शुक्रवार, १० मे, २०१३

एका आंबेडकराचा प्रवास कम्युनिज्मकडे? केवढे दुर्दैव!

खैरलांजी प्रकरणावरुन जेंव्हा नागपूर बंद पुकारण्यात आले होते तेंव्हा आंबेडकरी कार्यकर्त्यांवर लाठीमार करत यामागे नक्षलवाद्यांची फूस आहे असा अरोप ठेवण्यात आला होता. त्याच बरोबर अनेक कार्यकर्त्याना नक्षलवादी घोषीत करत तुरुंगात डांबले होते. तेंव्हा मात्र आम्ही सगळे जागो जागो पोलिसांचा निषेध करत रस्त्यावर उतरलो होते. आमच्यावर तो अन्याय होता व पोलिसानी ठेवलेला खोटा अरोप होता हे सर्व स्थारांतून ऐकू येत होते. आज मात्र फिरून त्याचा विचार करताना वाटते पोलिसांचा अरोप अल्पशा का असेना खरा होता की काय? कारण त्या आंदोलनातून एका स्वंतत्र संघटनेचा जन्म झाला.  त्या संघटनेचं नाव आहे कबीर कला मंच... कुठे आहे? तर पुण्यात! कोणी जन्मास घातली? कम्युनिस्टानी. म्हणजेच... बाबासाहेबांच्या कट्टर विरोधकानी. हो कम्युनिस्ट हे बाबासाहेबांचे कट्टर विरोधक व शत्रू होते. कारण बाबासाहेबानी मुंबईतील गिरणी कामगारांची चळवळ कम्युनिस्टांचा हातून खेचून नेली होती. कारण बाबासाहेब म्हणत "कम्युनिस्ट हे गरीबांचं कल्याण नाही तर त्यांचं वाट्टोळं करणार...!" अन याच लाल सलामवाल्यानी बाबासाहेबांवर चक्क हल्ला करण्याचा डाव आखल्यामुळे बाबासाहेबाना मुंबई सोडून दोन महिने बाहेर राहावं लागलं. चक्क भुमिगत व्हावं लागलं. हे ते लाल सलाम ठोकणार कम्युनिस्ट.... अन आज ते चक्क कबीर कला मंचाच्या नावानी आमच्या चळवळीत घुसले अन निळया पट्ट्या बांधून हिंडत आहेत.
कबीर कला मंचाचे कलाकर डोक्यावर निळी पट्टी बांधून जेंव्हा सर्वत्र फिरू लागले तेंव्हा प्रथम दर्शनी ते आंबेडकर चळवळीचाच भाग असल्याचे भासले खरे... पण तोंडात लाल सलाम ऐकल्यावर मात्र मी गडून पडलो. का? तर लाल सलाम हा कम्युनिस्टांचा नारा आहे. अन कम्युनिस्टातला एक गट तर स्वत:ला या देशाचा संविधानिक नागरिकच मानत नाही. अन याच्या अगदी उलट आंबेडकरवादी लोकं संविधानावर जिव ओवाळून टाकतात. हा केवढा मोठा फरक आहे... आपण याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
संविधानाला मानणारे आंबेडकरवादी अन संविधानाला न मानणारे कम्युनिस्ट हे दोघे एकच कसे काय होऊ शकतात. आता कोणी म्हणेल की सगळे गट संविधान नाकरत नाही. कम्युनिस्टांचा फक्त एकच गट संविधान नाकरतो... अरे हो, मान्य पण त्यांच्या ईतर गोष्टी तरी कुठे आंबेडकरी तत्वाशी जुळतात? कम्युनिस्टांचे कितीही गट असो तो प्रत्येक गट मार्क्सला तर मानतोच ना? अन बाबासाहेबानी थेट मार्क्सच नाकारला... म्हणजे त्यांचा बापच नाकारला. मग त्या मार्क्सचा पिल्लु कोणताही कम्युनिस्ट असो... तो आंबेडकरवादी होऊच शकत नाही.
मग प्रश्न उभा होतो तो कबीर कला मंच कोणाचा? आंबेडकरवाद्यांचा की कम्युनिस्टांचा?
हा कबीर कला मंच कोणाचा औरस/अनौरस पुत्र आहे हे जेंव्हा सिद्ध होईल तेंव्हा होईलच. पण आता काही तर्क व कसोट्या लावून त्याची दिशा, धोरणं व कार्य याचा अंदाज घेता येईल. ते संविधानीक मार्गाने चालतात का? बुद्धाचं तत्वज्ञाना मानतात का? अहिसंक लढ्यावर विश्वास आहे का? अन सगळ्यात महत्वाचं शस्त्रधा-यांशी काही लागेबांधे आहेत का? हे सगळं तपासलं पाहिजे. पोलिस तपास करत आहेत. आज ना उद्या काय ते बाहेर येईलच.
पण...
पण एका गोष्टिवर मात्र माझा तीव्र आक्शेप आहे तो म्हणजे “लाल सलाम” माझ्या बाप दादानी केवढा मोठा लढा दिला. पण त्यापैकी कोणी कधीच लाल सलाम घातला नव्हता. अन कबीर कला मंचाचा नारा लाल सलाम आहे. म्हणजे हे आमच्या रक्ताचे नाही हे निर्विवाद सिद्ध होते. कबीर कला मंच आंबेडकरी विचाराची संघटना नाही हे सांगण्यासाठी व सिद्ध करण्यासाठी हा लाल सलाम पुरेसा आहे. मागच्या लेखात मी लिहलच की उभ्या आंबेडकरी चळवळीत या लाल सलामला जागा नव्हती. मग आज कशी असणार? नक्कीच नसणार.
पण आजून एक प्रश्न उभा होतो... की या कबीर कला मंचाच्या पोराना प्रकाश आंबेडकर खुद्द पाठिवरुन हात कुरवाळताना उभ्या महाराष्ट्रानी पाहिले. शितल साठे व सचिन माळी यानी जेंव्हा आत्मसमर्पन केलं तेंव्हा खुद्द प्रकाश आंबेडकर तिथे हजर होते. त्यानी कबीर कला मंचाची पाठराखण केली. यावरुन लोकाना असे वाटले असेल की हे कबीर कला मंच म्हणजे आंबेडकरी चळवळीचाच भाग आहे... पण ते तसे नक्कीच नाही. प्रकाश आंबेडकर कबीर कला मंचाच्या पाठीशी उभे राहात असतील तर त्यानी वैचारीक स्थालांतर केले असेल. ते आंबेडकरवाद सोडून कम्युनिस्ट बनले असतील... पण प्रकाश आंबेडकर पाठराखण करत आहेत म्हणजे कबीर कला मंच आंबेडकरी संघटना बनली असे म्हणता येणार नाही. राहीला प्रश्न प्रकाश आंबेडकरांचा त्याना आपण विचारु या... ते यापुढे जयभीम म्हणणार की लाल सलाम म्हणणार?
जयभीम म्हणाले तर ते तरतील... अन लाल सलाम म्हणाले तर पुढच्या निवडणूकित जनता त्याना लालोलाल करुन फेकून देणार. अन जर त्यानी म्हटलं की मी जयभीमही म्हणणार अन लाल सलामही म्हणणार तर मात्र हा मोठा धक्का असेल. ती लबाडी असेल. आंबेडकर घराण्याचा आंबेडकरवाद ते कम्युनिस्ट असा तो प्रवास झाला असे सिद्ध होईल. अन ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असेल. महाराष्ट्रात आजवर फक्त पुर्वाश्रमीचे महारच आंबेडकरवादी होते. आता मात्र मोठा बदल होत आहे. ईतर समाजही आंबेडकरवादाची कास धरत आहे. आंबेडकरवादाची एक नवी लाट उसळताना आपण पाहत आहोच. मराठे ते ओबीसी नि भटके अशा सर्व स्थारातून आंबेडकरवादाकडॆ प्रवास सुरु झाला आहे. अन अशा वेळी एक आंबेडकर मात्र कम्युनिस्ट बनावा यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.

प्रकाश आंबेडकरांचा प्रवास आंबेडकरवादी ते कम्युनिस्ट असा सुरु झाला की नाही लवकरच कळेल. तोवर आपण वाट पाहू या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा