-२० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.
२)     या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे  प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील ४ अमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
३)     केंद्रिय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.
४)     केंद्रिय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल
५)     उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.
६)     प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिनीमध्ये  दलितांच्या जागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे.  तो पर्यंत अमलात असेल जो पर्यंत  दोन्ही संबंधीत पक्षांद्वारा आपसात समझौता होऊन त्यास हटविण्याची सर्वसंमत निर्णय होत नाही.
७)     केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.
८)     दलिताना स्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
९)     सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.
असा होता पुणे करार.

मसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम.सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबाना सही करु देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम. सी. राजानी मुंजे सोबत जो करार केला होता तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्य द्रोहीनी या करारावर सही करु नये अशी मद्रासच्या दलितांची मागणी होती. शेवटी यातही तडजोड करण्यात आली व सह्यां करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवियाने सही केली.
इतर सर्व सभासदानीही सह्या केल्या.  अन तिकडे तुरूंगातही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यानी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.
२५ सप्टे १९३२ रोजी सर्व पुढारी करार मंजूर करण्यासाठी मुंबईत आले. ब्रिटिश महाराज्यपालाना या कराराची माहिती तारेने कळविण्यात आली. मुंबई राज्यपालांच्या कार्यवाहांना दोन्ही पक्षाच्या पुढा-याने प्रत्यक्षपणे माहिती दिली. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रीमंडळाने पुणे करार मंजूर करुन घेतला. त्यावर मंत्रीमंडळाने शिक्का मोर्तब केले.  तिकडे दिल्लीत हिंदु महासभेनेही आपली मंजूरी दिली. अशा प्रकारे पुणे करार घडवून गांधीनी दलितांचे अत्यंत महत्वाचे दोन अधिकार काढुन घेतले.  मात्र हेच अधिकार शिख, मुस्लिम व ख्रिश्चनाना खुशाल बहाल केले.

९ टिप्पण्या:

 1. मला इतिहासाची जास्त माहिती नाहि तरी कृपया खालील प्रश्न माझ्या मनात आले ते कृपया शांत करा.....
  दुहेरी मतदानाचा दलितांना काय फायदा झाला असता?
  राष्ट्र म्हणून, हिंदू म्हणून त्यांना काय फायदा झाला असता?
  गांधीनी स्वताचा मोठे पणा वाढवण्यासाठी आणि दलितांचा मसीहा "ते नाहि तर आणखी कोणी नाहि" या नियमाने हे सर्व केले का?
  सावरकराना आणि हिंदू महासभेला या पासून काय फायदा झाला

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Dalitanna swtache pratinidhi swata nivdun denyacha hakk milala asta... Dusra mudda swatachya unnatiche kayde swata karnyacha hakk milala asta... Sadhhachya pakshiy rajkarnat te shakya nahi karan pakshyachi bandhilki rakhavi lagte..
   Rahta rahila prashna rashtrachya hitacha aatachya system mule rashtra Kay fayda jhalay... Karan sadhya dalitanchi rajkiy nirnay 0% aahe... Te savarnanchya hatatach aahe... Yacha indirect parinam hindutwa wadi sanghatenena jhala

   हटवा
 2. कुणाल,
  दुहेरी मतदानामुळे स्वत:चा एक स्वतंत्र नेता निवडण्याच्या पलिकडे त्याच भागातील हिंदु नेत्याला निवडण्याचा अधिकार बजावताना हिंदुंकडून होणा-या छळावर एक राजकीय तोडगा होता. आपल्या मागण्या लावुन धरताना मतांचा अधिकार कामी येतो.

  गांधीना अगदी आतून वाटे की चातुर्वण्य असावं. ते मणिभवनच्या भेटीत तसं बोलून दाखवितात.

  सावरकरांच मत गांधिपेक्षा थोडसं वेगळं होतं. त्याना वाटे की स्वतंत्र मतदार संघामुळे अस्पृश्य कायमचे हिंदुंपासुन दुर जातील. त्यानी अस्पृश्याना हिंदु धर्मातच ठेवण्याचे अनेक प्रयत्न केले. धर्माची पुनरबांधनी व्हावी ते अशा मताचे होते. पण ही पुनर्बांधनी होता होता दलिती कुजून मरेल याचा त्याना अंदाज नव्हता. म्हणून बाबासाहेबानी प्रश्न लवकरात लवकर निकाली लावण्यावर भर दिला.

  तसं बाबासाहेब सुद्धा १९३५ पर्यंत सावरकरांच्या मताशी सहमत होते. हिंदु धर्मात राहूनच असृश्यांचा विकास व्हावा असे त्याना वाटे. पण नाशिकच्या चळवळीने त्यांचे डोळे उघडले व त्यानी निर्णय फिरविला.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. गांधी बाबानी जरी कपटी राजकारण खेळून दुहेरी मतदानाचा अधिकार टाळला असला तरी..एडल्ट फ्रेंचाईजी आणि आरक्षणाच्या माध्यमातून शोषकांची व्यवस्था देशोधडीला लावण्याचे महान क्रांतिकारक कार्य बाबासाहेबांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलंयं.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. बाबासाहेबांनी एक योजना ६ मे १९४५ ला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वार्षिक अधिवेशनात सादर केली. त्या योजनेत बाबासाहेबांनी म्हटले होते की 'वन्य जातींना मतदानाचा अधिकार असू नये कारण मतदानाचा हक्क आपल्या हिताच्या दृष्टीने बजावण्याएवढे वन्य जातींमध्ये सामर्थ्य उत्पन्न झालेले नाही.' गंमत म्हणजे सवर्ण जेव्हा अस्पृश्यांच्या बाबतीत हीच भाषा वापरत तेव्हा बाबासाहेबांना संताप येत असे. बाबासाहेबांच्या मनातही कुठेतरी उच्चनीचता होती हे यावरून सिद्ध होत नाही का?

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. tumhi yacha arth asa kasakay gheu shaktat.aho paranjape saheb ucchanichata hi tyawelachya kahi sawarn lokanni nirman keli hoti.mhanaje tumach mhanan as ahe ka ki tyawelche asprushya he vanya jiv ahet mhanun? te pan manasech hoti na dada.ani sangayach zal tar "maratha" samajala arakshan milave he babasahebanich mudda mandala hota.

   हटवा
 5. मी खरच एम. डी. रामटेके सरांच अभिनंदन करतो .कि त्यांनी एवढ सोप्या आणि सरळ भाषेत या लेखाची मांडणी केलेली आहे .या लेखात कुठेच गुंतागुंत दिसून येत नाही .२४ सप्टेंबर १९३२ सालच जे वादळ या देशात सुरु झाल होत ,ते हुबेहूब लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे .अश्याच प्रकारे बहुजनांचे प्रबोधन करून भारत बोद्धामय होण्याच्या दिशेने तुम्ही पाऊल टाकत आहात त्यासाठी तुम्हाला राजेंद्र गाढे चा जयभीम

  राजेंद्र गाढे
  ता .रावेर

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. मी खरच एम. डी. रामटेके सरांच अभिनंदन करतो .कि त्यांनी एवढ सोप्या आणि सरळ भाषेत या लेखाची मांडणी केलेली आहे .या लेखात कुठेच गुंतागुंत दिसून येत नाही .२४ सप्टेंबर १९३२ सालच जे वादळ या देशात सुरु झाल होत ,ते हुबेहूब लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे .अश्याच प्रकारे बहुजनांचे प्रबोधन करून भारत बोद्धामय होण्याच्या दिशेने तुम्ही पाऊल टाकत आहात त्यासाठी तुम्हाला राजेंद्र गाढे चा जयभीम

  राजेंद्र गाढे
  ता .रावेर

  प्रत्युत्तर द्याहटवा