शुक्रवार, ३ मे, २०१३

बलुतं:- दया पवार

दया पवारांचं बलुतं तसं प्रचंड गाजलेलं पुस्तक. ग्रंथालीला प्रकाशन व्यवसायात जम बसवुन देणारं हे पुस्तक.  त्यानंतर उपरा व आमचा बाप... सारखी पुस्तक ग्रंथालीनी मराठी वाचकना दिली. मी उपरा व आमचा बाप... वगैरे पुस्तक खूप आधीच वाचली पण बलुतं तेवढं टाळत होतो. त्याला कारण काय तर मी बलुतची परिक्षण वाचलं होतं व ईतरांच्या तोंडून जे ऐकलं होतं त्यातून माझं मत असं बनलं की बलुतं म्हणजे “महारवाड्यातली लफडी” मग कशाला वाचायचं ते पुस्तकं?. कोणत्याही पुस्तकापेक्षा माझा प्रत्यक्ष अनूभव प्रचंड दांडगा की...!  महारवाड्यातली लफडी ईतरांकडून ऐकावी ते गैरमहारानी... ज्यांचं आयुष्यच तिथे गेलं त्याला काय गरज हे पुस्तक वाचायची? असा माझा एकंदरीत स्टान्स होता.
कधितरी बलुतं विकत आणलं होतं खरं पण उपरोक्त कारणामुळे ते न वाचता तसच पडलं होतं. परवा माझ्याकडे वाचायला एकही पुस्तक नव्हतं म्हणून अडगळीतून बलुतं काढलं. अन एवढे वर्ष हे पुस्तक न वाचल्याचा मोठा पश्चाताप झाला. तसं बलुतंमध्ये रेखाटलेला महारवाडाही माझ्यासाठी कित्येक बाबतीत नवा होताच म्हणजे मी अनुभवलेला महारवाडा व दगड्यानी १९३५-५५ पर्यंतचा बलुतं मधुन मांडलेला महारवाडा यात प्रचंड तफावत आहे. काही काही गोष्टीतर हादरवून सोडणा-या आहेत.
कावाखाना: बलुतंमधलं कावाखाना मनाला चटके लावून जातो. कावाखाना म्हणजे दया पवारांचं मुंबईतलं वास्तव्याचं ठिकाण. तिथेलं वातावरण, बायका, शेजारचे जुगाराचे अड्डे वगैरे... तरी सुद्धा त्याची दुसरी एक बाजूही येतेच व ती म्हणजे हे सगळं जरी असलं तरी कावाखाण्यातली माणसं कशी एकमेकांशी जुडलेली असतात याचे दिलेले अनेक संदर्भ सुखावणारे आहेत. त्यातल्या त्यात हाईट करणारा संदर्भ म्हणजे एक माणूस असतो ज्याची ठेवलेली बायको/बाई त्याच्या पगारावर डल्ला मारते खरं पण रात्री मात्र त्याला हातही लावू देत नाही. हे जेंव्हा कावाखानातल्या ईतर बायकाना कळतं तेंव्हा एकदिवस सगळ्या बायका बळजबरीनी त्या माणसाचं हनिमून घडवून आणतात... कसं? तर त्या बाईला सगळ्या बायका धरतात व खाटेवर झोपवतात. तीचे दोन हात दोन बायका धरतात व आजून दोन बायका पाय फाकवून धरतात... अन नव-याला  सांगतात... “आता तू चढ हिच्यावर...” अन तो तो चढतो. आई गं... हे वाचून हासून हासून माझी पार वाट लागली. एकंदरीत कहरच म्हणावं लागेल हे प्रकरण. कावाखान्यातले असे अनेक प्रसंग भन्नाट आहेत अन हेलावणारेही आहेत.
गावचा महारवाडा: बलुतंमध्ये पवारानी रेखाटलेला महारवाडा म्हणजे एक अनोखं विश्व. खरंतर माझं हेच मत होतं की एका महाराला त्या महारवाड्यांचं कसलं कौतुक? सगळ्यानाच माहित असतं तिथलं आयुष्य कसं असत ते. पण नाही... पवारानी रेखाटलेला महारवाडा आपल्या अनुभवातल्या व ऐकिवातल्या महारवाड्यापेक्शा नक्कीच वेगळा आहे. कारण ते सगळे अनुभव चक्क १९४० च्या दरम्यानचे आहेत. म्हणजे आजून बाबासाहेबांची बौद्ध धम्माकडॆ वाटचाल वा विचार व्हायचा होता तेंव्हाच्या त्या घटना आहेत. म्हणून त्या नक्कीच वाचनीय तर आहेतच पण अनेक अंगानी वेगळ्य़ा आहेत. महारवाड्यातली गटबाजी, तंटे, झगडे हे तर आहेतच पण आम्ही जे म्हणतो ना की महार बिचारे.... वगैरे साफ  धुवून काढणा-याही काही घटना आहेत. महार त्या काळात सुद्धा मराठ्यांशी कसा झगडा मांडून बसत व नेमक्या वेळेवर नडून प्रसंगी मराठ्याना जेरीस आणल्या जात असे याचं वर्णण जबरदस्त आहे. अरे वर कारे करणा-या त्या घटना म्हणजे महार समाज कसा लढवय्या होता याचे पुरावेच आहेत.
महारांची बढाई: महार समाज बढाई मारण्यात तेंव्हाही कसा मागे नव्हता याचे अनेक उदाहरण व घटना बलुतंमध्ये आढळतात. आपण थेट पांडवांचे वंशज आहोत असा अभिमान बाळगणारे व त्यावरुन दिवस रात्र चकाट्या पिटणारे महार पवारानी मस्त रेखाटले आहेत. तेवढ्यावरच थांबतील ते महार कसले. दिल्लीत म्हणे पांडवांचे एक सिंहासन आहे अन ते अत्यंत गरम आहे... किती गरम? तर त्यावर मके टाकले की त्याच्या लाह्या होतात ईतके ते गरम आहे म्हणे... त्या सिंहासनावर कोणीच बसू शकत नाही... पण बाबासाहेब मात्र त्या सिंहासनावर बसू शकतात! त्या काळात अशी कथा महारवाड्यात सांगितली जायची म्हणे. हे वाचल्यावर हासून हासून माझी पुरेवाट झाली. त्याच बरोबर बहमणी राजाकडून मिळालेल्या ५२ अधिकाराची कथाही भन्नाट वाटली. असे अनेक किस्से आहेत.
अनैतिक संबंध: ओघानेच अनैतिक संबंधही येणारच... पण त्यातल्या त्यात दोनचार घटना मात्र धक्कादायक आहेत. मराठ्यांच्या बायका महारासोबत झोपायच्या असा संदर्भ येतो. हे वाचून मी उडालोच. खेडेकरांचं पुस्तक वाचून माझं साधारण मत असं झालं होतं की मराठ्यांच्या बायकाना सहसा बाहेर जाण्याची गरज पडत नाही. पण दया पवारानी हे सगळं उडवून लावलं. असा काही नियम नसतो हे अधोरेखीत केलं. कहर म्हणजे ह्या मराठ्यांच्या बायका ज्या महारा सोबत झोपायच्या त्या ईतर वेळी मात्र विटाळ पाळायच्या. अगदी पिण्याचे पाणी सुद्धा त्या पुरुषाला वरुन ओंजळीत टाकायच्या अन एकांत मिळाला रे मिळाला की मग लगेच कवटाळायच्या...  त्या काळात मराठा बायका महारासोबत झोपायच्या हे  वाचून मी प्रचंड हादरलो. 

या पुस्तकात एकसे बढकर एक अशा नवनवीन गोष्टी लिहलेल्या आहेत. महारांच्या पोराना शिक्षणासाठी वसतीगृह तयार करुन दिल्यावर पोरं मास्तराशी झगडायची... कशासाठी? तर म्हणे त्याना फीस्ट हवं असायचं. बापरे. म्हणजे हे फीस्टचं खूळ तेंव्हासुद्धा होतं म्हणायचं. पण त्याच बरोबर शिक्षण घेण्याची जिद्दही महारात ईतरांपेक्षा तौलणिकदृष्ट्या अधिक होती व त्याचे परिणामही कसे दिसू लागले हे या पुस्तकातून अत्यंत प्रभाविपणे मांडले आहे. अगदी पवारांसोबत शिकणारे अनेक विध्यार्थी सरकार दरबारी अधिकारी झाल्याचे संदर्भ वाचून बरे वाटते. 
आंबेडकर चळवळीला बगल: या पुस्तकातील एक महत्वाची गोष्ट अशी की बलुतंमध्ये आंबेडकर चळवळीबद्द्ल काहीच नाही. जेंव्हा की या काळात आंबेडकर चळवळीचे वारे देशभर घो घो करत जात होते तरी दया पवाराना त्याचा स्पर्श तेवढासा झाल्याचे जाणवत नाही. थोडेफार संदर्भ येतात खरे पण तेवढ्या पुरताच येतात. पण भाऊसाहेब गायकवाडांचे मात्र जागोजागी संदर्भ आले आहेत. अन भाऊसाहेब हे त्यांचे आदर्श असल्याचंही कुठेतरी एका वाक्यात लिहलं आहे.  देव सोडण्याची प्रक्रिया व अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे संदर्भ ईथे आहेत.
यापलिकडे बलुतंमध्ये बरच काही आहे. महारांची त्या काळाची जिवनशैली कशी होती याचं ते डॉक्यूमेंटेशनच आहे. तर त्याच बरोबर ईतर समाजाचंही बरच वर्णन येतं. अनेक कारणासाठी वाचावं असं एक मस्ट रीड पुस्तक आहे हे...!
नक्की वाचा!!!

२ टिप्पण्या:

  1. बलुतं मध्ये एक वाक्य आहे," मुसलमानही अस्पृश्यता पाळतात ..हे पाहून मी उडालोच!" पु.ल.देशपांडे यांचा अभिप्रायही सर्वांनी वाचावा असा आहे.

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. खैरमोडे लिखीत बाबासाहेबांच्या चरित्रात औरंगाबदची एक घट्ना येते. बाबासाहेब नाशिकहून आपल्या कार्यकर्त्यांसकट औरंगाबाद जवळचा दौलताबाद किल्ला पाहायला जातात. त्याना तहान लागते तेंव्हा तिथल्या विहिरीतन/ की तलावतनं (मला आता निट आठवत नाहीये) पाणि पिल्यावर मुसलमान लोकं ओरडा करतात व बाबासाहेबांच्या अंगावर धावून जातात. महारानी आमचं पाणि बाटवलं म्हणून हमरी तुमरीवर येतात. नंतर बाबासाहेबानी आपल्या भीम स्टाईलनी समाचार घेतला तो भाग वेगळा. पण मुसलमान अस्पृश्यता पाळायचे हे मात्र नक्की.

    प्रत्युत्तर द्याहटवा