सोमवार, २२ जुलै, २०१३

गुरुपौर्णिमा आणि धम्मचक्रप्रवर्तनसुत्त!

आज गुरुपौर्णीमा. बौद्ध धम्मात गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्वं आहे. त्याच बरोबर हिंदू धर्मात सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. बाबासाहेब लिखीत बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात येणारी कथा अशी. सिद्धार्थ गोतम गृहत्याग करुन सत्याच्या शोधात रानात निघून जातात. तपश्चर्या करत असताना रानात त्याना पाच तपस्वी/सन्यासी भेटतात. मग काही दिवस ते सिद्धार्था सोबत तपश्चर्या करतात.  काही दिवसानी भगवान बुद्ध अन हे पाच सोबती वेगवेगळ्या मार्गानी निघून जातात. नंतरच्या काळात भगवान बुद्धांची व त्या पाच सन्यास्यांची साधना आपापल्या मार्गानी चालू असते. अन एके दिवशी सिद्धार्थला बुद्धत्व प्राप्त होते. बुद्धत्व प्राप्त झाल्यावर पहिला प्रश्न असतो की हे प्राप्त झालेले ज्ञान कुणाला द्यावे. सुरुवातीला बुद्ध ठरवतात की सामान्य माणसाला कळेल असे हे ज्ञान नाही त्यामुळे कुणालाच दयायचे नाही. पण थोडा विचार केल्यावर बुद्धाच्या लक्षात येते की ध्यानसाधनेच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या सोबत जे पाच तपस्वी/सन्यासी होते त्याना धम्मज्ञान देता येईल. कारण ते पाच तपस्वी  ज्ञान ग्रहण करण्याच्या व समजण्याच्या योग्यतेचे होते.
मग भगवान बुद्धानी त्या पाच सन्यास्यांचा शोध सुर केला. काही दिवस रानावतानातून प्रवास करत भगवंतानी शेवटी त्याना शोधुन काढलं. मात्र सन्यासी बुद्धावर रागावलेले असतात. जेंव्हा तथागत भगवान बुद्ध त्या सन्यांसांजवळ पोहचतात तेंव्हा नाराज झालेले सन्यासी भगवंताचा धिक्कार करण्याचे ठरवून असतात. कुठल्याही परिस्थीतीत बुद्धाला स्विकारायचे नाही या मतावर ते ठाम असतात. पण साक्षात बुद्ध जेंव्हा त्यांच्या पुढे उभा राहतो तेंव्हा त्या सन्यास्यांच्या मनातील घृणा नष्ट पावते. नकळत ते बुद्धाची सेवा करु लागतात. एक सन्यासी अंथरुन हातरतो, दुसरा पाय चेपुन देतो... अशा प्रकारे सगळे आपला क्रोध विसरुन बुद्धाची सेवा करु लागतात. तथागत भगवान बुद्धाच्या करुणेचा हा प्रभाव असतो. अन बुद्ध धम्मातील पहिलं प्रवचन सुरु होतं. तथागतानी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर दिलेलं हे पहिलं धम्म-प्रवचन... या प्रवचनाला धम्मचक्रप्रवर्तनसुत्त म्हणुनही ओळखले जाते. बुद्धानी दिलेलं हे पहिलं धम्म प्रवचन बरोबर आजच्या दिवशी म्हणजे आषाढ पौर्णिमेला झालं होतं. हे प्रवचन ऐकुन पाचही सन्यास्यांचे मतपरिवर्तन होते अन त्या पाचही जणानी बुद्धाला गुरु म्हणून स्विकारलं. धम्मातील मुख्य प्रचारकांच्या गुरुदिक्षेचा हा दिवस. त्या नंतर हे पाचही सन्यासी धम्म दिक्षा घेऊन बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी आयुष्य झोकुन देतात. आज आपण जो बौद्ध धम्म पाहतो त्याची सुरुवात अशी झाली. संघ म्हणुन ज्याला आपण सरणं जातो त्या संघाची सुरुवातही आजचीच. म्हणजेच आषढ पौर्णिमेची. 
म्हणुन बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व असून आपण सगळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन पाळतो.
सर्वाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

जयभीम
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा