शुक्रवार, १२ जुलै, २०१३

सेक्युलरिज्म आणि सर्वधर्म समभावची गल्लत

सेक्युलरिज्म व सर्वधर्म समभाव या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्याकडे सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव असा अर्थ लावल्या जातो. सर्वप्रथम सेक्युलर हा शब्द १८५१ मध्ये ब्रिटिश विचारवंत जॉर्ज जॅकॉब होलीओक यानी वापरला. सेक्युलर या शब्दाची पाळंमुळ ग्रीक तत्वज्ञानात सापडतात. सेक्युलर या शब्दाचा अर्थ आहे  निधर्मी, म्हणजे ज्याला कोणताच धर्म मान्य नाही तो. धर्म व धर्मावादी गोष्टी नाकरणारा सिद्धांत म्हणजे सेक्युलरिज्म. १८५१ पासून जी सेक्युलर शब्दाची लाट उसळली ती जगभर जाऊन आदळली. त्या काळात कम्युनिस्टांची चलती होती. कम्युनिजमचा स्वतंत्र सिद्धांत होता तो म्हणजे निधर्मी व कामगारांची हुकूमशाही. ज्याना कामगारांची हुकूमशाही पटत नव्हती पण स्वत:ला पुढारलेला म्हणवून घ्यायचे होते ते स्वत:च्या वैचारीक वारस्याचं बारसं करत “आम्ही सेक्युलर” असं म्हणू लागले. भारताची तर चक्क धर्माच्या नावावर फाडणी झाल्यामुळे इथल्या व्यवस्थेवर धार्मिक ठपका बसलाच होता. नवीन सरकारपुढे तो पुसून टाकण्यासाठी दोन मार्ग होते एक कम्युनिजम जे बाबासाहेब, गांधी व नेहरू सारख्या विचारवंताच्या तटबंदीला कधीच भेदू शकले नाही. दुसरं सेक्युलरिजम. मग झालं सेक्युलरिजमचं गुणगाण.
मग काय, जिकडे तिकडे सेक्युलरिजमचं कौतूक सुरु झालं. प्रचारात नेते स्वत:ला सेक्युलर म्हणवुन घेऊ लागले. मुसलमान व दलितांची मतं मिळविताना आम्ही सेक्युलर वगैरे भाषणबाजी सुरु झाली.  भाजपं व हिंदूवादी कसे सेक्युलर नाहीत हे सांगताना स्वत:च्या सेक्युलरिजमचा ढिंडोरा पिटल्या जाऊ लागला. अन मागच्या ५०-६० वर्षात सेक्युलरिज्मचा अर्थ सर्व धर्म समभाव असा होऊन बसला.
परवा पल्लवी पाटील नावाच्या एका बाईशी चर्चा करताना तिनी मला प्रश्न विचारला “जर तुम्ही सेक्युलर आहात तर मग सगळ्याच धर्मांची व देवतांची पुजा करायला हवी...” अन मी उडालोच.  कारण इथे सेक्युलरिज्मचा अर्थ सर्वधर्म समभाव असा भलताच घेतला जातो. जे की चूक आहे.
सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव नसून निधर्मी असा त्याचा अर्थ आहे. भारतीय संविधानही सर्वधर्म समभाव जपत नाही तर तो निधर्म जपतो. अन्यथा सर्व धर्माना जपता जपता हा संविधान कधी मुस्लीम, कधी इसाई तर कधी भगवा असे अनेक रंग धारण करत गेला असता. आमचा संविधान हा सर्वधर्म समभाव जपणारा नसून तो निधर्म जपतो. ज्याना धर्म जपायचेच आहे त्यानी आपल्या घरात जपावा असे म्हणतो.
आता आंबेडकरवादी सेक्यूलर की सर्वधर्म समभाव वाले? हा प्रश्न येतो.
आंबेडकरवादी हे सर्वधर्म समभाव जपत नाही व सेक्युलरही नाहीत. कारण बाबासाहेबानी आम्हाला बौद्ध धम्म दिला. याचाच अर्थ दुसरा धर्म जपणे आम्हाला अमान्य आहे. आंबेडकरवादी हे बौद्ध धम्म जपत असल्यामुळे हा समाज धार्मिक समाज आहे. याचाच अर्थ निधर्मीचा लेबल आम्हाला चिकटूच शकत नाही. म्हणजेच कुठल्याही किंमतीत आम्ही सेक्युलर नाही. अन सर्व धर्माना समान माणणे तर निव्वड मुर्ख संकल्पना आहे. कोणी घरात सगळे धर्म पाळणे केवळ हास्यस्पदच ठरेल. थोडक्यात सांगायचं तर आंबेडकरवादी हा सेक्युलरही नाही व सर्वधर्म समभावही मानत नाही. कारण सेक्युलर बनला तर बौद्ध धम्म सोडावा लागेल व सर्व धर्म समभाव म्हटल्यावर घरात गणपती, विष्णू, शिव, येशू, अल्ला, बुद्ध सगळे एका रागेंत बसतील....
मग आंबेडकरवादी निधर्मी(सेक्युलर) नाही व सर्वधर्म समभावही जपत नाही तर मग ते काय जपतात?

आंबेडकरवादी स्वातंत्र्य, समता व बंधुता जपतात.

जमल्यास तुम्हीही जपा. अन यापुढे सेक्युलर व सर्वधर्म समभाव यात गल्लत न करता या दोन शब्दातील भेद लक्षात ठेवा.

जयभीम.
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा