सोमवार, १५ जुलै, २०१३

...तर, स्त्री ही मादीच!आपण एकविसाव्या शतकात राहतो. विचारानी आधुनिक आहोत, शिक्षण व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली असुन आज माणूस थेट चंद्रावर जाऊन आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील भरारी, संगणकाची गती व तंत्रज्ञानाचा झपाटा हे सगळं पाहता आजचा माणूस म्हणजे चमत्कारांचा बाप आहे. त्याच बरोबर राजकीय, आर्थिक व सामाजीक प्रगतीचा ग्राफ वर जाताना एक मात्र नेहमी खटकणारी गोष्ट कानावर पडते ती म्हणजे माणसानी कितीही प्रगती केली तरी तो स्त्रीला आजही मादी म्हणुनच पाहतो...
अगदी घरात होणारे शारिरिक शोषण ते शाळा, महाविद्याल, रेल्वे स्टेशन, प्रवासातील गर्दी पासून तर थेट कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रीयांचे शोषण. या सर्व ठिकाणी पुरुषांच्या नजरा बायकांकडे मादी म्हणूनच रोखलेल्या असतात हा स्त्रीयांचा एक कॉमन ओरडा असतो. स्त्रीला स्त्री म्हणून स्विकारताना पुरुषाना एवढी अडचण का होते? तीला व्यक्ती म्हणुन स्विकाराणे आजही का बरं पुरुषाला जमत नाही. प्रत्येक स्त्री’त मादी दिसणे ही पुरुषांची विकृती आहे वगैर वगैरे चर्चा होतात.  अन या सर्व चर्चांचा निष्कर्ष काय तर पुरुष हे कितीही सुधारले तरी त्यांची ही विकृती काही जाणार नाही.
काल “उंच माझा झोका...” या मालिकेचा शेवटचा भाग होता. ते पाहताना या विषयावर चर्चा झाली अन  एका  पुरोगामी स्त्रीशी या विषयावर माझा जंगी वाद झाला. म्हटलं तो इथे आपल्या मांडावा.
माझं स्पष्ट मत आहे की स्त्री ही पुरुषासाठी मादीच असते. फक्त एक अपवाद... तिच्या गळ्यात नात्याचा बिल्ला असल्यास मात्र ती मादी नसते.
एखादी सुंदर स्त्री दिसली की पहिल्या दोन सेकंदात जी नैसर्गिक भावना उसळते ती मादीचीच. पण तिस-या सेकंदात संस्कार मुसंडी मारुन वर येतो अन मनाचा ताबा सव:कडे घेत तीचं वय, आपलं वय, तीचं वैवाहिक स्टेटस, समाजातील स्टेटस अशा नाना विषयाचा पाढा वाचून आपल्या थोबाडीत मारत आपल्या नैसर्गिक भावनांना लगाम घालतो. कालांतराने हे नित्याचंचं होऊन बसतं. एखादी स्त्री दिसली की सुरुवातील मादी अन नंतर संस्काराच्या दडपशाहीत माघार... हे प्रकार सुरु असतात. त्या नंतर आपण स्वत:ची पाठ थोपटू लागतो. "बघ... आपण स्त्री कडे आदराने पाहतो" वगैरे. पण हा सगळा बकवास आहे. नैसर्गिक प्रतिक्रीयेवरील संस्काराच्या दडपशाहीचा अंगवळनी पडलेला हा प्रकार.  बाकी काही असो, पण पहिल्या क्षणात सुंदर स्त्री बद्दल उसळलेली भावना ही सच्ची असून प्रत्येक स्त्री ही पुरुषासाठी मादीच असते. नंतर मात्र सारवा सरव करत आपण कृत्रीम भावना व्यक्त करतो. इथे कोणी म्हणेल तुमच्या आया बहिणीना पाहून हेच वाटते का? आजिबात नाही. कारण नात्याचा बिल्ला नैसर्गिक भावनावर कमालीचं काम करतो. ते असं...
 मी अहेरीत शिकताना आमच्या शाळेच्या रस्त्यात एक सुंदर मुलगी दिसायची. आम्ही सगळे मित्र तिकडून जाताना तिच्यावर लाईन मारायचो. तीही आमच्याकडे पाहून हसायची. मग आम्ही तिच्या बद्दल काय काय ते विचार करायचो अन बोलायचो.  अन एक दिवस आमच्या गृपच्या मित्राच्या मोठ्याभावाला तिचं स्थळ सांगुन आलं. अन दणक्यात लग्नही उरकलं. ज्या मुलिकडे काल पर्यंत आम्ही मादी म्हणुन पाहायचो आता ती आमची वहिनी झाली होती. हा वहिनीच्या बिल्ला इतका प्रभावी होता की एका क्षणात मादीची आदरणीय स्त्री बनली.  महाविद्यालयातही असे  काही किस्से घडले. कॉलेजमधील सगळ्यात हॉट मुलगी जिच्यावर आम्ही सगळे लाईन मारायचो तीनी चक्क एका मित्राशी लग्न केलं. एका क्षणात मादीची वहिनी झाली. मागची तीन वर्षे ज्या पोरीकडे मादी म्हणुन पाहायचो तीच्यातली मादी आता शोधुनही सापडेनाशी झाली. हे जबरदस्त स्थीत्यांतर कशामुळे घडून येतं? नात्यांमुळे.
आपल्या देशात नात्यातल्या स्त्रीला नावानी हाक मारले जात नाही. ती आत्या, मामी, काकू, मावशी, वहिनी, बहिण अशा  कुठल्या ना कुठल्या रुपात असते. अन जोवर हे नातं चिकटलं आहे तोवर ती मादी असूच शकत नाही. अगदी शेजारच्या व वाड्यातल्याच  काय पण गल्लीतल्या, मोहल्ल्यातल्या सगळ्याच स्त्रीयाना आपण कुठल्या ना कुठल्या नात्यानी हाक मारत असतो.... अमूक त्या काकू, अमूक तमूक त्या वहिनी, अमूक त्या ताई... हे असं असतं. मग ह्या अमूक-तमूक आपल्या नात्यातल्या नसल्या व केवळ ओळखिच्या असल्या तरी ही नात्याची लेबलं असतात. अन एकदा हे लेबल लागलं की मग त्या त्या लेबलच्या हिशेबानी तो मानही दिला जातो.
विदेशात मात्र शेजारची कॅथरीन नावाची काकू वायानी ४५ची असली तरी घरातला विशीतला जॉन तीला नावानी हाक मारताना “मिसेस कॅथरीन” असचं म्हणतो. म्हणजे कॅथरीनकडे मादी म्हणून पाहण्याचा मार्ग मोकळा. मग असे कित्येक कॅथरीन व जॉन पळून जाऊन विवाह करण्या पर्यंतचे अनेक किस्से वाचायला मिळतात. वयाचं भान हरपून थेट मादी म्हणून पाहताना, मज्जाव घालणारी नात्याची आडकाठी तिकडे नाही. कारण ते काकू म्हणत नाहीत वा वहिनी म्हणत नाही. थेट नावानी हाक मारल्यामुळे स्त्रीकडे मादी म्हणून पाहताना सोयीचं पडतं. हा प्रकार आता भारतातही सुरु झाला आहे. याचे काही फायदे असतीलही पण दुष्परीणाम मात्र भयंकर असणार. लवकरच आपण वीस वर्षाच्या पोरानी ४५शितल्या बाईशी लग्न केल्याच्या बातम्या ऐकणार आहोत. कारण नात्याचं लेबल नसलं की प्रत्येक स्त्री ही मादीच असते. काही वर्षा पुर्वी शेजारच्या वहिनीचा संदर्भ देताना भोसले वहिनी, पोकळे काकू असे असा उल्लेख केला जायचा. आता मात्र त्यात बदल झाला असून प्रिया वहिनी, वर्षा काकू इथ पर्यंत मजल गेली आहे. पुढच्या काही दिवसात नुसती नावच घेतली जातील. किंबहुना एका विशिष्ठ वर्गात हे सुरुही झालं आहे. हा थेट नाव घेण्याचा संस्कार इतर वर्गा पर्यंत झिरपायला फार वेळ लागणार नाही.
स्त्रीकडे मादी म्हणुन पाहताना भिंतीचं काम करणारी ही नात्यांची लेबलं आता गडून पडू लागलीत. प्रिया वहिनींची जेंव्हा फक्त मिसेस प्रिया उरेल तेंव्हा स्त्री ही फक्त अन फक्त मादी असेल. थोडक्यात जर नात्याचं लेबल नसेल तर स्त्री ही फक्त मादी असते. अन हा उलटा प्रवास सुरु झाला आहे. 
नातं नसेल तर... स्त्री ही मादीच!

जयभीम.
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा