बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

कार्ल्याच्या लेण्यांबद्दल प्रबोधनकारांचे मत


कार्ल्याच्या लेण्या ह्या बौद्ध लेण्या आहेत हे निर्वाद सत्य आहे. हिंदू देवी एकवीरेनी तिथे अतिक्रमण केले हे ही जगमान्य आहे. आता प्रश्न असा आहे की हे मंदिर तोडून देविला तिथून पळवून लावायचे की ते आहे तसेच ठेवायचे?. खरं पाहता या देवीला हाकलने आता अशक्यप्राय आहे. कारण जरी ते अतिक्रमण असले तरी देवीचं लेण्यातील वास्तव्य पाहता कायद्याच्या कसोट्या लावल्यास तिचाही तिथे अधिकार बनतोच. त्यामूळे या देवीला हटविण्याची कल्पना म्हणजे अडवाणीनी अयोध्या प्रकरणी “मंदिर वही बनायेंगे” म्हणत दंगे घडवून आणले त्यातला प्रकार होईल. आपण ठरलो बुद्धाचे अनुयायी, आपला वारसा संयमाचा व शांततेचा. एवढा अत्याचार होऊन सुद्धा आपला समाज कधी दंगा केल्याचं ऐकिवात नाही. बाबासाहेबांच्या सोबतीने आमचा समाज चवदार तळे, काळाराम मंदिर ते नामांतरा पर्यंतचे अनेक लढे लढविले पण सर्व लढे अहिंसेच्या मार्गाचे होते. या सर्व लढयांतून आंबेडकरी जनतेनी कमालीचं संयम दाखविलं. त्यामूळे एकवीरा प्रकरणावरुन बौद्ध दंगा करणार नाहीत हे  याची खात्री आहे. आमचं म्हणनं एवढच आहे की मुख्य स्तूपात जाणारी वाट अडविली जाऊ नये. आमची वाट अडवून धरण्याचा प्रकार थांबला पाहिजे एवढीच विनंती आहे. आम्ही एकविरेला तेवढी जागा सोडली हा आमचा मोठेपणा आहे. याच्या अगदी उलट अयोध्येत हिंदूनी मशीद पाडली. आपल्या हक्काच्या जागेत कुणी घुसल्यास त्याला उध्वस्त करण्याचा हिंदूंचा वारसा आहे. अयोध्या प्रकरणावरुन  हिंदूची  असंवेदनशीलता व हिंसक वृत्ती अधोरेखित होते.  पण आमच्या घरात घुसलेल्या एकविरेचं मंदिर बौद्ध बांधव पाडणार नाही. आम्ही संवेदनशील मनाची व क्षमाशील वृत्तीची माणसं आहोत. बाबासाहेबानी बुद्धाच्या मार्गानी जाण्याचा कानमंत्र दिला व प्रत्येक भीमसैनिकानी तो जोपासला.  आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत.  पण आमच्या संयमी वृत्तीचा गौरफायदा घेत हिंदूनी स्तूपाची वाट अडवून धरावी याला मात्र हिंदूंची दादागिरी म्हणावं लागेल. हिंदूनी दादागिरी थांबवावी अन स्तूपाची वाट अडविणे सोडावे.
हिंदूनी लेण्या बळकावण्याचा जो प्रकार केला आहे त्या बद्दल बाळा (साहेब ?)  ठाकरेंचे वडील काय म्हणतात ते जरा खालच्या लिंकवर वाचा. 


प्रबोधनकार म्हणतात,
पार्वती ही जरी जगन्माता सा-या विश्वाची आई असली, तरी ब्राह्मण कवीच्या कल्पनेच्या मुर्वतीसाठी तिचे गंजड शंकराशी लग्न लागून, कधी स्मशानांत तर कधी हिमालयांत, भैरव पिशाच्चादि सेवक गणांच्या संगतीत तिला संसार करणें भागच पडलें. सृष्टिविधात्या ब्रह्मदेवाला, सृष्टी उत्पन्न झाल्यावर, विष्णूच्या बेंबटांतून खेचून काढणा-या भिक्षुकशाहीनें असली देव देवींची गोतावळ्यांची लफडी इतकीं निर्माण केलेली आहेत की, त्याच्या वंशवेलांत सद्धर्माचाहि थांग आज लागणें मुष्किलीचें होऊन बसलें आहे. फार दूर नको. लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची, तेथल्या त्या ओ-या, ते दिवाणखाने, ते स्तूप, सा-या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा. तेथें बाहेर एक देवी प्रगट झाली. तिचे नांव एकवीरा. हिला वेहेरची देवी असेहि म्हणतात. ही म्हणजे पांडवांची बहीण. हिच्यासाठीं भीमानें एका रात्रीत हीं लेणीं कोरून काढली. हिचा दुसरा इतिहास काय, तर ही रेणुका, परशुरामाची आई. स्वतः परशुरामच जेथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता तेथे त्याची ही एकवीरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार? चैत्री पौर्णिमेची कार्ल्याची जत्रा मोठी दांडगी. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जाता. नवसापायीं शेळ्यामेंढ्यांचे कळपच्या कळप फडशा पाडून हीं कार्ला लेणी रक्तांत न्हाऊन निघतात. जो प्रकार कार्ला येथें, तोच प्रकार इतर सर्व लेण्यांत. जेथे असले बोकडखाऊ देवदेवींचे देऊळ नाहीं, तेथे प्लेझर पार्टीसाठी जाणारे लोक सुद्धां कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यांत अखंड सुरू असलेले हे `देवळीप्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय? सारांश, भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्धी विषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो, हे विसरता कामा नये.
मनुस्मृति पुराणें आणि देवळे असा तीन पेडी फांस हिंदुसमाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सवत्यासुभ्याचें सोवळें वर्चस्व आजवर टिकवून धरलेले आहे. या मर्मावर कोणी घाव घालतांच जात सुधारक दुर्धारक भटें सापांसारखी कां फुसफुसतात. याचें अझून ब-याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठें आश्चर्य वाटतें. मनुस्मृति, पुराणें आणि देवळें या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा. जाळून पोळून खाक करा कीं भिक्षुकशाही रसातळाला गेलीच! प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हातीं लागणार नाहीं. पण हा सोन्याचा दिवस उगविण्यापूर्वी ब्राह्मणांनीं या तीन महापातकांबद्दल भटेतरांच्या मनावर डागलेली धार्मिक पापपुण्याची मोहिनी नाहीशी करणें फार कठीण काम आहे.
देवळांचा उपयोग पूर्वी प्राचीन काळीं कदाचित चांगला होत असेल. धर्मप्रसाराचें व धर्म रक्षणाचें कार्य या देवळांनीं किंवा त्यांतल्या धोंड्यादगड्या देवदेवींनीं आजपर्यंत काय केलें, ते इतिहासावरून दिसतच आहे. गिझनीच्या महंमदाच्या सोट्याचा तडाका सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे इंपिरियल बँकेचे बाप असावे, अशी पुसटशीसुद्धा कल्पना कधीं इतिहासाला आलेली नव्हती. त्यावेळेपर्यंत लघुरुद्र, महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारे हिंदु आणि पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडी खालच्या भुयारात संपत्ति सांठविण्याचा `धर्मवानधंदा करीतअसतील, हें महंमद गझनीला जसें बिनचूक कळलें, तसें फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाहि कळलें नसावें असें वाटतें. म्हणूनच महंमदाच्या बजरंगी सोट्यांचे थाड थाड थाड एका मागून दोन तीन तडाके खाईपर्यंत त्याला आपल्यावरील प्रसंगाची कल्पना आली नाहीं.”
आता बोला.  प्रबोधनकार स्वत: म्हणतात की कार्ल्याची देवी म्हणजे बौद्ध लेण्यातील घुसखोरी आहे. अनेक बौद्ध स्थळांचं पावित्र्य घालविण्यासाठी जाणिवपूर्वक बोकडं कापण्याची प्रथा सुरु करणारे हिंदू मुसलमानांपेक्षा कित्येक पटिने धर्मांध तर आहेतच पण हिंसकही आहेत.  एकविरा देवीला पिटाळून लावण्याचा अजिबात इरादा नाही. पण या देवीच्या भक्तानी बौद्धांची अडचण करु नये. या स्तूपाचं दर्शन आमचं धार्मिक अधिकार आहे. या अधिकारावर गदा आणल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे एकमेव पर्याय उरेल. ती वेळ येऊ न देता बौद्धांचा स्तूप दर्शनाचा अधिकार अबाधित राहील असं वागवं.
जयभीम.

३ टिप्पण्या:

 1. प्रबोधनकार ठाकरेंचे परखड, सत्यवादी आणि विचार करायला लावणारे अस्सल विचार.........

  आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानांत, इसवी सनाचा उदय होईपर्यंत, धार्मिक क्षेत्रांत नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळें अखंड चालूं होतीं. आपमतलबी भिक्षुकशाहीनें नवमतवादाच्या प्रत्येक लहानमोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूंच ठेविला होता. (ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरली आहे) सांपडेल त्या पशूचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारात क्रांति होत होत, बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज `अहिंसा परमो धर्म’वाला निवृत्तमांस बनला होता. धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाहि पार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूल मानानें इसवी सनाच्या २-या ३-या शतकांपर्यंत हिंदू जनांत व हिंदुस्थानांत देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमतवादी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीनें नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून, भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या २-या ३-या शतकांत महाभारत, रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीनें फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या कालच्या कोणत्याही वाङ्मयांत देव आणि देवळें आढळून येत नाहींत. नाहीं म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या अमदनीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठीं आणि स्वाध्यायासाठीं ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ मंदिरें हीं अस्तित्वांत आलेलीं होतीं. पुढें पुढें या संघ मंदिरांत महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाअर्चा बौद्धांच्या हीनयान पंथाने सुरूं केल्या. हिदुस्थानांत देव-देवळांचा उगम शोधीतच गेले, तर तो या बौद्ध विहारातच बिनचुक सापडतो. नंतर इसवी सनाच्या ७-८व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ रजपूतांच्या पाठबळानें बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशधडीला लावले. लक्षावधि लोकांना मसणवटींत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीहि हिराऊन घेण्यात आली. अशा रीतीनें हिंदुस्थानांत हिंदु समाजांत अगदी पहिल्यानेंच आद्य शंकराचार्यानें अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वस्तुंचा आणि बौद्ध-मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथें शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडाबहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशारीतीनें बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळांत झाले.
  शंकाराचार्यांनीं ब्राह्मणी धर्मांच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यांतल्या सुडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती कीं, चालू घटकेपर्यंत बौद्धधर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत आहे. हिंदुजनांच्या मनांत बौद्धद्वैषाचें पेरलेलें भिक्षुकशाही विष आज कसें थैमान घालीत असतें, हें वाटेल त्या बौद्ध लेण्यांत पाहून घ्यावें. वास्तविक या विहारांत किंवा लेण्यांत महात्मा बुद्धाचे बौद्ध भिक्षू `अहिंसा परमो धर्म’चें तत्त्वचिंतन आणि भूतदया क्षमा, शांति या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरतांच त्यांची खाडकन स्मशानें बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले. त्यांचा अहिंसावाद हवेंत वितळला. ताबडतोब प्रत्येक लेण्यांत एकेका उग्र देवाची अगर देवीची देवळें उगवली आणि त्यांना कोंबड्या बक-यांच्या कंदु-यांनी संतुष्ट करणा-या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्याइतक्या फुगल्या.

  उत्तर द्याहटवा
 2. Contd..

  प्रबोधनकार ठाकरेंचे परखड, सत्यवादी आणि विचार करायला लावणारे अस्सल विचार..........

  महंमद गिझनीच्या वेळेपर्यंत हिंदूंची देवळें म्हणजे अनंत भल्याबु-या त्रांगड्यांची पेवें बनलेली होती. हा वेळ पावेतों मुसलमान स्वारीवाल्यांना देव किंवा देवळें फोडण्याची कल्पना, खुमखुमी किंवा वेड मुळींच माहीत नव्हतें. देव आणि देवळें फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथानें लावलेली आहे. सोट्यांच्या तीन दणक्यांत पिंडीखालीं जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुह्याचे कागदपत्र मिळाले, तर असल्या घसघशीत बोहाणीच्या जोरावर देवळें फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदु थोडेच होते? चालूं घडीचा मुसलमान देवळें फोडण्याचा व देव बाटविण्याचा प्रघात `पीछे से आयी और आगे बढी’ असल्या वृत्तीचा केवळ `बं भोलानाथ’ आहे. त्यापेक्षा त्यांत विशेष कांहीं नाहीं.
  भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचे संरक्षक. त्याचा पालनकर्ता, भट जिवंत तर धर्म जिवंत,भट ओंकारेश्वरावर गेला कीं धर्म तेव्हांच जाणार सोनापुरांत. `ब्राह्मण वर्गानेंच आजपर्यंत धर्म जगविला’ ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल- मवाळ–गबाळ–टवाळ भटांची आरोळी. देवळें म्हणजे धर्मांचीं आगरें. धर्माची गंगा येथेच उगम पावते. त्या उगमावरच भटांचें आसन. देवळांत तर प्रत्यक्ष देव. सा-या विश्वाचा स्वामी. `चराचर व्यापुनी’ आणखी वर जो `दशांगुळें उरला’ ते हिंदूंच्या देवळांत जाऊन भरला. असल्या देवांचे कोण काय करणार?

  अशा त्या जगच्चालक सर्वपराक्रमी कर्तुमकर्तु अन्य कर्तुम सोमनाथावर ज्यावेळी महंमदानें सोटा उगारला, त्यावेळीं रजपूत राजांच्या घिसाड दक्षिणांवर टोणग्यांप्रमाणे चरणारे हे देवधर्म-संरक्षक भट होते कोठें? ते सारे पंचा सावरून आधींच सूंबाल्या करीत पळाले होते. सोमनाथ म्हणे मोठें जागृत कडकडीत दैवत. पण या दैवताचा कडकडीतपणा आणि जागृतपणासुद्धा ऐन प्रसंगी वायबार ठरला. जेथें देवच स्वतःचें संरक्षण करू शकला नाहीं, तेथें भटांनी तरी का हकनाक प्राण द्यावे आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून तो जनानखान्यापर्यंतची दलाली देवाशीं - किंवा देवाच्या नांवावर करण्यास सवकलेल्या हिंदु राजांनी देवासाठी व देवळांसाठी काय म्हणून शस्त्र उचलावें? सगळीच जेथें बडवेगिरी, तेथें धर्माच्या पोकळ नांवासाठी आणि पापपुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठीं कोण कशाला आपला जीव धोक्यांत घालतो? जोंपर्यंत प्रसंग आला नाहीं. तोपर्यंत लघुरुद्र, महारुद्र चालूं आहेच.

  गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा `सनातन धर्म’ त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे. समाज क्षेत्रांत भिक्षुकशाहीला जगद्गुरुंनी हिंदु हिंदुतच स्पृश्य आणि अस्पृश्य अशी `सनातनी’ द्वैताची पोखरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि `पवित्र’ बडव्यांनी स्पृश्य भागांतहि भट भटेतर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस यत्न करण्यांत, या हिंदुब्रव देवळांचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. भट भटेतर वादाची नरक नदी देवळांतूनच उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अज्जीबात समूळ नष्ट व्हावा असें मनापासून वाटत असेल, त्य सर्व विवेकवादी स्पृश्या-स्पृश्य हिंदुजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे. देवळांचे महात्म्य सफाई नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणा-या द्वैत भावनेचा या हिंदुस्थानातून बीमोड होणार नाही.

  - देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे (प्रबोधनकार ठाकरे)

  उत्तर द्याहटवा
 3. वरील लिखाण १००% सत्य आहे यात अजिबात अतिशोक्ती नाही!!!!!!!!!!!

  उत्तर द्याहटवा