शनिवार, ८ जून, २०१३

राज्यभिषेकदिनी आला मराठा आरक्षणाचा हुंकार!परवा म्हणजे ६ जूनला शिवाजी महाराजांचा राज्यभिषेकदीन सोहळा रायगडावर साजरा करण्यात आला. चांगली गोष्ट आहे. बाबासाहेबानी सांगितलं होतं ज्याला इतिहास माहित नसतं ते इतिहास घडवत नसतात या उक्तीला साजेसं ते वागणं होतं. मराठी माणसानी राज्यभिषेकदिन साजरा केला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण जरा खोलात जाऊन पाहिलात तर रायगडावर जो राज्यभिषेकदिन साजरा करण्यासाठी जमलेला समाज होता तो मुख्यत्वे मराठा समाज होता असे लक्षात येईल. ईतर समाजही असेल पण मराठा समाजाच बहुसंख्य होता हे जाहीर होतं. अन या सोहळ्यात मराठा वर्चस्व ठेवण्याचे सगळे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाने झोकून दिले. जोडीला मराठा आरक्षणाची आरोळी होतीच. मग हा कार्यक्रम नेमका कोणाचा ही संभ्रवस्था निर्माण झाली नसेल तरच नवल. म्हणजे जे मराठा आरक्षणाच्या बाजूने नाहीत वा ज्याना त्या आरक्षणाशी काही देणं घेणं नाही अशी जी कोणी लोकं तिथे हा सोहळा सजरा करायला गेली त्याना प्रचंड अवघडल्या सारखं झालं. आलो कशाला, अन पाहतो काय म्हणून अनेकानी तोंडात बोटं घातली.  थोडक्यात शिवाजीचा राज्यभिषेक आता मराठ्यांचा वयक्तीक कार्यक्रम बनत चालला आहे. यातून एकच होणार मराठ्यांचा दरारा पाहता इतर समाज हळूच शिवाजी प्रभावातून बाहेर पडेल. म्हणजे उद्या तो शिवाजी विरोधक म्हणून उभा राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हा एक धोका आहेच आहे. मराठे मात्र शिवाजीचं नाव वापरून मराठा आरक्षण चळवळ तीव्र करत आहेत. शिवाजीच्या नावानी या चळवळीला धार आणता येईल असा एक समज.
शिवाजी हा उभ्या महाराष्ट्राचा असं आम्ही लहानपणी ऐकलं होतं(ज्याच्यावर माझा कधीच विश्वास नव्हता) पण आजची अवस्था पाहता कित्येकाना शंका येत असेल. मराठा आरक्षण अजेंड्यात शिवाजी महाराजाचं व रायगडाचं काय काम? पण मराठे तसं चित्र उभं करण्यात यशस्वी होतं आहेत. किंबहूना मराठा आरक्षण विरोधातील प्रत्येक माणूस नुसता मराठा द्रोही नाही तर शिवद्रोही... असाही प्रचार लवकरच होणार. रायगडावर मराठा आरक्षण चळवळीचे खंदे समर्थक व नेते राजकुमार संभाजी राजे हजर होते. त्यानी परत एकदा मराठा आरक्षणाचा हुंकार दिला. थोडक्यात या वर्षीचा राज्यभिषेकदिन हा मराठा आरक्षणाची किनार घेऊन साजरा करण्यात आला. याही पुढे मी तर असं म्हणेन की या वर्षी रायगडावर जमलेली गर्दी ही शिवाजीच्या राज्यभिषेक दिनाला मानवंदना देण्यापेक्षा मराठा आरक्षणाची चळवळ भक्कम करण्याच्या हेतूनेच जमली होती.  जर हे असेच चालले तर हा दिवस महाराष्ट्रातील ईतर बहुजन समाज नक्कीच टाळायला लागेल.
शिवाजी हा बहुजन नायक आहे असा प्रचार करताना महाराला पाटिलकी दिली हे प्रत्येकजण हटकून सांगतोच. पण शिवाजीच्या आधी बहमनी राजानी आम्हाला अनेक अधिकार दिले हे मात्र टाळले जाते.  बहमणी राजानी आम्हाला ५२ अधिकाराची सनद दिली होती. शिवाजीनी त्यातले १२ अधिकार तरी आम्हाला चालू ठेवले का?  उत्तर आहे “नाही” म्हणजे हा मुद्दा जर लावुन धरला तर आंबेडकरी समाज शिवाजी पासून हळूच दूर होईल. कारण शिवाजीची बहुजन प्रतिपालक अशी जी प्रतिभा फुगविली जात आहे ती पार कोसळते. राहीला इतर समाजाचा प्रश्न. तो मराठा आरक्षणामुळे मराठ्यांवर उलटणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. ओबीसी समाजातून आता लवकरच मराठा विरोधी हुंकार येणार. वाघ्या प्रकरणाच्यावेळी त्याची एक लहानशी झलक  दिसली होती. ही झलक कधी वादळात रुपांतर होईल ते सांगता येणार नाही, पण होईल एवढे मात्र खरे.

या जोडीला मराठा समाजाची ही आत्ताची वागणूक शिवाजीला मराठ्याच्या घरी बंदिस्त करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. मराठे असेच आजून काही वर्ष शिवाजीच्या नावाने रायगडावर मराठा आरक्षणाच्या गर्जना देत बसले तर रायगड पडलाच समजा. कारण ही गर्जना जेवढी तीव्र होत जाणारा तेवढाच बहुजन समाज रायगडापासून व शिवाजी पासून दूर होत जाणार. 

थोडक्यात या वर्षीचा राज्यभिषेकदिन म्हणजे रायगड पडण्याच्या दिशेनी पडलेले पहिले पाऊल होय.
***

1 टिप्पणी: