बुधवार, ५ जून, २०१३

कम्युनिजम एक अभिशाप: भाग-६ (आक्टोबर क्रांती)                                                  एप्रिल थेसीस व कम्युनिस्ट पक्ष:
लेनीन देशात परतून २४ तास व्हायचे होते तोवर एक जंगी सभेचे आयोजन करण्यात आले.  या सभेत बोलण्यासाठी व लोकाना सांगण्यासाठी घाईघाईत लेनीनने एका कागदावर जे काही विचार लिहले त्या विचारानी उभ्या रशीयाला हादरवून सोडले. हेच विचार पुढे एप्रिल थेसीस म्हणून प्रसिद्ध झाले. लेनीन लिहतो “रशियाने भांडवलशाही संघर्षातून बाहेर पडले पाहिजे.  रशियात संसदीय प्रजासत्ताक निर्माण करण्या ऐवजी कामगारांची हुकूमशाही निर्माण करणे गरजेचे आहे.  त्याच बरोबर जागतीक पातळीवर कम्युनिजमचा प्रचार व प्रसार करण्याची आपली योजना तयार असून Communist International ही संघटना उभारण्याचा आपला मानस आहे. सध्याची शासन यंत्रणा नष्ट करुन आपण आपली नवीन अशी कम्युनिस्ट यंत्रणा उभी करणार आहोत” अशा प्रकारची नव्या यंत्रणेची मांडनी ज्या थेसीसमध्ये केली ती थेसीस म्हणजेच एप्रिल थेसीस. याच यंत्रणेला पुढे जगाने पोलादी पकड वा Iron curtain (पोलादी पडदा) म्हणून संबोधले. कम्युनिस्ट यंत्रणेतील ही पोलादी पडदा पद्धत ईतकी प्रभावी आहे की देशात काय चालू आहे याची खबरबात जगाला अजिबात लागत नाही. रशिया सारख्या अवाढव्य देशाला पोलादी पडच्याच्या आड लपविण्याची किमया लेनीने करुन दाखविली. आज चीनही याच पोलादी पडद्यात लपलेला आहे. हे पोलादी पडदा तंत्र जन्मास घालण्याची लेनीनची बुद्धी अफलातूनच म्हणावे.
याच सभेत बोलताना लेनीन म्हणतो “जगातील सर्व सोशल डेमोक्रटीक कार्यकर्त्यानी समाजवादाशी घात करत परस्पर सरकारांशी समझोता केला आहे.  पहिल्या महायुद्धाच्या काळात खरे तर सरकारला कोंडीत धरुन त्या त्या देशात समाजवादी सरकार स्थापण करण्यासाठी कामगारानी उठाव  करायला हवा होता. पण जर्मन, फ्रांस, इंग्लड व युरोपातील जवळपास प्रत्येक देशातील मार्क्सवाद्यानी युद्धकाळात आपली क्रांती स्थगित करत देशातील सरकारच्या बाजूने उभे राहून महायुद्धात उड्या मारल्या व देशरक्षणार्थ उभा झाल्याचा आव आणला. यामुळे मार्क्सवाद्यांनी समाजवादाशी गद्दारी केली असून आता माझ्या नजरेत समाजवाद पुरता बदनाम झाले आहे. म्हणून यापुढे आपल्या पक्षाचे नाव सोशल डेमोक्रॅटिक पक्ष राहणार नाही. यापुढे आपला पक्ष कम्युनिस्ट पक्ष म्हणून ओळखला जाईल” तर असा झाला कम्युनिस्ट पक्षाचा जन्म. आजवर सगळीकडे समाजवादी म्हणून ओळखली जाणारी ही चळवळ आता कम्युनिस्ट म्हणून ओळखली जाणार होती. ईथे आजून एक गोष्ट नमूद करायची आहे ती म्हणजे लेनीनच्या पक्षाला बोल्शेव्हीक पक्ष म्हणून ओळखले जाते पण या नावाचा पक्ष कधीच अस्तित्वात नव्हता. बोल्शेव्हिक हा गट होता. बोल्शेव्हिकचा अर्थ बहुसंख्य. आपण बहुसंख्य आहोत हे दाखविण्यासाठी लेनीन नेहमी बोल्शेव्हिक शब्दप्रयोग करायचा. पण अधिकृतरित्या बोल्शेव्हिक नावाचा पक्ष कधीच नव्हता. तो आधी समाजवादी पक्ष होता ज्याचे वरील प्रमाणे कम्युनिस्ट पक्ष असे नामांतर झाले.

लगेच लेनीनने क्रांतीच्या दिशेनी वाटचाल सुरु केली. आता त्यांचा नारा होता ...
“सर्व सत्ता सोव्हिएटांच्या हाती, भांडवलदारांचा नि:पात होवो, युद्धखोरांचा धिक्कार असो”
अशा प्रकारे बोल्शेव्हिकानी हंगामी सरकार उलथून लावण्याची सुरुवात केली.
लेनीनचे उठाव:
१६ जुन १९१७ रोजी बोल्शेव्हिकांचा मेळावा भरला. बोल्शेव्हिकांनी देशभर दहशत माजवून सोडली होती. लेनीन आता हंगामी सरकार पाडून सत्ता हाती घेईल व कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित होईला याचा सर्वत्र प्रचार सुरु झालाच होता. जे सैन्य हंगामी सरकारच्या बाजूने होते त्याना दुहेरी मारा बसत होता. तिकडे झारचे सैन्य दूर दूर उचापत्या करत होते तर ईकडे काही सैनाधिकारी लेनीनच्या बाजूने उभे झाले. लेनीनचा धडाका पाहता हंगामी सरकारातील काही सैन्य तटस्थ तर काही लेनीनकडे झुकले. उरल्या सुरल्या एवढूश्या सैन्याच्या बळावर लेनीनचा पाडाव करणे सरकारला अवघड होऊन बसले. लेनीन तर रोज उठून एकच आरोळी ठोकू लागला होता की हंगामी सरकार पाडायचे अन कामगारांची हुकूमशाही आणायची. या घोषणा कामगाराना प्रचंड लुभावण्या वाटायच्या अन रोज ढिगानी कामगार लेनीनच्या गटास सामील होऊ लागले. त्याच बरोबर बंडखोर सैन्यही सामील होऊ लागले. एकंदरीत लेनीनची ताकद वाढत होती. हंगामी सरकारनी तर नोव्हेंबर मध्ये सार्वत्रीक निवड्णूका घेण्याचे जाहीर केले होते. लेनीनला हे नको होते. अन आज या मेळाव्यात लेनीननी एक गर्जना केली. “माझ्या शूर वीरानो हंगामी सरकारच्या मेरिन्स्की प्रसादावर चालून जा व सरकारचा ताबा घ्या” मग काय हा हा म्हणता सैन्य व बोल्शेव्हिक बंड करायला निघाले. पण लेनीनच्या कारवायांवर बारीक नजर ठेवून असलेल्या हंगामी सरकारला याचा आधीच सुगावा लागला होता. श्खेईडने सगळी तय्यारी केली होती. त्यानी  लेनीनचे हे बंड चिरडून टाकले व रशियात लोकशाहीच प्रस्थापित होणार हे परत एकदा गर्जून सांगितले.
आता लेनीनने आजून एक उठाव करण्याची तय्यारी केली.  कॉन्सटाईट बंदरातील नौसैनिकाना हाताशी धरुन बंड करण्याचा प्लॅन केला. त्याच बरोबर एक मशिनगन रेजिमेंट व कामगार सैन्य असा एकंदरीत उठाव करणार होते.  ठरल्या प्रमाणे १६ जुलै १९१७ उजाडला खरा पण आजून लेनीनकडुन आदेश आले नव्हते. वाट पाहून पाहून हे बंडखोर कंटाळले व त्यानी शेवटी टॉरीड प्रासादावर हल्ला चढविला. रस्त्यात दिसेल त्याला संगिनेना भोसकने काय, गोळ्य़ा झाडणे काय सुरु झाले.  या उठावात सैन्याच्या जोडीला २५,००० कामगार सहभागी झाले होते. हंगामी सरकारच्या विरोधात नारेबाजी करत शहरातून एक मिरवणूकही काढली. पण या उठावाला नागरिकांचा पाहिजे तसा पाठिंबा मिळाला नव्हता. कोणाच्या बाजूने उभं राहावं हेच सामान्य माणसाला कळेनासे झाले होते.
पेट्राग्राड मध्ये हा उठाव झाला तेंव्हा हंगामी सरकारचे युद्धमंत्री केरेन्स्की हे एका लष्करी आघाडीला भेट देण्यासाठी शहराबाहेर गेले होते. जेंव्हा ते परतले तेंव्हा त्यानी १६ व १७ जुलैच्या बंडाचा अहवाल मागवून घेतला. केरेन्स्कीने ताबडतोब हुकूम काढला “लेनीनला असेल त्या अवस्थेत अटक करुन तुरुंगात डांबा” अन परत एकदा लेनीन भुमिगत झाला.  अशा प्रकारे जुलैचाही उठाव फसला.
आक्टोबर क्रांती (शेवटचा व यशस्वी उठाव):
चोरा सारखा पळून गेलेला लेनीन भुमिगत राहून निर्णायक उठावाच्या तय्यारीला लागला. ईकडे हंगामी सरकारात बरीच ढवळाढवळ होऊन केरेन्स्की आता प्रधानमंत्री बनला. त्या आधी या क्रांतीला आक्टोबर क्रांती का म्हणतात व ती ७ नोव्हेंबरला का साजरी केली जाते याचं कारण पाहू या.  १ फेब्रुवारी १९१८ रोजी रशियन बोल्शेव्हिकानी पश्चीम युरोपियन कॅलेंडरचा स्विकार केला. त्या आधी रशीयात रशीयन कॅलेंडर वापरला जात असे. हा रशीयन कॅलेंडर पश्चीम युरोपीयन कॅलेंडरपेक्षा १३ दिवसानी मागे होता. त्यामुळे क्रांती झाली तेंव्हा ती तारीख २५ आक्टोबर अशी होती. पण नवीन कॅलेंडर स्विकारल्यावर तेरा दिवस पुढे जावे लागले अन या गणीता प्रमाणे तो दिवस येतो ७ नोव्हें. म्हणून ही अक्टोबर क्रांती नोव्हेंबरमध्ये साजरी होऊ लागली.
तर लेनीन आपल्या तय्यारीला लागला होता व केरेन्स्की मात्र पहिल्या महायुद्धात रशीयाच्या सिमेवर येऊन उभा ठाकलेल्या जर्मनांना पिटाळून लावण्याच्या कामात गर्क होता.  ५ नोव्हेंबरला केरेन्स्कीला गुप्तचरांद्वारे बातमी कळली की लेनीनने उठावाची पुर्ण तय्यारी केली आहे.  केरेन्स्कीने ताबडतोब सुत्र हलविले. पायदळ व तोफदळा लगेच राजधानिकडे कूच करण्याचे आदेश धाडले. नोव्हा नदीत उभ्या असलेल्या अरोरा या युद्ध नौकेला सज्ज होण्यास सांगितले. स्मोल्नीचे(बोल्शेव्हिकांची कचेरी) टेलिफोन दळणवळण तोडून टाकले.  रोबोची पुट  या बोल्शेव्हिकांच्या वृत्तपत्रावर बंदी घालण्यात आली.  जिडके तिकडे बोल्शेव्हिकांची धरपकड सुरु झाली. पॅट्राग्राड मधिल विंटर पॅलेस मध्ये हंगामी सरकारची कचेरी तर स्मोल्नीमध्ये बोल्शेव्हिकांची.
अन ईकडे लेनीनने क्रांतीचा शेवटचा घाव घालण्यासाठी क्रांतीकारक समिती स्थापण करुन प्रत्येकाला कामं वाटून देऊ लागला.  या क्रांतिकारक समितितला एक महत्वाचा सदस्य होता तो म्हणजे ट्रॉटस्की.  लेनीनने ट्रॉटस्कीवर मुख्य जबाबदा-या टाकल्या.  बोल्शेव्हिकानी जागो जागी जाऊन बंडखोर सैन्याचा ताबा घेतला व बंडासाठी सज्ज राहण्यास सांगितले. वरुन आदेश येताच हंगामी सरकारवर चढाई करण्याची पुर्ण सज्जता झाली. हा हा म्हणता बोल्शेव्हिकांचा प्रभाव ईतका वाढला की काही तासात त्यानी सरकारचे अनेक सेनाधिकारी फितवून बोल्शेविकांच्या मंडपात उभे केले. हे सगळं पाहून तिकडे उभी असलेली युद्धनौका अरोरात मोठा गोंधळ उडाला. आपण कोणाच्या बाजूने लढावं हेच कळेना. शेवटी ट्रॉटस्कीने अरोरावर आदेश धाडले “तुम्ही सरकारचं नाही आमचे आदेश पाळा. विजय आमचाच आहे. आता चुकलात तर क्षमा नाही” युद्धनौका बोल्शेविकांच्या बाजूने उभी झाली. यावेळी लेनीन रशियातील व्हायबर्ग नावाच्या एका उपनगरात लपूण बसला होता. तिकडे स्मोल्नीमध्ये ट्रॉटस्की व ईतर बोल्शेव्हीक उठावासाठी सज्ज झाले होते. स्मोल्नीशी संपर्क तुटला होता. तिकडे काय घडत आहे हे उपनगरात बसलेल्या लेनीनला कळत नव्हते.
केरेन्स्कीने उठावाचा धोका ओळखून पेट्राग्राडला येणा-या सर्व रस्त्यावर सैन्य पाठवून नदीवरचे सगळे पूल उडविण्याचे आदेश दिले. म्हणजे बोल्शेविकांचे लाल सैन्य शहरात घुसणार नाही. नंतर देशातील ईतर सैन्याना  बोलावून बोल्शेव्हिकांवर मागून हल्ला चढवायचा. पण तोवर पेट्राग्राड पडू द्यायचे नाही असा हा प्लॅन.  जेंव्हा ट्रॉटस्कीला कळले की केरेन्स्की शहराला जोड्णारे सर्व पुल पाडत आहे तेंव्हा त्याना बंडखोर व बोल्शेव्हिक लाल सैन्याला आदेश दिले व हा हा म्हणता सरकारी सैन्य व बोल्शेव्हिक क्रांतीकारी सैन्यात जुंपली. बरेच पुल उडविल्या गेले तरी एकंदरीत १० पुलांचा ताबा बोल्शेव्हिकानी मिळवला. ईकडे लेनीन जिथे राहात होता ते व्हायबर्ग हे उपनगर बोल्शेव्हिकांच्या ताब्यात आले होते. म्हणजे लेनीन सेफ झाला. पण त्याला ईथे करमेना. राजधानी पेट्राग्राडला जाऊन काय चालले ते पाहायचे होते. ईथून ते अंतर दहा बारा मैलाचे होते. रात्र पडतात लेनीन पायी निघाला. व्हायबर्ग सोडल्यावर पाहतो काय तर सर्वत्र केरेन्स्कीच्या सैन्याचे पहारे लागले होते. लेनीन चालू लागला. चालता चालत एक चर्च दिसले. त्यानी तिकडे नजर टाकली तेंव्हा काटे १२ च्या आकड्यावर पडले. आता दुसरा दिवस सुरु झाला म्हणजे ७ नोव्हेंबर १९१७ हा दिवस सुरु झाला होता.  सायंकाळी निघालेला लेनीन रास्त्री २ च्या सुमारास स्मोल्नी इन्स्टीट्यूटच्या दारात येऊन उभा झाला.
ट्राटस्कीने लाल सैन्य तयार ठेवले होते. लेनीन येताच महत्वाची बैठक झाली व अडीचच्या सुमारास हे सैन्य केरेन्स्कीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी स्मोल्नीतुन बाहेर पडले. महत्वाचे १० पुल लाल सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे फार अडचण नव्हतीच. रात्रभर सरकारी सैन्याची व लाल सैन्याच्यात अनेक चकमकी झाल्या. सकाळ झाली तेंव्हा उभा पेट्राग्राड लाल सैन्यानी ताब्यात घेतला होता. आता फक्त दोन मुख्य कचे-या बाकी होत्या. विंटर पॅलेस व मेरिन्स्की पॅलेस या दोन सरकारी कच-या काय त्या शिल्लक होत्या.  पेट्राग्राड पडल्याची खात्री होताच अमेरीकन वकिलातीच्या मोटारितून प्रधानमंत्री केरेन्स्की पेट्राग्राडमधून निसटला.
दुपारी दोन वाजता स्मोल्नीत क्रांतिकारकांची सभा भरली. विंटर पॅलेस व मेरिन्स्की पॅलेस ताब्यात घेण्याचा प्लॅन तयार झाला. सायंकाळ पर्यंत मेरिन्स्की ताब्यात आले पण आजून विंटर पॅलेस काही ताब्यात आले नव्हते. काही मंत्री व सरकारी सैन्य आत महालात होते. केरेन्स्की बाहेर गेल्यामुळे तो लवकरच सैन्य घेऊन शहरात उतरेल व बंडखोरांचा बिमोड करेल या आशेनी सरकारी सैन्य विंटर पॅलेस लढवत होते. शेवटी रात्री नऊ वाजता ट्राटस्कीने आरोरा नावाच्या युद्ध नौकेला विंटर पॅलेसवर तोफगोळा डागण्याचे आदेश दिले.  युद्धनौकेतून तोफांचा भडीमार सुरु झाला व विंटर पॅलेसचे एक एक भींतीना भगदाड पडू लागले. आता मात्र क्रांतीकारी सैन्य महालात घुसून हल्ला चढवू लागले. रक्ताचे लोट वाहू लागले. हंगामी सरकारचे सैन्य धारातिर्थी पडताना लाल सैन्याशी शौर्याने लढत होते. हा हा म्हणता सरकारी सैन्याचा पाडाव झाला व पहाटे ३.१५ मिनटानी लास सैन्यानी विंटर पॅलेसचा ताबा घेतला. हंगामी सरकारातील मंत्र्याना अटक करुन पिटर व पॉल किल्यात रवाना केले.
८ नोव्हेंबर १९१७ रोजी पहिले बोल्शेव्हिक सरकार स्थापन झाले.  नव्या बोल्शेव्हिक सरकारने हुकूम काढले. सर्व सरकारी कर्मचा-यानी कामावर हजर व्हावे. सर्व व्यापा-यानी आपापली दुकाने उघडून व्यापार सुरु करावा. अन पेट्राग्राड शहरातून बोल्शेव्हिकांची सत्ता सुरु झाली.
पेट्राग्राड पाठोपाठ मास्कोतही उठाव झाला व देशभर बोल्शेव्हिकांची सत्ता आली. केरेन्स्की कायमचा देश सोडून पळून गेला.  अशा प्रकारे एका लोकशाहीचा गळा दाबून कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित करण्यात आली.
आता सुरु होणार होता एकपक्षीय, जुलूमी असा बोल्शेव्हिकांचा लाल इतिहास.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा