गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

साहित्य सम्राटाच्या जयंतीच्या शुभेच्छा!आण्णाभाऊ साठेंची आज जयंती. योगायोग म्हणजे आजच टिळकांचा स्मृतीदिन. १ ऑगष्ट १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला अन अगदी त्याच दिवशी म्हणजे १ ऑगष्ट १९२० ला आण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. दोघेही प्रखर राष्ट्रवादी, चळवळे आणि साहित्यिक. टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहेची हाक देत उभा देश पेटवुन दिला तर आण्णाभाऊनी ’ये आजादी झूठी है, यंहा की जनता भुकी है’ चा नारा दिला. आण्णाभाऊ आयुष्यभर दलितांसाठी(कम्युनिस्टांच्या छावणीतून, आंबेडकरी नव्हे) लढले व तळागळातल्या लोकांच्या व्यथा साहित्यातुन मांडत राहिले तर टिळकानी स्वातंत्र्याचा महायज्ञ अखेर पर्यंत चालू ठेवला.  मंडालेच्या तुरुंगात बसुन टिळकानी ’गीतारहस्य’ सारखं अजोड तत्वज्ञानाचा ठेवा निर्माण केला तर “सांगुन गेले भीमराव..” सारख्या अजरामर ओळी आण्णाभाऊच्या लेखणीतुन उतरल्या. दोघेही महान व अत्युल्य व्यक्तीमत्व होते. त्यांचं स्वत:चं तत्वज्ञान होतं. जिवनातील ध्येय, जगण्याचा उद्देश व वाटचालीचा मार्ग स्पष्ट होता. त्यासाठी हे दोघेही आयुष्यभर लढतही राहीले. आजच्या घडीला त्यांच मुल्यांकन करण हेच मुळात चुकेल. कारण त्या त्या ठिकाणी दोघेही महानच.
अण्णाभाऊ कट्टर कम्युनिस्ट होते हे एक कटू सत्य आहे. बहुजन नेत्यानी वा लेखकानी आण्णाभाऊंचं थोडफार का होईना उदात्तीकरणच केलं हे मान्य करावच लागणार.  आण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांच्या हयातीत कधीच आंबेडकर चळवळीचा भाग नव्हते. आज आम्ही कितीही छाती बळवली तरी खरं ते खरच. आण्णाभाऊनी आयुष्यातील उमेदीचा काळ कम्युनिस्ट चळवळीत घालविला. बाबासाहेब तर कट्टर कम्युनिस्ट विरोधी. म्हणजे ओघानेच आण्णाभाऊ हे बाबासाहेबांचे विरोधक होते.  जेंव्हा हा देश स्वतंत्र झाला व बाबासाहेब तिथे दिल्लीत बसून देशाच्या पुढच्या वाटचालीची दिशा ठरवत होते तेंव्हा अण्णाभाऊ मात्र मुंबईच्या शिवाजीपार्कच्या सभेतून “ये आझादी झुठी है...” चा नारा देत होते. केवढा हा विरोधाभास.  कम्युनिस्टांच्या छावणीतून आण्णाभाऊनी दिलेला प्रत्येक हुंकार हा आंबेडकरी चळवळीला पोळुन काढत होता. कारण कम्युनिस्टानी नेहमीच बाबासाहेबांची कोंडी करण्याची भुमिका घेतली होती. याचाच अर्थ आण्णाभाऊनीही या कार्यात थोडा का होईना हातभार लावलाच होता. पण सुदैवाने देर आये दुरुस्त आये... म्हणतात तसं शेवटी शेवटी अण्णाभाऊना कम्युनिस्टांची चळवळ कशी आत्मघातकी आहे हे लक्षात आले अन शेवटी का होईना पण कम्युनिस्टाना जयभीम ठोकून अण्णाभाऊ आंबेडकरी चळवळीत उतरले. तो पर्यंत बाबासाहेब गेले होते. असो. 
थोडक्यात आण्णाभाऊनी आपली चूक दुरुस्त केली. ही खूप मोठी गोष्ट होती. आण्णाभाऊंचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरला. अण्णाभाऊंच्या या निर्णयामुळे त्यांचा समाज आंबेडकरी चळवळीशी एकरुप झाला. त्यातुन आंबेडकरी चळवळीची ताकत वाढत गेली. अण्णाभाऊंच्या या निर्णयाला सलाम. अन्यथा आज त्यांचा समाज कम्युनिस्टांच्या मागे फरफटत जाताना दिसला असता.

आज साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची जयंती.  त्या निमित्ताने मी त्याना मानवंदना देतो. 

जयभीम.
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा