मंगळवार, २ एप्रिल, २०१३

असं आंघोळ घालण्याची पद्धतच आहे...दुष्काळाचा काय संबंध?

महाराष्ट्रातील मराठवाड्यात दुष्काळ पडला. राजकारणी व मिडीयावाल्यानी सामूहिक ओरडा सुरु केला. राजकारण्याना या  बहाण्याने पैसे लाटायचे आहेत तर मिडीयाला ’बघा आम्ही कसे सच्चे, संवेदनशील व दर्दी पत्रकार आहोत’ म्हणुन सोंग करायची संधी चालून आली. या दोघांची डंडार चालू झाली अन आपण सगळे त्या डंडारीचे प्रेक्षक. पण हे दोघेही कसे लबाड आहेत हे मी मागील दोन तीन लेखातून मांडत आलोच आहे. 
असो...
हा ईथे डकवलेला फोटू सध्या फेसबूकवर गाजत आहे. फेसबुकवरच्या संवेदनांची वेगळीच कथा. प्रचंड अज्ञान व खेड्यापाड्यातल्या संस्कृतीशी अजिबात परिचय नसणारा हा फेबूगट कशावरही भलताच सुटतो. 

"हा फोटू म्हणे दुष्काळाचा परिणाम होय. मराठवाड्यातल्या दुष्काळामुळे तिथल्या आया पोराना अशा बाजेवर बसवून आंघोळ घालतायत...." असा प्रचार चालू आहे अन फेबुकराना ते खरच वाटताय. बिचारे कित्ती हळहळताहेत हा फोटू बघून... अन मला मात्र फिदकन हासायला आलं हे सगळं वाचून.

अरे बापुर्ड्यानो,
जरा फेसबूक वरुन बाहेर या, खेड्या पाड्यात जाऊन बघा. या फोटोचा अन दुष्काळाचा काडीचा संबंध नाहीये. खेड्यात अशीच आंघोळ घातली जाते पोराना. जिथे पाणि धो धो वाहतो त्या आमच्या विदर्भातील (गडचिरोली भागात जिथे १६००मिली पाऊस पडतो अन आता एप्रिलमधेही नदीची मधली धार तुटत नाही) खेड्य़ापाडयात पोराना असच बाजेवर बसवून आंघोळ घातली जाते. तिकडे बाथरुम किंवा बाथटब वगैरे नसतात.

आमच्या विदर्भात घराला दोन आंगणं असतात(पुढचं व मागचं) अन पुढच्या आंगणात मांडो असतो. जेवणे, झोपणे, खेळणे व लहान पोराना आंघोळ घालणे (बाजेवर बसवून) हे सगळं आंगणातच चालतं. नंतर रात्री त्याच आंगणातल्या मांडवावर पोरं झोपतात तर मोठी माणस मांडवाखाली आंगणात झोपतात. फक्त पावसाळ्यात तेवढं घरात व ओसरीत झोपायची पद्धत आहे. जेंव्हा पाहूणे येतात तेंव्हा त्याना पाय धुवायला पाणी दिले जाते अन ते पाहूणे याच आंगणात पाय धुतात. जेवायला बसताना हात धुवायला पाणी दिले जाते अन हातही इथेच धुतले जातात. लहान पोरं याचं आंगणात हागतात अन कोंबड्या व बक-या सुद्धा ईथेच पडीक असतात. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय याच आंगणात एक कोप-यात असते. 

वरील चित्रातील आंघोळ म्हणजे अगदी रुटीन पार्ट आहे, त्याचा दुष्काळाशी काही संबंध नाही. जे वर आंघोळ करताना दिसतय ना ते पोट्टं नंतर त्याचं आंगणात मातीही खेळतं, अन माती खातही......... आता काय म्हणता......... माती खायचा फोटू कोणीतरी टाकायचा अन फेसबुकवाले म्हणायचे ........ 

बघा बघा..... आता दुष्काळामुळे पोरं बिचारी माती खाऊ लागली!!!!!!!!!

हद्द झाली यार फेसबुक पिढीची!!!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा