मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

रिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा...


कॉंग्रेस नावाच्या अत्यंत बलाढ्य नि शक्तीशाली पक्षाच्या विरोधात एक प्रबळ, सामर्थ्यशाली नि तोलामोलाचा विरोधीपक्ष असावा या  दूरदर्शी व उदात्त हेतूने बाबासाहेबानी रिपब्लिकन पक्षाचा संकल्प सोडला. आपला स्वत:चा पक्ष या संकल्पित रिपब्लिकन पक्षात विलन करत अनेक तोलामोलाचे विचारवंत, राजकीयपटू नि समाजोद्धारकांचा समावेश असणारा हा पक्ष असे जाहीर केले.  हा रिपब्लिकन पक्ष एका जातीचा व समाजाचा प्रतिनिधी नसून तो कॉंग्रेसच्या विरोधात उभा असणारा सर्व समाजाचा एक प्रबळ पक्ष असेल असे बाबासाहेबानी स्पष्ट नमूद करुन ठेवले आहे.  स्वातंत्र्य, समता व बंधुतेवर अधिष्ठित हा समावेशक पक्ष असेल व तो मुख्यत्वे विरोधी पक्ष म्हणून मोठी कामगिरी बजावेल,  अशी होती ती संकल्पना. पण बाबासाहेबांचे हे स्वप्न पुर्ण झाले नाही. लवकरच त्यांचे महापरिनिर्वाण झाले व हा संकल्पित पक्ष तसाच राहिला. पण बाबासाहेबाच्या अनुयायानी हे अपूरे स्वप्न पुर्ण करण्याचे अव्हान स्विकारले नि ३ ऑक्टोबर १९५७ रोजी “रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया” ची स्थापना करण्यात आली.
त्या नंतरचा एकंदरीत इतिहास मी सांगायची गरज नाही ते सर्वानी पाहिलेले आहे, वाचलेले आहे. आजही  आर. पी. आय. वर सर्वत्र टिका होताना दिसते. गटातटाच्या राजकारणामूळे आर.पी.आय. हा नेहमीच मुख्य प्रवाहातील पक्षाच्या दावणीला बांधल्या गेला. सत्तेच्या लालसेपोटी निळ्या नेत्यानी स्वाभिमान गहाण टाकत मुख्य प्रवाहातील पक्षासोबत केलेल्या तडजोडी नि करार याची जबरदस्त किमत मोजताना रामदास आठवलेचा शिर्डित झालेला पराभव गाफिलपणाचा परिपाक होता हे सर्वानी याची डोळा, याची देही पाहिले. त्या नंतरच्या आठवलेच्या दोषारोपांच्या मालिका, पोरखेळ नाटकं नि हातपाय आपटून रडण्याचे अनेक प्रकार सर्वानी पाहिले. एकेकाचे नाव घेऊन आर. पी. आय. चे किस्से लिहायला घेतल्यास चार पाच खंडाची ग्रंथमालिकाच तयार होईल. गटातटाचा खेळ जर सर्वात जास्त कुणी खेळला असेल तर तो आर. पी. आय. नी. एक दुस-याला शिंमग्याच्या शिव्या देत सर्वानी स्वतंत्र चूली मांडल्या व निळ्या झेंड्याखाली बाबासाहेबांच्या संकल्पित प्रबळ नि सशक्त विरोधी पक्ष्याचे तीन तेरा वाजविले.  चक्क पन्नास वर्षे उलटली तरी पक्षाची घडी बसेना. त्यामूळे आंबेडकरी समाजात मोठा संताप आकार घेत गेला. वेळ प्रसंगी या संतापाचे लहान सहान उद्रेकही झालेत. पण या सर्व प्रकरणात आर. पी. आय. च्या नेत्यांनी नेमकं कुठे चुकत आहे याचं आत्मचिंतन करायला पाहिजे होते ते झाले नाही. आर. पी. आय. ची राजकीय पटावरील थट्टा होण्याची कारणं काय आहे ते पाहू या.
आर. पी. आय. च्या चुका:
सर्वात मोठी चूक ही की हा पक्ष बौद्धानी  बंदिस्त केला. किंबहूना महाराष्ट्रातील बौद्ध (पुर्वाश्रमीचे महार) यानी या पक्षाची व्यापकता न ओळखता पक्षाला स्वत:च्या धर्मापुर्ती, समाजापूर्ती मर्यादीत करुन टाकले. हा हा म्हणता राष्ट्रव्यापी उद्दिष्टे बाळगून उदयास आलेला पक्ष एका जातीच्या चौकटीत बंदिस्त झाला. आर. पी. आय. म्हणजे बौद्धांचा पक्ष असे समिकरण तयार झाले. ही ओळख समाजद्रोही व पक्षघातकी ठरली. संपूर्ण समाजाला कवेत घेऊन नवे राजकीय पर्याय उभे करण्याचे बळ ज्या पक्षाच्या मुलभूत मांडणीत होते त्याची दूरावस्था झाली. उदात्त हेतू, राजकीय दूरदृष्टी व संघटनात्मक कौशल्य याच्या अभावामूळे पक्षाच्या प्रसारावर आघात होत गेले. जोडीला पैशाची अडचण व स्वार्थबुद्धी त्यामूळे पक्षाचे सबलिकरण झाले नाही.  सदैव कुणावरतरी अवलंबून राहावे लागले. ज्यांच्यावर हा भार टाकला त्यानी पक्षाला हवे तसे वागविताना पक्षाच्या मुलतत्वाना फाट्यावर मारत या पक्षाला परावलंबी नि दिशाहीन बनवित खिळखिळे करुन टाकले. मग प्रश्न असा पडतो की याला दोषी कोण? खचितच आंबेडकरी अनूयायी. कर्तव्यबुद्धिला न जागता केलेले करार, नितीधैर्य न दाखविता स्विकारलेली धोरणं, मुलतत्वाला फाट्यावर मारत केलेली मनस्वी वाटचाल पक्षाला अत्यंत घातकी ठरली. ही झाली एक बाजू. रिपब्लिकनच्या दूरावस्थेस कारणीभूत दुसरी बाजू म्हणजे समाज परिवर्तनाचा अभाव.
मूळात रिपब्लिकन नेत्यानी राजकीय समिकरण मांडताना समाज या घटकाचा प्रभाव, त्याचं सबलिकरन नि त्याची राजकीय उपयोगीता याची सांगळ घालताना फक्त मत एवढेच मुल्य गृहित धरले. प्रबळ राजकारणासाठी सशक्त सामाजाचे पाठबळ आवश्यक असते हे यांच्या डोक्यात कधी आलेच नाही. ईथेच सगळी गल्लत झाली. टिकावू राजकारणाचं बलस्थान एक सशक्त समाज असतो. जो समाज स्वत:च सशक्त नाही त्याचे राजकीय प्रतिनिधी तग धरु शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. संख्याबळा पेक्षा त्या समाजाची सामाजिक स्थीत जास्त महत्वाची असते.  बाबासाहेब म्हणायचे जो समाज सामाजिक दृष्टया विकसीत आहे, ज्याची मानसीक पातळीवर योग्य जडण घडण झाली आहे  असा समाजच राजकारणाच्या रणांगणात तग धरतो.
रिपब्लिकन नेत्यानी समिकरणच उलटे मांडले. राजकीय सत्ता मिळवून सामाजीक परिवर्तन घडवून आणू असा त्यांचा सिद्धांत आहे. त्यामूळे राजकारणात कधी टिकाव धरताच आला नाही आणि समाजकारणाचे तीनतेरा वाजले.  खरतर आधी समाजाचे सबलिकरण करणे गरजेचे आहे. रंजल्या गांजल्या समाजात शैक्षणीक, सामाजीक, धार्मिक नि आर्थिक आघाड्यावर क्रांती घडवून आणल्यास हा समाज भक्कम होत गेला असता. मग असा सशक्त नि प्रबळ समाज राजकीय पटावर मोठा परिणाम दाखवून गेला असता.  पण ईथे मात्र आधी राजकरण करा, राजकिय सत्ता हातात आली की मग समाजीक परिवर्तन घडवून आणू असा पवित्रा घेत सर्वानी निळे झेंडे हातात घेऊन धडाधड उड्या टाकल्या. पण ज्या समाजाच्या बळावर हा निळा झेंडा टिकवायचा आहे त्याचे सबलिकरण न झाल्यामूळे हे निळे झेंडे राजकारणाच्या वादळात पार उखडून फेकल्या गेले. झेंडे धरुन उड्या टाकलेल्या नेत्यांची पार वाताहत झाली. मग कुणाला पवारानी सावरले तर कुणाला पंजानी. पण एकंदरीत झालं काय तर ज्या समाजाच्या बळावर यानी उड्या टाकल्या तो समाज रंजल्या गांजल्यांचा एक शोषित व दुर्बल घटक. त्या समाजात योग्य ती सामाजिक क्रांती घडवून आणलीच गेली नव्हती. त्यामूळे राजकीय समिकरण धडाधड कोसळली. दारुच्या बाटल्या, गांधीची नोट अशा लहान सहान प्रलोभनास झूगारुन देण्यारा समाज निर्माण झाला नाही. शिक्षणाच्या अभावामूळे रोजगाराचा प्रश्नही उभा ठाकला. कमाईचे साधन नसल्यामूळे गावातिल पाटिल व मराठा मंडळीकडे  सदैव मान तुकविणे चालू राहिले. अशा एकंदरीत परिस्थीत परावलंबी जिवन जगणारा समाज एक प्रबळ राजकीय नेतृत्व देण्यास असमर्थ ठरला. मग यावर उपाय काय? माझे उत्तर आहे बौद्ध धम्म.
बौद्ध धम्म एकमेव पर्याय
आता प्रश्न असा आहे की बौद्ध धम्माने आर्थिक प्रश्न कसा काय सुटणार? शैक्षणीक प्रश्न कसा काय सुटणार? मी मात्र अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो की या दोन्ही समस्याचे समाधान बौद्ध धम्मात आहे. कारण बौद्ध धम्म मानसिक पातळीवर जे परिवर्तन घडवून आणेल ते समाजाला वस्तूनिष्टतेकडे नेणारे असेल. दैववाद, अंधश्रद्धा व परावलंबन या पासून दूर नेण्याचे तत्वज्ञान धम्मात आहे. त्याच बरोबर ईथल्या अडचणीचे उत्तर स्वर्गातील देवावर न सोपविता ईथेच सोधण्याचे तंत्र बौद्ध धम्माकडे आहे. म्हणजेच आयुष्यातील अडीअडचीणींवर मात करण्याचा वस्तूनिष्ठ व प्रभाव मार्ग बौद्ध धम्मास शरण गेलेल्या प्रत्येक उपासकास स्वत:चा उत्कर्ष घडवून आणण्यास मदत करेल.
आर्थिक प्रश्न सोडविताना वस्तूनिष्ठता मोठा परिणाम दाखवून जाईल. उपलब्ध परिस्थीती व सामुग्रीचा सर्वोत्तम उपयोग करुन विकास साधण्याची कला अंगी बाणत जाईल. आज पर्यंत देव दैवावर रडत बसून स्वत:चं सामर्थ्य न ओळखता दारिद्र्य ओढवून घेतलेला समाज मोठ्या जोमाने कामाला लागेल व आर्थिक परिस्थीतीवर मात करेल. सटवीच्या हातची लेखनी खेचून स्वत:चे भविष्य स्वत: लिहायला सुरुवात करेल.  हे सर्व घडुन येईल फक्त बौद्ध धम्माच्या स्विकाराने. आर्थिक प्रश्न निकाली निघताना सामाजिक प्रश्नाचाही निकाल लागेल. अन हळू हळू धम्म रुजत गेल्यावर नैतिकतेची वृद्धी होईल. ही नैतिकता जेंव्हा प्रत्येक माणसात रुजेल तेंव्हा गांधीची नोट व दारुची बाटली झिटकरणारा एक नवा आदर्श समाज पहावयास मिळेल. ज्या समाजाची नैतिक पायाभरणी भक्कम असेल तो समाज आपले दायीत्व ओळखून वागेल. याचा एकंदरीत परिणाम असा असेल की लवकरच एक आदर्श समाज निर्माण होईल. पण वर उल्लेखीत आदर्श समाज हा राजकीय़ परिवर्तनातून वा  विकासातून कधीच निर्माण होणार नाही. असा आदर्श समाज फक्त व फक्त बौद्ध धम्माच्या शिकवणीतूनच निर्माण होऊ शकेल. धम्माचे पालन करणारे, उच्चकोटीचे सामाजीक मुल्य जपणारे लोकं जेव्हा राजकाराणात असतील तेंव्हा हा देश खरी प्रगती करेल.  म्हणून या देशाचे व समाजाचे हीत साधायचे असल्यास बौद्ध धम्म हा एकमेव पर्याय असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा