मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

निळे तालिबानी...

नुकतीच सम्राट मधून बातमी वाचण्यात आली की बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यानी दैववादी(आस्तिक) आंबेडकरावाद्यांची शोधमोहिम सुरु केली आहे(याना हा अधिकार कुणी दिला?). ज्याच्या घरात देव-देवतांच्या मुर्त्या सापडल्या अश्याना गद्दार आंबेडकरवादी ठरवत त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या बहिष्काराचा आवाका ईतका प्रचंड आहे की मला तर हे महासभेवाले निळे तालिबानी वाटत आहेत. एखाद्याला बौद्ध महासभेनी बहिष्कृत घोषीत केले ईतर कुठल्याही बौद्धाने अशा बहिष्कृतांकडे जाऊ नये, बौद्ध महासभेच्या व्यतिरिक्त दुस-या कुठल्याही धार्मिक  संघटनांच्या धम्मगुरुनी अशा गद्दारांच्या घरी कुठलेही कार्य बौद्ध पध्दतीने करु नये, ईतर धम्म बांधवानी विवाह, गृहप्रवेशादी कार्यावर बहिष्कार टाकावा. समाजानी अशा गद्दाराना धडा शिकविण्यासाठी शक्य तितक्या कठोर पद्धतीने वर्तन करावे अन चहुबाजूनी अशा गद्दारांना सामाजिक व धार्मिक पातळीवर घेराबंदी करत जेरीस आणावे असा हा एकंदरीत बहिष्काराचा आवाका...
बापरे...
कोण टाकतोय हा बहिष्कार? ... बौद्ध महासभा! कोण आहे ही बौद्ध महासाभा? खुद्द बाबासाहेबानी धम्म प्रसारार्थ स्थापन केलेली व समस्त बौद्धाना पुज्य नि वंदनीय अशी ही संस्था आहे.  अशा या सर्वज्ञात बौद्ध महासभेच्या परिचायाची अजिबात गरज नाही. म्हणून मी आता थेट विषयाकडे वळतो.
गद्दार आंबेडकरवादी एक चिंतन...
बाबासाहेबांच्या महान कार्यातुन उभी झालेली समतेची चळवळ अनेक वळसे घेत कुठे फिरतेय याचा वेध घेतल्यास असे दिसेल की आंबेडकरी चळवळ पुढे जाऊन तीन भागात विभागल्या गेली त्या तीन आघाड्या म्हणजे राजकीय़ आघाडी, सामाजीक आघाडी व धार्मिक आघाडी. आंबेकरी चळवळीतील राजकीय़ आघाडी अत्यंत स्वार्थी लोकानी व्यापली गेली. बाबासाहेबांचं नाव वापरत स्वत:ची पोळी भाजण्या व्यतिरिक्त राजकीय पात्राना आजून काहीच करता आले नाही. राजकीय आघाडीने स्वत:ला गहान टाकत बाबासाहेबांच्या आदर्शाची, तत्वज्ञानाची व कार्यप्रणालीची सर्वादेखत धींड काढली व ४८+ (हे + याच्यासाठी कारण हा आकडा असाच पुढे सरकणार आहे याची १००% खात्री आहे) पक्षात विभागणी करत जमेल तिकडे गुलामी स्विकारत आंबेडकरी विचारधारेशीच खेळ-खंडोबा केला. पण नवल बघा यातील कुणीच गद्दार ठरत नाही, ते का? याचं उत्तर कुणीतरी दिलेच पाहिजे. पण जे बिचारे स्वभावानी गरीब आहेत, शिक्षणानी उच्च शिक्षीत आहेत पण मनानी कमकूवत असल्यामूळे वा ईतर कुठल्याही कारणास्तव देवभक्त आहेत ते मात्र गद्दार! आहे की नाही कमाल. निळा झेंडा घेऊन राजकारणात वावरणा-यानी हेतुपुरस्सरपणे केलेला आंबेडकरघात गद्दार ठरविण्यास पुरेसं नाही... का नाही? कारण ते सत्तेचे भागिदार आहेत.  ते मांडतील तेच समिकर आंबेडकरवादी ठरविण्याचे प्रमाण असणार. जर नाही तर मग प्रश्न असा उरतो की आंबेडकरवादी ठरण्याचे मापदंड काय? हा आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न. आंबेडकरी समाज आज संभ्रमावस्थेत आहे की आंबेकरवादी म्हणजे नेमकं काय? आंबेडकरवादी ठरण्याच्या कसोट्या काय? मापदंड काय?  ईथे चिंतनाची गरज आहे.
आंबेडकरवादी म्हणजे नेमकं काय हा प्रश्न निकाली काढल्या शिवाय गद्दार कोण व आंबेडकरवादी कोण हे सिद्ध करता येणे नाही. मग कसा काढायचा हा प्रश्न निकाली. कोणत्या कसोट्या वापरायच्या आंबेडकरवादी ठरविण्यासाठी हा प्रश्न उभा राहतो. खरतर हे काम खूप सोपंही आहे अन महाकठिणही आहे. अगदी एका वाक्यातही ते सिद्ध करता येऊ शकतं वा हजार पानी पुस्तक लिहून यथासांग चर्चा करत हा विषय निकाली काढता येईल. पण १००० पानी पुस्तक वाचणार कोण? आम्हाला थोडक्यात पटणा-या मार्गानी सांगता येईल का ते बघा! मग अगदी सोपं आहे. आपल्या वर्तनात मुलभूत बदल घडवून आणायचा आहे. बरं मग ते बदल कोणते? हे बदल दोन भागात विभागले आहेत. एक आपण ईतरांशी कसं वागायचं व दुसरं म्हणजे आपण स्वत:शी कसं वागायचं. ईतरांशी वागताना स्वातंत्र्य, समता व बंधुता पाळायची. व स्वत:शी वागताना पंचशिलाचे पालन करावयाचे आहेत. काय आहेत हे पंचशील? १) प्राणी मात्राची हत्या करु नका. २) चोरी करु नका ३) विषयवासनांचा त्याग करा ४) खोटे बोलू नका ५) मद्यपान( धुम्रपान आजुन जे  काही पान असतील ते) करु नका.  झालं... एवढं केलात की तुम्ही आंबेडकरवादी झालात.  हे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आंबेडकरवादी ठरता. मग तुम्हाला कुणी गद्दार बिद्दार म्हटलं की त्यालाच वरील कसोट्यात लावून तपासा अन तो खरा आंबेडकरवादी आहे का बघा. पितळ उघड पडायला वेळ लागणार नाही. तुमच्याशी एखादी व्यक्ति बंधुत्वाने वागत नसेल तर ती व्यक्ती आंबेडकरवादी असूच शकत नाही ये त्याना ठामपणे सांगा. वेळ पडलीच तर ठणकावून सांगा. बौद्ध महासाभावाले असो वा आजून कोणी असो तुम्हाला जर कोणी गद्दार म्हणत असतील तर  आधी त्यानाच वरील  कसोट्यात घालून पाहा. बघा ते किती सच्चे आंबेडकरवादी ठरतात. खूप सोपं उत्तर आहे, तुमचा द्वेष करणारा व तुमच्याशी बंधूत्वाने न वागणारा तो मग कुणीही असो तो आंबेडकरवादी  ठरतच नाही. मग त्याच्या गळ्यात महासभेचा बिल्ला असो व खुद्द बाबासाहेबांच्या रक्तातला असो. तुमचा तिरस्कार(फक्त तुम्ही देवभक्त आहात यावरुन) जर कोणी करत असेल तर तो आंबेडकरवादी नाहीच मुळी.
बरं! या झाल्या आंबेडकरवादी असण्याच्या मुलभूत कसोट्या. पण एक प्रश्न उरतोच तो म्हणजे जे महार (हा शब्द जाणीवपुर्वक घेतला आहे. कारण आजून महाराना आंबेकरवादाचा गुंता सुटलेला नाहीये) बाहेरच्या खोलीत बाबासाहेबांचा फोटो लावतात व आतल्या खोलीत देव ठेवतात त्यांचं काय? वर वर तो बौध्द असल्याचं दाखवतो पण आतून त हिंदू असतो. ते आंबेडकरवादी की गद्दार? कारण बौद्ध महासभेनी त्याना गद्दार ठरविताना फक्त देव हीच कसोटी लावून त्याना गद्दार व हिंदु-महार ठरविले आहे (ईतर कसोट्यांचं काय? ज्या कसोट्या त्यांच्यावरच उलटणार आहेत त्या कसोट्यांचं काय करायचं. स्वत: बंधूत्वापासून दूर दूर जात आहेत ते बौद्ध कसे असे अनेक प्रश्न पडतात) अन एखादा स्वत:ची जात हिंदु महार लावतो म्हणून तो आंबेडकरवादी नाही अस म्हणने कितपय योग्य आहे?  हिंदु-महार कि बौद्ध याचं मुल्यांकन कोण करणार? त्याच्या कसोट्या काय? एखाद्या आंबेडकरवाद्यानी घरात देव ठेवले म्हणजे तो गद्दार ठरतोच का? अन एखाद्या वरील पंचशीलाचे पालन न करताही बौद्ध कसा काय ठरु शकतो? पंचशीलाचे पालन न करणारे आंबेडकरवादी कसे काय बुवा? असे अनेक प्रश्न आहेत.
माझं तर स्पष्ट मत आहे की मुळात एखादी व्यक्ती देवांची पूजा अर्चा करत असल्यास तेवढ्या कारणा वरुन त्याला गद्दार ठरविता येणार नाही.  हे वाक्य वाचल्या वाचल्या स्वत:ला आंबेडकरवादी समजणारे २२ प्रतिज्ञांकडे बोट दाखवून देवाचा समाचार घेण्यास तुटून पडतील पण तो केवळ उताविळपणा ठरेल. आंबेडकरवाद स्विकारताना आज पर्यंत हाच उताविळपणा आपला घात करुन गेला. आंबेडकरवादी बनणे ही एक प्रदिर्घ अशी प्रक्रिया आहे.  तो संस्कार आहे, भावना, विचार व श्रद्धा यांच्या स्थीत्यांतराची ती प्रक्रिया आहे. थेट मनावर आघात घालायचा आहे अन हे एवढं सोपं नाही. रातो रात बदलण्याची प्रक्रिया तर नक्कीच नाही. मनाच्या अवस्थांवर काम होणे गरजेचे आहे. त्याला खूप मोठा कालावधी लागणार आहे. हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माकडे जाण्याची अवस्था म्हणजे वर वर पाहता वाटणारी ही धार्मिक संक्रमणावस्था असली तरी मुळात ती मानसीक संक्रमणावस्था आहे. त्याला किमान काही पिढ्यांचा कालावधी जाव लागतो. ईथे प्रश्न उठतो तो असा की शिकल्या-सवरल्यानी एवढा वेळ का घ्यावा? अरे ते काय खायचं काम आहे का! शिकलेला माणूस का भावूक नसतो का? असतो! भावनांचा व शिक्षणांचा काय संबंध.  देव पुजा करणारा माणूस ज्याला बाबासाहेबां बद्दल अत्यंत आदर आहे सर्वांशी तो बंधुत्वाने वागत असेल तर तो कुठल्याही आर.पी.आय. ब्रॅंडच्या राजकारण्यापेक्षा अनेक पट्टीने शुद्ध आंबेडकरवादीच ठरतो. जो उच्च शिक्षित आहे पण मनानी कमकूवत असल्यामूळे देव-भक्तीच्या आहारी गेला पण समतेचा, स्वातंत्र्याचा व बंधुत्वाचा वसा जर जपत असेल तर असा देवभक्त आंबेडकरवादीच ठरतो. केवळ तो देवपूजा करतो म्हणून त्याच्यातील स्वातंत्र्य-समता-बंधुता या गुणांचं अवमुल्यांकन नाही करता येणार. एखादा माणूस(आपला बरं का) पंचशिलांचे पालन करत असेल व तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन येत असेल अशा माणसाला आंबेडकरवादी म्हणायचे की गद्दार? माझ्या मते तो आंबेडकरवादीच. तो देव मानतो एवढ्या कारणावरुन त्याच्या आंबेडकरवादावर बोट उचलता येणार नाही. अन एखाद्याला बाबासाहेबांचे सर्व आदर्श पायदळी तुळविल्यावरही फक्त तो देव मानत नाही एवढ्या कारणावरुन आंबेडकरवादी ठरविता येणार नाही.  हे जर सत्य असेल तर मी ठामपणे असे म्हणू शकतो की आंबेडकरवादी ठरविण्याची कसोटी देव नाहीच मुळी. देवाच्या पलिकडे अनेक गोष्टी आहेत ज्यावरुन आमच्या माणसांचा आंबेडकरवाद अधोरेखित होते. देवाची कसोटी लावून आंबेडकरवाद तपासणे केवळ हास्यस्पदच नाही तर मुर्खपणा  आहे. कसोट्या लावायच्याच तर तत्वज्ञानाच्या लावा. बघा मग कसे सगळे (बौद्ध महासभेवाले सुद्धा) बाद ठरतात.
घेणे-सोडणेचा घोळ
बर आंबेडकरवादाची थेअरी घेणे-सोडणेत सुद्धा मांडता येईल. आंबेडकरवादी म्हणजे काय तर काही घेणे (स्विकारणे) व काही सोडणे (त्यागणे). मग आधी घेणे की सोड्णे यावर खडाजंगी होऊ शकते. बर परत प्रश्न हा की काय घेणे व काय सोडणे हा मोठा प्रश्न आहेच की.  त्याची क्रमवारी कोणी लावायची. मुळात आम्हाला घ्यायचं काय आणि सोडायचं काय हे माहित आहे पण त्याच्या क्रमवारीत घोळ आहे. आम्हाला हिंदु धर्म सोडायचा आहे व बौद्ध धम्म स्विकारायचा आहे (नाममात्र नाही. अगदी कृतीतून व मनातून) पण हे अगदीच ढोबळ वक्तव्य झाला. त्या त्या धर्मातील एक एक चालिरीती सोडायच्या आहेत व धम्माच्या चालिरीती स्विकारायच्या आहेत.  बाबासाहेबानी २२ प्रतिज्ञा मधे याची क्रमवारी लावून दिली आहे. त्यानी आधी देव सोडायला सांगितले. प्रतिज्ञा क्रमांक १ ते ५ देव सोडायला सांगतात. सहावी प्रतिज्ञा श्राद्ध सोडायला सांगते. सातवी प्रतिज्ञा  अत्यंत महत्वाची आहे. ती तुम्हाला बौद्ध धम्माशी अनुरुप वागण्यास प्रतिबद्ध करते. आठव्या प्रतिज्ञेत ब्राह्मणाचं पौरोहित्य नाकारत नववी प्रतिज्ञा दिल्या जाते जी समता शिकविते. मग बाबासाहेब एकेक प्रतिज्ञा देत पुढे सरकतात व १९ प्रतिज्ञेत हिंदू धर्माचा त्याग करायला सांगतात. हिंदू धर्म वाईट आहे व तो सोडायचाच आहे. पण कसा? आधी तुमचं सर्वस्वं बौद्ध विचारानी व्यापून जाउद्या मग आपसूकच हिंदू धर्माची हाकलपट्टी होईल. 
बाबासाहेबाना हे पक्कं माहित होतं की हिंदू धर्म त्यागन्याची प्रक्रिया आधी होऊच शकत नाही. माणूस बौद्ध धम्मानी पुरेपूर व्यापला गेला की हिंदू धर्माला जागा कमी पडू लागेल व तो हळू हळू बाद होईल.  म्हणजे ही थेअरी घेणे-सोडणेवर येऊन थांबते. आधी बौद्ध धम्म घ्या... तुमचं तन मन त्या धम्मानी व्यापून टाका तेंव्हा कुठे हिंदू धर्म तुमच्यातून बाहेर पडेल.  
ईथे एक मोठा गुंता तयार होतो. बाबासाहेबानी आधी देव सोडायची प्रतिज्ञा दिली व नंतरच धम्माची दिक्षा दिली. बोला आत्ता काय म्हणता? खरच पहिली प्रतिज्ञा देव सोडायला सांगते पण मागच्या ६०वर्षातील अनूभवातून आम्ही मानसशास्त्र शिकणार की नाही. शिकावच लागेल. मानसशास्त्र या विषयाकडे कानाडोळा करुन चालणार नाही. आधी देव सोडणे (काही सन्माननीय अपवाद वगळता)एवढं सोपं नाही हे सिद्ध झालय. आपले बांधव लपून छपून देव धर्म करतातच. तो त्यांचा भावनीक व वयक्तीक प्रश्न आहे. हळू हळू तोही निकाली निघेल त्याला वेळ द्यावा लागेल. हे सगळं ठिक आहे तरीपण देवाचा तिळा काही सुटताना दिसत नाही राव... ते महासभावाले लय त्रास देतायत म्हणून कित्तेकानी मला सांगितलं. देव नाही सोडलात तर तुम्ही गद्दार अश्या पवित्र्यावर ते ठाम आहेत.  हा देवाचा गुंता जर सोडवायचा असेल तर मग शेवटचा एकच उपाय तो म्हणजे बौद्ध धम्माची धम्मग्रंथे...
कोणती आहेत हो धम्म ग्रंथं? त्रीपिटीक... हे बौद्ध धम्माचं धम्मग्रंथ आहे. त्याच्यात देव आहेत का हो? हो त्रिपिटकात देव आहेत. बोला.... आता काय म्हणता. भगवान बुद्धांच्या आईच्या स्वप्नात येणारे देव त्रिपिटकात आहेत. बुद्धाना बोधीसत्व प्राप्त होते तेंव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव करणारे देव त्रिपिटकात आहेत. दिव्य दृष्टीने पाहणारा असीत मूनी त्रिपिटकात आहे व सगळ्यात महत्वाचं म्हणजे असीत मूनी भविष्यवाणी सांगतो. कोणाची हो? बुद्धाची... हो बुद्धाची भविष्यवाणी सांगतो व ती खरीही ठरते(म्हणजे ईथे ज्योतिष शास्त्राला मान्यता). छे मग त्रीपिटीक खरा धम्म ग्रंथ नाही दुसरं एखादं नाव सांगा. आम्हाला त्रिपिटक मान्य नाही कारण त्यांच्यात देवांचं अस्तित्व आहे.
आहे की, खुद्द बाबासाहेबानी लिहलेलं व आम्हा सगळ्याना मान्य(?) असलेलं धम्मग्रंथ म्हणजे द बुद्धा एन्ड हिज धम्मा हे पवित्र धम्मग्रंथ आहे. पण त्यात सुद्धा देवांचं अस्तित्व आहेच की. बाबासाहेब लिखित या ग्रंथात नुसतं देवांचं अस्तित्व नाही तर काही चमत्कारही आहेत. आता बोला! अन हो बाबसाहेबांचं अत्यंत आवडतं पुस्तक म्हणजे मिलिंद प्रश्न... या मिलिंद प्रश्नाची सुरुवातच पुनर्जन्मापासून होते व अनेक देव दर्शन घडवत मोठया युक्तिवादाच्या सागरातून हा ग्रंथ पुढे सरकतो व तत्कालीन विद्वत्तेचे संदर्भ देत बौद्ध परंपरेचा वैभवशाली इतिहास सांगतो. पण देव काही चुकला नाही. म्हणजे बौद्ध वांगमयात देवा लागला. त्रिपिट नाकारणे सोपे... कारण त्याच्याव विपर्यास झाला हे सर्वाना माहित आहे. पण खुद्द बाबासाहेबानी लिहलेल्या ग्रंथाचं काय करणार?
आता एकच पर्याय, खुद्द बाबासाहेबानी लिहलेला ग्रंथ नाकारणे... आहे का हिंम्मत? नाही. मग देवाच्या कसोट्या लावून आपल्याच बांधवाना गद्दार संबोधने थांबले पाहिजे. आमच्या बांधवांच मुल्यमापन करायच असल्यास त्यांची बाबासाहेबांवरील निष्ठा बघा, भावनात्मक कप्प्यातीले देव नाही. २२ प्रतिज्ञांच्या क्रमवारीत सुरुवातीलाच जरी देव नाकरला गेला तरी ते राबविताना आलेला अनूभव आपल्याला हेच शिकवून जातो की देवाच्या बाबतीत कठोर भूमिका घेउन आपल्याच बांधवाना दुखावण्यापेक्षा जरा आस्ते चलोची भूमिका घेत समाज बळकट करणे जास्त गरजेचे आहे. शास्त्राचा संदर्भ घेत युक्तिवाद केल्यास सर्व धम्मग्रंथात थोड्याअधिक प्रमाणात देव डोकावतोच आहे त्यातून मला एक महासंकट दिसतो तो म्हणजे नास्तिक-आंबेडकरवादी आस्तिक-आंबेडकरवादी भविष्यात अशा दोन गटात समाजाची विभागणी होण्याची.  देवाचा मुद्दा खूप ताणल्यास वरील दोन गट पडणे अटळ आहे. कारण आपल्या सामाजातील दोन्ही लोकं (देव मानणारे व न मानणारे) बाबासाहेबाना सोडायला तयार नाहीत. कारण त्याच्यात स्वार्थ वगैरे नसून या दोन्ही लोकाना बाबासाहेब अत्यंत प्रिय व आदरनीय आहेत. वयक्तीत आयूष्य, भावना, संस्कार नि विचार भिन्न असूनही बाबासाहेबां बद्दल नितांत आदर आहे. तो असणे त्यांच्यातील आंबेडकरवाद अधोरेखित करण्यास पुरेसं आहे. उगीचे देवाच्या कसोट्या लावत अशा लोकाना गद्दार ठरविणारे व आपल्याच बांधवांशी बंधुत्व न पाळणारे निळे-तालिबानी ठरतात. देवाचा मुद्दा जर असाच ताणून धरल्यास विभागणीला पर्याय नसणार. कारण संपुर्ण बौद्ध वांगमयात देवाचं अस्तीव स्विकारणारा संदर्भ नाही कुठेच नाही जे जेवढं खरं आहे तेवढच खरं हे ही आहे की देव नाकारनाराही संदर्भ नाही. हे धोक्याचं आहे. देवा बद्दल बौद्ध धम्मग्रंथात थेट स्टेटमेंट कुठेच नाही. ते नसण समाजाच्या विभागणीला कारणीभूत ठरु शकतो. त्याही पेक्षा महत्वाचं काय तर देव हे आंबेडकरवादी ठरविण्याचं एकमेव मापदंड होऊच शकत नाही.
हिंदू धर्माबद्दल आमच्या मनात जो तिढा आहे तो काढून टाकणेही तेवढेच गरजेचे आहे. याचा अर्थ घरात गणपती बसवा असा नाहीये पण थोड सौम्य होणं अपरिहार्य आहे. कारण आजचा काळ हा सर्वांच्या संस्कृतीचा व संस्कारांचा आदर राखत आपल्या स्वत:च्या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याचा आहे. एकमेकांचे हात धरुन पुढे जाण्याचा काळ आहे. बरं आजून एक मोठी चूक अशी की देव म्हटलं की तेवढे हिंदूचेच देव आम्हाला दिसतात. ईतरही धर्मात देव आहेतच की. पण आमचं वैर तेवढा हिंदूच्या देवाशीच. आता हे वैर हळू हळू शमविण्याची गरज आहे. त्या आधी आपल्या स्वत:च्या बांधवाना सांभाळण्याची गरज आहे. असं कुणार बहिष्कार टाकून चालणार नाही. बहिष्कार टाकणे म्हणजे समता नाकारणे होय व ते बौद्ध धम्मात बसत नाही. बौद्ध महासभेची मोहीम  अत्यंत घातक व समाजाची विभागणी करणारी आहे. त्यांचा बहिष्काराचा पवित्रा पाहता व आपल्याच बांधवाना बंधुत्व नाकारण्याच्या या निर्णयामूळे मी त्याना निळे-तालिबानी असच म्हणेन.
-एम. डी. रामटेके

८ टिप्पण्या:

 1. होय....बहिष्कार टाकणे म्हणजे समता नाकारणे होय व ते बौद्ध धम्मात बसत नाही....आणि कोणी बसविण्याचा प्रयत्न देखील करू नये....! लेख उत्कृष्ट आहे...धन्यवाद सर....!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Excellent Article, Sir please give at least 5 specific examples with page number in which Babasaheb has mentioned about miracles and existence of God in his book Buddha and his Dhamma. If u dont have time to give 5 specific examples then at least give page number. Regards - Nilesh Mandlecha(Psychologist and MBA in HR)

   हटवा
 2. mi Maratha ahe....pan Dr Ambedkar yannchya baddal mala khup adar ani abhiman ahe.karan ekunach rashtrachya vikas mag to arthik,samajik kinva vaicharik aso tyala vidhayak valan denyachi ji tatve Babasahebanni 50 peksha jast varsha purvi mandali ti aaj hi lagu keli tari ekunach rashtra vikas howun desh mahasatta honyas vel lagnar nahi....pan sarvach political parties na Ambedkar fakt election purte athavatat ani mag 5varsha saglech visrun jatat.Babasahebanna eka jatiche kinva samajache aslyache mhanane mhanje eka MAHAN purushala bandist karne navhe kay...?

  उत्तर द्याहटवा
 3. In Buddhism, the creator god and various gods(devatas) are two different things. Buddhism do not believe in creator god. But do believe in various devas. These devas are not creator but these are beings having certain power due to their meritst. According to Buddha there are six realms of existance those are, Deva, Asura, Manushya, Prani i.e animals, preta i.e hungry ghosts and hell beings i.e Naraka. So devas are one of them having greator merits, they are not eternal they do die like humans but their life span is very long.

  उत्तर द्याहटवा
 4. ह्या प्रकारे बहिस्कार करणे म्हणजे एक प्रकारे अति करण्यासारखेच आहे.

  उत्तर द्याहटवा
 5. मला वाटते..... ह्या बौद्ध महासभावाल्यांना,,,बौद्ध धम्म म्हणजे बौद्ध धम्मात परमेश्वराचे स्थान नाही इतकाच समजला.. मुळ बौद्ध धम्म ज्या मुलभुत तत्वांवर आधारित आहे,, स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, मैत्री, शील ह्या सर्व गोष्टींचा विसर पडलेला दिसतोय....

  आमच्या नागपुरलाच अनेक ठिकाणी पाहायला मिळतात,,, म्हातार्या बाया पैसे जमवुन विहार बांधतात,, दररोज सकळी न चुकता विहारात जातात, त्रिशरण पंचशील नुसते ग्रहणच करत नाहीत तर करित नाहीत तर त्यांचे काटेकोर पणे पालनसुद्धा करतात... (जे कोणतेच, राजकीय व सामाजिक चळवळीतील नेते करत नाही, उदा. बामसेफ, RPI,etc, पण हे गद्दार ठरत नाहीत, ) पण घरी गेल्यावर त्यांच्या देवालयात लक्ष्मीचा (कोणतेही देवी, देवता) फोटो असतो.. फक्त यामुळेच यांना " गद्दार बौद्धाचे " प्रमाणपत्र द्यायचे का? अन जे राजकारणी स्वतः "जय भीम" म्हणत जय भीम ची च कत्तल करतात त्यांच्याबद्दल काय? करावे हे नाही सुचत का ह्या महासभा वाल्यांना...

  बौद्ध धम्म हा समतेवर आधारीत आहे... हा धम्म आपल्याला,, समानता शिकवतो, प्रेम शिकवतो, मैत्री शिकवतो. सर्व प्राणीमात्रांबद­्दल बंधुभाव शिकवतो.. केवळ देवाच्या कसोट्या लावुन आपल्याच बांधवांना गद्दार समजुन त्यांच्यावर बहिष्कार टाकल्यास बाबासाहेबांची (विचारांची) कत्तल केल्यासारखे होईल...

  बहिष्कार...

  बापरे किती मोठा शब्द... ह्याचा अर्थ माहीत आहे का? बौद्ध महासभा वाल्यांना.. ज्या बाबासाहेबांनी,, समाजातील विषसमान विषमतेला मारण्यासाठी उभं आयुष्य घालवलं आज त्यांचच नाव घेवुन तुम्ही... त्यांच्याच विचारांविरुद्ध वागता आहात..

  मग त्या अस्पृष्यता पाळणार्या ब्राह्मणांमध्ये अन बहिष्कार टाकणार्या बौद्धांमध्ये फरक तो काय???

  बहिष्कार म्हणजे का? तर फक्त देव मानतो म्हणुन...... मग THE BUDDHA AND HIS DHAMMA ला पण बहिष्कृत करणार काय??

  बहिष्कार वाद्यांनो तुम्हीच तर बौद्ध धम्माचा त्याच्या विचारांचा खुन करत आहात..

  उत्तर द्याहटवा
 6. बौद्ध धर्मातील देव, स्वर्ग आणी नरक संकल्पना इतर धर्मापेक्षा खुप वेगळ्या आहेत.

  अधिक माहीतीकरीता ह्या संकेतस्थळावर जा...
  http://piyushkhobragade.blogspot.no/2013/03/1.html

  उत्तर द्याहटवा