मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

तसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही


फुगण्यात अर्थ नाही,रुसण्यात अर्थ नाही,
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

निष्पन्न ही न ज्यातुन्,उत्पन्न ही न काही,
नापिक जमीन ऐसी,कसण्यात अर्थ नाही

हे तथ्य जाणले मी,आयुष्य भोगताना
तू एकटा जगी या,रमण्यात अर्थ नाही

या बेगडी जगातुन्,निष्कर्श काढला मी
तू व्यर्थ चंदनासम ,झिजण्यात अर्थ नाही

विद्येविनाच वंचित्,शूद्रास राखते जी
तसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही

सांगून काल गेले,ते बुद्ध या जगाला
मुर्खांत सज्जनाने,बसण्यात अर्थ नाही

शरदा च्या चांदण्यातच्,राहून रामदासा
दारुण तुझा पराभव्,बघण्यात अर्थ नाही 

व्हा संघटीत बंधू,संघर्ष हा कराया
परतून खैरलांजी,घडण्यात अर्थ नाही

जो अर्थबोध ही ना,हो सकल बहुजनांना
असली गझल विनायक्,रचण्यात अर्थ नाही

-------------------------------------------
विनायक (अण्णा) त्रिभुवन्,वाशी,नवी मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा