गुरुवार, ७ मार्च, २०१३

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मुहल्ला!


दोन दिवसापुर्वी गणेश कला-क्रिडा मंच, पुणे येथे भरीपनी ’शिवाजी अंडरग्राउंड’ चा खेळ आयोजित केला होता.  हा खेळ फ्री होता.  खरं तर दुस-याच दिवशी कोथरुडमधे हा खेळ तिकीटावर आजोयीत होताच, म्हणजे अगदी निवांतपणे बसून आरामात खेळ पाहण्याची संधी होतीच. पण मी तसे केले नाही. मी गेली फुकटचा खेळ पाहायला. या मागचा हेतू पैसे वाचविणे अजिबात नव्हता. तो होता आपल्या लोकांसोबत खेळ पाहण्याची जी झिंग असते ती अनुभवण्याचा. कोथरुडातील वातानुकुलित सभागृहात आरामात बसून पाहण्यात ती मजा कुठे जी आपल्या बांधवांच्या गराड्यात बसून भीम-गर्जनेच्या जयघोषात पाहण्यात आहे.
खेळाची वेळ होती सायंकाळचे ५ वाजता. मला असल्या कार्यक्रमांचा दांडगा अनूभव असल्यामुळे मी तब्बल दीड तास उशीरा गेलो. पण त्यांच्या दांडगाईच्या पुढे माझी दांडगाई शूल्लक ठरली अन आजून अर्धातास ताटकळत वाट पाहावी लागली.
मी जेंव्हा सभागृहात पोहचलो तेंव्हा उभ्या सभागृहात लोकं बसलेली. अगदी शेवटच्या एक-दोन रांगा सोडल्या तर सगळं खचाखच भरलेलं. मागच्या रांगेत जाऊन जागा धरली खरी पण खेळ चालू झाल्यावर आवाज नीट ऐकू येईना. मग काय, बाहेर पडलो अन पहिल्या गेट मधून अगदी स्टेजच्या पुढे जाऊन उभा झालो. बघतो काय तर माझ्या सारखे अनेक बांधव स्टेजच्या अवती भवती खालीच फलकत मारून बसलेली. मी जरा वेळ उभा राहून भींतीचा आधार घेत थांबलो खरा. पण हा हा म्हणता सभागृहातील प्रत्येक मोकळी जागा खचाखच भरली जाग होती. लोकं खालीच बसून ते नाटक पाहू लागली. माझ्याकडे दोन पर्याय होते. थेट बाहेर पडून उद्या निवांत कोथरुडला पैसे मोजून पहावे अन दुसरा म्हणजे ईथेच खाली बसून ताटकळत. मी दुसरा पर्या निवडला अन खाली बसलो. (ज्याना माझा ईगो माहित आहे त्यानी जर मला ईथे असं पाहिलं असतं तर त्याना विश्वासच बसला नसता. पण काय नं... “बाबासाहेब म्हटलं की काहिपण.....” असा मी वेडा आहे.)पडदा उठला अन खेळ सुरु झाला....

“शिवाजी अंडरग्राउंड इन भीम नगर मुहल्ला....”
नाटकाची कथा तशी साधी सोपी व आपल्या अवती-भवती जे रोजरासपणे घडत असतं त्यातलीच आहे. एक राजकीय ताई असते. ती सतराशे साठ पक्ष बदलत असते. ताईनी नुकताच पक्षांतर करुन एका नवीन पक्षात प्रवेश केलेला असतो. पुढे शिवजयंतीच्या निमित्ताने गावात तमाशा ठेवण्याचा बेत होतो. त्या प्रमाणे सुपारीही देण्यात येते. पण ऐन वेळेस ती सुपारी घेणारी तमशगिरीन अमेरीकेतील सुपारी घेते अन निघून जाते. मग होते पंचायत.
मग शोधा शोध करुन एक बुवा सापडतो अन गावात शिवजयंतीच्या निमित्ताने शाहिरी ठेवण्यात येते. मिलिंद कांबळे नावाचा एक सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता या बुवाच्या शाहिरी-टीमचा सदस्य असतो. बुवा कै च्या कै शिवाजी रंगवायला लागतो अन मिलिंद कांबळेशी ईथे वाजतं.
मग काय मिलिंद कांबळे विरुद्ध बुवा अशी शाहिरीची जुगलबंदी घोषीत करण्यात येते. अन मिलिंद कांबळे नावाचा आंबेडकरी शाहीर खरा शिवाजी उलगडून सांगतो.
या नाटकात मला आवडलेली अनेक वाक्ये आहेत. अनेक प्रसंग आहेत. पण त्यातल्या त्यात आवर्जून उल्लेख करावा असं एक वाक्य म्हणजे...
जेंव्हा बुवा म्हणतात की “मला कुठल्याही लढ्याच्या प्रसंगा बद्दल विचार. सर्व तोंडपाठ आहे. प्रत्येक लढाई बद्दल अन गढ तोरणा बद्दल...” त्यावर मिलंद म्हणतो “आजून किती दिवस लढाया व गढ तोरणा बद्दल बोलणार,  अरे कधीतरी शिवाजीच्या धोरणा बद्दल बोला” अन उभ्या सभागृहात गडगडाट होतो.
असच आजून एक प्रसंग आहे तो म्हणजे शिवाजीचं शेती धोरण सांगताना महाराजानी सोन्याचा नांगर फिरवलं... वगैरे उदाहरण देत बुवा लोकाना भावनिक करतो पण त्यावर मिलिंदनी प्रस्तूत केलेलं शिवाजीचं शेती धोरण म्हणजे आज पर्यंतच्या इतिहासकारांच्या कानाखाली काढलेला खणखणीत आवाज आहे. आम्ही शिवाजीला ज्या भूमिकेतून बघायला पाहिजे होतं त्या भूमिकेतून न पाहिल्याचा मनातून पश्चाताप होतो.
अशा अनेक लहान सहान गोष्टी मिलिंदनी या नाटकात आपल्या शाहिरीतून मांडल्या ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत.
एकंदरीत प्रत्येकानी पहावं असं हे नाटक आहे.

नाटकावरील ब्रिगेडी प्रभाव:
या नाटकाची दुसरी बाजू अशी की हे नाटक जेवढं सरस नि दर्जेदार आहे तेवढचं बायस नि एकांगीही आहे. तुम्हाला वाटेल दोन परस्पर विसंगत वाक्ये कशी काय? ते तुम्ही नाटकवाल्याना विचार. त्यानीच तसं करुन ठेवलय. मी फक्त तुम्हाला सांगतोय.
नाटकावर ५०% ब्रिगेडी प्रभाव असल्यामूळे ब्राह्मणद्वेषाचा अतिरेक आहे. त्याच बरोबर बहूजन समाजाचा एवढा पुळका आहे की शिवाजीला थेट बहुजन उद्धारक म्हणून पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न झालाय जो खोटा व प्रतिकावा आहे. शिवाजी हा ब्राह्मण प्रतिपालक नव्हता हे सांगताना दिलेले दाखले अगदीच तकलादू तर आहेतच पण त्यांच्या आठ प्रमुखा पैकी सात प्रमूख हे ब्राह्मण होते हे पद्धतशीरपणे टाळले गेले. मुस्लिमांना समान वागणूक देण्या-या गुणाचं कौतूक करताना भान हरवल्याचा पुरावा देत शिवाजीच्या चुलत की कोण काकाचं नाव मुस्लिम नाव असल्याचाही उल्लेख येतो. हा ब्रिगेडी प्रभाव तर डोक्यात जातो. त्याच बरोबर महाराना पाटीलकी दिल्याचा प्रचार करताना ती फक्त एकाच महाराला दिली होती हे तर सांगत नाहीतच, पण बहमणी राजानी दिलेल्या ५२ अधिकारातील १२ तरी अधिकार शिवाजीनी महाराना चालू ठेवले का? अन नाही ठेवले तर का नाही? हे मात्र जाणीवपूर्वक टाळले गेल. हा सुद्धा ब्रिगेडी प्रभाव होय. त्याच बरोबर भास्कर कुलकर्णीचं मुंडकं उडविणे हा त्यांचा नाईलाज होता हे सांगण्यापेक्षा शिवाजीनी जणू तो प्रघात घालून दिला असा प्रचार या नाटकातून होत आहे. थोडक्यात शिवाजी सांगताना ब्राह्मणानी जो अन्याय केला तोच अन्याय आंबेडकरी समाजानेही केला असे म्हणायला पुर्ण वाव आहे. ब्राह्मणांचा शिवाजी हा मुस्लिम विरोधी असतो तर आंबेडकरी समाजाचा शिवाजी हा ब्राह्मण विरोधी असे समिकरण मांडले गेले. म्हणजे तुमने हमारी गाय मारी हम तुम्हारा वासरु मारेंगे प्रकार आहे सगळा!
हा ब्रिगेडी प्रभाव तेवढा सोडलाच(?), तर मग उरलेली कलाकृती अप्रतीम आहे.
प्रत्येक कलाकारानी साकारलेली भूमिका  व त्याचा दर्जा पाहता काही वर्षातच या क्षेत्रात आंबेडकरी कलावंत मोठी मजल मारेल हे दिसून येते. जसे की साहित्य क्षेत्र आंबेडकरी समाजानी दुमदुमवून सोडले तसे नाट्यक्षेत्रही दुमदुमेल हे नक्की. जर कशाची गरज असेल तर थोडा ब्रिगेडी प्रभाव बाजूला सारून खरा आंबेडकरी बनून नाट्यक्षेत्रात उतरण्याची. 
-----
का पहावा:- तोरणांचा नाही तर धोरणांचा शिवाजी ईथे सापडतो.
का पाहू नये:- ब्रिगेडचा प्रचंड प्रभाव नि ब्राह्मण द्वेष.


जयभीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा