सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २७ (भीमगर्जने नंतरचे वादळ)


जातपात तोडक मंडळाचे वार्षिक संमेलन (१९३६)
जातपत तोडक नावाची नावाची त्या काळातील पुरोगामी लोकांची एक अत्यंत प्रसिद्ध संघटना होती. जातियवादाच्या विरोधात पुरोगामी म्हणवून घेणा-या हिंदु बांधवांची ही जातीयवाद्यांच्या विरोधात काम करणारी संघटना. पण या संघटनेची कार्यपद्धती मात्र सनातन वाद्याना न दुखविता जातीयवादाचे निर्मूलन करणारी होती. जातीयवाचाव्या विरोधात मोठी भरीव कामगीरी करणारी ही संस्था सनातनी लोकांचा कर्दनकाळ बनून फिरत असे. बाबासाहेबांसारख्या अस्पृश्य उद्धारकाच्या उदयानी ही संस्था अत्यंत भारावून गेली. १९३६ मध्ये लाहोर येथे भरणा-या जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्षपद बाबासाहेबानी भुषवावे असा ठराव या मंडळाद्वारे पास करण्यात आला. तदनंतर बाबासाहेबानी अध्यक्षपद स्विकारावे अशी आग्रहाची विनंती केली.  श्री. इंद्रसिंग नावाचा यांचा एक कार्यकर्ता या संदर्भात मुंबईत येऊन बाबासाहेबांची भेट घेतो.  तसेच डॉ. गोकुळचंद नारंग नावाच्या धनाढ्य व्यक्तीने संमेलन काळात बाबासाहेबानी आपल्याकडे राहावे अशी विनंतीही केली. या परिषदेसाठी बाबासाहेबानी अध्यक्षिय भाषण करावयाचे होते. त्यासाठी त्यानी अत्यंत विद्वत्तेने एक प्रदिर्श भाषण तयार केले. बाबासाहेबांच्या भाषणाची तय्यारी ही उभ्या भारताला गदागदा हालवून सोडणारी होती. जातीयवाद्यांच्या अंध नि वर्चस्ववादी मनोवृत्तीला भगदाड पाडणारी होती.
 ईकडे मुंबई ईलाख्यात बाबासाहेबांची भीमरुपी गदा हिंदुत्ववांद्यांवर घणाघाती हल्ले चढविण्यात मश्गूल झालेली होती. बाबासाहेबानी उगड उघड घेतलेली हिंदु विरोधी भूमीका  जातपात तोडक वाल्याना फारसी आवडली नाही.  त्यामूळे त्यांच्यात बाबासाहेबांच्या अध्यक्षीय पदापद्धल अंतर्गत वादावादी चालू झाली.  शेवटी १९३६ च्या मार महिन्यात असे घोषित करण्यात आले की मंडळाचे वार्ष संमेलन मे महिन्या पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.  ९ एप्रिल १९३६ रोजी संताराम हरभगवान नावाचा मंडळाचा एक सदस्य मुंबईत येऊन बाबासाहेबांची भेट घेतो.  बाबासाहेबांच्या हिंदू विरोधी भीम गर्जनेनी लाहोरचे जातपात तोडक मंडळांच्या सदस्यात उडालेले खटके व काही व काही दुखावलेले वरिष्ठ सदस्य मंडलाचा राजिनामा दिल्याची बातमी घानावर घातली. तरी सुद्धा मंडळ बाबासाहेबानाच अध्यक्ष म्हणून संमेलनास बोलविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. त्याच बरोबर अध्यक्षीय भाषणासाठी बाबासाहेबानी लिहलेल्या भाषणाचा काही भाग छापण्यासाठी म्हणून या सदस्याने सोबत घेतला.  ईकडे बाबासाहेबांची भीमरुपी गदा मात्र काही केल्या थांबेना. सनातन वाद्यांवर भीमास्त्राचा मारा सतत चालू होता.  त्याच बरोबर धर्मांतराची घोषणा झाल्यापासून हिंदू समाजात  सर्वत्र एक हाहाकार उडाला होता.  चहू बाजूनी बाबासाहेबांवर टिका, शाप नि दुषणांचा भडीमार होऊ लागला. प्रतिउत्तरात लढ्यात बाबासाहेबही मोठ्या विर्याने उत्तर देत, विद्वानाच्या बैठकीतला हा महामानव या सर्वांवर भीमास्त्र सोडून सनातन्याना घायाळ करी.  हिंदू धर्मावरील अत्यंत टोकाची टीका, धर्मग्रंथाना लावलेल्या तत्वज्ञानाच्या कसोट्या  व वेद, स्मृती नि श्रृतींचा तर्कबुद्धिने घेतलेला समाचार ईतका मनोवेधक आणि मर्मभेदक असे की बाबासाहेबांपुढे हिंदीचे लढवय्ये नांगी टाकून पळ काढीत.  पण याची दुसरी बाजू होती की, हिंदूंच्या मनातील द्वेष वृद्धिंगत  होत गेला.  बाबासाहेबांचे विरोधक वाढत गेले.  याचा एकंदरीत परिणाम असा झाला की, जातपात तोडक मंडळासारखी  स्वत:ला  पुरोगामी  समजणारी संस्था बाबासाहेबाना अध्यक्ष बनविण्यात धोका मानू लागली. शेवटी बाबासाहेबांच्या हिंदू विरोधी लढ्याचा परिणामी धसका घेऊन पुरोगाम्याचं सोंग आणणारी ही जातपात तोडक मंडळ नावाची संघटना लाहोर येथे भरणारे वार्षीक संमेलन कायमचे स्थगीत करते. अशा प्रकारे बाबासाहेबांचे अध्यक्षीय भाषण निकाली काढले. या संमेलनासाठी लिहून घेतलेले प्रदिर्घ भाषण तय्यार होते. परिषद रद्द झाल्यामूळे या भाषणाची एक लहानशी पुस्तीका छापून घेण्याचे ठरले. जातीचे निर्मूलन (अनायलेशन ऑफ कास्ट) नावाची पुस्तीका इंग्रजीत छापण्यात आली. लवकरच या पुस्तीकेचे जवळपास सात आठ भाषेत भाषांतर करण्यात आले. आणि या लहानशा पुस्तीकेने त्या काळात भारतभर खडबड उडवून दिली. हिंदू धर्माचे वाभाडे काढणारी ही पुस्तीका हिंदू धर्मग्रंथाचा समाचार घेणारी तर्क व तत्वाच्या कसोट्या लावून धर्मग्रंथाचा धुव्वा उडविणारी आहे.

शीख धर्माची चाचपणी
१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोप-यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले.  बाबासाहेबही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट ईथे हजेरी लावतात. सेवानिवृत्त न्यायाधिश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व ईतर अनेक मंडळीनी मोठ्या अभिमानानी शीख धर्माचा जाहीर नि विधीवत स्विकार केला.  या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण झाले. बाबासाहेब ईथे शीखांच्या भूमीत बोलताना मोठ्या त्वेषाने भीम गदा फिरवीतात आणि परत एकदा जाहीरपणे धर्मांतराच्या निर्णयावर ठाम असल्याची भीम गर्जना करतात. या परिषदेच्या मंचावरुन उभ्या भारताला एक आव्हान करतात की, “हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी  माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामचे, दारिद्र्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव आमच्यावर लादले. अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जिवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेचि तत्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगती प्रवर्तक आहेत. त्यामूळे मला शीख धर्म मनातून आवडु लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केंव्हा करायचे हे आजून ठरायचे आहे.”  अशा प्रकारे आपला पुढील कार्यक्रम काय असेल याचं ओझरतं दर्श त्यांच्या या भाषणातून तमाम त्या लोकांपर्यंत ज्पोहचलं ज्यांच्या पर्यंत पोहचायला पाहिजे होतं.
प्रतिनिधी सुवर्ण मंदिरात पाठविले.
आता मात्र धर्मांतराची चळवळ अत्यंत वेगाने आकार घेऊ लागली. बाबासाहेबांच्या वादळी प्रचाराने भारतभर खडबळ उडाली. हिंदू धर्मातील सर्व आघाड्या पेटून उठल्या अन बाबासाहेबांवर चतूरस्त्र टिका होऊ लागली. बाबासाहेब मात्र प्रत्येक टिकेगणिक अधिक दृढनिश्चयी व ठामनिर्णयी बनत गेले. शीख धर्माकडील त्यांचा झूकाव अल्लेखनिय होता. उपलब्ध तमात धर्मातुन हा धर्म बाबासाहेबाना आकर्षित  करुन गेला. पन भावनेच्या भारात तडकफडकी निर्णय घेऊन नंतर पश्चाताप करनार बाबासाहेब नव्हते.  जो कुठला धर्म स्विकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करुन, मानवि मुल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंका कुशंकाचे निराकरन  झाल्या नंतरच धर्मांतर करायचे या मताचे बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतन्या मुकंद याना बाबासाहेबानी अमृतसर येथील गुरुद्वारेत वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारेतील शीख  बांधवानी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले.  दोन महिने पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने ही मुलं परत आली.
१३ जणांची तुकडी
१८ सप्टे १९३६ रोजी बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपली १३ जणांची एक तुकडी अमृतसरला रवाना केली.  मुलगा व पुतण्या यानी दिलेल्या वृत्तांताचा  हा सकारात्मक परिपाक होता. धर्मांत चळवळीतील शीख धर्माच्या दिशेनी पडलेले हे आजून एक पाऊल होते. हा हा म्हणता ही तुकडी अमृतसरला पोहचून शीख धर्माचा अभ्यास सुरु केला. दरम्यान काळात झालेल्या पत्र व्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारे अनेक पत्र बाबासाहेबाना मिळाले. उत्तरादाखल लिहलेल्या  पत्रात बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या.  ईकडे  बाबासाहेब ईतर कामात गढून गेले.  याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला.  शीख धर्माचा त्यांच्यावर ईतका प्रभाव पडला की या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता तडक शीख धर्माची दिक्षाच घेऊन टाकली.  खरतर बाबासाहेबानी याना अभ्यासासाठी पाठविले होते. धर्म स्विकारण्याचा निर्णय आजून व्हायचा होता.  बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला हा निर्णय ईतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकल्या गेले.  जेंव्हा ते मुंबईत परतले तेंव्हा त्याना कुणी काळ कुत्रही पुसेना.  यांचा कधी विषय निघाल्यास  बाबासाहेब म्हणत, “देव जाणे त्यांच काय झालं ते” अशा प्रकारे धर्मांतर  चळवळीची वाटचाल चालू होती.
शीखांशी मतभेद आणि काडीमोड
बाबासाहेब शीख धर्माचा स्विकार करतील याची सर्वत्र चर्चा चालू झाली. याच दरम्यान आजून एक दुसरीच समस्या उद्भवू लागली. अस्पृश्याना विधिमंडळात मिळालेले आरक्षण हे हिंदू धर्मातील एक जात (वर्ग) म्हणून मिळाले होते. पण जर अस्पृश्यानी हिंदू धर्माचा त्याग करुन शीख धर्म स्विकारल्यास या आरक्षणाचे काय? असा नवीनच निर्बंधीक पेच तयार झाला. बरं शीखानाही राखिव जागा मिळाल्या होत्या पण त्या फक्त पंजाब प्रांतापुर्ती मर्यादीत होत्या. धर्मांतरा नंतर शीख हे भारतभर असणार पण शिखांचे आरक्षण मात्र भारतभर लागू नव्हते, अशी ही नवीन अडचण उभी ठाकली. अस्पृश्यानी शीख धर्म स्विकारावा यासाठी हिंदू महासभेचा पाठिंबा  मिळविण्याचे काम सुरु झाले. १८ जुन १९३६ रोजी बाबासाहेब व डॉ. मुंजे यांची या संदर्भात एक भेट झाली. सर्व बाजुनी चर्चा झाल्यावर  व हिंदू महासभेच्या प्रमुख सदस्यांची संमती घेतल्यावर डॉ. मुंजे व हिंदू महासभेनी अस्पृश्यांच्या धर्मांतरास व शीख धर्म स्विकारण्यास पाठिंबा दिला.  पण शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा  झाला की शीख धर्म स्विकारण्याचा  विचार सोडून दयावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची अतिरिक्त जाबाबदारी अंगावर पडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २६ (धर्मांतराची भीम गर्जना)


अनेक प्रयत्न करुन बाबासाहेब दलितांना सामाजीक न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटत राहिले. सवर्णाच्या मनात कधितरी अस्पृश्यांबद्दल सदभावना जागॄत होईल या आयेशी ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. मागच्या पाच वर्षापासून नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनूयायी मोठ्या जिकरीने लढा चालविला होता. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटले नाही. त्याना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्या मांजरापेक्शाही खालच्या दर्जाची वाट्ली. याचा एकंदरी परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला झगडा मागच्या पाच वर्षात मातीत मिसळला. याच दरम्यान जेंव्हा नाशिकचा लढा चालू होता तेंव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून गेले होते, त्यामूळे त्यानी आपल्या कार्यंकर्त्यां मार्फत हा झगडा सतत पाच वर्ष केला. तिकडे  गोलमेज परिषदेच्या माध्यामातून जमेल तितकं अस्पृश्यांसाठी खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यानी अस्पृश्याना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लेढा दिला.
शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेब एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात तो म्हणजे धर्मांतराचा. ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचिही कदर नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करुन बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्याना बोलून दाखवू लागले, त्यांची मन चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्म व नकारात्मक अशा दोनी प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजून आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आता मात्र बाबासाहेबाना बळ आलं. आपल्या समाजातील मोठा जनसमूदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्याबर बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली ती म्हण्जे पर्यायी धर्म निवडायचा कुठला. ईथून निघूण परत दुस-या अशा धर्मात अजिबात जायचे नव्हते जिथे परत जातियवादाची पुनरावृत्ती होईल. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मातंर करण्याच्या निर्णयावर येतात. आता वेळ होती या धर्मांतराच्या घोषणेची. सा-या जगाला ओरडून सांगयची की या हिंदूच्या अमानवी वागणूकिस कंटाळून माझा अस्पृश्यवर्ग धर्मांतर करणार आहे हे सांगण्याची. अन येत्या काही दिवसात येवल्यात भरणा-या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले.

येवला परिषद
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. हा हा म्हणता भारताच्या कानाकोप-यातून अस्पृश्य जनता येवले नगरी मोठ्या संखेनी येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले ईतका प्रचंड जनसमूदाय येवले नगरी धडकला. एकून १०,००० लोकांचा हा जनसमूदाय येवल्या नगरीत बाबासाहेबांच्या नावाच्या गगनभेदी आरोळ्यानी आकाश दुमदुमवून सोडत होता.  अन बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते.
येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष आयू. अमृत धोंडीबा रणखांबे होते. लोकानी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी अन हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरु झाले. बाबासाहेब म्हणतात, “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाण हृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे  हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकिचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानूष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुस-या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुस-या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?” बाबासाहेबांच्या या वाक्यानी सभेतील लोकं मोठ्या उत्साहात टाळ्याच्या गडगडाटाने प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मूकपणे सांगून गेला की, ’होय, आम्हाला हा धर्म फेकून दयावयाचा आहे, कधी व कसे ते फक्त तुम्ही सांगा’ अन हा मूक संदेश बाबासाहेबानी ऐकला. अगदी त्यांच्या मनातला विचार अस्पृश्यानी प्रतिध्वनीत केल्यावर बाबासाहेब मोठ्या आवेशाने पुढची भीमगर्जना करतात जी ऐकून भारतच नाही उभ्या भूतलावर मोठं वादळ उठतं. ते म्हणतात, “मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हतं. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.” ही भीम गर्जना ऐकून अस्पृश्य लोकामधे एक  उत्साहची लाट उसळते. नसा नसात नवचैतन्य भरणारी ही भीम गर्जाना म्हणजे हजारो वर्षाची हिंदूंची गुलामी झिटकारण्याची अभूतपूर्व क्रांतीची डरकाळी होती.  आता अस्पृश्यांच्या जिवनाचे एक नवे पर्व सुरु झाले, ते या येवलेभूमीनी अनूभवले. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता.  आता मात्र तो या घोषणेनी मनोमनी या सर्व गुलामीतून मूक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीम गर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांच्या शेवटच्या माणसा पर्यंत पोहचला तो म्हणजे, एक तर आता हिंदूच्या छाताळावर बसून बाबासाहेब आपली अस्पृश्यता घालवतील (जे अशक्य होतं) किंवा या हिंदू धर्माला झिटकारुन धर्मांतरा द्वारे मानवी मूल्ये जपणा-या धर्मात मोठ्या मानाने आमचे धार्मिक पुनर्वसन करतील. त्यासाठी लागणारी मानसिक तय्यारी करण्याचा ईथे निर्णय करुन अस्पॄश्य बांधव पुनर्जन्म झाल्यागत स्वत:मधे एक अप्रतिम बदल  झाल्याचे पाहू लागला. हा बाबासाहेबांच्या भीमगर्जनेचा प्रभाव होता, त्यांच्या मानवी मुल्याच्या झगड्याचा परिणाम होता.

भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळारम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदुच्या हृदयात आपल्यासाठी आजिबात स्थान नाही तेंव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरु होत आहे. आम्हाला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तीभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेंव्हा की यांचा देव अन हे आम्हाला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले. तेंव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मुल्य़े नाकारणा-याना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातीभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तय्यारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जलोषात व उत्साहात परतीला निघतात.

भीम गर्जनेचे उमटलेले पडसाद
बाबासाहेबांच्या भीम गर्जनेनी उपस्थीत पत्रकार लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. तसही बाबासाहेबांच्या तोफेतून निघणारे अनपेक्षित गोळे मोठे धक्कादायक असतात याचा पत्रकाराना चांगलाच अनूभव होता. पण हा धर्मांताची बॉंब मात्र पुरता भारद हादरवून सोडाणारा होता.  धर्मांध लोकांच्या गालावर मारलेली ही थापड ईतकी प्रभावी नि तडाखेंबंद होती की उभ्या भारतात मोठे वादळ येते. दुस-या दिवशीच्या सर्व मुखपत्रातील प्रथम पानावर ही बातमी छापून येते.  बाबासाहेब धर्मातंर करणार ही बातमी जगभर पसरते. हिंदू धर्माच्या अमानवी छळाला कंटाळून मोठ्या शौर्याने केलेली ही गर्जना हिंदू धर्मातील विविध लोकांमध्ये मोठं वादळ उठवून जाते. हिंदू विचारवंत, पिठाधिश, मठाधिश व सामान्य नागरीक प्रत्यक स्थरावर याचा मोठा परिणामकारक प्रतिसाद उमटला. वरच्या सर्व स्थरांत मोठा गहजब माजला. अन बाबासाहेब मात्र धर्मांतराच्या बॉंबनी घायाळ झालेल्या या हिंदूच्या छिन्न विछिन्न अवस्था न्याहाळात निवांत बसले होते. त्याना हेच पाहायचे होते की आतातरी हा समाज आम्हाला सुधारतो का.
हिंदू धर्मातील समाजसेवक अन पुरोगामी वर्ग मात्र बाबासाहेबांच्या या भीम गर्जनेनी कमालीचा दुखावतो, अस्वस्थ होतो. कारण ईथला पुरोगामी वर्ग अस्पृश्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने राबत होता. अस्पृश्यांचा उध्दार व्हावा याची मनातून तळमळ असलेला हा पुरोगामी हिंदूवर्ग बाबासाहेबाना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त करु लागला. लगेच धर्मांतर न करता आजून पाच वर्ष तरी वाट पहावी अन हिंदू समाला सुधरण्याची संधी द्यावी असे अर्ज करणारे अनेक पत्र बाबासाहेबाना पाठविण्यात आले.
पण काही धर्मांध हिंदूना मात्र बाबासाहेबांचा हा  निर्णय सुखावून गेला. त्यांच्या मते एकदाची अस्पृश्यांची घाण या हिंदू धर्मातून बाहेर पडेल. हिंदुना सुगीचे दिवस येतील. अस्पृश्यांची संख्या ईतकी प्रचंड होती की जर तो मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मात गेल्यास त्यांच्या संख्याबळात होणारी वाढ हिंदूना निस्तेनाबूत करुन सर्व आघाड्यावर आपलं वर्चस्व गाजवेल हे या मुर्खांच्या लक्षातच येत नसे. बाबासाहेबानी मुस्लिम धर्म निवडल्यास या देशाचं नाव एक रात्रीत बदलून ईस्लामीस्तान होईल साधं एवढं समजण्याची अक्कल या हिंदू धर्मांध कट्टरपंथीयात नव्हती. पण याची जाण असलेले हिंदू मोठे अस्वस्थ झाले. कुठल्याही परिस्थीतीत बाबासाहेबाना या धर्मांतरापासू रोखणे गरजेचे आहे याची जाण असलेला हिंदूवर्ग बाबासाहेबाना अक्षरश: विनवन्या करु लागला.

अनेक धर्मगुरुंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव
बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करुन दुस-या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हा हा म्हणता साता समूद्रापार जाते अन अनेक धर्माचे धर्मगुरु जे नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टानी उभं जग पालथं घालत असतात त्याना मोठी संधी आयती चालून आल्याने उकळ्य़ा फूटू लागल्या.  अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबाना आपल्या धर्मात यावा यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले. राजगृहावर देश विदेशातून अक्षरश: अशा धर्मगुरुंद्वार पत्रांचा व तारांचा वर्षाव होतो.
ख्रिश्चनांचे धर्मगूरु बिशप ब्रेनटन थॉबर्न ब्रॅडले, मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्च मुंबईचे बिशप यानी बाबासाहेबाना ख्रिश्चन धर्म स्विकारुन आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करुन घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यानी त्यांच्या धर्मात आधिपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरी होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले.  ख्रिश्चन मिशन-यांकडे असलेल्या अमाप पैशाचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचिही कल्पना दिली. शिक्षण क्षेत्रातील मिशन-यांचं कार्य मोठं लक्षणिय व वाखाणन्याजोग. याचा दलिताच्या उत्कर्षासाठी अत्यंत प्रभावी नि सकारात्मक प्रभाव कसा पडेल हे ही समजावून सांगितलं.
मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबाना तार करुन मुस्लिम धर्मात येण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरु बाबासाहेबाना भेटण्यास आलेत.  बाबासाहेबानी ईस्लाम स्विकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडुन कशी पैशाची व ईतस सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्यानी ईस्लाम स्विकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास कसा हिंदूचा थरकाप उडेल हे ही बाबासाहेबाना ठासून सांगण्यात आले. हे सत्यही होते. हिंदू धर्माचे लोक सहसा मुसलमानांच्या वाटेला जात नाहीत. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मूक्त करण्याचा खरतर हा सोपा मार्ग होता. पण बाबासाहेबाना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्या बरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरूष यांचा वयक्तील पातळीवरही मोठा बदल घडावून आणावयाचा होता. शैक्षणीक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिल पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडाझेप घ्यावयाची होती. हे ईस्लाम मध्ये शक्य  नव्हते. बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनाना नकार दिला व ईस्लामचा मार्ग नाकारला.
शिख धर्माचे धर्मगुरू व सुवर्ण मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष सरदार दरिपसिंग दोबीया बाबासाहेबाना तार करुन अस्पृश्यांनी शिख धर्मात यावे अशी विनंती केली.  एकेश्वरी शिख धर्म अस्पृश्यांचं मनोभावे स्वागत करायला तयार आहे. त्याच बरोबर आमच्या धर्मात सर्वाना समान वागणूक दिली जाते नि विद्यार्जनाचे, उत्कर्षाचे सर्व मार्ग शिख बंधू व भगिनीना सदैव उघडे असल्या कारणास्तव या धर्मात तुमचा केवळ नि केवळ उत्कर्षच होईल अशी हमी दिली. बाबासाहेब मधल्या काळात शिख धर्माकडे झुकतातही.  बाबासाहेबाना हा धर्म तसा ईतरांच्या तुलनेत जरा जवळचा वाटू लागला होता.
बौद्ध धम्माचे अनुयायी, महाबोधी संस्था बनारस येथील कार्यवाह यानी बाबासाहेबाना तार केली. भारतात जन्मलेल्या, जातीभेद ना मानणा-या, सर्वाना समान समजणा-या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हा सर्वांचा मोठा उत्कर्ष होईल. मानवी मुल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक काना कोप-यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती आहे, अनुयायी व धम्म बांधव आहेत. आशीया खंडातील बहुसंख्य देशानी बौद्ध धम्म स्विकारलेला आहे. ईश्वराला काळीमात्र महत्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा बौद्ध धम्म तुमचा तेजोमय भविष्य घडवून सोडेल. तळागळातल्या लोकांच्या  प्रती अत्यंत करुना बाळगणारा बौद्ध धम तुम्हा सर्वांचा नवा ईतिहास रचेल अशा प्रकारचं एकंदरीत संदेश बाबासाहेबाना मिळतं.
गांधी  मात्र टोमणं मारायला विसरत नाहीत. अस्पृश्यांचा प्रश्न निकाली निघण्याच्या टप्प्यात  असताना, शेवटाच्या निर्णायक वळणावर असताना बाबासाहेबानी अशी घोषणा करणे केवळ दुर्दैव आहे. हरीजन बांधव आंबेडकरांचे काही एक ऐकणार नाही, धर्म काय अशी रातोरात बदलण्याची वा अंगावरचे कपडॆ बदलावे तशी बदलण्याची गोष्ट आहे का? बहुतांश हरीजन आंबेडकरांच्या या धर्मांतरास साथ देणार नाही अशी मुक्ताफळं गांधीनी उधळली. 
स्वातंत्र्यवीर सावरकर यानी मात्र मोठ्या अस्वस्थ व दु:खी मनाने या धर्मांतराच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. सावरकरानी रत्नागिरी व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्पृश्य निवारणाचे कार्या हाती घेतले  होते. त्यांनी सहभोजन व मंदिर प्रवेशाचे कार्य मोठ्या झपाट्याने चालविले होते. रत्नागिरी सारख्या कट्टरपंथी कोकणस्थांच्या बालेकिल्ल्यात सहभोजन घडवून आणने म्हणजे गंमत नव्हती. अस्पृश्य बांधवानी हिंदू धर्मातच रहावे अन यासाठी त्यानी बदलण्याची गरज नसून हिंदु धर्माने कात टाकावी असा विचार मांडाणारे सावरकर हे नंतर कट्टरपंथीया द्वारे चांगलेच झोडपले जातात.
अशा प्रकारे बाबासाहेबांच्या धर्मातराच्या भीम गर्जनेनी सारा भारत दुमदुमू लागला.  सर्वत्र मोठा गहजब उडाला. ईतर धर्मीयाना ही संधी वाटू लागली तर गांधी, सावरकरादि नेत्यानी बाबासाहेबांवर तोफा डागल्या. सर्व वृत्तपत्रातून झाडून टिकांचा वर्षाव होऊ लागला. माथेफिरू हिंदूनी मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. काहीनी तर चक्क तारा पाठवून तसे कळविले. एकानीतर चक्क रक्ताने पत्र लिहून पाठविले की जर तुम्ही  धर्मांतर केलात तर तुमचा खून करु. अशा सर्व स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. एकंदरीत ही घोषणा हिंदूच्या जिव्हारी लागली होती व तशा  प्रतिक्रिया देशभर उमटल्या. बाबासाहेब मात्र सेनापती जसे शत्रूच्या किल्यावर तोफ डागून शांतपणे उध्वस्त तटबंधी न्याहाळतो तसे हिंदूवर धर्मांतराची तोफ डागल्यावर शांतपणे कोसळणारी हिंदू तटबंदी न्याहाळत होते.

शंकराचार्थ पदाची मागणी:
सर्वत्र धर्मांतराच्या विरोधात हिंदूनी अक्षरश: बाबासाहेबांवर टिकेची झोड उठविले. तिकडॆ ख्रिश्चन लोकं हिंदूंच मोठ्या प्रमाणात धर्मांतर करुन यांच्या संख्याबळाला जबरी सुरुंग लावत होते. मुस्लिमानी सुद्धा मोठ्या प्रमाणात हिंदूचे धर्मांतर घडविणे चालूच ठेवले होते. अन जोडीला बाबासाहेबांनी केलेली घोषणा प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास हिंदू एका झटक्यात सर्व आघाड्यावर मागे फेकल्या जाईल हे चित्र दिसू लागलं. येवले परिषदे नंतर बाबासाहेब वसईचे मित्र डॉ. सदानंद गाळवणकर यांच्याकडे मुक्कामी गेले. तिथे हिंदू धर्माचे प्रसिद्ध धर्मगुरु मसूरकर महाराज बाबासाहेबांची भेट घेतात. हे मसूरकर महाराज हिंदुच्या धर्मांतराचा धोका जानणारे व तो टाळण्यासाठी खटाटोप करणारे एक सच्चे हिंदू होते. ईतर धर्मांधासारखे डोळ्यावर पट्टी बांधून हिंदू म्हणवून घेणारे नव्हते. यानी स्वत: गोव्यातील दहा हजार धर्मांतरीत होऊन ख्रिश्चन बनलेल्या लोकांचे शुद्धिकरण करुन हिंदु धर्मात परत घेतले होते.  ते मोठ्या कळकळीने बाबासाहेबान म्हणतात की धर्मांतर हा तोडगा नसून तुम्ही कृपया यावर मार्ग सांगा. तेंव्हा बाबासाहेब एक बिनतोड प्रस्ताव मसुरकरांच्या पुढे ठेवतात. बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्य हिंदुला एका वर्षासाठी शंकराचार्य पदावर बसवावे, अन तुम्ही सर्व हिंदूनी व शंभरेक ब्राह्मणानी वर्षभर सहकुटूंब त्या अस्पृश्य शंकराचार्याच्या पाया  पडून मनोभावे पुजा करावे. तेंव्हा आम्ही मानू की तुम्ही आम्हास समान समजता व तो दर्जा देण्याईतपत तूमचे हृदय पालट झाले आहे.”  बाबासाहेबांचे हे वाक्य ऐकून मसुरकरांचा मुखवटा पार गडून पडतो. कारण अस्पृश्याला शंकराचार्य बनविण्यासाठी लागणारी मानसिकतात ईतरांची तर सोडाच पण खुद्द मसूरकरांची सुद्धा नव्हती. बाबासाहेबांचं डाव उलटविण्याचं कौशल्य फारच अप्रतिम होतं. पुढच्या माणसाला पार नागडा करुन सोडायचे. अशा प्रकारे शंकराचार्याची मागणी करुन बाबासाहेबानी मसूरकराना त्या खिंडीत गाठले जिथे मावळे त्यांचेच, आयुधं त्यांचीच, हमल्याची रुपरेषा त्यांचीच अन दाणदाणही उडाली त्यांचीच. हे असले भीमास्त्र सोडाण्यात बाबासाहेब मोठे पटाईत होते.  


पुण्यातील परिषद
धर्मांतराचा निर्णय तळीस नेण्याचे काम जोमाने चालविले जाऊ लागले. जाने १९३६ च्या १२ व १३ तारखेला पुण्यात परिषद भरविण्यात आली. प्रा. एन. शिवराज यानी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले होते. अध्यक्षिय भाषणात शिवराज  यानी एक जबरदस्त मुद्दा मांडला. ते म्हणाले आर्यांनी आणलेला हिंदू धर्म ईथे रुजण्या आधी आदिद्रविडांचा एक तेजस्वी इतिहास या मातीला आहे. आपण तो पुनरुज्जीवित करावा. बाहेरून आलेल्या धर्माला पुरुन उरणारा आदिद्रविडांचा इतिहास मोठा प्रभावी नि तेजस्वी आहे. डॉ. पुरुषोत्तम सोळंखी जे सुरुवातीला धर्मांतराच्या विरोधात होते ते आता मात्र अनुकूल झाले होते. त्यानी आपल्या भाषणात नवीन धर्म स्थापन्याचा प्रस्ताव सुचविला होता. बाबासाहेबानी आपल्या तेजस्वी भाषणात धर्मांतराची गरज, त्याची उपयुक्ततात पटवून देताना धर्मांतरामूळे रोजगाराचा प्रश्न मिटणार नाही हे अधोरेखित केले. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागेल हे ठासून सांगितले. धर्मांतर हा मानवी मुल्याचा प्रश्न असून पोटा पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा मार्ग नव्हे. उपजिविकेच्या आघाडीवर लढण्यास सज्ज होण्याचे आवाहन केले. पाच वर्षा    पर्यंत हिंदूच्या हृदयपालटाची वाट पाहून तदनंतर धर्मांतर करु असा निर्वाणीचा ईशार दिला. अशा प्रकारे हिंदूना ५ वर्षाचा अल्टिमेटम देऊन बाबासाहेब पुढच्या कामाला लागतात.  

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

अखेर महागाईचा आवाज सरकारच्या कानावर पडला.


खरं तर एख्याद्या तरुणाने पवार सारख्या दिग्गज नेत्याच्या मुस्काडात मारणे ही अजिबात समर्थनीय बाब नाही.  मी व्यक्तीश: या घटनेचा निषेध करतो. त्यांची राजकीय कारकिर्द नि भारतीय राजकारणातील उत्तूंग व अत्यंत महत्वाचे  स्थान पाहता हा हल्ला होणे अगदी अनपेक्षितही नाही, कारण जनसामान्यांच्या मनात धगधगणारा लावा, राजकारण्यांच्या प्रती वाढत चाललेली नाराजी कधी उसळी मारुन बाहेर येईल याचा नेम नाही.  महागाईने पेटलेला देश कित्येक महिन्यापासून कानठळ्या बसतील अशी आरोळी फोडते आहे पण या निगरगठ्ठ राजकारन्या पर्यंत सामान्य माणसाचा आवाज काही पोहचेना. राजकीय नेत्यांच्या उदासीन  धोरणाचा बळी सामान्य माणूस पडू लागला. जनतेतील प्रक्षोभ वाढू लागला. त्याचा प्रतिध्वनी कधी न कधी उठणारच होता. आज या तरुणाच्या रुपाने महागाईच्या विरोधातील आवाज सामान्य माणसाने सरकारच्या कानावर घातला. तो घेण्यास पवार पुढे आलेत हा निव्वड योगायोग आहे. वेळीच सुधरले नाहित तर आजून काही तरुण असे आवाज घालत राहतील यात शंका नाही.  
त्याच बरोबर मुंबई बांबस्फोटाच्या वेळी बडे बडे शहरोमे छोटी छोटी बाते होती रहती है म्हणना-या राष्ट्रवादीला असा चोप देणे जरी समर्थनीय नसले तरी वरच्या डॉयलॉगला जनसामान्यातून मिळालेलं समर्पक उत्तर आहे. आता विचारा त्या आबा पाटलाना कसं वाटलं म्हणून!  किंवा बडे बडे नेताओके साथ छोटी छोटी घटनाएं होती रहती है असं छाती ठोकून सांगा म्हणा.  सामान्य माणसावर हल्ला झाला तेंव्हा जशी प्रतिक्रीया दिली तशी प्रतिक्रीया खरतर आज राष्ट्रवादिनी दयायला हवी. हे सर्व मोठ्या नेत्याशी होतच असते असं उस्फूर्तपणे व खेळकरपणे म्हणायला हवं. Take It Easy चे बॅनर तयार करुन सर्व राष्ट्रवादीवाल्यानी जागोजागी लावायला पाहिजे. तेंव्हा मानलं असतं याना.  पण हे आता तसं करणार नाही. आपला तो बाप्प्या दुस-याचा तो कार्ट प्रकार करतील. 
दिवसेंदिवस वाढणारी महागाई, शिक्षण क्षेत्रातील ठेकेदारी, बांधकाम व्यवसायातील मुजोरी ही सर्व या नेत्यांमूळे आकार घेत आहे याचा कुठेतरी जनसामान्यातून विरोध होणारच. जनतेच्या संयमाचीही एक परिसीमा असते. आता मात्र या सर्व सीमा पार तुटण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जनतेच्या मनात राजकारण्यांच्या बद्दल जो रोष वाढत जात आहे याकडे राजकारण्यानी सर्वस्वी दुर्लक्ष केले. राजकारण्यांचा मस्तावलेपणा, मनस्वी वागणूक आणि पैशाचा माज यामूळे त्यानी सामान्य माणसाला नेहमीच गृहित धरले. या एकंदरीत वागणूकीच्या विरोधात सामान्यातून आवाज उठणे अपेक्षित होते. मनात वाढत गेलेला रोष आता उद्रेकाच्या रुपाने बाहेर आल्यास नवल वाटुन घेण्याचे कारण नाही. पवाराना बसलेली थापड ही आजच्या तरुणाची प्रातिनिधीक प्रतिक्रिया आहे.  पवारांशी त्या तरूणाचा व्यक्तीक झगडा नाहीच मुळी. हा झगडा सामान्यांचा आहे. आज एका पवाराच्या कानफडात बसली, उद्या दुस-या कुठल्यातरी नेत्याच्या कानाखाली बसेल, परवा तिस-याच कुणाच्यातरी. हे आता थांबविण्यासाठी राजकारण्यानी धोरनात्मक पाऊल उचलावे. महागाईवर नियंत्रन मिळवावे.
काही असो... महागाईचा आवाज अखेर सरकारच्या कानावर पडला, बरं वाटलं.

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

प्रकाशन सोहळा


महाराष्ट्र हे पुरोगाम्यांचं राज्य आहे अशी कितीही आरोळी फोडली तरी त्याला सदैव जातियवादाची किनार   होती व आहे. या जातियवाच्या ढिगा-यात कित्येक बहुजन नायक पूरले गेलेत. वर्चस्ववाद्यांचा प्रभाव असणा-  सवर्ण आणि बहुजन दोन्ही वर्गातील लेखक, इतिहासकारानी नेहमीच अशा पूरलेल्या इतिहासाला फाटा दिला. बहुजनांच्या इतिहासाशी नजरा नजर होऊनही जाणीव पुर्वक कानाडोळा केला. उत्तुंग व्यक्तीमत्व, जगदविख्यात अन अत्यंत प्रभावी बहूजन व्यक्तीच्या इतिहासाशी फटकून वागण्यात आले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला कि आमचे खरे नायक आम्हाला कधी कळलेच नाही. अशाच एका महानायकाला इतिहासाच्या ढिगा-यातून मोठ्या विर्याने उकरुन काढण्याचं अपूर्व कार्य केलं आयु. संजय सोनवणी यानी. हा धनगर सामाजात जन्मलेला व भारतभू साठी उभं आयूष्य पेटवून देणारा आध्य क्रांतिकरक, स्वातंत्र्य लढाची पायाभरणी करणारा वीर पुरूष म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय.
महाराजा यशवंतराव होळकर यांचं सोनवणी लिखित चरित्रग्रंथ ’भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर’ या पुस्तकाचा काल दि. १३ नोव्हे २०११ रोजी पुणे येथील प्रत्रकार भवनात मोठ्या थाटामाटात प्रकाशन सोहळा पार पडला. त्याच बरोबर धनगर-अस्मिता नावाच्या धनगर समाजाच्या पाक्षिकाचेही प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून धनगर बांधवानी मोठी गर्दी केली. काळाच्या ओघात गाडून टाकलेल्या आपल्या महानायकाच्या इतिहासाला सामोर आणल्या बद्दल संजय साहेबांवर धनगर समाजानी अक्षरश: स्तूतीसुमनांचा वर्षाव केला, मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली.  या कार्यक्रमाला राष्ट्रिय समाज पक्षाचे नेते श्री. महादेव जानकर स्वत: जातीने उपस्थीत होते. त्याच बरोबर बहुजन समाजाचे थोर विचारवंत हरी नरके सरही उपस्थीत होते.
धनगर समाजातर्फे संजय साहेबांचा सत्कार करण्यात आला. सहसा सत्कार करताना शाल देण्यात येते पण धनगर बांधवानी पारंपारीक पद्धतीने हा सत्कार करण्याचे ठरविले होते. संजय साहेबाना घोंगळं देण्यात आलं. व सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर पगडी चढविण्यात आली. ही होळकरी पगडी होती. सत्कार पुण्यात झाला अन पगडी दिली यावरुन लोकांत गैरसमज होऊ नये यास्तव आयोजकानी ही पुणेरी पगडी नसून होळकरी पगडी असल्याचं माईकवरुन सांगितलं. मागच्या दोनशे वर्षात प्रथमच पुण्यात होळकरी पगडीनी सत्काराचा मान पटकवीला.  या वेळी संजय साहेबांचे माहितीपर भाषण झाले.
श्री. जानकर साहेबानी आपल्या भाषणात सोनवणी व नरके सरांचे आभार मानले. ते पुढे म्हणतात, “संसदेत दिवसेंदिवस आपल्या ओबीसी नेत्यांची भाषणं अत्यंत प्रभावी होत चालली आहेत. त्यांची भाषणं म्हणजे संग्रही ठेवावे अशी टिपणं असतात. त्याच बरोबर सरकारला कोंडीत धरणारी व सामाजीक  नि राजिकय आघाड्यावर कामाचे वेध घेणारी विश्लेषणात्मक, तुलनात्मक, मर्मभेदक आणि दिमाखदार भाषणं असतात.  ओबीसी नेत्याच्या सडेतोड आणि अचूक युक्तीवादाच्या मागे नरके सरांसारख्या थिंक ट्यांकचं मोठं योगदान असतं. आम्हाला आमचा पक्ष देशाच्या चारही सिमाना नेऊन भिडवायचा आहे. त्यासाठी नरके व सोनवणी सारख्या विचारवंतांची आम्हाला निकडीची गरज आहे. यापुढे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर वाकडी नजर टाकणा-यानी खबरदार व्हावे.”  अशा प्रकारे जानकर साहेबानी विचारवंताची राजकारणाच्या सबलिकरनातील भूमिका विशद केली. त्याच  बरोबर विचारवंताना धमकावणा-या हुकूमशाहाना निर्वाणीचा ईशार दिला की थोबाडं बंद नाही ठेवली तर थोबाडीत बसेल.
नरके सरानी घेतला ब्रिगेडचा समाचार
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करताना नरके सरानी केलेली ज्ञानाची चतूरस्त्र उधळण समाजाच्या नाना पैलूवर प्रकाश टाकणारी होती.  चिकित्स, मार्गदर्शक, मनोवेधक नि आवाश्यक तिथे प्रक्षोभप्रवर्तक तोफा डागत नरके सर पुढे सरकतात. सामाजिक असमतोलतेचा अत्यंत तिटकारा बाळगणारे नरके नवा जातियवाद रुजवू पाहणा-यांचा समाचार घेताना म्हणतात की, “केवळ ब्राह्मणाना शिव्या घालणे ही चळवळ नसून विधायक आणि भरीव कामगीरी करुन तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी लढा उभारणे ही चळवळीची  उद्दिष्टे असावी. पण काही वर्चस्ववादी लोकं समतेच्या चळवळीत नवीन विषता तयार करु पाहत आहेत. वैचारिक मतभेद खोडण्यात सर्वस्वी असमर्थ असणारी ही माणसं लाथा बुक्क्याच्या बाता करतात. पण खबरदार या पुढे ते खपवून घेतले जाणार नाही.” पुढे नरके सर मोठ्या त्वेषाने बोलतात की, “आज काल इतिहास संशोधकांच पीक आलं आहे.  रातो रात इतिहास लिहून नवीन इतिहासकार जन्मास येत आहेत. अजिबात अभ्यास न करता ढापा ढापी करण्यात ही मंडळी सराईत असून खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहेत. ही लबाड लोकं विपर्यस्त इतिहास लिहण्यात गढून गेली आहेत. केळूस्कर गुरुजी लिखीत पुस्तकाचं चक्क टायटल बदलणारी, हवं तसं बारसं करुन घेणारी ही नवी पिढी या देशाचं, समाजाचं व इतिहासाचं वाटोळं करुन दम घेणार.  अभ्यासाच्या नावानी शंख असलेले खेडेकर तर माझं संशोधन स्वत:च्या नावावर छापण्या पर्यंतचा चोरटेपणा केला.” हा नरके सरानी घेतलेला खेडेकरांचा समाचार सभागृहात हशा पिकवून गेला. खेडेकारांचे दोन अनुयायी माझ्या सोबतच बसलेले होते.  त्यांचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. एकेकाचा टप्प्या टप्प्याने समाचार घेत नरके सर पुढे जातात. ते म्हणतात, “इंग्रजांकडून  इतिहास संशोधनाची शिस्त शिकावी. या कामात त्यांच्या तुलनेने आपण पाच हजार पट मागे आहेत. तटस्थपणा, वस्तुनिष्ठता आणि चिकाटी हे सर्व गुण इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे असून गैरसोयीचे असले तरी वस्तूनिष्ठता मांडण्याचं धारिष्ट्य वरील गुणसंपन्न माणूसच करू शकतो.” भावी इतिहासकाराना दिलेला हा मोलाचा सल्ला, चोरट्या इतिहासकारांची केलेली कान उघडणी आणि मस्तावलेल्याना दिलेला निर्वाणीचा ईशारा अशा प्रकारे घेतलेल्या चतूरस्त्र समाचारानी नरके सरांचे भाषण संपन्न झाले.
तिसरी आघाडी
महाराष्ट्रातील बहुजन चळवळीचे स्वत:कडे एकाधिकार मालकी हक्क असल्याच्या अविर्भावात हिंडणा-यांची एक मानसिकता आहे. त्यांच्याशी वैचारीक मतभेद असलेल्या प्रत्येक बहुजनास ते ब्राह्मणाचे हस्तक ठरवित असतात. ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशी चळवळ चालू आहे नि जे जे आमच्या विरुद्ध आहेत ते सर्व ब्राह्मणांचे हस्तक आहेत अशी आरोळी फोडत असतात. बामसेफ व मराठा सेवा संघानी बहुजन विचारवंतावर चिखल फेक करताना ते ब्राह्मणाना जाऊन मिसळले अशी आवई उठवली होती. बहुजन विचारवंत हे कधिच ब्राह्मणांकडे बुद्धि गहान टाकत नाहीत याचा खणखणीत पुरावा देणारा कालचा सोहळा यांच्या थोबाडीत मारुन गेला. ओबीसींचं आरक्षण हिसकावुन नेण्याच्या तय्यारीत असलेल्या वर्चस्ववाद्याना तडाखेबंद प्रतिउत्तर देण्याची गरज होती.  त्यासाठी संघटनात्मक कार्य उभारुन सडेतोड उत्तर देणे गरजेचे होते. कालच्या कार्यक्रमातून याची सुरुवात झाली आहे. बहुजन चळवळीची ही नवी आघाडी ख-या अर्थाने समता रुजविण्यात झोकून देईल. द्वेषमूलक कार्याला ईथे थारा नसणार आहे.  नरके सरानी आपल्या भाषणातून वर्चस्ववाद्याना निर्वाणीचा ईशारा तर दिलाच पण त्याच बरोबर  क्षमाशील हृदयाने असे आवाहनही केले की मोठ्या भावाप्रमाणे बंधूत्वाने वागालात तर विधायक नि भरीव कामात आमची साथच असेल.  आम्ही नेहमी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे होतो अन असणार हे याद राखा.  तोडा फोडा व झोडा करणा-यानी आता थांबावे अन्यथा त्याना तडाखेबाज प्रतिउत्तर देण्यात येईल.   
त्या नंतर सोनवणी लिखीत पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले. हातो हात पहिली आवृत्ती विकल्या गेली, फक्त पन्नास साठच पुस्तक उरलीत. हा सुध्दा विक्रीचा विक्रमी सोहळा होता. अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली.

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

वेदा आधी तू होतास...


वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे  ‘  ऋचा 
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही.
-----------
बाबूराव बागूल

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

महाराजा यशवंतराव होळकर

 
पुस्तकाचे नाव :  महाराजा यशवंतराव होळकर
लेखक            :   संजय सोनवणी
प्रकाशक         :   पुष्प प्रकाशन
आवृत्ती           :  पहिली.
पानं.              :  १४०
किंमत            :  १२५ रुपये
--------------
बहुजन नायकांच्या शौर्याच्या गाथा, कथा अन इतिहास लिहताना प्रचंड प्रमाणात जातियवाद करणारा या देशातील बुद्धिजीवी(?) वर्ग, इतिहास संशोधक व वर्चस्ववादी यानी अत्यंत खालच्या थराला जाऊन जमेल तितकं बहुजन कर्तूत्व दडपण्याच्या अनेक मोहिमा हजारो वर्षापासून मोठ्या शिताफिनं चालविल्या. या वर्चस्ववादी लोकानी मनुवादी लोकांचं उदात्तीकरण करताना बहूजन नायक जे सुर्याच्या तेजाप्रमाने त्या त्या काळात स्वयंप्रकाशीत होते त्यांचा सर्व आघाड्यावर तेजोभंग केला. कित्येक नायकांचा इतिहास बाटविला, दडपून टाकला एवढ्यावर न थांबता काहीना तर चक्क त्या काळातील खलपुरुष बनवून लोकांसमोर पेश केले. बळीराजा, बोधिसत्व रावण, बृहद्रथा सारख्या अनेक बहुजन नायकांचा उपमर्द करणारा इतिहास(पुराणे) लिहून ठेवण्यात आले. अशाच एका बहुजन नायकाला अगदी काल परवा म्हणजे इंग्रजांची सत्ता या मातीत स्थिरावण्याच्या प्राथमिक टप्प्यात असताना सर्व मनुवादी लेखकानी चक्क लुटारु, दरवडेखोर वगैरे शेलक्या वाहून बदनाम केले. पण नशीबाने इंग्रजी लेखकांच्या तटस्तवृतीमुळे इतिहासाच्या मातीत पुरलेला आमचा बहुजन नायक  संजय साहेबानी मोठ्या कष्टानी वरील पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या पुढे उभा केला आहे. या बहुजन नायकाचे नाव आहे, “महाराजा यशवंत होळकर.”
शिवाजी महाराजानी मराठी राज्याची पायाभरणी केली. त्या नंतर अनेक लोकानी हे महाराजांचं राज्य उपभोगलं. कित्येकानी ते टिकविण्यासाठी प्राण पणाला लावले. त्यातीलच एक अनूल्लेखानी मारलेलं नाव म्हणजे महाराज यशवंत होळकर होय.
मल्हारबांचे दत्तक पुत्र (नात्याने पुतणे) तुकोजीराव होळकर यांच्या चार (काशीराव, मल्हारराव-II, विठोजीराव व यशवंतराव) पुत्रापैकी सर्वात धाकटे पुत्र म्हणजे यशवंतराव होळकर. अहिल्याबाईंच्या मृत्यू नंतर (१७९५) तुकोजीराव गादीवर आले. पण दुर्दैवानी दोनच वर्षात त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला (१७९७).
३ डिसेंबर १७७६ रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. वयाच्या १९ व्या वर्षी खर्ड्याच्या निजामा विरुद्ध झालेल्या युद्धात (१७९५) यशवंतरावानी दहा हजार सैन्याचे नेतृत्व करीत निजामाला खडे चारले. त्या नंतर पेशव्याशी तह घडवून आणण्यासाठी निजामानी यशवंतरावाकडे गळ घातली. एवढ्या लहान वयात केवढं जबाबदारीचं काम अंगावर पडलं.
मल्हारराव-II यांचा पुण्यात खून
दौलतराव शिंदे (होळकरांचे पारंपारीक हाडवैरी)  यानी १४ सप्टे १७९७ रोजी पुणे  येथे मसलतीसाठी आलेल्या मल्हाररावाना धोक्याने गाठून ठार केले. यांची गरोदर पत्नी जिजाबाईस शिंद्यानी कैदेत टाकले. या कैदवासातच खंडेराव-II याचा जन्म झाला.  मल्हाररावाची हत्या करुन दौलतराव शिंद्यानी होळकरशाही संपवून होळकरी साम्राज्य घशात घालण्याचा प्रयत्न केला. पेशव्यानी सुद्धा शिंद्याना या कामास अनूमोदन देत होळकरांसारखे दौलतीचे जुने सेवक यांच्याशी दगाबाजी केली. काशीराव होळकराना सुद्धा शिंद्याना नाना लोभ दाखवून अंकित ठेवले. आता संपुर्ण होळकरशाही आपलीच झाली अशा मस्तावलेल्या विचारानी होळकर शाहीचे एक एक महाल जप्त करण्याचा सपाटा शिंदेनी चालविला. शिंदे व पेशवे यानी सामूहिकरित्या चालविलेल्या या होळकरशाहीच्या विरोधातील लढ्यात उतरून शिंद्यांशी सामना करावयास यशवंतराव अन विठोजी आजूनतरी वयाने व अनूभवाने खूप लहान होते. पण शरणागती पत्कारतील ते होळकर कसले. शिंदे व पेशव्यांच्या लोभी व सत्तापिसासू लोकांचा बिमोड करण्यासाठी होळकरी साम्राज्यातून एक नवे वादळ आकार घेते अन शिंदे व पेशवे यांचा पुरता नायनाट करते.
पुण्यावर हल्ला
पेशवे अन शिंदे दिवसेंदिवस माजखोर बनत गेले. यशवंतरावानी समेट घडवुन आणण्याचे अनेक प्रयत्न केले पण होळकरशाही घशात घालण्याच्या लोभापायी शिंद्यानी सर्व विनवण्या धुडकावून लावल्या. आता मात्र शिंदे व पेशव्यांना होळकरी तलवारीची धार दाखविणे हा एकमेव पर्याय उरतो व यशवंतराव अजस्त्र सेना (जी स्वबळावर उभारली) घेऊन पुण्याच्या दिशेनी झेपावतात. हडपसरला दोन्ही सेना आमने सामने येतात, युद्धास तोंड फुटते व या लढ्यात शिंदे अन पेशव्यांची पोलादी सेना चिरडून टाकणारी होळकरांची वादळी सेना मोठ्या शौर्याने लढते. यशवंतरावाच्या झंझावाता पुढे टिकाव न लागल्यामूळे पळपुटा बाजीराव रायगडास पळून जातो. शिंद्यांच्या सेनेला लोखंडाचे चने चारल्यावर होळकर पुण्यात दाखल होतात. यशवंतरावानी शिंदे व होळकरांत समेट घडवुन आणण्याचे अनेक प्रयत्न केले, पण मस्तावलेल्या शिंद्याना व पेशव्याना याची गरजच वाटली नव्हती. याची परिणीती पुण्याच्या युद्धात होते व पेशवे-शिंद्याना तलावारीच्या टोकाने पाणि प्यावे लागते.  युद्धात शिकस्त खाल्यावर बाजीराव रायगडास पलायन करतो. कित्येक विनवण्या करुन सुद्धा पेशवा पुण्यात येण्यास तयार न झाल्यामूळे अमृतरावाना तात्पुरते कारभारी नेमून यशवंतराव निघून जातात. यशवंतरावानी पाठ दाखवताच अमृतरावानी पुण्यात खणत्या लावून लोकांची लूट केली अन पाप यशवंतरावांच्या माथी मारले. याच दरम्यान तिकडे पेशवा इंग्रजाच्या छत्रछायेत जातो व पेशवाई गो-यांकडे गहान टाकतो. ६ डिसे १८०३ रोजी वसईचा तह करुन पेशवा इंग्रजांचा अंकित झाला.

