शनिवार, ६ जुलै, २०१३

इन्स्पेक्टर त्रिवेदी: पोलिस स्टेशन दामरेंचा.१९९३ ची गोष्ट. मी भगवंतराव वसतीगृह एटापल्ली येथ राहात होतो. आमच्या वसतीगृहाच्या अगदी पुढच्या इमारतीत बाजीराव सिडाम नावाचा पोलिस हवालदार राहायचा. हळू हळू त्याच्याशी ओळख झाली तेंव्हा हा सिडाम पोलिस आमच्या जवळचाच निघाला. मग आमची चांगलीच गट्टी जमली. मी याला सिडाम साहेब म्हणायचो. मी कित्तेकवेळा या सिडाम साहेबांकडॆ जेवायचो. कधी तिथेच मुक्कामी असायचो. अन काही दिवसातच सिडामची बदली झाली. सिडाम फार वैतागला होता. काय झालं म्हणून चौकशी केल्यावर कळलं की बदलीमुळे वैतागला होता. कारण या सिडामची बदली दामरेंचा पोलिस स्टेशनला झाली होती. हे दामरेंचा गाव मन्नेराजाराम-कोडसेपल्ली-येरमणार-पेरमेल्ली या मार्गावर आहे. हे गाव अत्यंत दुर्गम भागात असून दामरेंचाला जाण्यासाठी येरमणार नंतर फक्त पायवाट होती. हा सिडामा आमच्या रानातला माणूस असून सुद्धा दामरेंचा म्हटलं की वैतागला होता. यावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे गावं किती दुर्गम भागात होतं. आता दुर्गम भाग म्हटल्यावर नक्षलग्रस्त असणार हे आलचं.
याच दरम्यान दामरेंचात त्रिवेदी नावाचा पोलिस इन्स्पेक्टर मुंबईतून दाखल झाला. तेंव्हा नागर का नांगर आडनावाचे पोलिस इन्स्पेक्टर अहेरीत होते. ते स्वभावाने अत्यंत सौम्य व मृदूभाषी. त्यामुळे अहेरीत नुसता घॊळ चालायचा. त्यातल्या त्यात धर्मराबबाबा आत्रमचं हे गावं. मग आत्रामचे जवळचे सगळे पोलिसांवर चढायचे. अशा वेळी त्रिवेदी नावाचा एक तडफदार अधिकारी दामरेंच्याला येऊन थडकला (अहेरीशी याचा काही संबंध नाही तरी नंतर दामरेंच्याला बसून अहेरीला शिस्त लावण्याचं काम त्रिवेदीनी पार पाडलं). तेंव्हा प्राणहिता कार्यालय नुकतेच सुरु झाल्याचे आठवते. मग अधे मधे हे त्रिवेदी अहेरीला येत. आमचा सिडाम दामरेंचाला असल्यामूळे कधी कधी सिडाम सोबत त्रिवेदीही सिडामच्या खोलीवर येत. मी सर्वप्रथम या त्रिवेदीना सिडामच्याच घरी पाहिलं.
त्रिवेदीनी दामरेंचाला हजेरी लावल्यावर पहिलं काम हातात घेतलं ते म्हणजे येरमणार मार्गे दामरेंचा पर्यंतचा रस्ता तयार करण्याचं. मग काय मजूर मिळेनात, कारण नक्षलावाद्यांचा दबाव. पण त्रिवेदीही काही कमी नव्हता. त्यानी गावा गावात शिरून लोकांची पिटाई शुरू केली. रस्त्याच्या कामाला आला नाही तर हातकड्या लावीन असा दम भरत बदड बदड बदडून  काढलं.  प्रत्येक घरातून किमान एक मजूर आलाच पाहिजे अशी अट घातली. आता मात्र लोकांत दहशत पसरली. इकडे नक्षलवादी तर तिकडे त्रिवेदी. निरुपाय अन हताश झालेला रानातला माणूस रस्ता बनविण्याच्या कामावर हजर झाला. हा हा म्हणता पेरमिली-दामरेंचा रस्ता तयार झाला. लोकाना मजूरी मिळाली. या निमित्ताने थोडे पैसे आले. मग लागलीच मोहाच्या दारूचा पूर वाहू लागला. जेंव्हा त्रिवेदीला हे कळले तेंव्हा त्रिवेदीनी दारू काढणा-यांची आधी धुलाई केली. मग दारू काढणे बंद झाल्यावर दारू पिणेही बंद झाले. तरी लपून छपून दारु काढणे सुरुच होते. मग अशा वेळी पिणा-याना झोडपूण काढण्याची मोहीम सुरु झाली. त्रिवेदीची एवढी दहशत बसली की दारु पिणा-या अट्टल बेवड्याण्यानी सुद्धा दारू सोडली. त्या दरम्यान दामरेंचा हद्दीत ही मोठी क्रांती घडून  आली होती. बेवडा सोडणे म्हणजे गंमत नव्हे, पण ते त्रिवेदीच्या धाकापायी झालं.  करड्या शिस्तीचा व कठोरपणे नियम राबविणारा हा त्रिवेदी आंधळा नव्हता. त्यानी काही दिवसात तिकडची जिवन पद्धती अभ्यासली अन त्याच्या लक्षत आले की ईथला राना-वनात हिंडून काम करणारा व बारोमास राबणारा आदीवासी दिवसभराच्या कष्टातून थकून जातो. मग सायंकाळी थोडी दारू पिणे याची गरज आहे.  अन त्रिवेदीने वयस्काना दारू पिण्याची सूट दिली. तरूण पोराना मात्र सक्तीची बंदी होती.  म्हातारे पोतारे परत एकदा दिवस भराच्या कष्टातून घरी आले की दारू पिऊ लागले.
हे सगळं करताना त्रिवेदीनी तिथल्या तरुणांवर लक्ष केंद्रित केलं. तरुण पोरं दारू पिऊन दिसली की लगेच स्टेशनला हजेरी सुरु व्हायची. सुरुवातीच्या काळात फटके घालून दहशत निर्माण केल्यामूळे तरूण तसा बिचकूनच राहायचा. मग नुसतं त्रिवेदीचं नाव घेतलं तरी कित्येक गोष्टींचा निकाल लागायचा. जिथे माणसं आहेत तिथे गुंड वृत्ती आलीच. मग हे असले गुंड शोधून शोधून ठेचण्याचे काम त्रिवेदीने पार पाडले. शिकणा-या पोरांसाठी त्रिवेदी नेहमी मदतीचा हात देत असे. नवरा बायकोच्या भांडणाचे प्रकरण एकदा त्रिवेदीकडे गेले की आधी नव-याची धुलाई व्हायची. मग काय तो तपास व्हायचा.  यातून बायकांना धीर मिळत गेला व नवरे वटणीवर येऊ लागले. अत्यंत बेशिस्त असलेल्या  दामरेंचा भागाला त्रिवेदीनी वर्षभरात शिस्त लावली. सुरुवातीला मारझोड करुन प्रचंड दहशत निर्माण करणारा हा अधिकारी नंतर स्थानिकांशी कमालीचा संवेदनशिलतेने वागू लागला. मला वाटते ही त्याची स्टाईल होती.  पण अन्याय अत्याचार दिसला की परत त्याच्यातील लावा उसळायचा. मग कित्येकाना त्याची झड बसायची. पण एक गोष्ट मात्र लोकांना कळली की हा अधिकारी इतर अधिका-यांसारखा नाही. लोकांशी संवाद साधणारा, व त्यांच्या अडचणी समजून घेणारा. तसेच बदल घडवून आणण्याची आतून तळमळ असणारा हा सच्चा अधिकारी लोकाना वर्षभरातच आपलासा वाटू लागला.
थोडक्यात आजवर रानातला माणूस पोलिसांपासून दूर धावत होता, पण त्रिवेदीनी प्रवाह उलटा फिरवून दाखविला. आता किमान दामरेंचा भागातील लोकं तरी अडचणीच्या वेळी त्रिवेदीकडॆ धावू लागले होते. त्रिवेदीचा चांगुलपणा व त्याची दहशत दोन्ही आसपासच्या इतर पोलिस हद्दीत पोहचल्या होत्या. आमचं कुडकेल्ली तसं भामरागड हद्दीत येतं, पण त्रिवेदीच्या नावनी आम्हीही घाबरायचो. मी तेंव्हा अहेरीत होतो. अहेरी गाव त्रिवेदीच्या हद्दीत नव्हतं, तरी त्रिवेदीचे किस्से मात्र अहेरीत ऐकू येत होते. चौकात खर्रा खात हिंडणारे  व दारू पिऊन धुडघूस घालणारे काही तरूण एकदा त्रिवेदीच्या तावडीत सापडले. तो त्रिवेदी होता........अहेरी आपल्या हद्दीत येत नाही वगैरे तांत्रिक गोष्टी नंतर, आधी मस्तवाल तरुणांना धडा शिकवून कायदेशीर बाबींच नंतर पाहू अशा गणिताचा त्रिवेदी. मग काय त्रिवेदीनी आपली गाडी थांबविली अन अहेरीच्या भर चौकात पोरांची पिटाई सुरु केली. नुसती पिटाई केली नाही तर फिल्लमबाजी टाईप यांची वरात भर चौकातून अहेरी पोलिस स्टेशन पर्यंत काढली. त्या नंतर अहेरीही हादरलं. त्रिवेदीची गाडी अहेरीत दिसली की पुढचे काही दिवस चौकतला तमाशा बंद व्हायचा. इथे अनेक किस्से घडले त्यातला एक असा. 
बाबुराव शेठ...
आमच्या अहेरीत बाबूराव नावाचा एक गुंड होता. अहेरीच्या तेलगू टाकीजमध्ये हा ब्लॅकनी तिकीटं विकायचा.  मग त्याच्या जोडीला तिथली काही राडेबाज पोरं होतीच. या सगळ्यांची गांधी चौक व परिसरात दहशत होती. अहेरीचे पोलिस याच्याकडून हप्ता घेत असल्यामुळे बाबूराव अधीकच माजला होता. ही लोकं मग छोट्या मोठ्या चो-याही करायची. एकंदरीत बाबूराव गॅंगचा प्रताप वाढतच जात होता. या बाबूरावला आवर घालणारा कोणीच दिसत नव्हता. अन एक दिवस त्रिवेदी दामरेंचावरुन निघाला खरा पण अहेरीत येईस्तोवर मध्यरात्र झाली. जेंव्हा त्रिवेदीची गाडी गांधी चौकातून जात होती तेंव्हा बाबूराव व गॅंग चबूत-यावर बसून दारु पित होते. झालं त्रिवेदीने गाडी थांबवून बाबूरावचां बॅंड वाजविला. हातपाय बांधून तीन दिवस अंधा-या कोठडीत डांबून ठेवलं, तीन दिवस तडफल्यावर सोडून देण्यात आले(हे ऐकीव). त्रिवेदीचा हात पडल्यावर बाबूराव सुता सारखा सरळ झाला. “या पुढे तू मला या चौकात दिसायचं नाही, कळलं”  जेंव्हा त्रिवेदी बाबूरावला शेवटची वॉर्निंग देत होता तेंव्हा बाबूरावनी हळूच विचारलं “मग मी काय करु साहेब, तुम्हीच काहीतरी सुचवा!” अन त्रिवेदी थबकलाच. त्याच्या लक्षात आलं की नुसतं बदडणे हा काही उपाय नाही. बाबूरावचा प्रश्न रास्त होता. जरा वेळ विचार करुन त्रिवेदी म्हणाला “पुढच्या आठ्वड्यात तू मला अमूक ठिकाणी भेट, मी सांगतो काय करायचं ते” अन त्रिवेदी निघून गेला. मधल्या काळात त्रिवेदीनी बाबुरावची सोय केली. जेंव्हा बाबूराव त्रिवेदीला भेटला तेंव्हा त्रिवेदीनी बाबूरावला काही पैसे दिले व खाणावळ चालु करण्यासाठी एका ओळखीच्या माणसाची जागा उपलब्ध करु दिली.  बाबूरावनी मन लावून खाणावळ चालविली. 
१९९५ ला जेंव्हा मी अहेरी सोडली तेंव्हा ही बाबूरावची मेस नंबर वन मेस बनली होती. दारु पिणे कंप्लिट बंद झाले होते. अधून मधून त्रीवेदी साहेब बाबूरावच्या खाणावळीत येवायला येत असत. मी ही कित्येकवेळा या खाणावळीत जेवलो. बाबूरावच्या हातला अप्रतीम चव होती. बाबूरावच्या जिवनात त्रिवेदीने मोठा बदल घडवून आणला होता. कष्टातून पैसा तर कमावलाच पण बाबूराव आता बाबूराव शेठ झाला होता.
अशा अनेक बाबुरावाना मार्गी लावणारा पोलिस अधीकारी त्रिवेदी आज कुठे आहे  माहित नाही. या आधी व या नंतर येणारे जवळपास सगळेच अधिकारी खोट्या केसेस दाखल करुन आदिवासीना नक्षलवादी ठरविण्यात धन्यता मानत आलेत. कित्येक निर्दोषाना कोठडीत पाठविण्यात आले. पोलिस-स्थानिक संवाद पुर्णपणे तोडून टाकणारे व आदिवासींची प्रचंड पिळवणूक करणारे अनेक अधिकारी आलेत व गेलेत. पण त्रिवेदी मात्र निराळा होता. तो स्थानिकांशी व आदीवासींशी न्याय्य वागला. नक्षलवाद्यांशी कठोरपणे लढला. कधीतरी त्याचे इतर किस्सेही लिहेनच. आमच्या भागातील अनेक लोकं आजही त्रिवेदीचं नाव घेतात. अभार मानतात. मी ही या त्रिवेदीचे आभार मानतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा