गुरुवार, २७ जून, २०१३

Who Cares! (?)

हे दोन शब्द... म्हणजे एक वाक्य.... म्हणाल तर माझं आवडतं म्हणाल तर माझ नावडत. या शब्दांचा थेट मराठी प्रतिशब्द तसं अवघडच पण त्या धाटणिचे किंवा हू केअर्सच्या जरा जवळ जाणारे पहिले वाक्य म्हणजे गेला उडत. पण गेला उडत हे अगदीच सदाशिवपेठी टाईपचं झालं, अगदीच मिळमिळीत झालं. खरी मजा आहे गावठी वर्जन्स मध्ये. पण गावठी वर्जन्स ईतके उग्र आहेत की ते मी ईथे देऊ शकणार नाही. तरी द्यायचंच झाल्यास अरे हाsड हे देता येईल. अरे हाड म्हटल्यावर पुढचे काही सेकंद मन कसं अगदी हलकं हलकं होतं. मोठं काहीतरी ओझं टाकून दिल्यासाखं वाटतं. तुम्हाला शंका असल्यास नुसतंच अरे-हाड म्हणून बघा. बरं वाटतं. पण खरी मजा येते ते हू केअर्स मध्येच.
तर कधी हू केअर्स!  तर कधी हू केअर्स? अशा दोन प्रकारे मी वरील वाक्य वापरत असतो. पण जास्त कामाचं कुठलं तर हू केअर्स! हेच.  खरं तर हे वाक्य म्हणजे नुसतं वाक्य नाहिये. हे वाक्य म्हणजे एक अट्यिट्यूड आहे. कशाचा एटिट्यूड... म्हणाल तर झुगारण्याचा वा म्हणाल तर मनसोक्त जगण्याचा, दोन्ही आहे. तुम्ही कुठे वापरता त्यावर अवलंबुन आहे. ते संपुर्णत: प्रसंगसापेक्ष असतं. या हू केअर्सनी मला अनेकवेळा अडचणीत आणलं. तेंव्हा मात्र लागलीच ठरवून टाकलं की यापुढे जरा जपून वागायचं. पण सालं दुस-यांदा हू केअर्स प्रकार करुन संपल्यावर आठवतं की “नाही आपण हे नको करायला होतं” पण काय फायदा. तोवर हा माझा हू केअर्स माझा पार बट्ट्याबोळ करुन गेलेला असतो. नको नको त्या अडचणी कित्येकवेळा मी फक्त या दोन शब्दामुळे स्वत:वर आदळवून घेतल्या. कित्येकवेळा कारण नसताना हू केअर्स तोंडातून व कृतीतून निसटला व नंतर रेंगाळावं लागलं.  सुरुवातीला वाटायचं हे हू केअर्स असणे म्हणजे विकृती की काय?
पण जसं जसं वाचण वाढलं तसं तसं मात्र या एटिट्यूडचं समर्थन करण्यायोग्य मटेरीअल सापडू लागलं. अनेक लोकांकडे पाहताना असा अनूभव आला की यांची ससेहोलपट केवळ “हू केअर्सच्या” अब्सेन्समूळे होते आहे.  कित्येकांची प्रगती ही हू केअर्सच्याअ अभावामूळे थांबली आहे(याच्या उलट माझी कित्येकवेळा अतिरिक्त हू केअर्समुळे थांबली हे ही तेवढचं खरं) कित्येक बायकाना हू केअर्स म्हणता येत नाही म्हणून त्या पिचत गेल्याचे पाहिले आहे. कित्येक कामगार हू केअर्स नसल्यामूळे तिथेच झिझत असल्याचे दिसले. हे सगळं पाहिल्यावर मला जरा बरं वाटलं. या सगळ्याना जर हू केअर्स म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटून गेलं.
कारण जेंव्हा तुम्ही हू केअर्स म्हणता तेंव्हा नवीन वाटा सुरु होतात.  हू केअर्सचे बरेच दोष आहेत. तरी हू केअर्स म्हणायला शिका.... त्यातून सुरु होतो नवा मार्ग. फक्त तो म्हणताना जरा संयम बाळगा. बास!
बाकी कोणी काही म्हणू द्या... “हू केअर्स!”

1 टिप्पणी: