बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

नक्षलवादावर एकमेव उपाय, आंबेडकरी चळवळ!

डॉ. सत्यपाल सिंगानी नक्षलवादावर तोडगा म्हणून “नक्षलवाद्याना अनुकूल गावाना दंड ठोठावण्याचा” पर्याय सुचविला असून स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे. ऐंशीच्या दशकात सत्यपाल सिंग गडचिरोलीत होते अन त्या अनुभवावरुन सिंगानी हा दिव्य उपाय सुचविला आहे. सत्यपालाना परिस्थीतीच एकुन जाणीव दिसत नाहीये. किंवा गडचिरोलीत पोस्टींग असलेल्या काळात त्यानी ती जाणूनही घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. अन्यथा त्यांच्या तोंडातून अशी गोमुत्राची ओकारी बाहेर पडली नसती. दुखण बेंबीला व औषध शेंडीला हा महाराष्ट्रपोलिसांचा जुना प्रताप आहे. तो परत एकदा सत्यपाल सिंगाच्या वरील लेखातूण प्रतिबिंबीत झाला एवढेच. नक्षलवाद काय आहे? तो कसा अस्तित्वात आला? त्याची एकंदरीत कार्यपद्धती काय? त्याना मदत करणारे स्वेच्छेनी करतात की जिवाच्या भितीपोटी करतात? अशा अगदी मुलभूत गोष्टी सत्यपालरावानी अभ्यासलेल्या दिसत नाहीत. म्हणजे गडचिरॊलीच्या पोस्टींगच्या दरम्यान सत्यपालरावानी तुपाची पोळी खाऊन ढेकर देण्यापलिकडे दुसरे काही केलेले दिसत नाही. पोलिस हा कामचोर व जनतेचा लुटारु आहे ही प्रतिमा सत्यपाल सारख्या लोकांमुळे अधिकच बळकट होत जाते अन त्यातून सामान्य माणूस पोलिसांशी संवाद तोडून टाकतो. आमच्या गडचिरोलीच्या रानातही हे झाले आहे. पोलिस व सामान्य माणसाचा संवाद कधीच तुटला असून हे दोन घटक जेंव्हा आमने सामने येतात तेंव्हा पोलिसांच्या नजरेत मग्रूरी असते जर जनसामान्याच्या उरात धडकी. हे चित्र बदलायचे तर पोलिस व सामान्य नागरीकात संवाद निर्माण होणे अपरिहार्य आहे. पण सत्यपालांसारखे अधिकारी जोवर पोलिस सेवेत आहेत तोवर हा संवाद जुडणे तर दूर पण ते एकमेकासमोर माणूस म्हणून उभे होणे सुद्ध अशक्यप्राय आहे.
 जो माणूस “इंडयन पोलिस जर्नल” सारख्या नियतकालिकेतून दिवाळखोरी दर्शविणारा प्रस्ताव माडू शकतो त्याच्या हातून वा त्याच्या विचाराशी सुसंगत पोलिस टीमच्या हातून भरीव कार्याची मुळात अपेक्षाच धरता येत नाही. हातात शस्त्र धरुन उभी ठाकलेली नक्षल्यांची टॊळी अन्न पाणी मागत असेल तर कोणाची छाती होणार “नाही” म्हणण्याची. शस्त्राच्या धाकापायी दिलेली मदत व स्वेच्छेनी केलेली मदत यात कायद्याच्या मोजपट्टीने फरक सापडत नाही का? जर सापडत असेल तर मग सत्यपालानी तोंडातून असे गोमूत्र ओकण्याआधी  चार पाने चाळायला काय हरकत होती?
नक्षलवादी चळवळ ही मुळात दलितांची पिढीतांची चळवळ आहे. फक्त फरक एवढाच आहे की ती ब्रम्हो-कम्युनिस्टानी चालविली आहे. ज्या चळवळीला ब्राह्मणी विचाराचे म्होरके लाभले ती चळवळ या देशाला सदैव शाप ठरली आहे. नक्षलवादी चळवळीचेही तेच झाले आहे. कम्युनिस्टांच्या नेतृत्वात उदयास आलेली ही चळवळ दलितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढविली जात आहे. यावर एक सोपा उपाय आहे. चळवळीतले खालचे कार्यकर्ते म्हणजे खांद्यावर बंदूक घेऊन रानात हिंडणारे जवळपास सगळेच पिढीत वर्गातले दलित आहेत. वैचारीक दिशाभूल करुन दलित वर्गाला ब्रम्हो-कमुनिस्टानी सरकारच्या विरोधात उभे केले आहे हे सत्य आधी मान्य करायचे. म्हणजे आजार काय ते एकदाचं ठरलं की उपायाचे मार्ग दिसतील तरी. जिथे-जिथे नक्षली चळवळीला बाळसे चढले आहे तिथे आंबेडकरी  विचार पोहचला नाही ही अत्यंत महत्वाची गोष्ट आजवर कोणीच कशी हेरली नाही याचं नवल वाटतं. नक्षली चळवळ ही दिलितांची चळवळ असून आंबेडकरी विचाराच्या अभावामुळे वाट चुकलेलं ते दलित वादळ आहे. बाबासाहेबांचा विचार जिथे पोहचला नाही तिथे ब्राह्मणानी उडी टाकली व दलितांच्या हातात शस्त्र देऊन संविधान विरोधी कृत्यात उतरविले. ब्रम्हो-कम्युनिस्टानी सांगितलेल्या साम्यवादी तत्वज्ञानाला चिकटून बिचारा दलित मागच्या चार-पाच दशकापासून निष्कारण लढतो आहे.
बंदूकीच्या गोळीनी ही चळवळ संपविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण त्यामुळे नक्षली चळवळ अधीक उग्र होत आहे हे आपण मागच्या तिसेक वर्षात अनुभवतोच आहे. हजारो पोलिस व अर्धसैनिकबले भामरागडच्या रानात दिवस रात्र राबत असून सुद्धा नक्षली चळवळ संपता संपेन. उलट ती अधीकच हिंस्र बनत गेली. या चळवळीला बंदुकीच्या गोळीने शमविणे अशक्य आहे हे एकदाचे मान्य करा. म्हणजे पर्यायाचा विचार करता येईल. माझं विचाराल तर मी अगदी ठाम आहे की फक्त आंबेडकरी चळवळीचा पर्याय देऊनच ही चळवळ शमविता येईल. 
नजिकच्या तेलंगण्यातील नक्शली चळवळ हद्दपार करण्यात आंबेडकरी चळवळीचा सिंहाचा वाटा आहे. आंध्र पोलिसांच्या गेहाऊंड टीमनी जिवाची बाजी लावत नक्षल्याना पिटाळले असं चित्र रंगविलं जातं जे अर्ध्यसत्य आहे.  केवळ शस्त्राच्या बळावर नक्षली चळवळीचा बिमोड होऊ शकत नाही हे आपण मागच्या चार दशकात पाहतो आहे मग ग्रेहांऊडला ते कसं जमलं? मी म्हणतो अजिबात नाही जमलं. तेलंगणात आंबेडकरी चळवळीचा विचार जसजसा रुजत गेला तस तसा नक्षली विचार कुचकामी ठरत गेला. बाबासाहेबांच्या व बुद्धाच्या विचारापुढे लाल विचार तग धरु शकला नाही. अन त्यातून तेलंगणातील नक्षली चळवळ हद्दपार झाली.  
ज्या लोकांच्या जिवावर नक्षली चळवळ चालविली जाते त्या दलिताना चळवळीपासून परावृत करायचे असल्यास आंबेडकरी विचाराचा प्रचार करणे हाच एकमेव उपाय होऊ शकतो. उध्वस्त आयुष्य जगणारा नक्षली चळवळीत उभा असलेला दलित बंदूकीच्या गोळीला घाबरणारा नक्कीच नाही. पण बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार  केल्यास त्याचे मतपरिवर्तन होऊन तो संविधानिक मार्गाने आयुष्य जगायला तयार होईल. दिशाभूल होऊन नक्षली चळवळीत दाखल झालेल्या दलितांचे बंदुकीने नाही तर आंबेडकरी विचाराने शुद्धिकरण करता येईल. म्हणून म्हणतो, नक्षलवादावर एकमेव उपाय हा आंबेड्करी चळवळच होऊ शकतो!

1 टिप्पणी:

  1. Mr. Ramteke, can you please provide details of Ambedkari Movement in telangana? because if what you are saying is true, then it will be really interesting to spread it across other states. Also Dr. Ambedkar always supported small states. (In his book wirtten in 1955). Creation of Telanagana may be outcome of Ambedkari movement in that area.

    उत्तर द्याहटवा