मंगळवार, १९ मार्च, २०१३

फायनल ड्राफ्ट

मागच्या शनिवारी(९ मार्च २०१३) वेळात वेळ काढून फायनली फायनल ड्राफ्ट बघितला. आणि चक्क भारत नाट्य मंदिरात बघितला.
बापरे!!!!
बिना पार्किंगचं नाट्यगृह.... गाडी बाहेर रस्त्यावर लावलेली अन दर दहा मिनटानी “उचलली तर नाही ना” या विचारानी धस्स व्हायचं. कशाला ठेवतात खेळ या नाट्यगृहात असं सारखं वाटायचं.

शेवटी एकदाचा पडदा उठला अन निराशा झाली.
गिरीश जोशी झोपलेला असतो, अलार्म वाजल्यावर तो ताडकन उठतो अन लाईट लावतो वगैरे जे सीन आहे त्यातील जोशींचं उठन, चालणं, दिवा लावणं यातलं काहीच अभिनयात बसणारं नाहिये. झोपेतून उठलेला माणूस अगदी कसाही चालला तरी कसं चालणार नाही हे जर दाखवायचं झालं तर मी या प्रसंगातील गिरीश जोशींकडे बोट दाखवून म्हणू शकतो की ’असा नक्कीच चालणार नाही’ एवढं ते विसंगत चालणं नि वावरणं.
हा सीन पाहून गाडीच्या धस्स मधे आजून एका धस्सची भर पडली. म्हटलं आज काही खरं नाही.

नंतर होते एका मुलीची एंट्री...
पॅंट, टी-शर्ट घातलेली अन त्यावर जर्कीन घातलेला. हातात बाईकच्या किल्या (नशीब फिरवत बिरवत नाही) अन उभं राहताना एका पायावर शरीराचं ओझं टाकून दुसरा पाय ढिल्ला सोडलेला. टिपीकलं टपोरी टाईप पण त्याला संस्काराचीही किनार आहे हे अधोरेखित करणारं कंट्रोल्ड बिहेवीअर. थोडशी रेषा पार झाली की लगेच टपोरीचा शिक्का लागावा अशा ठिकाणी येऊन ठेपलेलं ते व्यक्तीमत्व साकारावं ते मुक्ता बर्वेनीच. त्या रेषेच्या तिथे शेवट पर्यंत टिकून राहण्याचं कसबही तीच्यातच. कित्तीवेळा वाटलं आता रेषा ओलांडणार... पण छे.... मुक्ता ती मुक्ताच. ट्पोरीचा शिक्का बसणा-या त्या रेषेचं इतकं भान अन प्रत्येक वेळी धरलेला तो सिनसटता संयम..... कमालिचं अभिनय!

कथा खुपच साधी सोपी आहे.
एका खेड्यातली एक दहावी नापास मुलगी मुंबईतील विख्यात टेलिव्हिजन स्क्रिप्ट रायटींगच्या संस्थेत प्रचंड फी वगैरे भरून प्रवेश मिळविते. त्या मागचं कारण असतं गिरिश जोशी नावाचा स्क्रिप्ट रायटिंग शिकविणारा शिक्षक. या शिक्षकाचे काही पुस्तकं/नाटकं वाचून ती भारावून जाते अन त्याच्या मुंबईच्या शाखेत प्रवेश मिळविते हे कधीतरी मधेच फ्लॅशबॅकमधे उलगडतं. पण होतं काय की तीनी वाचलेला तो लेखक व आता शिकविणारा शिक्षक यांच्यात दूर दुरचा संबंध नसतो. हे सगळं पाहून ती हताश/निराश वगैरे होते नी स्क्रिप्ट रायटिंगमधे तीचं मनच लागेना.
ईकडॆ गिरिश जोशीच्या लक्षात येते की त्याच्या वर्गात शिकणारी ही पोरगी म्हणजे अगदीच टुकार वगैरे अन त्याच्या संस्थेला शोभणार नाही असली विद्यार्थीनी. मग तीला थोडफार तरी यात तरबेज करावं म्हणून या शिक्षकानी तीला घरी(धडे द्यायला) बोलावलं. पट्टी येते खरी पण आत कशी जाऊ म्हणून दारात तासभर ताटकळत उभी राहते.... अशी ही सुरुवात.

त्या नंतर सुरु होतात अभिनयाचे एकेक संग्राम. मुक्ता बर्वेच्या पुढे गिरीश जोशीही मग एकसे बढकर एक अशी अभिनयाची पेशकश करत नाटक पुढे सरकतो.

पहिल्या दिवशी घरी घेतलेल्या क्लासमधे तीला निट समजावून सांगतो की स्क्रिप्ट रायटिंगमधे डायरी टाईप लिखान अजिबात येता कामा नये. पण दुस-या दिवशी तीनी आणलेला ड्राफ्ट पक्का डायरी टाईप असतो. त्यावरुन झालेली खडाजंगी व तसे अनेक सीन म्हणजे नाटकातील खास वैशिष्ट्ये आहेत. गावाकडली दाखविली तरी थोडसं सॉफ्ट ऍरोगंट दाखविलं व ते साकरताना त्या रेषेशी मुक्ता कमालीच्या कौशल्यानी खेळते अन कधीच ती रेषा पार करत नाही हे खास!

मग काय त्या मुलीचे कच्चे ड्राफ्ट सुरु होतात. दररोज एक कच्चा ड्राफ्ट लिहून आणायचा व त्यावर मास्तरानी सुचना देऊन दुरुस्त्या करायच्या असं ठरतं अन सुरु होतो प्रवास ड्राफ्टांचा....

पहिल्या का दुस-या ड्राफ्टमधी ती लिहून आणते की एका लहानश्या गावात एक मुलगी राहात होती. तीची आई मरते वगैरे अन ती पुण्यात बहिणीकडे शिकायला येते व तीला तीच्या बहिणीने रायटींगच्या क्लासेसला घातले. तीला काहीच येत नाही अन शिक्षक घरी बोलावून तीला शिकवू लागतो. तिथेही तिला जमले नाही म्हणून ती घरी परत गेली व विहिरीत उडी टाकून जीव दिला..... वगैरे हा पहिला ड्राफ्ट.

मास्तर अवाक होतो..... अन ओरडतो “अगं ही तर तुझी वयक्तीक डायरी वाटातेय.... तुझी कल्पना कुठे आहे याच्यात?”

ईथे परत एकदा एरोगंट मुलगी साकारताना मुक्ताचं अभिनय पहावं.

त्या नंतर दुसरा ड्राफ्ट....
स्टोरी वरचीच पण याच्यात ती मुलगी आपल्या बहिणीकडे राहयाला येण्या ऐवजी आपल्या भावाकडे येते नि स्क्रिप्ट रायटिंगच्या ऐवजी मेडीकलला प्रवेश घेते.
अन शेवट?????????
विहिरीच्या ऐवजी विष पिऊन मरते (म्हणजे एन्ड पण सेम)

परत एकदा मास्तर ओरडतो.... “ईथे तुझी कल्पना कुठे आहे???????”
परत एकदा अपला मुदा पटवून देणारी मुक्ता पहावी.........

हे असे ड्राफ्टचे खेळ चालू असतात पण त्याच्या जोडीला समांतर आजून एक खेळ चालू असतो तो म्हणजे यांच्या वयक्तीक आयुष्याचा. त्यातल्या त्यात मास्तराच्या आयुष्याचा....मुक्ताचं बारीक लक्ष असतं मास्तरच्या घरून येणा-या फोनांवर नि त्या दरम्यानच्या संवादांवर. याचा धागा धरून एक अप्रतिम ड्राफ्ट तयार करण्याची कल्पना तीला सुचते. पण मधल्या काळात बरच काही होतं.

अन शेवटी या सगळ्या घटनांना एका कथेत बांधून मुक्ता सादर करते तो ठरतो “फायनल ड्राफ्ट”

तो ईथे लिहता येणारच नाही, थिएटरात जाऊनच पहावा....

“फायनल ड्राफ्ट” एक अप्रतिम कलाकृती!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा