मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

२२ प्रतिज्ञा अभियान आणि शब्दप्रामाण्यवाद

बाबासाहेबानी आंबेडकरी समाजाला बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या होत्या. त्या २२ प्रतिज्ञा नागपूरच्या पवित्र भूमित बाबासाहेबानी समस्त पददलिताना हिंदू धर्माच्या दलदलीतून कायमचे खेचून बाहेर कढण्यासाठी नि सदैव बौद्ध आचरणास कटिबद्द करण्याच्या हेतूने वधवून घेतल्या होत्या. हिंदु समाजातील अस्पृश्य लोकांची बौद्धत्वाशी नाळ जोडताना, हिंदुत्वाशी संबंध तोडणारा घावही तेवढाच  घणाघाती असावा याची खबरदारी घेत २२ प्रतिज्ञाची सोय केली. हिंदुत्व नाकारणा-या प्रतिज्ञा देत बौद्ध तत्वज्ञानाशी नवे नाते जोडण्याचा तो अलौकिक प्रयोग होता. हिंदुत्व झुगारुन बौद्ध धम्म स्विकारणा-याना त्या तंतोतंत लागू होत्या. आज त्या घटनेला अर्ध शतक उलटुन गेले. बाबासाहेबानंतर ही तिसरी पिढी सुरु आहे. आमचे  आजोबा, वडील हे बौद्ध होते. बौद्ध म्हणून जन्मलेली ही आमची तीसरी पिढी आहे. आमचा हिंदू धर्माशी काहीएक संबंध नसून  जन्माने व कर्माने आम्ही बौद्ध आहोत. कोणेकाळी आमचे पुर्वज हिंदू होते ही गोष्ट आज इतिहासजमा झाली असून हिंदुत्वाशी आज आमचे काही देणे घेणे नाही.
बाबासाहेबानी १९५६ मधे हिंदू असलेल्या महाराना बौद्ध बनविताना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या तेंव्हाच्या लोकाना लागू होत्या. पण आज मात्र त्या २२ प्रतिज्ञा सरसकट लागू पडत नाहीत, त्यातील काहीच प्रतिज्ञा आम्हाला लागू पडतात. मग त्या काही प्रतिज्ञा वेचून वधाव्यात की कसे असाही प्रश्न येतो. की मग २२ च्या २२ प्रतिज्ञा म्हणाव्यात हा सुद्धा एक कडीचा मुद्दा आहेच. यातील नेमकं काय करावं याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. तरी सुद्धा स्वत:ला आंबेडकरवादी समजणा-या महामुर्ख लोकानी २२ प्रतिज्ञा अभियान मोहीम उघडून २२च्या २२ प्रतिज्ञा बौद्ध बांधवांकडून वधवून घेत आहेत. २२ प्रतिज्ञा या मूळात कुठल्याही बौद्ध माणसाला लागूच पडत नाही एवढी साधी गोष्ट यांच्या लक्षात येत नाही ही खरी खंत. त्या जर कुणास लागू पडत असतील तर हिंदू म्हणून जगणा-यास लागू पडतात. ते की कधी? तर समजा तो हिंदू इसम हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्मात प्रवेश करत असल्यास प्रवेशाचा विधी म्हणून त्या लागू पडतील. अन्य वेळी त्या गैरलागू पडतात. 
दर वर्षी ६ डिसेंबरला चैत्यभूमीत २२ प्रतिज्ञा अभियान  मोहीमे अंतर्गत बौद्ध लोकाना धरुन धरुन २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या जातात. कित्येक बौद्ध बांधवानी त्या बद्द्ल वेळोवेळी निषेधही नोंदवीला आहे. त्याच प्रकारे अनेक वृत्तपत्रातून व प्रत्येक विहारातून आता २२ प्रतिज्ञा वधवून घेणे सुरु झाले आहे.  काही वर्षा आधी विहारांतून बुद्ध पुजा-पाट केला जाई. पण आता मात्र त्याच्या जोडीला २२ प्रतिज्ञाही दाखल झाल्यात आहेत. प्रत्येक विहारातून व सार्वजनीक पुजापाठ, धार्मिक विधी नि ईतर कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात २२ प्रतिज्ञांचा प्रचार व प्रसार चालू आहे. पण या प्रतिज्ञा आपल्याला आज लागू पडतात  का असा कुणी विचार सुद्धा करत नाही. बाबासाहेबानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा डोळे बंद करुन व बुद्धी गहान टाकून म्हटल्या जाण्यामागचे कारण हिंदू द्वेष आहे की बाबासाहेबांच्या प्रति असलेली एकनिष्ठता हे ठरविणे अवघड होऊन बसले आहे. तरी जरा खोलात जाऊन पाहिल्यास  हेच सिद्ध होते की या २२ प्रतिज्ञांच्या मागे हिंदू द्वेषच जास्त आहे. अन्यथा बाबासाहेबांच्या प्रति निष्टा असती तर २२ प्रतिज्ञा मधून दिलेल्या १० पारमितांचे पालन सुरु झाले असते. २२ प्रतिज्ञा म्हणणा-यानी दारु सोडली असती. सर्वांना समान लेखले असते. खोटे बोलणे सोडले असते. यातलं काहीच होताना दिसत नाही. म्हणजे त्या प्रतिज्ञामधील समाजोध्दारक तत्वज्ञान व उच्च पातळीची नैतिक मुल्ये ज्यांची नितांत गरज आहे ती सरळ फाट्यावर मारली जात असून फक्त हिंदू द्वेषापुर्ती त्या प्रतिज्ञा हव्या आहेत. ही खरं तर लबाडी असून केवळ ढोंगी लोकानी भोळ्या भाबळ्या आंबेडकरी जनतेसमोर खोटा व द्वेषमूलक आदर्श उभा करण्याचा एकुण खेळ दिसतो. २२ प्रतिज्ञा म्हणणे हा आंबेडकरवाद्यांचा एक नवा ढोंग आहे. २२ प्रतिज्ञातील मतीतार्थ समजून घेण्यातही कुणाला रस नाही. २२ प्रतिज्ञामधील हिंदुत्व नाकारणा-या व त्याचा विरोध करणा-या प्रतिज्ञावर सगळा भर असतो. पण उरलेल्या ईतर प्रतिज्ञा मात्र नुसत म्हणायचं म्हणून म्हटल्या जातात. तर चला आपण २२ प्रतिज्ञा काय आहेत, त्या म्हणण्याची मानसीकता व उद्देश काय आहे ते सविस्तर पाहू या.

हिंदुचे देव नाकारणा-या पहिल्या सहा प्रतिज्ञा येणेप्रमाणे आहेत.
प्रतिज्ञा क्र. १:-  मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. २:- राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. ३:- मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. ४:- देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
प्रतिज्ञा क्र. ५:- गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. ६:- मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
वरील  प्रतिज्ञा हिंदूचे देव नाकारणा-या आहेत. माझ्या पुरता बोलायचं तर मी जन्माने बौद्ध असल्यामूळे हिंदूच्या देवांना नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कारण माझा त्यांच्याशी संबंधच नाही. म्हणून बाबासाहेबांच्या त्या सहा प्रतिज्ञा माझ्यासारख्या Buddhist by Birth माणसला लागू पडत नाही. त्यामुळे मी या सहा प्रतिज्ञां कधीच म्हणत नाही. जे आजही स्वत:ला हिंदू मानतात त्यानी नक्की म्हणावे. आम्ही हिंदू धर्म सोडून अर्ध शतक उलटले. जन्माने बौद्ध असल्यामूळे आम्ही बुद्धाची उपासना करीत वाढलो. ब्रह्मा, विष्णू  व महेश यांच्याशी तीन पिढ्य़ा आधीच नाते तोडण्यात आले. बौद्ध म्हणून जन्मलेले आम्ही तरुण मुलं हिंदू धर्माची दिक्षा घेऊन वरील देवतांचा स्विकार केला नाही, ते आमचे दैवत नाहीत वा त्यांचा आमचा काही संबंधही नाही. त्यामूळे त्याना नाकरण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याना आम्ही स्विकारलेच नाही. जे आमचे देव नाही त्याना नाकारण्याची प्रतिज्ञा कशी काय घेता येईल. म्हणून वरील १ ते ६ या सर्व प्रतिज्ञा मला गैरलागू आहेत.
प्रतिज्ञा क्र. ७:-  मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
सातवी प्रतिज्ञा मात्र मला लागू पडते.  कारण मी बुद्धाच्या शिकवणनुसार वागण्यास कटिबद्द असून तसा प्रयत्न करतो आहे.
प्रतिज्ञा क्र. ८:-  मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. 
मी जन्माने बौद्ध असल्यामूळे वरील प्रतिज्ञा मला गैरलागू पडते.  कारण ब्राह्मण माझ्या घरी येणार तरी कशाला? अन आमचे सगळे विधी भंते करत असल्या्मुळे वरच्या प्रतिज्ञेशी माझा काही एक संबंध नाही.
प्रतिज्ञा क्र. ९:-  सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. १०:-  मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
प्रतिज्ञा क्र. ११:-  मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
प्रतिज्ञा क्र. १२:-  तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
प्रतिज्ञा क्र. १३:-  मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
प्रतिज्ञा क्र. १४:-  मी चोरी करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १५:-  मी व्याभिचार करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १६:-  मी खोटे बोलणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १७:-  मी दारू पिणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १८:-  ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
९ ते १८ सर्व प्रतिज्ञा मला बंधनकारक असून मी त्या पालन करण्याचा प्रयत्न करतो. नवबौद्धांकडून वरील प्रतिज्ञा नुसतं वधवून न घेता त्याचे पालन होत आहे का, याची फेरतपासणीही केली जावी. ही तपासणी कुणी त्रयस्थाने न करता प्रत्येक बौद्धाने आत्मचिंतनाने तपासून पहावे की आपण ९ ते १८ प्रतिज्ञाचे पालन करतोय का? किंबहूना तसा प्रयत्न तरी करतोय का?  २२ प्रतिज्ञातील ख-या प्रतिज्ञा ज्यांची आज गरज आहे त्या म्हणजे या ९-१८. आपण सगळ्यानी त्यावर जितकं जास्त भर देऊ तितकं  जास्त धम्मकार्य गती पकडॆल.
प्रतिज्ञा क्र. १९:-  माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणा-याक व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणा-या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
ही प्रतिज्ञा म्हणताना खुद्द बाबासाहेब दोन क्षण थांबले, त्या दोन क्षणात बाबासाहेबांच्या डोळ्यापुढून अडीच हजार वर्षाचा काळ झरझर सरकला. ज्या धर्माने शतकानू शतके आपल्या बांधवांचा अतोनात छळ केला त्याची आठवण होऊन त्यांचे डोळे भरुन आले. अन दुस-याच क्षणात  मात्र त्यांच्या चेह-यावरील मुद्रा बदलली. अशा या नीच धर्माचा त्याग करताना त्याना आनंद होत होता. ती गुलामी झुगारण्याचा हा दिवस मोठ्या कष्टाने प्राप्त झाला होता. लगेच स्वत:ला सावरत बाबासाहेब ही प्रतिज्ञा पुर्ण करतात. उपस्थीत महार समाजातील सर्व बांधव हिंदू धर्माचा त्याग करणारी ही प्रतिज्ञा दाटलेल्या कंठानी पुर्ण करत  नव्या धम्मात प्रवेश करतात.  ही घटना आहे १९५६ ची. आज त्या घटनेला पाच दशकं उलटलून गेलीत. मधल्या काळात आंबेडकर चळवळीची राजकीय आघाडी जरी खिळखिळी झाली तरी सामाजीक व धार्मिक आघाडी मात्र प्रबळ होत गेली. त्याचा परिपाक म्हणजे पन्नास वर्षात झालेली बौद्ध धम्माची वृद्धी.  
आजच्या घटकेला २२ प्रतिज्ञा मधील ही १९ वी प्रतिज्ञा आपल्याला लागू पडते का हा महत्वाचा प्रश्न आहे? काय सांगते १९वी प्रतिज्ञा? ही प्रतिज्ञा हिंदू धर्माचा त्याग करायला सांगते. मी तर बौद्ध आहे, मग मी हिंदु धर्माचा कसा काय त्याग करु शकतो? करुच शकत नाही, म्हणून १९ प्रतिज्ञा मला गैरलागू पडते. मी ज्या धर्माचा कधीच नव्हतो (by birth / by choice) तेंव्हा त्या धर्माचा त्याग करतो असे म्हणने म्हणजे केवळ मुर्खपणा ठरेल. आजचे नवबौद्ध (आंबेडकरी) मात्र जाहीरपणे ही १९वी प्रतिज्ञा प्रत्येक कार्यक्रमात म्हणत असतात.  बरं एखादी व्यक्ती पहिल्यांदा ही प्रतिज्ञा म्हणत असल्यास असे गृहित धरायला हरकत नाही की ती व्यक्ती हिंदू आहे, त्या धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माचा स्विकार करत आहे. पण ईथे तसं होत नाही. दर रविवारी ही प्रतिज्ञा म्हटली जाते. म्हणजे मधल्या काळात हे घरी जाऊन परत हिंदू धर्माची दिक्षा घेतात की काय? म्हणून त्याना तो परत त्यागावा लागतो. जर तसे नसेल तर मग ते हिंदू नसतानाही हिंदू धर्माचा त्याग करण्याची खोटी प्रतिज्ञा घेत असतात की कसे? याचाच अर्थ जाहीरपणे ते खोटे बोलत असतात. म्हणजे बौद्ध धम्माचा अपमानच करत असतात. एखादी व्यक्ती हिंदू नसताना हिंदू असल्याचा आव आणत तो धर्म त्यागन्याची प्रतिज्ञा घेत असेल तर हा खोटारेडपणा आहे. जर हिंदू असेल तर मग तो धर्म वारंवार कसं काय त्यागता येतो? एकदा १९वी प्रतिज्ञा म्हटली की झालं, त्यागला तो हिंदू धर्म. पण  काही दिवसानी परत तो त्यागण्याची प्रतिज्ञा म्हणजे मधल्या काळात बौद्ध धम्म त्यागल्याचा पुरावा नव्हे काय? याचा अर्थ सरळ आहे की ही आंबेडकरी म्हणवून घेणारी लोकं एकतर दर आठवड्याला धर्म बदलत असतात किंवा याना ती प्रतिज्ञा कळतच नाही. जर दर आठवड्या धर्म बदलून परत परत तीच ती धरसोड करत असतील तर नैतिक पातळीवर त्याना बौद्ध म्हणवून घेण्याचा अधिकारच राहत नाही. किंवा दुसरी शक्यता म्हणजे ती प्रतिज्ञा त्याना कळतच नाहीये. पण न कळावं असं काय आहे त्या प्रतिज्ञेत. साधी, सोपी प्रतिज्ञा आहे. ’मी हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्विकार करतो.’ यात न कळण्यासारखं काय आहे? १९वी प्रतिज्ञा दुस-यांदा म्हणणारे समस्त आंबेडकरवादी हे आंबेडकरद्रोही, धम्मद्रोही नि खोटारडे ठरतात. तसेच हे ही सिद्ध होते की मधल्या काळात त्यानी वेळोवेळी बौद्ध धम्माचा त्याग करुन हिंदू धर्म स्विकारला अन प्रत्येक वेळी तो १९व्या प्रतिज्ञेद्वारे त्यागला. म्हणजे २२ प्रतिज्ञा मधील १९वी प्रतिज्ञा म्हणणारा प्रत्येक आंबेडकरी हा खोटारडा, फसवा नि धम्मद्रोही आहे.
प्रतिज्ञा क्र. २०:-   तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
प्रतिज्ञा क्र. २१:-   आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
प्रतिज्ञा क्र. २२:-   इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
२०,२१ व २२ या प्रतिज्ञा सर्वकाळ लागू पडतात. म्हणजेच बाबासाहेबानी धर्मांतराच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पैंकी आज आपल्याला लागू पडणा-या प्रतिज्ञा कोणत्या, तर ७, ९, १०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,२०,२१,२२ अशा एकून १४ प्रतिज्ञा आपल्याला लागू पडतात. १ ते ६ प्रतिज्ञा हिंदू धर्म नाकारणा-या आहेत व आपण हिंदू नसल्यामूळे त्या गैरलागू आहेत. ८ वी प्रतिज्ञा ब्राह्मणाच्या हातून क्रियाकर्म करण्याचे नाकारणारी आहे व १९ वी हिंदू धर्माचा त्याग करणारी. 
प्रश्न असा आहे की वरील २२ प्रतिज्ञा कुठे घेतल्या  जातात ? बुद्ध विहारात. मग सांगा जो माणूस बुद्ध विहारात येतो तो ब्राह्मणाकरवी विधी करवून घेत असेल का? अजिबात नाही. तेंव्हा ८वी प्रतिज्ञा म्हणण्याची खरच गरज आहे का?

शब्दप्रामाण्यवाद
वरील संपूर्ण युक्तीवाद ज्या  एका शब्दानी खलास होतो तो शब्द म्हणजे शब्दप्रामाण्यवाद. मलातरी हे अभियानवाले शब्दप्रामाण्यवादी आहेत की काय अशी शंका येते. प्रतिज्ञांचा अर्थ काहिही असो, त्या आज लागू पडो अथवा न पडो. पण त्या बाबासाहेबानी दिल्या आहेत म्हणून आम्ही म्हणतो. मग मी हिंदू नसलो तरी बाबासाहेबानी म्हटलं म्हणून मी ही असेच म्हणतो की ’मी हिंदू धर्माचा त्याग करतो’ असा हा शब्दप्रामाण्यवाद असण्याची शक्यताही आहे. पण आंबेडकरवादी माणसला शब्दप्रामाण्यवाद करण्याचा अधिकारच नाही. कारण बाबासाहेबानी व बुद्धानी स्पष्ट्पणे सांगून ठेवले आहे की ’मी सांगतो म्हणून मानू नका, तर्कावर तपासून बुद्धीस पटल्यास ते स्विकारा’ हे वाक्य बाबासाहेबानी त्यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात नमूद करुन ठेवले आहे. स्वत: हिंदू नसताना हिंदू धर्माचा त्याग करतो असे म्हणणा-या शब्दप्रामाण्य वाद्यांचा बाबासाहेबानी आधीच बंदोबस्त केला आहे. तरी सुद्धा जर शब्दप्रामाण्यवाद रुजत असेल तर ही आंबेडकर चळवळीची हार आहे. २२ प्रतिज्ञा अभियान मोहिमेतून तर शब्दप्रामाण्यवाद ठळकपणे दिसून येतो. बाबासाहेबानी जसे म्हटले आम्हिही तसेच म्हणू, मग त्यातील काही भाग कालबाह्य झालेला का असेना? म्हणजेच शब्दप्रामाण्यवाद. हा शब्दप्रामाण्यवाद समाजाला कुठल्या दिशेनी घेऊन जातोय? विनाशाच्या दिशेनी. हे जर असेच चालू राहिले तर काही वर्षानी ईथे आंबेडकरवादयांचा नवीन आंबेडकर-अपौरुष्येय असा नवा ग्रंथ जन्मास यायला वेळ लागणार नाही.  ज्या अपौरुष्यय तत्वज्ञानाशी झगडा करुन बाबासाहेबानी बुद्धाचे तत्वज्ञान दिले, ते पडले बाजूला व शब्दप्रामाण्यवादातून प्रवास करत आंबेडकरी समाज नव्या अपौरुष्येय च्या दिशेनी चालला आहे.  
२२ प्रतिज्ञा अभियान वाल्यानी वरील सर्व गोष्टीचा विचार करावा, त्या प्रतिज्ञा कुठे लागू पडतात, कितपत लागू पडतात याच विचार करुनच त्या वधवून घ्याव्यात. आजून ५० वर्ष जर त्या २२ प्रतिज्ञा जशाच्या तशा रेटल्या तर या शब्दप्रामाण्यवादाचा परिपाक म्हणून कालबाह्य गोष्टीना नाकारण्याची वृत्ती कमी होत जाईल. त्याच बरोबर नवे न स्विकारण्याची वृत्ती बळावत जाईल आणि यातून जे नवे तत्वज्ञान आकार घेईल ते अपौरुष्येय पेक्षा फार वेगळे नसणार.
जयभीम.

७ टिप्पण्या:

 1. अगोदरच आपला समाज नेते मंडळीनी संभ्रमात टाकला आहे...आत्ता विचारवंत, लेखक देखील संभ्रम वाढवणार असतील तर समाजाने कोणाकडे पाहावे ?

  उत्तर द्याहटवा
 2. एम डी रामटेके यांनी मांडलेले मुद्दे गेली अनेक वर्षे माझ्या मित्र नातेवाईकांच्या परिचितांच्या गप्पात मी मांडत आलो आहे. रामटेके यांनी ते सार्वजनिक मंचावर आणले, त्याबद्दल आधी मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. वास्तविक आंबेडकरी समाजाला अशाच दृष्टीकोनाची खऱ्या अर्थाने गरज आहे. माझे मित्र किरण सोनावणे यांनी एके ठिकाणी भाषणात म्हटले कि ज्या ज्या वेळी सुधारणावादी विचार आला, त्याचे ब्राह्मणांनी विकृतीकरण केले. मी भाषण संपल्यावर गप्पात त्याला विचारले, सध्या आपण ज्याचे पालन करतोय तो खरा बौद्ध धम्म कि विकृतीकरण झालेला..? त्यावर किरण हसला, म्हणाला, राज सध्या आपण पालन करीत असलेला धम्म आणि बुद्धाचा धम्म यात जमीन अस्मानाचा फरक आहे....!!!

  उत्तर द्याहटवा
 3. आपला लेख योग्य आहे. 22 प्रतिज्ञांचा सगळा रोख हा पहिल्या 6 प्रतिज्ञांवरच आहे. पुढील प्रतिज्ञांबद्दल मात्र बिलकुल मौन. 19 वी प्रतिज्ञा आज पुन्हा पुन्हा म्हणायची काहिच गरज नाही. "मनुष्यमात्राला असमान व नीच मानणा-या हिन्दु धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्विकार करतो". हि प्रतिज्ञा रोज म्हणणे म्हणजे रोज हिन्दु धर्माचा त्याग करण. याचा अर्थ आज मी हिन्दु धर्माचा त्याग करतो आणि आजच हिन्दु धर्म स्विकारतो आणि पुन्हा उद्या 19 वी प्रतिज्ञा म्हणुन हिन्दु धर्माचा त्याग करतो. अगदी मजेशीर. ज्याप्रमाणे एखादा व्यसनी सकाळी म्हणतो कि चला मी आज दारु सोडली, पण तो सन्ध्याकाळी पुन्हा दारु प्राशन करतो आणि दुस-यादिवशी सकाळी म्हणतो "चाल मी आज दारु सोडली आणि सन्ध्याकाळी पुन्हा तोच क्रम. पण हे साध लॉजिक समजुन घेतील ते आंबेडकरवादी कसले? ज्यात जातीत बाबासाहेबांसारखा प्रज्ञावंत जन्मला तो समाज बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीबाबत ईतका भावनिक आणि अन्धभक्त झाला आहे कि त्यातल्या ज्य गोष्टी आज गैरलागु आहेत त्या गोष्टीदेखिल तो आज कवटाळुन बसला आहे. महाड चवदार तळयाच्या वर्धापन दिनी अडाणी लोक आजही ते पाणी पितात अगदी तसच 22 प्रतिज्ञान्मधील काहि प्रतिज्ञांच झाल आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. डॉ. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म जो स्विकारला त्यामागे काहीतरी सत्य असले पाहिजे एवढे खरे. नाहीतर एवढ्या धर्मांचा अभ्यास करून सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्मच त्यांनी का स्विकारला. एक अभ्यासू आणि समाजात पोळलेल्या एका विद्वानानं जर हाच धर्म स्विकारला त्यामागे काहीतरी सत्य असलं पाहिजे हे नाकारता येत नाही. बौद्ध धम्म हा मुळाचत प्रज्ञा, शील, करूणा यावर आधारित आहे. धम्म म्हणजे जीवन जगण्याचा सरळ आणि साधा मार्ग.. आणि गौतम बुद्धाने तर पंचशीलातच धम्म सांगितला आहे.. त्या काय आहेत हे आपणा सुज्ञास न सांगितलेले बरे. तेव्हा सुडापोटी किंवा आकसापोटी काहीतरी लिहिणं हे चुकीचं आहे. समाजात गैरसमज असेच पसरतात आणि पसरवले जातात. कृपया आपण त्याला खतपाणी घालू नये. आपले ज्ञान आपल्यापाशीच असलेले बरे.. ते जास्त पाजळू नका...हे वाचून तुम्ही समाजातील मनुवादी आहात का असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही....

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. कट्टरता प्रत्येकात आहे. पण हिंदू हा सहिष्णू आहे. हेच पाकीस्तानात म्हणावं आपण. मग परिणाम बघावा.

   हटवा
 5. प्रतिज्ञा क्र. २१:- आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. ... या वरील प्रतिज्ञेत 'आज' हा शब्द असल्याने तीही प्रतिज्ञा आज लागू पडत नाही. रामटेके साहेब आपले विश्लेषण बरोबर आहे परंतु बाबासाहेबांनी ज्यांना बौद्ध केले त्यातील अनेकजन अजून महारच आहेत. म्हणतांना स्वतःला बौद्ध म्हणतात परंतु आहेत महारच. यांना बौद्ध करण्यासाठी आजही त्या २२ प्रतिज्ञा उपयुक्त आहेत.... विजय वाठोरे

  उत्तर द्याहटवा