मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

बोधिसत्व कसे प्राप्त होते


आपण सर्व बाबासाहेबाना बोधिसत्व  असे संबोधतो. परवाच्या रविवारी विहारात चक्क एका स्त्रीने हा प्रश्न विचारला  की बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते?. मग तिथल्या धम्मचा-यानी बोधीसत्वा बद्दल सविस्तर माहिती सांगितली. हाच प्रश्न इतराना पडत असल्यास त्याचे उत्तर म्हणून बोधिसत्वाचा अर्थ व प्राप्त होण्याचे टप्पे ईथे देत आहे.
बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. दहा पारिमितांचे पालन करताना बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होते.
१० पारमिता
१)   शील:- शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे.
२)  दान:- म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे.
३) उपेक्षा:- म्हणजे अलिप्तता, अनासक्ति, आवड-नावड नसणे, फलप्राप्तिने विचलीत न होणे, निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.
४) नैष्क्रम्य:- म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५) वीर्य:- योग्य प्रयत्न करणेहाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.
६) शांती:- म्हणजे क्षमाशीलतात, द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.
७) सत्य:- कधीही खोटे न बोलणे, कोणाचीही चुगली न करणे, कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.
८) अधिष्ठान:- ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.
९) करुणा:- समस्त प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.
१०) मैत्री:- प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.

वरील दहा पारिमितांचा सराव करता करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते. ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था. एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की मग जी अवस्था प्राप्त होते तीला बुद्धत्व म्हणतात. तर दहा पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते पाहू या.
पायरी: १) मुदिता:-  आनंदर प्राप्त करुन घेतो,  सर्व पाणिमात्रांच्या कल्याणाची तळमळ लागते.
पायरी: २) विमलता:- कामवासनेचे सर्व विचार काढून टाकणे आणि दयाशील बनने.
पायरी: ३) प्रभाकारी:- अनात्म व अनित्याचे आकलन होते, बुद्धी सतेज होऊन सर्वोच्च ज्ञानाची ईच्छा होते, तो कशाचाही त्याग करण्यास तयार होतो.
पायरी: ४) अर्चिस्मती:- अग्नी प्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता मिळवतो, अष्टांग मार्गाचे अनुसरण करतो, चतुर्विध ध्यान व व्यायाम करुन इच्चाशक्तीच्या बळावर पंचशिलेचे अनुकरण करतो.
पायरी: ५) सुदुर्जया:- त्याला सापेक्ष व निरपेक्ष याचे ज्ञान प्राप्त होते.
पायरी: ६) अभिमुखी:- अविद्येने अंध असलेल्या व्यक्ती विषयी अगाध करुणा बाळगणे.
 पायरी: ७) दूरगमा:- अनंताशी एकरुप होतो. मोह, माया, तृष्णेपासून अलिप्त होऊन परोपकार, सहनशीलता व व्यवहार चातुर्य मिळवितो. शक्ती, शांती, बुद्धी(प्रज्ञा) चा संपुर्ण अभ्यास व धर्माचे ज्ञान होते.
पायरी: ८) अचलावस्था:- जे जे चांगले आहे ते सर्व स्वाभाविकताच करतो. जी जी गोष्ट करेल त्यात यशस्वी होतो.
पायरी: ९) साधुमती:- ही स्थीती अत्यंत महत्वाची असून, या स्थीतीत उपासकास धर्म, शास्त्र, दिशा  जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
पायरी: १०) धर्ममेथ:- या स्थीतीत बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टि प्राप्त होते.
अशा प्रकारे दहा पारिमितांचे पालन करता करता साधक बोधिसत्वाच्या एक एक पाय-या चढायला सुरुवात करतो. एक एक टप्पा पार करायला कित्येक वर्षे जावी लागतात. दहा पारिमिताचा पाया जेवढा भक्कत तेवढी बोधिसत्वाच्या पाय-या ओलांडण्याची गती जास्त.
बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर दहा पारिमितांचे पालन करत करत बोधिसत्व बनले. ते आजून काही वर्ष जगल्यास त्याना बुध्दत्व प्रात झाल्यावाचून राहिले नसते.

१० पारमिता

बाबासाहेबानी धर्मांतराच्या वेळेस २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या होत्या. त्या २२ प्रतिज्ञा अत्यंत महत्वच्या असून त्यातील १२ प्रतिज्ञा दहा पारिमितांचे पालन करण्यास सांगते. पण कित्येकाना त्या दहा पारिमिता काय आहेत हेच माहीत नसल्यामूळे त्यांची अडचण होते. त्या दहा पारिमिता खालील प्रमाणे आहेत.
१० पारमिता
१)   शील:- शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे.
२)  दान:- म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे.
३) उपेक्षा:- म्हणजे आप्तिता, अनासक्ति, आवड-नावड नसणे, फलप्राप्तिने विचलीत न होणे, निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.
४) नैष्क्रम्य:- म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५) वीर्य:- योग्य प्रयत्न करणे,  हाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.
६) शांती:- म्हणजे क्षमाशीलतात, द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.
७) सत्य:- कधीही खोटे न बोलणे, कोणाचीही चुगली न करणे, कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.
८) अधिष्ठान:- ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.
९) करुणा:- समस्त प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.
१०) मैत्री:- प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.

सर्व बौद्ध बांधवानी या दहा पारिमितांचे पालन करण्याचा प्रयत्न करावा.

२२ प्रतिज्ञा अभियान आणि शब्दप्रामाण्यवाद

बाबासाहेबानी आंबेडकरी समाजाला बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या होत्या. त्या २२ प्रतिज्ञा नागपूरच्या पवित्र भूमित बाबासाहेबानी समस्त पददलिताना हिंदू धर्माच्या दलदलीतून कायमचे खेचून बाहेर कढण्यासाठी नि सदैव बौद्ध आचरणास कटिबद्द करण्याच्या हेतूने वधवून घेतल्या होत्या. हिंदु समाजातील अस्पृश्य लोकांची बौद्धत्वाशी नाळ जोडताना, हिंदुत्वाशी संबंध तोडणारा घावही तेवढाच  घणाघाती असावा याची खबरदारी घेत २२ प्रतिज्ञाची सोय केली. हिंदुत्व नाकारणा-या प्रतिज्ञा देत बौद्ध तत्वज्ञानाशी नवे नाते जोडण्याचा तो अलौकिक प्रयोग होता. हिंदुत्व झुगारुन बौद्ध धम्म स्विकारणा-याना त्या तंतोतंत लागू होत्या. आज त्या घटनेला अर्ध शतक उलटुन गेले. बाबासाहेबानंतर ही तिसरी पिढी सुरु आहे. आमचे  आजोबा, वडील हे बौद्ध होते. बौद्ध म्हणून जन्मलेली ही आमची तीसरी पिढी आहे. आमचा हिंदू धर्माशी काहीएक संबंध नसून  जन्माने व कर्माने आम्ही बौद्ध आहोत. कोणेकाळी आमचे पुर्वज हिंदू होते ही गोष्ट आज इतिहासजमा झाली असून हिंदुत्वाशी आज आमचे काही देणे घेणे नाही.
बाबासाहेबानी १९५६ मधे हिंदू असलेल्या महाराना बौद्ध बनविताना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या तेंव्हाच्या लोकाना लागू होत्या. पण आज मात्र त्या २२ प्रतिज्ञा सरसकट लागू पडत नाहीत, त्यातील काहीच प्रतिज्ञा आम्हाला लागू पडतात. मग त्या काही प्रतिज्ञा वेचून वधाव्यात की कसे असाही प्रश्न येतो. की मग २२ च्या २२ प्रतिज्ञा म्हणाव्यात हा सुद्धा एक कडीचा मुद्दा आहेच. यातील नेमकं काय करावं याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. तरी सुद्धा स्वत:ला आंबेडकरवादी समजणा-या महामुर्ख लोकानी २२ प्रतिज्ञा अभियान मोहीम उघडून २२च्या २२ प्रतिज्ञा बौद्ध बांधवांकडून वधवून घेत आहेत. २२ प्रतिज्ञा या मूळात कुठल्याही बौद्ध माणसाला लागूच पडत नाही एवढी साधी गोष्ट यांच्या लक्षात येत नाही ही खरी खंत. त्या जर कुणास लागू पडत असतील तर हिंदू म्हणून जगणा-यास लागू पडतात. ते की कधी? तर समजा तो हिंदू इसम हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्मात प्रवेश करत असल्यास प्रवेशाचा विधी म्हणून त्या लागू पडतील. अन्य वेळी त्या गैरलागू पडतात. 
दर वर्षी ६ डिसेंबरला चैत्यभूमीत २२ प्रतिज्ञा अभियान  मोहीमे अंतर्गत बौद्ध लोकाना धरुन धरुन २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या जातात. कित्येक बौद्ध बांधवानी त्या बद्द्ल वेळोवेळी निषेधही नोंदवीला आहे. त्याच प्रकारे अनेक वृत्तपत्रातून व प्रत्येक विहारातून आता २२ प्रतिज्ञा वधवून घेणे सुरु झाले आहे.  काही वर्षा आधी विहारांतून बुद्ध पुजा-पाट केला जाई. पण आता मात्र त्याच्या जोडीला २२ प्रतिज्ञाही दाखल झाल्यात आहेत. प्रत्येक विहारातून व सार्वजनीक पुजापाठ, धार्मिक विधी नि ईतर कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात २२ प्रतिज्ञांचा प्रचार व प्रसार चालू आहे. पण या प्रतिज्ञा आपल्याला आज लागू पडतात  का असा कुणी विचार सुद्धा करत नाही. बाबासाहेबानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा डोळे बंद करुन व बुद्धी गहान टाकून म्हटल्या जाण्यामागचे कारण हिंदू द्वेष आहे की बाबासाहेबांच्या प्रति असलेली एकनिष्ठता हे ठरविणे अवघड होऊन बसले आहे. तरी जरा खोलात जाऊन पाहिल्यास  हेच सिद्ध होते की या २२ प्रतिज्ञांच्या मागे हिंदू द्वेषच जास्त आहे. अन्यथा बाबासाहेबांच्या प्रति निष्टा असती तर २२ प्रतिज्ञा मधून दिलेल्या १० पारमितांचे पालन सुरु झाले असते. २२ प्रतिज्ञा म्हणणा-यानी दारु सोडली असती. सर्वांना समान लेखले असते. खोटे बोलणे सोडले असते. यातलं काहीच होताना दिसत नाही. म्हणजे त्या प्रतिज्ञामधील समाजोध्दारक तत्वज्ञान व उच्च पातळीची नैतिक मुल्ये ज्यांची नितांत गरज आहे ती सरळ फाट्यावर मारली जात असून फक्त हिंदू द्वेषापुर्ती त्या प्रतिज्ञा हव्या आहेत. ही खरं तर लबाडी असून केवळ ढोंगी लोकानी भोळ्या भाबळ्या आंबेडकरी जनतेसमोर खोटा व द्वेषमूलक आदर्श उभा करण्याचा एकुण खेळ दिसतो. २२ प्रतिज्ञा म्हणणे हा आंबेडकरवाद्यांचा एक नवा ढोंग आहे. २२ प्रतिज्ञातील मतीतार्थ समजून घेण्यातही कुणाला रस नाही. २२ प्रतिज्ञामधील हिंदुत्व नाकारणा-या व त्याचा विरोध करणा-या प्रतिज्ञावर सगळा भर असतो. पण उरलेल्या ईतर प्रतिज्ञा मात्र नुसत म्हणायचं म्हणून म्हटल्या जातात. तर चला आपण २२ प्रतिज्ञा काय आहेत, त्या म्हणण्याची मानसीकता व उद्देश काय आहे ते सविस्तर पाहू या.

हिंदुचे देव नाकारणा-या पहिल्या सहा प्रतिज्ञा येणेप्रमाणे आहेत.
प्रतिज्ञा क्र. १:-  मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. २:- राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. ३:- मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. ४:- देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
प्रतिज्ञा क्र. ५:- गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. ६:- मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
वरील  प्रतिज्ञा हिंदूचे देव नाकारणा-या आहेत. माझ्या पुरता बोलायचं तर मी जन्माने बौद्ध असल्यामूळे हिंदूच्या देवांना नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कारण माझा त्यांच्याशी संबंधच नाही. म्हणून बाबासाहेबांच्या त्या सहा प्रतिज्ञा माझ्यासारख्या Buddhist by Birth माणसला लागू पडत नाही. त्यामुळे मी या सहा प्रतिज्ञां कधीच म्हणत नाही. जे आजही स्वत:ला हिंदू मानतात त्यानी नक्की म्हणावे. आम्ही हिंदू धर्म सोडून अर्ध शतक उलटले. जन्माने बौद्ध असल्यामूळे आम्ही बुद्धाची उपासना करीत वाढलो. ब्रह्मा, विष्णू  व महेश यांच्याशी तीन पिढ्य़ा आधीच नाते तोडण्यात आले. बौद्ध म्हणून जन्मलेले आम्ही तरुण मुलं हिंदू धर्माची दिक्षा घेऊन वरील देवतांचा स्विकार केला नाही, ते आमचे दैवत नाहीत वा त्यांचा आमचा काही संबंधही नाही. त्यामूळे त्याना नाकरण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याना आम्ही स्विकारलेच नाही. जे आमचे देव नाही त्याना नाकारण्याची प्रतिज्ञा कशी काय घेता येईल. म्हणून वरील १ ते ६ या सर्व प्रतिज्ञा मला गैरलागू आहेत.
प्रतिज्ञा क्र. ७:-  मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
सातवी प्रतिज्ञा मात्र मला लागू पडते.  कारण मी बुद्धाच्या शिकवणनुसार वागण्यास कटिबद्द असून तसा प्रयत्न करतो आहे.
प्रतिज्ञा क्र. ८:-  मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. 
मी जन्माने बौद्ध असल्यामूळे वरील प्रतिज्ञा मला गैरलागू पडते.  कारण ब्राह्मण माझ्या घरी येणार तरी कशाला? अन आमचे सगळे विधी भंते करत असल्या्मुळे वरच्या प्रतिज्ञेशी माझा काही एक संबंध नाही.
प्रतिज्ञा क्र. ९:-  सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. १०:-  मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
प्रतिज्ञा क्र. ११:-  मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
प्रतिज्ञा क्र. १२:-  तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
प्रतिज्ञा क्र. १३:-  मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
प्रतिज्ञा क्र. १४:-  मी चोरी करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १५:-  मी व्याभिचार करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १६:-  मी खोटे बोलणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १७:-  मी दारू पिणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १८:-  ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
९ ते १८ सर्व प्रतिज्ञा मला बंधनकारक असून मी त्या पालन करण्याचा प्रयत्न करतो. नवबौद्धांकडून वरील प्रतिज्ञा नुसतं वधवून न घेता त्याचे पालन होत आहे का, याची फेरतपासणीही केली जावी. ही तपासणी कुणी त्रयस्थाने न करता प्रत्येक बौद्धाने आत्मचिंतनाने तपासून पहावे की आपण ९ ते १८ प्रतिज्ञाचे पालन करतोय का? किंबहूना तसा प्रयत्न तरी करतोय का?  २२ प्रतिज्ञातील ख-या प्रतिज्ञा ज्यांची आज गरज आहे त्या म्हणजे या ९-१८. आपण सगळ्यानी त्यावर जितकं जास्त भर देऊ तितकं  जास्त धम्मकार्य गती पकडॆल.
प्रतिज्ञा क्र. १९:-  माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणा-याक व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणा-या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
ही प्रतिज्ञा म्हणताना खुद्द बाबासाहेब दोन क्षण थांबले, त्या दोन क्षणात बाबासाहेबांच्या डोळ्यापुढून अडीच हजार वर्षाचा काळ झरझर सरकला. ज्या धर्माने शतकानू शतके आपल्या बांधवांचा अतोनात छळ केला त्याची आठवण होऊन त्यांचे डोळे भरुन आले. अन दुस-याच क्षणात  मात्र त्यांच्या चेह-यावरील मुद्रा बदलली. अशा या नीच धर्माचा त्याग करताना त्याना आनंद होत होता. ती गुलामी झुगारण्याचा हा दिवस मोठ्या कष्टाने प्राप्त झाला होता. लगेच स्वत:ला सावरत बाबासाहेब ही प्रतिज्ञा पुर्ण करतात. उपस्थीत महार समाजातील सर्व बांधव हिंदू धर्माचा त्याग करणारी ही प्रतिज्ञा दाटलेल्या कंठानी पुर्ण करत  नव्या धम्मात प्रवेश करतात.  ही घटना आहे १९५६ ची. आज त्या घटनेला पाच दशकं उलटलून गेलीत. मधल्या काळात आंबेडकर चळवळीची राजकीय आघाडी जरी खिळखिळी झाली तरी सामाजीक व धार्मिक आघाडी मात्र प्रबळ होत गेली. त्याचा परिपाक म्हणजे पन्नास वर्षात झालेली बौद्ध धम्माची वृद्धी.  
आजच्या घटकेला २२ प्रतिज्ञा मधील ही १९ वी प्रतिज्ञा आपल्याला लागू पडते का हा महत्वाचा प्रश्न आहे? काय सांगते १९वी प्रतिज्ञा? ही प्रतिज्ञा हिंदू धर्माचा त्याग करायला सांगते. मी तर बौद्ध आहे, मग मी हिंदु धर्माचा कसा काय त्याग करु शकतो? करुच शकत नाही, म्हणून १९ प्रतिज्ञा मला गैरलागू पडते. मी ज्या धर्माचा कधीच नव्हतो (by birth / by choice) तेंव्हा त्या धर्माचा त्याग करतो असे म्हणने म्हणजे केवळ मुर्खपणा ठरेल. आजचे नवबौद्ध (आंबेडकरी) मात्र जाहीरपणे ही १९वी प्रतिज्ञा प्रत्येक कार्यक्रमात म्हणत असतात.  बरं एखादी व्यक्ती पहिल्यांदा ही प्रतिज्ञा म्हणत असल्यास असे गृहित धरायला हरकत नाही की ती व्यक्ती हिंदू आहे, त्या धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माचा स्विकार करत आहे. पण ईथे तसं होत नाही. दर रविवारी ही प्रतिज्ञा म्हटली जाते. म्हणजे मधल्या काळात हे घरी जाऊन परत हिंदू धर्माची दिक्षा घेतात की काय? म्हणून त्याना तो परत त्यागावा लागतो. जर तसे नसेल तर मग ते हिंदू नसतानाही हिंदू धर्माचा त्याग करण्याची खोटी प्रतिज्ञा घेत असतात की कसे? याचाच अर्थ जाहीरपणे ते खोटे बोलत असतात. म्हणजे बौद्ध धम्माचा अपमानच करत असतात. एखादी व्यक्ती हिंदू नसताना हिंदू असल्याचा आव आणत तो धर्म त्यागन्याची प्रतिज्ञा घेत असेल तर हा खोटारेडपणा आहे. जर हिंदू असेल तर मग तो धर्म वारंवार कसं काय त्यागता येतो? एकदा १९वी प्रतिज्ञा म्हटली की झालं, त्यागला तो हिंदू धर्म. पण  काही दिवसानी परत तो त्यागण्याची प्रतिज्ञा म्हणजे मधल्या काळात बौद्ध धम्म त्यागल्याचा पुरावा नव्हे काय? याचा अर्थ सरळ आहे की ही आंबेडकरी म्हणवून घेणारी लोकं एकतर दर आठवड्याला धर्म बदलत असतात किंवा याना ती प्रतिज्ञा कळतच नाही. जर दर आठवड्या धर्म बदलून परत परत तीच ती धरसोड करत असतील तर नैतिक पातळीवर त्याना बौद्ध म्हणवून घेण्याचा अधिकारच राहत नाही. किंवा दुसरी शक्यता म्हणजे ती प्रतिज्ञा त्याना कळतच नाहीये. पण न कळावं असं काय आहे त्या प्रतिज्ञेत. साधी, सोपी प्रतिज्ञा आहे. ’मी हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्विकार करतो.’ यात न कळण्यासारखं काय आहे? १९वी प्रतिज्ञा दुस-यांदा म्हणणारे समस्त आंबेडकरवादी हे आंबेडकरद्रोही, धम्मद्रोही नि खोटारडे ठरतात. तसेच हे ही सिद्ध होते की मधल्या काळात त्यानी वेळोवेळी बौद्ध धम्माचा त्याग करुन हिंदू धर्म स्विकारला अन प्रत्येक वेळी तो १९व्या प्रतिज्ञेद्वारे त्यागला. म्हणजे २२ प्रतिज्ञा मधील १९वी प्रतिज्ञा म्हणणारा प्रत्येक आंबेडकरी हा खोटारडा, फसवा नि धम्मद्रोही आहे.
प्रतिज्ञा क्र. २०:-   तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
प्रतिज्ञा क्र. २१:-   आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. २२:-   इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
२०,२१ व २२ या प्रतिज्ञा सर्वकाळ लागू पडतात. म्हणजेच बाबासाहेबानी धर्मांतराच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पैंकी आज आपल्याला लागू पडणा-या प्रतिज्ञा कोणत्या, तर ७, ९, १०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,२०,२१,२२ अशा एकून १४ प्रतिज्ञा आपल्याला लागू पडतात. १ ते ६ प्रतिज्ञा हिंदू धर्म नाकारणा-या आहेत व आपण हिंदू नसल्यामूळे त्या गैरलागू आहेत. ८ वी प्रतिज्ञा ब्राह्मणाच्या हातून क्रियाकर्म करण्याचे नाकारणारी आहे व १९ वी हिंदू धर्माचा त्याग करणारी. 
प्रश्न असा आहे की वरील २२ प्रतिज्ञा कुठे घेतल्या  जातात ? बुद्ध विहारात. मग सांगा जो माणूस बुद्ध विहारात येतो तो ब्राह्मणाकरवी विधी करवून घेत असेल का? अजिबात नाही. तेंव्हा ८वी प्रतिज्ञा म्हणण्याची खरच गरज आहे का?

शब्दप्रामाण्यवाद
वरील संपूर्ण युक्तीवाद ज्या  एका शब्दानी खलास होतो तो शब्द म्हणजे शब्दप्रामाण्यवाद. मलातरी हे अभियानवाले शब्दप्रामाण्यवादी आहेत की काय अशी शंका येते. प्रतिज्ञांचा अर्थ काहिही असो, त्या आज लागू पडो अथवा न पडो. पण त्या बाबासाहेबानी दिल्या आहेत म्हणून आम्ही म्हणतो. मग मी हिंदू नसलो तरी बाबासाहेबानी म्हटलं म्हणून मी ही असेच म्हणतो की ’मी हिंदू धर्माचा त्याग करतो’ असा हा शब्दप्रामाण्यवाद असण्याची शक्यताही आहे. पण आंबेडकरवादी माणसला शब्दप्रामाण्यवाद करण्याचा अधिकारच नाही. कारण बाबासाहेबानी व बुद्धानी स्पष्ट्पणे सांगून ठेवले आहे की ’मी सांगतो म्हणून मानू नका, तर्कावर तपासून बुद्धीस पटल्यास ते स्विकारा’ हे वाक्य बाबासाहेबानी त्यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात नमूद करुन ठेवले आहे. स्वत: हिंदू नसताना हिंदू धर्माचा त्याग करतो असे म्हणणा-या शब्दप्रामाण्य वाद्यांचा बाबासाहेबानी आधीच बंदोबस्त केला आहे. तरी सुद्धा जर शब्दप्रामाण्यवाद रुजत असेल तर ही आंबेडकर चळवळीची हार आहे. २२ प्रतिज्ञा अभियान मोहिमेतून तर शब्दप्रामाण्यवाद ठळकपणे दिसून येतो. बाबासाहेबानी जसे म्हटले आम्हिही तसेच म्हणू, मग त्यातील काही भाग कालबाह्य झालेला का असेना? म्हणजेच शब्दप्रामाण्यवाद. हा शब्दप्रामाण्यवाद समाजाला कुठल्या दिशेनी घेऊन जातोय? विनाशाच्या दिशेनी. हे जर असेच चालू राहिले तर काही वर्षानी ईथे आंबेडकरवादयांचा नवीन आंबेडकर-अपौरुष्येय असा नवा ग्रंथ जन्मास यायला वेळ लागणार नाही.  ज्या अपौरुष्यय तत्वज्ञानाशी झगडा करुन बाबासाहेबानी बुद्धाचे तत्वज्ञान दिले, ते पडले बाजूला व शब्दप्रामाण्यवादातून प्रवास करत आंबेडकरी समाज नव्या अपौरुष्येय च्या दिशेनी चालला आहे.  
२२ प्रतिज्ञा अभियान वाल्यानी वरील सर्व गोष्टीचा विचार करावा, त्या प्रतिज्ञा कुठे लागू पडतात, कितपत लागू पडतात याच विचार करुनच त्या वधवून घ्याव्यात. आजून ५० वर्ष जर त्या २२ प्रतिज्ञा जशाच्या तशा रेटल्या तर या शब्दप्रामाण्यवादाचा परिपाक म्हणून कालबाह्य गोष्टीना नाकारण्याची वृत्ती कमी होत जाईल. त्याच बरोबर नवे न स्विकारण्याची वृत्ती बळावत जाईल आणि यातून जे नवे तत्वज्ञान आकार घेईल ते अपौरुष्येय पेक्षा फार वेगळे नसणार.
जयभीम.

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

रिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा...


कॉंग्रेस नावाच्या अत्यंत बलाढ्य नि शक्तीशाली पक्षाच्या विरोधात एक प्रबळ, सामर्थ्यशाली नि तोलामोलाचा विरोधीपक्ष असावा या  दूरदर्शी व उदात्त हेतूने बाबासाहेबानी रिपब्लिकन पक्षाचा संकल्प सोडला. आपला स्वत:चा पक्ष या संकल्पित रिपब्लिकन पक्षात विलन करत अनेक तोलामोलाचे विचारवंत, राजकीयपटू नि समाजोद्धारकांचा समावेश असणारा हा पक्ष असे जाहीर केले.  हा रिपब्लिकन पक्ष एका जातीचा व समाजाचा प्रतिनिधी नसून तो कॉंग्रेसच्या विरोधात उभा असणारा सर्व समाजाचा एक प्रबळ पक्ष असेल असे बाबासाहेबानी स्पष्ट नमूद करुन ठेवले आहे.  स्वातंत्र्य, समता व बंधुतेवर अधिष्ठित हा समावेशक पक्ष असेल व तो मुख्यत्वे विरोधी पक्ष म्हणून मोठी कामगिरी बजावेल,  अशी होती ती संकल्पना. पण बाबासाहेबांचे हे स्वप्न पुर्ण झाले नाही. लवकरच त्यांचे महापरिनिर्वाण झाले व हा संकल्पित पक्ष तसाच राहिला. पण बाबासाहेबाच्या अनुयायानी हे अपूरे स्वप्न पुर्ण करण्याचे अव्हान स्विकारले नि ३ ऑक्टोबर १९५७ रोजी “रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया” ची स्थापना करण्यात आली.
त्या नंतरचा एकंदरीत इतिहास मी सांगायची गरज नाही ते सर्वानी पाहिलेले आहे, वाचलेले आहे. आजही  आर. पी. आय. वर सर्वत्र टिका होताना दिसते. गटातटाच्या राजकारणामूळे आर.पी.आय. हा नेहमीच मुख्य प्रवाहातील पक्षाच्या दावणीला बांधल्या गेला. सत्तेच्या लालसेपोटी निळ्या नेत्यानी स्वाभिमान गहाण टाकत मुख्य प्रवाहातील पक्षासोबत केलेल्या तडजोडी नि करार याची जबरदस्त किमत मोजताना रामदास आठवलेचा शिर्डित झालेला पराभव गाफिलपणाचा परिपाक होता हे सर्वानी याची डोळा, याची देही पाहिले. त्या नंतरच्या आठवलेच्या दोषारोपांच्या मालिका, पोरखेळ नाटकं नि हातपाय आपटून रडण्याचे अनेक प्रकार सर्वानी पाहिले. एकेकाचे नाव घेऊन आर. पी. आय. चे किस्से लिहायला घेतल्यास चार पाच खंडाची ग्रंथमालिकाच तयार होईल. गटातटाचा खेळ जर सर्वात जास्त कुणी खेळला असेल तर तो आर. पी. आय. नी. एक दुस-याला शिंमग्याच्या शिव्या देत सर्वानी स्वतंत्र चूली मांडल्या व निळ्या झेंड्याखाली बाबासाहेबांच्या संकल्पित प्रबळ नि सशक्त विरोधी पक्ष्याचे तीन तेरा वाजविले.  चक्क पन्नास वर्षे उलटली तरी पक्षाची घडी बसेना. त्यामूळे आंबेडकरी समाजात मोठा संताप आकार घेत गेला. वेळ प्रसंगी या संतापाचे लहान सहान उद्रेकही झालेत. पण या सर्व प्रकरणात आर. पी. आय. च्या नेत्यांनी नेमकं कुठे चुकत आहे याचं आत्मचिंतन करायला पाहिजे होते ते झाले नाही. आर. पी. आय. ची राजकीय पटावरील थट्टा होण्याची कारणं काय आहे ते पाहू या.
आर. पी. आय. च्या चुका:
सर्वात मोठी चूक ही की हा पक्ष बौद्धानी  बंदिस्त केला. किंबहूना महाराष्ट्रातील बौद्ध (पुर्वाश्रमीचे महार) यानी या पक्षाची व्यापकता न ओळखता पक्षाला स्वत:च्या धर्मापुर्ती, समाजापूर्ती मर्यादीत करुन टाकले. हा हा म्हणता राष्ट्रव्यापी उद्दिष्टे बाळगून उदयास आलेला पक्ष एका जातीच्या चौकटीत बंदिस्त झाला. आर. पी. आय. म्हणजे बौद्धांचा पक्ष असे समिकरण तयार झाले. ही ओळख समाजद्रोही व पक्षघातकी ठरली. संपूर्ण समाजाला कवेत घेऊन नवे राजकीय पर्याय उभे करण्याचे बळ ज्या पक्षाच्या मुलभूत मांडणीत होते त्याची दूरावस्था झाली. उदात्त हेतू, राजकीय दूरदृष्टी व संघटनात्मक कौशल्य याच्या अभावामूळे पक्षाच्या प्रसारावर आघात होत गेले. जोडीला पैशाची अडचण व स्वार्थबुद्धी त्यामूळे पक्षाचे सबलिकरण झाले नाही.  सदैव कुणावरतरी अवलंबून राहावे लागले. ज्यांच्यावर हा भार टाकला त्यानी पक्षाला हवे तसे वागविताना पक्षाच्या मुलतत्वाना फाट्यावर मारत या पक्षाला परावलंबी नि दिशाहीन बनवित खिळखिळे करुन टाकले. मग प्रश्न असा पडतो की याला दोषी कोण? खचितच आंबेडकरी अनूयायी. कर्तव्यबुद्धिला न जागता केलेले करार, नितीधैर्य न दाखविता स्विकारलेली धोरणं, मुलतत्वाला फाट्यावर मारत केलेली मनस्वी वाटचाल पक्षाला अत्यंत घातकी ठरली. ही झाली एक बाजू. रिपब्लिकनच्या दूरावस्थेस कारणीभूत दुसरी बाजू म्हणजे समाज परिवर्तनाचा अभाव.
मूळात रिपब्लिकन नेत्यानी राजकीय समिकरण मांडताना समाज या घटकाचा प्रभाव, त्याचं सबलिकरन नि त्याची राजकीय उपयोगीता याची सांगळ घालताना फक्त मत एवढेच मुल्य गृहित धरले. प्रबळ राजकारणासाठी सशक्त सामाजाचे पाठबळ आवश्यक असते हे यांच्या डोक्यात कधी आलेच नाही. ईथेच सगळी गल्लत झाली. टिकावू राजकारणाचं बलस्थान एक सशक्त समाज असतो. जो समाज स्वत:च सशक्त नाही त्याचे राजकीय प्रतिनिधी तग धरु शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. संख्याबळा पेक्षा त्या समाजाची सामाजिक स्थीत जास्त महत्वाची असते.  बाबासाहेब म्हणायचे जो समाज सामाजिक दृष्टया विकसीत आहे, ज्याची मानसीक पातळीवर योग्य जडण घडण झाली आहे  असा समाजच राजकारणाच्या रणांगणात तग धरतो.
रिपब्लिकन नेत्यानी समिकरणच उलटे मांडले. राजकीय सत्ता मिळवून सामाजीक परिवर्तन घडवून आणू असा त्यांचा सिद्धांत आहे. त्यामूळे राजकारणात कधी टिकाव धरताच आला नाही आणि समाजकारणाचे तीनतेरा वाजले.  खरतर आधी समाजाचे सबलिकरण करणे गरजेचे आहे. रंजल्या गांजल्या समाजात शैक्षणीक, सामाजीक, धार्मिक नि आर्थिक आघाड्यावर क्रांती घडवून आणल्यास हा समाज भक्कम होत गेला असता. मग असा सशक्त नि प्रबळ समाज राजकीय पटावर मोठा परिणाम दाखवून गेला असता.  पण ईथे मात्र आधी राजकरण करा, राजकिय सत्ता हातात आली की मग समाजीक परिवर्तन घडवून आणू असा पवित्रा घेत सर्वानी निळे झेंडे हातात घेऊन धडाधड उड्या टाकल्या. पण ज्या समाजाच्या बळावर हा निळा झेंडा टिकवायचा आहे त्याचे सबलिकरण न झाल्यामूळे हे निळे झेंडे राजकारणाच्या वादळात पार उखडून फेकल्या गेले. झेंडे धरुन उड्या टाकलेल्या नेत्यांची पार वाताहत झाली. मग कुणाला पवारानी सावरले तर कुणाला पंजानी. पण एकंदरीत झालं काय तर ज्या समाजाच्या बळावर यानी उड्या टाकल्या तो समाज रंजल्या गांजल्यांचा एक शोषित व दुर्बल घटक. त्या समाजात योग्य ती सामाजिक क्रांती घडवून आणलीच गेली नव्हती. त्यामूळे राजकीय समिकरण धडाधड कोसळली. दारुच्या बाटल्या, गांधीची नोट अशा लहान सहान प्रलोभनास झूगारुन देण्यारा समाज निर्माण झाला नाही. शिक्षणाच्या अभावामूळे रोजगाराचा प्रश्नही उभा ठाकला. कमाईचे साधन नसल्यामूळे गावातिल पाटिल व मराठा मंडळीकडे  सदैव मान तुकविणे चालू राहिले. अशा एकंदरीत परिस्थीत परावलंबी जिवन जगणारा समाज एक प्रबळ राजकीय नेतृत्व देण्यास असमर्थ ठरला. मग यावर उपाय काय? माझे उत्तर आहे बौद्ध धम्म.
बौद्ध धम्म एकमेव पर्याय
आता प्रश्न असा आहे की बौद्ध धम्माने आर्थिक प्रश्न कसा काय सुटणार? शैक्षणीक प्रश्न कसा काय सुटणार? मी मात्र अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो की या दोन्ही समस्याचे समाधान बौद्ध धम्मात आहे. कारण बौद्ध धम्म मानसिक पातळीवर जे परिवर्तन घडवून आणेल ते समाजाला वस्तूनिष्टतेकडे नेणारे असेल. दैववाद, अंधश्रद्धा व परावलंबन या पासून दूर नेण्याचे तत्वज्ञान धम्मात आहे. त्याच बरोबर ईथल्या अडचणीचे उत्तर स्वर्गातील देवावर न सोपविता ईथेच सोधण्याचे तंत्र बौद्ध धम्माकडे आहे. म्हणजेच आयुष्यातील अडीअडचीणींवर मात करण्याचा वस्तूनिष्ठ व प्रभाव मार्ग बौद्ध धम्मास शरण गेलेल्या प्रत्येक उपासकास स्वत:चा उत्कर्ष घडवून आणण्यास मदत करेल.
आर्थिक प्रश्न सोडविताना वस्तूनिष्ठता मोठा परिणाम दाखवून जाईल. उपलब्ध परिस्थीती व सामुग्रीचा सर्वोत्तम उपयोग करुन विकास साधण्याची कला अंगी बाणत जाईल. आज पर्यंत देव दैवावर रडत बसून स्वत:चं सामर्थ्य न ओळखता दारिद्र्य ओढवून घेतलेला समाज मोठ्या जोमाने कामाला लागेल व आर्थिक परिस्थीतीवर मात करेल. सटवीच्या हातची लेखनी खेचून स्वत:चे भविष्य स्वत: लिहायला सुरुवात करेल.  हे सर्व घडुन येईल फक्त बौद्ध धम्माच्या स्विकाराने. आर्थिक प्रश्न निकाली निघताना सामाजिक प्रश्नाचाही निकाल लागेल. अन हळू हळू धम्म रुजत गेल्यावर नैतिकतेची वृद्धी होईल. ही नैतिकता जेंव्हा प्रत्येक माणसात रुजेल तेंव्हा गांधीची नोट व दारुची बाटली झिटकरणारा एक नवा आदर्श समाज पहावयास मिळेल. ज्या समाजाची नैतिक पायाभरणी भक्कम असेल तो समाज आपले दायीत्व ओळखून वागेल. याचा एकंदरीत परिणाम असा असेल की लवकरच एक आदर्श समाज निर्माण होईल. पण वर उल्लेखीत आदर्श समाज हा राजकीय़ परिवर्तनातून वा  विकासातून कधीच निर्माण होणार नाही. असा आदर्श समाज फक्त व फक्त बौद्ध धम्माच्या शिकवणीतूनच निर्माण होऊ शकेल. धम्माचे पालन करणारे, उच्चकोटीचे सामाजीक मुल्य जपणारे लोकं जेव्हा राजकाराणात असतील तेंव्हा हा देश खरी प्रगती करेल.  म्हणून या देशाचे व समाजाचे हीत साधायचे असल्यास बौद्ध धम्म हा एकमेव पर्याय असेल.