शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

दलित उद्योगपती - कल्पना सरोज


दारिद्र्याचा मारा खात, अगणित दु:खात खितपत पडलेल्या उपेक्षिताना बाबासाहेब रुपी समाज क्रांतिकरक लाभल्यावर सर्वत्र मोठी उलथापालथ झाली. सहस्त्रावधी वर्षे दारिद्र्यात खितपत पडलेला समाज उठून उभा राहीला. आपल्या अंगभूत कौशल्यावर मोठी मजल गाठली. सर्व क्षेत्रात मुख्य प्रवाहातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या कर्तुत्वाने आपली गौरवशाली गाथा लिहू लागला. देशाच्या मुख्य प्रवाहातील समाजाशी स्पर्धा करताना एक एक क्षेत्रात आघाडी घेत हळू हळू दलित समाज सर्वत्र आपल्या पाऊलखूणा उमटवू लागला. उद्योग क्षेत्रात उतरण्यासाठी लागणारं भांडवल, अनूभव नि आत्मविश्वास यांच्या अभावामूळे दलितांना या क्षेत्रात उतरावयास बराच अवकाश लागला. बाबासाहेबा नंतर पहिली पिढी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगीरी बजावत उच्च पदस्थ अधिकारी बनली. साहित्य क्षेत्रातही अनेक दलित साहित्यिकानी दैदिप्यमान कार्य केले. कला क्षेत्रातही दलितांचे सूरमणी प्रभाकर धाकडे ते अभिजीत सावंत, अभिजीत कोसंबी पर्यंतची गौरवशाली व तेजोमय वाटचाल आपल्या समोर आहेच. पण या सर्व आघाड्यात दलितांच्या हातून उद्योग क्षेत्र मात्र आजून दूर होते. पण हा आंबेडकरी समाज आहे, थांबणे आम्हाला अमान्य आहे. 
सर्व क्षेत्र पादाक्रांत करण्याच्या ध्येयानी झपाटलेला हा समाज नव्वदीच्या दशकात उद्योग क्षेत्रातही उतरला व हा हा म्हणता आज अनेक यशस्वी दलितांनी कार्पोरेट इंडस्ट्रीत आपली स्वतंत्र ओळख नि स्थान निर्माण केले. अशा दलित उद्योगपती मधील आध्यउद्योजक म्हणजे आयु. लाहोरी राम हे पहिले दलित अब्जाधीश. त्या नंतर मिलिंद कांबळे (डिक्कीचे संस्थापक), राजेंद्र गायकवाड (जी.टी. पेस्ट कंट्रोल), प्रसाद जगताप (एव्हरेस्ट स्पून पाईप इंडस्ट्री), संजय क्षीरसागर (एपीए इन्फ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड),  अशी अनेक दलित उद्योजकांची उद्योगपतीच्या दिशेनी वाटचाल सुरु झाली आहे.  अन एवढ्यावरच न थांबत याच रंजल्या गाजल्या समाजातून एक अत्यंत आत्मविश्वासी, कर्तुत्ववान नि कार्यक्षम महिलेनी कार्पोरेट क्षेत्रात गरूड झेप घेतली त्या महिलेचे नाव आहे आयु. कल्पना सरोज.
कल्पना सरोज:
कल्पना सरोज, भारतातील कार्पोरेट क्षेत्रातील नवीन तडफता तारा म्हणून सर्वज्ञात आहे. कल्पना सरोज आज रु. ३,०००/- कोटीची मालकीन असून अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. दहावी पर्यंतचे  शिक्षणही पूर्ण करु न शकलेली, पराकोटीच्या दारिद्र्यात जिची जडण घडण झाली अशी स्त्री आज यशाच्या एक एक पाय-या चढत थेट भारतीय कार्पोरेट क्षेत्राच्या इतिहासात आपल्या नावाचे एक सोनेरी पान लिहले आहे. 
विदर्भातील अकोल्या जवळील रुपरखेळ नावाच्या एका खेडयात पोलिस हवालदाराच्या घरी जन्म झाला. वयाच्या १२व्या वर्षी विवाह झाला.  त्या नंतर आपल्या जन्मगावापासून हजारो कोस दूर लोकानी गजबजलेल्या माया नगरी मुंबईत पतीच्या घरी कल्पना नांदायला आली. पण सासरच्या लोकांनी कल्पनाचा अतोनात छळ केला. अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीतून आलेल्या या कोवळ्या मुलीस घरुन भक्कम असे पाठबळही नव्हते. सासरच्या लोकांचा छळ, अमानवी वागणूक व पतीचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच गेला. वयाने लहान, शिक्षणाने अपूर्ण व घरचे दारिद्र्य यामूळे होणारा हा छळ मुकाट्याने सहन करत कसे बसे एक वर्ष काढले. पण शेवटी परोकोटीच्या वेदना असाह्य झाल्यामूळे या अमानवी छळापासून सुटका करुन घेणे हा एकमेव पर्याय उभा होता. पतीचे घर सोडण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण मनोधैर्य एकवटून हा निर्णय घ्याण्याचे ठरले. कर्तव्यबुद्धिला न जागणारा पती व सासरचे मंडळी यांनी नितीमत्ता सोडून केलेला अत्याचार मोडीत काढण्याचे साहस व बळ नव्हते. अन शेवटचा पर्याय म्हणजे या पतीला कायमचा निरोप देणे हा एकमेव उपाय होता. मोठ्या धैर्याने व दु:खी मनाने कल्पनाला हा निर्णय घ्यावा लागला. आता कल्पना परत एकदा आपल्या माहेरी वडलांकडे राहायला आली.
मात्र नव-याचे घर सोडून आलेल्या मुलिंची आपल्या समाजात काय स्थीती होते हे सर्वविदित आहे. समाजातील लोकांच्या शेलक्या व टोमणे अस्वस्थ करुन जात. पदोपदी होणारा उपमर्द नि उपहास मनाला चटके लावून जाई. पतीचे घर हे स्वर्ग मानणा-या समाजाला स्त्रीचे स्वत्व असते मुळात हेच मान्य नाही. त्यामूळे नव-यापासून फारकत घेतलेल्या स्त्रीस हा समाज सदैव दोषी मानतो. याचा जिवंत अनूभव कल्पनाला येऊ लागला. मनात विचारांचे काहूर उठू लागले. हे आयूष्य नकोसे होऊन गेले. आत्मघात करण्याचा विचार वारंवार डोकावू लागला. नव-याचे घर सोडल्या पासून सासूरवास संपला खरा पण सामाजीक सासूरवास सुरु झाला. पुरातन विचारानी बरबटलेला, स्त्रीस सदैव दुय्यम मानणारा व पुरुषी अहंकारानी पछाडलेला हा समाज स्त्रीयांच्याप्रती आपलं दायीत्व ओळखून जबाबदारपणे वागण्यास नेहमीच कमी पडला. उलटपक्षी स्त्रीयांवर सामाजिक बंधने लादण्यात व तीचा तेजोभंग करण्यात अग्रेसर होता. कल्पनाला सुद्धा समाजाच्या या संकुचीत नि प्रतिगामी वृत्तीनी अत्यंत छळले. अपमान व दोषारोपाचा प्रचंड मारा झेलत जगताना हे जिवन नकोसे होऊन गेले व शेवती  आत्मघात करण्याचा निर्णय घेऊन टाकला. विषाच्या दोन बाटल्या पिऊन टाकल्या. पण  आयुष्याचा शेवट करण्याचा हा प्रयत्न फसला. घरच्यानी तडका फडकी दवाखान्यात दाखल केले डॉक्टराना कल्पनाचा जिव वाचविण्यात यश आले. हा कल्पनाचा पुनर्जन्म होता. आता मात्र तिनी नवे आयूष्य स्वत:च्या अटीवर जगण्याचे ठरवून टाकले. समाजाच्या टिका टिप्पण्याना  भीक न घालता मनास पटेल तसे जिवन जगण्याचा निर्धार केला. अन वडिलांकडे आग्रह धरला की मला मुंबईस पाठवा. कष्ट करणा-या माणसाला यशाची कवाडं मुंबईत सदैव उघडी असतात व मला तिथेच जाऊन कष्ट करायचे आहे. पोरीच्या हट्टापायी व आत्महत्तेचा धसका घेतलेल्या वडलानी मुंबईतील नातेवाईकाकडे कल्पनाची राहण्याची सोय केली.
आता मात्र कल्पनाच्या आयूष्याला नवी कलाटनी मिळाली होती. आत्मविश्वासानी भरलेली, नव्या वाटा चोखाळणारी व अविरत कष्टानी यश खेचून आणणारी ही कल्पना मुंबईत येऊन थडकली. सुरुवातीला होजीयारीच्या दुकानात शिलाईची कामे करु लागली. अत्यल्प मोबदल्यात तीला हे काम करावे लागत असे, पण आयूष्यात काहितरी नवे घडवूनच थांबायचे असा निश्चय करुन मुंबईत आलेली कल्पना या कामासही मोठ्या आनंदाने स्विकारले. विशिष्ट ध्येयानी प्रेरीत माणसं थाबंत नसतात. त्यांच्या ठायी असलेली अखंड उद्योजकता नि अविश्रांत कष्ट या दोन भांडवालाच्या जोरावर बाकी सर्व तारून नेण्यास ते सिद्ध असतात. कल्पना सुद्धा अशाच ध्येयानी झपाटलेली एक तरुणी होती.
पदरी शिक्षणाचा अभाव होता खरा पण तिच्या ठायी असलेला आत्मविश्वास नि उद्योगशिलता याच्या बळावर  ही कसर भरुन काढण्यास ती सिद्ध होती.
दुसरा विवाह
हा हा म्हणता काही दिवस गेले. कल्पनाचा या व्यवसायात जम बसत गेला. त्याच दरम्यान एका उमद्या तरुणाशी तीची ओळख झाली व त्याच्याशी विवाह केला. हा तरुणही उद्योजक व आत्मविश्वासानी काठोकाठ भरलेला, ध्येयानी झपाटलेला नव्या वाटा चोखाळणारा उमदं व्यक्तीमत्व होतं. म्हणूनच बहुतेक कल्पनाच्या मनात वेगळं स्थान मिळवू शकला. त्याचा काल्याण येथे कपाट बनविण्याचा व्यवसाय होता. ईकडे कल्पना होजीयारीच्या व्यवसायात आता बरीच पुढे निघून गेली होती. या तरुणापासून कल्पनाला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये झाली. पण नशीबानी पुन्हा एकदा थट्टा केली, कल्पनाचा जोडीदार दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर टाकून ईह लोकाचा निरोप घेतो. आता तीचा सामाजीक दर्जा विधवा असा होता. हा आघात झेलण्यास कल्पना सज्ज नव्हती. पहिल्या आघाता नंतर मोठ्या धैर्याने उभी झालेली कल्पना पतीच्या निधनानी पुर्ती खचून गेली, कोसळली, कोलमडून पडली. पण या वेळी तीच्यावर दोन मुलांची जबाबदारी होती. त्यांची तोंडं पुढे येताच तीला परत नव्या उमेदीने उभे राहणे भाग पडले. पतीचा व्यवसाय होताच. कल्पनानी हा विस्खटलेला संसार परत एकदा आवरला व  नव्या उत्साहाने व्यवसायास सुरुवात केली.
कपाटांच्या व्यवसायात तीचा जम बसत गेला. पैसा मागे पडू लागला. अचूक निर्णय, अफाट कार्यक्षमता व अंगभूत उद्योगशीलता याच्या मिश्रणातून उभं झालेलं हे नवं व्यक्तीमत्व यशाची गरुड झेप घेत गेलं. या नंतर कल्पनानी कधी मागे वळून पाहिलच नाही.
कोहीनूर प्लाझा
याच दरम्यान कल्पनानी १९९७ मधे एक भूखंड विकत घेण्याचा निर्णय घेतला. खरतर हा निर्णय अत्यंत धाडसी व जोखीमीचा होता. जो भूखंड कल्पनानी विकत घेण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर अनेकांचे दावे होते. त्या जागेत असलेल्या ईमारतीत अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरुनी आपला मालकी हक्क सांगितला होता. त्याच बरोबर ईतरही स्थानीक बिल्डर व गुंडांची त्या जागेवर नजर होती.  या सर्व अडीअडचणीच्या जोडीला या भूखंडाशी निगडीत काही खटले न्यायालयात प्रलंबित होते. असा एकंदरीत कटकटीचा व गुंतागुंतीचा हा भूखंड विकत घेणे म्हणजे धैर्याचे व धाडसाचे कृत्य होते. कल्पनानी धाडसी निर्णय घेत हा भूखंड विकत घेतला. कायदेशीर लढा लढण्याची सिद्धता केली. दरम्यान काळात गाव गुंडाकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. पोलिसात तक्रार करुन या गुंडांचा बंदोबस्त करण्यात आला. ईतर राजकीय दबाव नि वजनदार माणसांचे नाना प्रलोभने झूगारून देत आपला लढा सुरु ठेवला. अखेर न्यायालयीन लढा जिंकून दाखविला, जागेचे मालकी हक्क कल्पनाच्या नावे झाले. विजयी घोडदौडची ईथे रोवली गेली मुहूर्तमेढ.
या जागेवर सुंदरशी ईमार बांधून कल्पनानी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. या ईमारतीला कोहिनूर प्लाझा असं समर्पक नाव देण्यात आले. २००० साली ही ईमारत विकून मिळालेल्या पैशातून हा व्यवसाय वाढविण्यास सुरुवात झाली.
कमानी ट्यूब्स लि.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून व्यवसायात असलेली कमानी ट्यूब्स लि. २००६ साली दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. या कंपनीवर ११६ करोडचे कर्ज होते. १२० पेक्षा अधिक खटले कंपनीच्या विरोधात न्यायालयात प्रलंबित होते. ५००ते ८०० कामगारांचे देणे बाकी होते. त्याच बरोबर कामगारांची दोन युनियन मधे विभागणी झालेली होती. एका युनियनची समजूत काढावी तर दुस-यानी रुसावे, दुस-याची मागणी मान्य करावे तर पहिला ओरडायचा. अशी एकंदरीत आणिबाणीची परिस्थीतून जाणारी ही कमानी ची कमान घ्यावयास कुणीच तयार नव्हते. तेंव्हा मोठ्या धैर्यानी एक स्त्री उद्योजक पुढे सरसावून येते व बीआईएफआर [बोर्ड फारइंडस्ट्रियल एवं फाइनेंशियल रिकंसट्रक्शन] कडे या कंपनीचे सुत्र आपल्याकडे दयावे असा प्रस्ताव ठेवते.  ते आत्मविश्वासानी भरलेलं व्यक्तीमत्व म्हणजे कल्पना होय.
शेवटी हा प्रस्ताव मान्य करुन कमानीची कमान  कल्पनाच्या हाती देण्यात येते. हा हा म्हणता वर्षभरात कल्पनाच्या कर्तूत्वानी कमानी गरुड झेप घेत कंपनी तोट्यातून बाहेर पडली. परंतू कंपनीवर असलेलेल एकूण कर्ज व ईतर सर्वि देणी अवाढव्य असल्यामूळे या सर्व कर्जातून मुक्त होण्यास कंपनीला सहा वर्षे लागली. पण आता मात्र कमानी ट्यूब्सचे गतवैभव परत आले. अत्यंत धोरणी, दिर्गोद्योगी, धाडसी व चिकाटीच्या बळावर  कल्पनानी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका कंपनीला खेचून बाहेर काढले व आपल्या कर्तूत्वाच्या बळावर कंपनीला गतवैभव प्राप्त करुन देत नवा इतिहास घडविला. 
समीर सरोज:
कार्पोरेट क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणारी, पहिली दिलत उद्योजिका म्हणून भारताच्या इतिहासात स्वत:च नावं कर्तुत्वाच्या बळावर अजरामर करणारी कल्पना शेवटी आहे व्यक्ती. या सर्व जबाबदा-या पार पाडताना, अवाढव्य व्यवसाय सांभाळताना वयक्तीक आयुष्यात एक जोडीदार असावा ही निसर्गिक गरज होय. कल्पनानी आपला तिसरा विवाह ज्याच्या सोबत केला त्याचे नाव समीर सरोज. सरोज साहेब बांधकाम व्यवसायाला वाळू पुरवठा करणारे व्यवसायी होते. पण लग्ना नंतर आता ते आपल्या पत्नीच्या व्यवसायात कल्पनाचे सहकारी म्हणून काम करतात.
कौटुंबिक जबाबदा-या
ही सर्व व्यवसायीक जबाबदारी सांभाळताना कल्पना आई म्हणूनही एक आदर्श व्यक्ती आहे. अत्यंत प्रेमळ, जबाबदार नि कर्तव्यदक्ष आई म्हणून कल्पनाची आप्त ईष्टात मोठी ख्याती आहे. दोन मुलांचे संगोपन करताना आपल्या मुलिला  होटेल मॅनेजमेंटच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठविले असून मुलगा जर्मनीमध्ये पायलटचे प्रशिक्षण घेत आहे. आभाळाला स्पर्श करणारी कल्पना जमीनीवर पाय रोवून उभी आहे. आपल्या लहान भावाचा व बहिणीचा शिक्षणाचा सर्व खर्च कल्पनानी केला असून त्यांच्या लग्ना पर्यंतची सर्व जबाबदारी पार पाडली आहे. एवढ्यावरच न थांबता कल्पनानी त्या दोघानाही एक एक सदनिका भेट म्हणून दिली व त्यांचे आयुष्य मार्गी लावले.
सामाजीक कार्य
बाबासाहेब आंबेडकरांच्या परोपकारबुद्धिमूळे आज हा बदल घडून आला आहे. समाज बांधवांप्रती त्यांच्या मनात असलेला कळवळा, त्याग व सामाजिक क्रांतीसाठी दिलेला प्रदिर्घ लढा यामूळे आज आपल्या समाजाला हे तेजस्वी दिवस पाहण्याचे भाग्य लाभले. कल्पना सरोजनी व्यवसायीक गगन भरारी घेतानाच सामाजीक बांधिलकी जोपासली आहे. आपण समाजाचे देणे लागतो व ते आपले कर्तव्यच आहे अशी खूणगाठ बांधून त्या सामाजीक ऋण फेडण्यास सदैव सज्ज असतात. त्याच बरोबर ज्या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला व बालपण गेले तिथे पायलट ट्रेनिंग स्कूल काढण्याचा त्यांचा संकल्प आहे.
दलित समाज आता नवा इतिहास घडवतो आहे. कार्पोरेट जगतातील कल्पनाची कामगीरी दलितांच्या कर्तूत्वाची दखल घेण्यास भाग पाडत असून नुकत्याच मुंबईत भरलेल्या दलित एक्स्पोला टाटा बिरला सारख्या दिग्गजानी भेटी दिल्या. सा-या जगाचे लक्ष वेधून घेणारी ही कामगीरी दलित बांधवांमधे नवचैतन्य जागविणारी, नवे मार्ग चोखाळायला लावणारी व मुख्य प्रवाहात आता स्वताचे स्वतंत्र स्थान निर्माण  करण्यास मार्गदर्शक ठरणारी आहे.  
दहावी पर्यंतही शिक्षण न घेऊ शकलेली एक अल्पशिक्षित ते एक यशस्वी उद्योगपती (? पत्नी)  असा थक्क करणार प्रवास करुन आज कल्पना जेंव्हा मुंबईतील बैलार्ड ईस्टेट मधिल कार्यालयात बसते तेंव्हा भारतातील मोठ मोठे दिग्गज तीला भेटायला बाहेर रांगेत उभे असतात.
या यशस्वी नि गौरवशाली वाटचाली बद्ध कल्पनाचं अभिनंदन व शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा