सोमवार, १३ मे, २०१३

जयभीम कॉम्रेडआनंद पटवर्धन निर्मीत या माहितीपटाला देश-विदेशातले अनेक पुरस्कार मिळाले असून भारत सरकारचाही पुरस्कार मिळाला आहे. याचा एकंदरीत प्ररिणाम असा होत आहे की आंबेडकरी समाजाला हा माहितीपट आपला वाटत असून आनंद पटवर्धनानी आंबेडकरी समाजासाठी एक भरीव कार्य केल्याचा सर्वत्र प्रचार केला जात आहे. या प्रचारातील एक भाग म्हणजे अनेक ठिकाणी आंबेडकरी संघटना या माहितीपटाचे जाहीर खेळ दाखवत असून हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याची जणू चळवळच उभी केली जात आहे. परवा पटवर्धन साहेबांशी चॅट करताना या चित्रपटा बद्दल मी आपली नाराजी व्यक्त केल्यावर पटवर्धन साहेब मला म्हणाले “आधी तुम्ही हा माहितीपट बघा... नंतर आपण बोलूया” अन लगेच दुस-या दिवशी त्यानी “जयभीम कॉम्रेडची” DVD माझ्या पत्यावर पाठवून दिली. ते पाहिल्यावर आता हे परिक्षण...
जयभीम कॉम्रेड:
या माहितीपटाचे नाव आहे जयभीम कॉम्रेड. माझा पहिला आक्षेप या नावालाच आहे. कारण जयभीम आणि कॉम्रेड या दोन गोष्टी परस्पर विरोधी गोष्टी आहेत. जयभीम हा आंबेडकरवाद्यांचा शूभघोष आहे तर कॉम्रेड ही कम्युनिस्टांची उपाधी आहे. तर काय झालं? पण हे सगळं एवढं सोपं नाहीये. आंबेडकरवादी हा संविधान प्रिय समाज असून तो सत्याग्रहाच्या मार्गानी जाणारा एक सत्याग्रही समाज आहे. अगदी याच्या उलट कम्युनिस्टाना संविधान मान्य नसून ते रक्तरंजीत क्रांतीवर विश्वास ठेवणारे अन रक्ताची होळी खेळणारे क्रांतीकारी आहेत.  म्हणून आंबेडकरवादी हा कॉम्रेड असूच शकत नाही.  अन त्याच प्रमाणे कुठलाही कॉम्रेड हा आंबेडकरवादी असूच शकत नाही.
आंबेड्करवादी म्हणजे काय, त्याची व्याख्या काय?
बुद्धाचा धम्म, संविधानाचा अवलंब. न्यायपालिकेवर विश्वास अन सत्याग्रहाची कास. हे ज्याला मान्य तो आंबेडकरवादी. आंबेडकरवादाची एवढी सरळ व सोपी वाख्या आहे अन ही माझी स्वत:ची व्याख्या आहे. या व्याखेची व्यापकता प्रचंड मोठी आहे.  पहिली अट काय तर बुद्धाचा धम्म मान्य असावा. कारण धम्म स्वातंत्र्य, समता व बंधूता शिकवतो. दुसरी अट काय तर प्रत्येक कृती ही संविधानिक मार्गानेच व्हावी. तिसरी अट म्हणजे न्यायपालिकेवर विश्वास ठेवलाच पाहिजे. अन चौथी अट म्हणजे एखादी गोष्ट अमान्य असल्यास व त्याचा विरोध करायचा असल्यास सत्याग्रहाच्या मार्गानी करावा. तोच एकमेव अधिकृत मार्ग आहे. अशी आहे आंबेडकरवादाची व्याख्या.
कम्युनिस्ट म्हणजे काय? अन कॉम्रेड म्हणजे कोण?
कम्युनिस्ट म्हणजे तो, जो कार्ल मार्क्सच्या सिध्दांवर विश्वास ठेवतो. म्हणजेच “The Communist Manifesto” यावर ज्यांचा विश्वास आहे. हा मेनिफेस्टॊ म्हणजे मार्क्सवाद्यांचा स्वत:चा स्वतंत्र संविधानच आहे. काय म्हणतो हा संविधान? संपत्तीचे समान वाटप, धर्माचे निर्मूलन, मजूरवर्गाची हुकूमशाही अन त्यासाठी रक्तरंजी क्रांती. हे ज्याला मान्य आहे तो कम्युनिस्ट. अन या कम्युनिस्ट संघटनेचा सैनिक (कार्यकर्ता नाही बरं का) म्हणजे कॉम्रेड. कॉम्रेडचा अर्थच आहे सह-सैनिक. मग सैनिक म्हटल्यावर सांगायची गरजच उरत नाही की त्याचे काम काय असते ते. बंदूक आलीच, उठाव आलाचा, रक्तपात आलाच. आंबेडकरी मात्र सैनिक नसतात. ते एकतर कार्यकर्ते असतात वा सत्याग्रही असतात. हा एवढामोठा बेसीक फरक आहे.
“बुद्ध की कार्ल मार्क्स” या पुस्तकात बाबासाहेब लिहतात “कम्युनिस्टना समता हवी आहे पण त्याना स्वातंत्र्य व बंधूत्व मान्य नाही” हे सांगताना बाबासाहेब पुढे म्हणतात “मजूरांचे राज्य असले तरी विरोध करण्याचं स्वांतंत्र्य कमुनिस्टाना मान्य नाही. समता असली तरी त्यात बंधूभावाचा अभाव आहे” म्हणजे तुम्ही विरोध केला तर निर्दयपणे तुमचं शिरकान करण्याची निती कमुनिस्टांची आहे. त्यामुळे कम्युनिस्टांची समता काही कामाची नाही. हे बाबासाहेब सांगून गेलेत.
...तर हा आहे मुलभूत फरक आंबेडकरवाद आणि कम्युनिस्ट यातला. म्हणून या माहितीपटाचं नावच चुकलं. एकतर ते कॉम्रेड असावं किंवा जयभीम असावं. दोन्ही संकल्पना परस्पर विरोधी असल्यामुळे जयभीम कॉम्रेड हे नावच चुकीच असून ती निर्मात्यानी आंबेडकरी समाजाशी केलेली लबाडी आहे. जयभीमवाल्याना सैनिक बनवून कापाकापीच्या संस्कृतीत रोवण्याचं हे काम पटवर्धनानी केलं. त्यानी ते नावं बदलावं. कारण आंबेडकरी हा कॉम्रेड असूच शकत नाही.
... माहितीपटाची सुरुवात होते ते शाहीर विलास घोगरे यांच्या तंबोरा वदनाच्य विद्रोही गाण्यानी व रस्त्यावर उतरलेल्या रंजल्या गांजल्यांच्या निदर्शनानी. खाली सबटायटल्स सरकत असतात. अगदी १ मिनिट ०५ सेकंदावर एक सबटायटल येते “झूठे संसद को तोडो...” अन मी हादरुनच गेलो. हा मप (माहितीपट) कोणाचा आहे व पुढे काय असेल याचा अंदाज येथेच येतो. जयभीमवाले कुठलाही प्रश्न संसदीय मार्गाने सोडवत असतात. पण हा मप चक्क म्हणतो “झुठे संसद को तोडॊ" मुळात आमची संसद झूठी आहे का? आम्हा सर्वांची श्रद्धा जिथे आहे व या लोकशाहीचा जो मानबिंदू आहे त्या संसदेला झूठी म्हणतात त्याचा काही पुरावा दिला आहे का? अजिबात नाही. नुसतं झूठी संसद म्हणत आमच्या संसदेचा अपमान करण्याचे काम पटवर्धनानी केले. अन माथी मारले कुणाच्या तर आंबेडकरी समाजाच्या. आंबेडकरी समाज तर संसदेवर प्रगाढ श्रद्धा ठेवून लढा उभारणारा एक संविधानप्रिय समाज आहे. मग हा समाज संसेदेला झूठी संसद म्हणणार का? अजिबात नाही. त्याही पुढे जाऊन संसदको तोडो असं म्हणणार का? शक्यच नाही. मग आंबेडकरी समाजाच्या तोंडून संसदेला तोडण्याची भाषा कोण बोलतोय? तर ही भाषा बोलतोय कॉम्रेड... म्हणजेच कम्युनिस्ट... म्हणजे संसदेवर ज्याचा विश्वास नाही, लोकशाहीवर ज्याच विश्वास नाही अन त्याच बरोबर सत्याग्रहाचा मार्ग ज्याना मान्य नाही अन रक्ताची होळी खेळण्याची ज्यांची प्रथा आहे ते कम्युनिस्ट बोलतात या गाण्यातून...  
माप पुढे सरकतो अन १ मिनिट ११ सेकंदावर आजून एक सबटायटल येते “नारा लगओ इंकलाब का”  आमच्या बापदादानी शंभर वर्षापासून अनेक चळवळी केल्या. लाठ्याकाठ्या खाल्या. वेळप्रसंगी स्वत:चं रक्त सांडलं, जेलात गेले. तरी आम्ही कधी कोणावर हात उगारला नाही. ती माची प्रथाच नाही. एवढं झालं तरी आंबेडकरवादी कधीच इंकलाब म्हणाले नव्हते अन म्हणणारही नाही. जगातीळ सर्वात मोठी क्रांती बाबासाहेबानी घडवून आणली. पण रक्ताचं एक थेंब सांडलं नाही. पण ईथे चक्क निळीपट्टीवाले इंकलाब म्हणत आहेत. आता मात्र खबरदार होण्याची वेळ आली. कारण हा मप काहीतरी भलताच आहे हे माझ्या लक्षात आले. हा आंबेडकरी नावाखाली तयार केलेला कम्युनिस्टांचा प्रचारपट आहे.
शाहीर विलास घोगरे
१५ जुलै १९९७ रोजी दलित शाहीर विलास घोगरे यानी आत्महत्या केली. ११ जुलै १९९७ रोजी घाटकोपर येथील दलित हत्याकांडाचा निषेध म्हणून विलास घोगरे यानी आत्महत्या केली होती. हा विलास घोगरे जरी दलित समाजातला होता तरी तो आंबेडकरवादी नसून तो कम्युनिस्ट होता हे ध्यानात घेणे महत्वाचे आहे. त्याची आत्महत्या म्हणजे आंबेडकरवादाचा अभाव नि कम्युनिजमचा प्रभाव याची परिणीती होती. आज पर्यंतची आंबेड्करी चळवळ पाहिली तर घाटकोपर हत्याकांडा सारखे अनेक कांड आमच्यासोबत नेहमीच घडत असतात. पण आंबेडकरी समाज त्यावर उपाय म्हणून आत्महत्या करत नाही, तर मोठया धैर्याने उभा राहतो अन संविधानीक मार्गाने सत्याग्रह करतो. आज पर्यंत आंबेडकरी समाज फक्त अन फक्त सत्याग्रहाच्याच मार्गाने लढत आला आहे. आमच्या बापानी... बाबासाहेबानी आम्हाला तोच मार्ग शिकवला आहे.
विलास घोगरे मात्र चक्क आत्महत्या करतो, का? कारण कम्यूनिस्ट लोकानी त्याची दिशाभूल केली. याच माहितीपटात आजुन एक सबटायटल येते.... “१९८० च्या दशकात तो कम्युनिस्टांकडे वळला” यातच सगळं आलं. विलास घोगरेनी आंबेडकरवाद सोडला अन कम्यूनिस्ट बनला हे वरील वाक्य अधोरेखीत करतं. थोडक्यात संयत, धीरगंभीर नि सत्याग्रहाच्या मार्गाचा त्याग करुन तो असंविधानिक, क्रांतिकारी नि रक्तरंजीत मार्गावर जाऊन ठेपला. अन त्यातून केली आत्महत्या. दोषी कोण, सरकार का? नाही. विलास घोगरेच्या आत्महत्तेचे खरे दोषी आहेत कम्युनिस्ट. हाच विलास घोगरे जर आंबेडकरवादी असता तर त्यानी आत्महत्या केलीच नसती.  त्यानी संयम दाखवत नि संविधानीक मार्गाचा अवलंब करत सत्याग्रह केला असता. थोडक्यात ही आत्महत्या म्हणजे कम्युनिस्टांचे पापक आहे. संविधानिक मार्गाने लढणा-या आंबेडकरी समाजाला रक्तरंजीत मार्गावर नेऊन उभा करणारा कम्युनिस्ट यानी विलास घोगरेंची हत्याच केली म्हणावी लागेल.
... अशा प्रकारे विलास घोगरे पासून सुरु होणारा हा माप जसजसा पुढे सरकतो तसतसा एक एक दलित मुद्दे पुढे करतो. १८ व्या मिनटात येतं कचरा गाड्यावर काम करणा-या दलितांचं चित्रण. अत्यंत हृदय द्राव चित्र पाहून मन हेलावून जातं खरं. त्या नंतर रमाबाई नगर मधील हत्याकांडापासून तर भाई सांगारेची भाषण असा होत दुस-या भागात येऊन ठेपतो ते कबीर कला मंचच्या कार्यक्रमा पर्यंत. हा सगळा माप पुढे सरकत असताना ड्फचा ताल मात्र सतत वाजत असतो. तो ठेका सुरुवातीपासून तर शेवट पर्यंत अशा काही रितीन एडीटींग करुन बसवला की त्याला तोड नाही. त्यासाठी मात्र मी पटवर्शनांचं कौतूकच करेन. त्यानी दिलेली एकंदरीत माहीती नि १४ वर्षातील शुटींगचं सातत्य या सा-या गोष्टी या मापटील जमेच्या बाजू तर आहेतच पण ज्या चिकाटीने पटवर्धनानी ते केलं त्याला तोड नाही. फक्त विरोध कुठे आहे तर या सगळ्या घटनांचा वापर कम्युनिस्टांच्या प्रचारासाठी करताना केलेली ती मांडणी व आंबेडकरवाद्यांचा कॉम्रेड म्हणून केलेलं बारसं... हे अमान्य आहे. याचा विरोध झाला पाहिजे.
डफ आणि क्रांतीगिते
भारतातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ही चळवळ व्याख्यानं, शिबीरं नि सत्याग्रह अशा वाटचालीचा वारसा बाळगते. बाबासाहेब म्हणायचे माझी दहा भाषणं एकीकडे अन तुमचा एक जलसा एकीकडे. यावरुन लोकं म्हणतील जलसा केवढं महत्वाचं. पण यातलं सत्य हे की लवकरच आंबेडकरी चळवळीने जलश्यांचे रुपांतर शिबीरात करुन टाकले. कॅडर कॅंम्प प्रकार  सुरु झाला. अन त्यातून निर्माण झालेला आंबेडकरी संविधानिक मार्गाने लढताना सत्याग्रही बनत गेला. जलसे उरले केवळ नावा पुरतीच.
पण याऊलट कम्युनिस्टांची चळवळ ही डफ घेऊन क्रांती गीते गाण्यावर भर देऊ लागली. लाल सलाम ठोकत रक्तरंजीत लढा उभारण्यावर कम्युनिस्टानी भर दिला. म्हणजे कम्युनिस्ट्नी व आंबेडकरवाद्यानी अगदी बाबासाहेबांच्या काळापासूनच परस्पर विरोधी दिशेने प्रवास सुरु केला. या मापत आंबेडकरवाद्यांची ही तेजस्वी प्रथा अजिबात दाखविण्यात आली नाही. आंबेडकरी समाज हा शिबीरातून, कॅडर कॅम्पातून वा साहित्यातून घ्डात गेला याचं कुठेच चित्रण नाही. आंबेड्करी माणूस एक संयत चळवळ उभारत गेला याचा अजिबात आढावा नाही. आमच्या चळवळीच्या सर्व बाजू झाकण्यात आल्या नि कम्युनिष्टांच्या बाजू आमच्या म्हणून दाखविण्यात आल्या. जे जे दाखवले ते सगळं गाण्यातून व डफच्या तालातून दाखविण्यात आले. फरक एवढाच की या डफच्या तालावर गाणारे व वाजविणारे  निळ्या पट्ट्या बांधलेले आहेत. म्हणजेच आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली कम्यूनिजमचा प्रचार करण्याची लबाडी आनंद पटवर्धन करतात. खरंतर त्यानी उघड उघड सांगायला हवं होतं की हा माप म्हणजे भारतीय कम्युनिजमचा प्रवास सांगणारा अधिकृत दस्तावेज आहे.
साहित्यिक व लेखकांचा एकही संदर्भ घेतला नाही.
जयभीम कॉम्रेड हा माहितीपट पाहताना अत्यंत खटकणारी गोष्ट म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली बनलेल्या या प्रोडक्टमध्ये आमचा साहित्यिक वारसा अजिबात दाखविला नाही. याचे कारण काय असावे. त्याच्या  दोन शक्यता आहेत. एक तर आमचा साहित्यिक प्रवास पटवर्धनाना अमान्य असावा. किंवा हा माहितीपट आंबेडकरवाद्यांचा नसून तो कम्युनिस्टांचा आहे हे आडमार्गानी पण ठणकावून सांगायचं होतं. मागच्या दोन हजार वर्षात जेवढी साहित्य निर्मीती झाली नाही तेवढी आम्ही लोकानी मागच्या ६० वर्षात केली. आंबेडकरी समाज अत्यंत वेगाने प्रगती करण्याचे कारण म्हणजे वाचनातून आलेली सजगता. आमच्या या सजगतेवर या चित्रपटात ब्र शब्द नाही. का? ते पटवर्धनच जाणे. कम्युनिस्टांच्या परंपरेत लेखनीला महत्व नसून तलवारीची व बंदूकीची परंपरा आहे. आंबेडकरी समाजाची साहित्यक चळवळ त्यामुळेच या माहितीपटात वर्ज्य ठरली असावी. तात्पर्य हा माप आंबेडकरी समाजावर आधारीत नसून तो कम्युनिजमचं कथन करणारा माप आहे. पण हा कम्युनिस्ट प्रोडक्ट आहे म्हटल्यास लोकं याला फाट्यावर मारतील म्हणून कॉम्रेडच्या आधी जयभीम लावण्याची शक्कल आनंद पटवर्शनाने लढविली आहे.
कबीर कला मंच
या मापतील दुस-या भागातील शेवटचा अर्धा तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ देण्यात आला ते कबीर कला मंचचा प्रचार करण्यासाठी. कबीर कलामंचचे कलाकारही आंबेडकरी वारसा सांगत नाहीत वा त्यांच्या गाण्यातून आंबेडकरी गीत येत नाहीत. त्यांची गीतं नीट लक्ष देऊन ऐकल्यास हे लक्षात येईल की कबीर कलामंचाचे कलाकार हे कम्यूनिस्टांची गाणी गात आहेत. अधे मधे बाबासाहेबांचं नाव जरूर घेतात पण ती गीते संविधान विरोधी, न्यायपालिका नाकारणारी नि सत्याग्रपासून दूर जाणारी आहेत. त्याच बरोबर ईथे राजकीय कायापालट असायला हवा म्हणताना क्रांती घडविण्याचा आशय असणारी ती सर्व गाणी कम्युनिस्टांचा अजेंडा राबविणारी आहेत. अगदी या उलट आंबेडकरी गीत हे संविधानाचे गुणागाण गाणारी, न्यायपालिकेचा सन्मान करणारी नि वेळच आली तर सत्याग्रहाच्या मार्गाने प्रश्न निकाली लावणारी असतात. मुलभूत फरक आहे तो विचारसरणीचाच. थोडक्यात कबीर कला मंच ही संघट्ना आंबेडकरवाद्यांची नसून कम्युनिस्टांची आहे. अन कम्युनिस्टांचा जगभराचा इतिहास पाहता त्याना रक्तरंजीत क्रांतीचा वारसा लाभला आहे.  कम्युनिस्ट हे नेहमीच संविधान विरोधी कार्यक्रम राबवित असून रक्तरंजीत क्रांतीचे आग्रही असतात. कबीर कला मंचाच्या विस्तारातून उद्या रक्तरंजीत क्रांतीवर विश्वास ठेवणारा समाज उभा होईल हे निर्विवाद सत्य आहे. महाराष्ट्र सरकारनी कबीर कला मंचाला वेसन घालण्याचे काम केले ते एका अर्थाने बरेच झाले.
अंतीम सार:
जयभीम कॉम्रेड हा माहितीपट आंबेडकरी समाजाचा वा त्यांच्या कार्याचा नि वाटचालीचा आढावा घेणारा माहितीपट नसून आंबेडकर चळवळीतील काही घट्नांचा केवळ आधार घेण्यात आला आहे. या माहितीपटातून कम्युनिजमची पायाभरणी करण्याचा प्रयत्न करताना आंबेड्करी समाजाला त्याचा भाग म्हणून दाखविण्याची मल्लीनाथी करण्यात आली आहे. भाषणं, शिबीरं आणि पुस्तकं यातून प्रचार व प्रसार करण्याचा वारसा जपणा-या आंबेडकरी चळवळीच्या तेजस्वी परंपरेचा स्पर्शही या माहितीपटाला नसून कम्युनिस्ट धाटणींची गाणी, डफ नि क्रांतीकारी  चळवळीचा भरणा यात आहे. या माहितीपटात सर्वत्र कॉम्रेडांचा(संविधान झुगारणा-यांचा) भरणा असून ते कॉम्रेड वाट भटकलेले महार होते. अशा वाट भटकलेल्या महारांचा फायदा उचलत डोक्यावर निळीपट्टी व तोंडात कम्युनिस्टांचे क्रांतीगीत असा तर्कविसंगत प्रकार या माहितीपटातून मांडण्यात आला आहे. आमच्या साहित्यिक क्रांतीला व सत्याग्रहाच्या मार्गाला फाट्यावर मारत ड्फ वाजविणे व क्रांतीगित गाणे एवढेच काय ते दाखविण्यात आले नि ते आमच्या नावावर दाखविण्यात आले हे दुर्दैव. जी लोकं या माहितीपटाला आंबेडकरवादी व दलितांचा माहितीपट म्हणून पाहायला जातील त्यांचा प्रचंड गोंधळ उडणार. पण जे लोकं हा कम्युनिस्टांचा माहितीपट असून त्यात अधेमधे आंबेडकरी समाजाच्या व्यथाही जोडल्या आहेत याची जाण ठेवून पाहितील त्याना एक गोष्ट लक्षात येईल की... हा सिनेमा म्हणजे जयभीम कॉम्रेड नसून तो फक्त कॉम्रेड आहे. अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्रेड हा संविधान विरोध असतो तर जयभीमवाला हा संविधानप्रिय असतो. 
पटवर्धन साहेबानी अत्यंत कष्ट घेऊन सतत १४ वर्षे राबून हा माहितीपट काढला त्यासाठी त्यांचे कौतूकच पण तो कारण नसताना आंबेडकरी समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचा निषेधही करतो. या माहितीपटातून आंबेडकरी चळवळीचा फायदा तर होणार नाहीच पण आमची एक नवीन ओळख होण्याची शकत्या आहे. आजवर आम्हाला लोकं वैचारीक चळवळीचा समाज म्हणून ओळखत... मात्र आता ड्फ वाजविणार म्हणून ओळखू लागतील. ज्याना विश्वास बसत नाही त्यानी नक्की बघावं नि खात्री करुन घ्यावी.

माहितीपटाचा उद्देश:- या माहितीपटाचा उद्देश काय तर आंबेडकरवादी बांधवाना सशस्त्र क्रांतीकडे वळविणे. आजवर ईथे हाच एक समाज असा आहे तो ईतरांच्या तुलनेत जास्त एकवटलेला तर आहेच पण लढाऊही आहे. फक्त फरक एवढाच आहे की तो आजवर सत्याग्रहाच्या मार्गाने लढतो आहे. त्याला तिथून खेचून रक्तपाताच्या मार्गावर नेऊन ठेवण्याचा हा कम्युनिस्टांचा डाव आहे. तो आपण वेळीच ओळखावा नि कम्युनिस्टांपासून दूर व्हावे. त्याच बरोबर कबीर कला मंचापासूनही आपण दूर राहावे.


जयभीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा