शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

महाराजा यशवंतराव होळकर

 
पुस्तकाचे नाव :  महाराजा यशवंतराव होळकर
लेखक            :   संजय सोनवणी
प्रकाशक         :   पुष्प प्रकाशन
आवृत्ती           :  पहिली.
पानं.              :  १४०
किंमत            :  १२५ रुपये
--------------
बहुजन नायकांच्या शौर्याच्या गाथा, कथा अन इतिहास लिहताना प्रचंड प्रमाणात जातियवाद करणारा या देशातील बुद्धिजीवी(?) वर्ग, इतिहास संशोधक व वर्चस्ववादी यानी अत्यंत खालच्या थराला जाऊन जमेल तितकं बहुजन कर्तूत्व दडपण्याच्या अनेक मोहिमा हजारो वर्षापासून मोठ्या शिताफिनं चालविल्या. या वर्चस्ववादी लोकानी मनुवादी लोकांचं उदात्तीकरण करताना बहूजन नायक जे सुर्याच्या तेजाप्रमाने त्या त्या काळात स्वयंप्रकाशीत होते त्यांचा सर्व आघाड्यावर तेजोभंग केला. कित्येक नायकांचा इतिहास बाटविला, दडपून टाकला एवढ्यावर न थांबता काहीना तर चक्क त्या काळातील खलपुरुष बनवून लोकांसमोर पेश केले. बळीराजा, बोधिसत्व रावण, बृहद्रथा सारख्या अनेक बहुजन नायकांचा उपमर्द करणारा इतिहास(पुराणे) लिहून ठेवण्यात आले. अशाच एका बहुजन नायकाला अगदी काल परवा म्हणजे इंग्रजांची सत्ता या मातीत स्थिरावण्याच्या प्राथमिक टप्प्यात असताना सर्व मनुवादी लेखकानी चक्क लुटारु, दरवडेखोर वगैरे शेलक्या वाहून बदनाम केले. पण नशीबाने इंग्रजी लेखकांच्या तटस्तवृतीमुळे इतिहासाच्या मातीत पुरलेला आमचा बहुजन नायक  संजय साहेबानी मोठ्या कष्टानी वरील पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या पुढे उभा केला आहे. या बहुजन नायकाचे नाव आहे, “महाराजा यशवंत होळकर.”
शिवाजी महाराजानी मराठी राज्याची पायाभरणी केली. त्या नंतर अनेक लोकानी हे महाराजांचं राज्य उपभोगलं. कित्येकानी ते टिकविण्यासाठी प्राण पणाला लावले. त्यातीलच एक अनूल्लेखानी मारलेलं नाव म्हणजे महाराज यशवंत होळकर होय.
मल्हारबांचे दत्तक पुत्र (नात्याने पुतणे) तुकोजीराव होळकर यांच्या चार (काशीराव, मल्हारराव-II, विठोजीराव व यशवंतराव) पुत्रापैकी सर्वात धाकटे पुत्र म्हणजे यशवंतराव होळकर. अहिल्याबाईंच्या मृत्यू नंतर (१७९५) तुकोजीराव गादीवर आले. पण दुर्दैवानी दोनच वर्षात त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला (१७९७).
३ डिसेंबर १७७६ रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. वयाच्या १९ व्या वर्षी खर्ड्याच्या निजामा विरुद्ध झालेल्या युद्धात (१७९५) यशवंतरावानी दहा हजार सैन्याचे नेतृत्व करीत निजामाला खडे चारले. त्या नंतर पेशव्याशी तह घडवून आणण्यासाठी निजामानी यशवंतरावाकडे गळ घातली. एवढ्या लहान वयात केवढं जबाबदारीचं काम अंगावर पडलं.
मल्हारराव-II यांचा पुण्यात खून
दौलतराव शिंदे (होळकरांचे पारंपारीक हाडवैरी)  यानी १४ सप्टे १७९७ रोजी पुणे  येथे मसलतीसाठी आलेल्या मल्हाररावाना धोक्याने गाठून ठार केले. यांची गरोदर पत्नी जिजाबाईस शिंद्यानी कैदेत टाकले. या कैदवासातच खंडेराव-II याचा जन्म झाला.  मल्हाररावाची हत्या करुन दौलतराव शिंद्यानी होळकरशाही संपवून होळकरी साम्राज्य घशात घालण्याचा प्रयत्न केला. पेशव्यानी सुद्धा शिंद्याना या कामास अनूमोदन देत होळकरांसारखे दौलतीचे जुने सेवक यांच्याशी दगाबाजी केली. काशीराव होळकराना सुद्धा शिंद्याना नाना लोभ दाखवून अंकित ठेवले. आता संपुर्ण होळकरशाही आपलीच झाली अशा मस्तावलेल्या विचारानी होळकर शाहीचे एक एक महाल जप्त करण्याचा सपाटा शिंदेनी चालविला. शिंदे व पेशवे यानी सामूहिकरित्या चालविलेल्या या होळकरशाहीच्या विरोधातील लढ्यात उतरून शिंद्यांशी सामना करावयास यशवंतराव अन विठोजी आजूनतरी वयाने व अनूभवाने खूप लहान होते. पण शरणागती पत्कारतील ते होळकर कसले. शिंदे व पेशव्यांच्या लोभी व सत्तापिसासू लोकांचा बिमोड करण्यासाठी होळकरी साम्राज्यातून एक नवे वादळ आकार घेते अन शिंदे व पेशवे यांचा पुरता नायनाट करते.
पुण्यावर हल्ला
पेशवे अन शिंदे दिवसेंदिवस माजखोर बनत गेले. यशवंतरावानी समेट घडवुन आणण्याचे अनेक प्रयत्न केले पण होळकरशाही घशात घालण्याच्या लोभापायी शिंद्यानी सर्व विनवण्या धुडकावून लावल्या. आता मात्र शिंदे व पेशव्यांना होळकरी तलवारीची धार दाखविणे हा एकमेव पर्याय उरतो व यशवंतराव अजस्त्र सेना (जी स्वबळावर उभारली) घेऊन पुण्याच्या दिशेनी झेपावतात. हडपसरला दोन्ही सेना आमने सामने येतात, युद्धास तोंड फुटते व या लढ्यात शिंदे अन पेशव्यांची पोलादी सेना चिरडून टाकणारी होळकरांची वादळी सेना मोठ्या शौर्याने लढते. यशवंतरावाच्या झंझावाता पुढे टिकाव न लागल्यामूळे पळपुटा बाजीराव रायगडास पळून जातो. शिंद्यांच्या सेनेला लोखंडाचे चने चारल्यावर होळकर पुण्यात दाखल होतात. यशवंतरावानी शिंदे व होळकरांत समेट घडवुन आणण्याचे अनेक प्रयत्न केले, पण मस्तावलेल्या शिंद्याना व पेशव्याना याची गरजच वाटली नव्हती. याची परिणीती पुण्याच्या युद्धात होते व पेशवे-शिंद्याना तलावारीच्या टोकाने पाणि प्यावे लागते.  युद्धात शिकस्त खाल्यावर बाजीराव रायगडास पलायन करतो. कित्येक विनवण्या करुन सुद्धा पेशवा पुण्यात येण्यास तयार न झाल्यामूळे अमृतरावाना तात्पुरते कारभारी नेमून यशवंतराव निघून जातात. यशवंतरावानी पाठ दाखवताच अमृतरावानी पुण्यात खणत्या लावून लोकांची लूट केली अन पाप यशवंतरावांच्या माथी मारले. याच दरम्यान तिकडे पेशवा इंग्रजाच्या छत्रछायेत जातो व पेशवाई गो-यांकडे गहान टाकतो. ६ डिसे १८०३ रोजी वसईचा तह करुन पेशवा इंग्रजांचा अंकित झाला.

मॉन्सनचा पराभव:
यशवंतरावांचे इंग्रजी सैन्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. मॉन्सन (गोरा अधिकारी) मोठा फौज फाटा घेऊन जयपूरहून निघाला. होळकरांचा टोंक-रामपुरा विभाग जिंकुन पुढे कुच केली.  १० जुलै १८०४ रोजी यशवंतरावानी मुकुंदरा खिंडीजवळ मॉन्सनला गाठले.  होळकरी सेना मोठ्या वीर्यानी लढली. इंग्रजी सेनेची धूळघाण उडवित होळकरानी बढती घेतली. गोरा अधिकारी मैदानातून पळून जातो. होळकरानी राजस्थान, मध्यप्रदेश ते चंबलचं उभं अरण्य दौड मारून इंग्रजांची दाणादाण उडविली. इंग्रज सैन्याचा मोठा दारुगोडा जप्त केला.
दिल्लीवर स्वारी:
इंग्रजी सेनेने होळकरी सेनेचा असा धसका घेतला की यशवंतरावाचे नुसते नाव ऐकली तरी इंग्रज अधिका-यांचा थरकाप उडे. इंग्रजांचा बंदोबस्त करुन दिल्लीच्या पातशाहला इंग्रजांपासून मुक्त करण्याची योजना तयार केली. आपली अजस्त्र सेना, मोठ्या वीर्याने लढणारे सैनिक व दारुगोळ्यासहित होळकरी सेना दिल्लीच्या दिशेनी झेपावते. ८ ऑक्टोबर १८०४ रोजी होळकरानी दिल्लीला वेढा घातला. दोन्ही सैनिकांमधे तुडूंब  युद्ध होते. यशवंतरावाच्या नेतृत्वाखाली होळकरी सेना पराक्रमाची पराकाष्ठा करते. इंग्रजी सेनेच्या पोलादी भींती होळकरी तोफानी उध्वस्त होतात. शिस्तबद्ध लढा देणा-या सैनिकांची अक्शरश: दानदान उडते. पण याच दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडते. यशवंतरावांचा जीवलग मीत्र, सल्लागार व सेनानी भवानी शंकर खत्री यशवंतरावाशी गद्दारी करतो. ऐनवेळी दगाबाजी करुन मोठी सेना सोबत घेऊन इंग्रजांच्या बाजूला उभा होतो. याचा फटका बसणे स्वाभाविक होते. दिल्लीची लढाई मोठ्या वीर्याने लढविणारी होळकरी सेना नजरेच्या टप्प्यातील विजय एका दगाबाजामूळे गमावून बसते. दिल्लीतिल चांदणी चौकातील, ’निमक हरामकी हवेल’ याच दगाबाज खत्रीची हवेली होय.
भरतपूरचे युद्ध:
जनरले लेकने यशवंतरावाना भरपूरच्या किल्यास वेढा देऊन कचाट्यात धरले. ७ जाने १८०७ ला त्यानी किल्यावर तोफांचा भडीमार सुरु केला. दोन दिवसाच्या अतीव परिश्रमान नंतर किल्याच्या तटाचा काही भाग कोसळतो. पण त्यातून इंग्रजी सेना शिरण्या आधिच होळकरी सेनेनी बाहेर उडी टाकून इंग्रजाना तलवारीने पाणि पाजले. लेकने मोठ्या डावपेचाने अनेक हल्ले चढविले, प्रत्येक हल्ला तितक्याच जोमाने परतविण्यात आला. इंग्रजी सेनेची शिस्त उधडून लावणारा महाराजा यशवंतराव खुद्द त्या पडलेल्या भगदाडातून मोठी सेना घेऊन इंग्रजांवर तुटून पडलो. या युद्धात इंग्रजी सेनेची दाणादाण उडाली. दिसेल त्या वाटेने गोरे पळू लागले. होळकरी सेना मोठ्या धैर्याने व वीर्याने रणांगणात शत्रूला तलवारीची धार दाखवू लागली. हा हा म्हणता इंग्रजी सेनेचा पाडाव झाला अन होळकरांचा विजयी. या युद्धाच्या अभूतपुर्व विजयामूळे युरोपात भारताचा नेपोलियन म्हणून यशवंतराव होळकर यांची ख्याती पोहचली.  
अशा प्रकारे इंग्रजी सेनेला धूळ चारणारा हा महान राजा सर्व हेवेदावे विसरुन शिंदे व भोसल्याना देशाच्या  स्वातत्र्यासाठी इंग्रजां विरुद्ध पेटुन उठण्यास आवाहन करतो. भारताला इंग्रजांच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन हाडवैरी शिंद्यांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजांविरुद्ध लढण्यास मैदानात उतरतो. पण शिंदे ते शिंदेच. पराकोटीची राजतृष्णा, होळकरांच्या मालमत्तेवर लोभी नजर व आतून अत्यंत द्वेषमूलक अन राजलालसेनी झपाटलेले शिंदे ईथेही धोखाधडी करतात. त्यामूळे यशवंतराव परत एकदा हताश होऊन एकला चलोच्या मार्गाने जातात. दक्षिण भारता पासून थेट पंजाब, लाहोर पर्यंत स्वत: दौड मारुन प्रत्येक राजाची भेट घेणारा व इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारा यशवंतराव होळकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जनक आहे. 

स्वातंत्र्य लढयाचे प्रणेते:
उभ्या आयुष्यात एकही लढा न हारणारे महाराज यशवंतराव या बाबतीत नेपोलियनलाही मागे टाकतात. अनेक तह करुन राज्य टिकवून ठेवणा-या तहबहाद्दूरांपेक्षा एकही तह न करणारा यशवंत, खरच नावा सारखा यशवंत होता.  शुन्यातून सैन्य़ उभारुन शिंदे, पेशवे ते इंग्रजा पर्यंत सर्वाना खडे चारणारा वीरपुत्र महाराज यशवंतराव होळकर म्हणजे या मातीला मिळालेलं एक अभूतपूर्व वरदान होतं. इंग्रजांचा धोका ओळखून पारंपारीक शत्रूशी वैर मिटवून युद्धास सज्ज झालेले यशवंतराव हे खरे भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते होत.  इंग्रजांचं वर्चस्व वाढताना पारतंत्र्याची चाहूल सर्वप्रथम जरी कुणाला लागली असेल तर ती होळकराना.  सर्व हेवेदावे विसरुन इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याचा विचार मांडणारे पहिले भारतीय म्हणजे होळकर. शिंदे, पेशवे, भोसले, शिख, पासून तर दिल्लीचा पातशाह पर्यंत उभा देश इंग्रजांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागला होता. इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारुन सुखासीन राज्य करण्यात सर्वानी धन्यता मानली होती. नेहमीच्या लढाया व कटकटीतून मुक्तता मिळविण्याचा एक उपाय म्हणजे इंग्रजी मांडलिकत्व असं समीकरण बनत गेलं होतं. चहू बाजूनी इंग्रजी साम्राज्याचा वेढा पडू लागला होता. एकंदरीत परिस्थीती मनोधैर्य खचवून टाकणारी होती. पण या परीस्थीतीतही राष्ट्रप्रेमानी पेटून उठलेला एकमेव मातृभक्त म्हणजे यशवंतराव. यशवंतराव हे एकमेव राजे होते ज्यानी आयुष्यात कधीच इंग्रजाना थारा दिला नाही. शेवट पर्यंत मोठ्या शौर्याने लढले, स्वाभिमानाने जगले. इंग्रजानी भारतातील सर्व शासकांशी आपल्या अटीवर तह करण्याचा सपाटा लावला होता. पण होळकरांच्या बाबतीत चित्र उलट होतं. होळकरांच्या अटीवर कसलीच खंडणी न लादता तह करण्यास इंग्रज एका पायावर तयार होते. यशवंतराव मात्र विनाअट विनाखंडणी तहास सुद्धा तयार झाले नाहीत. ते स्वत: जिवंत असे पर्यंत संपुर्ण भारत काबीज करण्याचा इंग्रजांचा मनसूबा कधीच पुर्ण झाला नाही. त्यांच्या नंतरही त्यांची वीर कन्या भीमाबाईने इंग्रजांशी मोठ्या शौर्यानी लढा दिला. अशा या पराक्रमी व इंग्रजाना दारातही उभं न करणा-या यशवंतरावांचा तेजोमय इतिहास सर्वानी वाचाव.    
हा सर्व इतिहास उलगडल्या बद्दल समस्त बहुजन समाज सोनवणी साहेबांचा आभारी असेल. प्रत्येक बहुजनाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे व आपला तेजोमय इतिहास समजून घेतलाच पाहिजे.

1 टिप्पणी:

  1. आजपर्यंत जातियवाद्यांनी बहुजन महापुरुषांचा इतिहास दडपन्याचे काम केले

    उत्तर द्याहटवा