शनिवार, २९ जून, २०१३

आर.एस.एस. ला विरोध का?

परवा संघाचं कौतूक करणारं लेख लिहल्यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रीया आल्या. एक म्हणजे ते आपले नेहमीचे तथाकथीत आंबेडकरवादी ज्याना नुसतं विरोध करणं तेवढच काय माहीत आहे. किंबहूना विरोध हा एककलमी कार्यक्रम राबविणे म्हणजेच आंबेडकरवाद असा ज्यांचा ठाम विश्वास आहे ते. काही मात्र सौम्य आंबेडकरवादी ज्यानी फोन करुन “नका करत जाऊ हो संघाची स्तूती. काय आहे ते आपल्या आंबेडकरवाद्याना नाही सोबत” वगैरे मैत्रीच्या सुरात सांगितलं. दोघांच्याही भावना सच्च्या होत्या. एका गटाला वाटतं “सालं काही झालं तरी संघवाल्यांची स्तूती करायलाच नको” दुस-या गटाला वाटतं “ठीक आहे. असतील त्यांचे गूण... पण ते आपण गाऊ नये” असे हे दोन विचारधारा असलेले. माझी दोघांबद्दलही तक्रार नाही, हे नेहमीचचं आहे. मी आपलं मत मांडणार. बास!
पण या वेळी मात्र तिस-या प्रकाराच्याही प्रतिक्रीया आल्या. त्या म्हणजे चक्क संघ समर्थकांच्या. त्यानी प्रश्न केला की जर तुम्हाला संघाचे हे गूण माहीत आहेत तर मग संघाचा विरोध का करता? विरोधाची कारणं सांगा.  त्याना हा प्रश्न पडणे अगदी सहाजिक आहे. कारण मी संघविरोधी आहे हे सांगताना, संघविरोधी का आहे हे सांगितलं नव्हतं. आज मात्र  तसा प्रश्न विचारल्यावर ते सांगण्यासाठी म्हणून हा लेख लिहावा लागला.

तर मी संघविरोधी असण्याची कारणे येणेप्रमाणे.
१)     संघ नोंदणीकृत संटना नाही: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था/संघटना नोंदणीकृत संघटना नाही. कुठलिही संघटना ही नोंदणीकृत असायला हवी. कारण त्यामुळे त्या संघटनेला एक वैधानिक रुप प्राप्त होतं. त्याच बरोबर त्या संघटनेचा उद्देश, कार्यप्रणाली व वाटचालीचा पडतळा तपासता येतो. संघटनेवर अनेक कायदेशीर बंधणे येतात. संघटनेच्या कामावर नजर ठेवायला सोपं जातं. ईथे मात्र संघ चक्क नोंदणीच नाकारतो. याचे कारण काय? ते संघवालेच जाणो. नोंदणी नाकारणे म्हणजे संविधान नाकारणे, म्हणजेच संघ भारतीय संविधान नाकारतो आहे. खरं तर संघानी स्वेच्छेनी नोंदणी घ्यायला हवी होती. लोकशाही पद्दतीने संघटना चालवायला हवी होती. त्यातून पारदर्शकता निर्माण झाली असती व लोकांचा संघाप्रती विश्वास वाढला असता. पण संघ नोंदणी नाकारुन गुढता वाढवत गेला आहे ही एक बाजू तर दुसरी बाजू ही की संघ संविधान झुगारतो आहे. याचाच अर्थ संघ मुळातच संविधान विरोधी संघटना आहे हे सिद्ध होते. हेतू असेलही चांगला पण संघानी नोंदणी घेण्याचे नाकारून भारतीय संविधान झुगारला आहे त्याचं काय करायचं? अन मी आंबेडकरवादी म्हणून संविधानाचा पुरस्कर्ता व संविधानप्रिय माणूस म्हणून संविधान झुगारणा-यांचा कायमच विरोधक असणार.
२)     संघाची घटना नाही: कुठलिही संघटना असली की त्या संघटनेची घटना असावी लागते. म्हणजे त्या संघटनेचे प्रमुख कोण, प्रमुखांची निवड कशी होणार, कार्यकर्ते कोण? कार्यकर्त्यांची निवड, त्याची प्रक्रीया, कालावधी, आचारसंहिता, आर्थिक व्यवहार, संघटनेचा उद्देश व ईतर कार्य. या सगळ्या गोष्टींचा घटनेच उल्लेख असावा लागतो. पण संघची घटना नाहीच. म्हणजे वाटेल तो घोळ घाला, सगळी मोकळीक. गांधी हत्तेनंतर संघ बराच गोत्यात आला होता. घटनेवरुनही संघाला धारेवर धरण्यात आले होते. तेंव्हा संघानी घाईघाईत एक घटना तयार करुन “ही घ्या आमची घटना” म्हणून वेळ मारुन नेली. त्या नंतर ती घटना कुठे गाडल्या गेली ते संघच जाणे. किंवा वेळ प्रसंगी दाखवायला म्हणून ती ठेवलिही असेल कुठेतरी जपून. पण त्या घटनेच्या आधारे ना कधी संघाचे काम चालले न कधी चालणार. म्हणून मी संघाचा विरोध करतो. स्वत:ची घटना न बाळगता संघटन चालविणे हे असंविधानिकच, अन संघ असंविधानिक पद्धतीने संघटना चालवते. त्यामुळे संघाला माझा विरोध आहे.
३)     संघाला लोकशाही अमान्य: संघाच्या कार्यकर्त्यांची, अधिका-यांची निवड कशी होते? जे कार्यकर्ते संघात काम करतात त्याना चांगल्या प्रकारे माहीत आहे, मी सांगायची गरज नाही. संघात कुठल्याही कार्यकर्त्याची वा अधिका-याची निवड लोकशाही पद्धतीने होते नाह तर थेट नेमणूक होते. अगदी सरसंघचालकासारख्या सर्वोच्चपदासाठी सुद्धा संघात निवडणूक होत नाही तर थेट नेमणूक होते. कुणी म्हणेल ही आमची अंतर्गत बाब आहे, तुम्हाला काय त्याच्याशी? पण ही अंतर्गत बाबच संघाला लोकशाहीचा कसा तिटकारा आहे हे अधोरेखीत करुन जाते. संघाला कार्यकर्त्यांद्वारे निवडून आणलेला सरसंघचालक नको असतो, तर नेमलेला एका विशिष्ट गटातला माणूस हवा असतो. का? सोप्प...लोकशाही विरोधी मनोवृत्ती. थोडक्यात संघाचा लोकशाहीला तीव्र विरोध असून संघ ही हुकूमशाही मनोवृत्तीची संघटना आहे. अन्यथा त्यानी लोकशाही पद्धतीने सरसंघचालक निवडला असता.
४)     निधी मिळविण्यासाठी अनेक नोंदणीकृत संघटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना व तीचे कार्य जगभरात माहीत आहे. सर्वत्र याच नावानी ही संघटना काम करते. संघटनेला काम करण्यासाठी निधी लागतोच, मग निधी मिळवायचे म्हणजे संघटना नोंदणीकृत असावी लागते. मग पैसा मिळविण्यासाठी संघानी अनेक पिल्लं जन्मास घातली. या पिल्लावळांद्वारे पैसा गोळा केला जातो. पिल्लावळ संघटनांची कायदेशीर नोंदणी करुन घेण्यात आली. अशा संघटनांतर्फे पैसे मिळवायचे अन ते खर्च करताना मात्र नाव वापरायचे मुख्य संघटनेचे, म्हणजेच राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र ठेवायचे अनोंदणीकृत. गरजेसाठी पिल्लावळ निर्माण करुन त्यांची नोंदणी व मुख्य संघटना बेलगाम ठेवण्याचा हा गेम काय आहे ते संघच जाणे. 
५)     हिंदूत्ववाद: संघानी कितीही आव आणला तरी त्यांचा हिंदूत्ववाद व जातीयवाद लपलेला नाही. सरसंघचालक नेहमी वरच्या जातीचेच का असतात? याचे उत्तर संघ कधीच देत नाही. संघटनेच्या सर्वोच्चपदी कायम संवर्ण व्यक्तीची नेमणूक करणारा संघ पराकोटीचा जातीयवादी आहे हे वेगळे सांगायची अजिबात गरज नाही. मग जो जातीयवादी आहे व हिंदूत्ववादी आहे त्याचा विरोध होणारच.
तर ज्यानी ज्यानी मला मागच्या लेखानंतर विचारले की संघाचा विरोध करण्याचे कारण काय? मला वाटते माझ्या वरील लेखातून त्यांच्या शंकेचे समाधान झाले असावे. झाले नसल्यास फोन करुन थेट बोलू शकता.
जयभीम.
***

गुरुवार, २७ जून, २०१३

Who Cares! (?)

हे दोन शब्द... म्हणजे एक वाक्य.... म्हणाल तर माझं आवडतं म्हणाल तर माझ नावडत. या शब्दांचा थेट मराठी प्रतिशब्द तसं अवघडच पण त्या धाटणिचे किंवा हू केअर्सच्या जरा जवळ जाणारे पहिले वाक्य म्हणजे गेला उडत. पण गेला उडत हे अगदीच सदाशिवपेठी टाईपचं झालं, अगदीच मिळमिळीत झालं. खरी मजा आहे गावठी वर्जन्स मध्ये. पण गावठी वर्जन्स ईतके उग्र आहेत की ते मी ईथे देऊ शकणार नाही. तरी द्यायचंच झाल्यास अरे हाsड हे देता येईल. अरे हाड म्हटल्यावर पुढचे काही सेकंद मन कसं अगदी हलकं हलकं होतं. मोठं काहीतरी ओझं टाकून दिल्यासाखं वाटतं. तुम्हाला शंका असल्यास नुसतंच अरे-हाड म्हणून बघा. बरं वाटतं. पण खरी मजा येते ते हू केअर्स मध्येच.
तर कधी हू केअर्स!  तर कधी हू केअर्स? अशा दोन प्रकारे मी वरील वाक्य वापरत असतो. पण जास्त कामाचं कुठलं तर हू केअर्स! हेच.  खरं तर हे वाक्य म्हणजे नुसतं वाक्य नाहिये. हे वाक्य म्हणजे एक अट्यिट्यूड आहे. कशाचा एटिट्यूड... म्हणाल तर झुगारण्याचा वा म्हणाल तर मनसोक्त जगण्याचा, दोन्ही आहे. तुम्ही कुठे वापरता त्यावर अवलंबुन आहे. ते संपुर्णत: प्रसंगसापेक्ष असतं. या हू केअर्सनी मला अनेकवेळा अडचणीत आणलं. तेंव्हा मात्र लागलीच ठरवून टाकलं की यापुढे जरा जपून वागायचं. पण सालं दुस-यांदा हू केअर्स प्रकार करुन संपल्यावर आठवतं की “नाही आपण हे नको करायला होतं” पण काय फायदा. तोवर हा माझा हू केअर्स माझा पार बट्ट्याबोळ करुन गेलेला असतो. नको नको त्या अडचणी कित्येकवेळा मी फक्त या दोन शब्दामुळे स्वत:वर आदळवून घेतल्या. कित्येकवेळा कारण नसताना हू केअर्स तोंडातून व कृतीतून निसटला व नंतर रेंगाळावं लागलं.  सुरुवातीला वाटायचं हे हू केअर्स असणे म्हणजे विकृती की काय?
पण जसं जसं वाचण वाढलं तसं तसं मात्र या एटिट्यूडचं समर्थन करण्यायोग्य मटेरीअल सापडू लागलं. अनेक लोकांकडे पाहताना असा अनूभव आला की यांची ससेहोलपट केवळ “हू केअर्सच्या” अब्सेन्समूळे होते आहे.  कित्येकांची प्रगती ही हू केअर्सच्याअ अभावामूळे थांबली आहे(याच्या उलट माझी कित्येकवेळा अतिरिक्त हू केअर्समुळे थांबली हे ही तेवढचं खरं) कित्येक बायकाना हू केअर्स म्हणता येत नाही म्हणून त्या पिचत गेल्याचे पाहिले आहे. कित्येक कामगार हू केअर्स नसल्यामूळे तिथेच झिझत असल्याचे दिसले. हे सगळं पाहिल्यावर मला जरा बरं वाटलं. या सगळ्याना जर हू केअर्स म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटून गेलं.
कारण जेंव्हा तुम्ही हू केअर्स म्हणता तेंव्हा नवीन वाटा सुरु होतात.  हू केअर्सचे बरेच दोष आहेत. तरी हू केअर्स म्हणायला शिका.... त्यातून सुरु होतो नवा मार्ग. फक्त तो म्हणताना जरा संयम बाळगा. बास!
बाकी कोणी काही म्हणू द्या... “हू केअर्स!”

आर. एस. एस. देते १०५ % मदत.


मी आर. एस. एस. चा कट्टर विरोधक. किती कट्टर? तर आजवर मी त्या खाकी पॅंटला कधीच पॅंट म्हटलं नाही तर चड्डीच म्हणतो. इतका...
$img_titleउत्तराखंडला दुर्घटना घडली आणि काही तासांच्या आत खाकी चड्डी सेवेसाठी हजर. या आर.एस.एस. चं बाकी काही असो पण यांची सेवा आघाडी व त्यांचं मॅनेजमेंट मात्र अजोड आहे. कुठेही दुर्घटना घडली की खाकी चड्डी सगळ्यात आधी मदतीला धावते. अगदी लातूरचा भूकंप असो, गुजरातचा भूकंप असो वा त्सुनामीचा तडाखा असो. प्रत्येक ठिकाणी खाकी चड्डी प्रचंड वेगाने मदत कार्य घेऊन पोहचली. अगदी भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून मदत करताना वरील सगळ्याच घटनांत ती दिसली.  हे सगळं कसं जमतं यांना? उत्तर सोपं आहे. संघाचे जाळे देशभर पसरले आहे. असा तालुका नसेल जिथे संघाचं कार्यालय नाही. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे संघवाले मदतीला धावण्यासाठी मनातून तयार असतात. घटना घडली की जमेल तेवढ्या लवकर संघाची टीम घटनास्थळी उतरते. यांच्यातील हिंदुत्ववादाबद्दल कितीही राग असला तरी या निस्वार्थ सेवा गुणाचं मात्र कौतूकच आहे.  
आता उत्तराखंडच्याच घटनेचं पहा. भारतातील अत्यंत दुर्गम अशा या पहाडी भागात सैन्याच्या जोडीने काम करणारे स्वयंसेवक दिसतात. खरं तर देशातील इतरही अनेक संघटनांचे स्वयंसेवक तिथे मदत कार्यासाठी पोहचले. पण संघ मात्र सगळ्यात आधी हजर झाला असे एकंदरीत वृत्तपत्रांतील बातम्या चाळल्यास कळते. कारण संघाच्या स्थानिक स्वयंसेवकांनी लगेच आघाडी उघडून मदतकार्य सुरु केले. बाहेरुन येणारे स्वयंसेवक मागून पोहचले पण तोवर ते थांबले नाहीत. स्थानिक कार्यकत्यांद्वारे मदतकार्य त्वरित सुरु झाले. संघ व इतर संघटनांच्या बाबतीत हा मुख्य फरक असतो. इतरांची सेवा पोहचे पर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. तौलनिक दृष्ट्या संघाची सेवा लवकर उपलब्ध होते हे सत्य नाकारता येत नाही. त्यासाठी संघाचं कौतूकच. 
आर्थिक मदत १००% पेक्षा जास्त केली जाते:
साधारणपणे कुठेही एखादी मोठी दुर्घटना घडली की समाजातील दानशूर लोकं सरकारला, स्वयंसेवी संस्थाना पैशाची मदत करत असतात. पण मदत म्हणून दिलेल्या पैशातील किती टक्के पैसा पिडीतांपर्यंत पोहचला या बद्दल नेहमीच दान करणारे साशंक असतात. सरकारी अनुभव असा आहे की त्यातले निम्मे पैसे हे राजकारणीच हडप करतात. तसेच इतर स्वयंसेवी संस्थाही मदत म्हणून मिळालेल्या पैशावर डल्ला मारतात. पण आर. एस. एस. या संघटनेत मात्र चित्र अगदी उलटं आहे. जर तुम्ही १०० रुपयाची मदत केलीत तर त्या पैशातून १००+ ५ अशी १०५ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची मदत गरजू पर्यंत पोहोचते. हा अनुभव मी स्वत: घेतला आहे.
१९८८ किंवा ८९ ची घटना आहे. मी समूहनिवासी वसतीगृह, एटापल्ली येथे शिकत होतो. हे वसतीगृह फक्त ७ वी पर्यंतच होते. मग पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणजे जायचं कुठे? हा प्रश्न होताच. अगदी याच वेळी एटापल्लीत (माझ्या मते १९८८ साली) आर. एस. एस. चे वनवासी आश्रम सुरु झाले. या आश्रमात अशी ७ वगैरे अट नव्हती. तुम्हाला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिका असं त्यांच म्हणणं होतं. मग काय. समुहनिवासीची माझ्या बरोबरची कित्येक मुलं तिकडे पळाली. मग मी अधे मध्ये त्याना भेटायला वनवासी आश्रमात जायचो. तिथल्या कार्यकर्त्यांशी माझी ओळख झाली. त्यातील एक नाव बंडू बोर्डे. एटापल्लीच्या या वनवासी आश्रमाचे अधीक्षक बंडू बोर्डे हे मूळ अकोल्याचे.  ते घरदार सोडून आमच्या दंडकारण्यात संघाचा प्रचार करायला आले होते. बंडू बोर्डे नेहमी माझ्या घरी(कुडकेल्लीत) मला भेटायला येत. मी संघात यावे असा त्यांचा प्रयत्न होता. मी संघात गेलो नाही पण बंडू बोर्डे या माणसाच्या व्यक्तिमत्वाने मात्र भारावून गेलो होतो. मग एटापल्लीला गेलो की त्या आश्रमात थांबायचो. नंतर जेंव्हा अहेरीत  शिकायला गेलो तेंव्हा बंडू बोर्डेनी मी अहेरीतील संघाच्या आश्रमात प्रवेश घ्यावा यासाठी प्रचंड धडपड केली पण मी ती मदत नाकारुन भगवंतराव मध्ये दाखल झालो. असो.
तर घटना एटापल्लीची...
...या आश्रमाना सरकारी ग्रांट नसायची(आजचं माहित नाही). लोकांच्याकडून वर्गणी स्वरुपात मिळालेल्या मदतीतून आमच्या रानात ही दोन वसतीगृहं त्या काळात उभी होती. आम्हा रानातल्या पोराना शिक्षणाची सोय पुरवत होती. इथे मला कळले की १०० रुपयाच्या मदतीत १०५ रुपयाची मदत उभी होते. ती संघाच्या स्वतंत्र तंत्रातून. तर ते तंत्र असं होतं...
...सघाला जर तुम्ही १०० रु. मदत/वर्गणी दिलीत तर संघ त्या पैशातून आवश्यक वस्तू घेताना संघाचे सदस्य असलेल्या दुकानांतून/पुरवठादाराकडून घेतात. आमच्या एटापल्लीत गादेवार व मद्दीवार नावाचे दोन संघ सदस्य व्यापारी होते/आहेत. मग यांच्याकडून वसतीगृहासाठीची खरेदी केली जाई. मधल्या काळात स्कॉलरशिपच्या परिक्षेसाठी मला एटापल्लीत काही महिने राहायचे होते. मग बंडू बोर्डेनी मला वनवासी वसतीगृहात राहण्याच्या आग्रह केला. मी स्वत: अनेक वेळा बंडू बोर्डें सोबत गादेवारकडे खरेदीसाठी जायचो. मग हे संघाचे सदस्य असलेले दुकानदार न-नफा न-तोटा (किंवा अत्यल्प नफा) या तत्वावर आश्रमासाठी वस्तू देत(सगळीकडे देतात की नाही माहीत नाही, पण ब-यापैकी हे तंत्र वापरले जाते). म्हणजे समजा १० किलो. तांदूळ १० रुपये किलो प्रमाणे असेल व त्यात दोन रुपये प्रति किलो नफा असेल. अशा वेळी नफा न कमवता हा तांदूळ ८ रु. किलोने दिला जाई.  म्हणजे मदत करणा-यांनी दिलेल्या शंभर रुपयात बाजार भावाप्रमाणे १० किलो तांदूळ आले असते. तेंव्हा त्या मदतीला १००% मदत असे म्हणता आले असते. पण इथे मात्र १२+ किलो तांदूळ मिळायचे. या मिळालेल्या १२ किलो तांदळाचे बाजारभावानुसार मूल्यांकन केल्यास प्रत्यक्ष मदत ही १२० रुपयाची ठरते. म्हणजे कोणीतरी दानशूर देतो १००रु. पण प्रत्यक्ष मदत पोहचते १२० रुपयाची. हा चमत्कार फक्त आणि फक्त आर. एस. एस. मध्येच घडतो. अगदी भाजीपाला घेताना सुद्धा हेच तंत्र वापरले जायचे. हा माझा स्वत:चा अनुभव असून मी वर दुकानदारांची नावं मुद्दामच दिली. कारण त्या दुकानदारांच्या हातून येणारी मदत रानातला विद्यार्थी घडवत होती. त्या दुकानदारांचे आभार मानावे तेवढे कमीच. माझे अनेक मित्र व आमच्या रानातील  कित्येक पोरं  आजही अहेरी व एटापल्लीतील या संघातील वसतीगृहातून शिकत आहेत.
आमच्या अहेरीत तर सगळा कोमटी समाज, म्हणजेच पद्मशाली समाज. चंद्रपुरातही सगळे धनाढ्य लोकं हे पद्मशालीच आहेत. या कोमटी समाजावर संघाचा प्रचंड प्रभाव. गावाकडचे  माझे अर्धे मित्र याच समाजातील आहेत. अहेरी व चंद्रपुरच्या मित्राना फोन करुन चौकशी केली तेंव्हा कळले की कित्येक संघवाले मित्र उतराखंडला धावलेत म्हणे. संघातील अनेक व्यापारी याच(ना-नफा-तोटा, अत्यल्प नफा) तंत्रानी मदत करतात हे आज परत एकदा कळले.  वरुन संघाची शिस्त वाखाणण्या सारखी असतेच.  मग १०० च १०५ % व्हायला अडचण असतेच कुठे? 
असो! संघाची भरपूर स्तुती झाली दिसते. पण काय करु झोडपायचे तिथे झोडपतोच पण जे चांगलं आहे ते चांगलंच. त्या बद्दल त्यांचं कौतुक केलच पाहिजे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे इतरत्र मदत दिलीत तर किती टक्के पोहोचेल माहीत नाही. पण संघाकडे दिलीत तर १०५% नक्कीच पोहोचेल याची खात्री बाळगा.
सध्या त्या उत्तरेच्या देवाच्या तावडीत सापडलेल्या लोकांसाठी अनेक जण मदत करताना दिसत आहेत. पण दिलेल्या मदतीतील नक्की किती %  पोहोचणार या बद्दल साशंक आहेत. त्याना एकच सांगणे. मदत द्यायची असेल तर संघाकडे द्या. त्यातून पोहचणारी मदत १००+ असेल याची खात्री बाळगा.

संघाच्या पॅंटला मी नेहमी खाकी चड्डी म्हणून हिणवतो... पण आज मात्र चड्डी नाही तर चक्क पॅंट म्हणावसं वाटतंय.  

तरी मी कट्टर संघ विरोधीच.

टीप:- भक्त मरत आहेत ही गोष्ट हृदयद्रावकच. पण त्यांच्याबद्दल मला सहानुभूती नाही हे ही तेवढेच खरे.

जयभीम.
***

 माझा RSS ला विरोध का? हा लेख खालील धाग्यावर वाचा.

http://mdramteke.blogspot.in/2013/06/blog-post_29.html

***