मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

वर्णद्वेषाचा फटका ओप्रा विनफ्रेलाही!बाबासाहेब अमेरीकेत शिक्षण घ्यायला गेले त्याला यावर्षी बरोबर १०० वर्षे पुर्ण झालीत. जुलै १९१३ मध्ये बाबसाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरीकेत गेले होते. सहा दशका आधी अमेरीकेत अब्राहम लिंकनच्या नेतृत्वात सिव्हील वॉर झाले तेंव्हा अमेरीकन गोरे दोन गटात विभागले गेले होते. एक गट निग्रॊंच्या बाजूनी होता तर दुसरा गट निग्रोंच्या विरोधात, म्हणजेच गुलांमानी गुलामच राहावे या मताचा. अन त्या नंतर जगाने मानवी संस्कृतीतील सामाजीक स्थित्यांतराचा अभूतपुर्व लढा अनुभवला. बाप पोराच्या विरोधात, आई लेकीच्या विरोधात, नवरा बायकोच्या विरोधात तर भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला होता, लढत होता. कोणासाठी? तर निग्रोना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी. एकाच कुटुंबातीक दोन माणसे परस्पारांविरोधात उभे होऊन एकाने निग्रोच्या मुक्ततेचा हुंकार दिला तर दुस-यानी विरोध केला... हे सगळं अनाकलनीय होतं. साधारणपणे शोषण करणारा समाज कधी शोषीतांच्या बाजूने उभा होत नसतो. पण अमेरीकेत मात्र तसं घडत होतं. अन त्यातून झालेल्या सिव्हील वॉर मध्ये लढणारे दोन्ही बाजूचे गोरे एकमेकांचे सख्खे रक्ताचे होते. अन लढत कशासाठी होते, तर निग्रोना गुलामगिरितून मुक्त करण्यासाठी. ही जगाच्या इतिहासातील अभूतपुर्व घटना होती. त्रैयस्थाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या घरातल्यांच्या विरोधात लढणे आजवर कोणालाच माहीत नव्हते.
सिव्हील वॉर नंतर एका काळ्या नेत्याचा उदय झाला ज्यानी समस्त निग्रों समाजाला अंधारातून खेचून बाहेर काढण्याचे कार्य बजावले, तो नेता म्हणजे बुकर टी. वॉशिंग्टन. पण बुकर टी. वॉशिंग्टननी हे साधताना गो-या लोकांशी केलेली तळजोळ निग्रोंवर अन्याय करणारी नसली तरी स्वातंत्र्य नकारणारी होती. म्हणजेच आजच्या मोजपट्टीत तो अन्यायच ठरतो. तांत्रिक शिक्षण व रोजगाराच्या संध्याच्या बदल्यात त्यानी मानवी मुलभूत हक्काची आहूती दिली होती. जेंव्हा बासाहेब अमेरीकेत शिकत होते तेंव्हा म्हणजे १९१५ मध्ये बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन झाले. अन त्याच दरम्यान आजून एक काळा नेता उदयास आला ज्यानी बुकर टी. वॉशिंग्टनच्या धोरणांवर कडाडून टीका करत ती कशी निग्रोंसाठी अन्यायकार आहे हे विश्लेषीत करत निग्रोंची चळवळ आपल्या बाजुने वळविले. त्या महान नेत्याचे नाव होते डब्ल्यू. ई. बी. डुबोईस.
डुबोईस याचं म्हणणं असं होतं की केवळ तांत्रिक शिक्षण घेऊन व आर्थिक प्रगती साधल्याने माणसाचा विकासही होत नाही व त्याची सामाजीक स्थीतीही बदलत नाही. फार फार तर तो सुखाने खाईल, पण ते पचणार नाही याची जबाबदारी वर्णद्वेषी समाज पार पाडत असेल. तेंव्हा हे मत लोकाना लगेच पटण्या सारखं नव्हतं. कारण नुकतीच गुलामी जाऊन स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आर्थिक विकास हाच सर्वस्वी विकास आहे असा समाज झालेले निग्रो नेते डुबोईस यांच्या मताला केराची टोपली दाखवत असत. या मतावरुन अख्खी निग्रोंची चळवळ दोन गटात विभागली गेली. बुकर साहेबांच्या मते शिक्षण व आर्थिक विकास साधल्याने निग्रोंची अवस्था बदलेल. अन डुबोईसांच म्हणणं होतं की माणसाने कितीही आर्थिक विकास साधला तरी त्यामुळे त्याच्या सामाजिक दर्जात बदल होत नसतो. म्हणजे आर्थिक बदलामुळे सामाजीक दर्जा बदलत नसतोच. मुलभूत मानवी हक्क हे आर्थिक निकषावर उभे नसून त्यासाठी सामाजीक संस्कार व्हावा यासाठी डुबोईस झगडत होते. बाबासाहेबानी अगदी डुबोईसांच्या गड्ड्य़ावर (जिथून ही चळवळ चालवली जाई ) जाऊन या दोन विरुद्ध विचार प्रवाहाचे निरिक्षण, चिंतन व मनन केले. त्यातून पुढे त्यानी भारतात अस्पृश्य निवारणासाठी डुबोईसांच्या मताला झुकते माप देत बौद्ध धर्माच्या रुपात सामाजीक व धार्मिक संस्कारातून समाज परिवर्तन घडवून आणले.
तर माझा मुद्दा असा होता की डुबोईस विरुद्ध वॉशिंग्टन अशी वैचारीक लढाई सुरु झाली अन अमेरीकेतील निग्रोंचा एक गट मुलभूत मानवी हक्काच्या लढाईसाठी उभा झाला. पण वॉशिंग्टनचा “तांत्रिक शिक्षणातून आर्थिक विकास” सिद्धांताच्या घोंघावणा-या वा-यामध्ये उभा अमेरीकन निग्रो बहिरा झाला व आर्थिक विकासाच्या मागे धावला. पैसा आला अन त्यामुळे काळ्य़ा लोकांच्या अंगावर चांगले कपडे आले. चहाच्या मळ्यातून स्वत:च्या फ्लॅट मध्ये स्थलांतर झाले. अन हा हा म्हणता १०० वर्षे उलटली. वर वर पाहता आर्थिक विकासाच्या छान-छोकीमुळे निग्रोंची प्रगती झाली असे वाटते पण ते खरे नाही.   Trayvon Martin नावाच्या सतरा वर्षाच्या तरुणाची हंत्या करण्यात आली होती व ती केस सध्या अमेरीकेत प्रचंड गाजत आहे. या हत्तेनंतर अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षानी अमेरीकेत अस्तीत्वात असलेल्या वर्णवादाची जाहीर कबूली दिली.  स्वत: ओबामाना त्यांच्या विध्यार्थी दशेत कसे वर्णवादाचे चट्के बसले हे सांगताना अध्यक्षीय पदाचे भान अले  व सारवा सारव करत ओबामा म्हणाले “माझ्या पोरीना माझ्या एवढा त्रास होत नाही तेवढाच काय दिलासा वाटतो” म्हणजे कमी प्रमाणात का होईना ओबामाच्या पोरीनाही वर्णद्वेषाचा फटका बसतोच आहे ही ती अप्रत्यक्ष कबूली होती. याचाच अर्थ आर्थिक विकासातून समता रुजत नसते. त्यासाठी सामाजीक समतेचा कार्यक्रम राबविणे हाच काय तो पर्याय असतो. अन हा पर्याय शंभर वर्षा आधी डुबोईसनी सांगितला होता. आर्थिक विकासातून सामाजीक समता येत नाही हे डुबोईसचे मत आज १०० वर्षानी १००% खरे ठरत आहे. कारण जिथे राष्ट्राध्यक्ष अशी कबूली देतो तिथे इतरांचे काय!

आता मागच्याच आठवड्यातील घटना बघा. ओप्रा विनफ्रेबाई एका स्विझर्लंड मधील दुकानात पर्स घ्यायला गेल्या होत्या. एका माहागड्या पर्सकडे हात दाखवून बाई “ती पर्स दाखव” म्हणाल्या. तर दुकानात काम करणा-या गो-या सेल्सगर्लनी काळ्य़ा ओप्राबाईला थेट नकार देत “तुम्ही ती पर्स घेऊ शकत नाही” असे सुनावले. अन त्याच बरोबर कारणही पुढे केले की त्या पर्सची किंमत २२,५००/- युरो असल्यामुळे तुम्हाला ती पर्स परवळणार नाही. ओप्राबाई ही ३ बिलीयन डॉलरची धनाढ्य स्त्री असून रंगाने काळी असल्यामूळे तीला साडॆबावीस हजाराची पर्स घेता आली नाही. बिचारी ओप्रा हा सगळा अपमान गिळून निमूटपणे दुकानाबाहेर पडली. परत एकदा डुबोईस आठवले. आर्थिक विकासातून सामाजीक खरखटं धूता येत नाही. नाहीतर काय मजाल की तीन बिलीयनच्या मालकीनला कोणी दुकानातून वस्तू न देता हाकलावे....
अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कबूली व ओप्रा विनफ्रेसोबत घडलेली घटना. या दोन्हीतून हेच सिद्ध होते की केवळ आर्थिक विकास होऊन चालत नसते तर त्यामुळे प्रतिगामी समाजानी आपले बुरसटलेले विचार बदलणे जास्त गरजेचे आहे. आर्थिक समतेतून सामाजीक प्रश्न सुटत नसतात पण सामाजीक समता आल्यास आर्थिक प्रश्न आपोआप मार्गी लागतील हे बाबासाहेबांचे मत आज खरे ठरत आहे.


 जयभीम
 ***


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा