शुक्रवार, १० मे, २०१३

कबीर कला मंच आणि आंबेडकरवाद...!

सध्या कबीर कलामंचच्या कलाकारांची धरकपड सुरु आहे. शितल साठे अन सचिन माळीनी मुंबईत शरणागती पत्करल्यावर तपासाला वेग आला. आनंद पटवर्धन म्हणतात की ही शरणागती नसून सत्याग्रह आहे. ककम(कबीर कला मंच) च्या कलाकारांचा हा म्हणे सत्याग्रह होता... अरेच्चा... आता हा कसाला सत्याग्रह? अन कोणाच्या नेतृत्वात? हे मात्र आनंद पटवर्धन सांगायला विसरले. शितल साठे व सचिन माळी व्यतिरीक्त आजून चार नावं देताना पटवर्धन म्हणतात... “सागर गोरखे, रुपाली जाधव, रमेश गाईचोर व ज्योती जाधव हे सगळे प्रकाश आंबेडकर व ईतर आंबेडकरी कार्यकर्त्यां सोबत बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ एकत्र आले नि तिथून मंत्रालयात जाऊन आबा पाटलांची भेट घेतली. लाल सलाम नावाचं क्रांती गीत म्हणून सत्याग्रह केला...” वगैरे लिहतात. ही तर चक्क बनवेगिरी आहे. काल सलामचा अन आंबेडकरवाद्यांचा तर काही संबंधच नाही. मग हे अचानक निळ्या रक्ताची माझी माणसं लाल सलाम कसं काय बुवा गाऊ लागले? ककम आपली फसवणूक करत आहे अन हे निर्विवाद असून ते मान्य केलेच पाहिजे.
कबीर कला मंचाचे कलाकार कपाळावर निळी पट्टी बांधतात अन गीत मात्र कम्युनिस्टांचे गातात... मुळात हेच चूक आहे. बाबासाहेबांची लेकरं कधीच कम्युनिस्ट नव्हती. भारतातली कम्युनिस्ट चळवळ ही ब्राह्मणी चळवळ होती.  ब्राह्मण लोकानी बहुजनाना हाताशी धरुन केलेल्या या चळवळीला बाबासाहेबानी नेहमीच धारेवर धरले होते. अन या सगळ्या कम्युनिस्टांचा जनक कार्ल मार्क्स याचा तर बाबसाहेबानी चक्क एक पुस्तक लिहून समाचार घेतला. बाबासाहेबा त्यांच्या पुस्तकातून(कार्ल मार्क्स की बुद्ध) कार्ल मार्क्सच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर दिले आहे. कार्ल मार्कची थेअरी, त्याचे सिद्धांत व त्यावरील उपाय हे सगळ अव्यहार्य आहेत हे सांगताना बाबासाहेब हे ही निक्षून सांगतात की कम्युनीज्मची पायाच मुळात चुकीचा असल्यामूळे तॊ फार काळ तग धरु शकणार नाही. अन आज आपण पाहतोच की जगातले सगळेच कम्युनिस्ट राष्ट्रानी कम्युनिज्म सोडून वेगळ्या वाटा शोधल्या आहेत. थोडक्यात मार्क्सिज्म वा कम्युनिज्म हा मानवी समाजाला मिळाला शाप आहे. अन तो शाप चक्क आंबेडकरी जनतेत रुजविण्याच पाप कोण करत आहे तर कबीर कला मंच.  ज्या कमुनिस्टाना बाबासाहेबानी वा-याला उभं नाही केलं ते चक्क आता बाबासाहेबांच्या चळवळीत घुसत आहेत. याचा परिणाम काय तर आंबेडकरी चळवळ उध्वस्त करायची अन कम्युनिज्म (ज्याला बाबासाहेबांचा विरोध होता)रुजवायचा.
कबीर कला मंचच्या कलाकाराना काय करायचं ते त्यानी करावं. पण ते जर कम्युनिस्टांच लाल सलाम गाणार असतील तर त्यानी निळी पट्टी उतरवावी. कारण निळी पट्टी ही आंबेडकरी जनतेची व चळवळीची ओळख आहे. त्याच बरोबर या निळया पट्टीने आजवर अनेक सत्याग्रह करताना स्वत:चं रक्त सांडलं तरी दुस-यावर हात उगारला नाही. सत्याग्रहाची एक तेजस्वी परंपरा चालविणारी निळी पट्टी कम्युनिस्टानी डोक्यावर लावावी हे आंबेडकरी जनतेस अमान्य आहे. आंबेड्करी समाज कधीच कम्युनिजमचा समर्थक नव्हता व पुढेही नसेल. बाबासाहेब खुद्द कम्युनिजमचा कडाडून विरोध करत असत. त्यामुळे कबीर कला मंचाच्या कलाकारांच्या डोक्यावर निळी पट्टी अन तोंडात लाल सलाम म्हणजे हा चक्क बाबासाहेबांचा अपमान आहे. त्याना लाल सलाम गायचंच असेल तर त्यानी खूशाल गावं.... फक्त ती डोक्यावरील निळी पट्टी उतरवावी. बास!

आम्ही जयभीमवाले आहोत... आमचा लाल सलामशी काही संबंध असूच शकत नाही. हे सर्वानी ध्यानात घ्यावे.

****

1 टिप्पणी: