मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

शरद पवार : भाग-०३ पाझर तलाव

सन १९६२ मध्ये वाणिज्य शाखेची पदवी मिळविल्यावर शरद पवारानी पुर्णवेळ राजकारण करण्याचा निर्णय घेऊन टाकला. ते पुण्यातील सोमवारपेठ ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यक्षेत्रात सभासद बनले. अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता म्हणून विध्यार्थीदशेतच पवारांची ख्याती होती. सक्रीय सभासद झाल्यावर लगेचच सोमवारपेठ ब्लॉक कॉंगेसचे  अध्यक्षपद पवारांच्या पदरात पडले. हा एका खंद्या कार्यकर्त्याचा गौरव होता. अध्यक्ष म्हणून शहरातील व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी वेळोवेळी त्यांचा संपर्क येऊ लागला अन यातून आकार घेत गेला एक प्रचंड आवाका नि जनाधार असलेला नेता.
शरद पवारांचं मूळ पींड होतं राजकारणाचं व लोकं जोडण्याचं. पहिल्याच वर्षी याची प्रचिती उभ्या महाराष्टाला आली. १९६२ मध्ये शरद पवारानी बारामती शहरात पश्चिम महाराष्ट्रातील युवक कॉंगेसच्या कार्यकर्त्यांचं शिबीर घेतलं. जन्म १९४० चा अन १९६२ मधे म्हणजे वयाच्या २२ वर्षीचं हे कार्य... ईतक्या लहान वयात एवढं मोठं कार्य पार पाडण्याची त्यांची कुशलता नि कार्यक्षमता पाहून यशवंतराव चव्हाण थक्क झाले..अन त्यानी पवाराना आपला मानसपूत्र जाहीर केलं.
१९६३ मध्ये बॅ. ए. आर. अंतुले यांची विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे प्रदेश युवक कॉंगेसची जागा रिक्त झाली. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून एकचा आवाज उसळला की हे पद पवाराना मिळावे. पण कॉंगेसध्ये थेट नेमण्याची पद्धत नव्हती. या पदासाठी निवडणूक लढवावी लागणार होती. पवारानी त्या दिशेनी हालचाली सुरु केल्या. या पदासाठी अर्ज भरला अन निवडणूक लढविण्याची मोर्चेबांधणी सुरु झाली. पवारांच्या विरोधात फलटणचे बॅ. राजाभाऊ भोसले उभे होते. या पदासाठी लागणारी गुणवत्ता, संघटन कौशल्य नि दूरदर्शीपणा हे सगळे गूण पवाराच्या अंगी उपजतच होते पण निवडणुकीत फासे पलटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मतं फिरु नये म्हणून सगळा अनूभव पणाला लाऊन ते लढले. दांडगा जनसंपर्क  व कार्यकर्त्यांशी नाड जोडलेली असल्यामूळे पवारानी ही लढत जिंकली अन वयाच्या २३ व्या वर्षी ते प्रदेश युवक कॉंगेस कमिटीचे अध्यक्ष झाले.
आता मात्र पवारांचा मुक्काम हलणार होता. पुणे शहराला रामराम ठोकून मुंबईत दाखल व्हायचे होते. अन मुंबईत राहून महाराष्ट्रातल्या कानाकोप-यात कॉंग्रेस पक्ष रुजवायचा होता. बारामती सारख्या लहानशा गावातून सुरु झालेला तो प्रवास आता थेट मुंबईत घेऊन गेला होता. राज्यात तरुणांची एक जबरदस्त फळी उभी करण्याची जबाबदारी पवाराच्या खांद्यावर येऊन पडली होती. त्याच बरोबर मुंबईतल्या वास्तव्यात बड्या नेत्यांच्या संपर्कात येऊन अंगी असलेल्या गुणांचं सोनं करण्याचिही ती संधी होती. दादर मधील टिळक भवनात पवारांचा मुक्काम हलला. १९६३ ते १९६७ पर्यंत म्हणजे पुढचे पाच वर्षे पवार याच टिळक भवनात राहून आपले कार्य सांभाळू लागले.
टिळक भवनातील वास्तव्यात पवार राज्यभर दौरे करायचे. प्रत्येक जिल्हा पातळीवर, तालूका पातळीवर जाऊन दिवसाचे रान करत पक्षाची बांधनी भक्कम करत होते. पण त्याच बरोबर जेंव्हा मुंबईत वास्तव्यास येत तेंव्हा मात्र विचारवंत व नामवंत लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडून नवे धडे शिकत. विविध विषयांवर चर्चा करुन त्यातील बारकावे समजावून घेत. त्याच बरोबर त्यातल्या खाचा-खडग्याचा अंदाज घेऊन प्रभावी नियोजन करत. एकंदरीत शिकण्याची जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती  नि मोठ्यांचा आदार यातून पवार स्वत:ला घडवत गेले. याचा त्याना पुढील वाटचलीसाठी खूप फायदा झाला.
१९६४ मध्ये महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांच्याकडे आजून एक संधी चालून आली ती म्हणजे भारतीय युवक कॉंग्रेसच्या कार्यकारणीवर त्यांची निवड झाली. आता दिल्लीची दारं त्याना उघडी झाली. इंदिरा गांधी राष्ट्रिय युवक कॉंग्रेसच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा होत्या. १७ मे १९६४ हा दिवस अभूतपुर्व दिवस ठरला. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या “तीन मुर्ती” या दिल्लीतील निवासस्थानी सर्व राज्यांच्या युवक कॉंग्रेसच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. राष्ट्रिय नेत्याच्या संपर्कात येऊन देश पातळीवरचे काम समजावून घेण्याची व साक्षात पंतप्रधान यांच्या मार्गदर्शची संधी मिळाल्यामूळे तरुण भारावून गेले. पवार त्याला अपवाद कसे ठरतील. या भेटीमुळे पवाराना हुरुप आला अन ते झोकून देऊन कामाला लागले.
फूड फॉर वर्क:
पुणे जिल्ह्यातील बारामती तालूका हा आज जरी आपल्याला सुजलाम सुफलाम अन प्रचंड प्रमाणात औद्योगिकरण झालेला एक अत्यंत विकसीत तालूका म्हणून दिसत असला तरी साठच्या दशकापर्यंत मात्र या तालूक्याची ओळख राज्याती एक अत्यंत दुष्काळी तालूका म्हणूनच होती. सलग तीन तीन वर्ष पाऊसच पडायचा नाही. अन पडलाच तर वाहून जायचा अन ईथली जनता दुष्काळानी होरपळून निघायची. हीच अवस्था अनेक तालुक्यांची होती. कित्येक लोकं भूकेनी मरत असत. कित्येक जण पाण्यासाठी तडफत असत. अशा तहानलेल्या व भुकेल्या लोकांसाठी युनोस्कोद्वारा Food For Hunger ही योजना राबविली जात असे. या योजनेद्वारे दुष्काळग्रस्त लोकाना धान्य व पाम ऑईल हे खायचे तेल दिले जाई. हे सगळं फुकटात वाटल्या जाई. लोकं बिचारी तासन तास रांगा लाऊन हे अन्न घेत असत. पवारांच्या डोक्यात एक आयडीया आली की हे अन्न फुकटात वाटण्यापेक्षा या अन्नाच्या मोबदल्यात काम करवून घेता येईल व त्यातून तालुक्याचा विकास साधता येईल. एक दिवस पवार थेट युनोस्कोच्या मुंबई कार्यालयात धडकले. तिथल्या अधिका-याना भेटून आपला प्रस्ताव मांडला अन Food For Hunger ऐवजी Food For Work अशी संकल्पना समजावून सांगितली. तिथल्या अधिका-याना ही योजना व्यवहार्य वाटली नाही. तिकदा दूरदर्शीपणा त्यांच्याठायी नव्हताच मुळी.  त्यानी पवाराना म्हटले “प्रायोगिक तत्वार तुम्हीच ही योजना बारामतीत राबवा...” अन पवारानी ते आव्हान स्विकारले.
बारामतीत १९२५ पासून मिशनरी लोकानी एका चर्चच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी कार्य चालविले होते. पवारानी जोडीला या मिशनरी लोकांचाही हात मागितला अन Food For Work संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य सुरु झाले. “कामासाठी धान्य व अन्न” अशी ती योजना सुरु झाली. पवारांच्या दूरदर्शी नियोजनातून व धडाकेबाज निर्णयातून अभूतपुर्व घटना बारामती तालूक्यात घडली. 
पाझर तलाव:
बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे पहिला पाझर तलाव आकार घेऊ लागला. कामाच्या बदल्यात अन्न व तेल देणे सुरु झाले. आस पासच्या गावतल्या लोकानी या उपक्रमास भरभरुन साथ देताना अनेकानी पवाराना सहकार्याचा हाथ दिला. हा हा म्हणता तांदूळवाडीतील पहिला पाझरतलाव पुर्ण झाला अन त्या वर्षी पाऊस पडल्यावर हा तलाव भरुन वाहू लागला. पाणि अडवले गेल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढली. पाऊस येऊन गेल्या नंतर बारामतीकर थक्क झाले... या तलावाने चमत्कार केला होता. पाण्याची पातळी कमालीची वाढली याचा पुरावा परिसरातील विहिरीनी दिला. त्या वर्षी विहीरीना उशारा पर्यंत पाणि होते. यातून काय संदेश जायचा तो गेला अन लोकानी जागोजागी पाझर तलाव करावे याचा आग्रह धरला. पवाराना हेच हवे होते अन हा हा म्हणता १९६४ ते १९६६ या दोन वर्षात या भागात एकुन ३०० पाझर तलाव बांधण्याचा विक्रम शरद पवार नावाच्या झझांवातानी करुन दाखविला. यशवंतराव चव्हानानी पवारांची पाठ थोपटली. युनोस्कोनी पवारांच्या दूरदर्शी पणावर शिक्कामोर्तब करत त्यानी चक्क स्वत:च्या योजनेचे नाव बदलून टाकले अन Food For Work असे ठेवले. पवारांच्या या अभिनव कार्याचा सर्व स्थारातून सत्कार झाला अन त्याचा प्रतिध्वनी राज्याच्या कानाकोप-यात गुंजला. दुष्काळग्रस्त लोकांसाठी हा मोठा दिलासा देणारा उपक्रम ठरला अन खेड्या पाड्यातून लोकं हा उपक्रम पाहण्यासाठी बारामतीत येऊन धडले. हा हा म्हणता महाराष्ट्रभर ही बातमी गेली अन बारामतीचा आदर्श घेत राज्यात ईतरत्र पाझर तलावाचे काम सुरु झाले.

या वर्षी दुष्काळानी महाराष्ट्र होरपळून गेला आहे. पवारानी यावर १९६४ मध्येच उपाय सांगितला होता. पवारांच्या दूरदर्शीपाणातून महाराष्ट्रात पाझर तालावाचा नवा इतिहास घडला.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा