सोमवार, १ जुलै, २०१३

डॉ. संजीवनी हाडे याना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा!


डॉ. संजीवनी हाडे
आज १ जुलै. तसं जुलै महिना म्हटलं तर आजारांचा महिना. असले नसले सगळे आजार एकाच वेळी उसळून येण्याचा हा महिना. या महिन्यात डॉक्टरांची चंगळ असते यावर माझा ठाम विश्वास. अगदी डॉक्टरानी देवाला अगरबत्ती नाही लावली तरी गि-हाईकांची रांग लागते. पेशाने डॉक्टर असणारे देवाची पुजा करतात तेंव्हा ते नेमकं काय मागत असतील यावर कित्येकदा जोक मारले जातात. काय मागत असतील डॉक्टर लोक? “लोकं आजारी पडू दे रे देवा” अगदी असं म्हणत नसले तरी “जास्तीत जास्त पेशंट येऊ दे रे देवा...” असं तर नक्कीच म्हणत असतील नै! फार फार तर याला सुधारुन “व्यवसाय बरा चालू दे रे देवा...” असं म्हणत असतील. पण या सगळ्या मागण्यातून माणूस आजारी पडो ही मागणी आडमार्गाने का होईना पण केली जाते. असो. प्रस्तूत लेखातील विषय तो नाहीच...माझं मत विचाराल तर मी देवाला मानत नाही. त्यामुळे डॉक्टरानी कितीही देवाला विनंत्या केल्या तरी त्यामुळे आजार येत नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. आजाराची कारणं बहुतेक वेळा आपलीच बेफिकीरी असते. कित्येक आजारं स्वास्थ सजगतेच्या अभावातून्य येत असतात. डॉक्टरानी दिलेली सुचनांचे नीट पालन न केल्यामूळे कित्येकदा आजार बळावल्याचे माझे स्वत:चे अनेक अनूभव आहेत.
आधीच्या काळात डॉक्टर हा पेशा अत्यंत सन्माननीय पेशा होता. ईतर क्षेत्रातील व्यवसायीक हे पैसे कमविण्यासाठी धावत असत पण डॉक्टर अन मास्तर मात्र आपला सन्मान टिकवून होते. काळाच्या ओघात खाजगी शिकवण्यांची लाट उसळल्यावर मास्तरानी हा सन्मान गमावला, पण डॉक्टरानी तो राखून ठेवला होता. पण ही परीस्थीती फार दिवस राहिली नाही. पैशाची लागण डाक्टरानाही लागली. मागच्या काही वर्षात डॉक्टर पेशातील लोकही पैशाच्या मागे धावताना दिसू लागले. मोठ्ठाले हॉस्पिटल बांधणे, विदेशी मशनरी आणने तर अनेक हॉस्पिटलांची साखळी उभी करणे अशी नाना स्वप्ने नवडॉक्टराना पडू लागली. मग स्वप्नपुर्तीच्या दिशेनी धावताना कित्येकानी हे ध्येय गाठलं खरं पण चिरडला गेला तो म्हणजे पेशंट. यात एक भर पडतच गेली. त्याच दरम्यान विदेशी पदवीचीही फॅशन आली.  म्हणजे विदेशातून एखादी पदवी करुन यायचं अन ईतरांच्या तुलनेत जास्त फीज आकारायचं. मधल्या काळात हे असे लंडन रिटर्न, अमेरीका रिटर्नच्या पाट्या जागो जागी दिसू लागल्या. या फॉरेन रिटर्न्सचा हेतू विशेष कौशल्य नि दर्जेदार सेवा होताच, यात शंका नाही पण जोडीला अधिकचा पैसा...यांची फीज ईतरांच्या तुलनेत दुप्पट. विदेशवारी/आधुनिक मशनरीज याचा पैसा लवकरात लवकर भरुन काढण्याच्या नादात डॉक्टरी पेशा मलीन होत गेला. मग पैशासाठी सिजरीन करणारे, लिंग परिक्षण करणारे व लहानशा आजाराचा बाऊ करुन पैसे उकळणारे अनेक किस्से बाहेर पडू लागले. मागच्या काही वर्षात अशा कित्येक डॉक्टरांचा पर्दाफासही झाला आहे. मग वाळल्यासोबत ओलेही जळू लागले. चांगले डॉक्टर्सही शंकेच्या टप्प्यात आले. आवाश्यक म्हणून केलेली सिझेरीनही बदनामीचे कारण ठरू लागली. समाजात अत्यंत आदराचे स्थान बाळगून असणारा डॉक्टरी पेशा आपले स्थान गमावू लागला.  चांगला डॉक्टर मिळने दुरापास्त झाले. अशा या दूर्मीळ परिस्थीतीत मला दोन डॉक्टरांचा आवर्जून उल्लेख करावसा वाटातो त्यातील एक नाव सर्वज्ञात आहे ते म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे व दुसरं नाव म्हणजे डॉ. संजीवनी हाडे. 
माझं बालपण भामरागडच्या रानात गेलं. आम्ही रानात जगणारी माणसं असल्यामुळे शक्यतो आजारी पडणं कमीच. सर्दी, खोकला, ताप बास! मोठ-मोठ्ठाले नामचीन आजरं आजून आमच्या रानात शिरायचे होते. शिरले तरी तिथेल्या अवघड जिवनशैलीत त्यांचा टिकाव लागला नाही. ही सगळी मोठ्ठी आजारं आरामदायी जिवनशैलीत लवकर रुळतात वा स्थीरावतात. खडतर आयुष्यात तग धरत नाहीत. कारण रोजचं राणोवणीच हिंडणं ईतकं असतं की कुठलाच व्यायाम न करताही शरीर सगळ्या आजारांची तटबंदी करु शकतं. तरी शरीर म्हटल्यावर आजार आहेच, मग पावसाळ्यात ताप तर ईतर वेळी खरुज. मग आम्ही थेट प्रकाश आमटेंकडॆ जायचो. प्रकाश आमटे फक्त एकच ईजेक्शन द्यायचे ती म्हणजे पेनासिलिन कि पेनाडोल अशी काहीतरि होती. आधी हातावर टेस्ट करुन अर्धा तासानंतर कमरेत टोचायचे. मग पुढचे दोन दिवस लंगडत चालावे लागे. प्रचंड दुखायचं. प्रकाश आमटॆला शिव्या शाप देत घरी यायचो. पण दोन दिवसात ठणठणीत व्हायचो. असे हे आमचे रानातले डॉक्टर. 
नंतर पुण्यात राहयाला आल्यावर अनेक डॉक्टर्स झाले. त्या दरम्यान कित्येक बरे वाईट अनूभव आलेत. कित्येकानी लुटलं, कित्येकानी बेफिकिरी केली. या दरम्यान डॉक्टरांच्या बेफिकीरीमुळे आम्ही एक अशी गोष्ट गमावली जी भरून निघणे अशक्य आहे. या घटने नंतर आमचा डॉक्टरांवरचा विश्वास ढासळत गेला. अशा दारूण अवस्थेतून जात असताना एक दिवस आमच्या धायरीत संजीवनी हाडे नावाच्या डॉक्टरची ओळख झाली. अन पैसे कमवणा-यांच्या गर्दीत एक चांगला डॉक्टर गवसला.
डॉ. संजीवनी हाडे यांचं क्लिनीक बेनकर मळ्यातील चाफळकरांच्या पोजेक्ट मध्ये आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये प्रवेश केल्या केल्या पहिली गोष्ट नजरेस पडते ती म्हणजे भींतीवरील स्वामी विवेकानंदाचा मोठा फोटो. स्वामी विवेकानंद हे डॉ. संजीवनीचे उर्जास्त्रोत आहेत. अन माझं अगदी उलटं. स्वामी-बुवा-संत दिसले की माझं डोकं फिरतं. त्याही दिवशी फिरलं. ईतराना ते प्रेरणादायी ठरत असेलही पण माझ्या सारख्या नास्तिकावर मात्र अगदी उलटा परिणा झाला. पहिल्या भेटीत मनात आलं “जागा चुकली आपली, ही डॉक्टर तर अट्टल भोंदू दिसते. साधू-संत नि बाबा-बुवा वाली दिसते, आपले पैसे फुक्कट गेले म्हणायचे”  असं म्हणत मी डॉक्टर बाईच्या पुढे जाऊन बसलो. ईतरांच्या मोजपट्टीतून ही जरी नकारात्मक मानसिकता वाटली तरी माझी पार्श्वभूमी पाहता वरील प्रतिक्रीया बरोबर होती. फरक एवढाच की दिसते त्या पलिकडॆही एखादं व्यक्तीमत्व असतं नि ते समजावून घ्यायला व कळायला एक विशिष्ठ कालावधी जावा लागतो. तो तेवढा काळ द्यावाचा लागतो. तो दिला की सगळं व्यवस्थीत जुडून येतं. अन माझ्याकडे पर्याय तरी कुठे होता?
डॉ. संजीवनी अत्यंत शांत स्वभावाच्या, हळूवार आवाजत बोलणा-या, अगदी क्लिनीक मधल्या त्यांच्या हालचालिही तश्याच... हळू हळू... शांत शांत... अत्यंत काळजिने सगळं विचारणा-या, धीरगंभीर चेहरा करुन सगळं ऐकुन घेणा-या व अगदी थोडक्यात व सौम्य शब्दात खालच्या पट्टीतल्या स्वरात उपाय सांगणा-या... हा सगळा सौम्यपणा पाहून सुरुवातीला मला त्या डिप्रेसिंग पर्सनालिटी वाटल्या... पण धायरी सारख्या ठिकाणी एम.बी.बी.एस.चा पर्याय नसल्यामुळे काही झालं की त्यांच्याकडेच जावं लागायचं.  दरम्यान हे ही लक्षात येऊ लागलं की संजीवनिनी दिलेल्या औषधाला गूण येतो. माझी बायको व मुलगी तर तिकडॆच बांधले गेले. मी मात्र आजूनही “काय ते संथ प्रकरण” असं म्हणून झटकून द्यायचो. पण कित्येकदा नाईलाजास्तव संजीवनीकडॆच जायचो. मग हळू हळू मी ही डॉ.संजीवनी कडेच जाऊ लागलो.  डॉक्टर पेशंटचं संवाद वाढू लागलं. ज्या बाईला मी सुरुवातील “हे काय संथ प्रकरण” म्हणायचो ती बाई चक्क गप्पिष्ट आहे हे कळत गेलं. प्रथम दर्शनी दिसणारा स्वामी विवेकानंद जरी स्वागत करत असला तरी कधीच भींतीवरुन उतरुन पेशंट पर्यंत पोहचत नाही. बाईसाहेब स्वत:हून कधीच विवेकानंदावर बोलत नाही. नुसता नावाला फोटू चिटकवला आहे असं एकंदरीत त्या वागतात. जेंव्हाकी आहे अगदी उलटं. त्यांचं उभं आयुष्य विवेकानंदानी व्यापलेलं आहे. तरी त्या याचा अतिरेक होऊ देत नाहीत. थोडक्यात भींतीवरचा विवेकानंद भींतीवरुन उतरून तुमच्या पर्यंत येणार नाही याची त्या काळजी घेतात. मागच्या ५ वर्षापासून त्या आमच्या फॉमिली डॉक्टर आहेत. दरम्यान मी हळू हळू त्यांच्याशी संवाद वाढवत नेला. मग अधे मधे हळूच त्या भिंतीवरच्या विषयाला हात घातला. मग संथ ते रवंथ असाही प्रवास झाला. सुरुवातील मला वाटायचं आपण बाईला बोलकं करतोय. पण नंतर कळत गेलं की नाही... त्या स्वत:च बोलक्या आहेत. फक्त कळी खुलते जरा उशीरा. त्याही पुढे जाऊन आता असं लक्षात आलं की त्या स्वभावाने अत्यंत स्थीर असून सगळा उथळपणा कधीच वाहून गेलाय. म्हणजे मी ज्याला संथपणा म्हणायचो ते स्वभावातील स्थैर्य होतं. त्या नंतर अनेक विषयावर आमच्या गप्पा झाल्या अन होतात. धायरीतल्या क्लिनीकला त्या सायंकाळी असतात. सकाळी मात्र सिंहगडरोडच्या मठात सेवा देतात. डॉक्टरी पेशा नैतिक मुल्य गमावत असताना मला मात्र नितीमान डॉक्टर सापडल्या.
आजकाल दिवसा आड डॉक्टरांचे बुरखे फाडणा-या बातम्या पेपरातून येत आहेत. पण अशाही काळात मला डॉ. संजीवनी सारखी डॉक्टर भेटली. ज्या पैसा कमवतात खरे पण त्याच्या मागे धावत नाही याचं बरं वाटतं.  नैतिकता सोडून वागणारे डॉक्टर असतीलही पण नैतिकतेला धरुन व त्या पेशाला शोभेल असं वागणारेही डॉक्टर आहेत याचा संदेश देणा-या काही मोजक्या डॉक्टरांपैकी त्या एक. मी त्यांचा आभारी आहे. असे डॉक्टर आपणासही मिळो ही मनोकामना.
आज डॉक्टर्स डे... आपल्या डॉक्टरांचा आभार मानण्याचा दिवस. मी या दिना निमित्त डॉ. प्रकाश आमटे व डॉ. संजीवनी हाडे यांचे आभारे मानतो व त्याना शुभेच्छा देतो.


1 टिप्पणी:

  1. रामटेके सर आज पहिल्यांदाच आपला ब्लॉग वाचला. अनेक विषयांवरिल आपली मते अतिशय प्रामाणिक व पटणारी आहेत. आपले वाचन प्रचंड आहे. माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण स्वामी विवेकानंदांचे गौतम बुद्ध व बौद्ध धर्माविषयीचे विचार वाचावे. स्वामी विवेकानंद हे आपण समजत आहात त्या अर्थाने स्वामी नव्हते. ते चमत्कार, रुढी, जातीभेद, कर्मकांड (काही प्रमाणात मूर्तीपूजा ) यांच्या विरोधात होते.
    बौद्ध निःसंशयपणेहा निःसंशयपणे जगातील एक श्रेष्ठ धर्म आहे. हिंदू धर्मही अनेक व्याधींनी ग्रासलेला आहे. परंतु प्रत्येकाला आपण जन्माला आलेल्या धर्माचा अभिमान असतो. आपल्या धर्मातील चूकीच्या गोष्टी नाकारुन त्याचवेळेस इतर धर्मांबद्दल आदर बाळगणे हिच स्वामी विवेकानंदांची शिकवण आहे.''हिंदू धर्म अत्यंत घातकी, समाज द्रोही व मानवी मुल्याची पायमपल्ली करणारा एक कडवट व कट्टरपंथी धर्म आहे'' हे आपले विधान आपण मुस्लिम व इसाई धर्माशी तुलना करुन पुन्हा तपासून पहावे.
    तेजानंद गणपत्ये 9921341122

    उत्तर द्याहटवा