गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

आंटिची मेस, जळगाव.

सौ. हेमलता वडनेरे
खानदेशातलं खाणं म्हणजे अप्रतिम चव. तसं कोल्हापुरी, नागपूरचं सावजी व कोणतालं कोकणी-मालवणी खाणही जबरदस्तच पण या सगळ्यात खाणदेशी जेवणाची चवच निराळी. आता ही सगळ्याना आवडेल की नाही ती गोष्ट वेगळी पण आहे मात्र जबरदस्त. जळगावातील नॉनव्हेजची दोन ठिकाणं मला प्रचंड आवडतात ती म्हणजे स्टेशन शेजारचं द्वारका व टॉवर चौकातून उजविकडे वळून गल्लीबोळातून(? जळगावात बोळं नाहीत) काही दूर गेल्यावर लागतं ते म्हणजे मराठ मटन.  या आधी जेंव्हा कधी कामा निमित्तानी जळगावात आलो तेंव्हा निव्व्ड मासाहारी जेवणार ताव मारुन परतायचो. पण या वेळेस मात्र आठवडाभर राहिल्यामुळे मग इतर प्रकारचं जेवण शोधणे सुरु झाले. अन मला सापडली आंटीची मेस ( Auntichi Mess, Jalgaon ).
मेस चालविणे आजच्या काळात एक धंधा बनला असून खास करुन जिथे बाहेर गावचे विध्यार्थी जेवायला येतात तिथे चव ही महत्वाची नसून कमी खर्चात जास्त कमविण्याचे समिकरण असते. अन चव दिलीच तर मग मिळणारे जेवण हे विद्यार्थ्याच्या आवाक्या बाहेरचे असते.  चांगली चव हवी असल्यास अवाजवी किंमत द्या नाही तर मिळेल ते पोटात ढकलून शिक्षणाचं काय ते पहा असा एकंदरीत होरा असतो.
पण जळगावात मात्र मला सौ. हेमलता वडनेरे यांच्या रुपात एक अपवाद सापडला. एम. जे. कॉलेजच्या परिसरात यांची मेस असुन त्या मागील २७ वर्षा पासून मेस चालवितात. मला  एका आटोवाल्यनी आंटीच्या मेसचा पत्ता सांगितला. मग मी शोधत शोधत शेवटी मेस मध्ये धडकलो. एकुण चित्र पाहून मला विश्वासच बसेना की ही मेस आहे...
मी विचारत विचारत जेंव्हा आटीच्या मेसमध्ये पोहचलो... पाहतो काय तर एक मोठं स्लॅबचं बैठं घर (की बंगला?). गेट मधुन आता शिरलात  की मध्ये दहा बाय पंधराची मोकळी जागा जिथे दोन-तीन टेबलं व खुर्च्या टाकल्या होत्या. अन ही जागा जिथे संपते तिथून सुरु होतं भलं मोठ्ठ किचन. त्याच बरोबर बंगल्याच्या सभोवतालीही थोडी मोकळी जागा आहेच. आत शिरुन पाह्तो काय तर पन्नासेक पोरं जेवायला बसलेली. पण कुठे? त्या बंगल्याच्या परीसरात जिथे कुठे मोकळी जागा दिसत होती तिथे, शाळेत जशा चटाई असतात तशा चटई टाकून पंगती बसल्या होत्या. काही मोठी माणसं टेबल खुर्च्यावर बसून जेवत होती व ते विध्यार्थी नसून परिसरातील नोकरवर्ग होते हे स्पष्ट दिसत होते. बर ही पंगतही मजेशीर होती... तिथे कोणी जेवण वाढत नव्हते. संपुर्ण सेल्प सर्व्हीस. मोकळ्या जागेतच पाच बायका पोळ्या लाटत होत्या व शेजारच्या टोपलीत टाकत होत्या. पंगतीतली पोरं किचन मधुन भाज्या घेऊन बाहेर पडत होती नि टोपलितल्या पोळ्या उचलून पंगतीत जाऊन बसत होती. पोळ्या अखंडपणे शेकल्या जात होत्या...पंगतीही उठत होत्या. नवी पोरं पंगतीत येत होती... आत मध्ये (किचन मध्ये) मोठ्ठाल्या दोन कढईंवर अखंडपणे भाज्या शिजत होत्या. शिजलेली भाजी किचनमधील एक टेबलावर ठेवलेल्या दोन पातेल्यात उलटवून परत कढईत नवी भाजी बनविणे सुरु होते... असं एकंदरीत सगळ अखंड चालू होतं....किचन मध्ये सर्वाना एंट्री. तिथूनच ताट, वाटी, भाज्या, वरण भात घ्यायचं... व बाहेर चपात्या!
मी हळूच जाऊन ताट घेतलं व टॆबलावरील पातेल्यातून दोन भाज्या घेऊन बाहेर आलो. टोपलीतून दोन पोळ्या उचलल्या व टेबलावर बसून जेवण केलं. मी एक गोष्ट नोटीस केली... शिकणारी पोरं घोळक्यानी येत... किचनमधुन भाजी-पोळी घेऊन कुठेतरी जाऊन खाली मांडी घालून बसत व जेवण झालं की निघून जात. माझ्या ताटातली भाजी संपली. मी भाजी घ्यायला किचनात गेलो तर तोवर आधिची भाजी संपुन दुसरी भाजी आली होती. हा चेंज प्रचंड आवडला. इरत्र जिथे एक किंवा दोन भाज्यावर बोळवण करतात तिथेच इथे मात्र एका दिवसात तीच भाजी रिपीट होत नाही. क्या बात है म्हटलं!
जेवण म्हणजे कसं हल्ली तीन पोळ्य़ा व दोन वाट्या टेबलावर आपटतात... परत हवे असल्यास एक्स्ट्रापैसे मोजावे लागते. पण इथे तसं नाही. आंटीच्या मेस मध्ये एक्स्ट्रा प्रकारच नाही. फूल्ल्ल... जेवण असा प्रकार आहे. तुम्हाला लागेल तेवढं खा... अन तृप्त होऊन जा. वरुन सेल्फ सर्व्हीस... तुम्हाला कोणी वाढणार नाही. लागेल तेवढं हातानी घेऊन खायचं. बास!
हे सगळं ठीक होतं. पण मला खरा धक्का तेंव्हा बसला जेंव्हा मी पैसे द्यायला गेलो. म्हटलं किती झाले? उत्तर आलं ३५ रुपये. मी उडालोच. कारण कालच रात्री चाळीस रुपयात अंडा बुर्जी खाल्ली होती. त्यातही दोनच पाव. वरच्या दोन पावासाठी अधिकचे पैसे मोजले होते. सकाळी भजी गल्लीत पोहे-रस्सा खाल्ला होता. पोट नाही भरल म्हणून परत एक मागवला. पैसे किती झाले विचारल्यावर उत्तर आलं ४० रुपये.  जळगावातच स्टेडीयम कॉंम्प्लेक्स मधील ’कॅफे मड्रास’ मध्ये दोन दिवसा आधी वडा सांबार खाल्ला होता. एका वडा सांबाराची किंमत आहे ४५ रुपये.  म्हणजे जळगावात इतर ठिकाणी नाश्ता करायचा म्हटल्यास चाळीसच्या खाली नाही. पण इथे मात्र अगदी फुल्ल जेवण ते ही तीन किंवा चार भाज्या, वरण, भात व पोळी हे सगळं मिळतं फक्त ३५ रुपयात.  अन चव? अप्रतिम चव. चवीच्या बाबतीत आंटी काम्प्रोमाईज करत नाही.... हे उभं जळगाव जाणतं. हो नुसतच ठोकत नाहीये. उभं जळगाव जाणतं. कारण जळगावातल्या जवळपास सगळ्याच वृत्तपत्रांतून आंटिचं कौतूक छापून आलेलं आहे. तर मी पैशाचं बोलत होतो... 
पैसे घेणा-या मालकिन बाईच्या चेह-यावर एक प्रसन्नता होती. समाधान दिसत होतं. मी विचारलं एवढं स्वस्त कसं काय देता? त्या हसून म्हणाल्या... काय म्हणाल्या.... बिचा-या मेस चालविणा-या त्याना कुठे काय म्हणता येतं की भावनाना छानशा वेष्टनात पॅक करुन मांडता येतं. अगदी जळगावी ठसक्यात जमेल तसं बोलल्या. पण भिडणारं होतं.... सगळच बोलण भिडणार होतं. अगदी खोल खोल उतरत होतं. कस आहे ना  तत्वज्ञानात नि वर्तनात विसंगती नसली की ते थेट भिडतच. मग त्याला जड नि भारदस्त शब्दाची गरज नसते. तर असा तो भिडणारा संवाद होता. त्या संवादाचा एकुण सारांशा काहिसा असा आहे...
... मी व्यवसाय म्हणून नाही तर सामाजीक बांधिलकी म्हणून हे करते. आज पासून २८ वर्षा आधी गरज म्हणून डबे सुरे केले. घरुन दोन डब्यानी सुरुवात झाली. कामावर निष्ठा व चांगली चव ह्यामुळे माझे डबे काही वर्षातच २०० च्या वर गेले. मग मात्र डबे पुरविणे अवघड जात होते. अन मी डबे बंद करुन मेस चालू केली. आज या व्यवसायात २८ वर्षे झालीत. मला दोन मुली आहेत. दोघीना याच व्यवसायातून शिकवलं, चांगले स्थळ शोधून लग्न लावून दिले. त्यातली एक मुलगी आज जळगावात स्वत:चं होटेल चालविते आहे. आज इथे माझ्याकडे रोज एका वेळेला ३५० मुलं जेवायला आहेत. एकुण १२ बाया कामाला आहेत. सगळ्याच मागील १०-१२ वर्षापासून असून त्या सर्वच बाबतीत समाधानी आहेत... वगैरे खुप भरभरुन बोलल्या. समाधान मात्र प्रत्येकीच्या चेह-यावर दिसत होतं.
एका वेळेला साडेतीनशे मुलाना जेवायला घालनं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. पण त्यातही महत्वाचं काय तर अत्यंत वाजवी किमतीत घरच्या चवीचे जेवण मुलाना देणे ही हेमलता ताईची खासीयत. ३५ रुपतात आज जळगावात नाश्ताही मिळत नाही तिथे फुल जेवण वाढणे ही खूप मोठी गोष्ट आहे.  
मी अनेक मुलूख वेगळ्या माणसाना भेटलो आहे... हेमलताताई अशाच एक मुलूख वेगळ्या व्यक्ती आहेत.

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

खाल्या मिठाला जागताना...!
खाल्या मिठाला जागलं पाहिजे हा मराठी टोमणा आजकाल तेवढा ऐकायला येत नसला तरी अधे मधे तो येत असतो.  आदर्शवादी विचारसरणी रुजविताना खास करुन नोकर वर्गांवर हे मिठाला जाण्याचा विचार खोलवर रुजविण्याचा एक काळ होता. मग मालक कितीही नालायक असला तरी मालकाचे अनेक जुलूम सहन करत मिठाला जागणारे नोकरही होते. मालक व नोकर यातील जुलुमी नातं अतूट बनविण्याची ही अफलातून शक्कल कोणी लढविली माहीत नाही, पण ती एकतर्फी व मालकांच्याच हितार्थ राबविली गेली हे मात्र नक्की. हा विचार/तत्वज्ञान कधी सुरु झालं माहीत नाही पण जेंव्हा केंव्हा याची सुरुवात झाली असेल तेंव्हा मजूर वर्गाचं जिवन अत्यंत दयनीय व हालाखीचं होतं एवढं मात्र नक्की. काय असेल ते असेल पण या विचाराला जर कुणी कळस चढविला तर तो हिंदी सिनेम्यानी. मस्तवाल मालिक आपल्या नोकराला चाबकाचे फटकारे मारतो आहे अन दोन हात जोडून “मैने आपका नमक खाया है हुजूर..” म्हणणारे अनेक सीन साठ-सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेम्यांतून दिसायचे,  आजकाल ते दिसत नाही.  आज हे जुने सिनेमे पाहताना  “मैने आपका नमक खाया है...” वाले सीन आले की हासायला होतं.
सोमवार पासून जळगावात आहे. हॉटेलमध्ये टी.व्ही असल्यामुले रोज सिनेमे पाहणे सुरु आहे. त्यातून हे "मैने आपका नमक खाया.... वाले संवाद काळाच्या ओघात विचित्र जाणवू लागलेत. आज जरा शांत डोक्यानी या नमकच्या फिलॉसॉफीचा विचार केल्यावर चिडचिड झाली व मी त्या पिढीचा नाही म्हणून बरही वाटलं. ज्या कोणा वर्गाकडे विचार रुजविण्याची जबाबदारी होती तो किती बेजबाबदारपणे वागला हे दाखविणारा आरसा म्हणजे मिठचं तत्वज्ञान.  मालकाकडॆ काम करणारा मजूर म्हणजे आपल्या कष्टाच्या बदल्यात मजूरी मिळवीत असे. खरं तर ती मिळविणे हा त्याचा अधिकारच. पण मालक कंपुतल्या लोकाना तसं वाटत नसे. त्याना वाटे की हे मालक लोकं मजूरांवर उपकार करत आहेत.  ते एका अर्थाने खरही असेल. कारण काम देणारे कमी अन मागण-यांची गनती नाही. म्हणजे श्रमाचे नेगोशिएशन होऊन श्रम-मुल्य घसरायला प्रचंड स्कोप होता. या सगळ्या परिस्थीत एखाद्याला काम मिळाल्यावर ते उपकार वाटत असल्यास नवल वाटायचं कारण नाही. म्हणजे हे खाल्या मिठाला जागण्याचं तत्वज्ञान रुजायला श्रमाचा गरजेपेक्षा अधीक असलेला पुरवठाही जबाबदार होता असं म्हणता येईल.  
पण वरील युक्तीवाद मला पटत नाही. श्रमाचा पुरवठा अधिक असल्यामूळे श्रमाचं मुल्यं घसरत हे मान्य पण त्यामुळे उपकारभावना व मिठाची गुलामी हे नाही पटत. कारण श्रमाच्या पुरवठ्याची परिस्थीती आजही फारसी बदललेली नाहीच. एक आय.टी. व विशेष कौशल्य असणारे एक दोन क्षेत्र सोडले तर बाकी  सगळ्या क्षेत्रात श्रमाचा पुरवठा जास्तच आहे. नोक-या नाही, रोजगार नाही ही परिस्थीत उलट वाढत चालली आहे.  तरी आजचा तरुण खाल्या मिठाच्या बदल्यात मालक देवो भवो वगैरे खपवून घेत नाही. मालकाशी खटके उडाल्यास तू नाही तर तुझा बाप म्हणतो... मिठाला जागणे संकल्पना हद्दपार होऊन मालक जे पैसे देतो ते उपकार नसून माझ्या कष्टाचे व हक्काचे पैसे आहेत असा विचार सर्वत्र रुजत चालला आहे. अगदी कारखान्यातील कामगारापासून शेतात राबणा-या शेतमजूरा पर्यंत हे मिठाचं गणीत झुगारणे सुरु झाले. मिळणारा पैसा उपकार नसून राबलेल्या कष्टाचा मोबदला आहे अन मी जे मीठ खातो ते मालकाचं नसून माझ्या स्वत:च्या कष्टाच्या पैशाचं खातो हा नवा विचार मागच्या दहा एक वर्षात सर्वमान्य होत आहे. म्हणजे नोकरा सोबत मालकही हा विचार स्विकारतो आहे. 
मालकाचे नोकरावर उपकार असतात असं माणणारा काळ गेला असून मला जशी पैशाची गरज आहे तसच मालकालाही काम करणा-या कामगाराची/मजूराची गरज असते हे कामगाराना तर कळलेच पण मालकानीही मान्य केले. उपकार आणि व्यवहार यातील फरक स्पष्ट होत गेला. आजच्या घडीला मिठाला जागणे वगैरे प्रकार बंद झाले अन या नात्यातील व्यवहार जास्त ठळकपणे अधोरेखीत होत गेला. मालकाचे मीठ जाऊन स्वत:चे मीठ ही संकल्पना रुजली असून  मिठाला जागण्याचे दिवसही इतिहासातील घटना बनल्या आहेत. खाल्या मिठाला जागताना आधी पिढ्यान पिढ्या झिजायचे. आता मात्र समिकरण बदललं असून खाल्या मिठाला ना जागायची गरज ना वाकायची गरज असे चित्र आहे. कारण ते मिठ कोणा ति-हाईताचं नसून आपलं स्वत:चं असत हे कामगाराना कळून चुकलं.
मग याचा प्रतिबिंब सिनेम्यांतून उमटताना दिसू लागलं. आजकालच्या सिनेमात ते "आपका नमक खाया हुजूर" ही डॉयलॉग शोधून सापडत नाही. सिनेमे हे काळाचा आरसा असतात हे खरच आहे. अमिताभ व राजेश खन्नाच्या काळातल्या सिनेम्यांतून दिसणारा "आपका नमक खाया" वाला एकुण कनसेप्ट आज हद्दपार झालेला दिसतो. वीस-तीस वर्षा आधी माणूस कसा विचार करायचा नि आज कसा विचार करतो यातील फरक अनुभवायचं असल्यास त्या त्या काळातले सिनेमे नक्की पहावे... त्यातून ब-याच गोष्टी काळाचं गुपीत सांगतात. समाजातील परिवर्तन कसे होत चालले हे ही सांगतात. एकुण मानसिकता कुठल्या दिशेनी जात आहे याचाही अंदाज येतो.
आजची पिढी अनेक अर्थाने व्यवहारी असून भावनिक व मारक अशी जुनी मुल्य नाकारत आहे. कालच्या पिढीला मात्र हीच मुल्ये नीतीमत्तेच्या मोजपट्टीत अधिक प्रिय असून आजची व्यवहारी मुल्ये म्हणजे नीतिमत्तेचे अध्य:पतन वाटते. कारण ती पिढी आयुष्याचा होम करायची... खाल्या मिठाला जागताना!!!

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

देवयानी प्रकरणातील जातीयवादी मानसिकता.

देवयानी खोब्रागडेवरुन आंतरराष्ट्रीय पातळीवरील जातीयवाद अधोरेखीत झाले आहे. खरंतर देवयानी केसच्या दोन बाजू आहेत. एक दृश्य बाजू जी उघडपणे देवयानीला आरोपी बनवते...दुसरी बाजू बुरसटलेल्या मानसिकतेची असून ती लगेच लक्षात येत नाही. ती एक अनसीन फोर्स म्हणून काम करत आहे हे मात्र खरे. यातील दुर्दैवी सत्य असे की देवयानी या किमान वेतन देण्यात चुकल्या हे स्पष्टच आहे. मग त्यामागील युक्तीवाद काही असला तरी चूक ती चूकच. त्यामुळे आपण कितीही बौद्धिक घोडे दामटले अन चर्चा झाडल्या तरी या प्रकरणातील देवयानीचा गुन्हा, गुन्हा ठरत नाही असे अजिबात नाही. किंवा इतर कारणं सांगत कायद्यातून सुटही देण्याचं समर्थन तर्कविसंगत नि अप्रस्तूत ठरतं. हे सगळं मान्य केलं तरी हे प्रकरण वरवर दिसतं तसं नाहिये... यामागे एक धूर्त अशी खेळी आहे. मला ती खेळी अधोरेखित करायची आहे.
तर प्रकरण काय आहे ते आधी पाहू या...
देवयानी खोब्रागडे या भारताच्या उपराजदूत म्हणून अमेरीकेत नियुक्त आहेत. त्याना भारत सरकार द्वारे दर माह ४१५० अमेरीकन डॉलर एवढा पगार मिळतो. या व्यतिरिक्त जे काही भत्ते वगैरे असतात ते अधिकचे मिळत असतात. हे अधिकचे मिळणारे भत्ते पगाराच्या कित्तेक पटीत असतात हे विशेष.  तर देवयानी खोब्रागडेनी अमेरीकेला जाताना आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी भारतातून एक बेबीसिटर नेली होती. अमेरीकेच्या नियमा प्रमाणे बेबीसिटरला किमान वेतनाच्या अटीनुसार दरमाह ४५०० डॉलर प्रतिमाह पगार देणे बंधनकारक होते. ही अट मान्य केल्याशिवाय इथून बेबी सिटर नेण्याची वा तिथली बेबीसिटर अपॉंइंट करण्याची परवानगीच मिळू शकत नव्हती. मग देवयानी खोब्रागडे यानी अनेक लोकं करतात ती गोष्ट केली. म्हणजे अमेरीकी सरकारला व इतर ठिकाणी दाखवायला एक ४५०० डॉलरवाला करार तयार केला अन दुसरा एक करार जो बाईला खरोखर किती पगार देणार तो केला, म्हणजे तो ३५० डॉलर प्रतिमाह असा होता. सगळे करतात म्हणून आपणही करु ही बेफिकीरी नडली. कारण आपण आंबेडकरी असून आपल्यावर ही सवर्ण लोकं टपून बसलेली असतात या गोष्टीचा खोब्रागडे बाईला विसर पडला नि इथेच घात झाला.
अमेरीकेत गेल्यावर सुरुवातीचे काही महिने काम करुन पगार खात्यात पडू दिला व नंतर हळूच बेबी सिटर बाईनी आपलं खरं रुप दाखविलं. देवयानीच्या वडलांच्या म्हणन्या प्रमाणे तिनी खोब्रागडे बाईला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. म्हणजे काय? तर तू मला जो पगार देतेस तो किमान वेतनाच्या नियमाप्रमाणे कमी असून मी तुझ्यावर अमेरीकेत केस दाखल करते वगैरे. यावरुन दोघात वाद झाले व आपल्याला  िप्लोमॅटीक इम्युनिटी कायद्याचे संरक्षण असल्यामुळे अमेरीकी सरकार मला अरेस्ट करु शकत नसून तुझा माझा करार भारतात झाला होता... त्यामुळे यावर जो खटला चालायचा तो भारतात चालेल असे देवयानी सुनावले व तसा खटला भारतात दाखलही केला. बेबीसिटर बाई मात्र अमेरीकेत कुठेतरी भुमिगत झाली. आजच्या घटकेला एकुण परिस्थीती अशी आहे की भारतीय न्यायालयाने बेबीसिटर बाईला पकडण्याचे वारंट काढले असून अमेरीकेला तसे कळविण्यात आले आहे. तर ही झाली केस....
आता पुढची गंमत काय आहे बघा...
अमेरीकेत एक मोठा नावाजलेला वकील आहे... त्याचे नाव आहे प्रीत भरारा.... हा वकिल भारतीय वंशाचा असून याचा तिकडे प्रचंड दरार आहे. तो सध्या अटर्नी जनरल या पदावर असून कारवाईचे आदेश यानीच दिले होते. यानी श्रीलंकेतील एका बिजनेसमॅनला व गुप्ता नावाच्या एका भारतीय सुपर मांईड बिजनेसमॅनला अमेरीकन कायद्याचा बडगा दाखवत हवालातमध्ये पाठविले आहे. या भरारानी प्रचंड उत्साह दाखवत देवयानीला अरेस्ट करण्याचे आदेश दिले. त्याचा युक्तीवाद असा की अमेरीकन कायद्याचे उल्लंघन करत देवयानी हिने किमान वेतनाचा नियम डावलून आपल्या बेबिसिटरला कमी पगार दिला. त्यामुळे देवयानीवर अमेरीकेतच कारवाई होईल व प्रचंड उत्साह दाखवत भर दिवसा शाळेच्या रस्त्यावर देवयानीच्या हातात बेड्या ठोकल्या...
या प्रकरणात देवयानीला डिप्लोमॅटीक इम्युनिटी गैरलागू आहे असा भराराचा युक्तीवाद असून ते संरक्षण फक्त कार्यालयीन कामकाजा संबंधीत दिले जाते असे त्याचे म्हणणे आहे.  हे प्रकरण कार्यालयीन कामाशी संबंधीत नसून वयक्तीक नोकराला कमी पगार दिल्याचा गुन्हा असून त्यामुळे डिप्लोमॅटीक इम्युनिटीचे संरक्षण घेता येणार नाही असा त्याचा युक्तीवाद आहे.
अशाच सेम केसवर या आधी भराराचे काय म्हणणे होते?
भरारा भाऊ आज जे देवयानीच्या विरोधात एवढा कत्तावून उठला आहे. आज त्याला अमेरीकी कायद्याचे उमाळे आले असून त्या अंतर्गत देवयानीला दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यास जी उत्सुकता तो आज दाखवत आहे ती उत्सूकता यानी अशा केसमध्ये याआधि दाखविली का हे तपासणे क्रमप्राप्त आहे...
तर या आधी अमेरीकेत अशा दोन केसेस घडल्या. प्रभू दयाल व नीना म्हलोत्रा यांच्या केसच्यावेळीही हा भरारा तिथे होता. नोकराला कमी पगार देणारे भारतीय (वरील) अधिकारी याना डिप्लोमॅटीक इम्युनिटी कायद्या अंतर्गत संरक्षण असल्यामुळे त्याना अरेस्ट करता येणार नाही असे ओरडून युक्तीवाद करताना भराराभाऊ थकता थकला नव्हता... आज मात्र नेमका उलट बोलू लागला आहे.  का बरं असं? घटना सेम... एका भारतीय अधिका-यानी वयक्तीक नोकराला अमेरीकेत कमी पगार दिला. आधि भरारा युक्तीवाद करतो की भारतीय अधिका-याना अटक करता येणार नाही कारण त्याना डिप्लोमॅटीक संरक्षण आहे. आज मात्र सेम केस बद्दल तो म्हणतो की देवयानीला डिप्लोमॅटीक संरक्षण गैरलागू असून तीला तातडीने अरेस्ट करा... नाही नाही भर रस्त्यात अरेस्ट करवलं.  याला काय म्हणायचं? मी जातीयवाद म्हणतो. कारण याच गुन्ह्यात अडकलेले आधीचे अधिकारी उच्च वर्णीय भारतीय होते तर या वेळेस हा गुन्हा करणारी आंबेडकरी अधिकारी आहे... देवयानी आंबेडकरी आहे हे कळताच पंजाबी रक्ताच्या अमेरीकन भराराची बुरसटलेली मानसिकता भरारी मारुन बाहेर पडली. देवयानीला भर रस्त्यात हातकड्या घालूनही याला शांती मिळाली नाही तर यानी तिला दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्याचा घाट घातला आहे. ती गुन्हेगार आहे व कायदा काय तो निर्णय देइलच... पण मला इथे बुरसटलेला जातीयवाद कसा साता समुद्रापार जोपासला जात आहे एवढेच सांगायचे आहे. एकाच प्रकरणात हे जातीयवादी कसे दोन प्रकारचे परस्पर विरोधी युक्तीवाद करतात एवढेच सांगायचे आहे.

राहिला प्रश्न देवयानी खोब्रागडेचा... बाईसाहेबानी कमी पगार दिला हा गुन्हाच. आता त्यावर योग्य ती कारवाई होईल व ती झालिही पाहिजे. पण फक्त आमच्या लोकाना अडकविण्यासाठी टपून बसलेले जातीयवादी आपण ठेचणे गरजेचे आहे.  आपल्या सर्व अधिका-यानी मिळून जातीयवाद्यांचेही प्रकरण उकरुन काढावे... याना धडा शिकवावा!
***
जयभीम

शनिवार, १४ डिसेंबर, २०१३

राजकरण्यांवर ’आप’बिति!


आजवरील राजकारणातील सामान्य प्रॅक्टीस ही आहे की ज्य पक्षाला सत्ता स्थापन करायचे असते त्यानी मदत घेण्यासाठी इतरांकडे गळ घालायची व या इतरानी त्यांच्या अटींची यादी सादर करायची. सत्तेत येणा-या पक्षाने या अटी मान्य केल्यास त्याना पाठींबा मिळायचा... ही होती आजवरची संस्कृती. मग यातून अपक्ष नावाचा नवा प्रकार रुजत गेला. कोण्याही ऐ-यागै-यानी व गावगुंडाने राजकारणात येण्याची जणू लाटच आली. पैशाच्या बळावर सीट जिंकायची नि बहुमतासाठी ताटकळत बसलेल्या हवशी (हौशी नाय बरं का) राजकारण्याशी सौदेबाजी करायची. मग काय खुर्चीसाठी हापापलेल्यानी या अपक्षकांना नकोतेवढं कुरवाळण, नको ते लाड पुरविणं चालू ठेवलं. त्यानी अपक्षांचा पेव फुटत गेला व पुढे पुढे याचा परिणाम असा झाला की बहुमत मिळविणे दुरापास्त झाले. मग काय गठबंधन हे समिकरणच होऊन बसले. मग त्यात मधेच पाठींबा काढून घेण्याचा अजुन एक नवा प्रकारही आला. कधिही उठून सरकार अल्पमतात आणू म्हणून ओरडणारे हल्ली गल्लो-गल्ली दिसू लागले. याचा एकुण परिणाम म्हणजे राजकारणाप्रती तरुणांमध्ये घृणा वाढत गेली... पाठींबा ही नवी संकल्पना राजकारणात अत्यंत मोलाची चीज बनली.
पाठींबा देणा-यांच्या अटींची पुर्तता म्हणजेच घोडेबाजार... जिथे कोटीच्या कोटीचे सौदे व्हायचे.

पण यावेळी चित्र उलट आहे.
बिचारे स्वत:च आपला गळ घालत आहेत की तुम्ही सत्ता घ्या आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठींबा देतो. हे जरा अतीच होतं. तरी इथवर ठीकच होतं हो... पण कळस बघा.... आप नी उलट याच समर्थकाना यादी करुन पाठविली आहे की “बघा... तुम्ही म्हणता म्हणून मी सत्तेत बसतो. पण माझ्या या अमूक तमूक अटी आहेत. त्या तुम्हाला मान्य आहेत का ते लिखीत कळवा. मगच मी सत्तेत बसतो. तुम्ही नुसतं पाठींबा देऊन चालणार नाही. तर मी सत्तेत बसावं यासाठी तुम्ही माझ्या या अटीही मान्य करा. मगच मी सत्तेत बसतो......”
जगाच्या राजकीय इतिहासात हे आजवर कुठेच घडले नसेल... जे दिल्लीत घडत आहे.  हे म्हणजे कसय ना.... न्हाव्यानी तुमच्या दारात येऊन तुमची फुकटात कटींग करायची विनंती करावी नि तुम्ही वरुन नाव्यालाच दरडवायचं की...
“ठीक आहे... पण या नंतर तू रोज आंघोळ करणार, स्वच्छ कपडे घालणार, सात्विक जेवण घेणार, शिवीगाळ नाही करणार, बायकोशी नीट वागणार, देवाची रोज पुजा करणार, पोराबाळांची काळजी घेणार, समाजाशी बांधिलकीणे वागणार, स्वत:ची दाडी रोज स्वत:च करणार, स्वत:चे केसही नीट नि वेळेवर कापून मस्तपैकी हॅंडसम बनणार, चार लोकात नावी म्हणून कदर करावी असे वर्तन अवलंबिणार....अशी प्रतिज्ञा कर. या सगळ्या अटी तुला मान्य असतील तर मी तुझ्याकडून हजामत करुन घेईन...” वगैरे अटी घालुन....
“बोल न्हाव्या.... या सगळ्या अटी मान्य असतील तरच मी तुझ्याकडून हजामत करुन घेईन...” असा प्रतिप्रश्न टाकण्याचा प्रकार चालू आहे. खरंतर हे सगळं एक स्वप्न वाटावं अस सत्य आहे.
एवढ्या अटी टाकल्यावरही न्हाव्यानी दारात उभं राहुन... “साहेब करु का तुमची कंटींग?” म्हणावं तशी गयावया करणारी दिग्गज राजकारणी पाहून मला एक गोष्ट जाणवत आहे.... लोकशाहीचा प्रभावी वापर केल्यास मस्तवाल राजकरणी कशी नांगी टाकू शकतात याचा हा एक नमूना आहे. मतदार जर सजग झाला तर राजकारणी गिळगिळायला लागतील याचं हे जिवंत उदाहरण आहे. मतदारानी आपला अधिकार बजावत दिशाहिन झालेल्या राजकारणाला शिस्त लावावी ही वेळ नक्कीच आली आहे. किंबहुना केजरीवालच्या रुपात पहिला यशस्वी प्रयोग पार पडला आहे. २०१३ मध्ये दिल्लीत जो बदल घडला तो देशात सर्वत्र घडायला अजुन काही काळ उलटेलही... पण घडणारच नाही अशा धुंधीत मात्र कोणी राहू नये. जरा वेळ लागेल एवढेच...!!!
आजवर कुठल्याच राजकरण्यांवर अशी ’आप’बिति आली नसेल!!!

बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

समलिंगी संबंध !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी समलिंगींच्या विवाहांबद्दलच्या विधानामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला असला तरी २००५ मद्धे जेंव्हा मानवेंद्र सिंग गोहील या राजपुत्राने आपल्या देशात प्रथमच आपण "गे" असल्याचे जाहीर केले तंव्हापासुन या विषयाला प्रथमच जाहीर तोंड फुटले. आता समलिंगी (सम-रती) आपल्या हक्कांसाठी आंदोलनेही करत आहेत. आंतरजालीय संस्थळांवर या विषयावर खडाजंग्या घडत आहेत. या विषयाच्या नैतीक, सांस्कृतीक, कायदेशीर, वैद्यकीय इ. पैलुंवर अथक चर्चा घडत आहेत. पुर्वी या विषयावर तोंड उघडणेही अशक्यप्राय होते. भारतात समलिंगी मंडळी आपण "तसे आहोत" हे सांगायची हिम्मत करत नव्हते. परंतु आता ते तोंड उघडु लागले आहेत, न्यायालयाचे दरवाजे आपल्या हक्कांसाठी ठोठावू लागले आहेत. जाहीरपणे मुलाखती देवु लागले आहेत...त्यामुळे संस्कृती रक्षकांचीही पंचाईत झाली आहे. भारतीय संस्कृती रसातळाला जात आहे असा त्यांचा आक्रोश आहे. समलैंगिकता ही विकृतीच असून समाजव्यवस्था यामुळे कोसलेल असा यांचा दावा असतो. त्याचवेळीस, अशा व्यक्तींची घृणा वाटली तरी त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टीकोनातुन पहावे, त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी असे म्हणनाराही मोठा वर्ग आहे.

 सामाजिक निषिद्धांत समलिंगी संबंध ठेवणे हे गंभीर पातक गणले गेले असले तरी भारतातील निषिद्ध संभोगाची परंपरा पुरातन आहे हे खुद्द धर्मशास्त्रे, पुराणकथा, महाकाव्ये, कामशास्त्रे, विविध शिल्पे (खजुराहो) व चित्रांमधुनही दिसून येते. निषिद्ध संभोगांत समलिंगी, अन्य-प्राणी संभोग, मुख वा पार्श्व-संभोग व क्लीबांशी केलेला संभोग प्रामुख्याने येतात. या सर्व प्रकारचे संबंध विपुल प्रमाणावर होते. मनुस्म्रुतीने स्त्रीने स्त्रीशी संभोग केला तर तिला चाबकाचे दहा फटके मारावेत व तिच्याकडुन दुप्पट वधुमुल्य वसुल करावे व समजा वयाने मोठ्या स्त्रीने कुमारिकेशी संबंध ठेवला तर तात्काळ तिचे केशवपन करुन तिची गाढवावरुन धिंड काढावी आणि हाताची बोटे कापुन टाकावी असे आदेश दिलेले आहेत. नारदस्मृतीही असेच निर्देश पुरुषांबाबत देते. असे नियम स्मृतीकारांना बनवावे लागले याचा अर्थ तो समाजातील एक प्रचलित भाग होता. आजपर्यंत तो अव्याहत चालु राहिला आहे, परंतु याबाबतीत गौप्य बाळगण्याच्या (लज्जेपोटी, समाजबहिष्कृततेच्या भयापोटी) प्रवृत्तीने काही जगजाहीर नाही म्हणुन याबाबत आपण फार सोवळे आहोत आणि पाश्चात्य जगच काय ते पापांच्या दलदलीत फसत चालले आहे असा भ्रम बाळगण्याचे कारण नाही.

समलिंगी संबंध फक्त मानवप्राण्यांत आहेत असे नाही. जगातील बव्हंशी प्राणी-पक्षी व जलचर जगतातही द्वै-लिंगी संबंध (समलिंगी व विभिन्नलिंगी) ठेवले जातात. यात बदके, कबुतरे, पेंग्वीन, डाल्फिन, सिंह, हत्ती, रानरेडे, जिराफ सरडे, घोरपडी इ. सर्वच आले. अर्थात त्यामागील कार्यकारण भाव आणि मानवी कारणभाव यात फरक आहे हे नक्कीच. पण पशुजगतही या प्रकारच्या संबंधांपासुन मुक्त नाही. किंबहुना नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होणारी गरज आहे.

ही विकृती आहे काय?

निसर्गत: प्रत्येक पुरुषात थोडा स्त्रीचा तर प्रत्येक स्त्रीत थोडा पुरुषाचा अंश असतोच परंतु भोजनात मीठ असते तेवढ्याच प्रमाणात. त्यामुळेच मैत्री, स्नेह या सामाजिक भावना निर्माण होतात. परंतु या बाबतचे संतुलन ढळले कि समलिंगी संबंधांकडे वाटचाल होवू लागते. ही प्रवृत्ती (मी याला विकृती म्हणणार नाही) जन्मजात असते असा दावा अनेकदा केला जातो, पण ते सर्वस्वी खरे नाही. सम-रती बनण्यात अनेकदा कौटुंबिक, सामाजिक पर्यावरणामुळेही मानसिक बदल घडवण्यात हातभार लागतो व निसर्गत: तशी नसलेली व्यक्तीही समलिंगी बनु शकते. त्यासाठी आपण खालील काही कारणांवर चर्चा करुयात.

 १. ज्या पालकांना मुलगाच हवा असतो पण मुलगीच झाली तर असे पालक अनेकदा मुलीला मुलासारखे कपडे घालणे, तशीच केशरचना करणे ई. उपद्व्याप करत असतात. मुलगा झाला, पण मुलगी हवी होती असे झाले तर त्याच्यावर मुलीचे संस्कार केले जातात. यातुन जी मानसिकता बालवयापासुनच निर्माण होत जाते ती विभिन्नलिंगियांबाबत आकर्षण वाटण्याऐवजी समलिंगियांबाबत आकर्षण निर्माण करते.

पालकांचे याबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. मुलाला मुलासारखेच व मुलीला मुलीसारखेच वाढु दिले पाहिजे. आता "नैसर्गिक" कलच जन्मता: वेगळा असला तर त्याचाही स्वीकार मोकळेपणाने केला पाहिजे. परंतु स्वत:च्या कर्माने समलिंगी निर्माण करण्यास हातभार लावणे हाच मुळात एक सामाजिक अपराध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

२. कळत्या वयात विभिन्न-लिंगिय व्यक्तीची अनुपलब्धता. मुले व मुली लग्नाच्या वयाच्या आधीच वयात आलेले असतात. सामाजिक दबाव, योनीशुचितेचा आजही असलेला प्रचंड प्रभाव, आपल्याकडील विचित्र कायदे यामुळे विभिन्न लिंगियांचाच बाबतीत आकर्षण असले तरी ते जेंव्हा अप्राप्य होते व शरीर वासना जिंकतात तेंव्हा वासनाशमनासाठी समलिंगियच एकमेकांना मदत करू लागतात. असे घडण्याचे प्रमाण खेड्यांत तर कल्पना करता येणार नाही एवढे प्रचंड आहे. यातील अनेकजण पुढे लग्न झाल्यावर हा नाद सोडुन देतात, काही बाय-सेक्श्युअल बनतात तर अत्यल्प मंडळी कायमस्वरुपी समलिंगी बनतात, कारण त्यातच आनंद मिळत असतो. ही विभक्ती किती काळ संबंध राहिले यावर अवलंबुन असते. अनेक मुली वा मुले केवळ ज्येष्ठांच्या बलात्काराने समलिंगी बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. होस्टेल्समद्धे राहणा-यांनी कधीतरी हा अनुभव (आवडो अथवा न आवडो) घेतलेलाच असतो, व तेथुनही समलिंगी निर्मितीचे लघुउद्योग चालु असतात..

कामशास्त्र ज्या देशात सर्वप्रथम लिहिले गेले त्या देशात सेक्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजुनही विकृत आहे. मानवी कामवासना या मुळात नैसर्गिक आहेत. त्याचे शमन करण्याची सोय असायलाच हवी. वेश्या (अगदी पुरुषवेश्यांचीही) नीट आरोग्यदायी सोय असायला हवी, अथवा समाजातच तरुण तरुणींना पुरेशी मोकळीक द्यायला हवी. सातच्या आत घरात हा फंडा कालबाह्य झालेला आहे. पुर्वी गणिकांना समाजात जो सन्मान होता तो या मोकळ्या मनोवृत्तीमुळेच. तसेच वसंतोत्सवादि उत्सव खास तरुण-तरुणींकरताच राखुन ठेवलेले असत. त्यंत तरुण-तरुणींना मुक्त मोकळीक असे. पण हे उत्सव संस्कृती रक्षकांनी कधेच बंद पाडुन ताकले आहे. वेश्यांचे म्हणावे तर बव्हंशी एड्सचे-गुप्तरोगांचे आगर आहेत. त्यांना समाजात कसलाही दर्जा नाही. सर्वांना तेथे जायची हौस असतेच, पण कबुल करायची शरम वाटते...मग असे दुस-यांना सहजी शंका येणार नाही असे "कुतुहल" व वासना शमवण्याचे मार्ग शोधले जातात हेही लक्षात घेतले पाहिजे.

.३. दीर्घ पल्ल्याच्या शिक्षा भोगणारे कैदी बाय डिफाल्ट समलिंगी बनतात. त्यांच्या मादीची भुमिका करणा-याची स्त्रीसारखीच काळ्जी घेतात, अगदी लुगडी चोळीही हौसेने घालायला लावतात. येरवडा जेलमद्धे अचानक झडतीसत्र आले तेंव्हा दोनशेपेक्षाही अधिक साड्या मिळाल्या होत्या. महिला तुरुंगही यात मागे नाहीत. हीच मंडळी जेंव्हा मुक्त होवून बाहेर येते तेंव्हा अर्थातच ते पुर्णपणे समलिंगी बनलेले असतात.

 

अशा दीर्घमुदतीच्या सजा झालेल्या कैद्यांना कुटुंबियांना भेटता यावे यासाठी प्यरोलची तरतुद आहे. पण ती वर्ष दोन-वर्षांतुन मोठ्या मिन्नतवारीने मिळते. धनदांडगे कैदी इस्पितळात दाखल व्हायची सोय करुन आपली सोय करुन घेतात...त्यांचे ठीक आहे, पण मग अन्य कैद्यांची नैसर्गिक गरज मारण्याचा कोणता मानवी अधिकार आपल्या सुसंस्कृत समाजाला व कायद्याला आहे? पण तसे होते व समलिंगी आपसुक तयार होतात...कारण मनुष्य वासनाशमनाचा काहीतरी तोडगा काढतोच! मग ती सवय बनते. त्यापेक्षा नैसर्गिक मार्गानेच त्यांचे वासनाशमन होईल अशी व्यवस्था करता आली तर? मग ज्या संबंधांना आपण समाज-कुटुंबसंस्थेचे मारेकरी समजतो तसे संबंधच निर्माण होणार नाहीत.

४. शेळी, म्हैस व गायीशीही वासना न आवरता आल्याने संभोग करणारेही खुप महाभाग आहेत. खेड्यात याचे प्रमाण अर्थातच जास्त आहे व यात बहुतेक गुराखीच अधिक असतात. वर आधीच सांगितल्याप्रमाणे हा अनैसर्गिक संभोग असला तरी त्याचे कारण विकृती हे नसुन मादीची अनुपलब्धता आहे. स्त्रीयांना अश्वमेध प्रसंगी यद्न्यिय अश्वाशी संभोग करावा लागे, यावरुन स्त्रीयांतही ही अनैसर्गिक उर्मी येत असेल, शास्त्रकर्त्यांना ते माहित असल्याने अशी अनुमती असेलही...परंतु विद्यमान जगात तिचे शमन कसे होते हे मला माहित नाही.

थोडक्यात, निसर्गत: जेनेटिक समस्येने, हार्मोनिक असमतोलामुळे जी समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते अशा व्यक्तींना दोष देणे आपला मुर्खपणा आहे. त्यांनाही सन्मानाने जगायचा, आपले हक्क अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे व तो नाकारणे अमानवी आहे. अश रितीने निर्मान होणारे सम-रती हे तुलनेने अत्यल्प असतात. परंतु जे ६०-७०% समलिंगी निर्माण होतात ते आपल्याच सामाजिक विकृतींमुळे, आपल्या कर्मामुळे हेही लक्षात घ्यायला हवे. धर्म-संस्कृती या संकल्पना किती ताणायच्या हे आता आपल्याला ठरवावे लागणार आहे. कामवासना अत्यंत नैसर्गिक असून तिचे दमन विशिष्ट मर्यादेपार अशक्य असते व तिचा स्फोट हा असे संबंध निर्माण होण्यात होतो. अनेकजण मग बलात्कारही करतात. त्यामुळे याकडे अत्यंत मोकळ्या दृष्टीने पाहण्याची व तसे प्रबोधन करण्याची गरज आहे. निकोप कामजीवनाची सोय ज्या समाजात आहे त्या समाजात असे घडणार नाही अशी आशा आपण करु शकतो.

यावर प्रश्न असा उद्भवेल कि अमेरिकेत एवढे मुक्त लैंगिक स्वातंत्र्य असुनही तिकडे अशांचे प्रमाण जास्त का? पण हा प्रश्न निरर्थक असाच आहे, कारण ते मुक्तपणे बोलतात, हक्कांसाठी लढतात म्हणुन ती संख्या मोठी वाटते. आपल्याकडे असे प्रमान अत्यंत नगण्य असे आहे, वास्तव हे आहे किमान दहा कोटी लोकांनी पौगंड ते युवावस्थेतील काळात हे अनुभव घेतलेले असतात...त्यातील कोटभर स्त्री-पुरुष आज किमान समलिंगी आहेत. लोकलाजेस्तव हे संबंध गुप्तच ठेवण्याची खबरदारी ते घेत असतात. पण ही संख्या काळजी करावी एवढी मोठी आहे, हे नक्कीच! त्यामुळे संस्कृती रक्षकांनाच प्रथम डोळे उघडुन या वास्तवाकडे गांभिर्याने पहात जरा समाजाला मोकळा श्वास घेवू दिला पाहिजे.

 -साभार:- संजय सोनवणी

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

आता येणार हुकुमी एक्का...!

नुकत्याच झालेल्या निवडणूका व कॉंग्रेसचा पराजय यावर सध्या सर्वत्र चर्चा झडत असून २०१४ मध्ये काय होणार याचा हा ट्रेलर होता वगैरे बाता चालू आहेत. कॉंग्रेस नेतृत्वानेही जनतेचा कौल स्विकारत आत्मचिंतनाची वाट धरली आहे. त्याच बरोबर राहुल गांधीच्या नेतृत्वावर अनेकानी तोंडसुख घेतले असून कित्येकांच्या सुप्त भावनाना या निमित्याने वाट मोकळी करता आली... खास करुन पक्षातल्या राहूल विरोधकाना...!!!
या पराजयामागे मुख्यत्वे दोन प्रकारच्या चर्चा होताना दिसत आहेत. एक म्हणजे हा मोदीचा विजय असून मोदी फॅक्टर प्रचंड प्रभावी ठरला वगैरे माननारी अर्ध्या हळकुंडाची काही मोदीछाप लोकं अतिरंजीत गप्पा हाणताना दिसत आहेत. अन दुसरा मतप्रवाह मात्र हा कॉंग्रेसच्या बेफिकीरीमुळे जनतेने व्यक्त केलेला रोस आहे असे प्रांजळपणे मान्य करतो.  दोन्ही मतप्रवाहाची चाचपणी केल्यास मोदी प्रभाव हा बनावटी व लबाड प्रचार असून कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे हा विरोधात जाणार कौल मिळाला हेच सिद्ध होते.
याचा अर्थ काय?
लोकाना मोदी हवा हा प्रश्नच निकाली निघतो. कारण लोकाना मोदीमध्ये पोटेन्शीअल वगैरे असे काही दिसत नसून कॉंग्रेसनी आपली जबाबदारी बजावताना उदासीनता बाळगली एवढाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे लोकाना मोदी हवा आहे असे अजिबात होत नाही... तर उलट कॉंग्रेसनी यातून धडा घेत उदासीनता झटकुन टाकत अधीक जबाबदारीने काम करावे हा संकेत मतदारानी दिला आहे. तो कॉंग्रेसलाही कळाला असून आता तशी पावलं उचलल्या जातीलच. मायबाप मतदारानी दिलेला ईशारा जरा कडक होता हे मान्यच... पण याचा अर्थ अजिबात असा होत नाही की त्याना मोदी हवा आहे. उलट दिल्लीतील भाजपाला मिळालेल्या मतदानात मागच्या पेक्षा या वेळी एक टक्क्याने घट झाली आहे. मोदीनी जिथे जंगी सभा घेतल्या तिथे मतदारानी मोदीला साफ नाकारले असून मतदानातून ते दाखवून दिले आहे. याचाच अर्थ मोदीच्या नावानी उठविलेले वादळ ही माध्यमांची करामत असून सामान्यांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. आपला मतदार सुज्ञ आहे...!
आता दुसरा प्रश्न असा की राहुलबाबाच्या नेतृत्वाचे काय?
मुळात ही हार नेतृत्वाची नसून कर्तूत्वाच्या अभावामुळे झाली हे जाहीर आहे. राहूल बाबाला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे राहुलच्या नेतृत्वावर व त्याच्या संगठण कौशल्यावर प्रश्नच उठत नाही. काही मोदीछाप लोकं अनेक शेरेबाजी करत असतात पण त्याला उपाय नाही. ते विरोधकांचे कामच आहे. त्यानी भाजपाची दिल्लीतील घटलेली लोकप्रियता व मतदान कसे वाढवता येईल यावर लक्षा दिल्यास जास्त बरे. न दिल्यास आहे तेही हातचे जाईल एवढे मात्र नक्की...
सेमिफायनल नावाचा हा कल्ला उठविताना सामान्य माणुस गोंधळून जाईल अशी खेळी मिडीयानेही खेळून घेतली. यात मोदीवर स्तूतीसुमनांचा वर्षाव करताना राहुलच्या नेतृत्वावर हमखास हल्ला चढविला गेला. मोदीचा विकास नि प्रगल्भता वगैरे वल्गना करताना राहुलवर हमखास अपरिपक्वतेचा ठसा मारायला कोणीच विसरले नाहीत. राहुल गांधीचे नेतृत्व कसे कुचकामी वगैरे सांगत आता कॉंग्रेस संपणारच इथपर्यंत चकाट्या पिटून झाल्य़ा. कॉंग्रेसकडे राहूल ब्रिगेड म्हणून जी तरुणांची एक नवी फडी उभी आहे ती अत्यंत कार्यक्षम असून येत्या काळात एक नवा झंझावात उभा होणार या भितीपोटी भाजप नि विरोधक माईंडगेम खेळत आहेत हे त्याचे खरे कारण आहे. सेमिफायन जर कुणाला  फायद्याचं ठरलं असेल तर ते कॉंग्रेसलाच. कारण यातून चौदाची आखणी काय व कशी असावी याची नेमकी दिशा अधोरेखीत झाली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी ती आखणी करतीलच. पण मला मात्र राहुल ब्रिगेडमध्ये एका नवा चेहरा येताना दिसतोय, तो म्हणजे प्रियंका गांधीचा. २०१४ मध्ये जे काही बदल होतील त्यातला एक बदल म्हणजे प्रियंकाचे आगमन हे असावे. सध्याची परिस्थीती पाहाता प्रियंकाच्या आगमनाने प्रचंड उलथापालथ होईल. तिकडे मोदीच्या सभा (ज्या नुसत्याच गाजतात) जशा प्रचंड ओसंडून वाहतात त्या तोडीच्या सभा उभ्या करायच्या असल्यास प्रियंका आलीच पाहिजे. कॉंग्रेसनी एवढी हुशारी नक्कीच दाखवावी... किंबहुना तसा निर्णय झालाही असेल. नव्या पिढीची, नव्या दमाची राहुल ब्रिगेड सज्ज आहेच... पण जोडील प्रियंका उतरल्यास २०१४ चे रण खरे रंगणार...!!!
कॉंग्रेस पक्ष त्यांचा आजवर न वापरला हुकूमी एक्का ’प्रियंका’ला आता बाहेर काढणार  का? ते लवकरच  कळेल.

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

प्रकाशन सोहळ्याचे निमंञन

सर्वाना अगत्याचे निमंञन!
ब्लोल पोस्ट म्हणून केलेले लिखाण पुस्तक रुपात प्रकाशित होताना पाहण्याचा आनंदच निराळा. 'गोटूल' नावांनी एक लेखमालिका ब्लोगवर लिहिली होती. नेटवरील वाचकांनी खूप प्रशंसा केली. ते सर्व  लिखाण आता पुस्तक रूपातून प्रकाशित होत आहे. २४ नोव्हेंबर २०१३ ला प्रकाशन सोहळा आहे. ब्लोगचे वाचक व इतर सर्व मित्रांना अगत्याचे निमंत्रण. कार्यक्रमाला नक्की या!

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

HOPE - अमोल साईनवारही गोष्ट आहे राजुराच्या एका शाळेतील. सन १९९६ चा उन्हाळा सुरु झाला. नुकतीच बाराविची परिक्षा संपल्यामुळे सगळ्याना सुट्ट्यांचे डोहाळे लागले. प्रत्येक जण सुट्ट्या घालवायला निघाला. तेंव्हा सुट्ट्यां घालविण्याचा प्रकार हा आज इतका बोकाळलेला नसला तरी शेवट्टी सुट्टी ती सुट्टी... सुट्टीचं आकर्षण नाही असा विध्यार्थी नाही.  ज्याची जशी कुवत त्याची तशी सुट्टी... पण सुट्टी मात्र ठरलेली. वर्षभर बारावीचा अभ्यास केल्यामुळे घरातही केवढं कौतूक... त्यातल्या त्यात मामाच्या गावाला जाणा-याचा भरणा अधिकच. गावातली पोरं आपापल्या बॅगा भरुन सुट्ट्यावर निघालीत. बस्टॅंडवर पोरांची व पालकांची गर्दी दिसू लागली. रोज कोणी ना कोणी सुट्टीवर जाताना दिसू लागला. हा हा म्हणता गावातली सगळीच पोरं सुट्टीवर गेली. पण एक पोरगं मात्र अगदी या सगळ्याच्या विसंगत वागत होता. तो सुट्टीवर जाणार नव्हता. तर तो कामाच्या शोधात होता. अगदी बाल वयातच ज्यानी कमवा आणि शिका हा सिद्धांत स्विकारला हा तो विध्यार्थी होता. हाच तो ज्यानी पुढे राजुरा भागात गरीब पण हुशार विध्यार्थ्यांसाठी HOPE निर्माण केली.
तर...
ही सगळी पोरं जेंव्हा सुट्टीवर जाण्यासाठी बॅगा भरत होती तेंव्हा हा मुलगा मात्र रस्तो रस्ती नोकरी शोधत हिंडत होता. त्या काळात गल्लो गल्ली टेलिफोन बूथ असायचे. सगळ्यात सोपी नोकरी या अशा बुथमध्ये मिळायची. त्याच्या पाठोपाठ कपड्याच्या दुकानात नोक-या मिळायच्या... शिकणारी पण गरीब घरातली पोरं उन्हाळ्यात ही असली काम करुन दोन पैसे साठवायची. जेंव्हा त्यांचे इतर मित्र सुट्ट्यांचा उपभोग घेत असत, आजचा क्षण तेवढा जगत असत तेंव्हा त्याच वयाची गरीब पोरं मात्र भविष्याची तजविज करण्यात गर्क असत. एकाच वयातील ही वैचारीक विसंगती अवाक करणारी आहे. ती कोणाच्या लेखणीतून त्यावढ्या प्रभाविपण उतरत नाही ही गोष्ट मात्र दुर्दैव! तर सुट्ट्यांमध्ये गरीबांची पोरं अशी राब-राब राबायची. अन एकदा जून उजाडला की याच साठवलेल्या पैशातून शाळेची खरेदी करत विद्यार्जनासाठी शाळेत दाखल व्हायची.  
...तर आज हा मुलगा अशाच कामाच्या शोधात होता. समान वयातील दोन वैचारीक टोकांचा हा एक टोक होता. तो परिस्थीतीने घडवून आणलेला नि विवेकाची देण असलेला टोक होता.
हा हा म्हणता राजूराभर हिंडुन झालं अन कामही मिळालं.
कुठे मिळालं?
न्यू केरला टायर, राजुरा येथे काम मिळालं.
काम काय होतं?
टायर बदलविणारा ऑपरेटर!
कुठल्याही कामाकडॆ पाहण्याचे दोन दृष्टिकोन असू शकतात. एक म्हणजे कामाला साध्य मानणारं व दुसरं म्हणजे कामाला साधन मानणारं. कामाला साध्य मानणा-यांचं काम बोंबलतं. पण जे कामाला साधन मानतात त्यांच्या नजरेत त्यांचं ध्येय साठलेलं असतं. हा असाच एक झपाटलेला ध्येयवेडा होता. त्यानी अत्यंत आनंदाने ही नोकरी धरली. सोबतची मुलं जेंव्हा सुट्ट्या घालवत होती तेंव्हा हा मुलगा मात्र टायरच्या राबत होता. करणार तरी काय? वयाच्या आठव्या वर्षी वडील वारले. घरची परिस्थीती बेताचीच. शिक्षण शिकून मोठं व्हायचं याची मनोमनी शपथ घेतलेली. काही झाले तरी परिस्थीतीवर मात करायची अशी प्रतिज्ञाच जणू ती... समज येण्याचं खरतर वय नसतच. परिस्थीतीची जाणीव झाली व त्या परिस्थीतीशी झगडा करायची तय्यारी केली की समज आपोआप आकार घेत जातो. त्यासाठी मग वयाची गरज अजिबात नसते. हीच माणसे पुढे ध्येयनिष्ठ व यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात नावलौकिकास येतात. पण अगदी याच्या उलटाही होतं. तुम्हाला परिस्थीतीची जाणीव झाली पण लढाऊपणा नसला की तुम्ही लढण्या आधीच हरता. लढाऊपणाच्या अभावातून तुम्ही परिस्थीतीशी झगडा मांडायचा विचार सोडला... तर मात्र तुमचं अस्तीत्व काळाच्या वादळात गाडल्या जातं. हाच गट पुढे समाजात उदासीन व नाकर्ता म्हणून ओळखला जातो. फक्त एका गोष्टीच्या अभावातून दोन परस्पर विसंगत समाजाची निर्मीती होते... ती म्हणजे लढाऊपणा! अत्यंत महत्वाचा गुण...!
मी ज्या मुलाची गोष्ट सांगतो आहे तो लढाऊ होता. काही झाले तरी परिस्थीतीवर मात करायचीच हे ठरवून टाकलेला. स्वभावने अत्यंत मृदू पण निश्चयाने मात्र कणखर. जोडीला कठोर परिश्रम हा निसर्गदत्त गुण लाभलेला. वयाच्या आठव्या वर्षी लर्न एन्ड अर्न तत्वावर शिक्षण सुरु केले. वडील वारले म्हणून रडत बसला नाही... वा शिक्षण सोडले नाही. पडेल ते काम करत शिक्षण सुरु ठेवले. हा हा म्हणता आज १२वी ची परिक्षा देऊन टायरच्या दुकानात दाखल झाला होता. अन पगार होता रु. १५००/- प्रतिमाह. मन लावून काम करणे सुरु झाले. सुरुवातीचे काही दिवस हे काम अत्यंत कष्टाचे वाटले. पण नंतर त्याची सवय झाली. हा हा म्हणता दोन-अडीच महिने उलटले. अन एक दिवस तिकडे १२वी चा निकाल लागला. कामावरुन सुट्टी घेतली व धावत धावत जाऊन निकाल बघितला. ७८% गुण मिळाले होते. मार्कशीटला छातीशी कवटाळून काही मिनीट शांत डोळे मिटून घेतले. हा अत्यंत आनंदाचा क्षण होता. कारण तो महाविद्यालयातून प्रथम आला होता... एवढच नव्हे तर तालूक्यातूनही प्रथम क्रमांक पटकाविला होता.  संपुर्ण राजु-यात त्याचं कौतूक सुरु झालं. सर्वत्र एकच नावाची चर्चा सुरु झाली... ते नाव होतं अमोल साईनवार.  पडेल ते काम करुन शिकणारा हा अमोल साईनवार आज राजू-याच्या प्रत्येक शाळेत चर्चेचा विषय होता. हा क्षण त्याच्यासाठी अभूतपुर्व होता. अत्यंत खडतर प्रवास व विपरीत परिस्थीतीवर मात करुन मिळविलेले हे गूण दैवी अनुभूतिंच्या पलिकडील आनंद देत होते.  आईच्या पायावर मार्कशीट ठेवून आशिर्वाद घेताना चमकलेले तीचे डोळे हा तर त्याही पलिकडची अनुभूती देणार क्षण... एकाच दिवसात किती किती आनंदाचे क्षण. वडील गेल्या पासून आजवर तिचे डोळे कधी एवढे चमकलेले पाहिले नव्हते. आपल्या या यशातून आई एवढी सुखावली याचा झालेला अभिमानही काही औरच होता...
पण...
दोन दिवसात या आनंदावर विरजण घालणा-या घडामोडी सुरु झाल्या. बारावीचा निकाल आल्यावर सुरु झाली ती म्हणजे उच्च शिक्षणाच्या प्रवेशाची घाई.  ज्याला अमोलपेक्षा कमी गुण होते अशी पोरं इंजिनिअरीग व मेडीकलसाठी अर्ज भरू लागली. हा मात्र कुठे अर्ज भरावा या संभ्रमावस्थेतच. नंबर लागणार की नाही याची भीती नव्हती, तर प्रवेश मिळवून शिकणार कसं? हा यक्षप्रश्न होता. टायरच्या दुकानात काम करुन तीन हजार रुपये साठविले होते.  एक मित्र राजू-यावरुन चंद्रपूरला निघाला होता. त्याच्या हातात १२०० ठेवले व प्रोस्पेक्टस आणायला सांगितलं.  मेडीकल, इंजिनिअरींग व डी.एड. अशी तिन्ही ठिकाणी अर्ज भरला.
 डी. एड.ची यादी लागली तेंव्हा सर्वात प्रथम याचंच नावं होतं.  त्याच बरोबर इंजिनिअरींगचीही यादी लागली. सीईसी, चंद्रपूरमध्ये ३०% कोट्यातून नंबर लागला होता.
इंजिनिअरींगसाठी  रु. ५३५०/- एवढी फी भरावी लागणार होती तर डी. एड. साठी रु. १०००/-. अन बचत केलेली एकुण रक्कम होती १२००/- म्हणजे इंजिनिअरींग काही जमणार नव्हतं. म्हणजे उरला तो डी. एड.
तसं हा पठ्ठा स्वभावाने शिक्षकच. वरील सगळी कामं सांगताना अजुन एक काम सांगायचं राहून गेलं. १२वी चा निकाल लागला तेंव्हा याच्याकडॆ वेगवेगळ्या शिकवण्या मधून शिकविण्याचा एकुण ५ वर्षाचा अनुभव होता.  त्यामुळे तसं हे क्षेत्र आवडीचच... मग काय याने कुठल्यातरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  शिक्षक म्हणून जायचं ठरवून टाकलं.
अन तिकडे कॉलेजात शिक्षकांच्या कानावर ही बातमी गेली.  प्रा. पोतनुरवार व प्रा. धवस अमोलच्या घरी धावले. हा पट्ठा मस्तपैकी शिक्षकी पेशाचे स्वप्न रंगवत बसला होता. कारण डी. एड. ला तर नंबर लागलाच होता. आता फक्त फीज भरून दोन वर्षात पदवी मिळविली की झालं या विचारात होता.  दारावर थाप पडली. यानी दार उघडून पाहिले तर दारात शिक्षक उभे. गुरुजनांचा स्वागत केलं.
“अमोल, हे काय ऐकतोय आम्ही?” सरानी विचारलं "म्हणे तु डी. एड. ला प्रवेश घेणारेस?"
“हो सर मी डी. एड. करण्याचं ठरवलं आहे” अमोलचे शब्द ऐकुन शिक्षक उडालेच. एक अत्यंत हुशार, विनम्र व कष्टाळू विध्यार्थी जो अमर्याद बुद्धीमत्तेचा धनी होता तो प्रायमरी शिक्षकाच्या वाटॆवर निघाला हे त्याना अजिबात आवडलेलं नव्हतं. हा गरीब होता हे त्याना माहीत होतं पण पडेल ते काम करणारा असल्यामुळे त्याची ही बाजू तेवढी महत्वाची आहे हे आजवर तरी जाणवलं नव्हतं. वा यानी तसं जाणवू दिलं नव्हतं. पण आज मात्र ती बाजू  शिक्षणाच्या एकुण ग्राफवर ठसठशीत उमटली होती.  त्यामुळे थोडावेळ शिक्षकही गोंधळले. पण लगेच स्वत:ला सावरत त्यानी अमोलची समजूत घालायला सुरुवात केली. डी.एड. निवडण्याची एकुण भुमिका समजावून घेतल्या नंतर शिक्षकांच्या लक्षात आलं की फक्त पैशाच्या अभावामुळे एक प्रतिभावंत विध्यार्थ्याची धुळधाण होणार होती. “नाही अमोल... आम्ही असं नाही होऊ देणार. काही तरी मार्ग नक्की निघेल. चल तू आमच्या सोबत” अन ते दोघे अमोलला घेऊन कॉलेजच्या प्रिन्सिपॉलकडॆ निघाले. प्रिन्सिपॉलनी संपुर्ण माहिती ऐकून घेतल्यावर एकच प्रश्न विचारला...
“अमोल, इंजिनिअरींगसाठी तुला किती पैसे लागणार आहेत?” त्यांच्या स्वरात ठामपणा होता. ती निव्वड केलेली चौकशी नव्हती तर आकडा ऐकुन जमेल तेवढी वा कुवती प्रमाणे मदत देण्याची जणू हमी होती. “ सर ४०००/- रुपयाची गरज आहे” अमोलच्या तोंडचं वाक्य संपायच्या आता प्रिन्सिपॉल म्हणाले “२०००/- मी दिले”  प्रिन्सिपालनी त्यांच्या परीने काय शक्य आहे ते सांगून टाकल्यावर ही टीम सामाजीक कार्यकर्ते श्री. चिल्लावर व शशिकांत यांच्याकडे थडकली. उरलेल्या दोन हजाराची सोय ईथून झाली. अन अमोलचं इंजिनिअरीगच शिक्षण सुरु झालं.
चंद्रपुरला राहून शिकताना फीजचा प्रश्न मिटला होता, पण पैशाची चणचण भासत असे. मग पहिलं वर्ष तेवढं अडचणीत काढलं. दुस-या वर्षापासून याच्या शिकवण्या सुरु....
हा हा म्हणता चार वर्ष कशी गेली कुणाला कळलच नाही. शेवटच्या वर्षाला विद्यापिठातून क्रमांक पटकावला. त्या नंतर सुरु झाली नोकरी. सीपला सारख्या नावाजलेल्या कंपनीत दाखल झाला. अनेक महत्वाच्या प्रोजेक्ट्स्वर काम केल्यावर कंपनीने विदेशात संधी दिली. काही वर्षे विदेशात वास्तव्य करुन अमोल मुंबईत परतला...आता त्याची नोकरी व्यवस्थीत सुरु आहे.
तर हा झाला त्याच्या आयुष्याचा सारांश...पण समाजाचं देण लागतो ही भावना त्याला स्वस्थ बसू देईना. आपल्या आयुष्याची घडी नीट बसली हे पक्क झाल्यावर Pay Back to Society ही अवस्था सुरु झाली...
.
.
अत्यंत बिकट परिस्थीतून पुढे येताना कित्तेकानी हातभार लावला अन आज अमोल एक  यशस्वी इंजिनिअर आहे. स्वत: हालाखीच्या परिस्थीतून गेल्यामुळे त्याला गरीबीचे चटके तर माहीत आहेतच, पण त्याच बरोबर फक्त पैशाच्या अभावामुळे कशी एखाद्या हुशार विध्यार्थ्याची राख रांगोळी होऊ शकते याचा निसटता अनुभव त्यालाही आलाच.  यातूनच त्यानी एक निश्चय केला की आपल्या आसपासच्या लोकामंधील कोणताही गुणी विध्यार्थी फक्त पैशाच्या अभावामुळे मागे राहू नये. आपण अशा हुशार पण गरीब विध्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवायची. त्यांचं आयुष्य उभं करायचं व समाजाला व देशाला पछाडणा-या अविध्येचा प्रश्न जमेल त्या मार्गानी निकाली काढायचं. नव्या पिढीतील हुशार विध्यार्थ्यांना घडविण्याच्या कार्यात  जमेल तेवढं योगदान द्यायचं हा निश्चच केला. अन यातूनच जन्म झाला होपचा.  HOPE (Help Our People for Education). होप ही अमोल साईनवारनी २००७ मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. ही संस्था हुशार पण गरीब विध्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविते. आजवर अनेक विध्यार्थी या संस्थेतून मदत घेऊन पुढे गेले. अमोलनी एकट्यानी स्थापन केलेल्या या संघटनेत अनेक लोकं जुळत गेली. विदर्भातील अनेक वृत्तपत्रानी याची दखल घेत अमोलच्या कार्याची स्तूती केली...

होप बद्दल पुढच्या भागात लिहतो...!

***