मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

नरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली


नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्याची बातमी ऐकुन मन सुन्न झाले. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब असून इथल्या समाजाची वैचारीक दिवाळखोरी अधोरेखीत करणारी ही घटना समस्त मराठी माणसाची लाज काढणारी आहे. पुण्या सारख्या शहरात प्रतिगाम्यांचे गुंड एखाद्याच्या खून पाडतात ही घटना अत्यंत निंदणीय असून या भ्याड हल्याचा प्रचंड निषेध! पण नुसत्या निषेधानी काय होणार? आता पोलिसांनी हल्लेखोराना लवकरात लवकर शोधून काढले पाहिजे. नुसतं पकडून चालणार नाही तर पुराव्या अभावी कोर्टातून निसटता येणार नाही अशा पद्धतीने पुराव्यांची शोधाशोध करुन केस भक्कम रित्या मांडणेही तेवढेच गरजेचे आहे.  दाभोळकर हे अंद्धश्रद्धा निर्मूलनाचा लढा उभारुन पुरोगामी महाराष्ट्राला नव्या वाटेवर नेण्यासाठी अखंड लढणारे नि तर्कबुद्धीचा आग्रह धरत परिवर्तनासाठी झगडणारे पुरोगामी चळवळीतील अग्रणी सैनिक होते. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातून अंधश्रद्धेचा कलंक पुसून टाकण्यासाठी चालविलेली दाभोळ्करांची चळवळ प्रतिगाम्यांच्या उरात धडकी भरून गेली. लोकाना लुबाडून खाणा-या आयतोबाना दाभोळकरांची प्रचंड चीड होती. त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मागच्या काही वर्षात प्रतिगाम्याना प्रचंड तापदायी बनत गेली व त्यातूनच सूड उगविल्या गेल्याचे दिसते. सध्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे विधेयक विधान भवनात धूळ खात पडले असून ते पास व्हावे यासाठी दाभोळकर सतत पाठपुरावा करत असत. विचाराचा विरोध विचारानी करण्याची हिंमत नसणा-या भ्याड प्रतिगाम्यानी दाभोळकरांची थेट हत्या केली. अशा लोकांचा केवळ निषेध करुन चालणार नाही तर कठोर कारवाई झाली पाहिजे व त्यासाठी महाराष्ट्रातील काना कोप-यातून पुरोगामी चळवळीने सरकारवर प्रचंड दबाव आणणे हाच काय तो पर्याय दिसतो. झोपण्याचं सोंग आणणा-या शासनाला गदागदा हलविल्या शिवाय ते होणे नाही.
योगायोग पहा, आज जयंत साळगावकरांचाही मृत्यू झाला. दाभोळकर हे महाराष्ट्राला विचार करायला सांगत होते तर याच्या अगदी उलट साळगावकर हे कालनिर्णयच्या माध्यमातून महाराष्ट्रात अंद्धश्रद्धेचा प्रचार करत होते. भिंतीवरील कालनिर्णयच्या रुपात घरोघरी मिनी पंचाग पोहचविण्याचे काम साळगावकरानी केले. दिनदर्शिकेत राषी-भविष्याची बेमालूमपणे घुसळण करुन साळगावकरानी महाराष्ट्राला अंधारात ढकण्याच कार्य बजावले. साळगावकरांचा मृत्यू झाला ही बातमी माझ्यासाठी अनुल्लेखणीय आहे. दाभोळकर उभ्या महाराष्ट्राल तर्कबुद्धीने जगायला सांगत होते तर साळगावकर ज्योतिष वाचायला. दोघांचेही कार्य महाराष्ट्रातल्या काना कोप-यात पोहचले. दोन्ही कार्य दोन परस्पर विरोधी टोकं होते. अन अशा दोन परस्पर विरोधी कार्याचे प्रेरक आज एकाच दिवशी निर्वाणास गेले. असो. आज दाभोळकरांचा खून पडल्याने मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे. इतरांचं माहीत नाही पण दाभोळकरांची चळवळ मात्र अखंड चालू राहील. अन ती चालविण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन पडली. आपण सगळे मिळून त्या त्या पातळीवर जमेल तसे ही चळवळ पुढे नेऊया. हीच दाभोळकराना खरी श्रद्धांजली ठरेल.

मी नरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो!

जयभीम

***

२ टिप्पण्या:

  1. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. याआधी पुरोगामी आधुनिक विचारांची कास धरणाऱ्या किती लोकांवर असे हल्ले झाले आहेत ते तुम्हाला माहिती आहेच. आता त्यांच्या मारेकऱ्यांना जरी शिक्षा झाली तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. त्यापेक्षा ज्या विचारसरणीतून ही हत्या झाली त्या विचारांचा पराभव होणे हे अत्यावश्यक आहे. मारेकऱ्यांना शिक्षा होणे हा कायदेशीर भाग झाला. पण अशा हत्या करण्याची प्रवृत्तीच नष्ट व्हावी यासाठी क्रांतिकारक विचारांची त्सुनामी निर्माण करणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर नथुराम प्रमाणे ह्या मारेकऱ्याची पुण्यतिथी देखील साजरी केली जाईल.

    प्रत्युत्तर द्याहटवा