मॉन्सनचा पराभव:
यशवंतरावांचे इंग्रजी सैन्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. मॉन्सन (गोरा अधिकारी) मोठा फौज फाटा घेऊन जयपूरहून निघाला. होळकरांचा टोंक-रामपुरा विभाग जिंकुन पुढे कुच केली.  १० जुलै १८०४ रोजी यशवंतरावानी मुकुंदरा खिंडीजवळ मॉन्सनला गाठले.  होळकरी सेना मोठ्या वीर्यानी लढली. इंग्रजी सेनेची धूळघाण उडवित होळकरानी बढती घेतली. गोरा अधिकारी मैदानातून पळून जातो. होळकरानी राजस्थान, मध्यप्रदेश ते चंबलचं उभं अरण्य दौड मारून इंग्रजांची दाणादाण उडविली. इंग्रज सैन्याचा मोठा दारुगोडा जप्त केला.
दिल्लीवर स्वारी:
इंग्रजी सेनेने होळकरी सेनेचा असा धसका घेतला की यशवंतरावाचे नुसते नाव ऐकली तरी इंग्रज अधिका-यांचा थरकाप उडे. इंग्रजांचा बंदोबस्त करुन दिल्लीच्या पातशाहला इंग्रजांपासून मुक्त करण्याची योजना तयार केली. आपली अजस्त्र सेना, मोठ्या वीर्याने लढणारे सैनिक व दारुगोळ्यासहित होळकरी सेना दिल्लीच्या दिशेनी झेपावते. ८ ऑक्टोबर १८०४ रोजी होळकरानी दिल्लीला वेढा घातला. दोन्ही सैनिकांमधे तुडूंब  युद्ध होते. यशवंतरावाच्या नेतृत्वाखाली होळकरी सेना पराक्रमाची पराकाष्ठा करते. इंग्रजी सेनेच्या पोलादी भींती होळकरी तोफानी उध्वस्त होतात. शिस्तबद्ध लढा देणा-या सैनिकांची अक्शरश: दानदान उडते. पण याच दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडते. यशवंतरावांचा जीवलग मीत्र, सल्लागार व सेनानी भवानी शंकर खत्री यशवंतरावाशी गद्दारी करतो. ऐनवेळी दगाबाजी करुन मोठी सेना सोबत घेऊन इंग्रजांच्या बाजूला उभा होतो. याचा फटका बसणे स्वाभाविक होते. दिल्लीची लढाई मोठ्या वीर्याने लढविणारी होळकरी सेना नजरेच्या टप्प्यातील विजय एका दगाबाजामूळे गमावून बसते. दिल्लीतिल चांदणी चौकातील, ’निमक हरामकी हवेल’ याच दगाबाज खत्रीची हवेली होय.
भरतपूरचे युद्ध:
जनरले लेकने यशवंतरावाना भरपूरच्या किल्यास वेढा देऊन कचाट्यात धरले. ७ जाने १८०७ ला त्यानी किल्यावर तोफांचा भडीमार सुरु केला. दोन दिवसाच्या अतीव परिश्रमान नंतर किल्याच्या तटाचा काही भाग कोसळतो. पण त्यातून इंग्रजी सेना शिरण्या आधिच होळकरी सेनेनी बाहेर उडी टाकून इंग्रजाना तलवारीने पाणि पाजले. लेकने मोठ्या डावपेचाने अनेक हल्ले चढविले, प्रत्येक हल्ला तितक्याच जोमाने परतविण्यात आला. इंग्रजी सेनेची शिस्त उधडून लावणारा महाराजा यशवंतराव खुद्द त्या पडलेल्या भगदाडातून मोठी सेना घेऊन इंग्रजांवर तुटून पडलो. या युद्धात इंग्रजी सेनेची दाणादाण उडाली. दिसेल त्या वाटेने गोरे पळू लागले. होळकरी सेना मोठ्या धैर्याने व वीर्याने रणांगणात शत्रूला तलवारीची धार दाखवू लागली. हा हा म्हणता इंग्रजी सेनेचा पाडाव झाला अन होळकरांचा विजयी. या युद्धाच्या अभूतपुर्व विजयामूळे युरोपात भारताचा नेपोलियन म्हणून यशवंतराव होळकर यांची ख्याती पोहचली.  
अशा प्रकारे इंग्रजी सेनेला धूळ चारणारा हा महान राजा सर्व हेवेदावे विसरुन शिंदे व भोसल्याना देशाच्या  स्वातत्र्यासाठी इंग्रजां विरुद्ध पेटुन उठण्यास आवाहन करतो. भारताला इंग्रजांच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन हाडवैरी शिंद्यांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजांविरुद्ध लढण्यास मैदानात उतरतो. पण शिंदे ते शिंदेच. पराकोटीची राजतृष्णा, होळकरांच्या मालमत्तेवर लोभी नजर व आतून अत्यंत द्वेषमूलक अन राजलालसेनी झपाटलेले शिंदे ईथेही धोखाधडी करतात. त्यामूळे यशवंतराव परत एकदा हताश होऊन एकला चलोच्या मार्गाने जातात. दक्षिण भारता पासून थेट पंजाब, लाहोर पर्यंत स्वत: दौड मारुन प्रत्येक राजाची भेट घेणारा व इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारा यशवंतराव होळकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जनक आहे. 

स्वातंत्र्य लढयाचे प्रणेते:
उभ्या आयुष्यात एकही लढा न हारणारे महाराज यशवंतराव या बाबतीत नेपोलियनलाही मागे टाकतात. अनेक तह करुन राज्य टिकवून ठेवणा-या तहबहाद्दूरांपेक्षा एकही तह न करणारा यशवंत, खरच नावा सारखा यशवंत होता.  शुन्यातून सैन्य़ उभारुन शिंदे, पेशवे ते इंग्रजा पर्यंत सर्वाना खडे चारणारा वीरपुत्र महाराज यशवंतराव होळकर म्हणजे या मातीला मिळालेलं एक अभूतपूर्व वरदान होतं. इंग्रजांचा धोका ओळखून पारंपारीक शत्रूशी वैर मिटवून युद्धास सज्ज झालेले यशवंतराव हे खरे भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते होत.  इंग्रजांचं वर्चस्व वाढताना पारतंत्र्याची चाहूल सर्वप्रथम जरी कुणाला लागली असेल तर ती होळकराना.  सर्व हेवेदावे विसरुन इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याचा विचार मांडणारे पहिले भारतीय म्हणजे होळकर. शिंदे, पेशवे, भोसले, शिख, पासून तर दिल्लीचा पातशाह पर्यंत उभा देश इंग्रजांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागला होता. इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारुन सुखासीन राज्य करण्यात सर्वानी धन्यता मानली होती. नेहमीच्या लढाया व कटकटीतून मुक्तता मिळविण्याचा एक उपाय म्हणजे इंग्रजी मांडलिकत्व असं समीकरण बनत गेलं होतं. चहू बाजूनी इंग्रजी साम्राज्याचा वेढा पडू लागला होता. एकंदरीत परिस्थीती मनोधैर्य खचवून टाकणारी होती. पण या परीस्थीतीतही राष्ट्रप्रेमानी पेटून उठलेला एकमेव मातृभक्त म्हणजे यशवंतराव. यशवंतराव हे एकमेव राजे होते ज्यानी आयुष्यात कधीच इंग्रजाना थारा दिला नाही. शेवट पर्यंत मोठ्या शौर्याने लढले, स्वाभिमानाने जगले. इंग्रजानी भारतातील सर्व शासकांशी आपल्या अटीवर तह करण्याचा सपाटा लावला होता. पण होळकरांच्या बाबतीत चित्र उलट होतं. होळकरांच्या अटीवर कसलीच खंडणी न लादता तह करण्यास इंग्रज एका पायावर तयार होते. यशवंतराव मात्र विनाअट विनाखंडणी तहास सुद्धा तयार झाले नाहीत. ते स्वत: जिवंत असे पर्यंत संपुर्ण भारत काबीज करण्याचा इंग्रजांचा मनसूबा कधीच पुर्ण झाला नाही. त्यांच्या नंतरही त्यांची वीर कन्या भीमाबाईने इंग्रजांशी मोठ्या शौर्यानी लढा दिला. अशा या पराक्रमी व इंग्रजाना दारातही उभं न करणा-या यशवंतरावांचा तेजोमय इतिहास सर्वानी वाचाव.    
हा सर्व इतिहास उलगडल्या बद्दल समस्त बहुजन समाज सोनवणी साहेबांचा आभारी असेल. प्रत्येक बहुजनाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे व आपला तेजोमय इतिहास समजून घेतलाच पाहिजे.