सोमवार, ३ जून, २०१३

कम्युनिजम एक अभिशाप: भाग-५ (लेनीन-II)


या हद्दपारीत लेनीनला झार सरकारकडुन महिना ७ रुबल ४० कोपेक्स मिळत असत. शिवाय वाट्टॆल तेंव्हा शेजारच्या रानात बंदूक घेऊन शिकारीला जाता येत असे. नदित डुबकी मारायला मोकळीक होती व पिटर्सबर्गमधले सगळे वृत्तपत्र ईथे मिळायचे. त्यामुळे ही हद्दपारी तशी मजेतच जात असे. याच दरम्यान लेनीनने आपली मैत्रीण व होणारी बायको नादेझ्या क्रुपस्काया हिला पत्र पाठवुन बोलावून घेतले. आता तर काही अडचणच नव्हती. ईथे लेनीन राहायला आला असे कळल्यापासून शेजार पाजारचे लोकं त्याला भेटायला येत असतं. लेनीन का वकील असल्यामुळे कायद्या संबंधी लोकाना मार्गदर्शन करणे सुरु झाले. अखेर मार्च १९०० मध्ये लेनीनची हद्दपारी संपली व तो रशीयाच्या दिशेनी निघाला.
इस्क्रा (ठिणगी):
आता मात्र लेनीनने ठरवले होते की नुसत्या मिटिंगा व संघटना बांधून कार्य होणार नसून त्यासाठी लोकाना क्रांतीची दिक्षा देणे गरजेचे आहे. मागच्या तीन वर्षाच्या हद्दपारीत लेनीनने अनेक प्लॅन आखले होते. त्याना मुर्त स्वरुप देण्याची वेळ येऊन ठेपली होते.  या तीन वर्षाच्या काळात त्यानी ’व्यवसायिक क्रांतिकारी’ नावाचा सिद्धांत मांडला होता. आता हा सिद्धांत जनमानसात रुजवायचा होता. क्रांतीकारी निर्माण करायचे होते. अन त्यासाठी लागणार होतं एक वृत्तपत्र. हे वृत्तपत्र विदेशातून चालविण्याची युक्ती लेनीनच्या डोक्यात जन्मास आली व मे १९०० मध्ये स्कोव्हा येथे बैठक घेऊन लेनीनने हा प्रस्ताव मांडला. लगेच पक्षाने हा प्रस्ताव मंजूर केला व इस्क्रा नावाचे वृत्तपत्र विदेशातून छापण्याची जबाबदारी  लेनीनवर पडली.
लगेच लेनीनने रशीया सोडला. थेट प्लेखानोव्ह व एक्सेलरॉड यांची भेट घेऊन इस्क्रा बद्दल सविस्तर सांगितले.  शेवटी जर्मिनी मधून इस्क्रा छापण्याचे ठरले व हा हा म्हणता २४ डिसे. १९०० रोजी  लायप्झिग येथील छापखाण्यातून इस्क्राचा पहिला अंक बाहेर पडला. आता इस्क्राच्या प्रती चोर मार्गाने गुप्तपणे रशियात पाठविले जाऊ लागले. इस्क्रा नावाची ठिणगी रशियात येऊन पडली. ती ठिणगी पाडणारा लेनीन होता. आता लेनीनसाठी रशीयाची दारं बंद झाली ती थेट १९१७ पर्यंत बंदच राहिली. इस्क्राच्या माध्यमातून लेनीनने आपला लाडका सिद्धांत “व्यवसायिक क्रांतीकारी” मोठ्या जोमाने कामगारांच्या डोक्यात उतरवू लागला.  याच दरम्यान एक पेरो नावाचा तरुण लेखक लेनीनला सापडला. पेरो हे या लेखकाचे टोपण नाव होते. रशीयातील क्रांतीचा पहिला घाव घालणारा हा पेरो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून ट्रॉटस्की होता.  इस्क्राची ठिणगी आता रशियात वणवा पेटवू लागली होती.
Social Democratic Party: हा पक्ष मार्क्सवाद्यांचा पक्ष होता. लेनीन याच पक्षाचा कार्यकर्ता होता. या पक्षाची सारी मदार मार्क्सच्या तत्वज्ञानावर होती तर कामगार हाच एकमेव काय तो क्रांती घडवून आणू शकतो असा या पक्षाचा विश्वास होता. या पक्षात लेनीनच्या तोलामोलाचे अनेक विद्वान होते. इस्क्राच्या माध्यमातून कामगारांत क्रांतीची पेरणी करताना लेनीनने सगळ्याना मागे टाकत सर्व सुत्र आपल्या हातात घेतली. एकंदरीत लेनीन सर्वांवर भारी पडत गेला. याच दरम्यान इस्र्काच्या संपादक मंड्ळीवरुन वाद झाला. लेनीनचा हटवादीपणा सगळ्य़ावर मात करताना पक्षात दोन गट पाडून गेला. मार्तोव्हाचा मेन्शेव्हिक तर लेनीनचा बोल्शेव्हीक असे दोन गट इस्क्राच्या संपादनावरुन पडले.
Socialist Revolutionary Party:  लेनीनच्या वा मार्क्सवाद्यांच्या पार्टीपेक्षा जास्त प्रसिद्ध व रशीयातील जनमानसात रुजलेली दुसरी पाटी म्हणजे ही रिव्हाल्युशनरी पार्टी. या पार्टिचं मार्क्सशी काही देणं घेण नव्हतं. कारण ही शेतक-यांची संघटना होती. अन मार्क्सच्या सिद्धांतात शेतक-याना जागा नाही. त्यामुळे मार्क्सवाद्यांचं व शेतक-यांचं कधी जमलच नाही. मार्क्सवाद्याना केवळ कामगारांची क्रांती हवी होती तर रिव्होल्युशनरीजना राष्ट्रीय स्वरुपाची क्रांती हवी होती. म्हणजे या क्रांतीत श्रमिक जनते बरोबर बुद्धिजीवी व शेतकरी वर्गाला सोबत घ्यावे हा यांचा सिद्धांत होता. थोडक्यात मार्क्सवाद्यांपेक्षा रिव्हॉल्युशनरी पक्षाची भूमिका अधिक व्यापक व समावेशक होती. कारण त्यांचे म्हणने होते की देशाला जशी श्रमिकांची व शेतक-यांची गरज आहे तशीच लेखक, शास्त्रज्ञ व बुद्धीजीवी वर्गाचिही आवशकता आहे.  ही झाली रशियातील चळवळीची अवस्था व संघटनांची तोंडओळख.
काळा रविवार:
२२ जाने १९०५ रोजी वर्कर्स युनियनने झारला आपले निवेदन सादर करण्यासाठी एक मिरवणूक काढली. सेंट पिटर्सबर्ग मधील विंटर पॅलेस या झारच्या महालाच्या दिशेनी ही मिरवणूक निघाली. हजारो कामगार आपल्या बायका मुलांसोबत या मिरवणूकीत  उतरले होते. मिरवणूक पुढे सरकू लागली तस तसे झारचे पोलिस व गुप्तहेर मात्र पेटून उठले. मिरवणूक राजवाड्याच्या चौकात येऊन धडकली. झारनी या मिरवणूकिचा बंदोबस्त करण्यासाठी एखादी प्रतिनिधी मंडळ पाठविण्या ऐवजी सैन्याला पाचारण केले होते. कामगाराना वाटले होते की किमान आमचे म्हणने ऐकुन तरी घेतले जाईल. पण झाले उलटेच. तुफान गोळीबार सुरु झाले अन मिरवणूकीत हाहाकार उडाला. या गोळीबारामुळे कामगार पळून जाऊ लागले तरी सैन्यानी गोळीबार चालूच ठेवला. सर्वत्र मुडदे पडले व रक्ताचे लोट वाहू लागले. जिकडे तिकडे लहान मुले व बायका किंचाळत होत्या. सैनिकांचा गोळीबार काही थांबेना. बघता बघता सगळी मिरवणूक स्मशानात बदलून गेली होती.  या हत्याकांडाने लोकांचा झारशाहीवरील विश्वास उडाला. आता मात्र प्रत्येकाला वाटू लागले की झारशाही उलथलीच पाहिजे. अन हा दिवस काळा रविवार म्हणून इतिहासात नोंदला गेला. झारचे शंभर गुन्हे पुर्ण झाले होते. आता क्रांती वेग घेणार होती. खरेतर झारच्या मुर्खपणामुळेच क्रांतीला वेग मिळणार होता.
तिकडे हजारो मैल दूर बसलेला लेनीन मात्र या घट्नेचे भांडवल करुन कसे राष्ट्र पेटविता येईल यावर विचार करु लागला. अन परत एकदा आपला लाडका सिंद्धांत “व्यवसायिक क्रांतीकारी”  इस्क्राच्या माध्यमातुन रशियाभर रुजविण्याची मोठ्या जोमाने सरुवात झाली. आता मात्र लोकाना हा सिद्धांत पटू लागला होता. लेनीनच्या विद्वत्तेमुळे नव्हे... तर झारच्या मुर्खपणामुळे!
आता मात्र रशियन सैनिकही अधून मधून उठाव करु लागले खरे पण त्या उठावामागे पद्धतशीरपणे एक यंत्रणा उभी नसल्यामुळे झारचे सैन्य या बंडखोर सैनिकांचा उठाव मोडून काढीत. अशा बंडखोर सैनिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात होती. लेनीनने या बंडखोर सैनिकाना आपल्या यंत्रणेत आणण्याची निती आखायला सुरुवात केली. कारण हे बंडखोर सैन्य क्रांतीसाठी मोठी महत्वाची भिमिका वटवू शकतात हे लेनीन जाणून होता.
झारशाहिचा अंत:
१२ मार्च १९१७ पासून पेट्रॉग्राड पेटून उठले. कामगारांचा व क्रांतिका-यांचा उठाव तर झालाच पण त्यात भर म्हणून बंडखोर सैनिक झारच्या विरोधात उभे ठाकले. आता कामगार वर्ग व बंडखोर सैन्य एकवटून उभे झाले. ड्युमा नावाची संसद विसर्जित करण्याचे झारने आदेश दिल्यामुळे ड्युमा सदस्यही झारच्या विरोधात आपापली राजकीय व संसदीय ताकड जमेल त्या पद्धतीने वापरत झारला शेवटाचा घोट पाजण्यास उभी झाली. बंडखोर सैन्याची संख्य प्रचंड गतीने वाढत गेल्यामुळे निष्टावाण सैन्याचा पाडाव होऊ लागला. एकंदरीत रशियात अराजक माजले होते. आता मात्रा झारशाही टिकने अशक्य झाले होते. लेनीन मात्र आजूनही देशाबाहेरच होता. मात्र त्याचे बोल्शेव्हिक क्रांतिकारी सदस्य त्याच्या ईशारावरुन ईथे धुमाकुळ घालत होते. थोडक्यात सगळचं अस्तव्यस्थ झाले होते.
हे सगळं घडत होतं तेंव्हा झार निकोलस कुठे होता? मोहिलेव्ह येथे आपल्या शाही आगगाडीत मस्तपैकी विश्रांती घेत होता. जेंव्हा पेट्राग्राडची बातमी झारला सांगण्यात आली तेंव्हा हा उठाव बोलणितून शमविण्या ऐवजी झारनी जनरल इव्हानोव्हला हा उठाव सैन्याच्या बडावर मोडून काढण्याचा हुकूम दिला. जनरल साहेब आपले राजनिष्ठ सैन्य घेऊन पेट्रॉग्राडच्या दिशेने निघाले. शाही आगगाडिही हलली. ती आता पेट्रॉग्राडच्या दिशेनी धावू लागली. आपला अंत जवळ आला हे झारच्या लक्षात आले नव्हते.  रात्री दोन वाजता ही शाही गाडी मलयविशेरा स्टेशनवर येऊन थांबली होती. झार गाढ झोपेत होता.
स्टेशनवरील  सैन्य अधिकारी झारच्या अधिका-याजवळ येऊन एक धक्कादायक माहिती दिली. तो म्हणाला “पेट्राग्राड क्रांतिका-यानी ताब्यात घेतले असून ड्युमाच्या सहाय्याने तिथे हंगामी सरकार स्थापण झाले आहे. त्यामुळे आता झारला पेट्राग्राडला जाता येणार नाही”  मलयविशेराहून ही शाही गाडी पेट्राग्राड ऐवजी स्कोव्हच्या दिशेनी फिरविण्यात आली. झारचे राज्य जेंव्हा बंडखोर व क्रांतिका-यानी हाती घेतले तेंव्हा हा झार गाढ झोपेत होता.
ड्युमा हे झारच्या सरकारातील प्रतिनिधी मंडळ होय. हा बंड झाला तेंव्हा ड्युमाचा सभापती होता रोडॅझिऍन्को. तिकडून झारने ड्युमाला तार पाठवून ड्युमा विसर्जीत करण्याचे आदेश दिले. पण ड्यूमाने झारचे आदशे धुडकावून लावले व क्रांतीकारकाना साथ देण्याची तैय्यारी दर्शविली. हजारो विध्यार्थ्यांचा व क्रांतिकारकांचा लोंढा जेंव्हा घो घो करत येऊन या ड्युमाच्या ईमारती समोर धडकला तेंव्हा चित्र असे होते की हे क्रांतीकारी लोकं ड्युमाची इमारत ताब्यात घेऊन सर्व ड्युमा सदस्याना विजेच्या खांबावर लटकविणार की काय अशी अवस्था होती. बंडखोर सैनिकांच्या हातात हत्यारं होती व ते सैन्य झारच्या सैनिकांची व सकराई नोकरांची कत्तल करत पुढे सरकत होते. जेंव्हा हा क्रांतीला लोंढा ड्युमाच्या इमारतीला धडकला तेंव्हा ड्युमा सदस्य मिटिंगमध्ये होते. द्वारपालानी जेंव्हा बाहेरील परिस्थीतीची कल्पना रोडॅझिऍन्को याना दिली तेंव्हा त्याचं डोकं सुन्न झालं. काय करावं कळेना. तेवढ्यात अलेक्झांडर केरेन्स्की नावाचा एक ड्युमा सदस्य  उभा होतॊ अन थेट बाहेर झेपावतो. आलेल्या क्रांतिकारंकाना हात दाखवुन तो म्हणतो “क्रांतीच्या अग्रदुतांचं मी स्वागत करतो, ड्युमा तुमच्या पाठीशी आहे” अन क्षणात सगळं चित्र पालटून जातं.  टॉरिड प्रासादाचे वातावरण एक क्षणात पालटले. पेट्रोग्राडमधील कामगार प्रतिनिधीनी प्रातिनिधीक मंडळाची( सोव्हिएट ऒफ वर्क डेप्युटीज) स्थापना केली. पेट्राग्राडचा सारा कारभार आता या सोव्हिएट्स मार्फत चालणार होता. ड्युमा मधील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचा नेता श्खेईड्झ याची सोव्हिएट्सच्या अध्यक्षपदी तर अलेक्झांदर केरेन्स्की याची उपाध्यक्षपदी निवड झाली.  आता टॉरिड प्रासादात सोव्हिएट्सच्या क्रांती सेनेची कचेरी स्थापण करण्यात आली. कारण झारचे निष्ठावाण सैन्य रशियाभर पसरले होते. ते सैन्य एकवटून मोठा हल्ला चढविणार व हे हंगामी सरकार उलथून लावणार याची जाण क्रांतिकारकाना होती. त्यासाठी सोव्हिएट्सच्या क्रांतीसैन्यात एक सुसुत्रता आणण्यासाठी ईथेच कचेरी थाटून कामास सुरुवात झाली. अशा प्रकारे ड्युमाच्या प्रतिनिधी मंडळाद्वारे हंगामी सरकार काम पाहू लागले. आता एकच काम बाकी होते, ते म्हणजे झारचा राज्यत्याग पत्रावर स्वाक्षरी घेण्याचे.
गुचकोव्ह आणि श्लगिन हे ड्युमाचे सदस्य १५ मार्च १९१७ रोजी स्कोव्हला निघून गेले.  रात्री १० वाजता ते ते स्कोव्हाला पोहचले. गुचकोव्हने राज्यत्यागाच्या घोषणेचा कागद झारच्या हाती दिला. झार हताश व हतबल होता. त्यानी राज्यत्यागाचे कागद घेतले. आपल्या वयक्तीक खोलीत गेला, सही केली कागद सुपुर्द केले. रात्री ११.४० मिनटानी झारचा निरोप घेऊन हे दोन्ही ड्युमा सदस्य परतीला निघाले.  अशा प्रकारे १५ मार्च १९१७ रोजी झारशाही संपुष्टात आली व १६ मार्च पासून हंगामी सरकार कारभार पाहू लागले. आता रशियात लोकशाही येणार होती व त्यासाठी २५ नोव्हे १९१७ रोजी सार्वत्रीक निवड्णूका घेण्याचे जाहीर झाले.
१२ मार्च ते १५ मार्च या चार दिवसात ड्युमा सदस्यातील केरेन्स्की नावाच्या सदस्यानी एवढी तडफ दाखविली की सा-या रशियात या माणसाची वाहवाई होऊ लागली. ड्युमा मध्ये जहाल व मवाळ असे दोन्ही गट होते. या दोन्ही गटाना अशा अवघड प्रसंगी एकसंध बांधून ठेवण्याची किमया केरेन्स्किनी करुन दाखविली. आता जागोजागो प्रचार सभा घेऊन केरेन्स्की सांगू लागला की जुलमी झारशाहीचा अंत झाला असून आता स्वातंत्र्य, समता व बंधूता या मातीत रुजणार आहे.
कोणी घडवून आणली ही क्रांती?
सोशलिस्ट रोव्हॉल्युशनरी पार्टी म्हणजेचे शेतकरी, विद्यार्थी व बंडखोर सैनिकानी ही क्रांती घडवून आणली. या क्रांतीमध्ये मार्क्सवाद्यांचं योगदान नगण्य होतं. मग कुठे होते बोल्शेव्हिक.
क्रांतीच्या वेळी बोल्शेव्हिक विदेशात होते:
रशियात जेंव्हा ही क्रांती झाली तेंव्हा सर्व प्रमुख बोल्शेव्हीक नेते हे देशाबाहेर होते. बोल्शेव्हिक क्रांतिचा जनक खुद्द लेनीन हा झुरिकमध्ये राहात होता. बुखारिन आणि ट्रॉटस्की हे न्युयार्कला होते. तसेच झिनोव्हेह, सेमाश्को, लुनाखरस्की, गॅनेटस्की व लिटविकॊव्ह यापैकी सगळे युरोपात वेगवेगळ्या देशात होते. स्टॅलिन, कामेनेव्ह आणि स्वेर्डलोव्ह हे सैबेरीयात हद्दपारीची शिक्षा भोगत होते. म्हणजे बोल्शेव्हीक नेत्यांचं या क्रांतीशी काही देणंघेणच नव्हतं. १६ मार्चला युरुपातील सर्व पेपरातून रशीयन क्रांतीची बातमी झळकली. लेनीनचा सहकारी ब्रान्स्की पेपरातील हे बातमी वाचून हादरुन गेला. तो धावत धावत लेनीनकडे आला व म्हणला “कॉमरेड, झारशाही नष्ट झाली” तेंव्हा लेनीननी ब्रान्स्कीला वेड्यात काढलं. पण जेंव्हा त्यानी लेनीनच्या हातात वृत्तपत्र ठेवला तेंव्हा लेनीनही हादरुन गेला. हा मोठा धक्का होता. कारण बोल्शेव्हीक व कामगारच काय ते क्रांती करु शकतात व झारशाही उलथवू शकतात हा लेनीनचा दावा होता. पण रशीयन रिव्हॉल्य़ुशनरी व ईतर लोकानी मिळून बोल्शेव्हिकांच्या सहकार्या शिवायच ही क्रांती केली होती. तसही रिव्हॉल्युशन-यांची भूमिका व्यापक होती व त्याचा हा परिपाक होता. केरेन्स्की नवा हिरो म्हणून उदयास आला होता. जेंव्हा लेनीन वाचले की केरेन्स्की हा स्वातंत्र्य, समता व बंधूता ची घोषणा देतो आहे तेंव्हा तो चरफळला. कारण लेनीनला हवी होती कामगारांची हुकूमशाही. अन रशीयात आली होती शेतक-यांची व बुद्धीजीवी लोकांची लोकशाही. ड्युमा सदस्यांद्वारे चालविले जाणारे हे हंगामी सरकार नोव्हे १९१७ मध्ये सार्वत्रीक निवडणूका घेऊन रशीयाला लोकशाहीच्या नव्या वाटेवर नेऊन ठेवण्याची घोषणा करुन त्या दिशेनी कामाला लागले होते.
आयत्या बिडावर उतरले बोल्शेव्हिक:
क्रांती झाल्याचे कळताच हे सगळे बोल्शेव्हिक रशियाच्या दिशेने झेपावले. दहा दिवसाच्या आत स्टॅलीन पेट्राग्राडला उतरला. प्रावदा पत्राचे प्रकाश पुन्हा सुरु केले. त्या नंतर आसपासच्या देशात लपलेले सगळे बोल्शेव्हीक हळू हळू देशात परतु लागले. २९ मार्च १९१७ ला स्टॅलिनने नव्या हंगामी राजवटी बद्दल प्रावदा मधून लिहले की “नव्या हंगामी राजवटीशी बोल्शेव्हिकानी समझौता केला पाहिजे” यावेळी पहिल्या महायुद्धाचा वनवा युरोपातील कित्येक देशांच्या सिमा भस्म करत चालला होता. म्हणून स्टॅलिनचे म्हणने असे होते की आपण सर्वानी हंगामी सरकारच्या पाठिशी उभे राहून जर्मनांचा जोरदार प्रतिकार केला  पाहिजे व देशाला जर्मनांच्या तावडीतून सोडविले पाहिजे.
२० मार्च १९१७ रोजी लेनीनने झुरिकहून पत्र लिहले. त्या पत्रात लेनीन म्हणतो की “मिलिउकोव्ह, गुचकोव्ह आणि ड्युमातील इतर काही मंडळी याना हाताशी घेऊन इंग्लड व फ्रान्स या साम्राज्यवादी राष्ट्रानी झारशाही उखडून टाकली आहे. जर्मनांच्या विरोधात रशीयन लोकानी अंग्लो-फ्रेंचाच्या बाजून लढावे अन साम्राज्यवाद मजबूत करण्यास योगदान द्यावे या हेतूने झारशाही नष्ट करण्यास या देशानी क्रांती घडवून आणली आहे. ही क्रांती खरी क्रांती नसून क्रांतीच्या नावाखाली साम्राज्यवाद्यानी खेळलेला डाव आहे”
२४ मार्च १९१७ ला लेनीनने दुसरे पत्र लिहले तो म्हणतो “रशियातील कामगारानी साडेसात लाखाची सेना उभारुन जमिनदार व भांडवलदारांचे हस्तक गुचकोव्ह नि मिलिउकोव्ह या दुकलीची सत्ता नष्ट केली पाहिजे. रशीयन कामगार वर्गाने या बाबतीत आघाडीवर असायला हवे. जगातील सर्व कामगारानी हेच केले पाहिजे. सर्वानी भांडवलशाही सरकार विरोधात उठाव करुन कामगारांचे सरकार स्थापन केले पाहिजे”
२५ मार्चला लेनीनने आणखी एक पत्र लिहले ते सुद्धा गुचकोव्ह नि मिलिउकोव्ह याना भांडवलदारांचे दलाल ठरविणारेच पत्र होते.
ही पत्रे एप्रिल मध्ये प्रावदा मधून  प्रकाशीत करण्यात आली. थोडक्यात लेनीन व प्रावदाचा संपाडक स्टॅलिन यानी एकाच विषयावर परस्पर मत प्रदर्शीत केले होते. स्टॅलिननी मार्च महिन्यात जे प्रावदा मधून छापले अगदी त्याच्या उलट एप्रिल मध्ये छापावे लागले. कारण लेनीन हा बोल्शेव्हिकांचा बाप होता. या दोन परस्पर विरोधी विधानानी बोल्शेव्हिकामध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
लेनीन अध्यापही झुरिकमध्येच होता. हंगामी सरकारवर प्रचंड टिका करुनही या सगळ्य़ानी लेनीनवर टिका करण्या ऐवजी देशात आल्यास स्वागत करु असे जाहीर केले. लेनीन जर रशीयात पोहचला तर मग कम्युनिस्ट चळवळ जोर धरेल म्हणून इंग्लड व फ्रान्सनी आपल्या देशातून त्याला प्रवास करण्यास मनाई केली. तसेच ट्रॉटस्की अमेरीकेतून हॅलिफॅक्स येथे पोहचताच ब्रिटीश सरकारनी त्याच्या पुढच्या प्रवासावर बंदी घातली. पण हंगामी सरकार अत्यंत उदारपणे वागले. परराष्ट्रमंत्री मिलिउकोव्ह यानी ब्रिटीश सरकारकडे तार करुन ट्रॉटस्कीला प्रवास करु द्यावा अशी विनंती केली व ती विनंती मान्य झाली. ट्रॉटस्की रशीयात उतरला. आता फक्त लेनीन व त्याचा कंपू देशाबाहेर होते. रशीयातील हंगामी सरकार एकदा का निवडणूका लढवून स्थीर झाले की सगळेच संपेल हे लेनीन जाणून होता. त्यामुळे ह्या निवडणूका होण्या आधीच रशीयात धडकायचे व हंगामी सरकार हाणून पाडायचे या इराद्याने लेनीनने स्वित्झर्लंड सोडण्याचा निर्णय घेतला. जर्मन सरकारकडॆ विणवण्या करुन बंद डब्यातून प्रवास करण्याची परवानगी मिळविली. जर्मनानी लेनीनचा प्रवास घडवून आणन्याचे सोपे कारण होते. लेनीन जर रशीयात पोहचला तर तो रशीयाला युद्धातून बाहेर खेचून काढेल व जर्मनाना इंग्लड व फ्रेंचाचा सहज धुव्वा उडविता येईल असं हे गणित. म्हणून लेनीन रशीयात पोहचणे जर्मनीसाठी आवश्यक बनले होते.
बंद डब्यातून प्रवास:
१० एप्रिल १९१७ रोजी लेनीन व कंपू गुप्त प्रवासाला निघणार होते. बर्गेनच्या जोजनेनूसार स्वित्झर्लंड मधील या क्रातिकारकाना अत्यंत गुप्तपणे बर्नहून जर्मनी व स्विडन यांच्या सिमेवरील सासनिट्झ या स्टेशनवर सोडण्यात येणार होते.  या प्रवासी तुकडीचे नेतृत्व फ्रिट्झ प्लॅटेन याच्याकडॆ होते. प्रवासात सगळे क्रांतिकारी प्लॅटेनचे नेतृत्व नि आदेश मानतील असे लिहून घेण्यात आले. आणि सुरु झाला झुरीक ते पेट्राग्राड्चा प्रवास जर्मनांच्या देखरेखीत अत्यंत गुप्त व बंड डब्यातून.  लेनीनच्या या गुप्त प्रवासाचा बेत आखताना जर्मनीने स्विझ सरकारचीही परवानगी मिळविली होती.  प्रवास सुरु झाल्यावर बर्नमधील जर्मन राजदुताला आठवण झाली की या लोकानी स्विडन मधून प्रवास करण्याचा परवानाच घेतलेला नाही. म्हणजे हे स्विडन मध्ये अडकणार. लेनीनला लवकरात लवकर रशीयात पोहचविणे जर्मनांची जबाबदारी व गरज होते. मग बर्लिनला फोने करुन परराष्ट्र खात्याला कामाला लावले. त्यानी स्विडनशी बोलून हा परवाना मिळविला व एकदाचा कटकट संपली.
या प्रवासात कोणालाही मधल्या स्टेशनवर उतरण्याची वा बाहेर डोकावण्याचे परवानगी नव्हती. कारण लेनीन प्रवास करतोय हे कळताच दोस्त राष्ट्राचे सैन्य त्या वाटॆत घातपाट घडवून आणतील ही भीती होती. मग काय यानी काहिही लागले तर ती वस्तू आणुन देण्याची जबाबदारी प्लॅटेनची होती.  लेनीन हा पट्टीचा बिअरबाज असल्यामूळे प्लॅटेनने त्यांच्यासाठी खास जर्मन बिअरची सोय केली होती.  दर मजल करत १३ एप्रिल १९१७ ला रात्री ही गाडी सासनिट्झला पोहचली. बंद डब्यातील प्रवास संपला. बर्न ते सासनिट्झच्या प्रवासाला तीन दिवस लागले. नंतर लहानशा हॊडीतून २० मिनटाचा प्रवास करुन मधली खाडी ओलांडली व स्विडीश भुमीवर पाय ठेवला. गॅनेटस्की नावाचा लेनीनचा सहकारी येथे स्वागतासाठी उभाच होता.
लेनीन रशीयात येत असल्याची तार मिळताच बोल्शेव्हिकानी जंगी तयारी केली. पेट्राग्राडच्या वेशीवरील फिनलंड स्टॆशन लेनीनच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. १६ एप्रिल १९१७ रोजी लेनीनची गाडी फिनलंड स्टेशनला शिरली. दोनच शक्यता होत्या. एकतर हंगामी सरकार आपल्याला फासावर चढवेल किंवा आपण रशियाची सत्ता हातात घेणार. एखाद्या सम्राटाचे स्वागत व्हावे असे बोल्शेव्हिकाने लेनीनचे स्वागत केले. १९०७ मध्ये रशीयातून कायमची काकलपट्टी झाली होती. आज पुर्ण १० वर्षानी लेनीन रशीयात परतला होता.
हंगामी सरकारच्या वतिने श्खेईड्झने लेनीनचे स्वागत केले.  स्टेशनवरील भाषणात लेनीन म्हणाला “रशियात नुकतीच जी बुर्झ्वा राजवट प्रस्थापित झाली आहे ती नष्ट करुन कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा माझा मानस असून कामगार मित्रानो आता क्रांतीसाठी सज्ज व्हा!” खरं तर हंगामी सरकारनी धाडसं दाखवून लेनीनला लगेच अटक करायला हवे होते. पण बोल्शेव्हिकांचा दरार ईतका होता की हे करण्याचे धाडस या सरकारकडॆ नव्हते.

आता लेनीन परतला होता. रशियातील लोकशाही उधळून लावणारी आक्टोबर क्रांतीची पायाभरणी सुरु झाली.

1 टिप्पणी:

  1. Thanks for info about Russian revolution.

    I will like to share documentary link about Stalin. I have not finished watching it yet. I am not sure if youtube has all episodes. I am getting it from netflix

    http://www.youtube.com/watch?v=D2A4hyoOrlU

    उत्तर द्याहटवा