गुरुवार, २१ मार्च, २०१३

IPL साठी रिचवताहेत टॅंकर्सचे टॅंकर्स

आसाराम बापूच्या नावानी नुकताच मिडीयानी सिमगा साजरा केला व राजकारण्यानी सुद्धा त्याला कोरस दिला. आर.पी.आय. ची पोरं आसारामवर धावली खरी पण रक्तबंबाळ होऊन परतली. आसारामनी नागपुरात काय दहा बारा टॅंकर पिचकारीत भरुन उडवले रे उडवले ईकडे बोंबा सुरु झाल्या. म्हणे काय तर उभा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना बाप्याला लाज कशी नाही वाटली पिचकारी मारायला. मिडीयानी हे प्रकरण मस्तपैकी तिखट मिठ घालून रंगविले. पिचकारीची बातमी अशी काही सोडली की सगळ्याना वाटू लागलं “खरचं की आसाराम केवढा मुर्ख आहे” पण या सगळ्या घटनेत महत्वाची भुमिका बजावणारा मिडीया आपल्याला शेंडी लावत होता हे कोणाच्याही लक्षात आले नाही. सध्या आपण मिडीया-अडीक्ट झालेलो आहोत. मिडीया म्हणेल तेच खर वाटतं. अन नेमकं हे हेरलेला मिडीया याचा गैरफायदा उचलत पैसे कमवायच्या मागे लागला आहे. मिडीयाला जाहिरातदारांकडनं पैसे मिळतात हे सगळ्यानाच माहित आहे. आधी हा मिडीयाचा धंधा नव्हता पण वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी मिडीयाचा मुख्य धंधा जाहिरातीतुन पैसे कमावणे बनत चालला आहे. म्ह्णून त्यांच्या बद्दल मिडीया चकार शब्द उच्चारत नाही अन जिथून पैसे मिळत नाही त्यांच्यावर घणाघाती वार घालत "बघा आम्ही कशी बातमी देतो" वगैरे आव आणते. नुकतच घडलेलं आसाराम प्रकरण जरी बातमी वाटली तरी तो आव होता, बातमी अजिबात नव्हती. बातम्या तर दाबाच्या असतात. सगळं पैशाचं गणित असतं.

पुढच्या महिन्यापासून आय.पी.एल. चे सामने सुरु होणार आहेत. त्यासाठी याच दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात मुख्य़ तीन ठिकाणी सामने होणार आहेत. मुंबई, पुणे व नागपूर. आता क्रिकेटचे सामने होणार म्हटल्यावर स्टेडीयमची तैय्यारी व त्यातल्या गवताची योग्य वाढ करणे हे ओघाने आलेच. म्हणजे सामने सुरु होण्याच्या महिना दिड महिन्या आधीपासून गवताला पाणी घालणे त्याला वाढविणे व त्याची छटाई करुन खेळण्यास योग्य बनविणे ही प्रक्रिया करणे अनिवार्य असते नि ती प्रक्रिया सर्वत्र सुरुही झाली आहे. मग या स्टेडीयमवरील गवताच्या वाढीसाठी रोज किमान दोन तरी टॅंकर लागत असतीलच ना?  ते कुठून येत आहेत? नुसतं मनोरंजनासाठी भरविल्या जाणा-या सामण्यासाठी लाखो लिटर पाणि ओतणे म्हणजे दुष्काळग्रस्तांवर अन्याय नाही का? आसारामच्या दहा बारा टॅंकरवरुन एवढा बाऊ करणा-या मिडीयाला या आय.पी.एल. च्या निमित्ताने ओतल्या जाणारे शेकडो टॅंकर्स कसे काय बुवा दिसत नाहियेत? मुंबईल आसारामच्या मागं काव काव करत धावणारा मिडीया आय.पी.एल. च्या सामन्यात मधे घुसून असाच पाण्याचा मुद्दा उचलून धरणार का?
अजिबात नाही.....

का बर?
...कारण आय.पी.एल. वाले प्रत्येक पेपरात जाहिरात देतात. त्यातून पेपर वाल्याना लाखोचं उत्पन्न होतं. तसचं टी.व्ही. वाल्यानाही आय.पी.एल. च्या जाहिरातीपोटी कोटीच्या कोटी रुपये मिळतात. म्हणजे आय.पी.एल. चे सामने खेळविणारे व त्या दरम्यान जाहिरात देणारे यातून मिडीयाला प्रचंड मोठे उत्पन्न मिळते. आय.पी.एल. हे मिडीयाच्या उत्पन्नाचे एक मोठे स्रोत आहे. अशावेळी मिडीया मूग गिळून बसणार. मग तेंव्हा त्याना दुष्काळग्रस्त महाराष्ट्र व त्यात होरपळून मरणारा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त दिसणे तर दूर पण या पैशाच्या पुरात दुष्काळग्रस्ताना बुडवायलाही हा मिडीया मागे पुढे पाहणार नाही. खरं तर मिडीयानी आता प्रत्येक स्टेडीयमवर स्टिंग ऑपरेशन करुन पाणि ओतणा-या टॅंकरची न्यूज दाखवायला हवी होती. पण ईथे तसं करण म्हणजे परवडणार नाही. प्रश्न पैशाचा आहे ना? मिडीया आता पैशाचं गणित मांडून बातमी सोडू लागला आहे. मोठ मोठ्ठाले ठेकेदार, जाहिरातदार व उद्योगपती हे सगळे मिडीयाचे की-कस्टमर्स आहेत. आय.पी.एल. त्यातलाच एक मोठा जाहिरातदार आहे. मग अशा की-कस्टमर्सच्या बातम्या देणे म्हणजे धंधा गमावणे नव्हे काय? मिडीया केवळ धंधा टिकवून ठेवण्यासाठी आपलं कर्त्यव्य गहाण टाकायला लागला आहे. म्हणजे मिडीयानी थेट नैतिकता विकली असे म्हणावे लागले.
आय.पी.एल. च्या खेळासाठी प्रत्येक स्टेडीयमवर जे पाण्याचे टॅंकर्स रिचवले जात आहेत ते खरं तर आसारामच्या पिचकारीच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक आहेत. आता काही स्टेडीयम वाले म्हणतील आम्ही अजिबात टॅंकर वापरत नाही. हा तर कहरच आहे. म्हणजे हे लोकं थेट फिल्टर केलेलं कार्पोरेशनच पाणी वापरतात. याना तर गाढवावर बसवून चौका चौकातून धींड काढली पाहिजे. शरद पवार परवा त्या कोकणातल्या जाधवाच्या मेजवाणीच्या निमित्ताने बोलताना ईथे दुष्काळ पडला असताना लोकप्रतिनिधी कसे एवढे असंवेदनशील वागू शकतात म्हणाले होते. आता महाराष्ट्रात तोच  दुष्काळ असताना आय.पी.एल. खेळविण्यासाठे स्टेडीयमवर पाणि रिचविले जाताना यातलं काहीच त्याना असंवेदनशील वगैरे वाटत नाहीच. खायला-प्यायला घालणे म्हणे असंवेदनशीलता पण खेळायला पाणी रिचवणे मात्र संवेदनशीलता... हायरे पवार...! नाही खेळवलं एक वर्ष आय.पी. एल. तर काय बिघडणार आहे? नाही उगवला गवत त्या स्टेडीयम मधे तर काय बिघडणार आहे? पण नाही, यांच्या पोतळ्या रिकाम्या राहतील ना! म्हणून दुष्काळात मरणा-याला मरु दयायचं, पण आय.पी.एल. खेळवणारच.
स्टेडीयमवर रिचवल्या जाणा-या पाण्याची बातमी मिडीया मुद्दाम लावून धरत नाही कारण आपला मिडीया का विकावू व पैसेखाऊ (कि कमाऊ) बनला आहे. पैशासाठी हा मिडीया आपली दिशाभूल करत तर आहेच पण मराठवाड्यात पाण्याविणा मरणा-या माणसांच्या खुणात अप्रत्यक्षरित्या सहभाग घेत आहे. आमचा मिडीया आता पॅस्सिव्ह गुन्हेगारी करु लागला आहे. कोण जाणे उद्या अक्टीव गुन्हाही करायला धजावणार नाही हा मिडीया. हे असं कशामुळे घडत आहे? एवढा बदल का बरं झाला? या सगळ्याचे उत्तर एकच आहे. मिडीया आता बातमीदार राहिला नसून तो जाहिरातीद्वारे पैसे कमविणारा व्यापारी बनला आहे. अन व्यापारी हा फक्त नफ्याचं गणित मांडत असतो व त्यासाठी काहिही करु शकतो. अन भारतीय मिडीयाची त्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.
थोडक्यात चौथा स्तंभ.... गहाण पडला!

मंगळवार, १९ मार्च, २०१३

फायनल ड्राफ्ट

मागच्या शनिवारी(९ मार्च २०१३) वेळात वेळ काढून फायनली फायनल ड्राफ्ट बघितला. आणि चक्क भारत नाट्य मंदिरात बघितला.
बापरे!!!!
बिना पार्किंगचं नाट्यगृह.... गाडी बाहेर रस्त्यावर लावलेली अन दर दहा मिनटानी “उचलली तर नाही ना” या विचारानी धस्स व्हायचं. कशाला ठेवतात खेळ या नाट्यगृहात असं सारखं वाटायचं.

शेवटी एकदाचा पडदा उठला अन निराशा झाली.
गिरीश जोशी झोपलेला असतो, अलार्म वाजल्यावर तो ताडकन उठतो अन लाईट लावतो वगैरे जे सीन आहे त्यातील जोशींचं उठन, चालणं, दिवा लावणं यातलं काहीच अभिनयात बसणारं नाहिये. झोपेतून उठलेला माणूस अगदी कसाही चालला तरी कसं चालणार नाही हे जर दाखवायचं झालं तर मी या प्रसंगातील गिरीश जोशींकडे बोट दाखवून म्हणू शकतो की ’असा नक्कीच चालणार नाही’ एवढं ते विसंगत चालणं नि वावरणं.
हा सीन पाहून गाडीच्या धस्स मधे आजून एका धस्सची भर पडली. म्हटलं आज काही खरं नाही.

नंतर होते एका मुलीची एंट्री...
पॅंट, टी-शर्ट घातलेली अन त्यावर जर्कीन घातलेला. हातात बाईकच्या किल्या (नशीब फिरवत बिरवत नाही) अन उभं राहताना एका पायावर शरीराचं ओझं टाकून दुसरा पाय ढिल्ला सोडलेला. टिपीकलं टपोरी टाईप पण त्याला संस्काराचीही किनार आहे हे अधोरेखित करणारं कंट्रोल्ड बिहेवीअर. थोडशी रेषा पार झाली की लगेच टपोरीचा शिक्का लागावा अशा ठिकाणी येऊन ठेपलेलं ते व्यक्तीमत्व साकारावं ते मुक्ता बर्वेनीच. त्या रेषेच्या तिथे शेवट पर्यंत टिकून राहण्याचं कसबही तीच्यातच. कित्तीवेळा वाटलं आता रेषा ओलांडणार... पण छे.... मुक्ता ती मुक्ताच. ट्पोरीचा शिक्का बसणा-या त्या रेषेचं इतकं भान अन प्रत्येक वेळी धरलेला तो सिनसटता संयम..... कमालिचं अभिनय!

कथा खुपच साधी सोपी आहे.
एका खेड्यातली एक दहावी नापास मुलगी मुंबईतील विख्यात टेलिव्हिजन स्क्रिप्ट रायटींगच्या संस्थेत प्रचंड फी वगैरे भरून प्रवेश मिळविते. त्या मागचं कारण असतं गिरिश जोशी नावाचा स्क्रिप्ट रायटिंग शिकविणारा शिक्षक. या शिक्षकाचे काही पुस्तकं/नाटकं वाचून ती भारावून जाते अन त्याच्या मुंबईच्या शाखेत प्रवेश मिळविते हे कधीतरी मधेच फ्लॅशबॅकमधे उलगडतं. पण होतं काय की तीनी वाचलेला तो लेखक व आता शिकविणारा शिक्षक यांच्यात दूर दुरचा संबंध नसतो. हे सगळं पाहून ती हताश/निराश वगैरे होते नी स्क्रिप्ट रायटिंगमधे तीचं मनच लागेना.
ईकडॆ गिरिश जोशीच्या लक्षात येते की त्याच्या वर्गात शिकणारी ही पोरगी म्हणजे अगदीच टुकार वगैरे अन त्याच्या संस्थेला शोभणार नाही असली विद्यार्थीनी. मग तीला थोडफार तरी यात तरबेज करावं म्हणून या शिक्षकानी तीला घरी(धडे द्यायला) बोलावलं. पट्टी येते खरी पण आत कशी जाऊ म्हणून दारात तासभर ताटकळत उभी राहते.... अशी ही सुरुवात.

त्या नंतर सुरु होतात अभिनयाचे एकेक संग्राम. मुक्ता बर्वेच्या पुढे गिरीश जोशीही मग एकसे बढकर एक अशी अभिनयाची पेशकश करत नाटक पुढे सरकतो.

पहिल्या दिवशी घरी घेतलेल्या क्लासमधे तीला निट समजावून सांगतो की स्क्रिप्ट रायटिंगमधे डायरी टाईप लिखान अजिबात येता कामा नये. पण दुस-या दिवशी तीनी आणलेला ड्राफ्ट पक्का डायरी टाईप असतो. त्यावरुन झालेली खडाजंगी व तसे अनेक सीन म्हणजे नाटकातील खास वैशिष्ट्ये आहेत. गावाकडली दाखविली तरी थोडसं सॉफ्ट ऍरोगंट दाखविलं व ते साकरताना त्या रेषेशी मुक्ता कमालीच्या कौशल्यानी खेळते अन कधीच ती रेषा पार करत नाही हे खास!

मग काय त्या मुलीचे कच्चे ड्राफ्ट सुरु होतात. दररोज एक कच्चा ड्राफ्ट लिहून आणायचा व त्यावर मास्तरानी सुचना देऊन दुरुस्त्या करायच्या असं ठरतं अन सुरु होतो प्रवास ड्राफ्टांचा....

पहिल्या का दुस-या ड्राफ्टमधी ती लिहून आणते की एका लहानश्या गावात एक मुलगी राहात होती. तीची आई मरते वगैरे अन ती पुण्यात बहिणीकडे शिकायला येते व तीला तीच्या बहिणीने रायटींगच्या क्लासेसला घातले. तीला काहीच येत नाही अन शिक्षक घरी बोलावून तीला शिकवू लागतो. तिथेही तिला जमले नाही म्हणून ती घरी परत गेली व विहिरीत उडी टाकून जीव दिला..... वगैरे हा पहिला ड्राफ्ट.

मास्तर अवाक होतो..... अन ओरडतो “अगं ही तर तुझी वयक्तीक डायरी वाटातेय.... तुझी कल्पना कुठे आहे याच्यात?”

ईथे परत एकदा एरोगंट मुलगी साकारताना मुक्ताचं अभिनय पहावं.

त्या नंतर दुसरा ड्राफ्ट....
स्टोरी वरचीच पण याच्यात ती मुलगी आपल्या बहिणीकडे राहयाला येण्या ऐवजी आपल्या भावाकडे येते नि स्क्रिप्ट रायटिंगच्या ऐवजी मेडीकलला प्रवेश घेते.
अन शेवट?????????
विहिरीच्या ऐवजी विष पिऊन मरते (म्हणजे एन्ड पण सेम)

परत एकदा मास्तर ओरडतो.... “ईथे तुझी कल्पना कुठे आहे???????”
परत एकदा अपला मुदा पटवून देणारी मुक्ता पहावी.........

हे असे ड्राफ्टचे खेळ चालू असतात पण त्याच्या जोडीला समांतर आजून एक खेळ चालू असतो तो म्हणजे यांच्या वयक्तीक आयुष्याचा. त्यातल्या त्यात मास्तराच्या आयुष्याचा....मुक्ताचं बारीक लक्ष असतं मास्तरच्या घरून येणा-या फोनांवर नि त्या दरम्यानच्या संवादांवर. याचा धागा धरून एक अप्रतिम ड्राफ्ट तयार करण्याची कल्पना तीला सुचते. पण मधल्या काळात बरच काही होतं.

अन शेवटी या सगळ्या घटनांना एका कथेत बांधून मुक्ता सादर करते तो ठरतो “फायनल ड्राफ्ट”

तो ईथे लिहता येणारच नाही, थिएटरात जाऊनच पहावा....

“फायनल ड्राफ्ट” एक अप्रतिम कलाकृती!!!

आसारामची पिचकारी!!!

दोन दिवसापासून मराठी-हिंदी-इंग्रजी अशा सर्व वृत्तपत्रातून झाडून एक बातमी छापली जात आहे ती म्हणजे आसारामची पिचकारी!!!
दोन दिवसापुर्वी आसारामनी नागपुरात जी पिचकारी मारली त्यानी उभ्या महाराष्ट्रात नवा ओला-वादळ उठला. त्या पिचकारीच्या विरोधात थेट विधान परिषदेत प्रतिध्वनी गुंजला नि नवल म्हणजे सगळ्यानी एकमतानं आसारामच्या पिचकारीचा विरोध केला. त्याच बरोबर वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे सगळे कॅमेरे त्या पिचकारीवर रोखले गेले. एकंदरीत वातावरण निर्मिती अशी केली जात आहे की जणू काही महाराष्ट्राच्या दुष्काळाला तो असारामच कारणीभूत आहे... अन हे सगळे राजकारणी बिच्चारे निरपराध आहेत!
अन बापू तो बापू... बापूच, कशाला ऐकतो तो. त्याची अरेरावी चालू आहे तो वेगळाच भाग. असो!
महाराष्टात दुष्काळ पडला याला आसाराम अजिबात जबाबदार नाही हे सांगायची गरज नाहीच. फार फार तर आपण एवढं म्हणू शकतो की ईथे दुष्काळ आहे त्यामुळे मनाची संवेदनशीलता दाखवत आसारामनी पिचकारी मारायला नको होती... बास! 
अन बापूनी ती संवेदनशिलता नाहीच दाखविली तर त्याना दोषही देता येणार नाही. कारण आम्ही स्वत: पुण्याच्या आस पास फेर फटका मारल्यास होणा-या पाण्याची नासाडी पाहून स्वत:च्या असंवेदनशीलतेची लाज वाटावी अशी अवस्था आहे. तेंव्हा त्या गुजरातमधल्या एखाद्या माणसाला संवेदनशिलतेचा मुदा पुढे करुन दोष देण्यात काही अर्थ नाही. मुळात आम्हीच असंवेदनशील असताना दुस-याना काय बोलावं. ही झाली सामान्य नागरीक म्हणून एक बाजू.
दुसरं असं की आसाराम बापू जे पाणी वापरत आहे ते पाणी टेक्नीकली खरच दुष्काळग्रस्ताना पुरविल्या जाऊ शकत होतं का? जर नसेल तर मग उगीच बोंबा का मारायच्या? नागपूरचं वा वाशीचं पाणी खरच मराठवाड्यातल्या लोकाना पुरविणे तांत्रीकदृष्ट्या पटतं का? मलातरी वाटतं नाही. म्हणजे पेपर वाल्यानी जो मुद्दा उचलून धरला तो केवळ दिशाभूल करणारा आहे. परत तेच.... मनाची संवेदनशीलता.  फिरून फिरून हाच एक अरोप ठेवता येतो. पण तो ठेवायचाच म्हटल्यास नुसतं आसाराम नाही, तर आपण सगळे अडकतो. कारण आपण फार काही संवेदनशीलतेने वागत आहोत असं वाटतं नाहिये.  
अन हो दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्याच्याशी नियोजनबद्ध पद्धतीने लढायचं असतं. अल्पकालीन व दिर्घकालीने अशा योजना राबवित त्यावर मात करायची असते. हे सगळं करण्याची जबाबदारी सरकारची असते. संवेदनशीलता हा काही दुष्काळावरचा उपाय नाही. मग कुठल्या कारणामुळे आसारामचा एवढा कांगावा केल्या जात आहे? स्वत:ची पापं लपवायला तर नाही ना?
आता विधान परिषदेतले पांढरे बगडॆही आसारामकडे बोट दाखवून केकटायला लागलित व जणू काही आसारामच दोषी आहे असा आव आणताहेत याचं मात्र नवल वाटतं.
अरे त्यानी पैसे मोजले अन पाणि वापरलं... विषय संपला.
दुष्काळाचा विचार व त्यावरील उपाय हे सरकारचे काम आहे. पाण्याचे नियोजन करण्यात व दुष्काळी भागात त्यासाठी प्रोजेक्ट राबविण्यात सरकारला अपयश आले आहे, त्यात आसारामचा काय दोष. मागच्या दहा वर्षापासून शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत, काय नियोजन केलं सरकारनी.

आसारामची पिचकारी दुष्काळाचं कारण आहे की परिणाम? 
दोन्ही नाही!

पण मराठवाड्यातील लोकं पाण्याविना मरत आहेत हे सरकारच्या धोरण्यातील चुकांचा परिणाम आहे हे मात्र नक्की. अन मराठवाड्यातला दुष्काळ ईतका टोकाला जाण्याचे कारण सुद्धा सरकारच आहे. सरकारनी योग्य नियोजन व त्याची अमलबजावणी केली असती तर हा दुष्काळ एवढा जाणवला नसताच. प्रिव्हेंटीव मेंटनन्स नावाचा एक प्रकार असतो. आम्ही थेट ब्रेकडाऊनवरच विश्वास ठेवतो.

१९७२ च्या दुष्काळातून धडा घेत काय नियोजन केलं सरकारनी. जर केलं तर मग हा दुष्काळ हाताळताना एवढी दमछाक का होत आहे? आसारामच्या पंधरा वीस टॅंकर्सनी एवढं काय घोडं मारलं? तितकं पाणी तर या २८८ आमदारांच्या वॉशरुमच्या ड्रेनेजतून रोज वाहत असेल. उगीच आसारामला बोलण्याचे काय कारण? कि या निमित्ताने स्वत:च्या कुकर्मावर पड्दा टाकण्याच प्रयत्न होत आहे?
अन आसारामच्या नावानी बोम मारण्यापेक्षा आमदारानी स्वत: पाणी कमी वापरण्याची जाहीर शपथ का नाही घेत. की जमणार नाही म्हणून हिंमत होत नाहीये!
अन वृत्तपत्रातून व वाहिन्यांतून केकाटणा-यानी सुद्धा आपले कॅमेरे जरा राजकारण्यांकडे फिरवावे. म्हणजे काय ते कळेल. पण ते तसे नाही करणार. कारण त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. वृत्तपत्राना मोठ मोठठाल्या जाहिराती देणारे हेच राजकारणी व त्यांचे ठेकेदार. म्हणजे वृत्तपत्रांचं मुख्य उत्पन्न हे अशा बड्या लोकांच्या जाहिरातीतून होतं. ते रुसले तर वृत्तपत्रे व वाहिन्या चालणार कशा? म्हणून बातमी देताना हे सगळे घटक तपासले जातात. आसाराम बिचारा देत नसेल एवढ्या मोठ्या जाहिराती. अन्यथा त्याच्याही बातम्या आल्या नसत्या.

राहिला प्रश्न आसारामच्या पिचकारीचा.... तो खर्चून खर्चून किती खर्चणार आहे? राजकारण्यांपेक्षा तर जास्त नक्कीच नाही.

मी तर म्हणेन “आसाराम तुम बिनधास्त पिचकारी मारो. साला ईधर कोई संवेदनशील वगैरे नही है
आणि हय तो भी वो दुष्काळ के उपर कोई उपाय नही है. ये पेपरावाला साला तुमको अवर हमको सिर्फ उल्लू बनाता है!"